रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

फोन येणे

माझ्या घरी विविध प्रकारचे फोन येतात, नेहेमीच, सजीव व्यक्तींकडून तर अगदी सारखेच पण बाकी सगळ्यांकडून देखील. कसं? सांगते ऐका. 

आधी ताजी आजची गोष्ट आणि मग तुम्हाला भूतकाळाची सफर घडवते. सध्या माझी "बदली" झाली असल्यामुळे खूप दिवसांनी घरी आले आणि म्हणायला नको पण थोडीशी अवकळाचं आली होती घराला. रात्रभर झोप नाही मला, हे समजतंच नव्हतं कि कुठून सुरु करू आवरायला. मी काय आवरु, मावशींना काय सांगू, कसं सांगू ई. सरते शेवटी पहाटेच सुरवात केली एक एक कोपरा करत, थोडं बसत उठत मस्त लख्ख  दिसायला लागलं घरा, त्यामुळे अजून हुरूप वाढला आणि मावशींच्या मदतीने मज्जा आली. इतके म्हणजे इतके फोन आले त्यानंतर, कारने धन्यवाद दिले, स्वयंपाक घर, देव घर, न्हाणीघर ई. सगळेच बोलते झाले. इतकं म्हणजे इतकं समाधान वाटलं म्हणून सांगते, कोण म्हणतं घर आणि घरातल्या वस्तू निर्जीव असतात आणि ते फोन करत नाहीत, बोलत नाहीत ते, व्यक्त होत नाहीत. मला तर नेहेमीच जाणवतं प्रकर्षाने. आणि कोणी का म्हणे ना "आई कुठे काय करते" मला माझे "प्रशस्ती पत्र" मिळाले न मागता, समाधान लाभलं, अजून बाकीच्या सजीव प्राण्याने कशाला वेगळं सांगायला हवं, आणि का थांबायचं त्या करता? मी आपली अशीच पुढे जाणार ह्या विविध प्रकारच्या फोन च्या संभाषणांवर भर देऊन प्रत्येक ठिकाणी, घरी दारी. बास. असे अनोखे फोन अनुभवून / घेऊन तर बघा, जगावेगळी मज्जा येईल.

हि असली फोन संकल्पना माझी पिल्लं लहान असल्यापासून सुरु झाली खरं. त्यांना अभ्यासाचा फोन येत असे, जेवणाचा पण, पाण्याचा ई. पिल्लाना पण भलतीच मज्जा यायची आणि अडनेड वय असल्यामुळे ते ऐकायचे पण आणि पट्टाकिनी कामं व्हायची हसत खेळत.

त्यानंतर "मेरी बिल्ली मुझपर म्याऊ" पद्धतीने हिच माझी पिल्लं संगणकावर खूप वेळ मी काम करत बसले कि, फोन वर जास्त कामाचं बोलणं झालं कि, आणि अश्या टिपलेल्या आणि ज्याने मला कदाचित त्रास होईल अश्या वेळी मग म्हणायचे "मम्मा, तुझ्या संगणकाचा आत्ताच फोन आला होता बरं का". म्हणजे थोडक्यात "पुरे आता".

माझ्या मावशींनी घर नीट साफ नाही केलं तरी फोन येतो मला, झाडू चुकून जोरात आपटला गेला किंवा पडला त्यांच्या हातून, भांडे धुतांना आवाज झाला जास्त तर.....  त्यामुळे आता माझ्या अवतीभोवती सगळ्यांनाच हि अजिबोगरीब फोन संकल्पना माहिती झाली आहे आणि आवडली पण आहे.

असो, आज अनेक जणांचे आणि अनेक प्रकारे धन्यवाद देणारे फोन येऊन गेले म्हणून हा पंक्ती प्रपंच.  

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

अहोभाग्य

एका अनोख्या गिफ्ट बद्दल सांगणार आहे आज मी. सर्वांच्याच आयुष्यात येणारे काही टप्पे महत्वाचे असतात आणि आज फक्त मी काही ठळक वाढदिवसांबद्दल बोलते आहे. आधी फक्त साठी, पासष्टी, सत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन ई. वाढदिवसांना महत्व होत, किंबहुना सर्वांसमक्ष साजरे होत, मोठा सोहोळाच जणू.  त्यानंतर कधी हे निश्चित माहित नाही पण बहुतेक सॉफ्टवेअर तय्यार करण्यासाठी माणसांची ये-जा दुसऱ्या देशात सुरु झाली तेव्हा पासून असेल कदाचित गोजिरवाणे सोळा, अठरा, एकवीस, चाळीस, पन्नास अश्या वाढदिवसांना जास्त महत्व आलं आणि टिकलं देखील. अर्थात अर्धशतक गाठणं सध्याच्या वेगळ्या वेगवान धावपळीच्या काळात पण एक खास बात आहेच. ह्या सगळ्या बदलांमुळे मग अश्या खास दिवसांसाठी काय उपहार / भेट द्यायची ह्या कडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. मी पण प्रवाह पतित झालेच. पण एक सांगा मंडळी मुलाच्या पन्नासाव्या वाढ दिवसादिवशी त्याच्या आई वडिलांकडून शुभेच्छा मिळण्याचं भाग्य किती जणांना लाभतं? माझ्या दृष्टीने फार कमी. त्यात कुटुंब मोठं असलं, आणि त्यात लहान्या मुलाचा पन्नासावा म्हणजे तर दुधात साखर, केशर, बदाम, पिस्ते.... आणि हे न मागता मिळालेलं गिफ्टच नाही तर फार मोठे आशीर्वाद आहेत. अजून काय पाहिजे. ह्या पुढे सगळ्या मटेरिलिस्टिक / भौतिकवादी भेटवस्तू अगदी नगण्य. जे असे अहोभाग्य घेऊन जन्माला नाही आले त्यांना विचार म्हणजे समजेल / उमगेल. अर्थात ते आई बाबा मग प्रत्यक्ष शुभेच्छा / आशीर्वाद द्यायला नसतील समोर अगदी वाढदिवसाच्या दिवशी, पण ते आहेत हिच फार मोठी अनोखी भेट आहे. ते आई बाबा, ती मुलं असेच अनेक प्रसंग एकत्र साजरे करोत अनेक वर्ष, ठणठणीत प्रकृती सोबत हीच ईशचरणी प्रार्थना.

उत्साहाचा झरा

रविवारची गोष्ट आहे बहुतेक. मी माझा हक्काचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे जरा मनसोक्त फिरायला निघाले सकाळी, भल्या पहाटे वगैरे नाही. थोडेसे पाय मोकळॆ झाल्यावर परत आले तर आमच्या गार्ड ताई, बाकी काम करणाऱ्या मावश्या ई. कामावर आल्या होत्या. मग काय मला तर अनेक जणी सापडल्या गप्पा मारायला. मला अजून काय पाहिजे. बास मग मी गेले / रमले श्रवण भक्तीत कारण एक गार्ड ताई प्रचंड उत्साहाचा झरा असलेल्या सगळं सांगायला लागल्या. म्हणतात कश्या "काल माझी डबल ड्युटी होती (सकाळी सात ते तीन  आणि  तीन ते अकरा), त्यानंतर घरी गेले, आवरलं, सकाळी पहाटे ४ ला उठले, सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, त्यात माझे चुलत सासरे आले आहेत त्यामुळे दोन भाज्या केल्या, मुलगा अगदी लहान आहे त्यामुळे त्याच खाणं + दूध तय्यार केलं, माझा डब्बा केला, माझी तय्यारी करून आत्ता सकाळी ७ च्या आता पोचले ऑफिस ला, कारण रात्र पाळीच्या गार्ड ना वेळेत सोडायचं असत.....". हे सगळं त्या बोलत होत्या तेव्हा मी सहज त्यांचं निरीक्षण करत होते आणि त्या इतक्या सध्या पण अप्रतिम तय्यार होऊन आल्या होत्या, इतक्या सहज रितीने सगळं सांगत होत्या, कुठेही नाराजी नव्हती, थकवा म्हणजे काय हे तर माहितच नव्हतं तिला. मग माझ्या मागे लागली आपण एकाचा वाढदिवस साजरा करायचा का? हे मागवायचं का, ते मागवायचं का? हे आणि ते. आज गुरवार तिची संद्याकाळची ड्युटी आहे, आज पण तोच उत्साह, कुठेही किंचित कमी न झालेला. कसं काय जमतं कोणास ठाऊक. असेच वैविध्य दिग्गज अक्का असाधारण लोक माझ्या आजुबाजुला असल्यामुळे फारच ऊर्जा मिळते मस्त काम करायला.

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

प्रेम

मंडळी इडली वरच्या माझ्या प्रेमाबद्दल तर आपण ह्या आधी बोललो, चर्चा केली आणि पोटभर हसलो देखील. ते प्रेम आता नवीन शिखर गाठू इच्छित आहे, कसं म्हणताय? सांगते. ऐका. 


अगदी ताजी आजची गोष्ट. 

कोणास ठाऊक त्या माउलीला कसं काय समजलं माझं इडली प्रेम, पण त्यांनी माझ्या साठी खास भरलेली इडली तय्यार करून आणली, साग्र संगीत. वरून दिसायला साधी पण आत गम्मत, ती पण मस्त, झक्कास तिखट चवदार अशी. त्या कामासाठी म्हणून महाराष्ट्रात आल्या आहेत पण त्यांच्या पद्धतीचे प्रकार सतत करत असतात, त्यातलाच हा एक. बटाट्याचं भरीत म्हणे, ते इडलीत स्टफ केलेलं. शिवाय उत्कृष्ट चवीची शेंगदाणा चटणी आणि सांबर. अर्थातच सगळं त्यांच्या खास शैलीत बनवलेलं, कुठलीही नक्कल न करता. त्या मुळे देखील ते अजून जगावेगळं आढळलं. सगळ्यात पहिले म्हणजे नरम, मऊ, सच्छिद्र, परिपूर्ण साधी इडली करणं म्हणजे आव्हानात्मक आणि त्यात पोट भरलेली... मी तर निःशब्द झाले. त्यात उगाच आणायची म्ह्णून नाही आणली, भरपूर प्रमाणात, सगळंच. स्वच्छ शिस्तीत बांधून आणलेलं. त्यांची कामाची वेळ सकाळी ७ ची. त्या आधी घरचं सगळं आटोपून, स्वतःचं करून, शिवाय माझ्यासाठी हे खास बनवून आणणं म्हणजे फक्त कमाल आहे. इडली म्हणजे काल सकाळ पासून तय्यारी, भरपूर अशी. मी त्यांची खरंच कोण? काय ऋणानुबंध असतील? मी तर त्यांच्या साठी काही म्हणजे काहीच केलं नाही? त्या माझ्या साठी काम पण करत नाहीत? मग इतकं? बरं त्या एक गार्ड आहेत. म्हणजे आर्थिक दृष्ट्या पण साधारण कदाचित. पण मन बघितलं का. हात राखून नाहीच. सगळे जिन्नस अगदी चांगल्या प्रतीचे वापरलेले. मला अत्यानंद तर झालाच, प्रश्न देखील पडले, शिवाय त्याच्या बद्दल / त्याच्या कष्टा बद्दल आदर निर्माण झाला, इडली बद्दल माझं असलेलं प्रेम अधिक बहरलं हे नक्की. ह्या अन्नपूर्णा प्रसन्न असलेल्या ताईंना शतश: धन्यवाद आणि त्यांच्या हातून सतत अशीच पदार्थांची रेलचेल सर्वांना चाखायला मिळो हीच ईशचरणी प्रार्थना. 

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

जास्तीच बटण

आज इस्त्री करतांना आतल्या भागात एक सुबक सुंदर बटण दृष्टीस पडलं. ते बघितल्यावर मग लक्षात आलं कि पुढील भागावर त्या ड्रेस च्या असे ६-७ बटण आहेत, शोभेचे. आत जास्तीच बटण देणे हि एक फार सुरेख पद्धत. एखाद वेळी जर पुढे लावलेलं बटण पडलं, निसटलं आणि सापडलं नाहीच तर असावं म्हणून दिलेलं. आणि आज काल सगळेच हे असं देतातच. नवीन नाही काही. पण अचानक एक साम्य समोर उभं ठाकलं आणि म्हटलं मांडव.

कदाचित मुलं मोठे झाले कि आपले आई-बाबा पण अशीच एक मागील बाजू पकडून अदृश्य स्वरूपात राहतात आणि पट्टाकिनी कामी येतात, काही हरवलं, लागलंच तर, पडलं तर. अगदी तस्सेच काही मित्र, मैत्रिणी, शेजारी, सहपाठी, नातेवाईक ई. असतात. चला तर मग आज मी जसे त्या निर्जीव जास्तीच्या पण खास अस्तित्व आणि महत्व असलेल्या बटण ला धन्यवाद दिले, तस्सेच थोडासा वेळ काढून कोपऱ्यातले किंवा कोपऱ्यात लपलेले सगळे त्यांना आठवू या. धन्यवाद नाही पण सहज बोलू तरी या, गरज पडण्याची वाट नको बघायला. नाही का?

सवंगडी

 
अगदी लहान असतांना त्या वेळेच्या प्रथेनुसार वर्षभराचे पापड, सांडगे, कुरडया ई. सगळं उन्हाळ्यात घरीच होत असे. आमच्या कडे आजूबाजूच्या शेजारणी, मावशी ई. यायच्या. आमचे वाळवणं तय्यार झालं कि मग आई त्यांच्या कडे जाऊन देवाण घेवाण होत असे, "एकमेका साह्य करू ...." असं काहीस. मज्जा म्हणजे मज्जा असायची. आमच्या टोळीला दोन महत्वाची कामं सोपवली जात असे. एक म्हणजे ते पापड उलटसुलट करणे  वाळले कि अंदाज घेऊन दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी संपूर्ण वाळले कि मग काढून डब्ब्यात शिस्तीत ठेवणे. आम्ही एका पायावर तय्यार. अगदी कच्चा पापडाचा गोळा / लाटी फस्त करण्यापासून आमची जय्यत तय्यारी असायचीच. मग काय आयतं कोलीत हातात मिळालं कि पापड उलटसुलट करण्याच्या निमित्याने अर्धे अधिक आमच्या पोटात. आई शप्पथ ते अर्धे कच्चे पापड काय लागायचे चविष्ट. अहाहा. आज हे पापड पुराण का? सांगते.

काल मी पापडाच्या लाटण्याने लाटलेली पोळी आधी पोटभर बघितली, चाखली आणि यथेच्छ खाल्ली.  प्रत्येक पिठाप्रमाणे खरं तर लाटणं असतं म्हणजे त्याची जाडी, उंची, रुंदी, त्यावरचं डिझाईन ई. कारण प्रत्येक पिठातली सिंग्धता, चिवटपणा, लवचिकपणा आणि त्यापासून तय्यार होणार पदार्थ त्याचं शिजवणं, टिकवणं आणि एकंदरीत संपूर्ण प्रक्रियाच भिन्न, त्याचमुळे. त्यामुळे ज्याला लागणार त्याला तेच लाटणं वापरणं हितावहः. एकच लाटण वापरून सर्वच पदार्थ करता येणं अशक्य. जसे कि प्रत्येका साठी प्रत्येकाला एकच तरणोपाय कामी येत नाहीच कधी, व्याधी एक पण औषधे अनेक. त्यामुळेच जरी पापडाच्या लाटण्याने केलेली पोळी गोजिरवाणी दिसली तरी ती लाटायला, शिजायला आणि चवीला हवी तशी नव्हती बरं का मंडळी.

वाढता वाढता वाढे ....

माझ्या १०वितली गोष्ट आहे हि. पहिला पंजाबी ड्रेस परिधान केला होता मी, माझी एक नुकतीच लग्न झालेली वाहिनी होती तिचा. मग मी पण शिवले काही. पण इंजिनीरिंग च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला तेव्हा दररोज घालायला सुरवात केली. तेव्हा म्हणजे विद्यार्थी दशेत बहुतांशी ड्रेस हे चुन्नी सहित मिळत असतं कारण ते शिवून घ्यावे लागतं. त्यावेळी का कुणास ठाऊक पण चुन्नी हि जास्त वापरली जात नसे, खराब होत नसे, धुतली जात नसे, कदाचित तो पांढरा कोट घातला जायचा दुचाकी चालवतांना म्हणून असेल. कुर्ता पायजमा धुतला जात असे त्यामुळे त्याच साधारण वयोमान ६ महिने टिकत असे. मग त्यानंतर त्या २ मिटर च्या चुन्नीच काय? मग एक शक्कल शोधून काढली, टेलर ला पटवलं आणि त्या चुन्नीचा कुर्ता मग शिवाला जात असे. त्यावर हवं असल्यास / घरी सहज उपलब्ध नसल्यास मग पायजमा विकत घेतला जात असे आणि शिवाय चुन्नी देखील जर तो ड्रेस कॉलेज मधे वापरायचा ठरला तर. मग "पुनःश्य हरिओम", पुन्हा त्या चुन्नीचा कुर्ता, अशी मज्जा सुरु असे. पण त्यामुळे मी एकदम उठून दिसत असे कारण तसा कुर्ता कोणाचं कडे नसायचा, अगदी भिन्न. अर्थात माझ्या ज्या ज्या मैत्रिणी असं रियुज प्रयोग करायच्या त्या सगळ्यांनाच मस्त मज्जा यायची. किती साधे सोप्पे दिवस होते ते. अहाहा. आणि उत्साह बघा ना, शिगेला पोचलेला, टेलर ला पटवणे, मग त्या कुर्त्यावर मॅचिंग साठी सिताबर्डी गाठणे. ह्या नाही तर त्या दुकानातून हवी तश्शी चुन्नी मिळवणे. नाही मिळाल्यास डाय करायला टाकणे, मग ती पुन्हा घ्यायला जाणे. देवा, इतका वेळ, उत्साह, चिकाटी, आवड, धडपड ... काय काय केलंय, अनेक वर्ष. आता आठवलं तर प्रचंड हसू येतंय. अश्या रियूस (विद्यार्थी असतांना) ते फक्त टसर सिल्कचेच, इंग्लिश रंगातले ड्रेस (शिक्षक झाल्यावर) ते आधुनिक ड्रेसेस ते ऑनलाईन आणि रेडिमेड हा मोठा प्रवासाचा पल्ला गाठला सहज हे लक्षात देखील आलं नाही, न कळत नवनवीन प्रकारांना मी आत्मसात करत गेले.

विविध ड्रेसेस शी जसं सहज जुळवून घेता आलं तस्संच बाकी बाबतीत पण ह्या पुढे सहज मला आणि सर्वांना जुळवून घेता  येईल हि अपेक्षा आणि ईशचरणी प्रार्थना.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

उपमा

हा छोटासा पण बहुउपयोगी शब्द आणि संकल्पना आहे, माझ्या दृष्टीने. सर्वप्रथम तर मी फार धडपडत आणि उशिरा शिकले उपमा द्यायला. आणि त्यानंतर मात्र मला उपमा देण्याचं अतिसाधारण महत्व लक्षात आलं. हो अर्थातच मी अतिशयोक्ती होणार नाही उपमा देतांना ह्याची दखल घेते म्हणण्यापेक्षा आताशा सहज दखल घेतली जातेच. थोडेसे टिपलेले चांगले गूण शब्दात मांडले तर स्वतःचा आणि समोरच्याचा उत्साह शिगेला पोचतोच आणि मग स्वास्थ्य सांभाळून उत्कृष्ट कामं होतातच.

उपमा हा एक छोटेखानी पण उपयुक्त, पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ देखील आहे आणि तो वैविध्य पद्धतीने करतात त्याही मुळे मला अत्यंत प्रिय आहेच. अगदी झटकी पट होणारा आणि सर्व स्वाद, रंग, स्निग्धता सामावून घेणारा असा, उत्कृष्ट दिसायला, हलका.... बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी आई फक्त फोडणी, असल्यास कढिपत्ता टाकून साधं उप्पीट करत असे आणि ते पहिल्या वाफेचं तूप घातलेलं उप्पीट म्हणजे ह्या जगा पलीकडले. त्यात वेळ असेल तर थोडीशी पौष्टिक उडीद डाळ, दाणे, काजू ई पण मग पेरले जात. उपमा, उपीट नाही, म्हणजे हळद न घातलेला पांढऱ्या रंगाचा. आणि म्हणूनच कदाचित त्यात हिरवे मटार, लाल चुटुक गाजर, पिवळे जर्द मक्याचे दाणे, वेगळ्या गडद हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, न दिसणारा कांदा आणि बरंच काही घालून तय्यार केलेला पदार्थ. जाड रव्याचा उपमा आणि त्याची चव भन्नाट, तर बारीक रव्याचा अजूनच भिन्न. अर्थात बारीक रव्याचा कधी तरी होत असे ताप आल्यावर तोंडाची चव परत यावी म्हणून, किंवा रवा नारळ लाडू होऊन थोडासा उरला तर ई.

दक्षिण भागात राहायला गेल्यावर ह्याच उपम्याचे अजून वेगळे रूप बघायला, चाखायला मिळाले, ज्यात भरपूर प्रमाणात टोमॅटो आढळला. त्या टॉमॅटो मुळे त्याला ची अनोखी रंगछटा मिळाली, ती जागावेगळीच, बघितलं कि खावं अशीच.

कधी नारळ पेरलेला, कधी बारीक शेव, तर कधी भरपूर कोथींबीर आणि शिवाय तूप, तर कधी चटणी सोबत, तर कधी नुसताच....

आज समजलं उपमा जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती ला देतात तेव्हा माणसागणिक इतकी वैविध्यता त्यात का येते ते, आणि त्याच मूळ आणि गमक काय आहे. अहाहा. दोन्ही उपमांचा विजय असो.

असेच सर्वांमधले उत्कृष्ट गूण टिपत राहा, उपमा देत राहा आणि उपमा चाखत राहा देखील, सर्वार्थाने, सतत.  

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

मोठं होणं म्हणजे नक्की....

परवा माझ्या कडे phd झालेल्या अर्चना मॅडम चा मला फोन आला, काही बाबतीत बोलायचं होत त्यांना. कामाचं बोलणं झालं आणि म्हणतात कश्या "मॅडम अहो मला आणि तुम्हाला ओळखतात ते सगळेच जण म्हणायला लागले आहेत कि मी अगदी तुमच्यासारखी बोलते, हसते आणि वागते पण". मला फार बरं वाटलं, उत्साही वाटलं, अर्चनाने इतकं काय, कसं  आणि का टिपलं हे समजलं नाही अजिबात. असो. पण मग मी म्हटलंच "ह्यालाच मोठं होणं म्हणतात ना मॅडम. तुमची phd झाली, मानाची मोठी नोकरी पदरी पडली, आणि phd व्यतिरिक्त सहज गरज नसतांना बऱ्याच चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यात ह्याला च मोठं होणं म्हणतात मॅडम". 

माझे बाबा म्हणायचे फक्त वयाने मोठं होणं म्हणजे च मोठं होणं नाहीच. मोठं आहे हे दिसलं पाहिजे तुमच्या कृतीतून सातत्याने. मोठं असल्यासारखं वागलं पाहिजे संयमाने प्रयत्नपूर्वक, कळत न-कळत सतत शिकत राहणं आणि त्याचा सदुपयोग करत राहणं म्हणजे कदाचित मोठं होणं.  दुसऱ्याचा दृष्टीकोन जाणून घेणं, मितभाषी होणं, ऐकून घेणं, समजावून सांगणं, स्वानुभवाचे बोल शेअर करणं ई. म्हणजे कदाचित मोठं होणं. लहान, चिरतरुण राहणं, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं, रागावण्याची पद्धत बदलणं म्हणजे मोठं होणं. जमेल तेवढे प्रसंग आव्हान म्हणून स्वीकारणं, नाण्याची दुसरी बाजू बघणं, प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या मदत करणे ई. छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रूप वाटणे, आनंद मिळवणे, तो पसरवणे आणि ह्या सगळ्यांमुळे आकडा जरी फुगीर झाला तरी बोबडं / उत्साह / धडपड / वैविध्यता जपणे म्हणजे मोठं होणे. हो ना?

देवळाची पवित्र पायरी

अगदी लहानपणापासून न कळत्या वयात मी आई बाबांसोबत देवळात जात होते आणि सर्वांना बघून तस्स वागत होते. थोडीशी वयाने मोठी झाल्यावर जेव्हा स्वतःहून एकटी जायला लागले देवळात तेव्हा लहानपणी शिकलेलं आणि त्या नंतर बहरलेलं संमिश्र असं वागायला लागले, कृती करायला लागले. आई बाबांची एक शिकवण अशी होती कि घर हे मंदिर, शाळा / कॉलेज / ऑफिस हे पण एक मंदिर. बऱ्याच लहान मोठ्या ऑफिस मधे अनेकविध मान्यवरांसोबत काम करायच भाग्य लाभलं मला पण जेव्हा मी सिंबायोसिस मधे काम करायला सुरवात केली, ह्या ऑफिस च वैशिष्ट्य आणि असाधारण महत्व पटलं / जाणवलं तेव्हा न कळत नतमस्तक व्हायला झालंच, दररोज, न चुकतात, अनेक वर्ष. माझ्या नेहेमीच्या सवयी प्रमाणे मी रोज ऑफिस ला लवकर पोचत असे गाडीने जात होते तेव्हा. त्यामुळे कोणालाही काहीही समजत नव्हतं अर्थात मला पण कि कधी मी नमन करून ऑफिस मधे प्रवेश करत होते ते. मग बस ने प्रवास सुरु झाला आणि त्या हि वेळी माझं रुटीन कधीच बदललं नाहीच. चार महिन्याचा कालावधी होता जेव्हा मला ऑफिस ला जाता आलं नाही. पण पुन्हा जेव्हा सुरवात केली हळूहळू ऑफिस ला यायला तेव्हा पहिल्या दिवशी मी आले, नतमस्तक झाले, आणि मागून एक आवाज आला. माझ्या डिपार्टमेंट च्या हेड होत्या त्या बोलणाऱ्या. म्हणतात कश्या, "मॅडम ह्या चार महिन्यात सगळ्यात जास्त जर कोणी तुम्हाला मिस केलं असेल तर ह्या पायरीने". बाप रे, तेव्हा पर्यंत मला हे माहित नव्हतं कि माझ्या हेड हे बघतात ते. आणि त्यावेळी मला खात्री पटली कि भरपूर सदिच्छा, डॉक्टरांचे अथक प्रयत्न, प्रार्थना, व्यायाम, खाणं, घरच्यांचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद ई. शिवाय अजून कोणाची तरी प्रकर्षाने इच्छा होती कि मी पुन्हा यावं आणि भेटावं ते. "त्या" पायरीने माझी वाट पाहावी म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट होती माझ्या साठी. निर्जीव असली तरी सजीवांप्रमाणे माया केली, सांभाळलं आणि परत आणलं देखील. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि माझ्या मंदिराच्या पायरीला एक विनंती कि सर्वांचीच अशी काळजी घे, काही मनातल्या मनात तुला नमस्कार करत असतील ते बघ.  नाही नतमस्तक झाले तरी तुझं अस्तित्व आहे हेच खरं.

सिग्नल

आमच्याकडे जेव्हा पहिला टीव्ही आला त्याला रिमोट कंट्रोल होता का नाही ते आता मला आठवत नाही.  पण समजायला लागल्यावर, किंवा टीव्ही कसा हाताळायचा हे कळल्यावर मग मी रिमोट पण वापरू लागले. त्या वेळी रिमोट हा थोडासा जड, मोठी बटणं आणि एक खासियत म्हणजे रिमोटच्या समोरच्या भागाला एक पारदर्शक भाग असायचा. तो भाग जर झाकला तर कमांड्स जात नसत / पोचत नसत टीव्ही पर्यंत. तसेच टीव्ही वर पण छान दिसेल असा भाग असायचा ह्या कमांड्स घ्यायला / अक्सेप्ट करायला. त्या भागावर एक छोटासा LED दिवा पण होता तो पकपकायचा कुठलेही बटण दाबले कि किंबहुना जास्त दाबले आणि अडकले कि देखील. कधी कधी का कुणास ठाऊक पण जोरात दाबावे लागत असे बटण तरच तो टीव्ही तसे प्रोग्रॅम / चॅनेल दाखवायचा.

एवढ्यातच मी नवीन अगदी पिसासारखा हलका रिमोट वापरते आहे ज्याच्या बटणांना स्पर्श केला कि ऍक्शन होते ताबडतोब आणि त्याला आधी सारखं पारदर्शी वेगळी जागा, LED, दिवा ई. काही म्हणजे काही नाहीच. तंत्रज्ञानाची आणि प्रगतीची कमाल आहे. काळ्याच रंगाच्या पण पारदर्शी भागाची निर्मिती झाली आहे असा अंदाज आहे माझा. आडवं तिडवं कसं हि धरा तो रिमोट बरोबर चालतोच, सरळ टीव्ही समोर धरला पाहिजे असं काही नाहीच. आणि अर्थातच हे सध्या बाकी सगळ्या वस्तूंना ज्यांना रिमोट आहे त्यांना पण लागू आहेच.

अर्थात आता जग रिमोट च्या फार फार पुढे गेलं आहे, सध्या टाळया, आवाज किंवा काही न सांगता आपोआप शिकून ह्या वस्तू माणसाला हवं तसं वागतात. मग माणसाने असा बदल का करू नये आजूबाजूच्या सगळ्या माणसांशी वागतांना? हे सगळे रिमोट कंट्रोल नसतांना टेलिपथी म्हणा, किंवा डोळ्यांची भाषा, किंवा शब्दाविण बोली ई. अस्तित्वात होताच ना, मग आता का नाही? प्रत्येक गोष्ट सांगावी का लागते, करून का नाही टाकली जात वेळेआधी? गोष्टी आपोआप का नाही केल्या जात?

अगदी सहज शक्य आहे, करण्यासारखं, करून तर बघा स्वतः साठी, आत्ता पासून ताबडतोब,
"ते" अदृश्य सिग्नल पोचावा सर्वांपर्यंत.

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तंदुरी काजुकतली

एवढ्यातच एका पूजे निमित्य काजूकातली चा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. अर्थात माझ्या पर्यंत तो पोचला आणि मी त्याचा आनंदाने स्वीकार केला, एक म्हणजे आवडती काजूकातली आणि दुसरं म्हणजे पूजेचा प्रसाद. अर्थात प्रसादात नारळ चे फार सुबक तुकडे पण होते. मी एक कतली आणि एक नारळाचा तुकडा घेतला. आधी नाराळासोबत कतली चाखली तर वेगळी चव आली. ती कतली दिसायला मला जरी वेगळी वाटली म्हटलं असेल कुठल्यातरी वेगळ्या दुकानातली. पण मग जेव्हा फक्त कतली चाखली तेव्हा माझ्या आनंदाला काही पारावर उरलाच नाही. मला न माझ्या मुलाची पट्टाकिनी आठवण झालीच. तंदूरी रोटी सारखी चव, म्हणजे साध्या दररोज च्या पोळीपेक्षा निराळा स्वाद, कोळश्यावर भाजलेली / थोडीशी करपलेली अशी वेगळी चविष्ट  अहाहा,  एका दगडात दोन...  काय मज्जा आली म्हणून सांगू. कधीही स्वप्नात देखील मी असा विचार केला नव्हता कि मिठाई वाल्याकडून विकत आणलेली वस्तू पण बिघडू शकते / किंबहुना बिघडलेली मिठाई विकली जाते. जे बात. घाईत कदाचित दूध लागलं होतं, त्या करपलेल्या दुधाची काजूकातली मी पहिल्यांदाच चाखली आयुष्यात. पण काय चविष्ट लागत होती म्हणून सांगू. शप्पथ. गुळगुळीत नेहेमीच्या चवीची पातळ अशी सुबक काजुकतली खाण्यात आयुष्य गेलं, पण हि अशी अनोखी पहिल्यांदाच बघितली आणि फस्त केली सुद्धा. बरं झालं दूध लागलं, नाहीतर मला अशी जगावेगळी काजू तंदुरी वडी चाखायचं सौभाग्य लाभलं नसतंच. धन्यवाद त्या करणाऱ्याला अगदी मनापासून.

स्वयंपाक

भारतीय पद्धतीने पाककृती सातत्याने करत राहणे म्हणजे एक आनंददायी आव्हानच आहे. कारणं अनेक आहेत, अनेकविध सामग्रीने तय्यार केलेले पदार्थ, त्यात देखील कृतूनुसार, सणावारानुसार, तब्येतीला साजेस असं सगळं तयार करणं, त्याची तय्यारी, मांडणी, प्रत्यक्ष कृती आणि त्यानंतर आवरासावर. माझ्या दृष्टीने स्वयंपाकाचा अंदाज जास्त महत्वाचा. अर्थात सढळ हाताने केलं कि उरतच. उरलं कि मज्जा येते म्हणावं कारण तेव्हाच तर फोडणीचा भात, पोळीचा चिवडा, थालीपीठ ई. पदार्थ चाखायला मिळतात आणि ते प्रचंड चविष्ट लागतात. गोळाबेरीज काय तर स्वयंपाक करणे म्हणजे सातत्याने व्यग्र राहणे. कदाचित मुलींच्या / स्त्री वर्गाच्या स्वभावात तो प्रेमळपणा, आपुलकी आणि शांतात असते म्हणून हे क्षेत्र त्यांच्या स्वाधीन केलं गेलं होत अनेक पिढ्यांपूर्वी.  पण आता थोडीशी परिस्थती वेगळी आहे. प्रवाह पतित होणं गरजेचं. अनेक मुलांना आवड म्हणून किंवा अजून काही कारणास्तव रोजचा स्वयंपाक करायला आवडतो, किंबहुना आवडीने ते करतात. पण माझ्या दृष्टीने ते फारच अप्रूप आहे, सोप्प नाही आहे आणि त्यात विविधता + साग्रसंगीत, मग काय विचारात. अश्याच एका अवलियाची भेट झाली माझी काही दिवसांपूर्वी आणि समजलं कि गेली अनेक वर्ष ते एकटे स्वतः सगळं करतात आणि गाणं म्हणत / गुणगुणत त्या संपूर्ण प्रोसेस चा आनंद घेत आहेत. ते स्वतः एका आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयातील संस्थेचे संचालक आहेत, विश्वविद्यालयाच्या प्रचंड जबाबदाऱ्या सांभाळत शिवाय दररोजचा स्वयंपाक तो देखील वैविध्यतेने नटलेला, पौष्टिक आणि त्यावर गाण्याचा साज, आणि तेही नसे थोडके म्हणून सणासुदीला समविचारी शेजाऱ्यांना आग्रहाचं निमंत्रण, मी तर निःशब्दच झाले.

त्यातच त्यांच्या हाताच्या उत्कृष्ट चवीच्या पदार्थांचा फडशा पाडतांना अजुनक एक गुपित समजलं ह्या त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या आवडी मागचं. ते म्हणजे त्यांच्या मॅडम ची आई फार लवकर गेल्यामुळे लग्न झाल्यावर तिला माहेरपण उपभोगता आलं नाही. त्यामुळे सरांनी जणू काही विडाच उचलला आणि गेले अनेक वर्ष सर मॅडम ना माहेरची उणीव भासू देत नाहीत. उत्साहाने सगळं आळीपाळीने खाऊ घालतात सातत्याने.

अशीच सर्वांनी मनापासून सगळं करण्याची तय्यारी दर्शवली आणि कृतीत आणली तर प्रत्येकाची भरभराट होणार हे नक्की. यशाचा मार्ग म्हणे पोटातून जातो, मग आवडेल ते स्वतः करून खा, खाऊ घाला आणि समाधानाने, उत्साहाने कामाला लागा, यश निश्चित तुमचंच आहे. खूप काही शिकायला मिळालं आहे, मिळतं आहे ह्या संचालक सरांकडून. धन्य ते सर आणि त्यांची रोजनिशी.

दप्तर

माझा दादा लहान होता, शाळकरी मुलगा होता तेव्हा तो शाळेत जातांना पेटी घेऊन जात असे, अल्युमिनियम ची छोटीशी चौकोनी.  माझ्या दृष्टीत नेहेमी पडायची ती छोटेखानी पेटी आणि उत्सुकतेने मी अनेकदा विचारायची त्या बद्दल. मग माझी बारी आली, माझी शाळा सुरु झाली आणि मला पण एक अल्युमिनियम ची नवीन डिझाईन ची उत्कृष्ट दिसणारी अशी पेटी मिळाली. त्या शिवाय एक केशरी रंगाची प्लॅस्टिकची पेटी पण घेऊन दिली बाबांनी दप्तराशिवाय. चौकोनी पाटी मावेल असं दप्तर, दोन पेट्या आणि डब्बा असा तेव्हा माझा हक्काचा संसार होता. आलटून पालटून वापरात होते मी ते. ह्या तीनही दप्तरात कॅम्पस बॉक्स, त्यात पेन्सिल, पेन आणि बऱ्याच वस्तू, शिवाय जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, लोखंडी किंवा लाकडी पट्टी ई.  खूप काही असायचं. त्यामुळे शाळेतून येता-जाता मस्तीत चालतांना / धावतांना तो दप्तराचा संगीतमय आवाज / ते बोल म्हणजे अहाहा, थकवा संपून उत्साह द्विगुणित व्हायचा. 

दोन एक दिवसांपासून माझ्या लॅपटॉप च्या ब्यागेत प्लास्टिक चा लॅपटॉप चा स्टॅन्ड आहे आणि त्या शिवाय बहुतेक अजून छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत चुकून घाईघाईत बहुतेक. ते काय आहे ते असो पण मला अगदी उंच आकाशात गेल्याचा परमानंद होतो आहे, कारण ऑफिस ला जाता-येता मस्तीत चालतांना शाळेच्या दप्तरातून यायचा तस्सा आवाज येतो आहे. आई शप्पथ भन्नाटच. अगदी लहान झाल्यासारखं च वाटतंय. गती वाढवली कि, दिशा बदलली कि, चढतांना, उतरतांना, वळून बघतांना, प्रत्येक कृतीनुसार तो आवाज बदलतो, अहाहा. शब्दात मांडणे अतिशय अवघड. 

मला कधी म्हणजे कधी वाटलं नव्हतं मी पुन्हा एकदा दप्तराचा उपभोग घेऊ शकेन ते, आणि ते देखील ह्या वयात. पण पोटभर घेते आहे कारण तो सांगितीक आवाज अचानक उभा ठाकला माझ्या पुढ्यात. किंचित बदल एवढाच आहे कि पाटी दप्तरात आडवी ठेवण्याची पद्धत होती त्यावेळी, त्यामुळे दप्तरं आडवी असायची. आणि आता लॅपटॉप म्हणजेच आधुनिक पाटी उभी ठेवली जाते आणि त्यामुळे सॅक म्हणजे माझं दप्तर उभं आहे, बास. आईच्या हातचा डब्बा हवा होता, ती फक्त उणीव आहे. असो. असंच सतत मला अजूनही माझं लहानपण क्षणोक्षणी जगायचं आहे नेहेमीच. फार फार आवडतंय मला ते.

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

ऋणानुबंध

मला प्रत्येक कलात्मक काम करणाऱ्यांविषयी नेहेमीच एक कुतुहलात्मक प्रश्न पडतोच. तो असा कि सोनार जेव्हा एकदा दागिना घडवत असेल तेव्हा तो नक्कीच त्याच्या आवडत्या सौंदर्यवतीला डोळ्यासमोर ठेवून सोन्यावर आपली कला सादर करत असेल का? का त्याच्याकडे फक्त एक काम म्हणून बघत असेल? तेच टेलरच पण. गुपित काही असेल का? का फक्त एक योगायोग जेव्हा तय्यार विकत घेतलेला किंवा भेट दिलेला ड्रेस तुम्हाला अगदी योग्य बसत असेल? जेव्हा एखादा ड्रेस तुमच्यावर फारच नीट बसतो, तेव्हा न कळत आणि पट्टकिनी मन त्या शेतकऱ्या पर्यंत पोचतंच, ज्याने अपार कष्ट करून कापूस तय्यार केला, त्यावर मग प्रतिक्रिया होऊन कापड तय्यार केले गेले असंख्य हाताने, मग डिझाईन, आकार, शिवण आणि सरतेशेवटी सुशोभीकरण. ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे जशी कि फक्त अगदी फक्त माझ्याचसाठी घडलेली हि कलाकृती. असंच असत का फक्त मलाच हे जाणवतं आहे कि हे फक्त माझ्याचसाठी फार विचारपूर्वक घडवलेलं आहे? पण अर्थात आणि खरं म्हणजे तसं नाही आहे, आम्ही म्हणजे मी शेतकरी, टेलर ई. एकमेकांना ओळखत देखील नाही, अजिबातच. मग हा आशीर्वाद आहे का प्रेम का संतुष्ट आणि समाधानाने / भरभरून आनंदाने तय्यार केलेला हा ड्रेस आहे, गमक काय आहे, का मला अतिशय उत्साही वाटतंय, का मला त्या लोकांना प्रत्यक्ष्य भेटून धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत? काय ऋणानुबंध आहेत माझे त्या शेतकऱ्याशी, मातीशी, हवेशी, पाण्याशी, टेलरशी, विक्रेत्यांशी? कोणास ठाऊक. पण एक नवीन उत्साह, वेगळाच अनुभव देऊन गेला हा नवीन ड्रेस हे मात्र नक्की.

असो. 

असेच अदृश्य पण नाळ जुळलेल्यांची उतराई होऊयात नेहेमीच. फक्त ड्रेस च्याच बाबतीत नाही तर पुढ्यात वाढलेल्या अन्नासाठी ज्या कष्टकऱ्यांचे हात लागले आहेत, तुमच्या डोक्यावर छत ज्यांच्या मुळे आहे आणि ज्या सर्वांमुळे हे अस्तित्व आहे त्या सर्वांसमोर मी नेहेमीच नतमस्तक होते आणि होत राहणार. 

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

पंचतारांकित खाणं

माझी पहिली नोकरी एका छोटेखानी पॉलीटेकनिक कॉलेज मधे शिक्षक म्हणून सुरु झाली १९९५ साली. त्या नंतर १९९८ डिसेंबर पर्यंत  मग मी त्याच संस्थेच्या इंजिनीरिंग कॉलेज मधे शिकवलं. त्यावेळी / त्याकाळी आम्हा शिक्षकांना एक मोठी खोली दिली होती बसायला आणि त्यात प्रत्येकी एक टेबल आणि  खुर्ची. होत एक कपाट.  त्या आमच्या शिक्षकांच्या खोलीत मी, वानकर मॅडम, पद्मा मॅडम, भोयर सर, कराळे सर आणि सिद्गगी सर ई. मंडळी असायची. कांबळे मॅडम आल्या होत्या पण अगदीच काही दिवसांकरता. मी, वानकर मॅडम, पद्मा मॅडम, भोयर आणि वडस्कर असे मिळून दररोज न चुकता एकत्र डब्बा खात असू. पाच डब्बे म्हणजे पाच भाज्या आणि विविध प्रकार. माझी आई त्यात बहुतेक प्रत्येक दिवशी तूप कालवलेला आमटी भात देत असे भरपूर डब्ब्यात. फक्त विचार करा इतके टेबल भरून पदार्थ रोज असायचे जेवतांना. "आयसींग ऑन केक" म्हणजे त्या जेवणाची वैविध्यता, एक ब्राह्मणी, एक साऊथ इंडियन, एक होस्टेलचे तर बाकी दोन भन्नाट तिखट / चमचमीत, शिवाय पोटभर गप्पा आणि दिलखुलास हासणं. मला नाही वाटत इतकी मज्जा रोज कोणी उपभोगली असेल. आमचे भोयर सर नेहेमी म्हणत असत कि हे तर पंचतारांकित हॉटेल पेक्षा जास्त असतं दररोज आणि ते देखील घरच/ स्वच्छ / प्रेमाचे मसाले घालून केलेलं. कुठेही कधीही कसलाही भेदभाव नाहीच. पद्मा मॅडम इतक्या मानाने मोठ्या, कल्पना मॅडम वयाने थोड्याश्या मोठ्या माझ्या पेक्षा, तरी देखील सगळे जेवणाच्या टेबलावर सारखेच. 

आणि हे पुन्हा छोट्या प्रमाणात मला पुन्हा एकदा २०२१ मधे अनुभवायची संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा पद्मा मॅडम च्या हातच अप्रतिम जेवायला मिळणार आहे लवकरच. तेव्हा त्या दिवसांसारखे ते सगळे जण एकत्र नसू आम्ही पण आठवणीत आणि हास्यात नक्कीच भेट होईल, लवकरच. आणि ते दिवस पुन्हा अनुभवता येणार हा विचारच मला उत्साह देऊन जातोय.

सध्या नागपूर मधे वास्तव्य आहे माझं काही दिवसांकरता कचेरीच्या कामानिमित्य, त्यामुळे म्हटलं हे जुने बंध पुन्हा प्रत्यक्ष अनुभवावेत. त्याकाळी आमची फक्त सहपाठी म्हणुन ओळख नव्हती तर अगदी घरच्यासारखी.

 "अशी माणसे येती आणिक स्मृती देऊनी जाती".  

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

गवत

माझ्या ऑफिस मधे आणि बऱ्याच ठिकाणी मी नेहेमी बघते कि पावसाळ्यानंतर उगवलेलं भलं मोठं गवत काढण्याचं काम सुरु होत. ते गवत फार शिताफीने आणि बारकाईने च काढावं लागत. ते पण कौशल्याचं च काम आहे, कोणाही ऐऱ्या गैऱ्याचं नाहीच. ते गवत बाकी इतर झाडाझुडपांनी (लँडस्केप) सुशोभित केलेल्या परिसरात उगवतांना दिसत. त्यामुळे गवत फक्त उपटून काढावं लागतं ते हि हाताने. तेथे अजून इतक्या हुशारीने चालणाऱ्या मशिन्स निघाल्या नाहीत आणि कदाचित निघणार पण नाहीत. वायुवेगाने हात चालवत फक्त गवत काढून वेगळं टाकल्यावर त्या शोभेच्या झाडांना किती मोकळं, स्वच्छ, आनंदी आणि हायसं वाटत असणार नाही? कारणं अनेक आहेत. त्या रानटी किंबहुना उपद्रवी गवतांमुळे प्रचंड किडे येत असणार, चावत असणार, त्यामुळे वाढ खुंटणार ई.

तसेच काहीसे नात्यांचे पण आहेच कि, ऋतू प्रमाणे, काही कारणास्तव रानटी उगवलेलं गवत काढून फेकून देणे अत्यावश्यक आहेच नाही तर वाढ खुंटणार हे नक्की, नको ते कदाचित आजार होणार हे पण नक्की. त्यामुळे उपयुक्त / उपयोगी, प्राणवायू देणारी झाड शोधा, जपा आणि त्यांच्या सोबत स्वतः पण मोठे व्हा. आनंद द्विगुणित होणार हे नक्की. पण हे गवत सातत्याने काढणं आवश्यक आहेच. ते काढतांना त्याच्या आजूबाजूला असलेल्या किड्यांचा त्रास होणारच पण सरते शेवटी मिळणार सुख, भरभरून आनंद महत्वाचा.

भेट

कोणाला एखादी वस्तू भेट द्यायची म्हणजे त्याची सुरवात फार आधी पासून होते. ती सुरवात म्हणजे विचारांची आणि कृतीची. ज्याला भेट द्यायची त्याच्या बद्दल सखोल विचार करावा लागतो, त्याची आवड निवड फारच बारकाईने जाणून घ्यावी लागते आणि ते देखील न विचारता, सहज साध्य झालं पाहिजे ते. इतकं सोप्प नाही दुसऱ्यांसाठी भेट वस्तू विकत घेणे. संपूर्ण ती व्यक्ती माहित असल्याशिवाय आवडेल अशी वस्तू उचललीच जात नाही, किंबहुना ती वस्तू देखील घेणाऱ्याशी संवाद साधतच नाही. आणि इतकं सगळं घडतं एक वस्तू विकत घ्यायची म्हणजे, दुसऱ्याबद्दल इतका विचार सहज होत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या विचारांना, तो जो वेळ घालवला आहे ह्या सगळ्या प्रोसेस करता त्यांना, आणि एकंदरीतच भेट देण्याची इच्छा होणे आणि ती कृतीत आणणे हे सगळं जेव्हा माझ्या बाबतीत होत तेव्हा कडा ओल्या होतात न कळत, सहज, अचानक. इतकं कोणासाठी कोणीच सहसा करत नाहीच, आणि जेव्हा करतात तेव्हा आश्चर्य, आदर, अप्रूप, आश्वासक वाटल्याशिवाय राहवत नाहीच.  

"देवाण घेवाण" असं असायला हवं नाही का, पण माझ्या बाबतीत तर सगळे फक्त देतात मला, नेहेमीच, छोट्यापासून ते मोठ्या भेटी पर्यंत. ह्याचाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहतं नाहीच. परवाच मला अचानक अनपेक्षित अश्या एक नाही तर दोन वस्तू भेट मिळाल्या माझ्या भावाकडून आणि ते देखील कुठलाही प्रसंग किंवा सण-वार नसतांना, ध्यानी मनी नसतांना. का? कसं? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीच. माझ्यासारखी भाग्यवान मीच ह्यात काही दुमत नाहीच. आधी आजीआजोबांनी भरभरून दिल न कळत्या वयात, मग बाबांनी त्याही पेक्षा जास्त सात्यत्याने दिल आणि खूप शिकायला मिळालं, मग दादा, हे, आणि आता फार फार वेगळ्या प्रकारचं मुलं देत आहेत. हे काय सख्य कमी होत कि मला दोन पहाडासारखे भाऊ दिले जे तर देतांना थकत नाहीच. मित्रमैत्रिणी पण. माझ्या आधी ह्या सगळ्यांना कसं काय माहित असतं मला काय हवं आहे किंवा लागणार आहे आणि ते पुढ्यात सतत उभंच. मला पण आता भेट वस्तू देणं शिकलं पांहिजे माणसं ओळखून.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

पहिलं घर

प्रत्येक आई आणि लेकराचं जस एक अनोखं नातं असत तस्संच माझं आणि माझ्या पिल्लांच देखील आहे. त्याच मुळे आम्ही अनेकविध विषयांवर भरपूर पोटभर चर्चा करतच असतो, नेहेमीच. अनेक विषयांतला माझा आणि माझ्या लेकीचा विषय म्हणजे वजन वाढणे, व्यायाम, मोजूनमापून खाणे आणि त्याच्याशी संबंधित अँप ई. माझ्या संपूर्ण वेळ च्या नोकरी मुळे म्हणावं किंवा थोडासा आळस किंवा भरपूर खाण्याची आवड अश्या बऱ्याच कारणांमुळे व्यायाम आणि काटक / तंदुरुस्त / टकटक अशी शरीररचना मला कधीच सांभाळता / जपता आली नाही. हे माझ्या बोलण्यात सतत लेकीला जाणवायचं. आणि ती नेहेमी म्हणायची कि "मम्मा तुला अजून एक कारण माहित आहे, ह्या व्यतिरिक्त. जुळे झाल्यामुळे आणि त्यानंतर च्या संपूर्ण बदललेल्या जीवन शैलीमुळे थोडासा आकार बदलणारचं ना? आणि बदलू दे, शेवटी ते माझं पहिलं घर आहे आणि त्याच्या बद्दल तू पण काही बोलायचं नाही, समजलं? कोणी आलंय माझ्या ह्या पहिल्या घराचे आकारमान कमी करायला, तुझ्यासाठी काही करायला? नाही ना? मग जे बोलतात त्यांना बोलू दे, तू बिनधास्त राहा." आता इतकं धमकीवजा गोड जर कोणी समजावून सांगितलं / ठासून बजावलं म्हटल्यावर मग मी पण सध्याचा आकार मिरवायला शिकले. अर्थातच त्यावर काम करत राहणे आवश्यक आहे पण किंतु परंतु आणि लोक काय म्हणतील ह्या कडे दुर्लक्ष करून. मी तोवर "पहिलं घर" म्हणजे नोकरी लागल्यावर विकत घेतलेलं, किंवा सासरचं इतपतच मर्यादित बघत होते पण माझ्या लेकीने ह्या शब्दाचाच नाही तर त्यामुळे होणाऱ्या परिणामाचा अर्थच बदलून टाकला. 

आधी कपडे परिधान करण्यापासून ते प्रत्येक नजरा, आरश्यातले प्रतिबिंब मला थोपवत होत, थांबवत होत आणि उगाचच हिणवत पण होत. आता नाही. स्वीकारून पुढे जाणे महत्वाचे, जे मला माझ्या लेकीमुळे उमगले.

तर अश्या ह्या माझ्यातल्या तिच्या पहिल्या घराचा विजय असो.

स्वधा

आमच्या सिंबायोसिस च्या अनेक शाळा देखील आहेत ठिकठिकाणी, अगदी शहरात आणि खेड्यात सुद्धा. आणि अगदी पदोपदी / क्षणोक्षणी मला संस्थेने त्या शाळेसोबत सुद्धा काम करण्याची सुवर्णसंधी दिली. त्या उत्साहाने खळखळणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करायला मिळणं हि तर सुवर्णसंधीच, नाही का?. आणि त्यामुळे त्यांना म्हणजे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना देखील माझ्या इंजिनीरिंग कॉलेज बद्दल,आमच्या विद्यापीठाबद्दल माहिती मिळते. "एका दगडात अनेक...." असे असल्यामुळे मी कधीच कुठल्याच कामाला नाही म्हणत नाहीच. अगदी तशीच अजून एक सुवर्णसंधी आज चालून आली आणि मी आज खूप मनापासून तो वेळ पाचवीतल्या मुलांसोबत आनंदाने व्यतीत केला. काय वेगळी, उत्साही, ऐकणारी, आनंद देणारी आणि घेणारी, चर्चा करणारी, भाग घेणारी मुलं होती. अहाहा. फारच वेगळा अनुभव मिळाला मला. नवीन माहिती ऐकण्यासाठी उत्सुक असलेली मुलं असणं म्हणजेच शिक्षकांचं आणि आई वडिलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी सावंतवाडी बद्दल बोलले, इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही भाषा वापरल्या. भरपूर चित्र दाखवली. आणि त्यातल्या काही मुलांना पण छान कल्पना होती सावंतवाडी बद्दल. ऐकिची आई लहान असतांना आणलेली लाकडी फळं तिच्या कडे होती, ती तिने दाखवली सगळ्यांना. त्या फळांसोबत घडलेले आईच्या लहानपणीचे किस्से भन्नाट पद्धतीने मांडले. ऍक्युप्रेशर / मालिश करण्याची साधनं पण तेथे लाकडापासून तय्यार केलेली असतात ती एकाने दाखवली. त्यामुळे हे आमच्या सगळ्यांचंच सेशन असल्यासारखं झालं. शिस्त फार होती, मस्त हात वर करणे, शांत पणे एकाएकाने आळीपाळीने बोलणे, मस्ती नाही, गडबड नाही आणि "चेरी ऑन केक" म्हणजे मला पण आणि त्यांना पण खूप खूप बोलायचं होत, ऐकायचं होत, शेअर करायचं होत.... इतके गोड मनमोकळे बोलणारे मुलं, जबरदस्तच. आमचं सेशन सुरु झालं तेव्हा शिस्तीत एक विद्यार्थी त्याच्या मॅडम ना म्हणतो कसा कि "आज वाढदिवस आहे ना रसिकांचा?", मॅडम म्हणतात कश्या "आपण सेशन झाल्यावर तिला गाणं म्हणून शुभेच्छा देऊ", "म्हटलं का? कार्यक्रमाची गाण्याने सुरवात का नाही करायची? आधी शुभेच्छा आणि मग सेशन". भन्नाट पुढाकार घेऊन एका मुलाने मराठी + संस्कृत मध्ये ज्या शुभेछांचा वर्षाव केलाय, अहाहा. काही तरी निराळं, अनोखं आणि भावणारं आहे त्या मुलांमधे हे निश्चित. छोटंस पण प्रचंड आठवणी देऊन गेलेलं असं ते सेशन झालं. त्या सगळ्यांची कधी एकदा प्रत्यक्ष गाठ-भेट होते असं झालंय मला, त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना भेटायची ओढ निर्माण झाली ह्या सेशन नंतर हे निश्चित. शिक्षण क्षेत्रात असं वेगळं पेरणं फार आवश्यक आहे हे जाणवलं मला, ज्या मुळेच प्रत्येक उमलत्या फुलाला / रोपट्याला त्याच्या योग्य / त्याच्या साठीची दिशा नक्की आणि पक्की मिळेल हे निश्चित, अगदी स्वधा ह्या सौज्ञेला साजेसं.  

 Swadha = ones own spontaneous nature (Sanskrit word)

https://swadhaawaldorfschool.org/

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

आपे आपे

अगदी बोलता यायला लागल्या पासूनच माझ्या लेकाला वाटायचं कि तो फार मोठा झाला आहे आणि त्यामुळे सगळं म्हणजे सगळंच त्याला जमतं करायला, स्वतः. कोणाची म्हणजे कोणाची मदत, लुडबुड, सूचना काहीही नको असायच्या. त्याच्या भाषेत "आपे आपे", म्हणजे आपल्या आपण, माझं मला करायचं आहे, अश्या अर्थाने. आणि तो करतो तेच योग्य हे पण एक होत, असो पण त्यालाच तर आनंद म्हणतात, शिकणं म्हणतात ना. सांडलवंड करत खाणं, पसारा / राडा, धडपड ई. मी तर फारच मनापासून एन्जॉय करत असे. त्यातलाच एक भाग म्हणजे आंघोळ. ती पण आपे आपे च करायची असायची. गरम पाणी काढून द्यायची पण वाट बघत नसे इतका उत्साह आंघोळ करण्यासाठी. सगळी तय्यारी झाली कि मग त्याच पालुपद चालू व्हायचं "मम्मा आपे आपे". मग मी बाहेर आणि तो मी थोडक्यात सांगितल्या प्रमाणे आंघोळ करणार. मी आपली कामाला लागली रे लागली त्याचं पाणी काढून दिल्यावर कि क्षणात पळत पळत यायचा, जोरदार पडायचा देखील, पडायचा कशाचा जोरदार आपटायचाच. कारण? संपूर्ण गरम पाण्याची बदली फक्त अंग ओलं करण्या करता वापरलेले असायचं, आणि मग लक्षात यायचं कि अरे अजून साबण लावायचं राहिलंच कि. मग काय आरोळी थोडण्याशिवाय प्रत्यक्ष महाराज वायुवेगाने मातोश्रींना गाठत असतं हे सांगायला कि "पाणीच संपल मम्मा". बाप रे. काय बोलावं, कसं रिऍक्ट करावं, त्याला लागलंय का हे बघावं का गरम पाणी शिल्लक आहे का ते तपासावं, फटका द्यावा का हसावं काही म्हणजे काही समजत नसे मला. आणि हे अनेक दिवस / महिने / वर्ष मला उपभोगायला मिळालं, आणि हो फक्त मलाच नव्हे तर बाथरूम ला, त्या बादलीला, त्या साबणाला, अगदी सगळ्या सगळ्यांना. अहाहा.

हा आनंदाचा अथांग साठा शब्दात पेरणं अशक्यच आहे मला. हे शब्द मांडतांना ह्या क्षणी देखील तो माझा बदमाश ओल्या पायांमुळे पण कसरत करत वेगाने सगळ्या घरभर धावणारा वेद अजूनही जसाच्या तस्सा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. राग येत असे मला पण तो किंवा इतर कोणी पाय घसरून पडू नये म्हणून मग संपूर्ण फरशी पट्टकनी कोरडी करावी लागत असे, दररोज.

२००४ पासून आज पर्यंत आणि ह्या पुढे देखील ह्या माझ्या पिल्लांमुळे सतत वैविध्य गोष्टी मी  इन्क्रिमेंटली लर्न करत आहेच आणि करत राहणार हे निश्चित. खूप खूप आहे शिकण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं, आठवण करण्यासारखं.....

आठवणींचा सुगंध

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा". एवढ्याश्या पिटुकल्या वाक्यात माझ्या साठी तर संपूर्ण जीवनच सामावलं आहे असं वाटत, जाणवतं आणि पदोपदी ते अनुभवायला मिळत देखील.

माझी शाळकरी पिल्लं छोटी होती तेव्हाची एक गोष्ट. लहान मुलं म्हटली कि खेळणार, बागडणार, लोळणार, पडणार ई. आलंच. मातीत, घराबाहेर, इतरांबरोबर खेळलं नाही तर मग लहान कसलं नाही का? माझी पण दोघ काही वेगळी नव्हतीच. मनसोक्त रेतीत, मातीत, चिखलात आणि रस्त्यावर सर्वांसोबत सतत अनेक वर्ष खेळली. त्या वेळी खेळून किंवा बाहेरून घरी आल्यावर, स्पेशिअली संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुणे हे आरोग्यासाठी उपयोगी आणि फारच महत्वाचं, त्यामुळे मी त्यांना त्यांच्या भाषेत समजेल असं समजावून सांगितलं आणि ते कटाक्ष्याने पाळत पण होते. पण शेवटी मी आई आणि ते पण किंचित मस्ती करणारी. मग काय, सहज विचारायचे सुरवातीला मुलं बाहेरून आली कि "नक्की हात साबणाने धुतले का? कि फक्त पाण्याखाली धरले?". दोघे एकाच वयाचे असल्यामुळे एकाच वेळी एकाच नळाला एकाच ठिकाणी धक्काबुक्की करून हात धुवायचे असायचे ते हि इतक्या घाईत कि जसे कि ह्यांचे विमान सुटणार आहे. आणि मंडळी ती घाई कशाची असायची माहिती आहे का? तर दोघांनी हात साबणाने धुतले हे सिद्ध करण्याची घाई. त्याचा पुरावा द्यायची धडपड. आणि त्याची पद्धत म्हणजे मला दोघांनी एकाच वेळी / क्षणी माझ्या अगदी नाकाशी त्यांचे गोबरे, छोटेसे पंजे धरणे, म्हणजे तो साबणाचा सुगंध मला येईल आणि हे निश्चित होईल कि आरोग्याची काळजी घेतली गेली आहे, हात धुतले आहेत स्वच्छ. पण हे दिवसातून कित्येकदा घाईत शर्यत असल्या सारखे होत होते. दोघे एकाच वेळी धावत येऊन धडपड तोल सांभाळत माझ्यावर, माझ्या नाकावर अत्याचार करत असत. कितीदा माझं छोटसं नाक चेंदामेंदा झालाय माझं मलाच माहित. पण तो आनंद, उत्साह आणि स्पर्श इतका जगावेगळा असायचा ना कि बाकी लक्षात / ध्यानात / दृष्टीपथात यायचंच नाही माझ्या. काय ते दिवस होते आणि मला तर दुप्पटीने मिळालेले प्रसंग होते ते, आनंद द्विगुणित करणारे असेच. बघा नं १७-१८ वर्षांनी देखील संपूर्ण दिवस / क्षण जसे च्या तस्से डोळ्यासमोर उभे आहेत माझ्या. आणि हो फक्त माझं आणि त्यांचं नाकाचं नाही पण डोकं, चेहेरा, आणि विविध अवयव टक्कर एन्जॉय करायचे. निरागस, निष्पाप आणि भोळेपणाची कमाल म्हणेज आमचे "ते" दिवस. भूक लागलेली असली, तहान लागलेली असली, काहीही झालं तरी हात धुतले आहेत हे प्रुव्ह करण्याचा अलिखित नियम / विधी होतंच असे. काल परवा अचानक माझा आता मोठा झालेला लेक पट्टाकिनी त्याचे ओले धुतलेले हात घेऊन आला आणि म्हणतो कसा "मम्मा आठवतंय का?" आई ग, काटाच आला अंगावर. 

असा हा आठवणींचा सुगंध आणि जगावेगळा अनोखा ठेवा दिल्याबद्दल माझ्या दोन्ही पिल्लांना धन्यवाद.

"असे प्रसंग येति आणि स्मृती ठेवुनी जाती". 

पारदर्शक ता

KBC नावाचा एक फारच प्रसिद्ध कार्यक्रम टीव्ही वर गेली अनेक वर्ष चालू आहे आणि तो मी मनापासून आनंद घेत बघतेच. त्या कार्यक्रमाची रूपरेषा, आखीवरेखीव कंगोरे, विविधता आणि एकंदरीत सगळंच मनाला भावतं. इतका भव्य दिव्य कार्यक्रम आखायचा आणि तो शिस्तीत इतकी वर्ष सलग चालवायचा म्हणजे कमाल आहे. एवढ्यातच माझं सतत लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे पारदर्शक मध्यवर्ती बसण्याची जागा. त्या जागेकडे सातत्याने लक्ष जाण्याचं कारण म्हणजे मला असं जमिनीच्या खालचं बघायला हिम्मत होत नाही, विश्वासाने पाऊल ठेवावं असं वाटत नाहीच. अनेक ठिकाणी मी अनुभवलं आहे. पण गेल्या शुक्रवारी मला त्या विचारपूर्वक तय्यार केलेल्या जमीनच महत्व प्रकर्षाने जाणवलं. शुक्रवारी KBC चा सामाजिक उपक्रम असतो आणि त्यात एक दिग्गज प्रसिद्ध कलाकार जोडपं आलं होत. KBC म्हणजे फक्त प्रश्नमंजुषाच नाही, तर त्या अनोख्या जोडी बद्दल दाखवतांना तीच पारदर्शक जागा अगदी ३६० अंशाने बदलून गेली होती. त्यात विविध रंगछटा, हृदयाचा आकार, दिवे आणि बरेच परिणाम दर्शवण्यात आले होते. भन्नाट होत. KBC सेट च्या संपूर्ण कल्पक चमू ला माझा दंडवत.

त्यामुळे फक्त प्रश्नमंजुषे करता KBC बघत असाल तर इतर गोष्टींकडे पण लक्ष द्या, म्हणजे नवीन प्रश्न, उत्तर, मार्ग आणि दिशा नक्की मिळेल.   

ह्या एका छोट्या एपिसोड ला बघून हे मात्र निश्चित समजलं कि पारदर्शक असलं ना कि कुठलाही बदल सहज अंगिकारता येतोच. मग असे बदल स्वतःला आणि बघणाऱ्याला प्रचंड ऊर्जा, क्लुप्त्या आणि बरंच काही देऊन जातात.

LinkedIn

 "LinkedIn is a social networking site designed specifically for the business community. The goal of the site is to allow registered members to establish and document networks of people they know and trust professionally." - https://whatis.techtarget.com/definition/LinkedIn 

Yes I am totally aware of importance of connect with like minded people and professional for growth of self, others, society, institute and country at large. Hence including me all professionals from various walks of life are on LinkedIn platform and were / are benefiting from it. To be on LinkedIn or to continue on LinkedIn an individual needs a profile, a collection and achievements to talk about. This platform provides the place to portray virtual you. Its kind of prestigious, prosperous and blessed to be on such platform as it displays the strengths of individuals including education, background, experience, places, people, personality and what not.

Its a "one stop solution" while looking for apt personalities. To me this is the place to be and a highly motivating platform for the growth of an individual and others connected effectively. 

For me crafting my own profile was initially the aim but now I feel extremely proud that my own daughter is connected yet again with me on this platform. She went through my profile as in these tiny years my work place, my PhD scholars, my  family and the society poured so many opportunities on me, that the profile on LinkedIn is crafted automatically.  What else to ask for, I immediately went on Cloud-9 literally. Next generation is feeling like connecting with me is truly an achievement, far far better than any tangible certificates, pats on back, increments and what not. I was in love with the name of this platform, its objectives and now adoring more due to this professional, value-added bond between my engineer-to-be daughter Varnika.   

There is a proverb / saying that when your kids fit into your shoes treat them a friends as they are now successful grown-ups. Its the correct time to edit / append / change this saying a bit like this: when your kids checks your LinkedIn profile and send requests to connect means............. 

I am truly blessed to experience this in my life.

 

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

ताजा सुगंध

माझा सर्वात मोठा पुतण्या पहिल्यांदाच भरारी मारायला, आकाशाला गवसणी घालायला सज्ज झाला आहे. त्याच्या आवडत्या कंफोर्ट झोन मधून बाहेर पडून एकटा वसतिगृहात राहतो आहे. काकू म्हणून एक छोटीशी अगदी हलकीशी धुकधुक जरी मनात होती तरी देखील मला त्याच्या वर आणि माझ्या जाऊ-दिरांच्या संगोपनावर प्रचंड विश्वास होताच. त्यामुळेच कदाचित मी तब्बल दोन आठवडे शांतपणे थांबले, त्याला थोडसं रुळू दिल आणि काल न राहवून फोन केलाच. काय बोलला तो विश्वासानी माझ्याशी. फार आवडलं मला. त्याची नवीन वसतिगृहातली हि पहिली वहिली बॅच, त्यामुळे सगळ्या खोल्या, न्हाणीघर, फर्निचर सगळंच अगदी न हाताळलेलं, न वापरलेलं कोर करकरीत असं. त्याहीमुळे प्रचंड उत्साही वाटतंय असं म्हणाला माझा पिल्लू. तो फक्त वैविध्य विषयावर अखंड बोलत होता आणि मी परमानंद उपभोगत होते, ऐकत होते, माझं पिल्लू कित्ती मोठं झालं ह्या बद्दल "त्याला" धन्यवाद देत होते. थोड्या वेळाने मग आमचा संवाद सुरु झाला आणि त्यात मी पण त्याला माझ्या नवीन जागेबद्दल सांगितलं. मी जेथे सध्या राहते आहे तेथे पण अगदी सगळं कोर करकरीतच आहे इतकं कि जी मी लिफ्ट वापरते दररोज, बहुतांशी संध्याकाळी वर जाण्यासाठी, कधीकधी सकाळी सुद्धा खाली येण्यासाठी, त्याचा जो नवीन ताजा सुगंध अजूनही अबाधित आहे त्यामुळे दिवसभराचा थकवा एका क्षणात पळून जातो दूर, ताबडतोब. असं कुठे आहे कि फक्त सुगंधी फुलंच मन प्रसन्न करतात, ताजतवानं करतात, छे, अजिबातच नाही. एकदा सर्वांनी ह्या माझ्या नव्या लिफ्ट च्या कोऱ्या पणाचा अनुभव घ्यावाच असा अनोखा आहे. त्या सुगंधाची परतफेड होणे नव्हेच. एक मजला फक्त जायचा असतो मला पण तेवढ्यात मी जमेल तेवढा आनंद मनापासून उपभोगून घेतेच, दररोज, न चुकता. मला तो लिफ्ट चा सुगंध इतका भावाला आहे कि फक्त तो उपभोगण्यासाठी मी ती लिफ्ट वापरते.

जरी माझ्यात आणि माझ्या पुतण्यात एक पिढीचं अंतर असलं तरी ते कधीच जाणवलं नाही आम्हाला आणि आता तर अजून एक नवीन कोरा करकरीत समान कंगोरा सापडला दोघांमधे ताज्या सुगंधाचा. अहाहा, "सुख म्हणजे नक्की अजून काय असतं".

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

पैसे कमावण्याचा नवा मार्ग

एक कोरा करकरीत मार्ग उपलब्ध आहे सध्या पैसे कमावण्याचा आणि बरीच मंडळी जगातली ह्याचा फायदा घेत आहेच आणि घ्यायलाही हवाच. सर्वश्रुत असा यू-ट्यूब चा नवीन मार्ग, एक उत्कृष्ट विडिओ तय्यार करा, तो ठराविक मंडळींनी लाईक केला, बघितला आणि डाउनलोड केला कि यू-ट्यूब चं सॉफ्टवेअर त्यात अधेमधे कुठेही जाहिराती समाविष्ट करतं आणि त्या ऑटोमॅटिकली प्ले होतात. जाहिरात देणाऱ्या कंपन्या यू-ट्यूब ला पैसे देतात, कंपन्यांना प्रेक्षक वर्ग मिळतो आणि त्यामुळे कदाचित त्यांचा धंदा वाढतो. यू-ट्यूब मग ज्याने व्हिडीओ तय्यार केला आहे त्याला त्यांच्या ठरलेल्या पद्धतीने पैसे देतो. हे सगळं ठीक आहे, जर विडिओ मधे दाखवला गेलेले प्रॉडक्ट / कंपनी / ऑफिस ई. आहे. मी काही दिवसांपासून जरा श्री. विष्णू सहस्रनाम आणि बाकी स्तोत्र ऑनलाईन ऐकते आहे बदल म्हणून आणि काय महद आश्चर्य श्लोकाच्या मधेच भल्यामोठ्या आवाजात जाहिरात सुरु झाली. तशीही जाहिरातीच्या वेळेला का इतका मोठा आवाज अचानक आणि ऑटोमॅटिक वाढवतात कोणास ठाऊक. इतकं विचित्र वाटलं मला. म्हटलं काय हे. यू-ट्यूब च्या अल्गोरिथम मधे बदल अतिआवश्यक आहे. स्तोत्र ऐकतांना आणि ते पण अर्ध म्हणणं झाल्यावर संपूर्ण लक्ष विचलित होत अश्या जाहिराती आल्या कि. स्तोत्र ज्याने म्हटलं आहे त्यांना एक तर सुरवातीला किंवा शेवटी जाहिरात टाका किंवा फक्त जाहिरातीचा मथळा दिसू दे, विडिओ मधेच थांबवणं हे अगदी चुकीचंच आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीने पैसे द्या. सगळ्याच विडिओ ला एकच मॉडेल लावून कसं चालेल बरं? मला तरी हे आक्षेपार्ह वाटत आणि यू-ट्यूब ने ह्यावर नक्की उपाय शोधून काढला पाहिजेच. लवकरच.    

अतरंगी ड्रेस

वेद अगदी लहान असतांना त्याला एक टी-शर्ट भेट म्हणून मिळाला होता. तो इतका भन्नाट होता ना, कि त्याला पाहून मीच इतकी प्रेमात पडले कि विचारूच नका. मला वाटत होत कि हा माझ्या मापाचा का नाही आहे. असता तर ताबडतोब घातला असता आणि मिरवलं असत मी. त्या नंतर मग मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मॉल मधे गेले तेव्हा तेव्हा मी तस्साच टी-शर्ट शोधत असे, अनेकदा तर फक्त तो तस्सा टी-शर्ट शोधण्यासाठी मी बाहेर पडत असे.

तर त्या टी-शर्ट च्या दोन्ही बाह्या दोन रंगांच्या होत्या. समोरचे दोन भाग दोन वेगळ्या रंगात, बाह्यांना साजेसे, उलटे रंग, इकडचा तिकडे. अहाहा. भलताच मस्त होता, समजावून शब्दात मांडणं फारच अवघड आहे. असो. थोडक्यात काय तर ड्रेस च्या बाह्या वेगवेगळ्या हव्यात, त्याला साजेस समोर मागे वेगळं डिसाईन हवं. एक सारखं नेहेमीसारखं नको, काही तरी अतरंगी आणि वेगळं.

मी नवीन कचेरीत जॉईन होणार म्हणून मला काही नवीन ड्रेस हवे होते. अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत इथल्या ऑफिस मधे जाण सुरु होत, त्यामुळे मला जमणार नव्हतं. म्हणून हे आणि लेक गेले. जमतील तेवढे आणले ड्रेस आणि शुज. खूप मदत झाली त्यांची. त्यात एक ड्रेस इतक्या वर्षांनी मला मिळाला, किंबहुना ह्यांनी दोघांनी आणला जो अगदी तस्साच आहे, दोन बाह्या वेगळ्या, दोन तर्हेचे समोर डिझाइन, आई शपथ, जवळपास १८ वर्षांनी. भन्नाट. अगदी आनंद गगनात मावेनासा झाला आहे मला.

काय करू काय नाही असं झालाय, किती छान वाटतंय असा जगावेगळा ड्रेस घालून मिरवायला माझं मलाच ठाऊक. त्यामुळे आज इतकं जास्त काम होऊन सुद्धा अजिबात दमण थकणं झालं नाही.

माझ्या मते तुम्हाला हवं ते छोटसं देखील नक्की मिळेल, अचानक, कस - कुठे - केव्हा माहित नाही, पण गवसणार हे नक्की. मिळाल्यावर त्याचा परमानंद काही भलताच असतो हे मात्र नक्की.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...