बुधवार, १२ जानेवारी, २०२२

प्रसादाचे काही किस्से

"प्रसाद हा मज द्यावा देवा...." हि प्रार्थना भजन, आरती, मंत्रपुष्पांजली झाली कि म्हणत असत आणि त्यावेळी आम्हा मुलांचा आवाज शेवटची प्रार्थना असली तरी खणखणीत असायचा, कारण त्या नंतर हातात खूप वेळ वाट बघितलेला प्रसाद मिळणार असायचा. त्यामुळे अगदी लहानपणी पासून ह्या शब्दाशी माझी एक वेगळीच नाळ जुळली आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर असंख्य वेळा हा शब्द ऐकिवात, उच्चारण्यात आणि वापरण्यात आला इतक्या वर्षात. काल माझ्या एका मैत्रिणीने जी आज फारच मोठी दिग्गज मेडिकल डॉक्टर आहे तिने विचारला आणि मला जरा शब्द पेरावे असे वाटले. तर त्याच असं झालं, कि आज अनेक वर्ष एकाच संस्थेत काम केल्यामुळे असेल किंवा काळजी, पण ह्या इतक्यात नव्याने सुरु झालेल्या माझ्या १४ दिवसांच्या वनवासात मला दररोज माझ्या विश्वविद्यालयाच्या हॉस्पिटल मधून फोन येतो आणि पोटतिडकीने चौकशी होते. त्यात ह्या माझ्या मैत्रिणीला जेव्हा समजलं तेव्हा म्हणते कशी "काय कुठून मिळाला प्रसाद?".

प्रसाद म्हणजे देवाला दाखवलेला नैवेद्य, "त्याचा" प्रसाद  / आशीर्वाद, प्र-साद म्हणजे पुन्हा एकदा साद घालणे, साद आल्यावर प्रतिसाद देणे, प्रेमाची साद, कुणी दिलेला / पदरात टाकलेला असा  ई. असे अनेक अर्थ होऊ शकतात. मला तर सगळेच भावलेत.

ह्या नवीन दुखण्याबद्दल वैविध्य माध्यमातून इतकं ऐकलं होत, वाचलं होत आणि अंगावर शहारा आणेल असेच जग संपूर्ण ढवळून निघालं होत, तब्बल २ एक वर्ष. पण त्यातून जे सावरले त्यांच्यावर असलेला आशीर्वाद प्रकर्षाने जाणवला, त्यांनी जसा त्या रोगाला जबरदस्त प्रतिसाद दिला ते लक्षात आलं, किंबहुना त्यांना प्रतिसाद देण्यासाठी लागणारी ताकद मिळाली, स्थिरता प्राप्त झाली हे हि नसे थोडके. स्थिरता आणि इच्छाशक्ती नसेल तर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. पदरात पडल्यावर त्याला ताकदीने तोंड देणे आवश्यक नाही का? पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, साधनेची जोड, दृढ विश्वास आणि अर्थात "त्याची" इच्छा परम आवश्यक असते.

अजून एक प्रसादाचाच भाग म्हणजे अनपेक्षित लोकांकडून केलेली विचारपूस ती देखील सातत्याने, विविधतेने आणि मनापासून जे त्यांच्या बोलण्यात, शब्दात, उच्चारात सहज लक्षात येते. ज्यांना माहिती आहे त्यांनी विचारपूस करावीच असं कुठे लिहून ठेवलंय, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना? कदाचित त्यांनी हा विचार केला असेल कि कशाला उगाच त्रास द्यायचा, आराम करू द्या, पुन्हा पुन्हा तेच काय विचारायचं, किंवा ते मनातल्या मनात प्रार्थना करण्यावर भर देत असतील शब्दांवर नाही, एकासाठी नाही तर सगळ्या अख्खा जगासाठी प्रार्थना असेल ती, असो. कित्ती सखोल विचार आहेत नाही? माझ्या दृष्टीने हा पण एक प्रासादिक अनुभवच नाही का? दोन्ही प्रकारच्या लोकांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. कारण एकांकडून काय करावं हे शिकायला मिळतंय आणि दुसऱ्याकडून काय नाही ते, पण शिकणं चालूच आहे.

एक अतिदिग्गज व्यक्तिमत्व आहे, त्यांचे भाषण ४ महिन्यांपूर्वी ठरले होते, कारण त्यांच्या तारखा इतक्या लवकर घ्याव्या लागतातच. आणि जेथे त्या बोलणार होत्या तो पण कार्यक्रम फारच मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे सगळं खूप आधी ठरवलं गेलं. भाषणाच्या अगदी आदल्या रात्री खूप उशिरा रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते त्यांचे. त्या इतक्या दिग्गज आहेत कि सहज कार्यक्रम स्थगित करा असं सांगता आलं असतं त्यांना पण नाही, संपूर्ण ठरलेला वेळ त्या अस्खलित बोलल्या. प्रसाद नाही तर अजून काय हे? त्यामुळे अश्या आठवणी ना महत्व द्यावं आणि पुढे मार्गक्रमण करत राहावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...