शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

२२८७:बदली: कालचा टप्पा, आजची उडी

मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी मिळाली. मी ती संधी घेतली आणि ती सार्थक झाली कारण संस्थेचे आणि संस्थापकांचे नाव जगप्रसिद्ध आहे. 

जेव्हा मी फोन करून माझ्या आईला सांगितले की मी कामासाठी दुसरीकडे जात आहे आणि हे काम किती महत्त्वाचे आहे, तेव्हा तिला जगावेगळा आनंद झाला. तिचे शब्द होते: "कित्ती मस्त! नवीन काम खूप आव्हानात्मक आहे, त्यासाठी तुला निवडले आणि त्यामुळे तुझी बदली झाली! नवीन ठिकाणी सांभाळून राहा."

खूप वर्षांनी मी तिला इतके आनंदी पाहिले होते आणि त्याचे श्रेय कदाचित त्या 'बदली' या शब्दाला जाते. आई नेहमी सांगायची की बाबांची नोकरी पण बदलीची होती. कारण त्या काळात सरकारी नोकरी म्हणजेच बदली. खाजगीकरण आणि तंत्रज्ञान इतके फोफावले नव्हते, त्यामुळे शासकीय सेवा हाच प्रमुख पर्याय होता. सरकारी नोकरीत बदली स्वीकारली नाही तर बढती मिळत नसे, म्हणूनच बदली हा नोकरीचा एक अविभाज्य भाग होता.

परंतु आताशा 'बदली' हा शब्दप्रयोग पूर्णपणे थांबला आहे. कारण बहुतांश तरुण पिढी खाजगी किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहे आणि त्यांची शासकीय सेवेतील संख्या कमी आहे.

खाजगी कंपनीत काम करणारी तरुण पिढी पुष्कळदा सातत्याने नोकऱ्या बदलताना आढळते. मला आधी वाटायचे की तंत्रज्ञानातील जलद बदलांमुळे हे होत असावे, जेणेकरून नवनवीन तंत्रज्ञानावर काम करता यावे. दुसरे कारण म्हणजे वाढीव पगार. जर दुसरी कंपनी जास्त पगार देत असेल आणि इतर सुविधा योग्य असतील, तरी नोकरी बदलली जाते. काहींना ठराविक कंपनीत काम करायचे स्वप्न असते आणि संधी मिळताच ते ती स्वीकारतात. काहींना कामाचा ताण कमी हवा असतो, तर काही 'वर्काहॉलिक' असतात.

पण आज मला यामागचे खरे कारण समजले.

पूर्वी जेव्हा बदली होत असे, तेव्हा ती एक पर्वणी असायची, अर्थात, ही माझी आठवण आहे. बाबांच्या हुद्द्यामुळे आम्ही खूप मोठ्या सरकारी निवासस्थानांमध्ये राहिलो आहोत. नवीन जागा, नवीन माणसे, भटकंतीची नवीन ठिकाणे, वेगळे मित्र-मैत्रिणी, वेगळे शालेय वातावरण, खाद्यसंस्कृती, ही यादी खूप मोठी आहे.

या निमित्ताने कामासोबतच खूप काही शिकायला मिळायचे. नाती कशी जपायची आणि टिकवायची, ज्याला आजच्या भाषेत 'PR' म्हणतात. तेव्हा शनिवार-रविवार घराबाहेर राहणे किंवा देश-विदेशात सहलींना जाणे, हे फार ऐकिवात नव्हते. त्यामुळे घर, मित्र-मैत्रिणी, शाळा, खेळ, अभ्यास, सण, सगळं काही उत्स्फूर्तपणे साजरे केले जायचे. बदलीमुळे जीवनात लवचिकता (Flexibility) यायची आणि ती टिकून राहायला मदत व्हायची.

मला खात्री आहे, बाबांनाही नवीन ठिकाणी, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर, विविध चमूंबरोबर काम करणे आव्हानात्मक आणि आनंदी वाटत असणार. कदाचित याच कारणामुळे, म्हणजे कार्यरत व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासोबत कुटुंबही वृद्धिंगत व्हावे म्हणून 'बदली' होत असे; तो नोकरीचा एक भागच होता.

आताची मुलं जी नोकऱ्यांमध्ये उड्या मारतात, त्याचे कारण आहे: ती बदली नावाच्या संकल्पनेला मिस करतात. त्यांना एकाच जागी रोज जाऊन कंटाळा येत असेल; त्याच लोकांशी, त्याच विषयांवर काम करणे सोपे नसते. ठरलेल्या आजूबाजूच्या ठिकाणीच खाणे, तेच रस्ते, तीच बिल्डिंग... त्यांना बदल हवाच.

म्हणूनच, नोकरी बदलणे ही 'बदली'ची नवीन संकल्पना आहे. स्वतःच आपली बदली करून घ्यायची. याचे फायदे-तोटे आहेतच. पण, "बदल हा जीवनातील एकमेव स्थिर घटक आहे" हेच यातून सिद्ध होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...