माझ्या आईचं हे वाक्य मी अनेकदा ऐकलं आहे. किंवा त्या वेळी बऱ्याच जणी म्हणायच्या - साडीला हवा देणे, कपाटाबाहेर काढणे, नेसणे इत्यादी. खूप दिवसांनी बाहेर निघालेल्या साड्या लगेच कळायच्या, कारण त्यांना एक वेगळाच दर्प किंवा सुगंध यायचा.
अजून एक वाक्य सतत कानावर पडत असतं - "सगळं जग बदललंय सध्या."
आणि ह्या जगात माझं स्वयंपाकघरही येतं.
वातावरण, गर्मी, बदलते ऋतू, हवा, पाणी, घरांची रचना, छोटेखानी घरं... अगदी धान्यसुद्धा "कात टाकल्यासारखं" वाटतं कधी कधी. ही यादी खूप मोठी आहे खरं.
स्वयंपाकघरातली कपाटं, त्यांची लाकडं, हवा खेळती राहणं... सगळंच रूप पालटल्यासारखं आहे. त्यामुळे वर्षभर धान्य पुरणं किंवा टिकणं जरा अवघड झालं आहे. म्हणून आज मी सगळे डबे जरा बाहेर काढले आणि उघडे ठेवले. अर्थात, दररोज ह्यांपैकी बरेचसे डबे उघडले आणि पुन्हा बंद केले जातात. पण पावसाळ्याआधी सगळे डबे एकदा असे उघडे ठेवावेत, त्यांना जरा हवा लागू द्यावी असं वाटलं. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते पदार्थ टिकतील, मस्त राहतील, ताजेतवाने राहतील, वास येणार नाही आणि खराब होणार नाहीत.
साडी तर पूर्णपणे निर्जीव. तरीदेखील तिला वास येतो. मग ह्या सजीव पदार्थांना काही फरक पडणार नाही असं कसं म्हणायचं?
अर्थात, सध्या आपण बहुतेक सर्वच हवं तेवढंच सामान आणतो. तरी त्याची मस्त काळजी घ्यावीच लागते. म्हणून आज डब्यांना जरा हवा दिली. आणि लक्षात आलं... टिकवायचं असेल तर फक्त भरून ठेवून चालत नाही. मधूनमधून उघडावंही लागतं. धान्य असो, कपाट असो, की मन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा