का कुणास ठाऊक पण माझी पिल्लं जन्मल्यापासुन त्यांच्या वडिलांना ते बाबूश म्हणून आधी ओळखत होते मग हाक द्यायला लागले ते माझ्यामते ५वी - ६वी पर्यंत. मग अर्थात थोडेसे बदल झाले आणि बाबूश चं बाबा, डॅड ई. कधी झालं ते कळलं देखील नाही. असो. दररोज वैविध्य प्राचीन, पुरातन आणि आधुनिक गोष्टी सांगणारे, नाही म्हटलं तरी कडक, अत्यंत शिस्तप्रिय, व्यायामाची जिद्द, खूप सातत्याने नवनवीन शिखरं पादाक्रांत करून मुलांसमोर एक आदर्श निर्माण करणारे असे.
एवढ्यातच लिंक्डइन वर एक पिटुकली गोष्ट नजरेस पडली. एका वडिलांनी त्यांचा एक अनुभव कथन केला होता. ते त्यांच्या मुलीला शाळेच्या दारात सोडतांना सांगायचे दररोज कि "आजचा दिवस नक्की एन्जॉय कर आणि नवीन काहीतरी शिकं". आज शाळा पुन्हा नव्याने सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी शाळेच्या पायरीवर सोडतांना आई-वडिलांनी हे नेहेमीच वाक्य उच्चारताच लेक म्हणते कशी "आजचा दिवस नक्की एन्जॉय कर बाबा आणि नवीन काहीतरी शिकवं". व्वा, किती सुंदर ना?.
मी अगदी लहानपणी शाळेत जाऊन आले कि माझे बाबा मला आवर्जून विचारायचे, मला लाडाने का अजून काय कारण होतं माहित नाही पण ते मामा म्हणायचे, "मामा आज काय शिकवलंस टिचर ना?". मला खूप अप्रूप वाटायचं ह्या प्रश्नाचं आधी, कि टिचर / शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात ना? पण नाही, बघा ह्याला दूरदृष्टी म्हणायची का अजून काही पण मला नेहेमीचा अत्यंत बहुमूल्य सल्ला दिला त्यांनी, प्रत्येकाकडून नेहेमी चांगले गुण उचला, शिकत राहा, लहान असोत किंवा थोर. अगदी तेच नकळत मी नेमकं साधलं, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून, माझ्या सहपाठीं कडून आणि बाकी सर्वांकडून चांगलं टिपतं राहिले. त्यामुळे प्रत्येकाचे फक्त चांगले गुणधर्मच डोळ्यापुढे उभे ठाकले. बास.
घरा बाहेर पडल्यावर फक्त दुसऱ्यांकडून शिकायचं नाही तर स्वतःच्या कृतीने, वागण्याने, बोलण्याने दुसऱ्याला नक्की छानसा धडा द्या, नकळत, नेहेमीच. उदाहरणार्थ, विद्यार्थी फक्त शिक्षक शिकवतात त्या विषयाबद्दलच शिकत नाही तर प्रत्येक कृतीचे सूक्ष्म निरीक्षण करतातच, शिक्षकाची भाषा, शब्द, विद्यार्थ्यांशी वागणं, बोलणं, पोशाख, नियम आणि बाकी सवयी, ई.
बाबूश = एक छोटं पिटुकलं रोपटं ज्याला आधार देतं मोठं झाडं होण्यास, बहरण्यास सर्वतोपरी मदत करतो असा कल्पवृक्ष
आज फादर्स-डे च्या निमित्याने ह्या माझ्या काही सुमधुर आठवणींना उजाळा मिळाला. माझ्यातर्फे प्रत्येक / संपूर्ण बाबा नावाच्या विश्वाला अनेक अनंत शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा