शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

२२३८: एक नवा आरसा


माझ्या मते, या जगातील कोणत्याही सजीवाला किंवा माणसाला रागाचा एक थेंबही आवडत नाही. मग तो कोणीही असो किंवा कुठल्याही कारणास्तव तो राग व्यक्त करत असो. शांत, गोड आणि प्रेमाने बोललेलेच जास्त पटते, समजते आणि मनाला भिडते.

हे पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणवले, की शब्दांनाही वेदना देण्याची ताकद असते. एखादे रागाने ओतप्रोत भरलेले वाक्य बोलण्याआधी, क्षणभर थांबून, तेच वाक्य नव्या विचाराने मांडून बघा. यामुळे समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर तुम्हालाही एक वेगळे समाधान मिळेल. मनाला, शरीराला, समाजाला एक नवी ऊर्जा मिळेल. जर इतके फायदे असतील, तर ही सवय का नाही लावून घ्यायची? चला, आतापर्यंत जे झाले ते ठीक आहे, पण यापुढे हे नक्की करूया.

काचेचेही अगदी तसेच आहे. तिलाही मार सहन होत नाही. ती तुटते. इथे मी 'शाब्दिक मार' या अर्थाने काचेची तुलना केली आहे. पण आजच्या तंत्रज्ञानामुळे त्याच काचेने प्रचंड आघात सहन करण्याची क्षमता मिळवली आहे. आजच्या 'टफंड ग्लास'मुळे अख्खा ड्रम एका पिशवीत मावतो आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक सक्षम झाला आहे. हा बदल तिला करावाच लागला, कारण प्रवाहासोबत चालणे आवश्यक होते. पण केवळ पर्याय नाही म्हणून नाही, तर अत्यंत आवडीने हा बदल स्वीकारला गेला आहे.

कोणतीही थेट समानता नसली तरी, मागे वळून पाहताना मला जाणवते की, माझ्या बाबतीतही प्रत्येक जण मला रागावूनच गेला, जणू रागावणे हा त्यांचा अधिकारच होता. याचा अर्थ मी वाईट होते असे नाही, पण ते माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी लिहिलेले महत्त्वाचे धडे होते. सुरुवातीला जरी राग आवडला नसला, तरी त्या रागाचे आघात सहन करत मी शांतपणे पुढे जात राहिले. मार खातच मी घडले. आता मात्र, इतरांना अनावश्यक मार खाऊ द्यायचा नाही, हा माझा प्रयत्न आहे.

जे मला आवडले नाही, तेच वारंवार समोर आले आणि मी घडले, अगदी त्या काचेसारखी. जशी काचेत विविधता असते, तशीच माणसांच्या स्वभावात आणि सहनशीलतेतही असते. प्रत्येकजण वेगळा आहे. पण आज, तीच स्मार्ट काच प्रत्येक घरात आहे. तिच्या प्रवासातून, नाजूकतेकडून सक्षमतेकडे जाण्याचा धडा ती आपल्याला शिकवत आहे.

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

२२२३: चहा खाल्ला


हो हो अगदी योग्य वाचलंत तुम्ही. आज अचानक मला जाग आल्यासारखं झालं कि मी हे काय करते आहे?  मी जेव्हा पूर्णवेळ शिक्षिका म्हणून काम करत होते त्या वेळेपासूनच मी अमृततुल्यची फार मोठी शौकीन झाले होते. फार नाही पण घोटभर चहा हवाच. आणि आता काय भरपूर वेळ आहे हातात, त्या मुळे शांततेत विविध प्रकारे चहा दोनदा दिवसातून घेतला जातोच. केक रस्क आहेत सध्या सोबतीला. मग काय आज कपातील चहा कधी संपला हे समजलंच नाही. आधीच कप छोटा, त्यात एवढासा चहा आणि त्यावर रस्क बुडवल्यावर सगळा चहा त्या पठ्याने च फस्त केला कि, मला काहीच उरला नाही. जसे कि मीच चहा खाल्ला पिला नाहीच. प्यायला काही उरलेच नाही. चहा पण खाता येतो हे आज नव्याने उमगले. मग काय संगणक हाताशी आहेच, म्हटलं जरा चाचपडून पाहावे कि चहा स्वाद चॉकलेट किंवा ट्रॉफी उपलब्ध आहे का? पण छे हो, नाही सापडलं काही प्रथमदर्शनी असे. चॉकलेट च्या स्वादाचा चहा आहे, पण ट्रॉफी नाही. चहा खायचा असेल तर मग हाच एक पर्याय सध्या उपलब्ध, गरमागरम चहा+रस्क. चहा पिण्याची मजा नसली तरी नव्याने समजलं कि चहा खाता पण येतो ते. दोन्ही करायचे असेल तर किटली जवळ घेऊन बसणे, आधी खा मग प्या. आता माझ्याकडे बराच वेळ असल्यामुळे हे सहज शक्य आहे.  

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

२२२२: देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी


माननीय सुधीर फडकेंनी गायलेले हे भक्ती गीत आहे, अनेक वर्षांपूर्वी सादर केलेलं. ह्या भक्तिगीताचा एक अजून अर्थ मला आज उमगला म्हणून हा पंक्ती प्रपंच.  हे लिहितांना मी फक्त मध्यम वर्गीय लोकांबद्दल बोलते आहे ज्यांची संख्या फार मोठी आहे. काही ठिकाणं, घरं, सोसायटी सोडल्या तर बहुतांशी सर्वत्रच एक वस्तुस्थिती आढळते ती अशी कि "देवालय = देवाची खोली" वेगळी अशी कुठेही दिसत नाही. अर्थात जागा नसते, बजेट मधे बसणारी, विकली जातील अशी घरे बांधण्याकडे कल आहे आणि तो घेण्याकडे देखील. मग फर्निचर करतांना देव्हारा कुठेतरी भिंतीवर किंवा स्वयंपाकघराच्या कोनाड्यात तय्यार केला जातो. ज्याने हे घर दिलं, घर बांधण्याकरता जे कष्ट लागतात ते बहाल केले, बुद्धी दिली, शक्ती आणि युक्ती प्रदान केली, ई. साठी जागाच नाही. आधी मला हे खूप खटकत होतं पण आता नाही.  आता खरं कारण समजलं ते असं कि गेले तीन दशकं घरची स्त्री बाहेर पडली आहे अर्थार्जनासाठी. मग व्यवस्थित देव, धर्म, व्रत, वैकल्ले, उपवास, पूजा, अर्चा ई. कोण करणार. मग फक्त असण्यापुरते देवांचे फोटो ठेवण्या ऐवजी नकोच ते. आधीच्या काळी होती तशी अंगणात बाग नाही, घरची फुले नाहीत, सकाळ-संध्याकाळ, सणावारी पूजा करायला शांतपणे अजिबात शक्य नाही मग त्या ऐवजी हातातले काम यथाशक्ती, मनोभावे करा, जमेल तेवढी गरजूंना मदत करा, सत्कर्म करा, गरजेला धावून जा, कोणाला दुखावू नका, कोणाचे नुकसान करू नका, कोणालाच अडवू नका, सन्मार्गाने पुढे जा नेहेमीच, विचार आणि आचार सर्वोत्तम ठेवा, नतमस्तक व्हा, तुम्हाला जे जे मिळाले आहे त्या बद्दल धन्यवाद द्या त्या देवाला किंवा सृष्टीला किंवा त्या एका सर्वोत्तम ताकदीला, बास पोचेल "त्याला" सर्वकाही. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहे. आरत्या, स्तोत्र पठण, मंत्रोच्चार ई. सर्वांचे वेगळेच महत्व आहे पण ते जर काही कारणांनी घडत नसेल दररोज तर अर्धवट करण्यापेक्षा न केलेले बरे. कदाचित म्हणूनच ह्या भक्तिगीतांचा अर्थ समजून त्या पद्धतीने वागणे जास्त महत्वाचे आहे सध्या मध्यम वर्गीयांसाठी. 


मी एवढ्यातच एक नवीन नोकरी बद्दल ऐकले आहे ती म्हणजे एका सोसायटीत म्हणे एक मावशी दररोज येतात, अनेक घरांमधे जातात आणि दररोजची देवांची पूजा करतात. हि त्यांची नोकरी आहे. ठरलेल्या ठिकाणी जायचे, व्यवस्थित देवांची पूजा करायची, देवघर साफ करायचे, फुलं - पानं वाहायची आणि पुढल्या घरी जायचं. हा एक पर्याय आहे असं दिसतंय. 


मी आताच एक वाक्य वाचलं, कि तुम्ही जितक्या जास्त लोकांचे, ठिकाणांचे, संपर्कात आलेल्यांचे आणि इतर सर्वांचे आभार मानला तितक्या जास्त कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. "the more you are thankful, the more you attract things to be thankful for". आणि हे सगळं आधी शांतपणे, स्वतःसाठी, बोलबाला न करता, मनातल्या मनात करत राहा, जेव्हा जमेल तेव्हा, त्याला काही काळ वेळ नाही. आधुनिक गुरु देखील म्हणतातच ना, प्रत्येक श्वासाचे आनंदाने स्वागत करा, आभार माना, अगदी तसेच आहे. मानसपूजा म्हणजे तरी वेगळं काय ना? बास मग करत राहाच. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Dev_Devharyat_Nahi



2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...