एखाद्या मित्राने आपल्यासाठी जर काही केले, मदत केली, वेळेवर धावून आला तर आपण देखील त्याची परतफेड करतोच, कणभर जास्तच प्रमाणात. मित्रच कशाला कोणीही असो माणूस म्हणून आपण सदैव तत्पर मदतीसाठी, नातेवाईक, शेजारी-पाजारी, कचेरीतले कोणी, ओळखीचे, मित्राचे मित्र ई. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ह्यात भरच पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही. एक मेसेज टाकला कि बहुतांशी सगळेच धावून येतात. अनाहूत पणे पण झकास मदत मिळते, काही संस्था फक्त ह्या साठीच कार्यरत असतात. थोडक्यात काय "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". माणुसकी म्हणून, कोणी आपल्यासाठी काही केलं तर ताबडतोब त्याची परतफेड म्हणून सगळेच धडपडत असतातच. कोणी कष्टाने, तर कोणी पैशाने कार्यरत राहतातच. ह्या आधुनिक जगात खरं तर कोण कोणासाठी काही फुकट करतं सांगा? सगळेच फक्त फायदा बघत असतात. पण जर मी सांगितले असे एक जण आहेत जे सातत्याने दुसऱ्यांसाठी झटत असतात, यातना सोसत कार्यरत असतात, आणि हे सगळं कुठलीही अपेक्षा न ठेवता, एक महत्वाचे कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून, सगळे आपल्यावर अवलंबून आहेत ह्याची जाण म्हणून आणि अशी इतर अनेक कारणांसाठी. ऐका तर मग त्या अवलिया बद्दल थोडेसे, कारण त्याचे कार्य शब्दात सामावणारे नाही, चार ओळी पुरेश्या नाहीतच.
पाण्याची शृंखला तर आपण सगळे जाणतोच, ढग कसे तय्यार होतात, पाऊस कसा पडतो, बाष्प आणि पुन्हा ढग ई. हे असे अविरत सुरूच असते कार्य. नाही का? पाऊस पडला कि जलाशय भरली जातात, मग त्या नद्या असतो, सागर, तळे, विहिरी, कालवे, समुद्र किंवा जमिनी. विविध प्रकारे पाण्याची नैसर्गिक साठवण पण होते आणि तेच साठलेले पाणी पुन्हा पाऊस पडलाय, लागणारे बाष्प तय्यार करण्यास मदत करते. प्रत्येक सजीवाला अत्यंत आवश्यक असे ते स्तोत आहे. "पाणी हेच जीवन" असे म्हटले आहे हे काही खोटे नाहीच. अगदी शेती साठी, अन्न शिजवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी, स्वच्छतेसाठी, बांधकामासाठी, आणि इतर अनेक ठिकाणी पाणी हे अत्यावश्यक घटक आहे.
बंधारे, धरणं बांधून पाणी अडवले जाते, म्हणजे साठा राहील, जवळपासच्या शेतीला उपयोगी होईल, वीज निर्मिती होईल, जमिनीत पाणी मुरले जाईल आणि पाण्याची पातळी वाढायला त्याची मदत होईल, अश्या अनेक कारणांसाठी. धरणाचे अजून एक महत्वाचे फायचे हे शहरातील लोकांसाठी आहे. त्यांना अविरत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी. नदीतलं पाणी एका दिशेने, विविध गतीने, खडक आणि इतर वनस्पती, वळणं सांभाळत वाहते. सोप्पं नाही हं ते, दिसतं फक्त आपल्याला कि हि एक साधी नैसर्गिक बाब आहे पण नाही. समुद्रातले पाणी आपल्या चवीची काळजी घेण्यासाठी, मीठ तय्यार करण्यासाठी आणि इतर कारणांसाठी आत-बाहेर करत राहते, ते देखील विविध उंची वर, गतीने, काळ-वेळेनुसार. प्रचंड कष्टमय कार्य ते. जमिनीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्ग शोधात वाहात राहणे, अधे मधे मुळांना शोषण करणे, प्राणिमात्रांची तहान भागवणे हे देखील आहेच. पिण्या योग्य पाणी तय्यार होण्याची प्रक्रिया पण सर्वश्रुत आहेच. त्यात काही औषधे मिसळली जातात, गाळले जाते, टाकीत सोडले जाते, आधी भल्यामोठ्या पाईप मधून प्रवास करायला पाण्याला भाग पडले जाते, त्या नंतर गरजे नुसार उभे-आडवे-तिरके-वर-खाली प्रवास सुरूच. ह्या टाकीतून त्या टाकीत, भल्या मोठ्या ते थोड्या वेगळ्या आकाराच्या, मग अगदी बारीक, मग प्युरीफायर कडे, प्युरिफायर च्या अतिसुक्ष्म पाईपातून नको असलेले बाहेर आणि काय काय सांगू तो त्याचा प्रवास. आणि हा प्रवास म्हणजे खाच खळगे, मार, इकडे झुकणे, तिकडे वळणे, इथे अडथळा तिथे मार्ग काढणे. एवढे अविरत कष्ट सोसत ती गंगा मैय्या आपल्या दारात उभी असते सदोदित, आपल्या साठी फक्त, आपल्या गरजेसाठी. आपण तिच्या साठी काय करतो? मनःपूर्वक दररोज, न चुकता, अनेकदा किंवा जेव्हा जेव्हा तहान भागते तेव्हा तेव्हा धन्यवाद तरी देतो का? पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे हे माहिती असून प्रत्येक वेळी पाणी पितांना संवाद साधतो का? लक्ष देऊन पाणी पितो का? बसून एका जागी, शिस्तीत, शांतपणे पाणी पिण्याचा अनुभव घेतो का? ते महत्वाचे आहे हे शरीर चालू राहण्यासाठी हे पाण्याला दर्शवतो का? माझ्यामते फारच कमी वेळा आपण हे सर्व करतो. ज्या पाण्याने तुमच्यासाठी इतके केले आहे, करत राहणार आहे त्यासाठी काही क्षण राखीव पाहिजेतच प्रत्येकाकडे. आपण केलं तर पुढची पिढी करणार आणि त्यांना देखील हे पाणी मिळणार. धन्यवाद देऊन तर बघा मित्रहो, मनातल्या मनात.
अजून एक तरणोपाय असा आहे कि सगळीकडे म्हणजे अगदी सर्वत्र, घरी-दारी, हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट्स ई. मोठ्या आकाराच्या पाण्याच्या पेल्यांऐवजी फुलपात्र वापरली पाहिजेत. म्हणजे एकावेळी थोडे पाणी भरले जाईल, वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही. काय भन्नाट नाव ठेवलं आहे बघा, फुल आणि पात्र, असे पाणी पिण्याचे भांडे जे भरून पाणी प्यायले कि समाधान मिळतेच. इकडे तिकडे नेण्यासाठी योग्य, सांभाळायला, रचून ठेवायला सोप्पे. क्या बात है?
काही जण झाडं लावत आहेत, काही त्यांची निगा राखत आहेत, काही संस्था जमिनीत पाणी मुरवण्याकडे भर देत आहे, काही नद्या साफ करत आहेत, काही नद्या जोडणीचे कार्य करत आहेत, काही पाऊस अधिक चांगला कसा पडेल ह्या कडे लक्ष वेधत आहेत... आपण हात जोडूयात फक्त, मोबाईल बाजूला ठेऊन, दररोज रात्री झोपतांना, किंवा सकाळी उठल्यावर, कधीतरी जमेल तेव्हा. हि माझी कळकळीची विनंती आहे, आग्रह नाही. आपल्यासाठी, आपल्या पुढील येणाऱ्या काळासाठी, समाजासाठी तरी कराच. ह्या अश्या पाण्यासाठी तक्रारी करणारे जास्त आहेत.