बुधवार, ३ जून, २०२६

२४७८: आता काय करायचं?


तर त्याचं काय झालं, आजचीच गोष्ट हो.

सकाळी नाश्ता व्यवस्थित झाल्यावर मला एक गोळी नित्यनेमाने घ्यायची असते. मग काय, मी पाण्याचा पेला भरला, गोळी ठेवली होती तेथे गेले. गोळी घेतली डाव्या हातात. अगदी पिटुकली होती ती.

आधी गोळी तोंडात टाकायची आणि मग पाणी प्यायचं. रोजचीच कथा आहे माझी.

पण आज डाव्या हातात गोळी घेतली, उजव्या हातात पाण्याचा पेला. तो पण अगदी व्यवस्थित भरलेला. कारण मला ना... शूऽऽ... कोणाला सांगू नका... पण इतक्याशा नकट्या गोळीला देखील मला पोटभर पाणी प्यावं लागतं. सवय. काय करायचं? आणि माझं पेला भर पाणी पिऊन झालं देखील!

मग मी स्वयंपाकघरात आले. पुढच्या कामाला लागले. तेव्हा अचानक लक्षात आलं...

अगं बाई!

मी पाणी तर प्याले, पण गोळी? ती तर हातातच राहिली होती. देवा, आता काय करायचं? इतकी म्हणजे इतकी हसले मी स्वतःवर. कित्तीतरी वेळ एकटीच हसत बसेल अगदी डोळ्यात पाणी आलं इतक्या वेळ हसले. तिथपर्यंत जाऊन, गोळी हातात घेऊन, पेला भर पाणी पिऊन परत येणं आणि गोळी न घेणं म्हणजे वेगळंच नाही का?

आता कमीतकमी काही वेळ तरी ती गोळी घेणं शक्य नव्हतं. कारण आधीच भन्नाट नाश्ता झालेला, त्यावर पोटभर पाणी प्यायलेलं आणि आता ही गोळी.

बरं, ती गोळी कुठे आठवणीने ठेवली तर ती नक्की विसरणार, ह्याची मला पूर्ण खात्री होती. अगदी माझ्या चार डोळ्यांसमोर ठेवली तरी मी विसरणार हे निश्चित.

मग ती मी एका पिटुकल्या वाटीत विराजमान केली. आणि ती वाटी हातात घेऊनच थोडा वेळ बसून राहिले. टीव्ही बघितला. मधूनमधून वाटीकडे बघितलं. आणि मग एकदाची गोळी घेऊन मोकळी झाले.

प्रचंड अवघड आहे माझं.

मी पाणी पिताना काय विचार करत होते, कुठे हरवले होते, कशात मग्न झाले होते, कोणास ठाऊक.

पण एक गोष्ट नक्की. तिथपर्यंत जाऊन, गोळी हातात घेऊन, गोळी न घेता परत येण्यासाठी देखील एक वेगळंच कौशल्य लागत असावं!

गोळाबेरीज अशी की मज्जा आली. उद्यापासून फक्त गोळीकडे आधी लक्ष द्यायचं आणि मग बाकी.

काही तरी ठोस करावं लागणार. लक्ष द्यावंच लागणार. किंवा... गोळीला स्वतःच मला आठवण करून द्यावी लागणार!

२४७७: आयते / आयतं


ह्या शब्दाचा मला आज एक नवा अर्थ समजला. निदान मला तरी तो नवा भासला.

मी सकाळी उत्कृष्ट, चविष्ट असा चहाचा वाफाळता कप हातात घेतला आणि हा शब्द मला आठवला. "क्या बात है! मस्त आयता चहा मिळाला मला प्यायला. मसालेदार, शिवाय साथीला बिस्किटे, शांतता, कुठलीही घाई नाही. अजून काय पाहिजे?"

मग माझ्यातली मी म्हणाली, "छे छे, हा कसला आयता चहा? हा तर मी स्वतः केला आहे. कोणी करून दिला नाही मला."

चहासोबत, किंबहुना त्या आधीच, मी आपोआप नतमस्तक होते सूर्यबाप्पासमोर, वाऱ्यासमोर, आणखी एका सुंदर दिवसासमोर. तसेच हा चहा ज्यांच्या ज्यांच्या मुळे मला लाभला, त्यांच्या समोरदेखील.

मग त्यात गौमाता आली किंवा म्हैस. संपूर्ण अमूलचे टीम मेंबर्स आले, ज्यांनी मला दूध घरपोच दिलं. शेतकरी आले. चहाच्या मळ्यात काम करणारे कष्टकरी आले. आलं किंवा गवती चहाच्या शेतात राबणारे आले. उसाच्या मळ्यात कष्ट करणारे आले. कारखान्यात काम करणारे आले, जिथे चहा तयार होताना बारीक कण उडतात, साखरेत रूपांतर होताना प्रचंड उष्णता असते. पॅकिंग करणारे आले. घरपोच सामान आणून देणारे आले.

माझे आई-वडील आले. चहा करताना योग्य प्रमाण साधण्यासाठी मदत करणारे माझे डोळे, हात, मेंदू आणि इतर सर्व अवयव आले. गॅस आला, सिलिंडर आला, भांडं आलं, पाणी आलं, गाळणं आलं, काडेपेटी आली आणि तिच्या कारखान्यातील सगळे कष्टकरीदेखील आले.

ही यादी खरंच खूप मोठी आहे. बघा ना, कितीतरी हात राबले, कितीतरी गोष्टी एकत्र आल्या, तेव्हा मला हा चहाचा "आयता" कप हातात मिळाला.

आता सांगा, आहे की नाही अजून एक व्याख्या ह्या "आयतं" ह्या शब्दाची?

आणि खरंच नाही का हो मिळत आपल्याला सगळंच आयतं?

फक्त चहाच नाही. हवा. पाणी. सूर्यप्रकाश. गुरुत्वाकर्षण. अंतर्बाह्य प्रेरणा. ताकद. शारीरिक आणि मानसिक हालचाल. आणि इतर सगळं म्हणजे सगळंच. आयतंच मिळालं आहे आणि मिळतंय आजतागायत. म्हणून कदाचित अजून थोडं शांत, अजून थोडं संयमी, अजून थोडं स्थिर / grounded आणि अजून थोडं नतमस्तक व्हायला होतं मला.

२४७६: मौन


मी तीन-साडेतीन दशकांपासून शिक्षिका आहे. सगळ्या स्तरांवर शिकवले आहे आणि आता देखील थोड्या प्रमाणात शिकवते आहे. त्यामुळे मला ऐकता येतं, पण कमी. आणि त्यातल्या त्यात सुमधुर, ऐकावंसं असं काही असेल तरच खरं ऐकावंसं वाटतं. सुंदर, प्रख्यात, विद्वान असे अनेक वक्ते आहेत आणि त्यांपैकी ठराविकच मला भावतात. बाकीचे पण उत्कृष्टच बोलतात. कदाचित ते मला तितकंसं समजत नसेल असं म्हटलं तरी चालेल.

अलीकडे "मौन" ह्या विषयावर एक व्याख्यान ऐकलं. मला जितकं माहिती होतं, त्यापेक्षा खूपच जास्त मौनाबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल त्या दिवशी समजलं. अर्थातच माझ्या फार आवडत्या अशा आदरणीय डॉ. धनश्री लेले बोलणार म्हटल्यावर काय विचारता? माझ्यामते त्या बोलायला लागल्या की श्रोते अर्थातच मौन बाळगतात. पण ते मौन असं तसं नाही बरं का. संपूर्ण एकाग्र होऊन, कान देऊन, एका जागी बसून केलेलं ते श्रवण. भक्तिभावपूर्ण बोल आणि संपूर्ण आशीर्वादात्मक अनुभूती. असं कानी पडणं म्हणजे सुद्धा भाग्य लागतं हो. इतकी मोठी अभ्यासक किंवा आध्यात्मिक बैठक असलेली मी नाही. त्यामुळे एक पूर्ण दिवस मौन, किंवा त्यापेक्षा जास्त, हे माझ्यासाठी अवघड. त्यामुळे आदरणीय लेले ताईंना तासभर शांतपणे ऐकत बसणं हे देखील माझ्यासारखीला पुरेसं आहे, नाही का? कारण जरी आपण मौनाच्या कारणांमुळे तोंड बंद ठेवलं, तरी सामान्य माणसांची अंतर्गत खळबळ सुरूच राहते. पण लेले ताई बोलायला लागल्या की तसं होत नाही. अंतर्बाह्य मौन पाळलं जातं एक तासाकरता किंवा जितका वेळ त्यांचा कार्यक्रम असेल तेवढा वेळ.

मौन पाळण्यास सुरुवात केली की त्याचा परिणाम ताबडतोब दिसत नसेल कदाचित. त्यामुळे मी पण थांबणार आहे. अजून अनेक विषय लेले ताईंकडून समजावून घेणार आहे. मग नक्कीच ह्या प्रकारच्या मौनाचा परिणाम दिसेल. अर्थात परिणामासाठीच हे चाललंय असं नाही.

अजून एक मौनाचा प्रकार मला आढळला. मी बरेच ऑनलाइन वर्ग घेते. त्यात विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक असतात. ऑनलाइन पद्धतीत समोरचा श्रोता मला दिसत नाही. मी आधी एखादी पद्धत किंवा प्रकार समजावून सांगते आणि मग त्यांना करायला पुरेसा वेळ देते. त्यानंतर जेव्हा मी विचारते, "काही प्रश्न आहेत का?" किंवा "काही अडचणी आहेत का?" तेव्हा अक्षरशः शांतता पसरते. जणू काही कोणीच उपस्थित नाही. मग अनेकदा विचारल्यावर एखादं उत्तर येतं. माझ्यामते हे दोन, चार किंवा सहा तासांचं मौनच नाही का? इतका वेळ मौन पाळणं म्हणजे देखील कमाल आहे. काही विद्यार्थी तर असे असतात की ते बोलत नाहीत म्हणजे नाहीतच. आधी मला जरासा त्रास व्हायचा. त्यांना कळतंय का नाही, हेच समजत नसे. पण आता नाही मी त्रास करून घेत. कारण मला आता मौनाचं महत्त्व पटायला लागलं आहे.

अर्थात आताशा बरेच जण बाह्यरूपाने मौन पाळताना दिसतात. ते बोलत नाहीत, सतत ऑनलाइन काहीतरी पाहत असतात, कधीतरी काही टाइप करतात आणि बाकी संपूर्ण मग्न असतात. ह्या सगळ्यातून त्यांनी अंतर्गत मौन, आंतरिक शांतता, संयम आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी कमवाव्यात म्हणजे मिळवलं. बाहेरून शांत राहून अंतर्गत खळबळ वाढायला नको, एवढंच.

https://www.youtube.com/watch?v=vt2ezz09k6k (Dr Dhanashree Lele's video)

सोमवार, १ जून, २०२६

२४७५: हवा देणे


माझ्या आईचं हे वाक्य मी अनेकदा ऐकलं आहे. किंवा त्या वेळी बऱ्याच जणी म्हणायच्या - साडीला हवा देणे, कपाटाबाहेर काढणे, नेसणे इत्यादी. खूप दिवसांनी बाहेर निघालेल्या साड्या लगेच कळायच्या, कारण त्यांना एक वेगळाच दर्प किंवा सुगंध यायचा.

अजून एक वाक्य सतत कानावर पडत असतं - "सगळं जग बदललंय सध्या."

आणि ह्या जगात माझं स्वयंपाकघरही येतं.

वातावरण, गर्मी, बदलते ऋतू, हवा, पाणी, घरांची रचना, छोटेखानी घरं... अगदी धान्यसुद्धा "कात टाकल्यासारखं" वाटतं कधी कधी. ही यादी खूप मोठी आहे खरं.

स्वयंपाकघरातली कपाटं, त्यांची लाकडं, हवा खेळती राहणं... सगळंच रूप पालटल्यासारखं आहे. त्यामुळे वर्षभर धान्य पुरणं किंवा टिकणं जरा अवघड झालं आहे. म्हणून आज मी सगळे डबे जरा बाहेर काढले आणि उघडे ठेवले. अर्थात, दररोज ह्यांपैकी बरेचसे डबे उघडले आणि पुन्हा बंद केले जातात. पण पावसाळ्याआधी सगळे डबे एकदा असे उघडे ठेवावेत, त्यांना जरा हवा लागू द्यावी असं वाटलं. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते पदार्थ टिकतील, मस्त राहतील, ताजेतवाने राहतील, वास येणार नाही आणि खराब होणार नाहीत.

साडी तर पूर्णपणे निर्जीव. तरीदेखील तिला वास येतो. मग ह्या सजीव पदार्थांना काही फरक पडणार नाही असं कसं म्हणायचं?

अर्थात, सध्या आपण बहुतेक सर्वच हवं तेवढंच सामान आणतो. तरी त्याची मस्त काळजी घ्यावीच लागते. म्हणून आज डब्यांना जरा हवा दिली. आणि लक्षात आलं... टिकवायचं असेल तर फक्त भरून ठेवून चालत नाही. मधूनमधून उघडावंही लागतं. धान्य असो, कपाट असो, की मन.

२४७३: अकाली मोठेपण


एका रिऍलिटी शोमध्ये एक उत्कृष्ट गायिका आहे. गेले अनेक महिने ती टिकून आहे, म्हणजेच तिची गायकी खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यात काहीच दुमत नाही.

ती आणि तिची आई प्रत्येक एपिसोडला असतात. अर्थात, त्यांच्या बद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा कळलं की मुलगी आठ वर्षांची असतानाच वडील दोघींना सोडून गेले. मग अगदी सहज पुढचा प्रश्न विचारला आईला, "मग तुम्ही हिचा सांभाळ कसा केला एकटीने?"

तिच्या आईचं उत्तर ऐकाच मंडळी.

ती म्हणाली, "मी काय हिचा सांभाळ करणार? हिने मला सांभाळलं. ही अगदी त्या छोट्या वयात कार्यक्रम करून पैसे मिळवत होती, म्हणून घर चाललं. तिने सगळं चालवलं. मला सतत धीर दिला. कुठलीही तक्रार केली नाही, हट्ट केला नाही, काहीच नाही. अगदी शहाण्या मुलीसारखं जे होतं त्यात आम्ही दोघी जगलो."

ऐकून काटा आला अंगावर.

माझ्या ओळखी प्रचंड आहेत. त्यामुळे अशाच विषयाच्या बऱ्याच गोष्टी, अनुभव कानावर पडत असतात. त्यातलाच एक प्रकर्षाने आठवला ही आई-मुलीची कहाणी ऐकल्यावर.

एका उच्चशिक्षित कुटुंबात आई कामावर जात होती. ती ऑफिसला जाऊ शकली ती केवळ तिच्या लहानग्या मुलीमुळे. तिने खूप म्हणजे खूपच लवकर घर संपूर्ण सांभाळलं. तिच्या वयाच्या कितीतरी आधीच ती फार मोठी झाली.

आई आज इतकी वर्षं काम करू शकली ती केवळ मुलीमुळे. तिने हिशोब खूप लवकर शिकून घेतला आपोआप. कामवाल्या मावशींशी कसं बोलायचं, त्यांना कामं कशी सांगायची आईच्या गैरहजेरीत, धाकट्या भावाला कसं सांभाळायचं, शिवाय आपला अभ्यास कसा करायचा इत्यादी. सगळं म्हणजे सगळंच.

हे काय कमी होतं म्हणून तिचे वडील येता-जाता फक्त टीका करायचे. काय केलं नाही, कसं चुकलं, फक्त आणि फक्त हेच त्या कोवळ्या पिल्लाला सांगत आले.

अतिशय खराब गेलं तिचं बालपण. किंबहुना, ती जगलीच नाही तिचं बालपण. प्रचंड जबाबदाऱ्या वाटेला आल्या तिच्या आणि तिने त्या उत्कृष्टपणे पेलल्या, निभावल्या. कधीच म्हणजे कधीच ब्र काढला नाही तोंडातून. काय म्हणावं ह्या पोरीला? मी तिच्या पुढे नतमस्तक होते. अत्यंत साधी अशी ती माझ्या मैत्रिणीची लेक.

हजारो वेळा मी त्या बाप्पाकडे प्रार्थना करते आणि करत राहीन की तिला ह्यापुढील दिवस खूप सुखाचे आणि आनंदाचे जावोत. तिला प्रशंसेचे चार शब्द कानी पडोत. ती मुलगी म्हणजे माझ्या दृष्टीने एक अद्भुत व्यक्ती आहे. एक वेगळा अविष्कार आहे. एक वेगळं रसायन आहे, जे आजकाल बघायला मिळत नाही. कमाल आहे ह्या अशा मुलींची खरंच. कसं काय जमतं त्यांना? त्या इतक्या कोवळ्या वयात इतक्या प्रगल्भ कशा होतात? कोणास ठाऊक. अशा मुलींचा विचार जरी मनात आला तरी डोळे पाणावतात ताबडतोब.

भरभरून आशीर्वाद द्या बाप्पा त्यांना. आणि कधीच त्यांच्या मनात "मी कित्ती केलं?" अशी भावना रुजू देऊ नका. त्रास होईल त्यांना.

२४७८: आता काय करायचं?

तर त्याचं काय झालं, आजचीच गोष्ट हो. सकाळी नाश्ता व्यवस्थित झाल्यावर मला एक गोळी नित्यनेमाने घ्यायची असते. मग काय, मी पाण्याचा पेला भरला, गोळ...