फारच प्रचलित आहे नाही "ऊन खाणं" हा वाक्यांश / फ्रेज आणि त्यातल्यात्यात थंडीच्या मोसमात तर काही विचारूच नक्का. कसं खातात हो ऊन? कशाबरोबर? कसं लागतं? मस्ती सुचली आज मला सकाळी कोवळ्या उन्हाचा आनंद उपभोगतांना. अहाहा. "धूप सेकंना" असं हिंदीत म्हणतात ते योग्य वाटतं ऐकायला आणि कृती देखील, पण खाणं म्हणजे...
म्हटलं चला लिहावं.
भारतातले नावाजलेले शेफ जसं म्हणतात ना कि अनेक प्रकारे माणूस जेवतो, एक म्हणजे पदार्थ / वाढलेलं बघून, मग सुगंध, मग स्पर्श आणि त्यानंतर चव. जर हे खाण्याशी संबंधित आहे तर मग ऊन खाणं त्यात मोडतं का वेगळं?
आपण अर्थात मी देखील माझ्या मुलांना बाळं होती तेव्हा जमल्यास गच्चीतच हिवाळ्यात मालिश करायची, किंवा तेल लावल्यावर थोडसं उन्हात ठेवायचं. ज्या देशात ऊन / सूर्य बाप्पा दुर्मिळ आहे तेथे तर मोठे लोक पण जमेल तेवढं उन्ह्यात बसतात च ना? तर मंडळी, सगळंच फक्त जीभेमार्फतच खायला हवं असं कुठे आहे, जरा कातडीला पण जेवू द्या कि. आणि कातडीतून पण मिळणारे वैविध्य उत्कृष्ट पदार्थ आपल्या वाढीला, पुढे जायला, मार्गक्रम करायला प्रचंड मदत करतातच. अगदी थोडं ऊन पण कामाचं आहेच. शेफ च्या दृष्टीने सेन्सरी ऑर्गन्स जसे डोळे, नाक, जीभ ई. पदार्थ सेवन करायला मदत करतातच, पण कातडं पण कुठेही मागे नाही बरं का मंडळी. त्याचं तेवढंच महत्व आहे. हे महत्व ओळखा, अगदी फुकट आणि भरपूर प्रमाणात उपलब्द असलेलं ऊन नक्की खा, चाखा, अनुभवा आणि सुधृढ व्हा, ताजेतवाने व्हा, ठणठणीत राहा.
मार / शिव्या / हवा / ओरडा ई. सगळे पण उन्हा सोबत आणि वैविध्य खाण्या पिण्याच्या पदार्थांसोबत खातो, अगदी लहानपणापासूनच आणि आमच्या पिढीने विशेषच.
काय भन्नाट भाषा आहे नाही आपली मराठी? मी मराठीच्या प्रेमात होतेच, पण पुन्हा एकदा असे विचार मनात आले, असे वाक्यांश आठवले आणि उपभोगले कि जास्त प्रेमात पडायला होतंच.
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२
ऊन खाणं
असणं आणि दाखवणं
असेल तरच दाखवता येईल ना, पण असेल तर दाखवा बरं का मंडळी, निश्चितच आणि नेहेमीच. फार फार गरजेचं आहे ते, किंबहुना अतिआवश्यक असे. नाहीतर समोरच्याला समजणार कसं आहे ते. इंग्रजीत म्हणतात ना "एक्सप्रेस करणे" तेच ते, अगदी तस्संच.
सध्या मी बरेच छोटे छोटे प्रयोग सुरु ठेवले आहेत माझ्या ऑफिस ला जायचे यायचे. बस काही खास उपयोगाची नाही वाटतं मला, त्यामुळे विविध पर्याय शोधणं सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आपणहूनच एका ऑटो काकांनी विचारलं आणि आम्ही रोज यायला सुरवात केली सोबत. पण थंडीचं नको वाटलं ऑटोत सकाळी आणि शिवाय कार / बस पुढे ऑटो त जरा जास्त धक्के बसतात आणि रोज नको वाटत. मग त्याच ऑटो काकांनी मला अजून एक पर्याय सुचवला आणि आम्ही माझ्या कार ने ऑफिस ला जायला-यायला लागलो. त्यांना रोज ऑटोची सवय, त्यात माझी राणी थोडी निराळी आणि मोठी वाटली त्यांना पहिल्या दिवशी. मी स्वतः वाहन चालक असल्यामुळे आणि नवीन ड्राइवर मुळे
पाहिल्यादिवशी सतत लक्ष रस्त्याकडे / चालवण्याकडे होत. ऑफिस ला पोचल्या पोचल्या मुलीला आणि ह्यांना मेसेज करून कळवलं मी आणि मुलाला पण पाठवणार होतेच पण तेवढ्यातच त्याचाच फोन आला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. हे असं खास कधीच होत नाही, त्यामुळे मला काही क्षण लागले दोन धक्के एकदम पचवायला. "तू ठीक आहेस ना? गाडी? व्यवस्थित चालवली का? वेग कसा होता?.....". मला खूप खूप बरं वाटलं, दहा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं आणि पोचल्या पोचल्या फोन येणं फार काही सांगून गेलं, त्याचा आवाज, घाईत न केलेला फोन, काळजी ई. वाखाणण्यासारखं होत. सहसा माझी लेक करते फोन वगैरे, हे महाराज नाही पडत अश्या भानगडीत पण ह्या वेळी काही तरी वेगळं होत हे निश्चित. त्याने फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाही ठेवली काळजी / प्रेम ते व्यक्त केलं, जे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होत / आहे. त्यामुळे जमेल तस्स, जमेल तेव्हा, जमेल तेवढं, साजेसं प्रेम / आपुलकी / काळजी व्यक्त करा आणि जमवाच मंडळी, मग तो दृश्य / अदृश्य बदल अनुभवा स्वतः.
रविवार, ३० जानेवारी, २०२२
सुचणे म्हणजे आशीर्वादच
मी स्वतः संगणक क्षेत्रात असल्यामुळे ब्लॉग ह्या विषयाशी निगडित आहे, आणि आज पर्यंत असंख्य ब्लॉग्स वाचले आहेतच. माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे म्हणा किंवा सहज लक्ष जाताच त्या मुळे माझ्याकडून फक्त ब्लॉग वाचला जात नाहीच. तो आधी शोधायचा, वाचायचा, त्याच मनन चिंतन करायचं आणि त्या माहितीचा उपयोग करायचा. हे झालं नेहेमीच. पण जसा मी ब्लॉग उघडला रे उघडला कि माझी नजर उजव्या बाजूला मांडलेल्या किंवा आपोआप तय्यार झालेल्या यादी वर न कळत जातेच, का कुणास ठाऊक, ठरवून नाही बरं का मंडळी, पण जाते, आता त्याला मी काहीच करू शकत नाही. बरं नुसती नजर जाते असं नाही तर त्यावर मला असं धन्य धन्य वाटत त्या लेखकाबद्दल, कि कसं काय इतकं सातत्य निभावू शकतात, एका मागून एक इतके लेख, मग ते शैक्षणिक असो, माहिती देणारे असो नाही तर अजून काही. हे सातत्य टिकवणं कुठल्याही मनुष्याच्या हातात नाहीच त्याला भरपूर आशीर्वाद लागतोच "त्याचा". "त्याचा" वरदहस्त आहे म्हणजेच व्यक्तीच्या हातून कामगिरी होते आहे, सुचतंय, उतरतंय, शब्दात अचूक मांडता येतंय आणि त्याला वाचक वर्ग पण लाभतोय. अहाहा. अजून कशी खात्री किंवा शाश्वती मिळणार कि "त्याच" पुरेपूर लक्ष आहे तुमच्या कडे ते? हि झाली "त्याची" पद्धत, अस्तित्वाची जाणीव करून द्यायची. नाही तर माणूस कोण हो लिहिणारा, अनुभवणारा, उतरवणारा, पेरणारा, गुंफणारा, छे छे, अशक्यच. त्यामुळे लिखाण च नाही तर जे प्रत्येक कार्य प्रत्येक माणसाच्या हातून घडतंय ते "त्या" शक्ती मुळेच, हे सत्य मान्य करा, स्वीकारा, म्हणजे व्यर्थ अभिमान बाळगावा लागणार नाही आणि संपूर्ण शरण जा किंबहुना कार्य होत गेलं कि शरण जाण देखील आपोआप होतंच, तो देखील अजून एक कृपा प्रसादच. माझ्या ब्लॉग वरचे सातत्याने वाढत चाललेले आकडे म्हणजे "त्याची" कृपा दृष्टीच, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतत त्या कडे माझं लक्ष जात नाही, आणि शिवाय लिहायला सुचतं ते वेगळंच. मागे एका अनुकथेत मांडल्या प्रमाणे ते विषय, शब्द आणि गुंफण उभीच ठाकते आणि जानेवारी २०२१ पासूनच सुरु झालेला १३ महिन्यांचा प्रवास निस्वार्थ सुरु आहे, सुरु राहो आणि ज्या कारणासाठी / ज्या वाचकांसाठी हे लिहिलं जातंय त्यांच्या पर्यंत हे पोचवणं शक्य होवो हि प्रार्थना.
सवय आणि सेवा
आज माझं जरा जास्त चालणं झालं दररोजच्या पेक्षा, काही कामं निघाली आणि त्यामुळे पाय बोलायला लागले. माझ्या मनात आलं कि आज नक्की माझ्या लेकीला म्हणायचं कि जरा माझे पाय चेपून दे. आणि खात्री तर होतीच कि ती नाही म्हणणार नाही. त्या वरुन मला एक किस्सा आठवला माझ्या दररोजच्या ऑटो वाल्याने स्वःताहुन सांगितला. का? कुणास ठाऊक. दिवसभर म्हणे एका दिवशी जास्त झालं ऑटो चालवणं, घरी आल्यावर त्यांनी त्याच्या मुलाला म्हटलं कि जरा पाय दे, पाठिवर पायांवर चाल, तर तो मुलगा म्हणतो कसा "शेजारी औषधाचं दुकान आहे, गोळी आणा बाबा, दाबून का घेता?" म्हणजे त्याला असं सुचवायचं होत कि हि अशी सेवा करून घ्यायची सवय बरी नाही तब्बेतीला. काय हि पिढी नाही, हुशार म्हणावी, का स्मार्ट, का आगाऊ, कोण शिकवत असेल ह्यांना असं बोलायला. आणि त्यातून गेली दोन एक वर्ष हि मंडळी घरीच आहेत हो, बाहेर पडणं नाही, बाकी मित्र मंडळींना भेटणं नाही आणि त्यामुळे उगाच काही कानावर पडलं नसेल, मग हे प्रसंगावधान राखून बरोबर त्या वेळी बोलणं जमत कसं हा मला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे. माझी एक नात आहे, तिच्या आजोबांनी पण पाठिवर चाल म्हटलं कि हि बया धूम ठोकते, पळून जाते आणि थोडावेळ येत नाही समोर, कित्ती हुषार नाही. असो, असं हि सही.
ह्या छोट्याश्या प्रसंगातून हाच धडा मिळतो कि १. जुने विचार / आचार आणि अपेक्षा बाजूला ठेवा, मुलांसाठी आम्ही हे केलं ते केलं त्यामुळे त्यांनी आमची सेवा केलीच पाहिजे असा हट्ट सोडा, किंबहुना ठेवूच नका, म्हणजे सोडायचा प्रश्नच येत नाही, अपेक्षा नकोतच, आणि २. मुलांना त्यांचं विश्व आहे ना, मग त्यातून वेळ काढणं कधी कधी मुश्किल होईल आणि गैरसमज नको व्हायला, ३. मालिश च्या किंवा अॅक्युप्रेशर च्या व्यवसायात असलेल्या लोकांना मग काम कसं मिळणार.
स्वतःला ठणठणीत ठेवा, आतून बाहेरून, शारीरिक मानसिक रूपाने, पोटभर हसा, पौष्टिक खा, व्यायाम करा आणि आनंदी समाधानी राहा. कदाचित कोणाचीच गरज पडणार नाहीच, पण सहज बदल, गम्मत आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होण्या करता अधे मधे बोलवा अॅक्युप्रेशर किंवा मालिश करण्यास, बास, मज्जाच मज्जा नाही का. "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे".
शनिवार, २९ जानेवारी, २०२२
चिरतरुण
माझा एक छोटासा गैरसमज होता कदाचित कि शिक्षक हा पेशा किंवा शिक्षक हा माणूस म्हणून नेहेमीच चिरतरुण राहतो कारण तो / ती सदाकदाच तरुणांसोबत असतो. तरुणासोबत असणं म्हणजे त्यांच्या तरुण विचारांसोबत, त्यांच्या तरुण कपडे घालण्याच्या पद्धतीसोबत, त्यांच्या कृती सोबत आणि एकंदरीतच सळसळत्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात. मी स्वतः हे अनुभवलं तर आहेच पण बघितलं देखील आहे इतकी वर्ष सातत्याने बाकिच्यांसोबत देखील. पण आज, किंवा एवढ्यातच मला अजून एक असा व्यवसाय नजरेस पडला कि तो देखील तरुण ठेवण्यास मदत करतोच, ह्याची खात्री पटली म्हणून हा छोटेखानी लेख प्रपंच. तर त्याच असं झालं कि माझ्या घराशेजारी एक अनोख्या व्यवसायातले कुटुंब राहायला आलेत. त्यांना बघून, त्यांची ओळख झाल्यावर जास्त प्रकर्षाने जाणवलं कि जे मी सध्या लिहिते आहे ते किती योग्य आहे.
आमचं सध्या जेथे वास्तव्य आहे ते जरी शहराचा च एक भाग असला तरी त्याला अजून एक खेडवळ टच आहेच. कारण हा भाग आधी गाव म्हणून ओळखला जायचा किंबहुना गावाचं होत ते. त्यामुळे अजून जुने गाववाले आहेत राहायला. त्या गाववाल्यांनी त्यांची जमीन सोन्याच्या नाही तर प्लॅटिनम च्या भावात बांधकाम व्यावसायिकांना विकल्यामुळे त्यांचे जे तरुण मंडळी आहेत त्यांना नवीन पिढीच्या दुचाकी घेऊन दिल्या आहेत. किंवा काही थोड्याच वर्षांपूर्वी घेतलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गॅरेज च्या मध्यम वयाच्या काकांना नवीनच आहेत न गाड्या. त्या त्यांच्या कडे येतात दुरुस्त करायला आणि ते आमच्या घरासमोरून फेरफटका मारायला जातात, वैविध्य आकार / प्रकार / जडण-घडणीच्या गाड्या आणि त्या सतत हात खालून गेल्यामुळे, अती जोरात / अगदी हळू अश्या सर्व पद्धतीने चालवल्यामुळे चिरतरुण राहतात असं मला प्रकर्षाने जाणवलं. इतक्या प्रकारच्या गाड्या विकत न घेता, त्याच मालक न होता देखील हवं तेवढ्या दिवस मनसोक्त चालवता येत, मग कोणीही तरुण राहिलाच ना, आणि शिवाय ती गाडी ना दुरुस्त होती, ती लोण्यासारखी आता चालते आहे ह्याच समाधान, नवीन शिकायला मिळालं प्रत्येक गाडी हाताळतांना हे हि नसे थोडके. अहाहा. भन्नाटच.
कायमचं अनोख चित्र
त्याला तुम्ही गोंदण म्हणा, मी तर रांगोळी असं पण म्हणेल किंवा जे हवं ते. पण एक मात्र नक्की ते फारच वेगळं आहे, कायमचं आहे आणि त्याची सर कोणाला नाही. बरं अजुन एक खासियत ह्या चित्राची / रांगोळीची कि ती निसर्गाने काढलेली / चितारलेली आहे, आणि कुठल्याही दारात नाही, कागदावर तर मुळीच नाही. बऱ्याच जणींना मात्र "ती" च अस्तित्व रुचत नाही, त्यांना म्हणे तिच्या मुळे जरा अवघडल्यासारखं आणि वेगळं वाटतं कारण कधी ना कधी ती दृष्टीस पडतेच दुसऱ्यांच्या हो. अर्थात त्या कडे बघू तसं आहे, दुसऱ्यांना नाही आवडलं पण स्वतःला तर अभिमान आहे ना कि अशी अनोखी रांगोळी आहे, आपल्यासोबत कायमची, जी अनेक जणीं कडे नसेल देखील. कुणास ठाऊक. अर्थात सध्या सगळेच फारच हुषार झाले आहेत, अशी रांगोळी तय्यार होऊच नये ह्या कडे जास्त लक्ष देतात, प्रयन्त करतात आणि काही प्रमाणात सफल देखील होतात हो. ज्याचा त्याचा प्रश्न आणि दृष्टिकोन आहे तो. मला तर असं चित्र काढण्यापासून निसर्गाला वंचित करता येत हे देखील अजिबातच माहित नव्हतं आणि जेव्हा समजलं तेव्हा चित्रकार कामाला लागला होता. त्यामुळे आता ते कायमचं माझ्या वर चित्रित केलं गेलं. अर्थातच मलाच काय माझ्या लेकीला देखील फार अभिमान आहे, कारणं अनेक आहेत.
१. ज्या भागावर हे अनोखं, जगावेगळं चित्र रेखाटलं गेलं आहे ते माझ्या लेकीच्या दृष्टीने तिचं पहिलं हक्काचं घर आहे, जे तिला फार फार प्रिय आहे,
२. ते माझं अस्तित्व आहे एक प्रकारचं,
३. माझी ओळख पण,
४. हे माझ्या साठी आहे, दुसऱ्यांना काही घेणं देणं नाहीच,
५. चित्रकाराने आणि त्यामुळे माझ्या कडून ह्या करता प्रचंड कष्ट करून घेतले आहेत,
६. आयुष्याचा एक टप्पा आणि महत्वाचा भाग आहे,
७. मी चमकणाऱ्या आणि चमकत राहणं जेथे आवश्यक आहे अश्या क्षेत्रात काम नाही करत त्यामुळे हे चित्र माझ्या पुरत मर्यादित आहे, ह्याची फक्त मीच प्रेक्षक आहे, अर्थात कधी कधी चुकून दर्शन घडतं दुसऱ्यांना पण त्यांना मी कुठलाही अधिकार तर दिला नाहीच त्या बद्दल बोलायला / वाच्यता करायला आणि अशी अजून बरीच कारणं देता येतील.
मला एक अनोखं, उत्कृष्ट आणि नैसर्गिक चित्र जगायची संधी दिल्या बद्दल / प्राप्त झाल्याबद्दल "त्याचे" मनापासून धन्यवाद.
सर्व मुलींनो, मुक्तपणे चित्र एन्जॉय करत जगा, त्याची लाज वाटायची अजिबात गरज नाही, ते तुमच्या साठी आहे बाहेरच्यांसाठी नाहीच.
स्ट्रेचमार्क्स चा विजय असो, कारण तो काय खुणावतो आहे मैत्रिणीनो "रंग ढंग माझा वेगळा$$$", आणि शिवाय नाही ती "ठिपक्यांची रांगोळी", नाही "कॅनव्हास वर काढलेलं रंगीत चित्र", नाही "पेन्सिल नि रेखाटलेलं".
प्रमाण / भाग / हिस्सा
कृतूमानाप्रमाणे च खाणं माहित होत मला अगदी समजायला लागल्या पासूनच, कारण तेव्हा तेच शक्य होत आणि पाळलं जायचं मनापासून सर्वत्र. गम्मत म्हणजे त्या त्या गोष्टी फक्त काही दिवसांकरताच उपलब्ध राहत असल्यामुळे खूप मज्जा करत आणि जरा जास्त प्रमाणातच खाल्ल्या जात, उत्साहानी. उदाहरणार्थ हिरव्या मटार चा सिझन असला कि मटार भात, कचोरी, आमटी, पोह्यात आणि बाकी जमेल त्याच्यात मनसोक्त मटार घातले जात ई. आणि त्यात जर मी स्वयंपाक घरात प्रवेश केलाच चुकून काही पदार्थ करायला तर मग काय विचारू नका, कधी कधी जरा जास्त प्रेम उतू जायी आणि माझे बाबा विचारात असतं कि "तू आज कोबीत मटार घातला आहेस कि मटार मधे कोबी"?
परवा जरा पेढे बिढे घ्यावे ह्या विचाराने शिरले दुकानात आणि घ्यायला गेले होते एक वस्तू, उचलल्या अनेक. त्यात सरते शेवटी मला ज्वारी लाह्या नजरेस पडल्या आणि मी त्या घेतल्या देखील. चविष्ट च लागत आहेत त्या परतवलेल्या लाह्या पण मी जरा त्याची किंमत बघून अवाक झाले. खातांना ध्यानात आलं कि तो खरं तर ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा होता. मी काय नेहेमीप्रमाणे घाईत आणि उत्साहात ज्वारी लाह्या हे पाकिटावर वाचलं, पारदर्शक पॅकिंग असल्यामुळे दिसलं आणि मी घेतलं. बास. पण तो निघाला ज्वारी लाह्या चिवडा. अहो पण साधारणतः नेहेमीच एक चिवडा म्हणजे प्रमाण असतं प्रत्येक घटक टाकण्याचं. पण ह्यात मज्जाच होती, लाह्यात शेंगदाणे होते कि शेंगदाण्यात लाह्या हे अजिबात लक्षात येत नव्हतं. उगाच नाही त्याची किंमत इतकी जास्त होती. सर्वसाधारण पणे कुठल्याही लाह्यांची किंमत अगदी नगण्य असते, पण हा जगावेगळा महाग. तो करणारा शेंगदाण्याचा भक्त होता वाटत. मला अगदी पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय, मी एक एक लाह्या उचलून खाते आहे सध्या आणि ते वाटिभरापेक्षा जास्त साठलेले शेंगदाणे मला ह्याच्या-त्याच्यात वापरून टाकावे लागतील लवकरच. अर्थात भाजलेल्या पण मऊ लाह्या, तिखट मीठ मसाला लावलेल्या ह्यांना मज्जा म्हणून अधेमधे दाणे तोंडात येणं वेगळं आणि फक्तच असंख्य दाणे हो, देवा.
"अती तेथे माती" हि म्हण नेहेमी लक्षात ठेवा. सातत्याने समतोल सांभाळा प्रत्येक बाबतीत, फक्त खाण्याच्या नाही हो. क्रतू असो किंवा आवड "थोडक्यात गोडी" आणि प्रमाणात असावं सगळंच, "अजीर्ण होऊ देऊ नयेच", मग ते आपल्या वागण्या बोलण्याचं असेल, किंवा संबंधाच / नात्याचं.
शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२
डूल
"अगं कानात नेहेमी डूल घालावे मुलींनी, खूप शोभून दिसतात, नेहेमी म्हणण्यापेक्षा सतत घालावे हो, तो एक वेगळीच शोभा देणारा दागिना आहे".... इति माझी आई, सतत तिचं चालूच असायचं मी लहान असल्यापासून ते मी स्वतः आई झाले तो वर. मग माझ्या कडे एक मावशी लागल्या कामाला, त्या स्वतः आजी च्या वयाच्या पण जोश भारी कामाचा, त्या पण सूर लावत डूल घालण्याचा आणि एक दोनदा स्वतः माझ्या साठी विकत घेऊन पण आल्या डूल. आई गं, कित्ती काळजी आणि प्रेम ते. त्यानंतर का कुणास ठाऊक पण आई ने रिंग घाल म्हणून सुरवात केली. मग मी विचारलं डूल का रिंग? तर म्हणते कशी अगं कधी हे कधी ते, दोन्ही आहेत ना तुझ्याकडे, आलटून पालटून घालत जा.
आज अनेक महिन्यांनी का कुणास ठाऊक पण ऑफिस ला तय्यार होतांना माझ्या भल्या मोठ्या कानातल्या डब्यातुन डूल काढले, घातले, अजूनही हे लिहितांना स्क्रीन दिसत नाही आहे एवढे डोळे डबडबले आहेत. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, आईच माझ्या समोर उभी राहून बोलते आहे असं जाणवतं आहे, का कुणास ठाऊक. इतकुसे ते डूल पण आभाळा एवढी माया साठवून गेली आई त्यात. तिच्या समोर नखरे केले घालायला आणि आज मलाच मीच खुप छान दिसतेय असं वाटतंय ते डूल घातल्यावर. एक नवा जोश, नवा उत्साह जागा झाल्यासारखा वाटतोय, आता हा जोश आणि उत्साह मला कुठे घेऊन जाणार हे माहित नाही, बघुयात. तेव्हा तिच्या समोर घातले असते तर त्या जीवाला फार समाधान मिळालं असतं. असो. "आज फिर जिने कि तम्मना है...." असं झालंय माझं.
तुमच्यावर जे जीव लावतात ना त्यांच्या वेळेवर गोष्टी ऐका, त्यांच्या समाधानापुरतं का होईना ते करा, मग "दृष्टी आड सृष्टी" सारखं बदला नंतर हवं तर, पण त्यांना ते साखरेच्या कणा एवढं समाधान मिळू द्याच, त्या क्षणी जगून घ्याच. मग बघा तुम्ही आणि ते दोघेही कसे बहरता, आणि कदाचित अनेक वर्षांनंतर असं डोळे भरून येणार नाहीत.
गोल गोल फिरणारी खुर्ची
माझ्या लहानपणीची कथाच वेगळी होती, सर्वसाधारणपणे आजूबाजूला सर्वत्र एक सारखं वातावरण होत. सगळ्यांकडे बहुतांशी सारखंच असायचं, थोड्याफार फरकाने तेच. मग त्या लोखंडाच्या घडी करून ठेवता येतील अश्या खुर्च्या असो नाहीतर लाकडी स्टूल. ते स्टूल माझ्या मते अनेक वर्ष / पिढ्या चालत असलेले. अर्थात त्या काळी जे आहे त्यात आनंद मानणें, त्याच वस्तू नेहेमीकरता वापरणे आनंदाने ई. होतच. सदासर्वदा नवीन गोष्टी घेण्याची ऐपत तर नव्हतीच पण गरज पडायची नाही ते देखील होत, टिकावू वस्तू तय्यार होत असतं आणि टिकतही असतं, किंवा सातत्याने फॅशन बदलत नव्हती आणि लोक बदललेल्या फॅशन ला बळी पण पडायचे नाहीत. स्थिरता होती त्यावेळी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो. तर आम्ही लहानाचे मोठे झालो त्या स्टूल वर आणि खुर्च्यांवर बसून च. टीव्ही वर, किंवा एखाद्या कचेरीत गोल गोल फिरणारी खुर्ची दिसली कि फार अप्रूप वाटायचं. असं मनात यायचं कि ह्या माणसाने काही तरी भलं मोठं काम केलं असणार त्यामुळे ह्याला अशी भन्नाट खुर्ची लाभली. डोळे भरून बघायचो त्या कडे एकटक. त्यावेळी अश्या खुर्च्या सर्वत्र उपलब्ध देखील नव्हत्या दुकानात, मॉल तर अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे मला बसायला मिळणं अशक्यच. बाबांच्या ऑफिस मध्ये, माझ्या विद्यापीठात किंवा इतर ठिकाणी लाकडी हाताच्या खुर्च्या. त्यामुळे विषयच संपला. त्यानंतर जेव्हा जेव्हा, जिथे कुठे मला अश्या चाकाच्या खुर्चीवर बसायला मिळाले तेव्हा तेव्हा मी अगदी लहान मुलासारखा त्याचा आनंद उपभोगला. पर्वणी होती ना मला अश्या खुर्चीवर बसायला मिळणे म्हणजे. मग काय अमेरिका वारी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नोकरी आणि बदलते दिवस ह्यामुळे आता चाकाचीच खुर्ची इतस्ततः सर्वत्र नजरेस पडते, मी पण रोज घरी दारी वापरते, पण आज देखील अधे मधे त्यावर गोल गोल फिरतेच, ते सगळे जुने दिवस आणि तो जुना प्रवास आठवून, अजूनही अगदी लहान मुलासारखे अत्यानंद होतो तो शब्दात मांडण्यासारखा नाहीच.
मला एक एक्स्पर्ट ने एकदा विचारलं / थोडसं भोसकलंच, आणि म्हणतो कसा फार बदल करावे लागतील हो, तुमचं लिंक्ड-इन वर प्रोफाइल काही जबरदस्त नाहीच. त्यावर मी स्मितहास्य करून त्यांना उत्तर दिल, कि मी एका छोट्याश्या मराठी माध्यमाच्या शाळेतून आले आहे, माझं लिंक्ड-इन वर प्रोफाइल आहे कारण शिक्षण आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे. लिंक्ड-इन वर प्रोफाइल आहे, मी माझ्या मुलीशी आणि शेकडो लोकांशी जोडलेले आहे हेच माझ्यासाठी खूप आहे, आणि त्यात भरपूर समाधान आहे.
तसेच लोखंडी खुर्ची, स्टूल ते स्वतःची चाकाची कमवलेली खुर्ची हा प्रवास सुख देऊन जाणारा आहे. चाकाची खुर्ची नसती तरी देखील काही अडलं नसतंच, पण आहे ह्याचा अभिमान आहे आणि सध्या त्याचेच दिवस देखील आहेत.
तर आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद उपभोगा, समाधान माना, नसेल तर अडू देऊ नका आणि तुमचा छोटासा प्रवास आठवा, स्वाभिमानाने कमावलेल्या वस्तू अमोल आहेत हे लक्षात असू द्या.
ओळख
अनेक वर्ष सरकारी नोकरी केल्यामुळे, असंख्य ठिकाणी बदली झाल्यामुळे, वैविध्य मोठ्या प्रोजेक्ट्स वर काम केल्यामुळे, स्वभावामुळे, अनेक लोकांना मदत केल्यामुळे, खूप विषयांवर उत्कृष्ट पकड असल्यामुळे, भरपूर वाचन असल्यामुळे किंवा अजून अनेक अश्या कारणांमुळे माझ्या वडिलांचे ओळखीचे खूपच होते. मला कुठेही जायचं असल्यास किंवा कुठल्याही क्षेत्रात गरज असल्यास ते हव्या त्या व्यक्तीला निरोप देत, पण मला न जाणवू देता, माझं स्वतंत्र सांभाळून शिवाय त्यांची शांतात हे त्यांनी उत्कृष्ट पणे सांभाळलं आणि ते मला आत्ता जाणवत आहे. मी वयाने थोडी मोठी झाले, इकडे तिकडे जाऊ लागले आणि माझ्या पण ओळखीचा सागर सातत्याने पसरत राहिला. पण त्यात देखील कधी कधी असं व्हायचं कि मला प्रश्न पडायचा "आता पुढे कसं जायचं?ओळखीचं किंवा मार्गदर्शन करणारं माणूस नाही?" अश्या वेळी मी माझ्या वडिलांना विचारायची तेव्हा ते दोन उत्तर देत असतं, १. अगं जरा थांब, आता नाही लक्षात येत असेल जर एखादी आवश्यक डायरेक्ट ओळखीची व्यक्ती, तर थोड्या वेळानी येईल, आठवेल, आणि २. नाहीच निघालं ना कोणी ओळखीचं तर तेथे जा, नवीन ओळख कर आणि हे नेहेमी लक्षात ठेव, "तो" आहे ना, त्याची ओळख आहे ना तुला, विश्वास आहे ना त्याच्या अस्तित्वावर, तो मदत करणारच ह्यावर मग अजून कोणाची ओळख का हवी तुला? पुढे हो, होईल सगळं नीट. त्याची ओळख सर्वांशी आणि त्याच्या पेक्षा मोठी ओळख हवी का?
आता माझ्या मुलांची बारी आली, माझी भूमिका बदलली, आता मला उभं करायचं होत सगळं, मग झाले सुरु, शाळेत मुलांना टाकण्याचं ठरवलं, माझी सपोर्ट सिस्टिम उभी राहिली,मला शांततेत ऑफिस करता आलं, अनेक वर्ष न चुकता मदत मिळाली जेव्हा हवी / लागली तेव्हा. आता दुसऱ्या गावाला जाऊन शिकायचं म्हणतात मुलं. नवीन आव्हान उभं ठाकलं, काही क्षण डोक्याचा भुगा झालाच माझ्या कारण ते ठिकाण एवढं परिचयाचं नव्हतं. मुलगा पण चिडवायला लागला, म्हणाला आता काय निघतेय का ओळख? मी फक्त स्मित हास्य केलं, कारण खरंच कोणी म्हणजे कोणी उभं ठाकलं नाही डोळ्यासमोर. केलेत मी प्रयन्त, येईल यश, पण मग आधी बाबांचं वाक्य आठवलं. शांततेत दोन तीन दिवस घालवले, अनेक निरोप दिले आणि हा हा म्हणता यादी तय्यार झाली ओळखीच्या माणसांची. आता मला कदाचित शांत झोप लागेल, माझ्या काळजाचा तुकडा एकटा नाही त्या नवीन शहरात हे माहिती होतंच, विश्वास होता पण आता खात्री पटली. त्याला त्यातले काहीच कॉनटॅक्ट सांगणार / देणार बाकी माझ्या साठी राखीव, लक्ष पण ठेवणार न कळत आणि त्यांचं अस्तित्व माझ्याच साठी जसं काही अशी भूमिका असणार. आज पर्यंत हे मला देखील जमतंय हे खूप समाधान कारक आहे माझ्यासाठी, बाकीच्यांचं नाही माहित मला. अर्थात कोणीच सापडलं नसतं तर डायरेक्ट मेल करणार होते मी तिथल्या दिग्गज मंडळींना, आणि जाऊन प्रत्यक्ष भेटणार पण होते, पण आता घाईने ती कृती करण्याची गरज नाही. "त्याची" आणि त्याच्यासारखी मनुष्य रूपात लाभलेली साथ / ओळख फार महत्वाची. त्या ओळखीचा सुदुपयोगच फक्त करा आणि स्वःता देखील स्वतःची ओळख निर्माण करा, दुसऱ्यांना जमेल तशी मदत करा, परतफेड करत राहा, ह्या ना त्या स्वरूपात.
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
अनुभूती
"अनुभूती हि घेऊन क्षणभर जगताला विस्मरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा". हे श्री. दत्तात्रयांचे भजन माझ्या आईच्या हातून लिहिलं गेलं आणि अनेक वर्ष मी ऐकतच मोठी झाले. मानसपुजा करतं, मनातल्या मनात दिगंबरा म्हणत राहिलं तर जी अनुभूती येते ती घ्या आणि क्षणभर का होईना अवतीभवतीच्या जगाला विसरा, विस्मृतीत जाता येतंच म्हणा आपल्या आपण.
अनुभूती ह्या शब्दाशी हि माझी झालेली पहिली ओळख, तेव्हा अर्थात काहीही समजतं नव्हतंच, फक्त शब्द कानावर सतत पडत असे. अर्थात मराठी माध्यमातून शाळा सुरु झाली, अवतीभवती पण सगळं अस्सल मराठमोळं वातावरण आणि त्यामुळे मराठी शब्द अर्थासहित समजायला लागले, शिकायला लागले आणि मग भाषेची गोडी इतकी वाढली कि आज तागायत टिकली आहे / वाढते आहे.
अनेकविध अनुभूती घेत घेत इतकी वर्ष सरली उत्साहात, आनंदात, नवीन शिकण्यात आणि एवढ्यातच एका अप्रतिम, फारच अनोख्या व्यक्तीची ओळख झाली. अर्थात आम्ही फार थोड्यावेळ एकत्र होतो तरी देखील. एकंदरीत खूप आवडेल अशी साधी व्यक्ती, उत्साहाने आपणहून बोलणारी, हसमुख आणि प्रचंड शिकलेली, विद्यावाचस्पती आणि ते देखील आंतरराष्ट्रीयीकरण ह्या विषयात. बाप रे. पहिल्यांदा तिची ओळख अनु अशी करून दिली, गप्पा झाल्या विविध विषयावर, फोटो काढले, जेवलो, गाणे ऐकण्याचा / गुणगुणण्याचा आनंद उपभोगायला आणि मग त्यांचं संपूर्ण नाव ऐकलं तर डॉ. अनुभूती. कधी कधी असं होतं ना कि एखाद्याला पाहिल्या पाहिल्या एक वाखाणण्यासारखा आनंद मिळतो, काही क्षण असेल तो, पण पुरेसा असतो. मला हि मिळालेली अनुभूती पण अशीच होती. अनेक वर्षांपूर्वी तिच्या पालकांनी काय विचार करून तिचं हे नाव ठेवलं मला नाही माहित पण ती पुरेपूर उतरली आहे, अगदी तिच्या नावाला साजेशी आणि मला खात्री आहे प्रत्येकालाच तिच्या बद्दल असाच अनुभव येत असणार.
ज्यात क्रिया / कृती ई. दर्शवतात असे शब्द मुलाचे / मुलीचे नाव म्हणून ठेवणे हि खरं प्रथा नव्हती आधी, आजकाल फार ऐकिवात आहे. पण माझ्या जमान्यात अशी क्रियावाचक नाव ठेवणं आणि त्याला त्याने खरं ठरवणं हे सोप्प नाही, मेहेनत नक्कीच आहे, सातत्य टिकवावं लागतं आणि बरेच काही. असो. फार उत्तम, वेगळी आणि नेहेमी लक्षात राहील अशीच हि (डॉ.) अनुभूती.
मेडिसी इफेक्ट
परवाची मज्जा, सकाळी माझी फारच पळापळ आणि धावपळ सुरु होती, धडपड म्हणा त्याला, कारण नागपूरच्या ४-५ महिन्यांच्या वास्तव्या नंतर आणि तिथल्या एकंदरीत बदललेल्या रोजनिशी मुळे मला माझ्याच स्वयंपाक घरात सुचत नव्हतं. मावशी सुट्टीवर आणि मला ऑफिस, त्यामुळे डब्बा, नाश्ता करायचा होता, घड्याळ बघत. बटाटे लावले कुकर मधे, सवय मोडल्यामुळे असेल किंवा माझी कुकरची दोस्ती थोडीशी कमी झाल्यामुळे असेल, अंदाज चुकल्यामुळे शिट्टी बरोबर गरमागरम पाणी पण बाहेर येत होत, फवाऱ्यासारखं. इतस्ततः पसरत होतं आणि त्यात माझ्या डोक्यात ह्या विषयावर लिहावं असं चालू होत. देवा. काही दिवसांपूर्वीच मेडिसी इफेक्ट बद्दल माझ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं होत आणि ते देखील कुकर कडे बघतांना लक्षात आलं, त्यात गेली दोन एक वर्ष कुकर ची जाहिरात आहे ज्यात असं म्हटलं आहे कि कुकर मधनं पाणी बाहेर आलं तर पसारा होतो, आवरावे लागतं त्यामुळे त्यांनी कुकरच्या झाकणावर थोडासा खोलगट भाग तय्यार केला म्हणजे
१. पाणी त्यात साठतं जर बाहेर आलंच तर आणि
२. पुढची शिट्टी येईस्तोवर उष्णतेमुळे साचलेलं थोडसं पाणी वाफ होऊन निघून जातं. थोडक्यात काय स्वयंपाक घरात नीटनेटकेपणा टिकून राहतो / स्वच्छता राहते ई.
बघा म्हणजे त्या एवढ्या मोठ्या कुकरच्या कंपनीला सुद्धा अजून समजलं नाही कि पाणी बाहेर का पडतं, त्यांचं संशोधन अजून सुरु असेल, पण तो वर "एक पाऊल पुढे" ह्या प्रमाणे त्यांनी एक छोटेसे इन्व्हेंशन शोधून काढले आणि ते लोकांना आवडले देखील. असे नवीन झाकण असलेले कुकर मस्त विकले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण नवीन कुकर तय्यार होई पर्यंत का थांबायचं, छोटेसे नवीन काही तरी सतत शोधत राहत पुढे जाणं जास्त महत्वाचं, नाही का? वा,मेडिसी इफेक्ट चं माझ्या दृष्टीने हे एक छान उदाहरण आहे. बरं झालं त्या दिवशी मावशी नाही आल्या, मी शिरले स्वयंपाक घरात, कुकर लावला, त्यातनं पाणी बाहेर आलं, तेवढ्यातच मेडिसी चा वर्ग झाला होता, कुकर कंपनीची जाहिरात देखील आठवली आणि गोळाबेरीज म्हणजे हि पिटुकली अनुकथा. तर असेच प्रत्येक क्षेत्रात छोटे नवीन टप्पे विचारपूर्वक गाठूयात, मोठ्ठं काहीतरी प्रत्येक वेळी होईलच ह्याची वाट नको बघायला आणि वाईट वाटून घ्यायला, समाधान मानत पुढच्या पायरीची तय्यारी करूयात. "उठा उठा हो सकळिक, वाचे बरावा गजमुख, रिद्धी सिद्धीचा नायक, गणपती".
कुछ मिठा हो जाये
मी नागपुरचे काम आटोपून पुण्याला येते वेळी बऱ्याच जणांनी असंख्य भेट वस्तू दिल्या, अर्थात मी पण माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला माझी आठवण म्हणून फुल-ना-फुलाची पाकळी दिली. त्या सर्वांनमधे माझी अतिथी-गृहातली खोली ज्या रोज करत होत्या त्या मावशींनी मला दोन कॅडबरी छोटे चॉकलेट दिले, म्हणाल्या कि प्रवासात खा आठवणीने, तोंड गोड करा. महद आश्चर्य ह्याच वाटलं कि त्यांनी मला भेट वस्तू आणि शिवाय चॉकलेट पण दिले, माझ्या पद्धती प्रमाणे दोन हातात दोन-दोन. प्रवास झाला, घरी सात दिवसांचा वनवास भोगला आणि मग नियमित ऑफिस सुरु झाले. सहज मला आठवण झाली त्या दिलेल्या किंवा मी प्रेमाने मिळवलेल्या चॉकलेट्स ची. बॅगेतून काढले, अर्थातच मी थोडी हळवी असल्यामुळे असेल कदाचित आधी तर डोळ्यात पाणी आलं, पण मग छोटंस हसू पण देऊन गेलं, कारण ते डेरी मिल्क उघडल्यावर काय बघते त्या वेष्टनात फक्त चॉकलेट होत. नाहीतर हे कॅडबरी वाले चॉकलेट, मग त्यावर सोनेरी कागद, मग त्यावर पांढरा छापलेला कागद आणि त्यावर मग नेहेमीचे निळ्या / जांभळ्या रंगाचे आवरण ई. एकसूत्रता का नाही आढळली मला हे चॉकलेट उघडल्यावर? काय असा फरक पडतो ते सोनेरी आणि पांढरे कागद चॉकलेट वर गुंडाळून? ते पण आत, बाहेर दिसत नाहीतच ना, मग का उगाच वेळ, पैसा / किंमत, ऊर्जा आणि कचरा वाढवायचा? बरं फक्त एक पद्धत म्हटली तर मग छोट्या मोठ्या सगळ्याच चॉकलेट मधे ते हवं. आणि हे चॉकलेट जर बिना दोन कागदी थरांशिवाय लोक घेतात, खातात मग बाकी चॉकलेट मधे थर का कागदांचे? असो, मला सोप्प गेलं उघडलं कि डायरेक्ट चघळायला आणि काही तरी छोटेखानी पण नवीन आढळलं म्हणून हे लिहिता देखील आलं. जमल्यास सोनेरी आणि पांढऱ्या कागदाची चॉकलेट गुंडाळायला गरज तरी नाही आहे हे स्पष्ट झालं आहे, मग ते वापरणं थांबवावं कंपनीने आणि त्याची किंमत कमी करावी म्हणजे कदाचित खप अजून वाढेल आणि खायला सोप्प होईल ते वेगळंच, फ्रिज मधे गर्दी कमी होईल माझ्या कारण चॉकलेट जातं पोटात आणि हे दोन कागद एकटे गार वारा खात आ वाचून पसरून बसतात आपले, माझी जशी वाट बघत, मी काढून टाकले तर जागा रिकामी होते फ्रिज मधे. प्रत्येक चॉकलेट मागे ३ कागदं ह्या पेक्षा १ बरा, नाही का?.
"एकमेका साह्य करू आणि सहज मार्गाने तोंड गोड करू". आणि हो मंडळी, सगळे असेच राहून बघू ना, एकमेकांशी बोलायला सोप्पे, वागायला सोप्पे, सहज उपलब्ध कुठल्याही जुन्या थरां शिवाय म्हणजे वेळ, ऊर्जा, पैसा ई. वाया जाणार तर नाहीच पण रेशमांचे बंध कायमचे दृढ होतील ते वेगळेच.
रविवार, २३ जानेवारी, २०२२
अंदाज, कल्पना आणि जाणीव
अगदी नेहेमी प्रमाणे तो आज देखील माझ्या समोर उभा ठाकला, दत्त म्हणून आणि न कळत खुणावून गेला देखील. आणि मी, अगदी माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे पहिले काही क्षण गैरसमज करण्यातच घालवले. कदाचित एक ठराविक / टिपिकल भारतीय आई म्हणून असेल कदाचित. असो. पण अगदी पट्टाकिनी दुसऱ्या क्षणीच मला एक वेगळा कोन, एक वेगळा किरण नजरेस पडला आणि मला प्रचंड आनंद झाला कि सरतेशेवटी मला समजलं कि त्याला काय म्हणायचं आहे ते, काय संदेश पोचवायचा होता ते.
तर त्याच असं झालं कि माझ्या मोबाईल वर सगळ्यांसारखा गुगल पे अँप आहे. मी ते सगळीकडे वापरते आणि त्या मुळे असेल कदाचित पण तो मला बरेच छोटे छोटे मेसेजेस पाठवत असतो. आज पण तसेच झाले, आला एक मेसेज. त्यात थोडक्यात असं लिहिलं होत कि "महिन्याचा खर्च संपूर्ण कुटुंबासोबत वाटा / शेअर करा". आणि एक चौकोनी कुटुंबाचा फोटो त्या सोबत होता. म्हटलं शिकण्याच्या वयात मुलांनी घराचा खर्च का शेअर करायचा, वाटून घ्यायचा. आई वडिलांचं काम आहे ते, मुलांनी मस्त बिनधास्त शिकावं, मग नोकरी करून स्थिर स्थावर व्हावं आणि त्यांचा त्याचा खर्च सांभाळावा, बास. पण "नाण्याला जश्या दोन बाजू असतात" त्या प्रमाणे मला अचानक दुसरी बाजू जास्त प्रकर्षाने उभी ठाकली. त्यात असं दिसलं / नजरेस पडलं कि मुलांनी शिकण्याच्या वयात खर्च पैश्याच्या स्वरूपात वाटून घेण्यास नाही सांगत आहे गुगल पे, पण संपूर्ण कुटुंबाला कल्पना हवी कि महिन्याला घरात कुठे, कसा आणि किती खर्च होतो. एक जाणीव / जागरूकता म्हणून, बास. म्हणजे ते जेव्हा त्यांचं स्वतःच खर्च करण्याचं वेळापत्रक सुरु करतील तेव्हा ते काही अंश तय्यार असतील. गुगल पे नी हि सुविधा उपलब्ध करून दिली, त्या बद्दल मेसेज दिला आणि कळवलं त्या बद्दल शतशः धन्यवाद. बऱ्याच कुटुंबात कल्पना नसते महिन्याला घर चालवणं म्हणजे काय ते? ह्या छोट्याश्या कृतीने माझ्या दृष्टीने आई बाबांबद्दल एक अजून छोटीशी आदराची भुमीका वाटेल, बाजाराची सद्य स्थिती समजेल, एकमेकांच्या अजून जवळ येत येईल / जवळून ओळखता येईल, आत्मविश्वास वाढेल, पारदर्शकता जास्त व्यवस्थित टिकवता येईल ई. आणि अनेक फायदे मला दिसले. छान वाटलं. ज्याच्या डोक्यातून हि उत्कृष्ट कल्पना आली आहे त्याला, त्यांना शतशः धन्यवाद, अगदी मनापासून. आणि हो सुरवातीला सांगितल्या प्रमाणे हा नवीन विषय उभा ठाकला हो माझ्या समोर आणि हे माझे छोटेखानी विचार मांडण्याची संधी देऊन गेला. अर्थात थोडी महाविद्यालयात जाणारी मुलं पण गुगल पे साधारणतः वापरतातच, गरजेचंच आहे सध्याच्या जगात, त्यामुळे त्यांना घरातल्या सगळ्या / जमेल तेवढ्या छोट्या छोट्या उपक्रमात सहभागी करून घेणं उत्तम. अर्थात कोणी ह्या नवीन जाहिरात कुल्पती / युक्ती म्हणेल, आणि असेल देखील, ह्या मुळे काही जण सगळे व्यवहार गुगल पे वापरून करतील म्हणजे महिन्याच्या शेवटी एक यादी वर्गीकरण केलेली सगळयांना दिसेल आणि त्यावरून पुढील महिन्याच्या खर्चाचा अंदाज येईल आणि कमी-जास्त फेरफार लागलेच तर सुचतील / करता येतील. काही का असेना, सर्वांनी एकत्र येण्याचा हा मार्ग भावाला माझ्या मनाला. असेच एकमेकांशी नेहेमी जोडलेले पारदर्शक राहा आणि आनंद उपभोगा.
शनिवार, २२ जानेवारी, २०२२
पूर्ण मैत्रीण
माझी अत्यंत प्रिय राणी आणि मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मला मोठ्याने गाणे रेडिओ वर ऐकायला फार म्हणजे फार मनापासून आवडतात. आता रेडिओ म्हणजे फक्त गाणी नाहीत ना, अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात, समालोचन, टीका, विनोद आणि बरेच काही पण त्या सोबत ऐकता येतं गाडी चालवता चालवता. काल - परवा अगदी असंच झालं, मी गाडीत होते आणि एक रेडिओ जॉकी बोलता बोलता म्हणाली मी तुमची "पूर्ण मैत्रीण" आणि तिचं नाव सांगितलं. त्यापुढे ती काय काय म्हणाली, तो कार्यक्रम नेमका कशाचं होता ई. कडे माझं लक्षच नाही गेलं. मी सगळा वेळ फक्त हेच विचार करण्यात घालवला कि "पूर्ण मैत्रीण"म्हणजे काय. कारण आज पर्यंत मी वर्ग मैत्रीण, कॉलेज मैत्रीण, शाळेची मैत्रीण, गल्ली मैत्रीण, घट्ट मैत्रीण (फास्ट फ्रेंड), फक्त फ्रेंड, पहाटे फ्रेंड (३ एम फ्रेंड) असेच अनेक प्रकार ऐकले आहेत, वापरले देखील आहेत. आता हे नवीन काय "पूर्ण मैत्रीण"? म्हणजे अर्धी मैत्रीण / पाव मैत्रीण ई. पण असणार का भविष्यात? ऐकावं ते नवलंच.
ज्वलंत प्रश्न मला भेडसावतो आहे तो म्हणजे एखाद्याला / नवख्या व्यक्तीला जर मैत्रिणीची ओळख करून द्यायची असल्यास असं वर दिलेलं वर्गीकरण वापरता येईल हि कदाचित, पण खरं तर वर्गीकरण नकोच. मैत्रीण म्हणजे मैत्रीण, बास, एकदा केली कि निभवायची, जशी आणि अगदी मनापासून जमेल तश्शी, नेहेमी करता. आणि मग ती कोणाही बरोबर का असेना, मैत्री म्हटली कि त्यातच आलं सगळं. त्या संबंधातली सीमा रेषा सांभाळून एकमेकांसाठी सातत्याने असणं, किंबहुना हि भावना असणं, खात्री असणं ह्यातच आलं नाही का सगळं? चला तर मग सर्वांशी मैत्री ने च बागडूया आणि आनंद लुटुया, कुठलेही वर्गीकरण न करता. मैत्री सारखं दुसरं पवित्र, साधं, सरळ, सोप्प, बिनधास्त, जवळच, अपेक्षाविरहित, निर्मळ असं नातं असणं / मिळणं हे अहोभाग्य.
गुरुवार, २० जानेवारी, २०२२
अद्ययावत राहणे
जेव्हा पासून ह्या इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि चा जन्म झाला आहे आणि सर्वत्र तिचा वापर वाढला आहे / फोफावला आहे तेव्हा पासून स्वतःला उपडेट ठेवणं अत्यावश्यक झालाच आहे. अर्थात जे त्या क्षेत्रात कामं करतात त्यांना तर तरणोपाय नाहीच आहे, पण बाकी जनतेला देखील गरजेचे आहे. माणूस फक्त इथेच थांबला असता तर जास्त बरं झालं असतं पण तसं झालं नाही, मी माझ्या क्षेत्रात किती अद्ययावत आहे हे बघता बघता तो दुसरा अजून कुठे कुठे काय काय करतोय ह्यात पण शिरला स्वभावानुसार आणि गडबड झालीच. असो. स्वतः कडे बघा हे महत्वाचे. स्वतः ला अद्ययावत राखणे जास्त गरजेचे आणि तंत्रज्ञानाचा समाजउपयोगी वापर ह्या कडे लक्ष देणे जास्त निकडीचे आहे, आणि ते देखील आनंदाने, समाधानाने.
माझ्या विद्यार्थ्यांची उद्या पिटुकली परीक्षा घ्यायचं ठरलंय आणि त्या साठी मी आधीच प्रश्नपत्रिका तय्यार ठेवली एका वेगळ्या फाईल मधे. मग आम्ही जे प्लॅटफॉर्म वापरतो शिकवायला आणि परीक्षा घ्यायला त्यावर ती प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यायची होती. त्या साठी ते प्लॅटफॉर्म व्यव्यस्थित उघडले, गेले २-२.५ वर्ष आता तेच आम्ही वापरतो आहे त्यामुळे आता त्याची सवय झाली आहे. पण महद आश्चर्य. ह्या वेळी प्रश्नपत्रिका त्याच प्लॅटफॉर्म टाकते वेळी अचानक मला विचारण्यात आलं. आज पर्यंत तुम्ही एवढे विविध पेपर्स / प्रश्न पत्रिका तय्यार केल्या आहेत, त्याच पैकी काही प्रश्न पुन्हा विचारात येतील का? आणि संपूर्ण यादी ताबडतोब हजर झाली देखील मी हो नाही म्हणण्याची वाट वगैरे न बघता. माझा आनंद गगनात मावेना हि नवीन अपडेटेड फॅसिलिटी बघून, मी अवाक झाले. खरं तर हा इतका जगप्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे, ती कंपनी जगातील नावाजलेली आघाडीची कंपनी आहे मग ह्या कंपनीला अद्ययावत राहायची खरंच गरज आहे का?, अश्या पद्धतीची नवीन सोय देण्याची काय आवश्यकता? प्रश्न पत्रिका ऑनलाईन तय्यार करणे म्हणजे आधी प्रश्न टाकणे, मग वैविध्य उत्तरं, त्यातून अचूक उत्तर कोणतं हे नमूद करणे, त्या प्रश्नाला किती गुण हे लिहिणे, कोणते प्रश्न आवश्यक आहेत / नाहीत हे सांगणे आणि बरेच काही. मग सांगा आता ह्या प्लॅटफॉर्म वर जर मी म्हटलं कि हो मला खालील यादीतले हे ४ प्रश्न पुन्हा वापरायचे आहेत तर झालंच ना काम सोप्प, प्रश्न नव्याने टाकण्यासाठी लागणार द्राविडी प्राणायाम तर टळला ना, आणि शिवाय प्रत्येक वेळी नवीन प्रश्न देखील शोधायला नकोत, जर वर्ग वेगळा असेल तर, सिल्याबस / अभ्यासक्रम सारखा असेल तर ई. आणि बरेच फायदे. ह्या प्लॅटफॉर्म चा चमू मीच का उपडेट करू, किती करू, ई. वर वेळ, पैसा आणि शक्ती वाया न घालवता त्यांनी नवीनता देऊ केली आधी सर्वांना.
मग ह्या जगविख्यात दिग्गजा पुढे आपण कोण हो? कित्ती शिकण्यासारखं आहे ह्या छोट्याश्या प्रसंगातून, माझ्या साठी तर निश्चित आहेच. चला तर मग स्वतः सतत आनंदाने नवीन शिकुयात, आणि त्याचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी समाधानाने फायदा करून घेऊ यात, उगाच दुसरा काय काय करतोय, का आणि कधी करतोय ह्या कडे लक्ष देण्याशिवाय आणि ऊर्जा उगाच वाया घालवण्याशिवाय. किंवा साठलेल्या पाण्यासारखे एकाच जागी राहण्यापेक्षा, आभाळाएवढं आहे नवीन सतत शिकायचं ठरवलं तर. "थांबला तो संपला", चला उठा.
मंगळवार, १८ जानेवारी, २०२२
बाळंतपण
माझ्या आधीच्या विभाग-प्रमुख हा शब्द नेहेमी वापरायच्या, त्या बद्दल ह्या आधी एका अनुकथेत लिहिलं आहे मी. जेव्हा त्या विभाग-प्रमुख होत्या तेव्हा स्नातकोत्तर विद्यार्थी प्रवेश घेत, शिकत, प्रोजेक्ट वर काम करून एक डाक्युमेंट ज्यात प्रोजेक्ट बद्दल जुजबी माहिती आहे असं देऊन निघून जात. मग आम्ही सगळ्या गाईड्स घेऊन बसत असू ते डाक्युमेंट. अक्का पेपर, जर्नल ला पाठवणे, दिग्गज सांगतील ते बदल करणे, पुन्हा जर्नल ला पाठवणे ई. = बाळंतपण त्या पेपर चे. बहुतांशी त्याच बाळंतपण पूर्ण करतंच असू आम्ही सगळ्या आणि अत्यंत आनंदाने हो.
आज पुन्हा एकदा ह्या शब्दाची आठवण झाली. कारण पण तस्सेच आहे. गेल्या ४-५ महिन्यांपासून मी नागपूरला होते नवीन इंजिनीरिंग कॉलेज स्थापन करण्यासाठी. मी तो वर फक्तच तय्यार आणि चालू इंजिनीरिंग कॉलेज मधेच काम केलं होत, त्यामुळे नवीन कॉलेज स्थापनेचा अनुभव नव्हता. अर्थात काय काय असू शकतं कॉलेज स्थापन करायला ह्याची थोडक्यात माहिती होती आणि हे पक्के माहित होते कि मला भरभक्कम साथ द्यायला सगळीच फलटण तय्यार आहेच. त्यामुळे टाकलं पाऊल / मारली उडी. एक एक नवनवीन पदर / कंगोरे उलगडत / उघडत गेले जसे जसे दिवस सरत गेले तसे. आणि सरते शेवटी उभं ठाकलंच एक नवीन बाळ = नवीन इंजिनीरिंग कॉलेज. अर्थात भली मोठी इमारत आधीच तय्यार होती, तेथील बाकीच्या कॉलेज च्या संपूर्ण लोकांचा पाठिंबा, सहवास आणि मदत तर होतीच. पण एक लक्षात आलं, कधीच कोणीच, उगाचच अनावश्यक माहिती दिली नाही, घाबरवलं तर नाहीच. त्याच वेळी आणि आता देखील मला माझ्या प्रत्यक्ष बाळंतपणाची आठवण झाली. माझी आई, सासूबाई, आणि बाकीच्या अनेक अनुभवी स्त्रिया माझ्या आजूबाजूला होत्याच पण कोणी म्हणजे कोणीच उगाच अनावश्यक माहिती दिली नाही.
अर्थात ह्या वर नमूद केलेल्या दोन्ही उदाहरणात मी स्वतःच स्वतःहून गेले, प्रत्येक नवीन दिवस नवीन / भिन्न / कधी भलतं/ तर काही वेगळंच पण उत्कृष्ट असं काही देऊन गेलं. आणि आता मला बऱ्यापैकी कल्पना आली आहे दोन्ही बाळंतपण म्हणजे काय ते.
अर्थात आताशा गूगल बाबा कडे सगळंच जरी उपलब्ध असलं तरी
१. ज्याला त्यालाच ज्याचं त्याच अनुभवावं लागत आणि जावं लागतं त्या सगळ्या फेझेस मधून, त्याला काही तरणोपाय नाहीच आणि
२. गूगल बाबावर तरी माणसं च लिहिणार ना त्यांचे त्यांचे आलेले अनुभव, आपण तसेच अनुभवू ह्याची काय खात्री बरं ? त्यामुळे संपूर्णपणे एकतर अगदी हवी तशी माहिती तंतोतंत तर गूगल काय कुठलाच बाबा देऊ शकत नाही आणि सरते शेवटी बाळंतपणाच्या त्या काही महिन्यात, त्या वेळी जगावेगळा अनुभव येतोच.
त्यामुळे जास्त "ह्याला विचार त्याला विचार" करण्यापेक्षा उडी मारायची ठरवली ना कि मग पोहुनच निघायचं, ठरवा आणि नेहेमी विजेते व्हा, दर वेळी, मग कुठलेही बाळंतपण का असेना.
शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२
हे-ते आणि बरंच काही
एवढ्यातच माझी एका नवीन जोडप्याशी ओळख झाली. ती दोघे भौतिक शास्त्रात पारंगत आहेत जरी शाखा आणि नजरिया भिन्न आहे तरी. कारण भौतिक शास्त्राचा आवाकाच जगभर, जगाबाहेर आणि इतरस्तर पसरलेला आहे. असंख्य वर्ष त्या क्षेत्रात काम केलं असल्यामुळे ते म्हणतात कसे कि मला जागी स्थळी पाषाणी भौतिक शास्त्रच दिसतं. ते त्यांनी वाक्य म्हणता क्षणी मी पण म्हणाले जागी स्थळी पाषाणी मला फक्त मशीन लर्निंगच दिसतं, दुसरं काहीच नाही. आणि ऑन धिस नोट आमचं भेटणं ठरलं. मज्जा येईल ह्या गपांना असं दिसतंय एकंदरीत.
ह्या वरून आठवलं गेली अनेक वर्ष माझ्या डोक्यात एक विचार स्थानापन्न झाला आहे आणि तो काही केल्या जात नाही आहे. असन्ख, अथक प्रयन्त झाले.
योग ह्या विषयात पारंगत व्यक्तिंना बाकी व्यायाम प्रकार महत्वाचे वाटणार नाहीत कदाचित, तसेच जिम चे एक्सपर्ट फक्त जिमचीच महती गाणार, अगदी तसेच धावण्याचे आहे, चालण्याचे, पोहण्याचे ई. मग नक्की काय करायचं आणि करायचं का? जी मुलं / मुली पहिल्यांदा व्यायाम प्रकार सुरु करणार असतात त्यांची पाटी कोरी असते. त्यामुळे त्यांच्या साठी सगळं अनभिन्य. त्यामुळे जे आवडत ते करा ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. किंबहुना माझ्या अनेक ओळखीचे असे आहेत जे स्पष्ट म्हणतात आम्ही नाही बुवा व्यायाम करणाऱ्यातले अजिबातच, पिंडच नाहीना तो, ई. माझ्या आई वडिलांची पिढी आणि त्या आधीच्या त्या वेळी कोणीच असा खूप व्यायाम केला पण नाही आणि योग / जिम / धावणे / बाकी शर्यती ई. नव्हतं देखील ऐकिवात. दररोज च्या रोजनिशीतच शारीरिक हालचाल होत असे तेवढीच, बाकी स्वतः साठी वेळ काढणे, महागडे कपडे / जोडे आणि बाकी इतर बीन कामाच्या वस्तू विकत घेणे हे सगळं नव्हतंच. मग ते सुदृढ नव्हते, ते सगळेच्या सगळे ८०-८५ च्या पुढे जगले. मग खरंच व्यायाम करणे आवश्यक आहे? घराबाहेरचं जाणे / शोधणे गरजेचे आहे कि मला फिट कसं राहता येईल ते? घरातली कामं पुरेशी नाहीत?
आणि हो जे अगदी जीव ओतून सगळं व्यायाम प्रकार करतात ते फिट असतातच का? हो ते पहाटे घराबाहेर पडतात मग घरी कधी असतात? स्वतः सोबत वेळ व्यतीत करतात मग घरच्यांसोबत कधी, अहो ते सोडा, घरासोबत कधी?
माझ्या दृष्टीने बॅलन्स आनंदाने सांभाळणं अत्यंत महत्वाचं. उगाच व्यायामाबद्दल काही तरी वाचून आहारी जाणं नकोच. मी मागे अनेकदा विविध प्रकारे लिहिल्या प्रमाणे सकाळच्या मोकळ्या हवेत एक फेर फटका पुरेसा. मग जमतील तशी घरची कामं, जमेल ते प्रमाणात खा आणि पचवा, खाली बसा - उठा, प्रकृती सांभाळून सातत्याने व्यग्र ठेवा, धूळ साफ करण्या पासून ते जमतील ती कामे करा, व्यायाम पण होईल आणि घर लखलखीत झाल्यामुळे मनाला उभारी येईल ती वेगळीच, त्यामुळे येणारा उत्साह जास्त देऊन जाईल तुम्हाला.
ईंटरेटिव्ह / इनक्रेमेंटल लर्निंग
मी एक पूर्णवेळ काम करणारी आई असल्यामुळे अनेकदा असं झालंय कि मी घरी असतांना देखील कामं चालूच राहतात ऑफिस ची. ३-४ दा असं झालं कि मी माझ्या संगणकावर काम करत होते, घरी होते, आणि माझ्या लेकीला काही तरी बोलायचं होत, सांगायचं होत किंबहुना शेअर करायचं होतं. एकदा कामात लय लागली कि सोडावीशी वाटत नाही, फक्त केवळ ह्या दृष्टिकोनातून मग मी तिला माझ्या जवळ बसवून घेतलं आणि थोडं थांबण्यास सांगितलं. ती आधीच शहाणी मुलगी, त्यात तिला स्पष्ट दिसत होत माझं काम चाललेलं त्यामुळे ती गप्प बसली आणि तीच निरीक्षण सुरु झालं. अर्थात मी देखील लकीली त्यावेळी माझ्या विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशनच बहुतेक बघत होते, वेळेत माझे मुद्दे त्यांना सांगणे अवश्य होते.
प्रेझेंटेशन बघता बघता खटकलेले मुद्दे मी टिपून ठेवले, सगळं बघून झाल्यावर मी त्या विद्यार्थ्याचं मला आलेलं प्रेझेंटेशन असलेलं मेल उघडलं, हे सगळे मुद्दे त्यात टाकले आणि नकळत माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला दिसलं कि माझी लेक किंचित अस्वस्थ आहे. तिचे हावभाव चटकिनी टिपता आले मला. तिला वाटलं झालं आता आई पाठवते हे मुद्दे बास. पण नाही हो, माझी नेहेमीची सवय थोडीच सोडणार होते मी. मेल लिहायला सुरवात केली मी, आधी ग्रीट केलं वेळेनुसार, त्यांचं नाव टाकलं, धन्यवाद दिले प्रेझेंटेशन तय्यार करून पाठवल्या बद्दल, शिवाय सुंदर झाले आहे दिसायला देखील प्रेझेंटेशन हे पण नमूद केलं, सगळे मुद्दे व्यवस्थित मांडलेत हे देखील प्रकर्षाने सांगितलं आणि मग विनंती केली कि खालील मुद्यांवर काम करावं. आणि नकळत त्या वेळी देखील माझ्या डोळ्यांच्या कड्यांना लेकीच्या चेहेऱ्यावरचे बदलेले हावभाव टिपता आले, फार समाधानी वाटलं.
सर्वप्रथम मी तिला ह्यात सामील करून घेतलं, तिला दिसलं मी कसं छोटं का होईना पण काम प्रत्यक्ष करते कसं आणि फक्त रागवायचं नाही किंवा चुका च दाखवायच्या नाहीत हे देखील स्पष्ट झालं. एका दगडात अनेक... आणि हो आईच काम संपेस्तोवर शांत पणे एका जागी बसून राहायला पण शिकवलं. चांगलं काम / चांगल्या पद्धतीने केलेलं काम महत्वाचं असतं, स्वतःला आणि दुसऱ्यांना समाधान देऊन जाणारं असत हे पुन्हा एकदा समजलं. माझ्या दृष्टीने ह्यालाच ईंटरेटिव्ह / इनक्रेमेंटल लर्निंग म्हणतात.
मचाण अक्का स्कॅफोल्डिंग्ज
मी स्वतः स्थापत्य अभियंता नाही, पण माझे वडिल होते. त्यांनीच मला ह्या शब्दाची ओळख करून दिली होती, अनेक दा अनेक प्रकारचे स्कॅफोल्डिंग्ज दाखवले होते, त्याच्या बद्दल खूप भरभरून सांगितलं देखील होत. स्कॅफोल्डिंग्ज उभे कसे करतात, का करतात, काय बघायचं असतं उभं करतांना, किती मोठे असावेत, कुठल्या कामा करता ई. आणि बरेच काही, जसं त्यांना सुचेल तसं आणि आम्हाला जाता येता रस्त्यावर दिसेल तसं. ते इथेच थांबले नाहीत तर नकळत स्कॅफोल्डिंग्ज आणि आयुष्य उभं करणं ह्यातलं साम्य हळुवारपणे उलगडून पण सांगत असतं, लादलं नाही काहीच कधी त्यांनी.
आधी फक्त लाकडाचे मचाण असे, मग हळू हळू लोखंडाचा वापर सुरु झाला आणि अर्थातच स्मार्ट पणाकडे वाटचाल झाली. इतकी वर्ष बाबांनी अनेक गोष्टी सांगितल्यामुळे माझं लक्ष जातंच काही तरी नवीन टिपलं जातंच. माझ्या घराच्या मागे काल पासून एका एका बांधकामावर बाहेरून प्लास्टरिंग करण्यासाठी असेल कदाचित स्कॅफोल्डिंग्ज उभारण्याचं काम जोमात सुरु केलंय. स्कॅफोल्डिंग्ज हे डोमेन इतकं वृद्धिगत झालयं तरी देखील आमच्या मागच्या बिल्डिंग मध्ये बाबा आदमच्या जमान्यातील पद्धतीनेच काम सुरु आहे. अगदी अप्रतिम भल्या मोठ्या, सुबक दिसणाऱ्या आणि मजबूत सिमेंट च्या विटांनी अक्खी बिल्डिंग उभी राहिली आहे. फक्त खिडक्या दरवाजे, प्लास्टरिंग आणि रंग राहिला आहे. आता त्या भक्कम बांधलेल्या भिंतींना / विटांना भगदाड पाडणं सुरु केलंय त्यात लाकडी बांबू/ तत्सम गोष्ट पक्की बसून एकावर एक मनोरा उभारता येईल. फार विचित्र दिसतंय ते. ओरिजिनल फॅक्टरीत तय्यार झालेल्या आणि भिंत उभी झाल्यावर त्या विटांना भगदाड पडल्यावर त्याचा परिणाम काहीच होणार नाही का, गळेल का काही वर्षांनी, ती भोक बुजवली तरी पुन्हा ओरिजिनल सारखी नाही होणार, बीम वरच भर असतो का विटांवर पण? असे अनेक प्रश्न पडलेत मला. शिवाय भोकं पडायला वेळ, मेहेनत, पैसे, कष्ट आणि मग बुजवायला पण, कशासाठी? आमच्या सारख्या आजूबाजूला राहणाऱ्यांना ठोकाठोकी / छन्नी हातोड्याचा आवाज तो वेगळाच. ह्याच खर्चात जर बाहेरून पट्टाकिनी उभे राहणारे स्कॅफोल्डिंग्ज का नाही आणले? माझ्या मनात वेगळंच स्कॅफोल्डिंग्ज उभं राहिलंय ह्या सगळ्या प्रश्नांचं. माझा जरी काही संबंध नसला तरी देखील एवढं समजतंय जर तो बिल्डर हुशार आहे आणि सिमेंट च्या भल्या मोठ्या विटा, रेडी मिक्स सिमेंट ई. वापरतोय तर ह्यात कंजुषी का? व्हायचं तर संपूर्ण अत्याधुनिक व्हा, अर्ध्या हळकुंडाने पिवळं नक्को.
अग्नीरोधक
मी अनेक वर्ष सातत्याने बहुतांशी प्रत्येक व्यावसायिक जागी अग्नीरोधक बघितला आहे. पण त्याचं अस्तित्व कधीच जाणवलं नाही, कारण कदाचित तो सर्वत्र आहे / होता, जागी स्थळी पाषाणी... छोट्या मोठ्या प्रमाणात आणि विविधतेने नटलेला अग्नीरोधक. का कुणास ठाऊक पण सहज माझं लक्ष गेलं दोन स्क्रू / पेच असलेल्या खिळ्यावर / खिळ्याच्या आधारावर तो अग्नीरोधक विराजमान झालेला, अगदी सहज. म्हटलं काय, इतकं वजनदार व्यक्तिमत्व आणि फक्त दोन खिळे, हे कसं शक्य आहे. आधी म्हंटल्या प्रमाणे त्या कडे सहजी कोणाचंच लक्ष नसतं त्यामुळे जाता येता त्याला टपल्या बसत असणारच, धक्के खावे लागत असणार पण हा पठ्ठा स्तब्ध / स्थिर आणि न डळमळता उभा राहणार असा. "मी आहे, काळजी नसावी" अश्या काहीश्या अवतारात उभं राहणं म्हणजे अप्रूपच. त्या खिळ्यांची आणि अग्नीरोधक ची पण कमाल. असं स्थिर उभं राहणं, प्रतिबंधात्मक, निवारक ... असणे, अस्तित्व असून नसणे, न दाखवणे अहाहा, कित्ती कित्ती शिकण्या सारखं आहे अग्निरोधका कडून, जबरदस्त च. अग्निरोधक, त्याला उभं ठेवणारे खिळे आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रिया / कार्यपद्धतीतून जर कण भर शिकता आलं तर दृष्टीकोन, प्रत्येक दिवस आणि माणूस बदलेल हे नक्कीच. चला तर मग बघा चिंकीत / किंचित अंगीकारूया ....
तो शांतपणे, चुपचाप भिंतीवर टांगलेला असतो जसा कि एक उत्कृष्ट साथीदार, आग लागलीच तर विझवण्यासाठी खंबीर पणे साथ देणारा. तसंच आपण पण कोणा ना कोणासाठी आग (कुठल्याही प्रकारची हो) लागलीच तर विझवू या, उभं राहुयात सतत अगदी दोन खिळ्यांवर, अगदी छोट्याश्या ओळखीवर / मैत्रीच्या धाग्यावर / नात्याच्या पटलावर माणूस माणसाचा अग्निरोधक बनून. किंबहुना हा मानवरूपी अग्निरोधक तर शमन करण्यापेक्षा प्रतिबंधक म्हणून जास्त योग्य. चला तर मग आज पासून जमेल तेव्हा आणि जमेल त्या व्यक्तीला गारव्याची अनुभूती देऊयात म्हणजेच स्वतः देखील तसेच जगता येईल.
स्वछंद
का कोणास ठाऊक पण कदाचित सतत माझ्या आजूबाजूला तरुण पिढीचा घेराव असतो म्हणून माझ्या डोक्यात हा विषय घोळतोय सतत. माझ्या लहानपणीपासून सतत एकाच घोषवाक्य असल्यासारखं मी ऐकलं आहे, बघितलं आहे आणि अनुभवलं देखील आहे कि प्रत्येक मुलगी हि बहुतांशी तिचे केस हे घट्ट बांधणारच, कुठेही असली तरी. काही अंशी पण फारच कमी प्रमाणात मुली सोडत असतं केस पण नाहीच. आणि आत्ताच्या काळात तर कोणी म्हणजे कोणीच केस बांधत नाहीच, सदा न कदा मोकळेच, मग ते लहान असो व मोठे, शोभणारे असो व नसो, वयोमर्यादा पण नाहीच, सगळ्यांचेच केस गळ्यात. अशी जिद्द का? काय मिळत असावं सातत्याने केस मोकळे सोडून? हि फॅशन का अवडंबर का सोय का तरुण दिसायची धडपड? आणि जगी स्थळी पाषाणी दृष्टीस इतक्यांदा पडलं कि .....
गेले कित्येक वर्ष घरच्या सातत्याने होणाऱ्या पूजा अर्चा, व्रत वैकलय, पंक्ती, ब्राह्मण भोजन ई. थांबल्यामुळे ह्या बदलत्या हवेला जास्त खत पाणी मिळालं का? मला तरी हे एक महत्वाचं कारण वाटतंय, पाश्चात्यांच अनुकरण आहेच. धार्मिक वातावरणात आणि अर्थात जर ते सर्वत्र असेल तर च, गुरुजीच नाही तर सगळेच केस बांधण्याचे सल्ले देतातच, किंबहुना केस बांधले नाहीत तर इतक्या मोठ्या प्रमाणातली काम कशी करता येणार, पंक्ती वाढतांना पण गैरसोय होणार, आणि अशी अनेक कारणे आहेत.
बांधूनच ठेवा केस नेहेमी हा माझा अट्टाहास नाहीच, विविध केशरचना करा, प्रसंगानुसार, वयानुसार, पोशाखानुसार ई. आणि एकदा आरसा बघा आणि मग ठरावा. "आपण करू ती फॅशन" हेच खरं असलं तरी बरेचदा मोठ्या मोकळ्या केसांचा धोखा जास्त उपयोगा पेक्षा. खरंच योग्य कारण असेल तर नक्की सोडा मोकळे आणि राहा की स्वछंद, पण उठ सुठ नको. हजारो प्रकारच्या पिना, फुलं आणि अनेकविध गोष्टी उपलब्ध आहेत बाजारात, त्या पण वापरा म्हणजे स्वतःला आणि बघणाऱ्याला देखील विविधता अनुभवता येईल, रोज तेच गळ्यातले केस बघण्यापेक्षा. अनेक शास्त्रद्यांनी ह्या वर सखोल अभ्यासाअंती असा निर्णय दिलाय कि बहुतांशी केसांचं आयुष्य, पोत आणि एकंदरीत रया जाते जर सातत्याने मोकळे सोडले तर, त्यांना सगळ्याच प्रकारची सवय ठेवा. त्यामुळे प्रॅक्टिकली स्वछंद राहणं म्हणजे विविध केशरचना करण्यात आनंद मानणं.
गुरुवार, १३ जानेवारी, २०२२
आच्छादन
आच्छादन म्हणजे झाकण्यास योग्य, किंवा काहीतरी झाकण्यासाठी वापरलेले असे. माझी मुलं लहान होती तेव्हा मी एक दिवस छानसे डोक्याला बांधायचे रुमाल विकत घेतले, तीन विकत आणले कारण दोन त्यांना आणि एक मला. कारण? सांगते, थांबा. सर्वात महत्वाचं म्हणजे एक निळा आणि दोन तपकिरी किंवा चॉकलेटी अश्या रंगांचे आणले. मला कुठलाही रंग चालतो पण त्या दोघांना जरा वेगळा म्हणून, पण अर्थातच एकाच डिझाईनचे, भांडण नको, नाही का. त्यावेळी एक तर बहुतांशी आम्ही तिघेच जात असू इकडे तिकडे, वाढदिवस पार्टी, खरेदी, संध्याकाळी बगीचा आणि असे अनेक प्रसंग. आणि एवढी मोठी घरी अंगणात गाडी उभी असतांना ह्या दोघांनाही ऑटो तूनच जायचं असायचं. त्या दोघांना ते मोकळं बसणं, हवा, बाहेर च दिसणं, हात दाखवून ऑटो थांबवणं, मी मध्ये आणि माझ्या आजूबाजूला पाय लटकवत बसणं हे सगळं फार फार मनापासून आवडायचं. पण त्या उघड्या ऑटोत कानाला / मानेला वारा लागला कि सर्दी / पडसं व्हायला नक्को म्ह्णून हे रुमाल आणले होते तिघांसाठी. मुलं लहान होती, अभ्यास वाढला नव्हता, माझ्या हातात होती तो वर काय ते रुमाल वापरण्यात आले. शिंग फुटली आणि ते बापडे रुमाल माझ्या कपाटाचे धन झाले. मी पण अगदी आवडीने उपयोगात आणते, जेव्हा लागतील तेव्हा.
दूर च्या प्रवासाला जातांना हेच मोठ्या आकाराचे रुमाल असल्यामुळे ऊन लागू नये म्ह्णून आमच्या कारची खिडकी झाकायला मी नेहेमी त्यांचा उपयोग दिला आहे.
एवढ्यातच जेव्हा मी नागपूरला गेले होते काही महिने बदली म्हणून तेव्हा आवर्जून घाई असतांना देखील आठवणीने मी त्यातले दोन रुमाल ठेवून घेतले सोबत. म्हटलं नक्की उपयोगी ठरतील. कारण तेथे माझी गाडी नव्हती माझ्या दिमतीला, त्यामुळे बरेचदा टॅक्सितून जा ये करतांना, किंवा दुचाकी वर जाता येतांना, किंवा अजून कधी लागलं तर असावं म्हणून. एकदा मी माझ्या जुन्या शेजारच्या काकूंकडे गेले होते भेटायला, गप्पा मारायला, जेवायला आणि संध्याकाळी माझं माझी एक सख्खी मैत्रीण हिच्या सोबत भटकणं ठरलं होत. मैत्रिणीची दुचाकी आहे, ती आली मला घ्यायला आणि त्या आधीच मी जय्यत तय्यारी म्हणून रुमाल काढला माझ्या ब्यागेतून आणि गळ्याभोवती ठेवला पटकीनी बांधता येईल म्हणून. ते बघून काकू अवाक, म्हटल्या काय ग हे? अहो म्हटलं दुचाकी वर बसून जाताना वारा लागणारच ना, म्हणून येतानाच घेऊन आले होते, त्यांना विशेष कौतुक वाटलं जरी हि फार छोटीशी गोष्ट होती तरी. आज कपाट, माझी बॅग, आणि इतर गोष्टी आवरताना ते रुमाल दृष्टीस पडले आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी बद्दल मांडावस वाटलं.
खूप वर्ष त्या रुमालांनी एक मायेचं, प्रेमाचं, उबदार आणि आवश्यक असं आच्छादन उपलब्ध करून दिल, खूप गोड दिसायची माझी पिल्लं ते रुमाल बांधून, इनोसंट. आणि आता एका त्या मऊ रुमाला ऐवजी टोपी / हूड, शिवाय हॅन्ड्सफ्री ब्लू टूथ, रंगबिरंगी फक्त फॅशन पुरते स्कार्फ, नाही तर बहुतांशी काहीच नाही अशी भटकंती सुरु असते. नाजूक अवयव जपा म्हणजे मिळवलं मग आच्छादन कुठलंका असेना. हरकत नाही, जगासोबत चालणं अत्यावश्यक आहेच पण काळजीपूर्वक.
बुधवार, १२ जानेवारी, २०२२
प्रसादाचे काही किस्से
"प्रसाद हा मज द्यावा देवा...." हि प्रार्थना भजन, आरती, मंत्रपुष्पांजली झाली कि म्हणत असत आणि त्यावेळी आम्हा मुलांचा आवाज शेवटची प्रार्थना असली तरी खणखणीत असायचा, कारण त्या नंतर हातात खूप वेळ वाट बघितलेला प्रसाद मिळणार असायचा. त्यामुळे अगदी लहानपणी पासून ह्या शब्दाशी माझी एक वेगळीच नाळ जुळली आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर असंख्य वेळा हा शब्द ऐकिवात, उच्चारण्यात आणि वापरण्यात आला इतक्या वर्षात. काल माझ्या एका मैत्रिणीने जी आज फारच मोठी दिग्गज मेडिकल डॉक्टर आहे तिने विचारला आणि मला जरा शब्द पेरावे असे वाटले. तर त्याच असं झालं, कि आज अनेक वर्ष एकाच संस्थेत काम केल्यामुळे असेल किंवा काळजी, पण ह्या इतक्यात नव्याने सुरु झालेल्या माझ्या १४ दिवसांच्या वनवासात मला दररोज माझ्या विश्वविद्यालयाच्या हॉस्पिटल मधून फोन येतो आणि पोटतिडकीने चौकशी होते. त्यात ह्या माझ्या मैत्रिणीला जेव्हा समजलं तेव्हा म्हणते कशी "काय कुठून मिळाला प्रसाद?".
प्रसाद म्हणजे देवाला दाखवलेला नैवेद्य, "त्याचा" प्रसाद / आशीर्वाद, प्र-साद म्हणजे पुन्हा एकदा साद घालणे, साद आल्यावर प्रतिसाद देणे, प्रेमाची साद, कुणी दिलेला / पदरात टाकलेला असा ई. असे अनेक अर्थ होऊ शकतात. मला तर सगळेच भावलेत.
ह्या नवीन दुखण्याबद्दल वैविध्य माध्यमातून इतकं ऐकलं होत, वाचलं होत आणि अंगावर शहारा आणेल असेच जग संपूर्ण ढवळून निघालं होत, तब्बल २ एक वर्ष. पण त्यातून जे सावरले त्यांच्यावर असलेला आशीर्वाद प्रकर्षाने जाणवला, त्यांनी जसा त्या रोगाला जबरदस्त प्रतिसाद दिला ते लक्षात आलं, किंबहुना त्यांना प्रतिसाद देण्यासाठी लागणारी ताकद मिळाली, स्थिरता प्राप्त झाली हे हि नसे थोडके. स्थिरता आणि इच्छाशक्ती नसेल तर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. पदरात पडल्यावर त्याला ताकदीने तोंड देणे आवश्यक नाही का? पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, साधनेची जोड, दृढ विश्वास आणि अर्थात "त्याची" इच्छा परम आवश्यक असते.
अजून एक प्रसादाचाच भाग म्हणजे अनपेक्षित लोकांकडून केलेली विचारपूस ती देखील सातत्याने, विविधतेने आणि मनापासून जे त्यांच्या बोलण्यात, शब्दात, उच्चारात सहज लक्षात येते. ज्यांना माहिती आहे त्यांनी विचारपूस करावीच असं कुठे लिहून ठेवलंय, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना? कदाचित त्यांनी हा विचार केला असेल कि कशाला उगाच त्रास द्यायचा, आराम करू द्या, पुन्हा पुन्हा तेच काय विचारायचं, किंवा ते मनातल्या मनात प्रार्थना करण्यावर भर देत असतील शब्दांवर नाही, एकासाठी नाही तर सगळ्या अख्खा जगासाठी प्रार्थना असेल ती, असो. कित्ती सखोल विचार आहेत नाही? माझ्या दृष्टीने हा पण एक प्रासादिक अनुभवच नाही का? दोन्ही प्रकारच्या लोकांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. कारण एकांकडून काय करावं हे शिकायला मिळतंय आणि दुसऱ्याकडून काय नाही ते, पण शिकणं चालूच आहे.
एक अतिदिग्गज व्यक्तिमत्व आहे, त्यांचे भाषण ४ महिन्यांपूर्वी ठरले होते, कारण त्यांच्या तारखा इतक्या लवकर घ्याव्या लागतातच. आणि जेथे त्या बोलणार होत्या तो पण कार्यक्रम फारच मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे सगळं खूप आधी ठरवलं गेलं. भाषणाच्या अगदी आदल्या रात्री खूप उशिरा रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते त्यांचे. त्या इतक्या दिग्गज आहेत कि सहज कार्यक्रम स्थगित करा असं सांगता आलं असतं त्यांना पण नाही, संपूर्ण ठरलेला वेळ त्या अस्खलित बोलल्या. प्रसाद नाही तर अजून काय हे? त्यामुळे अश्या आठवणी ना महत्व द्यावं आणि पुढे मार्गक्रमण करत राहावं.
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२
"त्याचे" प्लँनिंग
माझी पिल्ल अगदी लहान होती तेव्हा पासून आमच्या कडे एक मावशी आहेत कामाला, मुलांना आणि घर सांभाळायला, ते मुलं ११ वीत होती तोवर त्या आमच्या कडे होत्या / टिकल्या म्हणायला हरकत नाही. त्यांनतर नवीन दिवसांमुळे (न्यू नॉर्मल डेज) मुळे मावशींना घरी बसावं लागलं. पण असो आता पुन्हा त्या काम सुरु करतील, लवकरच. मी गेले ५ महिने बदली मुळे बाहेरगावी राहते आहे आणि त्यामुळे असेल कदाचित पण माझ्या खोलीतल्या कपड्याचे कपाटाला अगदी अवकळा आली होती. मी डिसेंबर मधे सुट्टी ला आले तर सगळी व्यवस्था लावली. त्यामुळे पुन्हा एकदा मीच माझ्या कपाटाच्या प्रेमात पडले, ते रंगबिरंगी दृश्य वाखाणण्याजोगं च होत. कपाट साफ करता करता मला काही माझे ड्रेसेस व्यवस्थित इस्त्री केलेले आढळले आणि बाकीचे बिना इस्त्रीचे. बिना इस्त्रीची संख्या भरपूर असल्यामुळे मी मावशींना ताबडतोब फोन लावला. म्हटलं या ह्या शनिवार रविवारी आणि मला थोडी इस्त्री करायला मदत करा, म्हणजे कपाट अजून छान, शिस्तीत दिसेल आणि जागा व्यापली जाणार नाही उगाचच. त्या पण हो म्हणाल्या जसे कि त्या एका पायावर उभ्या होत्या माझ्या कडे कुठलेही काम करण्यासाठी. आणि एकदा का ह्या आमच्या मावशींना काम सांगितलं कि त्या फारच जीव घेतात, जमेल तेवढं पट्टाकिनी काम संपवायचं बघतातच. पण ह्यावेळी डिसेंबर अख्खा संपला, जानेवारी अर्धा पण ह्या मावशींनी काही मला तसूभर विचारलं नाही कि कधी येऊ, इस्त्री कधी करायची ई. मला राहून राहून आश्चर्य वाटतं राहील. म्हटलं असो. सध्याच्या माझ्या १४ दिवसांच्या वनवासाचा भाग म्हणून मग मीच स्वतःला रमवण्यासाठी, ऑफिस च्या कामाव्यतिरिक्त आणि लिहिण्या व्यतिरिक्त २-३ ड्रेस घेतले स्वतःच इस्त्री करायला. हे "त्याचं" प्लांनिंग होत तर?. गोष्ट अगदी नकटी आहे, पण बरेच काही शिकवून जाणारी. तो प्रत्येक ड्रेस जो आज मी इस्त्री करते आहे त्याच्या वरून हात फिरवतांना मला तो कधी घेतला, का घेतला, आणि बाकी काही आठवणी जाग्या झाल्या, खूप खूप वेगळं वाटतंय जे अव्यक्त आहे. इस्त्री करण्यासारखी छोटीशी गोष्ट पण इतकी वेगळी भासू शकते हे मला आज उमगलं. थंडीच्या दिवसात गरम स्पर्श, आठवणी, कपाटाची वाढलेली शोभा आणि हातात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग, फायदेच फायदे नाही का?.
त्यामुळे मंडळी "त्याच्या" प्लांनिंग कडे लक्ष असू द्या, उतावळे होऊ नका, जे जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार, "श्रद्धा आणि सबुरी" च रामबाण इलाज आणि इकच मंत्र सुखी आणि यशश्वी होण्याचा.
आमूलाग्र बदल
"Paradigm Shift akka प्याराडिम शिफ्ट" ह्या छोट्याश्या विषयाला आज एका विशिष्ट्य कोनाने हात घालायचा विचार आहे माझा. कुठलीही तुलना न करता हे बदल मी येथे दर्शवणार आहे. हे बदल कदाचित गरजेचे होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकून राहण्यासाठी, व्यावसायिकांची गरज म्हणून, बदलेल्या अपेक्षा आणि परिस्थिती म्हणून किंवा अजून काही.
मी जेव्हा तांत्रिक शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होते तेव्हा आम्हाला वार्षिक पद्धत होती, म्हणजे संपूर्ण वर्ष महाविद्यालयात जायचं, शिकायचं, अभ्यास करायचा, भरपूर मस्ती करायची आणि सरते शेवटी / वर्षाच्या शेवटी भरपूर अभ्यास करून परीक्षा द्यायची, इतकंच, बास. एकदा परीक्षा झाली कि मग मस्त सुट्ट्या, लांबलचक, दुसरे सत्र सुरु व्हायच्या आधी.
मग मी जेव्हा शिक्षिका म्हणून तांत्रिकी महाविद्यालयात काम करायला सुरवात केली काही वर्षांनी तेव्हा अर्धवर्ष ची सुरवात झाली. एक सत्र सहा महिने चालायचं, वर्षातून दोन परीक्षा आणि दोन सुट्ट्या देखील. ते आज तागायत सुरु आहेच बऱ्याच ठिकाणी.
मग माझं अमेरिकेत जाणं झालं आणि तेथे मला तिमाही अनुभवयाला मिळाली. पण मला अमेरिकेत प्रवेश मिळाला, उत्कृष्ट अध्यापकांकडून शिकायची सुवर्ण संधी मिळाली हे बघितल्यावर तिमाही हा नवीन प्रकार फारच उत्साहाने अंगी बाणवला मी, नकळत, सहज. अर्थात तेथील वातावरणच इतकं भव्यदिव्य होत, वेगळं होत, उत्साही होत, आणि नवीन होत कि सगळं सहज पार पडलं.
आता आली माझ्या लेकीच्या प्रवेशाची वेळ. बरेचसे महाविद्यालय आहेत पण सरतेशेवटी जे आम्ही ठरवलं त्यात तिमाही हि पद्धत होती. त्या महाविद्यालयात माझ्या ओळखीचे अनेक प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांचं हेच म्हणणं पडलं कि तिमाही हि पद्धत अवघड जाते, सतत प्रत्येक ३-४ महिन्यांनी परीक्षा येते, सुट्ट्या मिळत नाही पोटभर ई. पण केवळ बरेच अभियांत्रिकी विद्यार्थी स्नातकोत्तर शिक्षणासाठी बाहेरील देशात जाऊ इच्छितात म्हणून हा बदल घडवून आणला आहे.
मग मी माझ्या मुलीशी संवाद साधला तर म्हणते कशी, "मम्मा तू वार्षिक पद्धतीने शिकलीस, अर्धवर्ष पद्धतीत शिकवते आहेस, थोडा काळ तिमाही अनुभवलंस म्हणून तुला तुलना करता येते आहे. बरोबर? माझ्या साठी हे सगळंच नवीन आहे, मग वार्षिक काय, द्विवार्षिक काय आणि तिमाही काय? मी काहीच अनुभवलं नाही तर मग मला कुठेच अडचण येणार नाही कारण डोक्यात कुठलेही आधीचे तुलनात्मक मुद्दे / अनुभव / विचार / शंका ई. नाहीतच ना? तिमाही तर तिमाही, सगळे विद्यार्थी जसं करणार तसेच मी पण आणि पहिल्यांदाच. आणि कुठे लिहिलं आहे कि ह्या पद्धतीत अभ्यास कमी असतो / जास्त असतो, सुट्ट्या नाही तर नाही, शनिवार रविवार आहेच, शिवाय प्रवेश अभ्यास करण्यासाठी काही घडवून दाखवण्यासाठी घेत आहोत, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी नाही ना?'. मला हा स्पष्टव्यक्तेपणा भावाला आणि हि पिढी कित्ती वेगळी आणि विचार करणारी आहे हे प्रकर्षाने जाणवलं. हो, फक्त माझी लेकचं नाही तिचे बहुतांशी सगळेच मित्र मैत्रिणी अश्याच आढळल्या मला आणि हायसं वाटलं, अभिमान वाटला.
आहे ते, आहे तस्स स्विकारा, सहज, नेहेमी आणि त्या कडे संधी म्हणून बघा, कुठलेही क्षेत्र, कुठलाही प्रकार सोप्पा नाहीच, आव्हानात्मक आहेच, पुढे चला, संपूर्ण ऊर्जा त्यातनं साजिरं गोजीरं काहीतरी भन्नाट करण्यासाठी खर्च करा.
जरा विसावू या वळणावर
माझ्या हातून ह्या ज्या अनुकथा लिहिल्या जातात ना त्या मला अनेकदा अनेक जण विचारतात, "कसं काय लिहिता तुम्ही? विषय कुठून मिळतात?" ई. आणि अनेक प्रश्न. पण ह्या सगळ्यांचं एकाच उत्तर माझ्या समोर उभे ठाकतात विषय. आज काही व्हिडीओ बघतांना इतके सुंदर वाक्य वाचले "एकाकीपणा आणि एकांत" ह्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे, आणि फारच कोवळी पिटुकली रेष देखील, अर्थात मी हे एका व्यक्ती बद्दलच बोलते आहे, ना कि दोन.
गेले दोन दिवस मला माझा एकांत अनुभवयाला मिळतो आहे. मी माझ्या खोलीत, जमेल तसं थोडक्यात काम करते आहे, रोजनिशी चालू आहे, प्रचंड आराम, जमेल तेवढा व्यायाम, जप, ध्यान ई. मी मला शोधण्याचा, चाचपडण्याचा प्रयन्त करते आहे. आयत मिळालेलं ऐटीत फस्त करते आहे, विविध विषय लिहिण्यासारखे आहेत हे नक्की करते आहे, गप्पा / चॅट, भरपूर सिरिअल्स बघणं ई. पण अर्थातच चालू आहे. ह्या आधी पण एक्का दुक्का प्रसंग आलेत विसावण्याचे, पण आत्ताचा विशेष ठरेल ह्या शंकाच नाही, दिशा दाखवणारा असा. कदाचित विसाव्याचे क्षण त्या करताच लाभलेत कि काय कुणास ठाऊक.
एकुलती एक लेक, पण माझ्या आईचा नेम, "पैसे कमावणं किती आव्हानात्मक असतं हे बघा". असं म्हटलं आणि सहज माझी दहावी झाली कि मी शिकवण्या घ्यायला सुरवात केली. त्यानंतर ती जी गाडी सुरु झाली शिक्षण क्षेत्रात ती आज तागायत खाच, खळगे, खड्डे, वळणं, चढ उतार सगळं अनुभवत सुरु राहिले. माझ्या जमान्यात हे सगळं करत असतांना शिवाय स्वयंपाक, घरातील कामे, विणकाम / भरतकाम, गाणं, आणि मित्रपरिवार असणं, नाती टिकवण्याची कला देखील अनिवार्य होतंच. १९८८ साली १० वी झाले आणि घौड दौड सुरु झाली. अनेक वेळा नकळत निसर्गाने खुणावलं कि विसावा हो आता थोड्या वेळ, पण ते ऊर्जेचं वय, धडाडी गाठायची इच्छा आणि बरीच कारणं त्यामुळे त्या इशाऱ्यांकडे काना डोळा केला आणि म्हणूनच आज अजून एक प्रेममय विसावा जबरदस्ती माझ्या पुढ्यात मांडला आहे. ह्या माझ्या, माझ्या सोबतच्या १५ दिवसात बघुयात काय घडतं आणि काय उपरती येते, काय दिशा मिळते / स्पष्ट दिसते / होते ते. माझे सगळे अँटेने शाबूत आणि चालू राहायला हवेत आणि टिपून त्यावर सहज मार्गक्रमणा करता येईल हि आशिर्वादात्मक खात्री, नाही तर मी पण अशी १५ दिवस फक्त माझ्या साठी सुट्टी घेतली नसती, कुणी (ऑफिस किंवा घरच्यांनी) दिली नसती आणि शेवट पर्यंत मग मला विसावा मिळालाच नाही असं मनात येत कदाचित दोष देत राहिले असते मी. माझ्यासारखी भाग्यवान मीच, घरी, १५ दिवस एकटी आणि संपूर्ण स्वात्यंत्र हवा तस्सा वेळ घालवण्याचं, अहाहा, अजून काय हवंय.
तर मंडळी असे विसाव्याचे क्षण टिपा, बरेच येतात, खुणावतात, स्वतः सोबत राहून तर बघा, नव्याने ओळख पटल्याशिवाय राहणार नाहीच.
https://open.spotify.com/album/10356wAvquhSfJm6oHFDzB
https://gaana.com/song/jara-visavu-ya-valnavar-1
माहेरची साडी
माझ्या आई, आजी, मामी ई. कडून मी बरेचदा ऐकलं आहे कि जुन्या काळी दिवस फार वेगळे होते. एखाद्या व्यक्ती कडे अंगावर एक, दांडीवर एक आणि कपाटात एक असे तीन वस्त्र असले म्हणजे तो श्रीमंत. पहा त्यावेळची श्रीमंतीची परिभाषा, किंवा एक पेहेलू. अर्थात सर्वत्र असचं वातावरण होत त्यामुळे त्याच त्याकाळी काही वाटायचं नाही. शिवाय मुली / स्त्रीवर्ग हा फक्त चूल-मूल ह्या परिघात राहत असे आवडीने. त्यामुळे त्यांना कोणीतरी साडी चोळी आणि इतर गोष्टी घेऊन दिल्या तरच मिळत असतं. त्यांच्या कडे पैश्याच स्वातंत्र नव्हतंच किंबहुना त्याची आवश्यकता पण नव्हती. ठराविक वेळी वर्षातून दोन-तीन दाच नवीन गोष्टी भेट म्हणून मिळत असतं. सासुरवाशिणीला तर त्यामुळे भाऊबीजेला मिळालेली साडी म्हणजे जसं कि स्वर्गच, सोन्याहून पिवळे, अजून बरेच काही. अर्थात सासरकडचे देखील घेत असतील, पण माहेरहून आलेल्याला कणभर जास्त महत्व. भेट देणे म्हणजे त्या व्यक्ती बद्दल विचार करणे, त्या व्यक्तीला काय आवडेल काय नाही, काय छान दिसेल काय नाही, मग दुकान गाठून अनेकविध वस्तू बघून मग एक मनात भरलेली वस्तू निवडून ती त्या व्यक्तीला सुपूर्त करणे म्हणजेच भेट होय. हि संपूर्ण प्रक्रिया म्हणजे भेट, आणि ती जास्त प्रेमपूर्वक घडलेली, ओतप्रोत प्रेमाने भरलेली अशी हो. आजही काहीही असो, कितीही प्रकारचे विविध ड्रेस उपलब्ध असो साडीला तोड नाहीच. होय कि नाही हो मंडळी?
अगदी तस्सेच माझ्या सध्याच्या पाच महिन्यांच्या नागपूरच्या वास्तव्यात घडले. मला अनेक मंडळींनी अतिशय उत्तम मदत केली, साथ दिलीच, पण माझी खास एक शेजारी होती हो डॉ. नंदिनी. येता जाता अनेक वेळा तिनेच नव्हे तर तिच्या स्टाफ ने देखील मला हलकं व्हायला मदत केली, पोटभर हसले माझ्या सोबत, वेळ दिला, माझ्या असंख्य आणि उगाच बडबडींना प्रतिसाद दिला. तिने सातत्याने आपुलकीने माझी चौकशी केली, खाऊ घातलं, मला बसायला दिलेल्या खोलीचं उत्कृष्ट सुगंधी वातावरणात रूपांतर केलं अगदी अनेक वेळा, आणि चपराक प्रसंगांच्या दिवशी. अहाहा. "काय वर्णू तव गुण, अल्पमती नारायण". गाडी ची चक्कर, बडबड, सेंडॉफ ची पार्टी आणि साग्रसंगीत भेट देखील. साडी, कुंकवाचा करंडा, गजरा, नवीन फॅशन ची म्याचिंग बांगडी, आणि शिवाय माझ्या लेकीसाठी भेटी. मी अगदी निःशब्दच झाले. ह्या २०२२ मध्ये देखील मला पुन्हा एकदा माझ्या माहेरच्या साडीच महत्व पटलं, समजलं, उमगलं आणि हो मी तसं त्यांच्या साठी खरंच काही म्हणजे काही केलं नाहीच, कारण मीच त्यांच्याकडे पाहुणी होते, आणि मला कामाच्या रगाड्यात वेळ देखील नव्हता. तरीदेखील भरभरून भेटी अनेक स्वरूपाच्या कायमची घेऊन आले मी परत पुण्यात आणि त्या नेहेमीकरता टिकतील ह्यात शंकाच नाही, प्रत्यक्षात आणि मनात देखील. माझ्या मुलींसाठी हे किती नवीन शिकण्यासारखं आहे, आणि तिला इतकं त्याच अप्रूप वाटलं कि ती म्हणाली मला "मम्मा, मी त्यांना आणि त्या मला ओळखत नसतांना गिफ्ट्स, आणि त्या इतक्या उपयोगी आणि सुंदर, मान गये, तुमच्या जेन कडून आणि नागपूरकरांकडून खूप म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे".
रविवार, ९ जानेवारी, २०२२
अनोखा जगावेगळा बदल
तर हि सत्यकथा आहे मनस्वीची, हो माझी खास म्हणजे खास मैत्रीण, फारच जवळची, फार प्रिय आणि अर्थातच तिच्या परवानगीने च हि अनुकथा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. फारच न कळत्या वयापासून आम्ही एकत्र, असंख्य मुलामुलींच्या गराड्यात, कारण? दोघींचे बडबडे स्वभाव. मग काय त्या पिढी प्रमाणे शिस्तीत आम्ही एक एक पायऱ्या चढत गेलो आणि मग वेगळ्या झालो ते कायमच्या, तीच लग्न झालं, ती दूर देशी निघून गेली, कायमची. त्या वेळी सोशल मेडिया च जाळं निर्माण झालं नव्हतं आणि पसरलं देखील नव्हतं. पण अर्थात एवढ्यातच आम्ही पुन्हा एकत्र आलो, व्हर्चुअल का होईना पोटभर गप्पा होऊ लागल्या आणि सहज तिने काही गोष्टी सांगितल्या रादर बोलल्या गेल्या. तिचे यजमान हे बाकिच्यांसारखे मध्यम वर्गीय गटात मोडणारे. कौतुक करणं, गोड बोलणं किंवा उत्साहाने बायकोला इकडे तिकडे घेऊन जाणं, तिच्यासाठी गाडीत वाट बघणं, प्रवासाला सोडणं-आणणं ई. त्यांच्या रोजनिशीचा भाग नव्हताच मुळी. नाही म्हणजे नाहीच, सरळ स्पष्ट उत्तर मिळायचं, "कोण जातंय गावाला? मी? नाही ना? मग जो जातोय त्याने जाण्या-येण्याची सोय बघावी..... ई. असो. ते मान्य करून सगळं सुरळीत चालू होत. तीन तपें लोटल्यावर आत्ता अचानक गाडी विमानतळावर / बस स्टॉप वर जाता-येता न-सांगता उभी असते आणि ती प्रवासाला गेल्यावर तिची सगळे कसे आठवण करतील, जेथे जाते आहे तेथे तिने कसं आनंदी राहावं ई. सांगण्यात येत ते देखील हसत खेळत हो. बाप रे, एवढा अत्योत्तम बदल आणि अचानक, काय झालं असेल? "स्वभावालाच औषध असतं" हे मान्य करावंच लागेल. का मनस्वी इतक्या वर्ष सातत्याने तिची कामं करत राहिल्यामुळे हा बदल दिसून येतोय? का मुलं मोठी झालीत त्यांनी काही सांगितलं असेल? पटवलं असेल? किंवा मुलांसमोर चांगलच इम्प्रेशन पडावं म्हणून हि धडपड? तिच्या आणि माझ्या डोक्याचा अगदी क्षणभर भुगा झाला पण मग इतक्या हसलो ना आम्ही हा बदल ऐकून, बघून आणि न्याहाळून कि सगळं मिळाल्यासारखं झालं. मनस्वीला तर कधीच अपेक्षित नव्हतं, आणि त्यामुळेच जरा मूठभर जास्त मास चढलं अंगावर, काटे आले आणि मनस्वीच्या "ह्यांच्या" डोळ्यातलं समाधान, मी हे सगळं इतक्या वर्ष का नाही केलं हि खंत साफ दिसायला लागली आणि "त्यांच्या" साठी जास्त बरं वाटलं. "इंतजार का फल" ऐसा भी होता है, हे माहितच नव्हतं. म्हणून सर्वांना इतकी विनंती आहे कि सगळ्याच मनस्वी असू शकत नाहीत. त्यामुळे अनसिझनल अनेक छोट्या गोष्टी दोघेही एकमेकांसाठी नेहेमी करत राहा आणि हो हे फक्त स्वतः साठी बरं का?
थोडक्यात काय "अश्या घटना घडती आणि स्मृती ठेवुनी जाती".
परतीचा प्रवास
"या चिमण्यांनो परत फिरा रे, घरा कडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा...."
हे गाणं जिव्हाळा चित्रपटातलं आहे आणि माझ्या फारच जिव्हाळ्याचं देखील. अनगिनत वर्ष मी ते ऐकलं आहे, अगदी मनापासून आणि काही वेळा गाण्याच्या वर्गात म्हणण्याचा विफल प्रयास केला होता. असो.
आज जास्त प्रकर्षाने ह्या सदाबहार गीताची आठवण तर आलीच पण जाणीव / ओळख नव्याने झाली, महती पटली.
आपण दररोज सकाळी व्यायाम म्हणून चालायला जातो तरी देखील परतीची वेळ, मार्ग किंवा अंतर ठरवून जातो. पक्षी देखील तस्सेच, कचेरीत जाणं येणं, गावाला / सहलीला आणि इतर कुठेही असो तेच. अगदी बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट असो, नाहीतर एकदा खाद्य पदार्थ, नाहीतर औषध किंवा नोकरी, सगळ्यांना परतीचा प्रवास अनिवार्य त्या ठरलेल्या दिवशी.
माझं पण अगदी तसेच झाले. सप्टेंबर मध्ये च ठरले कि साधारणतः ४-५ महिन्यात परतीला सुरवात करायची. आज केली. आणि म्हणूनच आलेले अनुभव थोडक्यात मांडावे असं मनस्वी ठरवलं. हा त्याचा एक प्रयन्त. आतून बाहेरून धारा सुरूच होत्या, त्या कधी कोणाला दिसल्या आणि कधी नाही, माझ्या डोळ्यांतुन आणि निसर्गा तर्फे देखील हो. अहो आश्चर्य पण जानेवारीत पाऊस आणि नेमका मी विमानात बसले कि सुरु झाला, माझ्या अगदी जवळ असलेल्या खिडकीत पाणी वाहत होत आणि एक वेगळाच चटका देऊन जात होता. आणि पठ्ठा अगदी थोड्या वेळ आला आणि गायब पण झाला हो. कदाचित तो हे सांगण्याचा प्र्यन्त करत असेल कि वाईट वाटणं साहजिक आहेच पण पुढे मार्गक्रमणा करण्यासाठी ह्याच अश्रुंची फुलं करणं आवश्यक आहे. परततांना असंख्य आठवणी घेऊन निघा आणि त्यावर पुढील मनोरा रचा, आव्हान पेला, हसत खेळत दुसऱ्यांसोबत पुढील ध्येय साध्य कराच. कारण जितका सुरवातीचा प्रवास महत्वाचा कणभर जास्तच परतीचा कारण ते उगम स्थान असत पुढील नवीन प्रवासाचे, नवीन नात्यांचे, लक्षांचे, ध्येयाचे आणि जिंकायचे. चला तर मग, माननीय लता दीदींचे स्वर ऐकत प्रत्येक परतीचा प्रवास सुखावह करूयात, सुवर्णाक्षरात लिहिल्या जातील अश्या आठवणीने, प्रचंड उत्साहाने आणि समाधानाने.
https://www.youtube.com/watch?v=bC6sU4oYBpg
मला वेड लागले प्रेमाचे
आता काय काय आणि कसं सांगू, कुठून आणि कशी सुरवात करू, शेवट करू का नको करू काहीही म्हणजे काहीही आकलन होत नाही आहे. प्रेमात एकदाच पडतात का हो? आणि फक्त माणसांच्याच का?
माझं तर उत्तर नाही असं आहे. कारण गेले चार-पाच महिने पुन्हा एकदा माझ्या नागपूरला वास्तव्य करतांना इतके जण दृष्टीपथात आले, इतक्या वस्तूंसोबत वेळ घालवता आला आणि इतकी ठिकाण पुन्हा एकदा नव्याने ओळखता आली कि ज्याचं नाव ते, प्रेमात पडलेच पुन्हा, प्रचंड. आणि हो मंडळी जशी मी त्यांच्यावर प्रेम करायला लागले नकळत तस्सेच काही जण देखील हो, मूक असे, न बोलता,न व्यक्त करता आणि काही फारच बदमाश देखील होते. काहींनी संपूर्ण ४-५ महिने त्यांचं प्रेम व्यक्त केलं आणि काहींना उशिरा जाग आली आणि खूप खूप वाईट वाटलं कारण माझं काम आता संपुष्टात आलं होत आणि निघायची वेळ आली होती. मग काय थोडेसे वेडे चाळे, अनपेक्षित असे सुरु केले कि हो, माझी गेले ३-४ रात्रीची झोपच उडवली पठ्यांनी. इतके महिने शांत झोपेची सवय झालेली आणि अचानक हा प्रेमळ बदल थोडासा अपचनी पडला हो. आणि असे सगळे पण प्रेमळ असू शकतात हे नव्याने उमगलं.
नागपूर आणि पुणे संस्थेचं प्रचंड काम एकसाथ चालू होत आणि त्यामुळे रात्रीची झोप कधी, कशी, केव्हा आणि किती लागत असे ह्याचा हिशोबच नव्हता आणि जाणीव नाहीच, गृहीतच धरल्यासारखं झालं होत. त्या खोलीला, मुख्यत्वे गादीला, पांघरुणाला, पंख्याला, एकंदरीत वातावरणाला मी मनापासून धन्यवाद देत होतेच, पण एक निसटला होता वर्ग, कारण तो माझ्या पुढ्यात कधी अवतरलाच नाही. जसं त्यांच्या कानावर शब्द / बोल पडले कि मी आता निघणार कायमची त्यांना पण मग माझ्या सोबत गप्पा आणि कानगोष्टी कराव्याश्या वाटल्या, कित्ती कित्ती प्रेम बघा. आणि सुरु झाले हो, एकसाथ अनेक, एखाद-दोन ह्या कानापाशी, बाकीचे त्या कानापाशी, काही आजुला तर काही बाजुला, अगदी शर्यत त्यांच्यात जशी. कोण किती आणि किती वेळ गाणी सादर करतंय, काही अजून ऐकवतंय, आवाजात चढ उतार ई. विचारू नका. सरते शेवटी मी हात टेकून त्यांना काय म्हणायचं आहे, ते माझ्या कित्ती प्रेमात आहेत, मी चाललेय ह्याच त्यांना कित्ती वाईट वाटतंय हे सगळं समजावून घेतलंच. चार दिवस अंथरुणात बसून काढले आणि मज्जा अनुभवता आली. असं प्रेम पुन्हा मिळणार आहे का? अशक्यच. आणि कुठे लिहून ठेवलंय कि रात्र हि फक्त झोपण्यासाठीच असते, नाही. अश्या पद्धतीने त्या प्रेमळ झुंडाकडे बघितलं तर समजेल हो. अर्थात जस माझ्या इनोव्हा नी, वायफाय नी, सगळ्या जणांनी, स्टाफ नि माझ्या सोबत वेळ घालवला, दिला त्यात राहून गेलेल्या डासांना पण द्यावासा वाटला आणि ते मला फारच भावलं.
त्यामुळे मंडळी "बोलेवीण भाषा", "शब्दाविना भाव" जो कोणी सजीव, निर्जीव किंवा इतर दर्शवू इच्छितात त्यांचं सहर्ष स्वागत कराच आणि मग बघा प्रेमाची नवी परिभाषा कशी उलगडते ते, प्रकर्षाने जाणवते आणि वेगळीच ऊर्जा / दृष्टी देऊन जाते.
https://www.youtube.com/watch?v=0NhfdSQKUKw
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२
चांगल्या हातचं
अगदी लहानपणी पासून एक वाक्य किंवा एक संकल्पना आईकडनं घरी ऐकली होती, ती म्हणजे उपवास असला आणि उपवासाचे पदार्थ करायचे असले कि चांगल्या हातचं मीठ, तिखट, जिरे वापरायचे, नेहेमीच्या पाळ्यातले नाही. आणि तो काळ किंवा माझा स्वभाव सरळ साधा. मी आपलं ऐकायचं काम करायची आणि मोठी झाले तसं ते मी पाळलं देखील. का असं करायचं? ते केल्याने काय होत? केलं नाही तर काय होत? ई. कधीच विचारलं नाही आणि आईने कधी सांगितलं पण नाही. बरं आमच्याच घरी नाही आजूबाजूला इतरत्र सर्वत्र तेच वातावरण, उपवास तपास आणि सगळं म्हणजे सगळं तेच. असो.
आज खूप वर्षांनी मी उपवासाचं पदार्थ करण्याकरिता स्वयंपाकघरात गेले आणि हा विचार सहज मनाला शिवून गेला. कारण सोप्प होत, कारण आज उपवासाचा पदार्थ सहज संध्याकाळी खायला करत होते मी, कोणाचाही उपवास नसतांना. त्यामुळे मी काही फार चांगले मीठ, तिखट घेण्याच्या भानगडीत नाही पडले. आज सकाळीच ताज सगळं पाळ्यात काढलं होत, त्यामुळे मी फक्त नजर फिरवली आणि काहीही त्यात मिक्स झालं नव्हतं म्हटलं मग चला वापरा. आणि भुका लागल्या होत्या त्यामुळे जरा घाईच होती मला. त्यामुळे भराभर करण्यासाठी केलं आणि उत्तम झालं चवीला.
त्यामुळे दोन गोष्टींचा उलगडा झाला, एक म्हणजे बाकी मसाल्याचा वास लागलेलं तिखट मीठ जर उपवासाच्या पदार्थात घातलं तर थोडीशी चव कदाचित बदलेल, कारण उपवासाचे जिन्नस तय्यार करतांना मसाले लागत नाहीतच. तो फरक स्पष्ट ठेवण्यासाठी काय ते हे अलिखित नियम. आणि दोन म्हणजे काही हॉटेल मध्ये तर मसाले मारलेले उपवासाचे जिन्नस मिळतात, भारतात काही भागात देखील असेच मसालेदार पण उपवासाचे जिन्नस घातलेले पदार्थ करण्याची पद्धत आहेच. आमच्या समोर एक कुटुंब राहायला आलं होत भाड्याने त्यांनी हे सांगितलं होत, किंबहुना एकदा असा मसाले दार उपवास पदार्थ चाखला पण होता. त्यामुळे माझे बाबा नेहेमी म्हणायचे "आपण करू ती फॅशन", तसेच "आपण करू त्याला उपवास म्हणायचा", कोण फक्त दूध घेईल, कोण फळं, कोण पाणी तर कोण बाकी खिचडी वगैरे. त्यामुळे सोय बघा, वेळेकडे लक्ष द्या, "दोन हस्तक एक मस्तक" वापरून नेहेमी नतमस्तक व्हा म्हणजे सगळं मिळवलं. उपवास आपल्या पोटाला आराम मिळावा, खाण्यात बदल व्हावा, ऋतुमानाप्रमाणे सगळं पोटात जाण्याकरता, कंदमूळ असलेला पदार्थ सेवन करता यावे म्हणून करावा. जरी त्याला अध्यात्माची जोड द्यायची झाली तरी सहज देता येईल कारण बदल म्हणून पोटभरीचा एकच पदार्थ सर्व कुटुंबासाठी होतो आणि त्यामुळे देवाचं करायला वेळ मिळतो घरच्या आईला.
रविवार, २ जानेवारी, २०२२
तुझं तू माझं मी
TTMM हि एक अत्यंत सुंदर संकल्पना आहे आणि फक्त तरुण विद्यार्थ्यांसाठीच नाही तर बहुतांशी सगळ्यांनाच उपयोगी अशी. खूप ठिकाणी वापरली जातेच आणि तिची मला प्रकर्षाने आणि नावीन्याने ओळख झाली ती अमेरिकेतल्या एका वास्तव्यात. बॉस्टन शहरात कामानिमित्य मी गेले होते तेथे जेवण झाल्यावर आमच्या सोबत असणाऱ्या ६-७ विद्यार्थ्यांनी पट्टाकिनी आपआपले क्रेडिट कार्ड्स काढून दिले आणि त्या कॅफे च्या मालकांनी देखील ताबडतोब जादुई गतीने आलेलं बील त्या सगळ्या कार्ड्स मधे एकसारखं वाटलं. अहाहा. फार भावली ती पद्धत मला.
हे जे मॅनुअली केलं ते आता आज मला जी-पे मधे दिसलं, बाप रे, झकासच नाही का?. मी सतत माझ्या विद्यर्थ्यांना सांगत असते कि कुठलाही सॉफ्टवेअर तय्यार करणे म्हणजे जी मॅनुअली होत तेच ट्रान्सफॉर्म करणं ऑटोमेट करणं, जे मी बघितलं माझ्या चार डोळ्यांनी. मॅन्युअल TTMM २०१० मधे तर जी-पे २०२२ मधे एवढाच काय तो फरक.
असंच अगदी असंच TTMM सर्वांनी संकल्प म्हणून ह्या नववर्षात आत्मसात करून कृतीत उतरवलं तर, प्रत्येकाने आपल्या खर्चाकडे, कृतीकडे च फक्त लक्ष द्यायचे, दुसऱ्यांमध्ये ढवळाढवळ अजिबात नाहीच, विचार देखील नाही. कित्ती म्हणजे कित्ती सहिष्णुता, शांतात लाभेल प्रत्येकाला. हा अगदीच आवश्यकता असेल तर नक्कीच दुसऱ्याचा भार हलका करायचा, पण अलिप्त पणे. काय म्हणताय मंडळी? अगदी सहज जमण्यासारखं आहे. आणि माझी आई म्हणायची तसं "घर पहिली शाळा". चला तर मग स्वतः पासून, स्वतःच्या घरा पासून, मित्र मैत्रीण, ताने वाईकांपासून सुरवात करूयात ताबडतोब. धन्यवाद जी-पे, TTMM इम्प्लिमेंट केल्या बद्दल, सगळे जी सर्रास जी-पे वापरतात त्यांना हे ऑप्शन बघून नेहेमी लक्षात राहील आणि व्यक्तिमत्वात बदल झळकू लागेलच.
दिल से दिल तक
ऑफिस च्या कामाच्या निमित्याने मी नागपुरच्या वास्तव्यात विविध लोकांना, माझ्या आप्तस्वकियांना भेटायचं ठरवलं आणि ते हळू हळू सुरू केलं देखील. प्रत्येक वेळी कोणाच्याही घरी जाते वेळी मी हल्दीराम चे विविध पदार्थ घेतले. असेच मागल्या रविवारी एकांकडे जाते वेळी हल्दीराम च्या काही वस्तू ऑर्डर करतांना माझ्या साठी चाऊ-म्याऊ पण मागवलं. एक प्रकारची भुजिया होती आणि नवीन वाटली म्हटलं खाऊन बघावं आणि मला नेहेमीच असं नवनवीन चाखायला आवडत, प्रचंड. झालं काही वेळात आला कि तो माणूस डिलिव्हरी करायला. मी ते सगळे सामान बघून थोडी अवाक झाले, म्हटलं माझंच सामान आहे ना? कारण मी भुजिया ऑर्डर केली होती आणि ती एका छोट्याश्या पिशवी वजा पॅकिंग मध्ये येणार हि अपेक्षा होती नेहेमी प्रमाणे. पण काय सुखद छोटंस आश्चर्य, एक सुबक सुंदर देखणा डब्बा आला. नीट बघितलं तर तीच भुजिया, उघडून बघितलं तर त्यात एक विचारपूर्वक पॅक केलेलं पाकिट. काय आनंद झाला मला डब्बा + पाकीट हि अपेक्षाच नव्हतीच. एकदा पाकीट उघडलं कि कुठे काढून ठेवायचं हा यक्ष प्रश्न आणि रबर बँड्स लावले तरी सरदतात पदार्थ. त्यामुळे काही का असेना, हल्दीराम ने ह्या डब्याचे पैसे माझ्याच कडून जरी घेतले असले तरी माझी झालेली सोय मला जास्त भावली. ज्यांनी कोणी हा विचार केला आहे, ज्याच्या कोणाच्या डोक्यातून हि कल्पना सुचली आहे त्यांना प्रणाम. हलका, द्यायचा म्हणून, नाजूक, कमकुवत असा डब्बा नाही बरं का तो. ती भुजिया मटकी वापरून तय्यार केली आहे, अतिशय पौष्टिक अशी आहे, डब्बा दणकट आणि नाव त्याहून जगावेगळं "करोडपती भुजिया". एकंदरीत भावलेलं प्रॉडक्ट आणि प्रचंड औत्सुक्ययुक्त आनंद देऊन गेलेलं असं. शेव ह्या प्रकारातलं अनोखं असं नवखं पॅकिंग "दिल से दिल तक" पोचणार असं.
जडण घडण
माझ्या "त्या" दिवसातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझे बाबा मला अगदी एक "बेटा" म्हणून नकळत वाढवत होते तर आई "अगं उद्या तुला सासरी जायचं आहे..." ऐकवत होती आणि मी अशी बहरत होते, सहज. काहीही म्हणजे काहीही असो, मुहूर्त नको, खास कारण नको, ह्या दोन पद्धती ठऱलेल्याच. मला पण मग काहीच दिवसात लक्षात आलं होत कधी काय कुठलं वाक्य नचुकता माझ्या पुढ्यात येणार ते. आईच्या दृष्टीने मी "त्या" बाहेरच्या / माहित नसलेल्या घरासाठीच सगळं शिकत होते, आत्मसात करत होते, किंबहुना करायलाच हवं होत आणि ते देखील उत्कृष्ट रित्या. मग "त्या" घरी जाण्याचा आला की प्रसंग. गेले, तिथली होता होता पुन्हा तश्याच पद्धतीचं कानावर आलं, "आमच्या घरी असं असतं .... तुझ्या आईकडे .... ", तेव्हा सासऱ्यांच्या घरात वास्तव्य होत, त्यांनतर नवऱ्याच्या घरी. मग म्हणजे दोन्ही घर माझीच का .........?
मी जेव्हा आईच्या भूमिकेत शिरले कदाचीत काळानुरूप ती वाक्य उच्चारली नाही जात आहेत पण "आता काय थोड्याच दिवसात मुलीचं शिक्षण होऊन ती भुर्रकन उडून जाणार, तिच्या पंखात बळ येणार ई" नकळत बोललं जातंय.
किंवा उद्या मी कामानिमित्य गावाला जाणार, मग तेथून आठ एक दिवसात पुन्हा पुण्याला ई.
असंच का बोललं जात?, किंवा मनात येत फक्त जाण्याबद्दल?. मी कामानिमित्य गावाच्या वास्तव्यात कसे प्रत्येक क्षण अनुभवणार, स्मृती निर्माण करणार ई. ना का नाही महत्व दिल जात?. जाण्यावरच भर का? अशी जडण घडण का? माझी लेक आता माझ्या कडे अजून ३ वर्ष राहणार हे का नाही उभं राहत माझ्या ओठांवर सतत? हा एक महत्वाचा मुद्दा सध्या गेले ४ महिने मी नवीन पालकांना समजावून सांगते आहे. कारण सध्या मी एक नवीन तांत्रिक शिक्षण संस्था उभं करण्याचं ध्येय उराशी बाळगून जगले आहे आणि ते प्रत्यक्षात आणतांना शेकडो पालकांशी संवाद साधता आला. अपेक्षा करते कि त्यात / पालकांना समजावण्यात काही अंशी सफल होईन आणि माझ्यात देखील बदल दिसतील. मी आणि माझ्या आई-बाबांनी बघितलं ह्या सगळ्या कडे तसे कदाचित नवीन पिढीतले आई-बाबा, मुलं नाही बघणार पण काही सांगता येत नाही, बोटावर मोजण्या इतके असले तर त्यांना ह्या विचारांचा फायदा नक्की होईल असं वाटत मला. "हे विश्वची माझे घर..." असं राहणं उत्तम, ह्या जगाच्या शर्यतीत आनंदाने आणि उत्साहाने टिकण्याकरिता.
शनिवार, १ जानेवारी, २०२२
प्रेरणादायी असे काही तरी
सध्या सुट्टीवर आले आहे मी नागपूर हुन पुण्याला जवळपास चार महिन्यांनंतर. त्यामुळे सर्वप्रथम म्हटलं माझ्या डॉक्टर मैत्रिणीची भेट घ्यावी. कारणं अनेक होती, एक म्हणजे ती ला अनेक महिन्यात बघितलं नव्हतं, बोलले हसले नव्हते तिच्या सोबत, तिच्या मुलीबद्दल चौकशी करायची होती, पोटभर गप्पा मारण्याकरिता कधी भेटायचं हे ठरवायचं होत आणि औषध (नवीन / बदल) हे पण हो. दिल्या तिने एकदाच्या गोळ्या बदलून. मग मी पण त्या पट्टाकिनी विकत आणल्या दुकानातून. रात्री जेवणानंतर घ्या असं सांगण्यात आलं होत आणि मी पहिल्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यावर गोळी घेतांना पाहिलं तर माझ्या हातात टवका गेलेली गोळी स्थानापन्न झाली. मला वाटलं माझं गोळी काढतांना काही चुकलं कि काय. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण तसंच. म्हटलं काय होतंय काय? मग चवथ्या दिवशी पदर खोचला आणि उत्तर शोधायचं ठरवलंच. हळूच प्रयत्नपूर्वक ती पिटुकली गोळी वेष्टनातून बाहेर काढली, माझ्या तळहातावर निरीक्षणासाठी ठेवली आणि मी उडालेच. अहो ती गोळी चक्क हृदयाच्या आकाराची होती. इतकी छोटी आणि त्यात हुबेहूब हृदय कोरलं होत / साकारलं होत. अहाहा च. माझ्या साठी ती अत्यावश्यक अशी असलेली गोळी मी रोज घ्यावी म्हणून किती मोटिव्हेट करावं कोणी. जबरदस्तच. फारच भावली मला कल्पना / संकल्पना आणि ज्याच्या सुपीक डोक्यातून हा आकार साकारला गेला त्याला शतशः मनापासून धन्यवाद. अर्थात मला सध्या तरी अश्या बाहेरील मोटिव्हेशन ची गरज नाही, घेतल्या जातात गोळ्या लागणाऱ्या, पण असे असतील ना बरेच जणं, त्यांच्या साठी कुठल्यातरी व्यक्तीने / गोळ्या तय्यार करणाऱ्या तज्ज्ञाने केलेला हा विचार आणि कंपनीने तो उचलून धरला हे फार भावलं मला. आणि हो आकाराशिवाय गुगल बाबा ला विचारणा केली तर त्या गोळ्या पांढऱ्या, लाल, गुलाबी, हलक्या गुलाबी ई. वैविध्य रंगात आढळल्या. शपथच. वेळेवर गोळ्या घेऊन माणसं पटापट बरी व्हावीत ह्या बद्दलचे प्रयत्न अवर्णनीय आहेत हे मानलेच पाहिजेत. म्हणजे नवीन गोळ्या तय्यार करतांना आकार, प्रकार, रंग, रूप आणि माणसं ह्यांचा पण सखोल आणि सतत विचार करणे अत्यावश्यक आहे हे प्रकर्षाने आढळलं. मतितार्थ असा कि माणूस म्हणून नवीन गोळ्या-औषध नावारूपास आणा फक्त व्यवसाय म्हणून किंवा शर्यत म्हणून नकोच..
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...