"लक्ष जमिनीवर पाहिजे, नीट खाली बघून चाल, वर बघून चाललीस तर उताणी पडशील..." इति माझी माउली. तिची काही काही वाक्य नेहेमी करता ध्यानात राहिली माझ्या. दोन वेळा मात्र मी मान मोडेस्तोवर वर बघायचे, खूप खूप वेळ. आवडायचं मला ते खूप मनापासून. आणि ते मी कुठेही असली तरी त्यावेळी टाळलं नाहीच. १. म्हणजे विमान, आकाशात उंचच उंच उडणारं आणि माझ्यासाठी प्रचंड कुतुहलाचं असं, २. वैमानिकांचा शो, दरवर्षी असायचा, काय काय वैविध्य पद्धतीने आकार, प्रकार आणि कर्तबगारी करून दाखवायचे ते, अहाहा च.
विमान दिसलं रे दिसलं कि माझी स्वारी थांबलीच म्हणून समजा, का माहित नाही. सगळं हातातलं सोडून ते अदृश्य होईतोपर्यंत न्याहाळणार. हे सत्र सुरु राहील मी विमानात खुद्द बसे तो पर्यंत. मग किंचित त्याची उत्कट इच्छा, आवेग कमी झाला.
परवाची गोष्ट, पुन्हा एकदा नव्याने मी वर बघितलं आणि बघतच राहिले, खूप वेळ, अगदी नव्याने प्रेमात पडल्यासारखे. अर्थात होताच तो इतका अनोखा, बघणार नाही तर काय, प्रश्नच नाही. आणि त्यात मी तांत्रिक क्षेत्रात काम करणारी त्यामुळे त्या न्याहाळण्याला अजून एक कडा होती, खास अशी. इतका लोभस होता तो, ऐकत होता, म्हणेल तस्स वागत होता, त्याला चालवणाऱ्याची आज्ञा शिरसावंद्य असा अविर्भाव जणू, ह्या सगळ्यांमुळे माझी नजरच हटत नव्हती त्याच्या हालचालींवरून. मान मोडेस्तोवर वर बघत राहिले. दिसायला एवढा पिटुकला पण शक्ती / युक्ती अवाढ्यव्य आहे त्याची. आताशा सर्वांचाच अतिशय प्रिय झालायं तो, बहुगुणी असल्यामुळे सर्वत्र वास्तव आहे त्याचं. आमच्या महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. पहिल्या दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्याच्या कलेची पर्वणी साधता आली आम्हा सर्वांना आणि त्या अनोख्या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण टिपला तो ड्रोन ने. कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता, कोणाच्याही अध्यात-मध्यात न येता सगळे क्षण टिपले पठ्याने. इतका स्लिम-ट्रिम आणि स्मार्ट होता ना तो, कि इश्क हो गया डायरेक्टली मुझे, सच्ची. डायरेक्ट प्रेमातच पडले मी त्याच्या. ज्याने कोणी तो तय्यार केला होता त्याला साष्टांग नमन, कारण त्याचा रंग दिवसाच्या वेळी असतो त्या रंगाशी मिळताजुळता होता, पंखे पिटुकले, रिमोट लै भारी, आवाज शुन्य, अँगल परफेक्ट, चपळाई वाखाणण्याजोगी अशी, लँडिंग तर ह्या जगावेगळी, "काय वर्णू तव गूण ..." अगदी अशी स्थिती झाली होती माझी. एक तर हे असं ड्रोन वापरण फारच अनपेक्षित होतं, कार्यक्रम छोटेखानी होता, मी प्रत्यक्षात पहिल्यांदा इतक्या जवळून बघितला होता चालू स्थितीत, माझ्या चार डोळ्यांनी म्हणूनही असेल कदाचित. त्या दिवशी खूप वेळ वर बघणं फार फार बहुमूल्य ठरलं माझ्यासाठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा