सोमवार, २७ जून, २०२२

नृत्य आणि स्लॅकस

भव्य दिव्य स्टेज / रंगभूमी, मोठा नृत्यांगनांचा ताफा, भले मोठे झगमगते दिवे, वादक, गायक आणि टाळ्या ई. सगळं माझ्या डोळ्यासमोर नेहेमी दिसायचं, डोळे मिटलेले असतांना, स्वप्न म्हणायला हरकत नाही त्याला, जे कधीच खरं झालं नाही आणि होणार पण नाही. कारण नृत्य हि एक साधना आहे, अनंत वर्षांची. प्रत्येकाला आणि त्यातल्या त्यात माझ्या साऱखीला तर अशक्यच. साधं चित्रपट संगीतावर ताल धरता येत नाही ठिकसा... असो. हे सगळं मी शाळा, कॉलेज मधे असतांना दिसायचं बरं का, त्यानंतर कायमचं बंद झालं. 

शाळेच्या गणवेशाशिवाय त्या वेळी मला फक्त पंजाबी ड्रेस हाच एक प्रकार ठाऊक होता आणि मी ते वापरत होते. कधी तरी क्वचितच साडी, बाकी काही नाहीच. दारोदारी, प्रत्येक गल्लीबोळात तेव्हा पॅन्ट, जीन्स, टी शर्ट्स उपलब्ध नसायचे आणि खूप जणी घालत पण नसतं. त्यामुळे साधे शिवलेले पंजाबी ड्रेस हेच माहिती. ऑनलाईन शॉपिंग सुरु झालं नव्हतं आणि विकतचे ड्रेस फारसे नावडीचेच.

काही वर्षांपासून होजिअरी किंवा लिनन किंवा तत्सम कापडाचे फारच सुखावह असे पायजमे मिळतात आणि मुली (सर्व वयातल्या, तरुण, नोकरदार, आजी ई. ) ते वापरतात सर्रास. ते इतके आरामदायी असतात कि ज्याचं नाव ते. ऑनलाईन शॉपिंग मुळे, असंख्य दुकानांमधे, मॉल मधे प्रचंड प्रकार विकत / शिवलेले मिळायला लागल्यामुळे खूप विविधता आली आहे ड्रेसेस मधे, पायघोळ, फ्रॉक तत्सम, घेरदार, सरळ, आणि ढिगभर. भरपूर घेरदार कुर्ता पायघोळ असा आणि स्लॅकस घातलं कि मला एक मस्त नृत्यांगना झाल्यासारखंच वाटतं आणि मला खूप आनंद होतो. असली नृत्यांगना तर मी नाही, आणि असे विविध पोशाख सामान्य मुलीला उपलब्ध झाले म्हणून मला एक वेगळी ऊर्जा मिळते आहे, त्यामुळे कामं उत्साहानी केली जात आहेत आपोआप सहज.

थोडसं समांतरित विषयांतर: देशासाठी कार्य करण्याची संधी फारच थोड्या लोकांना मिळते, आधी स्कॉर्पिओ नावाची गाडी देखील फक्त एका विशिष्ठ वर्गालाच चालवायचे भाग्य मिळायचे. काही वर्षांपासून सर्रास ती सर्वसामान्य लोकांना विकत घेता येऊ लागली आहे. तीच शान, जबरदस्त मजबुती, टिकावू पणा ई. त्यामुळे जगावेगळं वाटतं त्या गाडीत बसतांना, चालवतांना, कि काय हि कलाकृती आहे, खास जवानांसाठी, कुठल्याही ठिकाणी सुरक्षित जाण्यासाठी. असो. 

जसे पडद्यावरचे कलाकार एकाद्या भूमिकेत शिरतात, स्वतः समाधान मिळवतात आणि दुसऱ्यांना पण देतात, अगदी तसे स्लॅकस घातले कि मला नृत्यविष्कार झाल्याचा भास होतो. माझी चाल बदलते, नवी वेगळी प्रेरणा मिळते, गती वाढते, पायाच्या चुण्यांची उब जाणवते, इलॅस्टिक सारखा असलेला त्या कपड्याचा ताण वेगळं सुख देऊन जातो आणि ऑफिस मधे कामासाठी लागणारे विविध साज चढतात, सूर गवसतो, मंद संगीत आणि वाद्यांची मैफिल सजते, असा प्रत्येक दिवस सार्थकी लागतो, समाधान देऊन जातो, प्रगती पथावर नेतो आणि बरेच काही. हे एक वेगळं स्टेज असल्यासारखं जाणवतं. जसे नृत्य सादर करणाऱ्या कलाकाराला प्रत्येक प्रयोग एक नवीन आव्हान असतं, कितीही माहीर असला तरी अगदी तसेच कितीही अनुभव पाठीशी असला तरी प्रत्येक दिवस आणि काम, माझ्या बाबतीत प्रत्येक नवीन येणारी बॅच आव्हानात्मकच असते आणि असायलाच
वी. मग त्या करता कंबर कसणे आलंच ना, स्लॅकस आणि पायघोळ नवीन ताज्या जमान्यातील ड्रेस घालून उत्कृष्ट असा. चला तर आता मी उद्या सकाळी नवीन आव्हानासाठी तय्यार होते दररोज सारखी, तुम्ही पण व्हा तय्यार लगेच. 

शबरीची बोरं

रामाला चविष्ट चवदार बोरं खायला मिळावी म्हणून शबरीने अर्पण करण्या आधी बोरं चाखून बघितली. भक्तीचे फारच भव्य दिव्य आणि अनोखे असे उदाहरणं. हि भक्तिमय रचना गेले अनेक वर्ष आपण ऐकतो आहे आणि बरेचदा वाक्य रचनेत किंवा प्रेरणादायक असं काही मांडण्याकरता आपण वापरतो देखील.

थोडसं विषयांतर, माझी लेक हि माझी खास मैत्रीण आहे, जिवाभावाचं सख्य आहे आमच्यात, शब्दात न बांधण्या पलिकडले असे. तर ती गेली काही वर्ष मला का कुणास ठाऊक सातत्याने सांगत आली आहे आणि ते मला मनापासून आवडल्यामुळे मी ते ऐकते आहे. "तुला आवडतं ते कर मम्मा", इति माझी कन्यका. ह्याच धर्तीवर मी खूप सुंदर अनुभव घेतले / घेते आहे आणि त्यातलाच एक म्हणजे आज शेवटचे काही उरलेल्या आंब्यांचा रस करण्याचा घाट घातला मी. शेवटचे, मौसम / हंगाम संपत आल्यामुळे आणि मी जरा जास्तच काळजीवाहू आई असल्यामुळे जेथे जेथे चिमुकला जरी संशय आला तेथे तेथे मी त्या आंब्याचा छोटा तुकडा चाखून बघितला आणि मग अख्या रसात तो सामावू दिला. अहाहा च. इतकं म्हणजे इतकं समाधान मिळालं म्हणून सांगते, अगदी (तुलना नाही) पण शबरी सारखं. आणि हो, आज कुणास ठाऊक पण मला जेवतांना रस तर खायचा होताच, पण आंबा देखील तसाच नुसता खायचा होता. मग हे दोन्ही मला साध्य झालं रस करतांना, काय मज्जा ना. मी तर रस करणं आज इतकं म्हणजे इतकं एन्जॉय केलं ना कि ज्याचं नाव ते. भन्नाट.

आणखी एकदा विषयांतर, माझी आई कट्टर नियम पाळणारी. त्यातला एक म्हणजे कुठलाही पदार्थ तय्यार झाला कि तो आधी देवापुढे ठेवायचाच आणि त्या नंतर खायला घ्यायचा अथवा वाढायचा. बास. त्यामुळे चाखून बघणे हे आमच्या घरी करणाऱ्याला माहितंच नव्हतं अजिबातच. म्हणजे पदार्थ तय्यार झाला कि वाढायच्या आधी चाखून बघायचा असतो? अहो आश्चर्यम. त्यामुळे जर चुकून माकून काही जिन्नस कमी जास्त झालेच तर खपवून घेतले जायचे, किंबहुना त्याला अजिबात महत्व नव्हतंच, उदाहरणार्थ मीठ कमी म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट, पानात वाढलेलं असतं, शांतपणे लावून घ्यायचं. इतकं सोप्प आणि सहज.

मग आले मी ह्यांच्या घरात आणि "पायाखालची जमीन सरकणे", "हादरा बसणे", "पोटात गोळा येणे", "मुलं म्हणजे देवा घरची फुलं"  ई. म्हणींचा प्रत्यक्ष अर्थ समजला. अगदी मानाने सांगते आहे, कारण प्रत्येकाच्या घरच्या पद्धती फार वेगळ्या आणि त्या योग्य पण. असो. तर ह्यांच्याकडे मुलांना वाढण्याआधी, पदार्थ होत आला कि एकदा / छे छे अनेकदा करणाऱ्याने म्हणजे उदाहरणार्थ मी, आणि मग सासूबाईंनी अनेकदा चाखून बघायचा, प्रत्येक पदार्थ. देवा पुढे ठेवणे म्हणजे काय? हे मी हळूहळू विसरूनच गेले पार. देवा. परमेश्वरा.

आज आंब्यांचा रस करतांना एक विचार मनाला शिवला, कि एका पेटीतले आंबे कदाचित एका किंवा अनेक आमराईतून आलेले असू शकतात, अनेक झाडांची ती फळे पण असू शकतात. पण रस तय्यार झाला कि एकरूप होतात आणि खाणाऱ्याला परमानंदाची जाणीव होते, अगदी नेहेमी, प्रत्येक वेळा. त्यामुळे:

१) मी नकळत परमेश्वराचं, शेतकऱ्याचं, सर्व कष्टकऱ्यांचं अभिवादन करून स्वयंपाक करते, पण अनेकदा चाखून बघण्याची सवय जडली ती जडलीच
२) मात्र कुठलीही नवीन वस्तू घरात आल्या आल्या देवघरात नक्की ठेवली जाते आणि नतमस्तक होतंच आपोआप
३) सरते शेवटी, प्रत्येक ठिकाणी आमरस दृष्टीपथात पडला आज मला, का कुणास ठाऊक? माझं ऑफिस म्हणजे अनेक ठिकाणांहून आलेल्या मंडळींनी तय्यार झालेलं, एकत्र खूप टप्पे पार पाडले आम्ही आणि असंख्य जणांना अत्यानंद देऊन गेलो. प्रत्येक कुटुंब म्हणजे तरी काय, विविध लोकांचा सुमधुर संगमचं जणू. चित्रपट निर्मिती, गाण्याची निर्मिती, रहदारी, खाद्य पदार्थ तय्यार करण्याची विधी ई. कुठलेही उदाहरण घ्या अनेक हात, विचार, भावना ई. एकत्र आल्याशिवाय पौष्टिक, चविष्ट, चवदार, सुगंधी, सुबक-सुंदर, देखणा, अनोखा रस तय्यार होत नाहीच.


त्यामुळे शबरी, श्रीराम ह्यांच्या पासून सर्वांना प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यात मनात हात जोडा आणि रसस्वाद चाखा. 

गुरुवार, २३ जून, २०२२

भातुकली

माझ्या लहानपणी अनेक मैदानी आणि घरी बैठे खेळ खेळले आहेत, त्याच पठडीतला हा एक, हमखास उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाला जाणारा, अत्यंत उत्साहाने त्यावेळी. पहिल्या आवृत्तीत सगळं कोरडं होतं, सूक्ष्म किंवा लहान प्रतिकृती आईच्या स्वयंपाक घरातल्या भांड्यांची वापरून. ते भांडे खोटे खोटे गॅस शेगडी वर ठेवायचे, खोटाच स्वयंपाक करायचा, सगळ्यांना वाढायचं, खायचं खोटंखोटं आणि कित्ती आवडलंय ह्याचा अविर्भाव आणायचा. आई गं, काय होतं ते सगळं, व्वा.

त्यांनतर च्या टप्प्यात आधी शेंगदाणे दोन भागात करून त्यात छोटासा गुळाचा तुकडा घालून त्याचे लाडू करायचे. इतका छान वेळ जायचा म्हणून सांगते आणि मग एक क्षणात ते फस्त व्हायचे लाडू. लाडू म्हणे? काहीही.

मग आम्ही साऱ्या मैत्रिणी मोठ्या झालो (असा आमचा भलामोठा गैरसमज होता), चक्क आठवतो तो दिवस मला, मी शेंडेफळ त्या ग्रुप मधलं, चौथीत होते, आम्ही सर्वानी ठरवलं कि सगळ्या आयांना आज स्वयंपाक करून खाऊ घालायचा, ठरलं आणि केलं देखील, कसंतरी. भलतीच मज्जा आली होती. 

त्यानंतर आई आणि तिच्या मैत्रिणीसोबत वनभोजन, वांगे नवमी ई. प्रकार एन्जॉय केले पोटभर. भोंडला म्हणजे तर उत्साहाचे सर्वोच्च शिखर, त्यात गाणी असायची, कसरत व्हायची, खूप जणी एकत्र येत होत्या, आणि मग खाऊ ओळखणे आणि फस्त करणे. मधे भिशी नावाची / प्रकारची भातुकली पण अनुभवली.

अमेरिकेची संस्कृती आत्मसात केली, पॉटलक नावाची, आधी हा शब्द पण उच्चारायला अवघड वाटला, मग झाली सवय. माझ्या दृष्टीने भातुकलीचाच एक प्रौढ प्रकार अर्थात विथ अ ट्विस्ट हो.

बरं ह्या सगळ्या भातुकल्या फक्त एक दिवसाच्या असायच्या. पण गेले तीन दिवस मी / आम्ही साऱ्या जणींनी फार अनोखी भातुकली अनुभवली. लहानपण पुन्हा मोठ्या प्रमाणात जगता आलं. बरीच वैशिष्ट्य सांगता येतील ह्या सळसळत्या तरुण उत्साहाने भरपूर अश्या भातुकलीची. एक म्हणजे हि सर्वांसाठी होती, फक्त मुली नाही. दुसरं म्हणजे सगळे विविधतेने नटलेले पदार्थ घरुन करून आणले होते, भल्या पहाटे उठून, आनंदाचा मसाला भरपूर पेरून, तिसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात देखील, सर्वांना पोटभर पुरून उरेल अस्स. हे सगळं दिवसभर खूप कचेरीत कामं करून, घरचं बघून बरं का. ह्या भातुकलीची मुळं जरी त्या लहानपणीचं घट्ट रोवली गेली तरी देखील स्वतःला सिद्ध करत शिवाय हाताची चव टिकवणं, खाऊ घालायचा उत्साह शाबूत ठेवणं तारीफे काबील नक्कीच आहे. सगळ्या माझ्या सख्यांना मनापासून धन्यवाद इकडे सुंदर, सुगंधी, चविष्ट तीन दिवस दिल्या बद्दल. लव्ह यू ऑल. 

बुधवार, २२ जून, २०२२

लुकूपुकू

हा एक सदाबहार आणि सर्वसामान्यपणे सहज वापरला जाणारा शब्द आहे, माझ्या कोशातला तरी. अर्थात माझ्या लहानपणीपासून तो माझ्या कानावर पडला आहे, म्हणजे बाकीची मंडळी देखील वापरत असतीलच नक्की.

नाजूक, कमकुवत, लोलम, मजबूत नाही असा ई. लुकूपुकूचे समानार्थी शब्द आहेत. प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार, प्रसंगानुरूप आणि आवश्यकतेप्रमाणे हे शब्दप्रयोग करतात. मागे एकदा एका समारंभात पुष्कळ मंडळी होती म्हणून कागदाचे छोटे पेले दिले गेले चहा करता. त्या पेल्याला बघूनच मला जाणवलं कि ते लुलूपुकू आहेत, त्यामुळे माझ्या एका वरिष्ठांना मी एकात एक दोन पेले घालून चहा घेण्याची विनंती केली हा शब्द प्रयोग करून आणि भन्नाट हशा पिकाला.

त्या नंतर योगायोग बघा, असाच एक समवयीन आणि समवैचारिक लोकांचा समुदाय सहभोजनाचा आनंद उपभोगण्यासाठी एकत्र आले. तेथे देखील अन्न वाढून घेण्यासाठी ज्या ताटल्या ठेवण्यात आल्या होत्या त्या प्रचंडच लुलूपुकू होत्या. त्यात भर म्हणजे काही जिन्नस पातळ स्वरुपाचे होते. बुभुक्षितांची जी फे फे उडाली म्ह्णून सांगते. हे सगळं काय कमी होतं त्यात चमचे लुकूच्या पल्याड हो. TQM, ६-सिगमा, ISO ई. गुणवत्ता प्रमाणपत्र आणि त्यांची संकल्पना काय फक्त कागदावर मांडण्याकरताच का? हे सगळे गरम पदार्थ वाढण्याकरता लागणाऱ्या गोष्टी गुणवत्ता प्रमाणपत्र घेतल्याशिवायचं बाजारात उपलब्ध होतात का? हे फार घातक आहे. अन्न वाया जातं, तारांबळ उडते, वयस्क आणि लहान मुलांना गैरसोईचं होतं ई. निकृष्ट दर्जा, निरुपयोगी वस्तू ठेवू नका विक्रिला हि नम्र विनंती.

आणि मी तरी ह्या वरून एक धडा नक्की घेतला कि जरी हि अनुकथा निर्जीव वस्तूंबद्दल होती तरी सजीवांनी बोध घेत आपण निरुपद्रवी कसं राहू ह्याचा विचार नक्की करावा. सातत्याने किंवा जमेल तेव्हा विचारात / मनात, कृतीत, चालीत आणि प्रत्यक्षात सहारा, साधन, मदतनीस अशा भुमिका साकारा, गुणवत्ता नेहेमी टिकवून ठेवा किंवा गुणवत्ते कडेच लक्ष असू द्या, कणखर, सुधृढ आणि मजबूत राहा प्रयत्नपूर्वक, तुमचा काही अंशी जरी उपयोग झाला तरी मिळवलं. सुख म्हणजे नक्की काय असतं अजून वेगळं? नाही का?

घाम

दोन अडीच दशकां आधी अमेरिकेत एक नवी पद्धत मी बघितली होती, अनुभवली देखील जी त्या आधी मला माहित देखील नव्हती. भारतात असतांना वातानुकूलित यंत्रणा असते हे ठाऊक होतं, पण सर्रास सर्वत्र ती उपलब्ध नसल्यामुळे ती एक महागडी चैनीची न-लागणारी निरुपयोगी वस्तू आहे एवढंच माझं ज्ञान त्याबद्दल. असो.

अमेरिकेत अख्खी च्या अख्खी इमारत वातानुकूलित होती तेव्हा, म्हणजे ऋतुमानाप्रमाणे किंवा ज्या भागात जसं हवामान असतं त्या प्रमाणे सम्पुर्ण इमारत गार किंवा गरम ठेवली जायची. पहिल्यांदा अनुभवलं तेव्हा दाही बोटं तोंडात गेली माझी आपोआप. आताशा भारतात देखील हे फारच सर्रास सर्वत्र बघायला आणि अनुभवयाला मिळतं. बहुतांशी प्रत्येक घरात AC, प्रत्येकाच्या दारात एक किंवा अनेक चारचाकी त्यामुळे त्यात नचुकता AC, कचेरीत, भोजनालयात, बँकेत, दुकानात, टॅक्सी त, अगदी जगी-स्थळी-पाषाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतक्या सर्व ठिकाणी AC. अतिशयोक्ती झाली असं जाणवतच.

काल मस्त पाऊस पडून गेला, वातावरण बऱ्यापैकी गार झालं होतं, ह्या नव्या AC-पिढीतला एक तरुण बघून मी अवाक झाले. त्याच्या एका गाडीतून काही तरी दुसऱ्या गाडीत ठेवणं सुरु होतं त्याच पार्किंग मधे. मी सहज बघितलं, बोलले तर बघते काय तो संपूर्ण नखशिखान्त घामाने डबडबला होता, जसा कि विहीर खोदून आला आहे, किंवा डांबरी रस्यावर काम करून आला आहे अस्सा. मग लक्षात आलं माझ्या, काही क्षण AC नव्हता ना त्यामुळे.

एवढ्यातच मी एक दिवशीय कृतिसत्र / कार्यशाळेत सहभाग घेतला होता. ती कार्यशाळेत जे शिकवत होते ते खूप नामांकित व्यक्ती होते, खूप वर्षांचा अनुभव होता त्यांना. अशी अनेक कृतिसत्र आयोजित केली असतील त्यांनी ह्याआधी. हे सत्र एका वातानुकूलित स्थळी आयोजित केलं गेलं होतं. ती खोली इतकी प्रचंड गार झाली होती कारण एक तर वातानुकूलित यंत्रणा नवीन होती, आणि खूप AC लावले होते, लोकं कमी होती ई. म्हणजे काही वेळाने खरंच AC बंद करावा अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली बहुतांशी सर्वांमधे. तरी पण ते शिक्षक अक्षरशः घामाने चिंब झाले होते. शिकवणे हि एक कला आहे, प्रत्येकवेळी वेगळं आव्हान असतं कारण श्रोर्तुगण बदलतो किंवा वर्ग संपेस्तोवर ची ती तात्पुरती स्थिती असू शकते, किंवा स्वभाव देखील. असो, पण हा पण घामाचा प्रकार झालाच.

प्रत्यक्षात उन्हातान्हात, रस्त्यावर, उन्हाळ्यात सतत शेगडी समोर / विस्तवासमोर जे काम करतात, कष्टकरी ह्यांचा काय तो खरा घाम, ज्याला स्वकष्टाचा वेगळा सुगंध असतो, दुर्गंधीची किनार देखील नसते, कधीच.

त्यामुळे गरज नसतांना अती AC मुळे लागलेल्या चुकीच्या सवयी काहींच्या शरीराला, किंचित गोंधळ / ताण / स्वभाव ह्या मुळे अनुभवलेला घाम आणि निरपेक्ष किंवा आखून दिलेली कामं प्रचंड कष्ट करून अवघड परिस्थितीत निभावतांना आलेला नैसर्गिक घाम असे अनेक प्रकार माझ्याकडून टिपले गेले.

जमल्यास कुठलीही गोष्ट अती करू नका, साधा पंखा असेल तरी आनंद माना, नसेल तरी अडू देऊ नका, कधीच. सरळ सोप्प सात्विक सहज समाधानाचे क्षण अनुभवा जमेल तेव्हा.

गमक

चाळीशी नंतर किंवा अर्धशतकी वाटचाल सुरु झाली कि नैसर्गिक रित्या का अजून काही पण बहुतांशी प्रत्येकाच्याच मागे एक ससेमिरा लागतोच, तो म्हणजे मल्टीविटामिन च्या गोळ्या घेण्याचा. भली मोठी यादी असते आणि नियमावली देखील. सुरवात भल्या सकाळी च होते. न्याहारीच्या आधी काय म्हणे तर कॅल्शियम ची गोळी, ब्रेकफास्ट नंतर बी-१२ किंवा बी १-अनेक असलेली गोळी, आठवड्यातून एकदा ड-जीवनसत्व असलेली, ई. आता गोळी घ्यायची म्हणजे पाणी आलं आणि ह्या गोळ्या स्वतः इतक्या गुबगुबीत असतात ना, कि घोटभर पाणी पुरत नाहीच, अर्थात काहींना हो. त्यामुळे बहुतांशी लोकांचं काही अंशी पोट ह्याचं सगळ्यांनी भरतं, मग न्याहारी थोडीशी करायची, मग पुन्हा दुसरी गोळी आहेच पाण्याच्या पेल्यासहीत तय्यार. थोडक्यात काय अनावधानाने किंवा नकळत मस्त पाणी पिणं होतं, अत्यावश्यक सत्व नैसर्गिक रित्या थोड्याश्या अन्नातून आणि बाकी गोळीमार्फत पोटात जातात, दिवस सार्थकी होतो, कामं उत्तम रित्या पार पडतात, उत्साह टिकून राहतो ई. ह्या अश्या वयाच्या वळणावर तसं देखील थोडासा जिभेवर ताबा हवाच, वजन आटोक्यात ठेवावंच आणि ते जर डॉक्टर तोंडावर म्हटले स्पष्टपणे तर काहींना आवडत नाही त्यामुळे मग अत्यंत हुशार आणि ज्यांना त्यांच्या पेशंट ची काळजी आहे त्यांनी असा अप्रत्यक्ष उपाय / तरणोपाय शोधून काढला आहे ह्याची मला खात्री आहे. नक्कीच हेच असणार त्यांच्या डोक्यात, म्हणजे एका दगडात अनेक पक्षी, असं काहीसं हो.

त्यामुळे "आता पर्यंत मी एकही गोळी घेतली नाही", असं म्हणत असाल तर अत्योत्तमच. पण जर अश्या उपयोगी काही गोळ्या असतील सुचवलेल्या तर नक्की घ्या, त्यामुळे सगळ्या जीवन सत्वांची पातळी योग्य राहील, शिवाय पाणी पोटात जाईल जे बरेच जण दुर्लक्ष करतांना दिसतात आणि हो वजन काटा धन्यवाद देईल तो वेगळाच. चला तर मग अत्यानंदाने गोळ्या घेण्याचे सोहोळे दररोज अनेकदा साजरे करूयात.

सामावून /जुळवून घेणं

आमच्या घराचा नक्षा संपूर्णपणे बदलून घेतला आहे एवढ्यातच, अर्थात सगळंच जुनं झालं होतं आणि बदल गरजेचा होता, अत्यावश्यक होता म्हणून. इतके दिवस झाले अगदी शेजारी शेजारी खेटून दोन प्लग पॉईंट्स आहेत, त्यात मी एकात मोबाईल आणि दुसऱ्यात लॅपटॉप ला चार्ज करायला लावते. पण आज पर्यंत फक्त चार्जर लावणे आणि काढणे इतकंच होत होतं म्हणून कि काय आज ते पॉईंट्स माझ्याशी संवाद साधत, इशारे करत काही तरी दर्शवत होते. मी बुद्दू, फारसं लक्ष नाही दिलं आधी, पण मग नाइलाजच झाला, आणि सरते शेवटी त्यांचं म्हणणं पटलं मला, मनापासून. माझा मोबाईल चार्जर बहुतांशी सर्वांचाच असतो तसा आहे, एक महत्वाचा ठोकला आणि त्याला एका बाजूने युसबी पोर्ट, वायर कनेक्ट केलेली. त्यामुळे खेटून असलेल्या दुसऱ्या पॉईंट वर लॅपटॉप ची पिन लावतांना युसबी ची दिशा बदलावी लागतेच. तेव्हा कुठे दोन्ही त्यांची नेमलेली कामं मस्त पार पडतात. अगदी तसेच आपण सजीव माणसांनी देखील केले तर? कित्ती सोप्प होईल नाही सगळं? खेटून घरी-दारी जर राहायचं, एकत्र नांदायचं, उद्देश साध्य करायचं, कामं नीट पार पडायची तर गरज पडल्यास किंचित दिशा बदलावी, समजावून घ्यावं, इकडचं-तिकडे करावं, सरकावं, दुसऱ्याला जागा करून द्यावी आवर्जून गरज पडल्यास, शांतता हवी असल्यास, नाही का? आणि हे सहज करण्यासारखं, होण्यासारखं, शक्य आहे. मग का नाही?

चला तर मग अगदी आत्तापासून सगळेच कोणाचीही वाट न बघता थोडसं सरकू या, आणि आपल्याला सरकता आलं ह्याचा आनंद उपभोगुयात.

एका कलेबद्दल काही

एक मुलगा आहे, माणूस म्हणा हवं तर, पण आजोबा नक्कीच नाही, काका पण नको आणि तो साधी दुचाकी बिनगियरची, गियर ची साधी मोटर सायकल, साधी जुनी गियरची चारचाकी आणि स्वयंगतिक / स्वधीनगतिक अशी अत्याधुनिक चारचाकी देखील तितक्याच शिताफीने चालवतो. माझ्या दृष्टीने हि एक कलाच आहे, इतक्या वैविध्य गाड्या सहज चालवणे आणि त्या देखील विविध कंपनीच्या, वेगवेगळे सेटीन्ग्स असलेल्या, उंची, लांबी, गती, उजवी-डावी कंट्रोल्स ई. म्हणजे कमाल च. असं खूप जणं करतात, मी नाही म्हणत नाही. आणि फक्त गाडीचं चालवणं नाही तर ते विविध देशाचे पदार्थ चालवून घेतात, विविध पोशाख चालवून घेतात, विविध देश - तेथील कामाच्या पद्धती अंगिकारतात आणि बरेच काही. फक्त ह्यांना विविध माणसं, किंवा घरची माणसं विविध प्रकारे चालवून का घेता येत नाही? बरं, अती उच्च विद्याविभूषित, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा चमचा घेऊन बाळ जन्माला आलं, असंख्य पुस्तकं डोळ्याखालून घातली, मग फक्त माणसांशी माणसांसारखं वागणं हि कला अंगिकारता येऊ नये ह्याचं प्रचंड आश्चर्य वाटतं मला. का कुणास ठाऊक?

सध्याच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमात काय किंवा जुन्या गुरूंनी सांगितल्या प्रमाणे, वैविध्य साहित्यात नमूद केल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही-आम्ही माणसं आहोत आणि समोरचा देखील माणूस आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे, पद, हुद्दा, शिक्षण, पैसा, ई. सर्व नंतर आलं जे

१. अवतीभोवती च्या माणसांमुळेच आहे
२. माणसांसाठीच आहे
३. माणसांमध्येच, माणसांसोबतच राहून पुढील मार्गक्रमणा करायची आहे

इतकं साधं विसरून कसं चालेल?

असो. 

मंगळवार, २१ जून, २०२२

करमणुकीचा बाप ...

मी दररोज कचेरीत येता - जाता गाडीत चालू असलेला रेडिओ ऐकतं असते. त्यातलाच एक कार्यक्रम आणि "एंटरटेनमेंट चा बाप" असं त्याचं खणखणीत घोषवाक्य... असो. ह्या घोषवाक्याचा अनुभव मी घेतला इतक्यातच, प्रत्यक्ष आणि मला प्रचंड धक्का बसला. तर त्याचं असं झालं कि एक अतिमहत्वाचं सत्र सुरु होतं. खूपच कमी वेळात त्या तज्ञाने उभं केलेलं असं सर्वउपयोगी असं, जीव तोडून कमी वेळात सर्व सांगण्याचा प्रयत्न सुरु होता, नावीन्याने नटलेल्या गोष्टी प्रस्तुत होत होत्या, मेहेनत स्पष्ट दिसतं होती आणि हे सर्व सुरु असतांना, इतर सगळे त्या सत्राचा कणन्कण साठवून घेत असतांनाच सातत्याने पार्शवसंगीत कानावर पडत होतं. बरं ते पार्शवसंगीत श्रवणीय पण नव्हतं, त्यामुळे प्रचंड संताप होतं होता. बरं एक स्तोत काय कमी होतं, दुसऱ्या पद्धतीचं बडबड नावाचं वाद्य ऐकू आलं. आणि हे करणारे अती उच्च विद्याविभूषित असे हो, भल्या मोठ्या हुद्यावर आणि प्रचंड हुषार. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण", असं झालंय मला. अहो तुम्हाला नाही ना रस ह्यात मग दरवाजा उघडा आणि बाहेर पडा ना, दुसऱ्याला का त्रास? आणि तुम्हाला हे विशेष महत्वाचं जर वाटत नसेल तर तुम्ही उभे राहा, घ्या सत्र, दाखवा किती धमक आहे ते. तुम्हाला जर ह्या पेक्षा जास्त जर काही काम असेल तर बाहेर पडा, ते काम आधी पूर्ण करा आणि मग पुन्हा शांतपणे सत्रात सामील व्हा, प्रश्न विचारा, ज्ञानात भर पडू दे. दुसऱ्यांचा वेळ, मेहेनत, हुशारी, ऊर्जा ई. सर्व व्यर्थ आणि तुम्हीच काय ते राजे का? आणि कशासाठी?

ह्याला माझ्या भाषेत "मल्टि टास्किंग ची कमाल" असंच फक्त संबोधता येईल.

किंवा कदाचित असं असेल शांत पणे चाललेल्या अती महत्वाच्या सत्रात त्यांच्या हातून सातत्याने संगणकाच्या माउस चा आवाज येतो आहे, त्यामुळे जीवतोडून शिकवणाऱ्याला अपमानास्पद वाटतं असेल, बाकिच्यांना त्रास होतं असेल हे ठाऊक नसेल किंवा त्यांना ऐकूच येत नसेल हो, बहिरे म्हणून किंवा कामाच्या व्यापात. बिच्चारे. इलाज करायला पण वेळ नाही, गरज वाटत नाही आणि इच्छा त्याहून नाही.

आपल्याकडून कोणाला फायदा नाही तर त्रास तरी होऊ देऊ नका कधीच, अवास्तव / नको असलेला / नको तेथे आवाज करू नका, हे नैतिकतेला साजेस नाही शिकलेल्या माणसाच्या, तुमच्या कडून आजूबाजूचे सतत शिकत असतात हे लक्षात ठेवा काय करावं आणि करू नये ते. "करमणुकीचा बाप" ह्याचा प्रकर्षाने अर्थ मला ह्या सत्रातल्या त्या खास व्यक्तींमुळे उमगला, त्यांचे मनःपूर्वक आभार. अशी माणसं त्या सत्रात असून देखील जो वक्ता होता तो अत्यानंदाने सत्र घेत राहिला, अहाहा च, साष्टांग दंडवत त्याला, धन्य आहे तो, त्याचे सोडून द्यायची सवय, खूप खूप शिकण्यासारखं आहे त्याच्या कडून.

"अशी माणसे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती".

माझा चार्जर

"माझा चार्जर" हि संज्ञा आपण दररोज कित्येकदा कळत - नकळत वापरतो. किती भलं होईल नाही जर असा एखादा चार्जर अस्तित्वात असेल तर? खरं तर आपण मोबाईल चा / लॅपटॉप चा चार्जर असं म्हणत असतो पण सवयी नुसार "माझा चार्जर..." अशी सुरवात असते. असो.

आपण सर्वच जणं आताशा थोडेसे जास्त थकले आहोत असं सर्वांनाच जाणवायला लागलं आहे. कारणं काही असोत, ती प्रत्येकाची आपली वेगळी आहेत, असणारच कारण डीएनए, क्षमता, ताकद, कामाचं स्वरूप ई. भिन्न आहे. सर्वच आपल्या परीने प्रयत्न करतात, कोणी व्यायाम, तर बाकी पौष्टीक आहार, तर कधी आराम, ई. तरी देखील हवं तसं ताजतवानं वाटतं नाही. चला तर मग खालील छोटेसे काही उपाय करून बघुयात,  कदाचित सदुपयोग होईल. "प्रयोगातून विज्ञान आणि निकाल / फळं / परिणाम..." ई. ची प्राप्ती  होईल आणि थकवा छू मंतर. थोडा वेळ द्यावा लागेल, सबुरी ठेवावी लागेल, लागलीच मला किंवा ह्या उपायांना तराजूत तोलू नका. निष्ठेने सुरु करा आणि स्वतः च स्वानुभव घ्या.

- "पी हळद होऊ गोरी" हे होणे नाही
- मल्टीविटामिन गोळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरु करा, थकवा जाणवतो = काहीतरी कमी आहे शरीरात, ती भरून काढली पाहिजे वेळेत
- हलकासा व्यायाम करा, योग करा, दमवू नका आणखीन स्वतःला परदेशी व्यायाम प्रकार अवलंबून
- थोडासा आराम करा
- फक्त स्वतःच काम करा, दुसऱ्यांच्यात लुडबुड नको, उगाच डोक्याला जास्त ताण
- एखादा छोटासा छंद जोपासा,
- काम म्हणून नाही तर आवड म्हणून एखादा खास पदार्थ करा, बागकाम करा
- मुलांसोबत, आप्तस्वकियांसोबत हसा, थोडा वेळ घालावा
- पत्ते खेळा आवडत असल्यास
- शांतपणे जेवा, आनंद घ्या
- प्रत्येक एक तासाला छोटा ब्रेक नक्की घ्या, छोटा म्हणजे १ मिनिटाचा, पण नक्की (हे शास्त्रोकरीत्या सिद्ध झालेलं आहे, अधिक माहिती करीत वाचा : http://www.just-a-minute.org/en/about/)

- साधी दोरी किंवा इलॅस्टिक / रबर ला सातत्याने ताणून धरलं तर ते तुटतं, निर्जीव वस्तू असून देखील, तुम्ही-आम्ही तर हाडामासाची माणसं आहोत, आपले डोळे हा फारच नाजूक अवयव आहे, मान मोडे पर्यंत संगणक आणि तदनंतर मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून देखील थकायला होतं, सर्वात जास्त थकण होतं ते बोलण्याने, सर्वात जास्त ऊर्जा वाया जाते ह्या कृतीने. त्यामुळे हवं तेवढं कामापुरतं नक्की बोला, जास्तीच, वायफळ टाळा.  
- स्वतःला सांगा कधीतरी "आय एम फिसिकली फिट आणि मेंटली स्ट्रॉंग"
- स्वतः वर प्रेम करा
- स्वतःसाठी एक मिनिट द्या दिवसातून कधीतरी
- स्वतःला गुड मॉर्निंग म्हणा 

- "when you have enough of screen look at green", look outside, the nature, take a walk or alike etc.
- छानशी साडी, ड्रेस, कपडे घाला, महागाचेच नाही तर आवडीचे, नक्की प्रसन्न वाटेल etc. to name a few....

हे सर्व नाही पण काही थोडेसे उपाय करून तर बघा मज्जा येईल आणि अजून तुमचे असे नवनवीन इलाज / तरीके / पद्धती ई. सुचतील आणि आणखीनच मज्जा येईल, थकवा नक्कीच छू मंतर, नेहेमी करता. विश्वास ठेवा. हे सगळं टप्प्या टप्प्याने मी स्वतः वापरूनच हि अनुकथा येथे कथन करत आहे.

थोड्याच दिवसात / महिन्यात माझ्या आजूबाजूच्या पऱ्या नक्की टवटवीत, अजून ताज्यातवान्या शक्ती - स्फुर्तीने परिपूर्ण झालेल्या मला दिसतील ह्याची खात्री आहे. आमेन.  

रविवार, १९ जून, २०२२

Graduation (translated from marathi)

 Translation by Google baba:

Graduate is a word that is used regularly and of course I also knew the meaning of this word. A person holding a degree, be it in any field like Commerce, Science, Arts etc. But after school education, the one who completed 3-4 years course in the university and earned it with hard work. It was my misconception that almost everyone is aware of only this meaning of the phrase graduation, but which is no more true and I had to add new meanings to my Vocab.

A friend of mine sent me some photos with appreciation and the title was a photo of her son’s graduation. I was stunned for a few seconds and literally said that her son has never been so big. And while I was thinking about it, I started looking at the photos, the same graduation hat, the rope on one side, the gown etc. It was the graduation ceremony photos as her beloved son stepped up from U-KG to first standard, a big function organized at school, here in Pune.

After that, while talking to a friend of mine who is settled in America, he said that next Saturday we have a big party, about 100 people will come. The occasion is their "daughter's graduation". I once again had a mountain of questions, when did his daughter grow up? Then I realized that she passed 12th with flying colors. In the United States, it is customary to say that after the 12th standard, at the age of 18, the children become independent and graduate.

My little poor brain, got to learn something new and I have to keep learning, isn't it?

Now, stepping into first standard in a small school from kinder garden is like getting a degree? I did not know these newly added steps. And yes, these are just the degrees on piece of paper. By the way, most of the people who come in contact with the us are constantly conferring a lot of titles on the face or on the back. Collect papers and all other degrees, give importance to some, throw away many while achieving various objectives, learn a lot and live with self-respect and happiness.

पदवीधर

पदवीधर हा एक नियमीत वापरला जाणारा शब्द आणि अर्थात मला देखील ह्या शब्दाचा एकचं अर्थ ठाऊक होता. पदवी धारण केलेला व्यक्ती, मग ती पदवी कुठल्याही क्षेत्रातली असो वाणिज्य, विज्ञान, कला ई. पण शालेय शिक्षणानंतर विद्यालयात ३-४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून कष्टाने कमावलेली अशी. बहुतांशी सर्वांनाच हाच एक अर्थ माहित असावा असा माझा गैरसमज होता, जो एवढ्यातच दूर झाला आणि मला माझ्या व्होकॅब मधे नवीन अर्थांची भर घालावी लागली.

तर त्याचं असं झालं, माझ्या एका मैत्रिणीने मला कौतुकाने काही फोटो पाठवले आणि त्याचं शीर्षक होतं तिच्या मुलाच्या ग्रॅड्युएशन चे फोटो. काही सेकंद मी भांभावून गेले अक्षरशः म्हटलं हिचा मुलगा एवढा मोठा कधी झाला. आणि हा विचार करत असतांनाच मी फोटो बघायला देखील सुरवात केली, तर अगदी झकास टोपी, त्याला एका बाजूने दोरी, गाऊन ई. काय तर म्हणे बालवाडीतून पहिल्या वर्गात पदार्पण केलं म्हणून मोठा समारोप झाला, शाळेत, इथे पुण्यात.

त्यानंतर माझ्या एका अमेरिकेत स्थाईक असलेल्या मित्राशी बोलतांना ओघात तो बोलून गेला कि पुढील शनिवारी आमच्याकडे भली मोठ्ठी पार्टी आहे, जवळपास १०० लोकं येणार आहेत ई. निमित्य काय म्हटलं तर "मुलीचं ग्रॅड्युएशन". मला पुन्हा एकदा डोंगरा एवढा प्रश्न पडला, ह्याची मुलगी इतकी मोठ्ठी कधी झाली? तेव्हा समजलं कि ती उत्तमरीत्या १२वी पास झाली. अमेरिकेत तशी पद्धत आहे म्हणे कि १२ वी झाली, साधारण १८ वर्ष पूर्ण झाली कि मुलं स्वतंत्र होतात, त्याला पण ग्रॅड्युएशन असंच म्हटलं जातं आणि मग "थँक्स गिविंग" ह्या दिवशी आवर्जून भेटतात ई.

माझ्या छोट्याश्या मेंदूला बरेच आघाद बसले पण असो नवीन शिकायला मिळालं आणि नेहेमी शिकतंच राहावं माणसाने, नाही का?

आता म्हणजे बालक मंदिरा तून छोट्या शाळेत प्रवेश म्हणजे पदवी मिळाल्यासारखंच आहे तर?, हं, पिटुकल्या पदव्या मिळवत मिळवत मग मोठ्या विद्यालयाच्या पदवी कडे वाटचाल करायची तर?, असो. ह्या नवीन निर्माण झालेल्या पायऱ्या ठाऊक नव्हत्या मला. आणि हो, ह्या झाल्या कागदी पदव्या.  तसे तर घरचे, दारचे, संपर्कात येणारे बहुतांशी सगळेच तोंडावर किंवा पाठीमागे भरपूर पदव्या सातत्याने बहाल करत असतातच. कागदी आणि इतर सगळ्या पदव्या जमा करा, विविध क्षेत्र / उदिष्ट साध्य करतांना काहीं बिगरकागदी ना तिलांजली द्या, भरपूर शिका आणि स्वाभिमानाने आणि आनंदाने जगा.

बाबूश

का कुणास ठाऊक पण माझी पिल्लं जन्मल्यापासुन त्यांच्या वडिलांना ते बाबूश म्हणून आधी ओळखत होते मग हाक द्यायला लागले ते माझ्यामते ५वी - ६वी पर्यंत. मग अर्थात थोडेसे बदल झाले आणि बाबूश चं बाबा, डॅड ई. कधी झालं ते कळलं देखील नाही. असो. दररोज वैविध्य प्राचीन, पुरातन आणि आधुनिक गोष्टी सांगणारे, नाही म्हटलं तरी कडक, अत्यंत शिस्तप्रिय, व्यायामाची जिद्द, खूप सातत्याने नवनवीन शिखरं पादाक्रांत करून मुलांसमोर एक आदर्श निर्माण करणारे असे.

एवढ्यातच लिंक्डइन वर एक पिटुकली गोष्ट नजरेस पडली. एका वडिलांनी त्यांचा एक अनुभव कथन केला होता. ते त्यांच्या मुलीला शाळेच्या दारात सोडतांना सांगायचे दररोज कि "आजचा दिवस नक्की एन्जॉय कर आणि नवीन काहीतरी शिकं". आज शाळा पुन्हा नव्याने सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी शाळेच्या पायरीवर सोडतांना आई-वडिलांनी हे नेहेमीच वाक्य उच्चारताच लेक म्हणते कशी "आजचा दिवस नक्की एन्जॉय कर बाबा आणि नवीन काहीतरी शिकवं". व्वा, किती सुंदर ना?.

मी अगदी लहानपणी शाळेत जाऊन आले कि माझे बाबा मला आवर्जून विचारायचे, मला लाडाने का अजून काय कारण होतं माहित नाही पण ते मामा म्हणायचे, "मामा आज काय शिकवलंस टिचर ना?". मला खूप अप्रूप वाटायचं ह्या प्रश्नाचं आधी, कि टिचर / शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात ना? पण नाही, बघा ह्याला दूरदृष्टी म्हणायची का अजून काही पण मला नेहेमीचा अत्यंत बहुमूल्य सल्ला दिला त्यांनी, प्रत्येकाकडून नेहेमी चांगले गुण उचला, शिकत राहा, लहान असोत किंवा थोर. अगदी तेच नकळत मी नेमकं साधलं, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून, माझ्या सहपाठीं कडून आणि बाकी सर्वांकडून चांगलं टिपतं राहिले. त्यामुळे प्रत्येकाचे फक्त चांगले गुणधर्मच डोळ्यापुढे उभे ठाकले. बास.  

घरा बाहेर पडल्यावर फक्त दुसऱ्यांकडून शिकायचं नाही तर स्वतःच्या कृतीने, वागण्याने, बोलण्याने दुसऱ्याला नक्की छानसा धडा द्या, नकळत, नेहेमीच. उदाहरणार्थ, विद्यार्थी फक्त शिक्षक शिकवतात त्या विषयाबद्दलच शिकत नाही तर प्रत्येक कृतीचे सूक्ष्म निरीक्षण करतातच, शिक्षकाची भाषा, शब्द, विद्यार्थ्यांशी वागणं, बोलणं, पोशाख, नियम आणि बाकी सवयी, ई. 

बाबूश = एक छोटं पिटुकलं रोपटं ज्याला आधार देतं मोठं झाडं होण्यास, बहरण्यास सर्वतोपरी मदत करतो असा कल्पवृक्ष 

आज फादर्स-डे च्या निमित्याने ह्या माझ्या काही सुमधुर आठवणींना उजाळा मिळाला. माझ्यातर्फे प्रत्येक / संपूर्ण बाबा नावाच्या विश्वाला अनेक अनंत शुभेच्छा.

शनिवार, १८ जून, २०२२

इजा-बीजा-तीजा च्या पल्याड

आजचा दिवस फारच गोड सुरु झाला / उगवला, पार पडला आणि सरला देखील. ह्या दिवसाची सुरवात झाली एका अत्यंत मधाळ मेसेज ने, "कुठे आहात, आहात ना ऑफिसला आज? काही तरी तुमच्या आवडीचं आणलंय", त्यानेच तृप्त व्हायला झालं मला पूर्णपणे. त्यानंतर माझ्या हातात होते दोन डब्बे, एकात ताजा घरच्या आंब्यांचा रस आणि दुसऱ्यात पुरणपोळी. कित्ती सुमधुर ते.

हे काय कमी होतं माझ्या विभागप्रमुख नी माझ्या साठी खास वड्या करून आणल्या होत्या, घरच्या, नारळाच्या. त्यामुळे एकापाठोपाठ दुसरा डब्बा हाती आला, न मागता, अचानक.

हे तीन खास डब्बे सरप्राईझ असे मिळाले, माझा नेहेमीचा डब्बा होताच शिवाय.

ह्यात अजून एक खमंग भर पडली ती म्हणजे आमच्याच एक लाडक्या मॅडम चा वाढदिवस होता. ते काही वेळानंतर समजलं. मग काय त्यांनी देखील छोटेखानी पार्टी दिली, दुपारच्या चहा सोबत.

संध्याकाळी आमच्या घरी आम्ही नवीन पाहुण्याचं जंगी स्वागत केलं. त्या कारच्या शो रूम मधे भन्नाट केक खायला मिळाला. "त्याला" नैवेद्य म्हणून आणि चार आजूबाजूच्यांच तोंड गोड करण्यासाठी म्हणून दोन प्रकारचे पेढे मागवले.

नवीन मेंबर ची डिलिव्हरी घेण्यासाठी कदाचित वेळ लागू शकतो म्हणून आधीच चविष्ट चवदार सँडविचेस केले होते.

एक दिवस, एक पोट आणि बघा हे कित्ती पदार्थ.

मै और मेरे टॉपिक्स

 मै और मेरे टॉपिक्स
अक्सर ये बाते करते है
वो है इसलिये ये हो रहा है
वो है इसलिये मै हू
वो मिलते है तो मै नाच उठती हूं ।।

मै और मेरे टॉपिक्स
अक्सर ये बाते करते है
आप आते हो कहासे?
और थे कहा अब तक?
आप दिखते हो तो मै नाच उठती हूं ।।

मै और मेरे टॉपिक्स
अक्सर ये बाते करते है
आप है इतने छोटेसे
पर मै मेहेसूस खूब बडा करती हूं  
आप सामने रुबरु होते हो
तो मै नाच उठती हूं ।।

मै और मेरे टॉपिक्स
अक्सर ये बाते करते है
हमारे मिलने
का कोई फायदा?
क्यू ये सोचना?
आप जहेन मे आते हो तो मै नाच उठती हूं ।।

मै और मेरे टॉपिक्स
अक्सर ये और बहोत सारी बाते करते रहते है, बाते करते
रहते है ....

नवा दागिना

म्हणजे तसा जुनाच आहे हा देखील दागिना पण जरा हटके असा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी कोणी तो मला दिला असला तरी त्याला एक चकाकी / एक झालर निश्चित आहे कि तो मी कमावला आहे कष्टाने, खूप वाट बघून, पेरून, शांत राहून ई. त्यामुळे मला प्रिय असा हा दागिना आहे. बहुमूल्य म्हटला तरी वावगं ठरणार नाही असा.

लहान बाळांच्या पायात पैंजण घालतात आवर्जून, कारण, ते नक्की कुठे खेळात आहेत, धडपडत आहेत हे सगळं दूर राहून देखील आईला, आजीला, घरच्यांना लक्षात येतं. थोडी मुलगी मोठी झाली कि पैंजण लाच एक प्रतिशब्द आहे तो म्हणजे छुमछुम. त्या अगदी पिटुकल्या घुंगरांचा आवाज इतका मधुर असतो कि त्याचमुळे त्याला हे नाव ठेवलं असणार. त्या छुमछुम मुळे त्या मुलीला एक नकळत सांगितीक साथ मिळते सतत, अगदी "जेथे जातो तेथे तो माझा सांगाती" अश्या पद्धतीची. छल्ला, कानातले झुमके, अधेमधे येणारे बांगड्यांचे, अंगठीचे आवाज ई. मुळेच मुलींचं विश्व एका वेगळ्या पद्धतीने व्यापलं आहे. आणि बाकीच्यांचं मला अजिबात ठाऊक नाही पण माझा तरी स्वयंपाक घरातला वेळ ह्या सगळ्या सूक्ष्म आवाजांमुळे खूप मार्गी लागतो, गती मिळते कामाला आणि कृतज्ञापूर्वक समाधान लाभतं ते वेगळंच "चेरी ऑन केक" जसं.

अगदी त्याच धरतीवर सध्या माझे प्रत्येक क्षण / तास आणि दिवस सुरु आहेत.

मला ओळख-पत्र = आयडी-कार्ड दररोज गळ्यात घालून ठेवायची सवय आहे, न चुकता. कारणं अनेक आहेत, 

  • एक म्हणजे ते मला कमावता आलं आहे, ती माझी एक ओळख आहे आणि ते बघून दररोज त्यामागची मेहेनत ह्याचा विसर पडत नाही मला. 
  • आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्या कार्डला मी माझ्या केबीनची चावी लावली असते, म्हणजे पुन्हा एकदा विसरायला नको, हातात बाळगायला नकोच ई. 

एवढ्यातच अत्याधुनिक वातानुकूलित अशी नवीकोरी केबिन लाभली आहे मला. त्या केबिनच्या ३ भल्यामोठ्या चाव्या आहेत, ज्या मी माझ्या कार्डला कालपासून लावल्या आहेत. आई शपथ, लहानपणी मी जेवढं पैंजण, छुमछुम, मग ओघाने आलेला छल्ला, झुमके, अंगठ्या, बांगड्या जितक्या एन्जॉय नाही केल्या तितक्या ह्या किल्य्यांचा सुमधुर आवाज करते आहे. त्यामुळे देखील मला अजून चालायची अवीट गोडी लागली आहे, पुन्हा एकदा, नवखी अशी. अहाहा च. शब्दात गुंफणे अतिशय अवघड आहे, कारण मी जे स्वतः अनुभवते आहे ते फारच उत्कृष्ट आहे आणि जगापल्याडचं. तर असा हा माझा नवखा दागिना, ज्याच्या आवाजात एक वेगळी सांगितीक भाषा आहे जी फक्त माझ्यासाठी च आहे, जी मलाच समजते अशी. "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे", असं काहीसं अनुभवते आहे मी. 

त्या किल्ल्यांच्या जुडप्याला छे छे, माझ्या नवख्या दागिन्याला अतिशय मनापासून धन्यवाद आणि ज्याने त्या तय्यार केल्या आहेत त्यांना देखील.

फँटसी

सध्या काय गेले काही वर्षांपासून सातत्याने कानावर पडणारा शब्द / संकल्पना म्हणजे "लग्नबाह्य संबंध". खूपच कॉमन झाल्यासारखं आहे हे, सर्वत्रच असतं अशी तर नव्या पिढीची समजूतच झाली आहे. असो. आणि मनुष्याचा स्वभाव, अपेक्षा, मन, गरजा, वातावरण, सहन करणे, प्रेशर  ई. कडे बघितल्यावर हे नक्की ध्यानात येतं कि कदाचित बाहेर पाऊल पडणारच, साहजिक आहे. पण त्याचे परिणाम, दुष्परिणाम आणि पालुपद कधी कधी हाताबाहेर जातात. मग माझ्या असं लक्षात आलं कि फँटसी हा मार्ग पण सहज अवलंबला असतो सर्वांनी अगदी कळत्या वयापासून. आपली सहचारिणी कशी असेल?, नोकरी कशी असेल?, बॉस कसा असेल? ई. आपण नेहेमीच वेगळ्या विश्वात रमून डोळ्यासमोर बघत असतो, ते देखील नसतांना. मग हीच क्लुप्ती बाहेरच्यांशी संबंध ठेवण्या शिवाय का नाही वापरात सर्रास? कदाचित कामात येईल देखील. किंवा आहे त्यातच अपेक्षित बदल घडून येईल, कारण शेवटी संपूर्ण विश्व हि पण एक फँटसीच, नाही का? फँटसी मुळे मग तुम्हाला आवडेल त्या व्यक्तीशी संवाद साधा, भेटा, गप्पा मारा, ज्यामुळे कधी कधी तर आपल्याच / किंवा आपण त्यांच्या आजुबाजुला असल्याचा देखील भास होऊ शकतो, तो अनुभवा ई. फँटसी तुमच्या पद्धतीने जगा. अर्थात "अती तेथे माती" होणार नाही ह्याची खबरदारी निश्चित घ्या म्हणजे मिळवलं.

मोकळं होणं महत्वाचं, त्यासाठी कोणी

  • प्राण्याशी गप्पा मारतं
  • पक्ष्यांशी संवाद साधतं
  • स्वतःच्या पिल्लांसोबत वेळ घालवतं
  • मित्र-मैत्रिणींशी हसी मजाक करतं
  • सहापाठींशी शेर करतं
  • "त्याच्याशी" सुद्धाहवं ते सांगितलं जातं (एका गाण्यात / भजनात म्हटल्या प्रमाणे आपण मीरेसारखं आळवत नाही त्यामुळे आपल्याला "तो" अनुभवता येत नाही)
  • पुस्तकांशी (वाचन करत) संवाद साधतं
  • वह्यांशी (कविता लिहितांना) हितगुज करतं
  • कॅनव्हास शी (चित्र रेखाटतांना) गुजगोष्टी सांगत ई.


ह्या क्षणी मला माझी एक खास मैत्रीण आणि तिचे वाक्य आठवले, ती म्हणायची कि जेव्हा जेव्हा माझे सासरे कटकट सुरु करतात तेव्हा मी दुबईची एक चक्कर मारून येते आणि मला पुन्हा एकदा परदेशी सफरीचा आनंद उपभोगता येतो घर बसल्या. शिवाय त्यांची बडबड तर कानापर्यंत सुद्धा येत नाही, आत शिरणं तर फार दूर राहिलं. हा तर फक्त एक किस्सा झाला आणि शिताफीने प्रसंग हाताळण्याची एक युक्ती.

फँटसी युक्त आपली अशी छोटीशी दुनिया निर्माण करा, समतोलपणा राखा आणि मस्त जगा.

बुधवार, १५ जून, २०२२

गोड म्हणजे गोड म्हणजे गोड असतं

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" हा एक सुप्रसिद्ध मराठी चित्रपट आणि अगदी तस्सेच माझे नितांत प्रेम आहे आमरस आणि पुरणपोळी वर देखील. त्याचं फक्त श्रेय जातं ते माझ्या खास मैत्रिणीला शिल्पा ला. कारण तिच्याच मुळे मला हा पराकोटीचा आनंद उपभोगता आला आणि येतो आहे गेले ९ वर्षांपासून. मला शिल्पाने सांगण्यापूर्वी फक्त हे ठाऊक होतं कि एक तर आमरस चाखायचा किंवा पुरणपोळीचा स्वाद घ्यायचा. आणि हे पदार्थ जसे वेगळे आहेत तसा त्यांच्या मुळे मिळणार आनंद वेगळा. पण नाही हो, आमरस-पुपो हा एक पदार्थ आहे. माझ्या खरंच ज्ञानात भर पडली जेव्हा मी हे एकत्र बघितलं आणि फस्त केलं. आणि तेव्हा पासून जी हि उन्हाळ्यातली प्रथा सुरु आहे ती आज तागायत शाबूत आहे. आज माझ्यासाठी खास आमरस-पुपो चा डब्बा आला आहे, हो मी काही क्षणात फस्त केला. त्यामुळे मला खालील बाबी समजल्या:

१. शिल्पा चुकीच्या ठिकाणी आणि व्यवसायात आहे,

२. ती एक उत्कृष्ट कूक आहे, अन्नपूर्णा प्रसन्न असलेली,

३. "चार चांद लग गये", "आनंद द्विगुणीत होणे", "चेरी ऑन केक", "परमानंदाची प्रचिती येणे" ह्या म्हणींचा मतितार्थ / खरा अर्थ आज मला समाजाला,

४. माझ्या मते आज "आनंद चौगुणीत / अपारगुणीत / अनंतगुणीत झाला" असं म्हटलं पाहिजे.

दोन पिल्लाचं करायचं, ऑफिस मधे डोकं वर काढायला वेळ नाही एवढं काम, बाकी असंख्य जबाबदाऱ्या आणि त्यात माझी फरमाईश उत्साहाने पूर्ण करायची म्हणजे कमाल आहे, खरंच. मी तर पूर्णतः निशब्द झाले. न मागता अचानक एखादी भन्नाट गोष्ट मिळाली तर? खजिन्याची चावी मिळावी तसं झालं आज माझं थोडक्यात, जेव्हा अचानक प्रेमाने ओतप्रोत भरलेला आमरस-पुपो चा डब्बा हाती आला. 

माझी आई नेहेमी सांगायची मला कि भेटवस्तू काय मिळाली ह्या पेक्षा त्यामागची संपूर्ण प्रोसेस महत्वाची, गिफ्ट देणाऱ्याने तुमच्या बद्दल विचार केला, तुम्हाला काय आवडेल ह्या साठी वेळ आणि ऊर्जा खर्च केली ई., अगदी तसेच माझ्यासाठी पुपो आणायची म्हणजे चणाडाळीचे चार दाणे कालच जास्त घेतले गेले, एक-दोन आंबे जास्त घेऊन रस केला गेला, प्रेमाचा साज चढवला, सुबक डब्यात भरून आणला, मेसेजेस केले, आई गं, हे सगळं किती गोड आहे... हैप्पी आणि लकी टू हॅव हर ऍज माय फ्रेंड.

मंगळवार, १४ जून, २०२२

तांत्रिक शब्द गुंफण

मी जेव्हा संगणक अभियांत्रिकी चं शिक्षण घेतलं तेव्हा आमच्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत काही गिनेचुने संगणक असायचे. पहिले संगणकाशी संभाषण कसं करायचं हे आम्हाला वर्गात शिकवलं जाई आणि त्याकरता आम्ही फक्त आमची वही+पेन आणि डोकं वापरात असू. ह्या सगळ्याची सुरवात आधी फ्लोचार्ट काढून आणि अल्गोरिदम लिहून केली जात असे. तो ठिकठाक वाटला तर मग "तांत्रिक शब्द गुंफण" अक्का कोड / प्रोग्रॅम लिहिला जात असे, ते देखील पुन्हा वहीतच. बास. वरून डायरेक्ट टपकल्यासारखं एडिटर उघडून संगणकावर प्रोग्रॅम लिहायला सुरवात होत नसे. त्याकरता लागणारे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हातात खेळण्यांसारखे वागवले जात नव्हते, किंबहुना नव्हतेच आणि आई वडिलांनी घेऊन दिले नव्हते / इतस्ततः उपलब्ध नव्हते. त्यामुळे संपूर्ण तय्यारीनिशी उतरावं लागायचं प्रयोगशाळेत आणि झटकीपट संपवावं लागायचं काम. हे सगळं पुढे फार कामाला आलं सर्वांना आणि वही+पेन / पेन्सिल हि पद्धत बहुउपयोगी आहे लॉजिक तय्यार व्हायला.

माझे आणि अनेक वर्षांनंतर माझ्या मुलांचे बॅडमिंटन चे सर पण सांगायचे कि कमीतकमी १-२ वर्ष आधी शारीरिक आणि मानसिक तय्यारी करावी मुलांनी मग रॅकेट हातात उचलावी. व्यवस्थित व्यायाम होणं अत्यावश्यक आहे, शिस्तीत खाणंपिणं हवं, आणि मग रॅकेट.

माझ्या एक प्रिय मैत्रिणीचे वडील आणि थोरले बंधू वैविध्य वाद्य शिकवतात, त्यांची संस्था कार्यरत आहे गेली अनेक वर्ष. ते विध्यार्थी आला कि ऍडमिशन असं सहसा करत नाहीत. आधी विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटाची पारख केली जाते आणि त्यानुसार ठरवलं जातं कि हा विद्यार्थी कुठल्या वाद्याकरता घडला आहे. समजा गिटार हे वाद्य सुचवलं तर पहिले २-३ महिने फक्त गिटार मांडीवर घेऊन क्लास मधे बसायला सांगितलं जातं. जो तक धरू शकला तो जिंकला आणि मग त्याचे खरे शिक्षण सुरु होते.

"तांत्रिक शब्द गुंफण" असो, नाहीतर खेळ अथवा संगीत, सगळेच कलेचे अविष्कार आहेत. त्यात टप्प्या टप्प्याने जाणं आवश्यक. घाई करू नये अजिबात आणि प्रत्येक टप्प्याचा मनापासून आनंद उपभोगावा म्हणजे अग्रस्थान प्राप्त करता येतंच. 

नाविन्यपूर्ण दृश्य

जगप्रसिद्ध, बहुउपयोगी, स्वास्थ्यवर्धक अशी हि वडाची पुजेचा खास दिवस आज. त्या निमित्याने ऑफिस ला जाता जाता वडाला ह्यांच्या दिर्घायुष्याबद्दल हात जोडले, भरपूर नैसर्गिक प्राणवायू सातत्याने पुरवल्या बद्दल त्याचे धन्यवाद मानले आणि सर्वांना सुधृढ ठेव अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. वडाच्या झाडापाशी पोचले तर वेगळंच दृश्य नजरेस पडलं. खूप मुलं म्हणजे ३०शीतली वडाच्या पाराजवळ खूप कामात व्यग्र दिसली म्हटलं झालं तरी काय? कोणी राजकारणी आला का? किंवा अजून काही. माझ्या गतीने माझी गाडी उभी केली तिथवर पोचेपर्यंत मला पोटभर हसता आलं. ज्यांच्या मुळे हे सहज शक्य झालं त्यांना मनापासून धन्यवाद.

वडाच्या झाडाच्या सानिध्यात ठराविक प्रदक्षिणा घालणे, त्या वटवृक्षाच्या छायेखाली काही काळ उभं राहणे आणि ते देखील ऋतू बदलाच्याच वेळी, हे का? आणि हे फक्त महिला / मुली ह्यांनाच आवश्यक आहे का सर्वांसाठी उपयोगी? तर प्रचंड प्राणवायूचा साठा ह्या वृक्षापाशी आठळतो. काही क्षण, ११ / २१ प्रदक्षिणा करत असतांना जो स्वच्छ शुद्ध प्राणवायू आपण सेवन करतो तो क्रतू बदलतांना आणि वर्षभर देखील साथ देतो, सुधृढ ठेवतो त्या व्यक्तीला. वड हा वृक्ष सातत्याने फक्त देत असतो, त्याच्या प्रत्येक भागाला महत्व आहे, त्याचा उपयोग आहे, हे असे असंख्य वडाचे गूण प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावं ह्या करता आज आणि जमेल तेव्हा (बुस्टर डोस आवश्यक असेल तेव्हा) ह्या वटवृक्षाच्या सानिध्यात थोडा वेळ व्यतीत नक्की करावा सर्वांनी, फक्त स्त्रियांनी नाही. प्रत्येकाच्या विचारसरणीत ३६० अंशाचा फरक नक्की दिसेल/ घडेल.

ह्या सर्व काल्पनीक, माझ्या डोक्यात सुरु असलेल्या विचारांचं ज्वलंत उदाहरण आज माझ्या नजरेस पडलं. मला आज हि अनुकथा लिहायची होती, वडाची पूजा का करायची? कोणी करायची? ई. त्याची तय्यारी कालपासूनच सुरु होती, आणि मला असं वाटलं होतं कि मी जे लिहिणार ते नवीन आणि खास असणार. पण छे हो, ह्या तरुण पिढीनी तर माझी विकेटच उडवली. कित्ती उत्साहाने फोटो काढणं सुरु होतं, व्हिडिओ तय्यार केला जात होता, काहीजण तान्ही बाळं सांभाळत उभी होती तर बाकी साडी+दागिने+गजरा+पूजेचं सामान ई. सहित स्वतःला सावरत कारचं दार उघडणं अशक्य म्हणून दार धरून उभे होते, अहाहा च. देवा, कित्ती उत्कृष्ट दृश्य होतं ते. मी जाणूनबुजून थबकले, थांबले, सर्व डोळ्यात साठवलं आणि मग गाडीत बसले ऑफिसला रवाना व्हायला. दृष्ट लागण्यासारखं होतं सर्व. माझ्या डोक्यात आलेले सर्वच प्रत्यक्षात अमलात येत होतं, हे बघून डोळ्याच्या कडा ओलावल्या हे नक्की. आधी फक्त महिला आजची पुजाअर्चा करायच्या, उपासतपास आग्रहाने अंगिकारायच्या. त्यानंतर मधला एक काळ असा आला कि ज्यात पुरुष वर्ग देखील उपास करू लागले, पण त्यानंतर सर्वांनाच वैज्ञानिक महत्व पटलं आणि आजचा सुदिन माझ्या दृष्टीस पडला.  हा सर्वांचा उत्साह असाच नेहेमी टिकून राहावा हे मनापासून मागणे "त्याला" / वटवृक्षाला. आमेन.

तर अशी हि आधुनिकतेची झालर, साज चढलेल्या वटपौर्णिमेची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.

"लिंबोणीच्या झाडामागे..."

हे एक फारच लोकप्रिय बालगीत आहे, जे पिढ्यांपिढ्या असंख्य आयांनी गायलं आहे आणि मुलांनी ऐकलं आहे झोपेच्या कुशीत शिरण्या आधी. मी ऐकलं, माझ्या मुलांना ऐकवलं, माझ्या मैत्रिणी, नातेवाईक, शेजारीपाजारी ई. सर्वांनीच ह्या गाण्याचा लाभ घेतला. माझ्या दृष्टीने जेव्हा हे गाणं प्रसिद्ध झालं, प्रत्येकाच्या ओठी होतं तेव्हा सर्वत्र बैठी घरं होती, गगनचुंबी इमारती नव्हत्या. कडूलिंबाचं झाड नेहेमीच भलं मोठं, उंच आणि भरपूर फांद्या+पानं +लिंबोण्यांनी नटलेलं सजलेलं असं असतं. सध्या माझ्या चवथ्या मजल्याच्या फ्लॅट च्या खिडकीत पोचलं आहे असंच एक कडुलिंबाचं झाड. प्रचंड औषधी गुणधर्म असलेलं आणि त्यामुळे प्रत्येक अंगणात असावं असं. बैठी घरं असल्यामुळे, निरभ्र आणि स्वच्छ आकाश असल्यामुळे त्या काळी छोटी खिडकी, त्यापुढे लिंबोणीचं झाड आणि त्या पल्याड चंद्र अशी स्थिती होती. ह्या सेटिंग मुळे अनेक पिढ्यातली मुलं शांत झोपी गेली. पण आता? चंद्र नजरेस पडणं अवघड, त्यात घरांची / फ्लॅट ची उंची झाड्यांच्या कैकपट + चंद्र, लिंबोणी सारख्या नैसर्गिक बाबीसाठी अरसिक मुलं? ह्या सर्व यक्ष प्रश्नांमुळे हे बालगीत लोप पावतंय. आणि सध्याच्या जमान्यात अवयव जसे ते सगळे गॅजेट्स, उपकरणं, मोबाईल, टीव्ही ई. पासून थोडसं अंतर बाळगाच. आपली धरणी, निसर्ग, हवा, पाणी, झाडं, वेली, फळं, फुलं, पक्षी, जमीन, माती, पाऊस, सावली, शेती, निसर्गातले विविध आवाज ई. आणि बऱ्याच अश्या गोष्टीची प्रत्यक्ष ओळख करून द्या, चित्रात नाही, विडिओ मधे नाही, आवर्जून, हळूहळू, वेळ काढून.  ह्या सर्वांमुळे आपण आहोत हे विसरून चालणार नाहीच. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर नक्की करा पण आवश्यक असेल तेव्हा, आहारी जाऊन नाही. तंत्रज्ञान आणि विविध मशीन्स हा फक्त एक घटक आहे, निसर्ग हा अविभाज्य घटक आहे.  चला तर मग, आईबाबा कृपया तुमचं तान्ह बाळ झोपायच्या वेळी तरी खाली घेऊन जा, (वरच्या मजल्यावर सोसायटीत राहातं असाल तर) स्वच्छ शुद्ध हवेचा लाभ घ्या, लिंबोणी चंद्र ई. दाखवा आणि स्वतःच बालपण पुन्हा एकदा जगा / अनुभवा.

सोमवार, १३ जून, २०२२

कसं काय?

का कुणास ठाऊक पण मला असंख्य जण अनेक प्रश्न सातत्याने विचारत असतात, हा त्यातलाच एक. मी जेव्हा जेव्हा अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक माझ्या अनुकथा कोणाशी शेअर करते तेव्हा पहिला प्रश्न असा विचारला जातो कि "तुम्हाला वेळ कसा मिळतो लिहायला?", "कामं नसतात का इतर?", "सुचतं कसं?", "का लिहिता? कोण वाचणार हे, ह्यात खास काही अर्थ नाही", "लिखाण खूप लोकांपर्यंत पोचावं ह्यासाठी काय करता?" ई. आणि अनेक. आधी मी शांतपणे आणि उत्साहाने प्रत्येक अश्या प्रश्नांची उत्तर देत असे, पण आता फक्त एक मोठं स्मितहास्य देते आणि बास. जे काही माझे तुटपुंजे वाचक आहेत त्यांचे अभिप्रायच पुरेसे आहेत पुढे लिहायला मला. ते सर्व जण माझ्या साठी त्यांच्या व्यापातून वेळ काढतात हेच खूप झालं माझ्यासाठी. त्या पलीकडे म्हणजे मला हे विषय कसे सुचतात हे अजिबात ठाऊक नाही, डोक्यात किडा वळवळतो आणि माझ्या हातून लिहिलं जातं, एक माध्यम म्हणून, बास. मी कोण होते लिहिणारी? विषय समोर उभा ठाकणे, शब्द सुचणे, मोटर स्किल्स वापरून बोट चालून ते उतरवले जाणे, हे सगळं माझ्या दृष्टीने जादूच आहे, ह्या पलीकडे काही नाही. ह्या छोटेखानी कार्यासाठी मलाच का निवडलं गेलं हा हि एक मोठा यक्ष प्रश्न आहे, ह्या लिखाणामुळे काय होणार आहे? माहित नाही. पण मी जमेल तसं, जसा वेळ काढता येईल तसं कार्य सुरु ठेवलं आहे. जेवणाचा, टीव्ही चा, आणि बाकी वायफळ वेळ वाया न घालवता मी तो लिहायला वापरते, हि बुद्धी होते हा पण आशीर्वादच. नाही का? वेळ कधीच मिळत नसतो, काढावा लागतो आणि ती अर्ज / उत्कट इच्छा / अस्वस्थ करणारी स्थिती असते ना, ते लिहीत नाही तो वर अजिबातच सुचत नाही मला. असं का होतं? हे मला माहित नाही आणि मी त्यात पडले नाही कधीच, किंवा वाचक कसे वाढतील ह्यात देखील मी कधीच वेळ वाया घालवत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, देत देखील नाही आणि त्यामुळे मला कुठलाही फरक पडत नाही, उलटं मला नवीन विषय सुचतात, कोणाला नवीन लिखाणाची लिंक द्यायची, कोणाला द्यायची नाही हे निश्चितपणे समजतं आणि वैविध्य स्वभाव दर्शन घडतं. त्यामुळे ह्या विचारलेल्या प्रश्नांना धन्यवाद, ज्यांनी विचारलेले त्यांना मनापासून आभार.  

एक खास प्रश्न

२०१८ मधे मी अनुभवलेल्या माझ्या पायांच्या एपिसोड नंतर अनेक जण मला हा एकच प्रश्न विचारतात. "तुम्ही नक्की काय केलंत पायांसाठी? आणि तुम्हाला नक्की कश्यामुळे बरं वाटलं?". मागे वळून बघितलं तर मला जशी सद्बुद्धी होत गेली मी त्या प्रमाणे वागत गेले. आपल्या सर्वांना परिचित अश्या अनेक थेरपी आहेतच, पण मी फक्त एका थेरपी वर अवलंबून राहण्यापेक्षा कॉम्बिनेशन वर भर दिला आणि त्याचा मला फार उपयोग झाला. मी अगदी प्रचलित ऍलोपॅथी औषधं सुरु ठेवली, होमिओपॅथी पण घेत होतेच, फिझिओ थेरपी ची साथ मिळाली, त्यात ऍक्युप्रेशर सुरु ठेवलं, हलक्या हाताने तेल मालिश होतं, पौष्टिक आहार, लिखाण, मनापासून पायावर पुन्हा एकदा उभं राहण्याचे प्रयत्न ई. सर्वच एकाच वेळी सुरु ठेवलं होतं. अहो भाग्य माझं, प्रत्येकाला फक्त दोनदा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळते, एकदा लहानपणी एखाद वर्षाचं असतांना आणि मग शैक्षणिक पदवी मिळाल्यावर नोकरी निमित्याने. पण मला हि संधी तिसऱ्यांदा लाभली. मी त्याचं सोनं करण्याचं ठरवलं आणि सर्वांची साथ मिळाली, प्रत्येक डॉक्टर च्या स्वरूपात मला नवीन, अनोखी, प्रचंड उत्साही, खूपच सकारात्मक मैत्रिणच मिळाली. आता सांगा कि मला नक्की कश्यामुळे फायदा झाला हा प्रश्न अनुतर्रित नाही का? नवीन मैत्री मुळे, पौष्टिक आहारामुळे, वैविध्य प्याथींमुळे, माझ्या संपूर्ण मित्र परिवारामुळे आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे, "त्याच्या" आशीर्वादामुळे, का "त्यानेच" दिलेल्या मनोधैर्यामुळे? मी परत माझ्या पायांवर नेहेमीपेक्षा कणभर जास्त भक्कम पणे उभी ठाकली आहे.

आपण एक तर योग क्लास ला जातो, किंवा घरीच नेमून दिलेली आसनं करतो, साधारणतः ४०-४५ मिनिटे. त्यात अगदी दीर्घ श्वास, बैठे व्यायाम, उभे किंवा झोपून केलेले व्यायाम प्रकार असतात. मग नक्की कश्यामुळे प्रत्येकाला उत्साही वाटतं, बरं वाटतं, आजारमुक्त होतं, वजन कमी होतं?

इतके लोक असतात आपल्या आजूबाजूला सतत, आपल्या सानिध्यात, मित्र, मैत्रिणी, ऑफिस मधले सहकारी, नातेवाईक, प्रेम करणारी माणसं, काम करणाऱ्या बायका, ड्राईव्हर, चाहता वर्ग, विद्यार्थी आणि इतर, मग तुम्ही सर्वार्थाने वृद्धिगंत कोणामुळे नक्की होता?

सांगता येईल का अश्या जगावेगळ्या प्रश्नाचे उत्तर? नाहीच, अशक्यच. पण हो, वर नमूद केलेले सर्वच्यासर्वच बहुउपयोगी हो, कोणालाही म्हणजे कोणालाही डावलून चालणार नाहीच. हा क्युम्युलेटिव्ह = एकत्रित परिणाम आहे. त्यामुळे जेव्हा जे हवं त्या प्याथीचा आधार घ्या, प्रत्येक मित्र आणि नातं मनापासून जपा, आणि कुठलाही विचार न करता, निरपेक्ष पणे सातत्याने योग करा, सुधृढ राहा. 

प्रत्येक योगासन उपयोगी, एकूणएक पौष्टिक घास महत्वाचा, सर्वांच्या शुभेच्छा अगदी ज्यांनी मालिश चं तेल तय्यार केलं त्यांच्या देखील, फिजिओ थेरपी आणि ऍक्युप्रेशर करतांना मनातल्यामनात केलेली प्रार्थना ई. महत्वाचं आणि एकंदरीत गोळाबेरीज म्हणजे कणाकणाने मिळालेलं प्रकृती स्वास्थ्य. त्यामुळे सातत्य ठेवा, इच्छाशक्ती जबरदस्त बाळगा, शंका मनात येऊच देऊ नका, मी कधी बरी होणार? असं स्वतःला विचारू नका, श्री. साईबाबा म्हणतात तसे "श्रद्धा आणि सबुरी", बास, सगळं उत्तम आहेच आणि राहणार. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या थोड्याश्या आधीच शुभेच्छा.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...