आपण सर्व मनुष्य प्राणी रस्त्याचा वापर करतो ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि अर्थातच कामानिमित्यच. प्रत्येकाला रस्ता वापरण्याची मुभा आहे आणि हक्क पण, तेथे कोणीही लहान-थोर, गोर-गरीब, कुठलाही भेदभाव नसतोच, नसायला हवा. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी लहान असतो, गाडी शिकण्याच्या अवस्थेतून गेला असतो, पायी चालला असतो, संघर्ष केला असतो. कोणीही कधीही वरून टपकलेला मी तरी बघितला नाही.
आधी माझा असा विश्वास होता कि जेवढी मोठी गाडी, जेवढं वय जास्त, जितका अनुभव दांडगा तेवढा तो व्यक्ती जमिनीवर जास्त स्थिर असतो, वावरतो आणि कृतीतून दिसतं.
पावसाळा सुरु झाला तेव्हा पासून एक ध्यान्यात येतंय कि गाड्यांचे आकार आणि किमती जितक्या जास्त म्हणजे विकत घेण्याची क्षमता जास्त तेवढा मिजास आभाळा एवढा, तितकीच जास्त घाई, तितकीच माणसांची कमी झालेली किंमत, तितकीच वाढलेली अपेक्षा, भलता गर्व आणि राजाचा आवेश, राजेशाही कधीची संपली तरी देखील. रस्ता हा फक्त आपला, बाकीचे एक तर अस्तित्वात नाहीत किंवा फक्त किडे माकोडे इतकेच. इतक्या आवेशात हाणायची गाडी, इतक्या वेगात कि आजूबाजूच्यांच्या अंगावर रस्त्यावरचं पावसाचं राड चिखल युक्त पाणी उडायलाच पाहिजे नखशिकांत. काय हे? काय हि असुरी वृत्ती? आणि काय मिळतं असं वागून?. मानलं कि त्या चालकाला घाई आहे, मग ऋतुमानाप्रमाणे जरा १० मिनिटे लवकर बाहेर पडावं आणि सावकाश गाडी चालवावी. हे विसरून कसं चालेल कि ज्या गाडीत तुम्ही कोरडे बसला आहात तशी कोरडी राहण्याची गरज दुसऱ्यांना देखील आहे. दिवसभर ओलं बसून किंवा ओल्या अवस्थेत कामं करणं अतिशय अवघड आणि तब्बेतीला हानीकारक आहे. तुम्ही उशीरा निघालात म्हणून बाकिच्यांना शिक्षा का? पावसाळ्यात कधी कधी ब्रेक नीट लागत नाहीत, पाण्यात तेल पडलं असेल तर घसरडं होतं, जोरात खड्यातून गाडी गेली तर नकळत चालकाच्या मणक्याला, मानेला मार / धक्का बसू शकतो, गाडीत पाणी जाऊन बंद पडण्याची शक्यता असते क्वचित, मग निघा कि थोडसं लवकर, करा कि दुसऱ्याचा विचार देखील, कारण रस्ता पण आपल्या मालकीचा नाही, गाडी तर नाहीच नाही आणि आपला श्वास देखील, सगळं "त्याने" भाडे तत्वावर दिलेले आहे, ते उत्कृष्ट पणे सांभाळा सातत्याने, बास.