शुक्रवार, ३१ मे, २०२४

आपल्या पायांवर उभे

 तसे मी घरीच गमाडी जम्मत म्हणून माझ्या पेक्षा लहान मुलांचा अभ्यास खूप आधीपासून घेत होते, तेव्हा मी देखील एक विद्यार्थिनी होते. माझं तंत्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हापासून नोकरी करायला लागले शिक्षिका म्हणून तेव्हा पासून शिकवतांना बसून राहणं, किंवा बसून शिकवणं ठाऊकच नव्हतं अजिबात. किंबहुना कशावर बसायचं? आणि का? सगळं काही फळ्यावर लिहावं लागायचं किंवा नोट्स वर्गात कथन कराव्या लागायच्या. अगदीच कधीतरी ट्रान्स्परन्सी शीट्स तय्यार केल्याचं तर मग त्यावेळचा प्रोजेक्टर वापरायला मिळायचा. पण तरी देखील उभंच, सतत. खुर्ची नसायची वर्गात शिक्षकांसाठी आणि स्मार्ट बोर्ड किंवा आज सारखं तंत्रज्ञान विकसित न झाल्यामुळे आधीपासून PPT तय्यार करून पाठवणे वगैरे अशक्यच. रक्तात भिनलं होतं कि शिकवतांना उभे राहणे. 


माझ्या मते प्रोफेशनल दर्जाचे जे विविध क्षेत्र आहेत जसे स्वयंपाक, चित्रकला, गाणे, फॅक्टरीत काम ई. उभे राहूनच करावे लागते, पर्याय नाहीच. 


आताशा माझे पाय बंद पडल्यापासून मी उठत बसत शिकवते आहे ते पर्यायच नाही म्हणून आणि तंत्रज्ञानाची जोड आहे म्ह्णून. नाही तर उभं राहिल्याशिवाय मज्जा नाही, सर्वांचे हावभाव नजरेस पडत नाहीत आणि त्यांना शिकवलेलं समजलं कि नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे उभे राहणे हाच पर्याय किंवा ते आपसूकच होतं खरं.  


एका दिज्जग गाणाऱ्या कलाकाराची मुलाखत ऐकत होते. त्यांना गाण्यास सांगितले, किंबहुना चारच ओळी, मुलाखतीचा कार्यक्रम असल्यामुले पूर्ण गाणे नाही. एवढे जगमान्य व्यक्तिमत्व असून सुद्धा त्या ओळी उभ्याने गायल्या आणि गाणं झाल्यावर पट्टाकिनी वादकांना दाद दिली. क्या बात है? मस्तच. 


हिंडत फिरत शिकवणे, समजावून सांगणे, मधेच एखादा प्रश्न टाकणे आणि चाचपणे, त्यामुळे सर्व वर्ग लक्ष तर देतोच आणि एक नाते देखील निर्माण होते. 


मधे एक व्हिडीओ बघण्यात आला माझ्या, त्यात एक भला मोठा, नावाजलेला, लोकप्रिय असा शेफ होता / आहे. त्याचे काही कारणास्तव पाय कामातून गेले. तज्ज्ञांच्या मते ते ठीक होणं अशक्य होतं. त्याला उभे राहणे अर्थात कधीच जमणार नव्हतं. पण नोकरी करणं अत्यावश्यक. मग काही दिवस त्याने आराम केला आणि त्याच वेळी त्याच्या जिवलग मित्रांनी मस्त शक्कल लढवली. त्यांनी जेथे स्वयंपाक होत असे तिथले छत वेगळ्या धाटणीतले बसवले. एक खुर्ची आणली आणि दोरखंड. अर्थात तो साधारण दोरखंड नव्हता. तो पुली होता, जो आडवा, तिरका, आणि हव्या त्या दिशेला सरकू शकत होता. त्यामुळे काय साधले गेले तर   हा शेफ खुर्ची वर बसायचा. त्याला जो पदार्थ तय्यार करायचा आहे ऑर्डर प्रमाणे त्यासाठी लागणारे घटक पदार्थ ह्या त्या स्टेशन वर ठेवलेले असायचे. ते तो सहज स्वतः घेऊ शकेल, कोणावर अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होईल आधीसारखा म्हणून हि केलेली जय्यत तय्यारी. काय दिमाख लावला आहे ना?  भन्नाट च. असे असावते दोस्त. ह्या सगळ्या महेनतीमुळे त्या शेफची नोकरी टिकून राहिली, त्याला पैसे मिळत राहिले, शिवाय त्या खानावळीचा फायदा झाला, गिऱ्हाईक खुश आणि त्यामुळे त्याचे परत मिळालेले स्वावलंबन. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाहीच. 


न्यू नॉर्मल दिवसांमधे मी हे आवर्जून टिपले आहे कि ऑनलाईन शिकवायचं असलं तरी बरेच हाडाचे शिक्षक उभा राहूनच शिकवत होते, तसे कॅमेरे सेट करत होते.  त्या शिक्षकीपेशाचा अत्यादर म्हणून, किंवा सवय म्हणून किंवा सवय टिकून राहावी म्हणून, कारण हे दिवस जाणार हे ठाऊक होतं त्यांना. कदाचित बघणाऱ्या विद्यार्थ्याला शिकता यावं हे देखील म्हणून असेल. पण उभं राहण्याने जो खंबीरपणा येतो. वर्गात लक्ष राहतं आणि सर्वांपर्यंत पोचता येतं,हे शिकवतांना नेहेमीच खूप कामी येतंच. आपल्या पायांवर उभे आहोत दिमाखात ह्याचा सतत प्रत्यय येत राहतो. असेच अखंड उभे राहायचे आहे ह्याचं बळ मिळतं. 


  

गुरुवार, ३० मे, २०२४

सुवासिकता


आमच्या सोसायटीची शान औरच आहे. वैविध्य रंगांनी नटलेली, सजलेली अशी. त्यात एक खास लहानपणीची आठवण करून देणारे घंटीच्या फुलाचे झाड पण आहे, म्हणजे पिवळ्या आणि केशरी रंगांची, दोन्ही. काल मी संध्याकाळी खाली जाऊन पाय मोकळे करत असतेवेळी माझ्या देखत आणि फक्त माझ्या साठी एक ताजतवानं फुल माझ्या पुढ्यात अवतरलं. अहाहा. मग काय विचारता? तो न्यारा सुगंध घेऊन मी वेगळ्याच विश्वात पोचले. कित्ती म्हणजे कित्ती वेळ तो सुगंध देत राहिला मला. इतका उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक असा अनुभव होता ना तो, कि ज्याचं नाव ते. 


उन्हाळ्यातला तो मोगऱ्याचा मंदधुंद सुवास अगदी बहुतांशी प्रत्येक फ्लॅट मधून येणारा कारण सगळ्यांच्याच बाल्कनीत मोगरा स्थानापन्न झालेला आहेच. सकाळची सुरवात काय मोहक होते म्हणून सांगू? हे काय कमी होतं, त्या नंतर एकावर एक घरं असल्यामुळे गवतीचहा घालून उकळी आली कि असं वाटतं कि जे शब्दात मांडणे अश्यक्यच.  माझ्यासारखी गवतीचहा वेडी सर्व ऋतूत तो वापरते, पावसाळ्यात आल्याला खास, विशेष प्राधान्य दिले जाते, आणि त्याचा घमघमाट तर वर्णन करण्या पल्याडचं. हेच आलं त्याच हिवाळ्यात "जिंजर कुकी" ह्या नावाने तय्यार केलं जातं तेव्हा ओव्हन ने पसरवलेला सुवास भूक चाळवून जातोच. हेचं आलं कढीची शान वाढवतं तेव्हाचा घमघमाट भूक वाढवून जातो. प्रत्येक वेळी ऊर्जेचे स्तोत वेगळे, घटक पदार्थ वेगवेगळे असतात तरी सुवास छाप सोडतोच.  स्वयंपाक घरात तय्यार होणाऱ्या गोड, तिखट, आंबट प्रत्येक पदार्थाची अवीट गोडी पोचतेच घरी आणि दारी सुद्धा. प्रत्येक मसाल्याचा सुगंध वेगळा आणि तो जेव्हा एखाद्या पदार्थाची शान वाढवतो तेव्हा तेव्हा प्रकर्षाने जाणवणारा घमघमाट पसरवतोच. शेकणे, शिजवणे, भाजणे, तळणे, बेक करणे, अगदी प्रत्येक वेळचा अनुभव निराळा. 


तर अशी हि आमची सोसायटी, सुगंधी. सातत्याने माणसांच्या स्वभावाचा, सहवासाचा, पदार्थांचा, फुलांचा, मातीचा, पॉलिशचा, रंगरंगोटीचा, पेट्रोलचा, आणि असे अनेक विविधत्वाने नटलेली. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण, या आणि स्वतः अनुभवा आमच्या सोसायटीचा अनोखा गंध. 

मंगळवार, २८ मे, २०२४

मानसिक स्थैर्य


मोबाईल हा एक नवीन प्रकार जेव्हा पासून उदयास आला आहे तेव्हा पासून जणू हा एक मानवी आणि जीवापेक्षा महत्वाचा अवयव झाला आहे. "जेथे जातो तेथे तो माझा सांगाती", जेव्हा पाहावं तेव्हा आणि ज्याला पाहावं तेव्हा फक्त मोबाईल हातात, सोबत आणि ध्यान लागल्याची परम अवस्था. काय बोलायचे हे समजतंच नाही मला. अगदी वाहता रस्ता म्हणू नका, दुकानं, गाडी चालवतांना (दोन्ही दोन आणि चार चाकी), उठता बसता... दमले मी बघूनच. मी तर असे दिग्गज बघितले आहेत कि जे उच्च विद्याविभूषित आहेत, अनेक दशकांचा अनुभव गाठीशी आहे, तरी देखील मोबाईल आणि सोशल मिडिया वर आलेला प्रत्येक संदेश, मग तो ऑडिओ असो, विडिओ असो, लिंक असो नाहीतर टेक्स्ट, वाचलाच पाहिजे, उघडलाच पाहिजे. कित्ती धोकादायक आहे ते, कसं समजत नाही ह्या मंडळींना? आणि का उघडायचा? दुसरे काही महत्वाचे करण्यासारखे नाही का? बरं पाठवणारा आहे हो भले हि ओळखीचा पण त्याचे मूळ? कोणाला ठाऊक? मग का?


वय, वर्ग, शैक्षणिक पात्रता, ठिकाण, कामाचा अनुभव, कामाचे स्वरूप काहीही म्हणजे काहीही फरक नाहीच. कोणालाही इतकं जवळ कधीच कोणीच बाळगले नसेल इतका त्याचा ध्यास आणि सहवास. कंटाळा येत नाही का? डोळे, मान, कान ई. दुखत नाहीत? 


आताशा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात वावरत असला तुम्हाला मिटिंग ला हजर राहणं आलंच, म्हणजे बोलणं आणि समजावून सांगणं देखील आलं, त्यामुळे मुका सुद्धा बोलायला लागला आहे आजकाल. मुका म्हणजे अगदीच शब्दार्थी घेऊ नका. अबोल म्हटलं तरी चालले. प्रेसेंट केलं नाही, काम कसं आणि किती वेळेत केलं हे समजावून सांगितले नाही तर गाडी पुढे जाणारच नाही. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा म्हणजे ह्या मोबाईल मुळे आणि अर्थातच तंत्रज्ञानामुळे सगळे सतत बोलतांना आढळतात, काय आणि कुणाशी इतके बोलतात कुणास ठाऊक. आणि मी असे संशोधन पत्रिकेत ऐकले आहे कि बोलका माणूस मोकळा असतो. त्याच्यात काहीही साठून राहात नाही. त्यामुळे तो आतून शांत असतो. तिसरे म्हणजे व्यक्त झालीत सगळीच माणसं आताशा, ह्या ना त्या पद्धतीने. काही जण बोलण्याला प्राधान्य देतात, काही रील्स करतात, काही जण लिहून मोकळे होण्याचा अनुभव घेतात, आपआपली मते मांडतात, आणि आवर्जून करतातच. 


मग एक फार मोठा प्रश्न उद्भवतो माझ्या देखत तो असा कि मग ह्याच सगळ्या मोकळ्या माणसांना मानसिक आजाराची लक्षणे का दिसत आहेत आणि ती देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्वत्र पसरलेल्या अवस्थेत? सगळा समाज पोखरून निघतो कि काय हि भिती आता निर्माण झाली आहे. दिसायला उत्तम, वागण्या बोलण्याला व्यवस्थित, कामं मार्गी लावणारा तरी देखील मानसिक रित्या खोकला का? काय त्रासदायक आहे असं? सर्वांचे स्वभाव असे का होत चालले आहेत? हा एक गहन आणि गंभीर प्रश्न आहे, सर्वच वयोगटासाठी आणि जगभरात निर्माण झालेला. काहीही होऊ नये म्हणून तर सगळे जणं स्वतःला गुंतवून ठेवत आहेत ना त्या मोबाईल नामक निर्जीव वास्तूसोबत, व्यक्त पण होत आहेत, आता पुढे काय करायचं हा देखील प्रश्न नाहीच कारण खूप काही मोबाईल ने दिले आहे करायला. बरं आधी सारखं नाही, आता भिशी आहे, सहली सजह काढल्या जातात, हवी तेवढी खाण्याची ठिकाणे आहेत, ओला आणि उबेर आहेत, नको तेवढ्या, जुन्या पान्या मित्र मैत्रिणीचा गोतावळा आहे, मग काय उणं आहे? समाधानी वृत्ती का नाही मग? अजून काय हवंय?  हे सगळं नव्हतं तेव्हा माणसं शांत निद्रेचा अत्यानंद घेत होती, अचानक दत्त म्हणून घरी येत होती आणि जेवूनच जात होती, कमाई थोडी होती, कुठलेही सहज उपलब्ध तंत्रज्ञान नव्हते खेळण्यासारखे वापरायला. 


डोळे उघडा, नीट बघा, आजार टपकण्याची वाट बघू नका, सर्व काही प्रमाणात वापरा, सर्वकष स्वरूपाचा विचार आणि आचार ठेवा, मोबाईल आपल्यासाठी आहे हे विसरू नका, घरची कामे करा, व्यायाम करा, जेवतांना जेवा फक्त, माणसाने माणसाशी माणसासम वागून तर बघा, सातत्याने स्क्रीन टाळा मंडळी, कृपया.  खूप उत्कृष्ट गोष्टी आहेत, कामे आहेत, संध्या आहेत, जरा मान वळवून तर बघा.  

नागपूरकरांचे नवखे दर्शन


माझ्या संत्रा नगरीचा मला अभिमान होता, आहे आणि सदोदित राहील. पूर्वीचे नागपूरकर कसे होते हे जगमान्य होतं आणि ठाऊक होतं. तिथल्या पाण्याचा रंग अनोखाच आणि ढंग देखील. तिथल्या हवेत आणि पाण्यात जी काय जादू आहे, ती अनोखीच, पट्टाकिनी लक्षात येतेच. "कालाय तस्मै नमः", म्हणतात ते काही वावगं नाहीच. काळ आपला महिमा दाखवतोच. त्याची जादू निराळी आहेच. आणि "बदल हाच तर स्थिर आहे" ना सगळ्यात. जुने आणि असली नागपूरकर पांगलेत इकडे तिकडे, नोकरी निमित्य किंवा इतर कारणांनी. त्यामुळे माझ्या लाडक्या संत्रा नगरीत एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती दृश्य आहे. जे नागपूरकर पांगले आहेत ते नागपुरी हवाहवासा बाणा इतरत्र पसरवत आहेत. म्हणजे उत्तमोत्तम गूण बाकिच्यांना पोचत आहेत त्या अनोख्या मातीचे. आत्तापर्यंत तरी बघितलं, ऐकलं, सानिद्यात आलं कि कळत होतं कि हि व्यक्ती नक्कीच नागपूरची आहे. पण एवढ्यात मला एक नवीन नवखा अनुभव आला आणि थोडासा हादरा बसला. मुळचे एक नागपूरकर कुटुंबीय सध्या दुसऱ्या ठिकाणी स्थायिक आहेत. माझी त्यांची अनेक वर्षांची ओळख. जेव्हा यथोचित ठरलं भेटायचं तेव्हा का कुणास ठाऊक मनात पाल चुकचुकलीच पण तरी देखील म्हटलं नाही असं होणं शक्य नाही. पहिला धक्का बसला जेव्हा उण्ग्यासारखा पत्ता पाठविला. पोचले तर घर कुठे सापडतंय. आपलं घर खोपच्यात आहे म्हटल्यावर जरा आजूबाजूची माहिती, किंवा खूण द्यावी का नाही? म्हटलं असो. मग पोचले घरी, एका खुर्चीचं ऑफिस आहे तेथे बसलो, मोघम बोललो. आधीच काय काम आहे ते कळवलं होतं, मला वाटलं ते तयारीने बसतील, उत्तरे तय्यार ठेवतील मस्त भन्नाट काही तरी ऐकायला मिळेल, पण छे. मग कसा तरी पाण्याचा पेला आला समोर. आणि हो विसरलेच. काही किलोमीटर प्रवास झाल्यावर मला अचानक फोन आला कि "आमच्याकडेच आज नाश्ता करायचा हं". मी सांगितलं कि मी इथपर्यंत पोचले आहे आणि घरूनच व्यवस्थित खाऊन निघाले आहे.  मनात म्हटलं हि काय वेळ आहे आमंत्रण द्यायची. कित्ती दिवस आधीच ठरलं होतं तेव्हा नागपुरी आग्रह गेला कुठे? असो. कसं तरी बोलणं झालं, मग लहान मुलांना वाढतो तेवढे आजाऱ्याचे पोहे आले पुढ्यात, आणि त्या सोबत फूस झालेली राजगिरा वडिचा तुकडा. आजाऱ्यासाठी खास तय्यार केलेले, अगदी काहीही न बघितलेले असे पोहे, म्हणजे अगदी हळद, मीठ, तिखट सुद्धा विसरलेले. असो. रसविरहित जे काही बोलणे सुरु होते ते एकतर्फी होते, मध्ये फक्त काही हुंकार किंवा छोटीशी वाक्ये येत होती, पोहे खाता खाता. त्यांनी अक्षरशः डोळे मिटण्याच्या आत ते पोहे फस्त पण केले. आणि मग दोघे आपआपले फोन बघायला लागले, चाळवाचाळव करायला लागले. ती देहबोली हे स्पष्ट दर्शवत, खुणावत होती मला कि कधी निघताय? माझं नशीब बलवत्तर त्यामुळे मला पट्टाकिनी उबेर मिळाली. गेट पर्यंत सोडायला आले तेव्हा मी म्हटलं कि या आता माझ्या घरी, भेटू आणि भेटत राहिलं पाहिजे. घरी या, कारण माझ्या आजूबाजूला आपल्या दोघांच्या ओळखीचे अनेक जण राहतात. मी सर्वानांच बोलावून घेते. पण "तू पुन्हा ये निवांत, सावकाश, जेवून गेली असतीस तर बरं वाटलं असतं, किंवा काय हे धावपळीत येणं, पुढल्यावेळी जरा वेळ काढून ये..... ह्या पैकी काही म्हणजे काही च कानावर पडले नाही. टॅक्सी वाळल्यावर मी हात काढून टाटा करणार तर बघते काय गेटपाशी कोणीच नाही हो. घरात सुद्धा शिरले नाही मी, घर दाखवतो ना आपण फिरवून, ते नाही. चार घरं सोडून अजून एक दोघांच्या ओळखीचे राहतात. आधी आमचं एक दोनदा बोलणं झालं होतं फोन वर तेव्हा मी इच्छा व्यक्त केली होती कि अनायासे मी इतक्या दूर येते आहे तर एकाच ठिकाणी दोघांना भेटू. त्याची पण काहीही व्यवस्था केली नाही, सुतवाच्य पण नाही हो. मला वाटलं कि मला सरप्राईझ देतील दोन्ही कुटुंब, पण अगदीच नाही.  कमाल कमाल आहे.  इतके कोरडे नागपूरकर हे अस्वस्थ करणारं आहे मला. कसं शक्य आहे हे? मी स्वप्न तर नाही ना बघितलं? वाईट स्वप्न? पण नाही, टॅक्सी ला नोटा दिल्या मी दोन्ही वेळा, कारण भरपूर भाडं झालं, अंतर लांब असल्यामुळे. असो. 


माझे बाबा म्हणतात तसे, प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. प्रत्येक म्हणजे फक्त माणूसच नाही, प्रसंग देखील. शिकण्यासारखं म्हणजे प्रत्येक वेळी काय करायचं, किंवा काय घ्यायचं असंच नाही तर काय करायचं नाही हे पण प्रकर्षाने शिकण्यासारखे आहे. हा प्रसंग मला नागपूरकर असे वागूच शकत नाही, किंवा कोणीही घरी बोलावून असे वर्तन करू नये हे शिकवून गेलं नक्को. मस्त धडा मिळाला. खूप समाधान मिळालं कारण नकळत मला अगदी आदल्या दिवशी झालेली अजून एका नागपूर च्या कुटुंबाकडून आवभगत आठवली आणि इतर अनेक अत्योत्तम असे प्रसंग आठवले, आणि खूप जणांशी मनःपूर्वक जोडले गेले, जास्त प्रकर्षाने. माझी नवीन भागात मस्त मोठ्ठी लांब चक्कर झाली. खूप नवनवीन रस्त्यांवरून भटकंती करून आले, मनसोक्त, कुठलीही घाई नाही, घड्याळाच्या काट्यांवर पळायचे नाही, शोरूम मधून नुकत्याच, अगदी माझ्यासाठी बाहेर पडल्या होत्या कि काय अश्या कोऱ्या करकरीत गाड्या दोन्ही वेळा लाभल्या. अजून काय हवंय मला. आणि हो, माझ्या हातून होणारे पोहे कित्ती म्हणजे कित्ती चविष्ट, अप्रतिम, भन्नाट आणि सर्वगुणसंपन्न असतात हे नव्याने कळले, शिक्कामोर्तब झाला. अहाहा च. 


पुण्याच्या पाण्याचा असर होता, कि घरी काही गडबड होती, केमिकल लोचा झाला होता का? माहित नाही. पण जे काही असेल ते सगळ्यातून निघून पुन्हा एकदा संत्रा नगरी सारखे सर्वांशी वागोत हि सदिच्छा.  

रविवार, २६ मे, २०२४

वर्थ

 मी काल माझ्या एका खास, आवडीच्या आणि सूर जुळलेल्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. सर्व भेटीच्या आठवणी सामावून घेत परत निघाले. सातची वेळ साधारण त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच गाड्या होत्या, माणसं होती, चाकरमानी पण असतील त्यात कदाचित. बरेच ठिकाणी थांबत थांबत / थबकत थबकत माझी टॅक्सी पुढे जात होती. त्यामुळे मावळता सूर्यामुळे आकाशात निर्माण झालेली जगावेगळी रंगबीरंगी नक्षी भन्नाट दिसली, भावली. भव्य रस्ते, मोठ्ठी दुकाने ई. बघतांना एक प्रकर्षाने जाणवले. एका रांगेत काही दुकाने होती त्यात कारागीर कपाटे तय्यार करत होती. काही तय्यार झालेली कपाटे रस्त्यावर, म्हणजे दुकानाच्या दृश्य भागी मांडून ठेवली होती. लक्ष वेधून घेतील असे काही माझ्या चार डोळ्यांना दिसले. मी आजतागायत फक्त भल्या मोठ्या आकाराची महागडी मार्बलची फरशी बघितली होती. पण हे म्हणजे माझ्यासाठी तरी वेगळं होतं. हुबेहूब त्याच मार्बल ची प्रतिकृती होती ती. तीच रचना, मूळ कल्पनेचा आराखडा जसाच्या तस्सा उतरवला होता, पण अर्थात  सनमाइका डिज़ाइन स्वरूपात. जबरदस्तच. दिसायलाच इतकं वेगळं वाटलं कि ज्यांना खोलीची भव्यता दाखवायची आहे, किंवा फर्निचर चं वेगळेपण दाखवायचं नाही आहे, लपवायचं आहे अश्यांसाठी खास केलं होतं असं वाटलं. काही जण फरश्या पण भिंतींवर लावतात ना (तश्या वेगळ्या पण मिळतात) तसेच काहीसे भासले दुरून बघते वेळी पण ते प्रत्यक्षात मात्र कपाट होते. इतके हुबेहूब उभे करणे हि कमाल आहे आणि मी पहिल्यांदा हे बघितल्यामुळे मला वाटल्याशिवाय राहिलं नाहीच कि असं पण कपाट होऊ शकतं हे कसं काय कोणाच्या डोक्यात आलं असणारं? 


माझ्या विद्यालय / महाविद्यालयाच्या दिवसात नागपुरात एक वेगळ्या धाटणीतली सोसायटी बांधली गेली होती आणि ती माझ्या बघण्यात पण आली, जंतरमंतर. जमीन आणि भिंत एकाच रंगसंगतीचे म्हणजे भुलभुलैय्या सारखं अनुभवता येईल त्या घरात. माझी लेक नेहेमीच म्हणते मला, काहीही झालं, कुठेही गेलीस तरी नागपूर कसं नजरेस पडतं तुझ्या, नेहेमीच, सदोदित? 


एकंदरीत काल माझं बाहेर पडणं सार्थकी ठरलं.  "इट वॉज वर्थ इट". पुन्हा एकदा लहान मुलं झाल्यासारखं वाटलं मला, माझ्या बाबांच्या गाडीतून चक्कर मारतांना जगावेगळा अनुभव मिळायचा अगदी तस्सा. 

मधुर रसाळ

 मनमोकळा संवाद आणि हलका फुलका हसण्याचा आवाज दारावरची पाटी वाचतांनाच आला. दार उघडले तर काय? आल्हाददायक गारेगार वातावरण. निश्चितच ते वातानुकुलीत यंत्राने उगाचच थंड करायची म्हणून हवा गार केली नव्हती हे निश्चित समजले. मी पहिल्यांदा हजेरी लावली होती त्यामुळे मी पूर्णपणे अनभिन्य होते. आवाजावरून लक्षात आले कि हा कूलर आहे, चार डोळ्यांनी बघितल्यावर माझे नागपूर उभे ठाकले असे दृश्य दिसले. तो डेसर्ट कूलर होता, खोली बाहेर मांडलेला, स्थानापन्न झालेला असा, क्या बात है? अपार्टमेंट मधे हे मी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच अनुभवलं प्रत्यक्ष, अगदी तिथल्या मंडळींसारखे, वेगळे, उत्कृष्ट आणि भन्नाट. ती माझ्या माहेरचीच / माहेरच्या गावचीच मंडळी होती, "नो वंडर" त्यामुळेच अशी सुरवात झाली आमच्या भेटीची, जी खूप महिन्यांनी होत होती. ठरतंच नव्हतं काही कारणांमुळे. आणि मग काय विचारता, त्या गप्पा अघळ पघळ अश्या, ते सुबक सुंदर घर, दिलखुलास माणसे, चविष्ट नाश्ता आणि अनेक विषयांची देवाण घेवाण त्या तासात झालेली. असं फक्त आमच्या नागपूरकरांचंच होऊ शकतं हे निश्चित. कुठलेही टोकाचे विषय नाहीत, कोणा  एका बद्दल पाल्हाळ लावले नाही, उणे-दुणे तर नाहीच नाही, अनेकविध विषयांवर मस्त चर्चा झाली. नवीन मंडळींची थोडक्यात ओळख झाली.  पट्टाकिनी बरी झालेली, अगदी पहिल्यासारखी फ्रेश, उत्साहपूर्व / उल्हासित मैत्रीण बघून, बोलून, तिच्या सोबत वेळ घालवून एक वेगळी पर्वणी लाभली  /गाठली असं वाटलं. 

"चेरी ऑन केक" म्हणजे वातावरण मस्त होतं, गर्मी विशेष नव्हती, दोन्ही वेळा उत्कृष्ट गाड्या आणि वाहनचालक मिळाले. माझ्या घरापासून साधारण अर्धा तास लागला जायला आणि यायला. त्या बघत माझं फारसं काय नाहीच जाणं होत. त्यामुळे मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं, माहेरी जातांना कसा उत्साह असतो तसं झालं. जातांना एका बाजूचे नवनवीन दुकानं, गगनचुंबी इमारती, सजलेले / नटलेले रस्ते, वेगळं दृश्य बघत बघत, अत्यानंद घेत मी पोचले, मस्त हवेशीर आणि मोकळ्या जागी वसलेल्या सोसायटीत. आणि येतांना रस्त्याची दुसरी तितक्याच ताकदीची दुसरी बाजू होतीच. मोठ्ठी चक्कर अनुभवता आली. काय ती भव्य दिव्य फर्निचर ची दुकाने, ओळीने, दुतर्फा, अबब च. भले मोठे रस्ते काय, उड्डाणपुलं काय, बागबगीचे काय, अहाहा च.  

एकंदरीतच अनुभवलेला नागपुरी बाणा (मधुर रसाळ नेहेमीच) वाखाणण्यासारखाच होता. माझ्या माहेरच्या गावचं पाणीच वेगळं आहे, त्यामुळे अशीच मंडळी असणार, खुलल्या स्वभावाची, अनोळखी व्यक्तीला पण आपलंस करून घेणारी अशी, पुन्हा पुन्हा भेटावसं वाटणारी अशी. क्या बात है? सहीच. 

"अश्या भेटी होती आणिक स्मृती ठेवुनी / देऊनी जाती". 


बचत पिंड


स्वभाव असतो का घडतो का घडविला जातो हे मला आज सुस्पष्ट झालं. 

मला समजायला लागल्या पासून फक्त माझ्याच घरात नाही तर आजूबाजूला, शेजारीपाजारी आणि सर्वत्रच एक घोष वाक्य ऐकत आम्ही सर्व जणी मोठ्या झालो. "सासरी जायचं आहे". बसणं, उठणं, सवयी, खर्च ई. सगळं म्हणजे सगळं सासरी जायचं आहे ह्यांच्याशीच कसं निगडित होतं कोणास ठाऊक? पैसे अगदी सांभाळून खर्च करायचे, कारण एक तर वडिलांचे आहेत, खरंच गरज आहे का?, अशीच सवय टिकून राहिली तर? त्यामुळे सातत्याने अकुंश ठेवला जायचा, गरज नसतांना, परिस्थिती असतांना देखील. असं होता होता स्वतः कमवायला लागल्यावर ५०% बचत करायची असे वडिलांनी सांगितले. कुठे ठेवायचे ते पैसे हि दिशा दाखवली. उरलेले पैसे गाडीच्या सर्व्हिसिन्गला, इंधनाला, वाढदिवस वगैरे अश्या ठिकाणी, किंवा घरी आई वडिलांना काही छोटं मोठं आणण्यात खर्च होत असतं. हे सगळं करते वेळी वाटलं कि सासरी गेलं कि सगळंच आलबेल असणारच, म्हणजे दुसरे मत नव्हते, कुठलेही स्वप्न नव्हतेच, खात्रीच होती. पण तेथे पण जपून वापरणे च पदरी पडले. किंवा इतक्या वर्षांची सवय एकदम मोडली नाही. मग घरासाठी, मुलांची फी, हे - ते खर्च, सरकारी नोकरी नसल्यामुळे मग नंतरच्या वेळी / उतार वयात कामी येतील म्हणून ठेवले गेले काही. जोडीदाराने भरपूर खर्च केले पण कुठेतरी ती कुणकुण होतीच, स्वछंद वागता आलेच नाही.  आता काय इच्छा निवृत्ती, त्यामुळे अजूनच फुंकून मार्गक्रमणा. आजचीच ताजी पिटुकली गोष्ट. काहीही कारण नसतांना मनात आलेली. दोन कंपन्यांची टाल्कम पावडर ची किंमत बघितली. नेहेमीची पावडर फक्त मंद सुगंध देते आणि दुसरी बघितली ती कमी किमतीत (डील सुरु असल्यामुळे) पण अत्तर किंवा परफ्युम लावल्याचा आनंद देते, एक दगडात दोन ... मग का नाही घेऊ मी. मनाला शिवले कि दोन जिन्नस घेण्या ऐवजी एकाच घेऊ. 

जडण घडण, आजूबाजूचे तेव्हाचे वातावरण असे होते कि उद्या माझीच मुलं कमवायला लागल्यावर त्यांच्या पुढे हात कधीच पसरवणार नाहीच. 

म्हणजे बचत हा पिंड / स्वभाव झाला आहे माझा किंवा माझ्या वेळच्या मराठी, साध्या, मध्यमवर्गीय मुलींचा. हवे तेव्हा, हवे तेवढे खर्च करतो, केला आहे, कंजूस नक्कीच नाही, रडत बसत नाही पण हात राखून म्हणतात ना तसे काहीसे. चांगली सवय लावली आहे कळत - नकळत. त्यामुळे थोडे तरी बाजूला राहिले आता. कशी मज्जा असते नाही. नोकरी करणारी मी, किंवा माझ्या सारख्या चाकरमान्यांना नाही भावात कोणालाच पैसे मागायला आणि उडवायला. तक्रार अजिबात नाही, खूप म्हणजे खूप धूम केली जेवढं होतं तेवढ्यात, सगळ्यांनीच हं, आई बाबांनी, लग्नाच्या आधी, लग्नानंतर, मुलांसोबत, हे खूप मस्त आहे आणि शिकवणारं असं, खूप समाधान आहे. जमिनीवर पाय  घट्ट रोवून आहेत हे सगळ्यात महत्वाचं.   

शनिवार, २५ मे, २०२४

लुडबुड

 आत्ताची जी तरुण पिढी आहे त्या विषयी माझ्या सारख्या आधिच्या शतकात जन्मलेल्या, वाढलेल्या सर्वच व्यक्तींना असे वाटते कि ह्यांचं काही खरं नाहीच. बाकी सर्व मला बोलायचे नाही पण रात्री अपरात्री जागणे म्हणजे काय ना? आणि ते देखील सातत्याने? का? कशासाठी? शिस्त अशी राहिलेली नाहीच. गेम खेळत बसत असतील नाही तर वेळ वाया घालत, बाकी येतंय काय? "लवकर निजे, नवकर उठे त्यांना आरोग्य धन संपत्ती लाभे" हे लक्षात कसं येत नाही ह्या तरुण आणि सो कॉल्ड स्मार्ट पिढीला. सर्वत्रच असे दिसून येते. ह्या अश्या सततच्या कानावर पडणाऱ्या वाक्यांनी मला काही आठवलं. 

एक आणि सर्वात माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे: मी अगदी सुरवातीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात वावरते आहे, मग ते अगदी छोटेसे तंत्रनिकेतन असो, इंजिनीरिंग महाविद्यालय असो, अमेरिकेतील भली मोठी युनिव्हर्सिटी, आंतराष्ट्रीय विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय कंपनी असो. माझे शिकवण्याचे काम पेहेलू पाडत / पडत अविरत सुरु आहेच त्याच्या कृपेने. अश्या क्षेत्रात राहायचे म्हणजे विद्यावाचस्पती हि पदवी अत्यंत महत्वाची कारण त्याने माणूस पुन्हा एकदा, नव्याने घडतो. पण नेमकं त्याच वेळी भारतीय आणि मध्यम वर्गीय मुलगी असल्यामुळे लग्न, कार्य, मुलं हे ओघाने आलंच. ते टाळता येणं जरा मुश्किल. मग असं असतांना, म्हणजे पूर्णवेळाची नोकरी, पूर्णवेळापेक्षा मोठी जुळ्यांची जबाबदारी, घर थोडेफार आणि त्यात PhD म्हणजे तारेवरची कसरत. पण त्याने मार्ग दाखवला. मी रात्री लवकर झोपून पहाटे एक ते दीड च्या सुमारास उठायचे आणि पाच वाजेपर्यंत काम करायचे. पाच ते सहा डबे, सहा ते पावणे सात मुलांच्या शाळेची तय्यारी, ई.  हि अशी माझ्या PhD ची गाथा. त्या अवीट गोड  वेळी मला मम्मा हे दे, ते दे, बाहेरचे आवाज, गोंधळ, दारावरची बेल, बायका आणि त्यांचा गगनाला भिडणारा आवाज हे सगळं टाळलं जायचं.  त्यामुळे काही तास लागण्या ऐवजी मिनिटात अशी कामे व्हायची, डोकं चालायचं आणि मज्जा घेता यायची. 

दुसरं म्हणजे: माझी लेक निरीक्षणाअंती मला सांगते कशी एक चित्रपट बघतांना कितीदा थांबवतेस ग? सलग पाहात जा ना? रात्री सगळे निजले कि मग शांतपणे न ब्रेक घेता उपभोग घ्यायचा मम्मा. हे मला इतकं पटतं ना, कि आजचंच घ्या ना, मला सकाळची कामे, व्यायाम आटपून एक चित्रपट बघायची इच्छा झाली, तीव्र म्हणायला हरकत नाही, जसा तो चित्रपट सुरु झाला तशी दारावर मावशी हजर आणि त्यांनी जी भांडी आदळायला सुरवात केली म्हणून सांगते कि माझी इच्छा दीड तास थांबून राहिली. ते होत नाही तर लेक उठली, मग तिचे चहा पाणी गप्पा, ते होत नाही तर गाडी पुसणारा आला देवा... 


आत्ता समजलं, मी लेखिका वगैरे नाहीच, पण असं मनापासून वाटतं कि एक काही तरी माझ्या हातून जर लिहायचा योग आला आहेच तर ते एका बैठकीत पूर्ण व्हावं, म्हणजे मग ती लय सांभाळली जाते. 

अगदी तसेच, जे आत्ताचे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे, कोड करून बघणारे, कायद्याचा अभ्यास करणारे, संशोधन करून पेपर लिहिणारे ई. आणि अनेक असे, ज्यांना हे सगळं करते वेळी शांतता प्रिय असेल किंवा एका जागी बसून करण्याची इच्छा असेल तर मग उपरात्रीची वेळच योग्य, नाही का?

"चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" ह्या वर विश्वास ठेवून अधे मधे एखादा गेम, अगदी काही मिनिटे फक्त खेळाला तर वेगळी ऊर्जा मिळत असावी कदाचित, अर्थात आहारी न जाता. 

तिसरेआणि सगळ्यात महत्वाचे: माझ्या लहानपणी किंवा कमवण्याच्या आधी त्या काळच्या आई वडिलांची एक सवय होती कि मुलांना भरपूर कामं सांगायची. तो दृष्टीस पडला रे पडला कि बास, अर्थात त्यांच्या वयाला शोभतील अशी. तेव्हा असं वाटायचं कि कामे केल्याने शिकता येतं भरपूर. नाही म्हणता येत नव्हतं मुलांना तेव्हा त्यामुळे सकाळी लवकर उठायचा शिस्ता आणि त्यानंतर ओळीने काम. काही जण आपल्याच मुलाला तुला हे जमत नाही, ते करता येत नाही, तो बघ, तिच्या कडून शिक .... अशी सरबत्ती देखील लावत असतं. हे सगळं उगाचच का ऐकायचं हा आताच्या मुलांचा पवित्रा. म्हणूनही सकाळी आई वडील, किंवा वडील असे पर्यंत डोक्यावर पांघरुणच. मला आवडली हि पद्धत. आवडली म्हटल्या पेक्षा भावली. 

आधी मला असं वाटायचं कि शरीराला एक लवकर उठायची, वेळेची, खायची शिस्त पाहिजे. मग ह्या मुलांना नाही आहे का शिस्त? तर आहे ना. त्यांचे शरीर आणि सर्व यंत्रणा त्यांच्या वेळेनुसार चालते, व्यवस्थित. त्यांना भूक लागते, पचते, अजून काय हवे?

आधी व्यायाम हा रिकाम्या पोटी करावा असा बडगा असायचा. आता रात्री सुद्धा जिम दुथडी भरून वाहात असतात. 

बदल हाच स्थिर असतो, हे अगदी खरं आहे. 

चला तर मग नवी पहाट अनुभवूयात, किंवा कोणाची लुडबुड नको असेल तर वर सांगितल्याप्रमाणे तरी वागा नाही तर बेल बंद करा, बाईंना सुट्टी द्या आणि शांततेत चित्रपट बघा.  

शुक्रवार, २४ मे, २०२४

विजय असो

 चावणे हा डासांचा स्वभावच आहे. ते त्यांचं खाद्य आहे हे हि तितकंच खरं आहे. त्यांच्या चावण्याने जेवढा त्रास होतो तेवढाच कानाशी गुणगुणण्याने देखील, मग उगाचच त्यांना हाकलण्याचा आणि असफल असा मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात आपणच मार खातो. ह्या सगळ्यात मला आज एक नवीन गोष्ट ध्यानात आली, एक वेगळा फॉर्मुला / समीकरण. बाकी सगळी शास्त्रीय कारणे आहेत, मान्य पण आहेत आणि मी त्या विषयाची अभ्यासक नाही. 

कोवळी, मऊ, लहानमुलांची नितळ, गोरीपान त्वचा नक्कीच काळ्या डासांना आकर्षित करत असणार. मग ती फक्त दुरून बघण्यापेक्षा बसून बघावे त्यावर असं त्यांना वाटणारच ना? त्यात काय वावगं आहे. मग फक्त बसून चालत नाही तर मग स्वभाव आडवा येतोच. मग एकाच प्रकारच्या त्वचेवर का बसायचं, फक्त एकाच प्रकारची अनुभूती का घ्यायची, विविधता हवीच म्हणून मग खूप सारे हात, पाय चाखले जातात सहज. 

माणसाचा स्वभाव पण आहे, वैताग आहे, झोप मोड होते, खाज सुटते आणि हो आजार होण्याची पण भीती असते डास चावल्यावर. त्यामुळे माणसाच्या स्वभावानुसार त्यांना मारलं जातं. हाताने, रॅकेटने, गुड नाईट च्या मशीनने आणि इतर काही पद्धतीने. मग त्यांना त्याचा वचपा काढावासा वाटलंच ना? साहजिक आहे. त्यामुळे मग चव, मस्त चावा घ्या असे ते चक्र सुरूच राहतं. जशी जशी माणूस त्यांना मारण्यासाठी विविध गोष्टींची निर्मिती करतो आहे, तशी तशी त्यांची ताकद देखील वाढते आहे, ते जास्त निगरगट्ट होत आहेत आणि सरते शेवटी काय कलियुगाचा महिमा. मग तो डासांना पण लागू पडतोच ना. आपण जसं त्यांना मारण्यात किंवा ते चावू नयेत म्हणून मागे पुढे बघत नाही तसे ते देखील करतातच. तुम्ही कुठेही असा, कुठल्याही वेळेला, काहीही पेहेराव करा ते स्वभावानुसार चावणार म्हणजे चावणारच. आपण एक मारला कि कदाचित तिकडे बदला म्हणून किंवा नैसर्गिक प्रक्रिया म्हणून आधीच १०-१०० तय्यार होत असणार. 

तुम्ही म्हणणार हे सगळं तर आम्हाला ठाऊक आहे, हि काय नवीन सांगते आहे?

मला आज हे जाणवलं कि डासच नाही तर चावा घेणारे अनेक जण असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या, मग आपण त्यांना चावणे योग्य नाही आणि शक्य नाही. पुढे जा, त्यांना मारा, हाकला, स्वतःला जपा, बाकीच्यांची पण काळजी घ्या पण थांबू नका, तक्रार तर नकोच, पर्याय शोधत राहा. चावणे हा धर्म, स्वभाव, कृतीचा, रुटीनचा आणि हक्काचा एक महत्वाचा भाग आहे चावणाऱ्यांचा, अगदी तस्साच शांत राहून कृती करत राहायचा आपला, नाही का? तुमच्या जोमाने पुढे जाण्याच्या कृतीकडे बघून, निरखून ते शेवटी हात टेकणार हे निश्चित. त्यांना खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ते चावतात म्हणून नवनवीन तरणोपाय शोधले जातात आपल्या हातून. हे हि नसे थोडके ना?

त्यांच्या स्वभावाचा विजय असो.   

 

कारण


कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम जो अमिताभ जी ज्याचे यजमान पद भुषवितात तो बघतेच. अर्थात ऑन - एअर असतांनाच जमेलच असे नाही. पण  तंत्रज्ञानाच्या  मदतीमुळे मला हवा तो भाग हवं तेव्हा बघता येतो, त्याचा आनंद उपभोगता येतो. हा कार्यक्रम फारच लोकप्रिय झाला आहे आणि त्याच मुळे गेले १५ क्रतू त्याचे झाले आहेत. जे खूप वाखाणण्यासारखंच आहे. 


माझी आई जेव्हा पासून टीव्ही आला अस्तित्वात आणि तुरळक घरात सुरवातीला तेव्हा पासूनच म्हणते आहे कि हा ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही करतो, त्याच साठी घडला आहे.  त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक ठळक कार्यक्रमाच्या दोन बाजू आहेत. ह्या कार्यक्रमातून खूप ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचा असंख्य नागरिकांना  फायदा होतोय. हे जरी खरं असलं तरी माझ्या साठी दुसरी बाजू जास्त महत्वाची आहे. बघता बघता मला ह्या दुसऱ्या बाजूने जास्त आकर्षित केलं. त्याची असंख्य  कारणे आहेत.  जसे जसे ह्या कार्यक्रमाने ऋतू बघितले तसे तसे तो जास्तीत जास्त वृद्धिगत होत गेला. कार्यक्रम बहराला म्हणजे संपूर्ण टीमचं उत्साहाने काम करत गेली आणि नवनवीन सफल प्रयोग करत आणि मांडत गेली. जे माझ्या सारख्या आणि इतर प्रेक्षकांना खूपच भावले, भिडले थेट. तो संपूर्ण भव्य दिव्य सेट उभारण्याचे श्रेय आणि त्यामागचं वैचारिक कार्य म्हणे एका मुलीने केलं आहे. तिथूनच मी प्रेमात पडले ह्या कार्यक्रमाच्या. जी काही विविधता त्या सेट वर बघायला मिळते त्यानेच डोळे दिपतात अक्षरशः. अमिताभजींचे पोशाख अथ:पासून इतिपर्यंत ठरवणे, त्या करता वाट्टेल तिथे भटकणे, भलभलत्या लोकांना गाठणे, करवून घेणे, हे सगळं पण एक मुलगी करते प्रकर्षाने. अर्थात ह्यांची चमू असणार पण डोकं तीच आहे. तिच्या बद्दलची मुलाखत ऐकली आहे मी. म्हणून लिहिते आहे.  कुठल्या दिवशीचे काय महत्व आहे, कोण येणार आहे, विषय काय सुरु आहे, आणि असे बरेच कंगोरे लक्षात घेऊन सूत्रसंचालन ठरवले जाते. रंगसंगती, अधिक उपयुक्त पूरक घटक / ऍक्सेसरीज ठरवले जातात. ते इतके भन्नाट असतात माझ्यासाठी कि मी त्याची दिवानी होते बघितल्या बघितल्या. उदाहरणार्थ टाय बांधण्याची एकाच पद्धत आहे किंवा तो एकाच प्रकारे घालून मिरवला जातो हे मला माहिती होतं. म्हणजे टाय हा एक घटक आहे, एक कपडा आहे, ज्यात कधी प्लेन, तर कधी विविध रंगांची उधळण केलेले असतात, पण तो एकाच तुकडा असतो, विशिष्ट पद्धतीने शिवलेला. पण अहो महद आश्चर्यम, काल बघते तर काय, एक वैविध्य रंगानी सजलेल्या टायची थोड्या मोठ्या आकाराची जणू गादी होती ज्यावर एक प्लेन नेहेमीचा टाय पहुडला होता. संपूर्ण कार्यक्रमात मी फक्त तेच बघत राहिले आणि माझे अक्षरशः ऍक्टिव्ह मेडिटेशनच घडले. वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारच्या, फॅशनच्या, रंगांच्या, सुशोभित केलेल्या पिना ज्या त्यांच्या कोटाची शोभा वाढवतात म्हणून सांगते, अहाहा च. त्यांचे बूट, मोजे, घड्याळ आणि पाकीट शुशोभीकरणावर घेतलेली मेहेनत नजरेस पडतेच. कोट नसेल तर बाकी कपडे देखील लक्ष वेधून घेतात माझे. अधेमधे जमलंच तर मग मी प्रश्न उत्तर बघण्याचा प्रयत्न करते. हे काय कमी होतं, सगळ्यात भारी म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची एबी नि केलेली सुरवात, कधी गोष्ट, कविता, चारोळ्या, अनुभव, ओव्या ई. असे अनेक वैचारिक, बहुउपयोगी पेहेलू पाडलेले असतात. क्या बात है? जे कोणी हे ठरवतं त्यांना माझा संस्थांग नमस्कार. हे सगळं पाहण्यासाठी म्हणून मी टीव्ही समोर बसते. संपूर्ण चमूचे कौतुक करावे तितके कमीच आहे. जरी त्यांचे ते काम असले, अर्थार्जन होत असेल त्यातून, तरी प्रत्येक वेळी, वेळोवेळी, वर्षानुवर्षे ते वेगळीच उंची गाठत आहेत. हे निश्चितच फक्त काम करणे नव्हे, जीव ओतून / झोकून देऊन करणे होय. प्रत्येकाने, आपापल्या क्षेत्रात असं केलं तर सोन्याहून पिवळे होईल.   

आलं

 

न्यू नॉर्मल डेज पासून तर प्रत्येक जण पारंपरिक, भारतीय, आंतरदेशीय आणि नवीन पदार्थ तय्यार करण्यात अगदी निपूण झाले आहेत. यू ट्यूब अगदी दुथडी भरून वाहतं आहे त्यामुळे. वयाची काळजी न करता, प्रत्येक भाषेत, काही पदार्थ समजावून सांगत सांगत, तर इतर जण फक्त सांगेतीक पार्श्वभूमीवर पदार्थ करून दाखवणे सुरु आहे. बहुतांशी सगळेच जणांची एक खासियत आहे. जेव्हा ते काय काय घालायचं ते सांगतात आणि जर घटक पदार्थांमधे आलं असलं तर "एक इंच तुकडा" हे जसं काही जगमान्य प्रमाण आहे. एक इंच आल्याचा तुकडा? प्रत्येक वेळी? का? कशासाठी? थोडसं आलं किसून थंडीत चहात, काढीत, उपम्यात आणि मूग डाळीचे डोसे केले तर थोडेसे, बास. डोक्यावरून पाणी गेलं तर काही मसालेदार वाटणामधे थोडीशी चव बरी लागते. पण उठसुठ "एक इंच तुकडा" है माझ्या दृष्टीने जरा अती होतंय. इतक्या आल्याची गरज नाहीच. आणि हो ते देखील चटणीच्या मिक्सर च्या भांड्यात वाटलेली चटणी आणि त्यात इतक्या प्रमाणात आलं हे शरीरातील उष्णता वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे. आतून प्रत्येकाने जरा थंड राहायचा प्रयत्न केला तर गरमी जाणवणार नाही. यू   ट्यूब दाखवलं आहे म्हणून ते चांगलचं आहे हे कशावरून? तुम्ही बघा ना ती पदार्थ तय्यार करण्याची पद्धत आणि तुमच्या हिशोबाने मग तय्यार करा. तुम्ही कुठे राहता, तुम्हाला काय सोसत, तुमची तब्बेत किंवा प्रकृतीचा प्रकार काय आहे, आणि मग तोच तुम्हाला रुचेल असा, तुमचे व्हर्जन तय्यार होईल, जे त्रासदायक ठरणार नाही.  स्वतः ओढवून घेऊ नका काहीच. तोच पदार्थ नाही, पण बाकी काय काय पोटात गेलंय त्या दिवशी, दिवसाची वेळ काय आहे, आपण व्यायाम किती करतो, कामाची आपल्या पद्धत काय आहे, जेवणाच्या वेळेची शिस्त पाळली जाते का? असं थोडक्यात लक्षात आणा आणि मग ग्रहण करा. करू नका असं नाही पण "अती तेथे माती" हे विसरू नका. निसर्गाला, गर्मीला, कामाला आणि इतर कोणालाच दोश देऊ नका. काय खावं, काय सेवन करावं हे जितकं जरुरीचं आहे तितकंच काय वर्ज करावं हे जास्त अत्यावश्यक आहे समजणं. "प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्युअर". बळी पडू नका, आहारी जाऊ नका, सोसेल तेच पोटात ढकला. "अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे... ". 

आणि सांगणारे फक्त त्या आल्यावर थांबत नाहीत हो, भरपूर गरम मसाला घालतात, चटपटीत पणा यावा म्हणून आमचूर नाही तर चाट मसाला मिसळवतात, शिवाय भरपूर तिखट ई. अरे काय चाललंय काय? एवढं तिखट आणि मसालेदार सतत खाऊन त्या पोटाचं, आतड्यांचं काय होणार, कित्ती कामाला लावावं फुकट पचनशक्ती / पचनसंस्था काम करते आहे म्हणून? बरं नाही ते.  

आवडीनुसार, स्वादानुसार मीठ फक्त का घालायचं प्रत्येक पदार्थांमधे? प्रत्येक कृती बघा, एक तर सरते शेवटी मीठाची बारी येते आणि फक्त त्यालाच स्वादानुसार, आवडीनुसार ह्या उपाध्या दिल्या जातात. किंबहुना हे प्रत्येक घटकाला लागू आहेच. एक चेतावणी दिली पाहिजे किंवा तळटीप द्यायलाच हवी, कि ह्या कृतीत दाखवलेले प्रमाण हे करणाऱ्याच्या आवडीचे आहे. दर्शकांनी त्यांच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावं, किंवा तत्सम. हि अशी तळटीप नाही दाखवली तरी आपल्याला आपली प्रकृती माहिती आहे आणि आताशा सर्वच जण सुशिक्षित, शिक्षित, निष्णात, समंजस, जाणते आहेतच ना. मग? 

तात्पर्य असं कि छोटासा तुकडा, किसून काही भाग, आलं पूर्णपणे नाही घातलं तरी, अर्धा इंच, फक्त साल असे फेरबदल करा आणि तो तुमचा पदार्थ म्हणून चाखा यथोचित, आनंद उपभोगा, त्रास होऊ देऊ नका. हॅप्पी कूकिंग. 

सोमवार, २० मे, २०२४

माझी ठिपक्यांची रांगोळी

वैविध्य प्रकारच्या रांगोळ्या काढता येतात आणि आताशा तर तंत्रज्ञानामुळे जगभरातल्या किंवा भारतातल्या अनेक भागांमधून कश्या पद्धतीच्या रांगोळ्या काढल्या जातात हे घर बसल्या समजतं. म्हणतात ना प्रत्येक मैलावर संस्कृती बदलते, अगदी तसेच आहे रांगोळी बाबत देखील. 

आताशा मी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीच्या हातावर दररोज न चुकता स्टार काढते, कधी आईस्क्रीम रेघोटल्या जाते तर कधी आणखीन काही. ह्या सगळ्या मैत्रिणी वय वर्ष १-२ च्या दरम्यान आहे. खूप म्हणजे खूपच खुश होतात त्या स्टार बघून. त्यांच्या हाताच्या पृष्ठभागावर मोठ्ठा स्टार काढणे म्हणजे आव्हानात्मकच आहे मला. पण मी ते खुबीने निभावतांना मला काही खास जाणवले. मग माझे माझ्या हाताकडे सहज लक्ष गेले आणि माझ्या आईचे हात आठवले. किंवा आईच्या पिढीच्या बऱ्याच लोकांचे हात डोळ्यासमोर उभे ठाकले.  पिल्ल्यांच्या तळहातावर अगदी पुसटश्या रेषा असाव्यात. कोणीच त्या कडे बघत नाहीच, किंवा त्या कडे लक्ष जात नाही. तेव्हा फक्त बोबडे बोल, डुगूडुगू चालणे, प्रतिसाद देणे ह्यावर जास्त लक्ष केंद्रित असते. पण त्यांच्या पिटुकल्या तळहातावर रेषा असणारच.  पृष्ठभागावर मात्र काहीही नसते, खूपच मऊ, मुलायम अशी गोंडस त्वचा. बास. एकदम क्रिस्टल क्लियर. 

मध्यम वयातल्या लोकांच्या हातावर म्हणजे फक्त मनगटापर्यंत नीट निरखून बघितले तर मस्त ठिपके दिसतात, काही आकृत्या, आकार, नक्षीकाम, रचना नकीच दृष्टीस पडतात. बघा एकदा नीट. आणि छोटासा तो हाताचा पृष्ठभाग, पण, विविध आकाराच्या रचना आढळतात तेथे. त्यात कातडी देखील वेगळ्याच मऊ पद्धतीची आणि घट्ट पणे हाडांना न चिकटलेली, थोडीशी दूर आणि जास्त प्रमाणात आहे असं दर्शवणारी. त्यामुळे मग सगळ्याच नक्षीकाम भर पडते, थोडे अजून वेगळे भासते ते चित्र, नैसर्गिक रित्या तय्यार झालेले.  छोट्या, मोठ्या, लांब, बारीक सारीक रेघा, शीरा आणि शिवाय ठिपके ह्या मुळे त्या रांगोळीला बघावेसे वाटते. आणि प्रत्येकाच्या हातावर एक वेगळीच तऱ्हा नक्कीच नजरेस पडेल ह्यात शंकाच नाही. 

हि झाली साधी नैसर्गिक पद्धत. पण त्याला जर आधुनिकतेचा साज चढला तर मग काही वेगळं चित्र उभे ठाकेल डोळ्यासमोर. भरपूर आणि नियमित मालिश केलेले हात, सतत पाण्यात असलेले हात, कष्टकरी हात असे विविध प्रकार असणार.  

आजीची हातावरची कातडी तर वेगळाच बहर आणते ह्या रांगोळी तत्सम कलाकृतीला. तिचा स्पर्श आणि परिणाम (३D) देखील अनोखा असतो.  

तळहातावरच्या आणि पायावरची रांगोळी व्यक्तिमत्व कथित करते म्हणे. हे सांगणारा मात्र फार मोठा साधक असला पाहिजे. ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही ते. "त्याची" कृपा प्रसाद साध्य झालेला असा परिपूर्ण साधक, जो सहज  असणे आणि सापडणे दुर्मिळच. त्यामुळे आपण फक्त पृष्ठभागावर मन, डोळे केंद्रित करू या, आणि त्याचा आनंद उपभोगूयात. 

बघा म्हणजे गम्मत म्हणून माझ्या पिटुकल्या मैत्रिणीच्या हातावर विविध रंगांच्या पेनाने काढलेले स्टार मला काय काय देऊन गेले.  

शनिवार, १८ मे, २०२४

गोंधळावृत्ती


हि एका मुलामुलींची कथा आहे, जोडपं हो. दोघे मस्त शिकलेले पण विविध क्षेत्रात काम करणारे, नोकरदार जोडी. भारतातले आणि मध्यम वर्गीय कुटुंब, म्हणजे मुलगा नेहेमी करताच नोकरी करत राहणार आणि मुलगी काही खच-खळगे, सुट्ट्या, काही महिन्यांचा अवधी असे सगळे टप्पे पार करत नोकरी सांभाळणार. असो. ती तिच्या क्षेत्रात गरजेचे असल्यामुळे त्याच्या पेक्षा जास्त शिकलेली. पण ते क्षेत्रच मुळी समाजाने कमी लेखलेलं त्यामुळे पगार पण अर्थात फारच कमी. असं असतांना देखील अगदी सुरवातीपासून अनेक प्रसंगात काही खास तिच्या समोर उभं ठाकलं. मागच्या पिढीने एका पगारात भागवलं मग तुला कसं जमत नाही? हे म्हणायच्या आधी "आम्हाला सून / बायको नोकरी करणारीच हवी" हे पालुपद होतंच बरं का मंडळी, हे विसरून चालणार नाहीच. आणि अनेक वर्ष उठत-बसत नोकरी केल्यावर एक दिवस असा आला कि तिला नोकरी सोडावीशी वाटली, सोडली तर तीच मंडळी खिशातून एक मस्त पुडी काढून म्हणतात कसे "फुकट खात बसली आहे घरी, अक्कल नाही कमवायची". वा, क्या बात है नाही? त्यांनाच ठाऊक नाही आहे कि त्यांनाच काय हवयं? 


बरं ह्याच जोडप्यातला नवरा इतका जास्त कमावतो कि हिची कमाई म्हणजे अगदी घुंगुरडे, क्षुल्लक पेक्षाही कमी, त्या मानाने, कुठलीही तुलना करायची नाही येथे, पण एक फक्त माहिती म्हणून. असं असून देखील अनेक खर्च मुलींनीच उचलायचे, उचलले आणि शिवाय "तुझा काय उपयोग? काय केलंस आत्तापर्यंत?" हे त्यावर ऐकायचे. मस्त आहे कि नाही? मोठ्या पेक्षा भला मोठा पगार, त्यात भारतीय पद्धतीने, पुरुष प्रधान संस्कृती नुसार पुरुष हे कर्ते असतात, कमावते असतात, मग बाहेर खायला, मज्जा करायला निघालं कि पालुपद सुरु. काहीही खर्च करायचा म्हटलं कि "माझ्याकडे पैसे नाहीत" हेच बिंबवलं जातं. त्या नंतर करणं  होत खर्च, वस्तू घेतल्या जातात पण निरीच्छेने. 


माझ्यामते अश्या कार्ट्यांनी पैशाशीच लग्न करावे करता आले तर. कारण बरोबरीने कमावणाऱ्या मुली ऐकून घेणार नाहीतच, त्यामुळे सोईस्कर रीत्या ह्यांना कमी कमावणारी लागते म्हणजे हे आपले डाव सतत साधू शकतात आणि गोंधळावृत्तीचे प्रदर्शन सतत मांडू शकतात. त्यातून त्यांना काय मिळते त्यांनाच ठाऊक पण मुलगी मात्र जास्त सशक्त होते आणि मुले समाजासाठी तय्यार होतात अश्या वागण्याने. नकळत किती फायदा होतो बघा मंडळी. होते ते योग्यच. पुढे चला, चालत राहाच. असेच नमुने भरले आहेत सर्वत्र, काही उपवाद सोडले तर. घरोघरी शेवटी मातीच्याच चुली / गॅस / मिक्रोवेव्ह.  

मुंजीची आवृत्ती


एक मजेशीर आवृत्ती बद्दल सहज आज डोक्यात आले आहे, म्हटलं टिपून ठेवावं. 

अनेक पिढयांपासून मुंज हि संकल्पना आणि एक पारंपरिक विधी संपन्न होत आला आहे. खूपच लहान वयात होणारे हे संस्कार त्या मुंज्याच्या, मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, एकंदरीत वाढी साठी आणि एक उपयुक्त व्यक्तिमत्व उभे करण्यासाठी फारच अत्यावश्यक आहे. हे सगळं म्हणजे सातत्याने वैविध्य अंगाने शिकत राहणं, ते शिकलेलं आत्मसात करणं आणि वेळोवेळी उपयोगात आणणं. 


अजून एक फार महत्वाची म्हण आहे ती अशी कि "आयुष्यभर माणूस सातत्याने शिकतच राहतो". किंबहुना शिकत राहिलेच पाहिजे मग ते पारंपरिक पद्धतीने असो किंवा आधुनिक, कळत - नकळत, निरीक्षणातून आणि इतर अश्या अनेक मार्गांनी. फक्त त्या मुंजीच्या कोवळ्या वयातच, आई आणि कुटुंबापासून, किंवा कौतुक होण्यापासून, जे मागितले ते ताबडतोब मिळण्यापासून दूर तो मुलगा शिकतो असे नाही, शिकावं पण नाही, ते अविरत असे कार्य आहे, बघणे, शिकणे, उपयोगी आणणे, आणि असे हे चक्र चालूच राहिले पाहिजे. "थांबला तो संपला". 


ह्या अत्याधुनिक काळात फक्त मुलंच नाही तर हिरीरीने मुली देखील फार लवकर घराबाहेर पडायला लागल्या आहेत. जिथे योग्य संधी असेल तेथे नोकरी करण्याकरता जाणे पण आवश्यक असते अनेक वेळा. प्रत्येकवेळी कुटुंब बरोबर राहिलाच हे निश्चित नाहीच. त्यामुळे एकटं राहणं आलंच. पर्यायाने मग हवं ते घरचं खायला मिळणं, कौतुक ई. पासून दूर होतोच व्यक्ती. 


अनेक वर्षांचा संसार झाल्यावर एखादी सुवर्णसंधी चालून आली ज्यात सन्मानाने त्या व्यक्तीला आमंत्रित केले जाते सल्लागार म्हणून तर देखील दूर जाणे होऊ शकते.  "कंफर्ट झोन" च्या बाहेर राहणे म्हणजे मुंजी नंतरची संकल्पना आहे, माझ्या दृष्टीने, मग ती कुठल्याही वयात का होईना. लहानपणीच आपण सर्व शिकत नसतोच. वयोमानाप्रमाणे, उठ-बस होते त्या नुसार, प्रसंगानुरूप शिक्षण होत राहते. 


शिक्षण, नोकरी, सल्लागार ह्या वर हि गोष्ट थांबत नाहीच मंडळी. आताशा स्वतः किंवा ठेवले तर जेष्ठ नागरिक संपूर्ण सोईंनीयुक्त अश्या ठिकाणी जाऊन राहणे पसंत करतात.  ते देखील बाकींसारखे आवाहनात्मकच आहे. प्रत्येक पाऊल तसे पहिले गेले तर आव्हानपूर्वक आहेच. आणि त्यातच खरे शिक्षण आहे. कारण मुंज हि संकल्पनाच मुळी सर्वार्थाने शिक्षण, घडण ह्या वर बेतली आहे. त्यामुळे चला तर मग अनेक वेळा मुंजी नंतरचे वास्तव्य अत्यानंदाने अनुभवूयात आणि सर्वांनीच हो, मुलामुलींनीही. 

बुधवार, १५ मे, २०२४

सही ना?

 बरेच वेळा फोडणी हातावर उडते आणि कातडी क्षणाचाही विलंब न करता त्यावर प्रतिक्रिया दर्शवते. अर्थात फोडणीच्या तेलाचे काही अंश किंवा एखादा मोहोरीचा दाणा हातावर येऊन बसलाच तर पिटुकला डाग लागू शकतो. तव्याला कित्येकदा हात लागतो, घाईत, त्याचा पण चटका बसतो आणि दृश्य असतो तो, काही दिवस. त्या नंतर मग मस्त खाज सुटली कि लक्ष जाते आणि समजते कि आता बरं झालं, ते जे छोटेसे दुखले होते ते. कधी कुकर, कधी डाळीचे पाणी तर कधी भाकरी / थालिपीठ, सगळेच कधी ना कधी खूण देऊन जातात. पण ह्या खुणा काय खुणावतात हो? कि संवेदना शाबूत आहेत, कातडी काम करते आहे दोन प्रकारे, एक म्हणजे चटका बसला कि खुणावते आणि बरे झाले कि सुद्धा. म्हणजे बघा ना आपल्या साठी कित्ती लक्ष केंद्रित करून कार्य चालू असतं तिचं अहो रात्र. क्या बात है? ऊन, वारा, पाऊस किंवा बाकी अनेक गोष्टींपासून संरक्षण  तर करतेच पण त्याशिवाय दिमाखात डाग पण मिरवते, वेगळे दृश्य पाहायला मिळते त्यामुळे.  सही ना?  

जुन्या रुढी, परंपरा


आपल्या देशात अनेक प्रथा आहेत ज्या जुन्या पिढीतले लोक, किंबहुना ज्यांना आपण सर्वश्रेष्ठ, जेष्ठ नागरीक म्हणतो ते प्रकर्षाने पळतांना दिसतात. ह्या शिवाय नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे असेल किंवा नवीन गोष्टी शिकण्याची आवड, "जमाने के साथ चलो..." अश्या प्रमाणे भरपूर नवीन पद्धती, चालीरीती, गोष्टी, पेहेराव, खानपान, भेट वस्तू, देवाण घेवाण, अपारंपरिक किंवा आधुनिक सणवार आताशा साजरे होतांना दिसतात. "न्यू नॉर्मल डेज" मधे तर लग्न सोहोळे देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने साजरे झाले. त्यामुळे खूप बदल दिसतोय. खूप प्रमाणात आजी आजोबा सोशल मिडिया वापरत आहेत, म्हणजे त्यांना बदल मान्य आहे. सातत्याने स्वयंपाक घरात वावरणारी सून ह्या पेक्षा दर महिन्याला कमावून आणणारी, एक खास हुद्दा असलेली, नाव कमावलेली / कमवत असलेली अशीच सून सर्वानांच हवी आहे.


एक खास परंपरा होती आधी कि मुलीच्या सासरी पाणी देखील प्यायचे नाही. आणि प्यायला लागलेच तर, किंवा राहायला लागले तर भरपूर प्रमाणात भरपाई करायची, त्याचे पैसे ठेऊन यायचे किंवा द्यायचे ह्या ना त्या स्वरूपात. माझ्या वडिलांनी पण पाळली होती हि परंपरा जेव्हा ते माझ्या सासरी एक रात्र / दिवस राहिले होते तेव्हा.  मग मला हा ज्वलंत प्रश्न आहे कि बऱ्याचदा आपण हे वाचतो, ऐकतो कि TCS सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा बाळंतपणाचा अवधी सुट्टी म्हणून घेतला असेल एखाद्या मुलीने तर तिला परत संधी देतात, शिकवतात आणि आत्मसात करतात. ती तुमच्या वंशाच्या दिव्याला जन्म देणार असते / दिला असतो म्हणून जर बिनपगारी सुट्टी घेते तर तिला सासरची मंडळी, सासू सासरे पगार देतात? मुलाचे आई-वडिल जेव्हा मुला-सुनेच्या-नातवंडांच्या घरी राहायला येतात तेव्हा पैसे देतात? जर सुनेने काही अपरिहार्य कारणांमुळे नोकरी सोडली तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्रीमंत सासरे मदत करतात, तिचे मनोबल वाढवतात? ह्या सगळ्यांचे उत्तर फार मोठे नाही असेच आहे. मग ह्या सर्वश्रेष्ठ-जेष्ठ नागरिकांनी काय बदल केला स्वतःत? मग त्यांच्या वयाचा, अधिकाराचा, अनुभवाचा, जग कणभर जास्त बघितल्याचा काय फायदा? कुटुंबाचा करता श्रेष्ठ फक्त नावापुरताच? किंवा काहीच जणांना पोसणारा असा असतो का?  अर्थात ह्याला अपवाद आहेत, पण अगदी बोटांवर मोजण्या इतके. नवीन तंत्रज्ञान आलं, जग अगदी जवळ आलं, खूप देश पाहून झाले, IPL पण पचवलं टेस्ट मॅच सोबत, धोती च्या ऐवजी जीन्स / ट्रॅक पॅन्ट मिरवली, देव-देव करत द्राक्षासव पचवलं / उपभोगलं, मग फक्त सुनेने काय बिघडवलं आहे? काही कुटुंबात बदल नजरेस पडतोय पण तो सर्वदूर पसरला पाहिजे लवकर. असा दुटप्पी पणा सोडून देता आला पाहिजेच. इथे फक्त पैशाची गोष्ट नाही आहे, एकंदरीत स्वभाव दर्शन आणि सततचा गोंधळ / कन्फ्युजन नजरेस पडतंय, जे घातक सिद्ध होतंय त्या माऊलीला आणि पुढील पिढीला देखील. हे थांबलं पाहिजे ताबडतोब.  

मंगळवार, १४ मे, २०२४

इन साईड-आऊट

 माझी आणि वर्णिकांची नाळच जोडली होती आणि आहे म्हणून असेल कदाचित पण ती मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते. अगदी इंग्लिश मधे म्हणतात ना "इन साईड-आऊट" अगदी तसेच. 


मला जेव्हा पासून घन पदार्थांची ओळख झाली, चव घेऊन खाता येऊ लागले तसे मला आठवते कि खाऊ येण्याचा मोठा ओघ होता आणि नेहेमी असायचा. आत्ता समजतंय कि मी इतकी मोठी खव्वयी कशी झाले ते आणि लहानपणी इतकी हत्ती कशी होते ते. 


अनेक पिढ्यांची परंपरा असलेले, एका फार नावाजलेल्या धार्मिक संस्थेत गुरुजी असणारे एक काका आमच्याकडे नियमित यायचे. त्याची अनेक करणे होती. एक म्हणजे देऊळ आणि आमचे घर ह्यातले अंतर कमी होते, आमच्या अंगणात असंख्य प्रकारची फुले येत होती ती पूजेला नेण्याकरता ई. प्रत्येक खेपेला ते आवर्जून माझ्यासाठी खास  जर्दाळू आणायचेच. का? माहित नाही. त्या सुकामेव्याचा स्वाद इतका जगावेगळा होता कि ज्याचं नाव ते. अगदी आशिर्वादात्मक, प्रेमाने भरपूर, अत्यानंदाने दिलेला, स्वादिष्ट आणि परिपूर्ण. आधी आई त्याचे तुकडे करून द्यायची, बदाम फोडून द्यायची, माझे दात मजबूत झाल्यावर मग मी ते सगळं हाती घेतलं.  त्या गुरुजींनी कधी एक किंवा दोन जर्दाळू दिले नाहीत मला, भरपूर द्यायचे, खूप दिवस मी ते फस्त करण्यात घालवत असे मग. तेव्हा पासून जे ह्या फळाची चटक लागली म्हणून सांगते ती आज तागायत टिकून आहे. 


मधे हैदराबादला काही दिवसांच्या वास्तव्यात समजले कि "खुबानी का मीठा" हा पदार्थ पण जर्दाळू पासून तय्यार करतात. तो देखील मला खूप म्हणजे खूपच भावाला.  हे काय कमी होते तर काल मला जगावेगळा अनुभव दिला माझ्या वार्णिकाने. कुठून शोधून काढलं माहित नाही, पण मला न सांगता, न विचारता एक भन्नाट गारेगार चा कप दिला कि हातात. चव घेऊन बघितली तर उडालेच. जर्दाळू आईसक्रीम होते ते. मी स्वप्नात देखील असं होईल असा विचार केला नव्हता. क्या बात है? एवढीशी नाही तर तिचं लक्ष बघा. आईला काय आवडतं ते बरोबर आलं कि आणलंच / खाऊ घातलंच मला आवर्जून. सहीच. तिच्या इतक्या सगळ्या व्यापात माझ्या आवडीचं ऑर्डर करून पुढ्यात मांडणं म्हणजे कमाल आहे. माझ्या साठी फार मोठी पर्वणी होती ती काल. काय मनापासून तय्यार केलंय ते गारेगार हो? माझ्या मते फक्त उत्कृष्ट फळांचा वापर केला आहे, कुठलीही जास्तीची गोडी त्यात घालण्याची गरज पडली नाही त्यामुळे आणि त्यात नॅचरल हा भाला मोठा ब्रँड, मग काय विचारता. तोड नाही च. ह्या गारेगार समोर बाकी सगळेच फिके. इतकी मज्जा आली म्हणून सांगते.  

जसे जर्दाळू हे फळ किंवा सुकामेवा असतो, त्याची चव, अवीट गोडी, एक नैसर्गिक अनुभव, त्याचा रंग, माउसरपणा, वैशिष्ट्यपूर्ण पणे स्थानापन्न असलेला पिटुकला चविष्ट बदाम, खूप वेळ रेंगाळणारी चव, बाह्यरूप अगदी सहज, मऊ, पण आतून कणखर / कडक तशी माझी वर्णिका. माझ्या लहानपणीपासून सुरु झालेला सिलसिला वर्णिकाच्या जाणतेपणापर्यंत टिकून आहे हे अप्रूपच आहे माझ्या दृष्टीने.  

जर्द हे पिवळ्याला सुशोभित करतं आणि पिवळा / पिवळ्याच्या विविध छटा हा मैत्रीचा खास रंग आहे. माझी आणि लेकीची एक वेगळीच खास मैत्री आहे. आळू म्हणजे गोल, कोन किंवा टोक नसलेला, ज्यामुळे तो कोणालाच बोचत नाही, टोचत नाहीच आणि त्या उपर सर्वांशी जुळवून घेतो, सर्वसामाविक, प्रसन्न, उत्साही, चैतनशील असे व्यक्तिमत्व असलेली ती. त्यामुळेच हे सगळे तिच्या हातून घडतंय, पिटुकलं आहे आकाराला, पण भन्नाट. 

सोमवार, १३ मे, २०२४

अपार शक्ती

 २०१८ पासून माझे जसे पाय थांबले पूर्ण शक्तीने काम करण्याचे तसे मी स्वतःला तय्यार करत गेले कि आता मला संपूर्ण वेळ काम करता येणं आव्हानात्मक वाटतंय. मोठा पगार घ्यायचा आणि आधी करत होते त्या पेक्षा कणभर कमी काम करायचं हे मनाला पटत नव्हतंच. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरु झाली. कठिण होते ते मला सर्वतो परी. अनेक पिढ्या आमच्या कडे फक्त नोकरीच करत आल्या असल्यामुळे मला हे कळत नव्हतं कि पुढे काय? म्हणजे थोडेफार पैसे पण मिळायला हवेत आणि डोक्याला खुराक पण हवीच. त्यामुळे मग विचार, वाचन, मनन, चिंतन, आणि लिखाण सुरु ठेवले. जे जे मार्ग डोळ्यासमोर उभे राहतील ते ते लिहून ठेवले पर्याय म्हणून. शिवाय एक अंदाज घेतला कि प्रत्येक व्यक्ती, किंवा माझ्या एकटीला असे किती पैसे लागतील महिन्याला? अर्थात हे सगळेच अंदाज होते आणि आहेत. कारण प्रत्येक महिना वेगळा उभा ठाकतो आहे माझ्या समोर. त्यामुळे एकच रक्कम खर्च होईल असे मुळीच नाही. मग हळू हळू पूर्णवेळची नोकरी सोडल्यावर एक एक पाऊल टाकायला सुरवात केली. जम बसायला थोडा अवधी निश्चित लागेलच. पण सुरवात खूप मस्त झाली आहे, मालगाडी जागेवर थांबली नाही आहे हे हि नसे थोडके. बराच वेळ हातात असतो सध्या, प्रत्येक रुपया महत्वाचा आहे ह्या घडिला, हिशोब दररोज लिहिला जातोय न चुकता, आणि कमाई पण नमूद केली जाते आहे. अश्या सर्वांची गोळाबेरीज केली. खर्च किती होतो हे समजले. गेल्या ऑक्टोबर पासून ते एप्रिल पर्यंत   मिळालेले पैसे भागिले तितके महिने जेव्हा केले तेव्हा काय आश्चर्य? पट्टाकिनी डोळ्यात पाणी उभे राहिलेच. मला महिन्याला लागतात तेवढेच मिळालेत, किंचित कमी पण हे पुन्हा एकदा सिद्ध झाले कि तो आहे. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी भक्कम उभा आहे, आधार स्तंभ आहे. त्याची करोडो लेकरे, तरी देखील त्याचे माझ्या कडे किती बारकाईने लक्ष आहे बघा. हे निश्चित कि तो कधीच मला काहीच कमी पडू देणार नाहीच. आज पर्यंत पडू दिले नाही, ह्या पुढे देखील तो सर्व सोय करणार हे नक्की. मनःपूर्वक धन्यवाद त्याला, त्या अपार शक्तीला, त्याच्या निरीक्षणाला. माझ्या कडे शब्द अपुरे आहेत हे सर्व वर्णन करायला. 

इन टँजिबल


तांत्रिक घडामोडी झाल्या आणि जगभर खूप मोठ्या संगणक तंत्रज्ञानावर आधारित भल्यामोठ्या सिस्टिम्स तय्यार झाल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर बहुतांशी सर्वच जण वापरतात, कारण आता ती काळाची गरज आहे, मग व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असो. अथांग अश्या सॉफ्टवेअर सिस्टिम शिवाय आता पर्याय नाहीच. सर्वत्र ऑटोमेशन / स्वयंचलित यंत्र आणि आज्ञावली निर्माण झाली आहेत. ती डोळ्यांना दिसत नाहीत, स्पर्श करता येत नाही तरी देखील त्यांचे वास्तव्य नाकारता येत नाही कारण आपण सर्व त्यांचा सर्रास उपयोग करतोच म्हणूनच त्यांना इन टँजिबल असे संबोधले जाते. त्या सर्व प्रकारच्या आज्ञावलींपासून आपलं अक्षरशः अडतं, त्याचं महत्व आपण सर्व जाणतो, जणू काही ते आपलं सर्वस्व आहे. दिसत नसले तरी मानतो, आहे ह्याची खात्री बाळगतो अगदी आपल्या बाप्पासारखे नाही का? काल एका लेखिकेने एक बातमी लिहिली आहे "मातृदिन" बद्दल, तिचे थोडक्यात अनुभव. तिच्या म्हणण्या प्रमाणे दुर्दैवाने तिची आई ह्या जगात नाही, मग तिला आपल्या आई साठी हे घ्या, ते घ्या, असा मातृदिन साजरा करा असे इमॆल का येतात आणि माझे दुःख वाढवतात? तर तिला आणि माझ्या सारख्या इतर मुलींना मला हे आवर्जून सांगावेसे वाटते कि आई आहे, तिची शिकवण आहे, तिने सांगितलेले अनुभव आहेत, तिचे बहुमूल्य आशीर्वाद आहेत, किंबहुना आपण तिचाच एक भाग आहोत, किंवा संपूर्ण तीच आहोत. अर्थात सध्या ती इन टँजिबल आहे. पण ह्याचा अर्थ ती नाही किंवा कधीच नव्हती असा नाही. तर तिची शिकवण पुढे नेण्याचे भले मोठे कार्य आता मुलीला जबाबदारीने करायचे आहे, फक्त तिच्याच कुटुंब करता मर्यादित न ठेवता सर्वत्र जमेल तसे पसरवयाचे आहे. एक खूप सुंदर जाहिरात आहे, त्यात असे म्हटले आहे कि प्रत्येकाला आई समान एक जण असतेच, मग ती मावशी असो, शिक्षिका असो, आत्या असो, नाहीतर कोणी. ह्या मातृदिनी किंवा जेव्हा जमेल तेव्हा तिच्या समवेत वेळ घालावा, तिला आवडेल ते करा, गप्पा मारा, फक्त तिच्या शेजारी बसा आणि आठवणी निर्माण करा. इन टँजिबल ला टँजिबल करणे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे. त्यामुळे उठा आणि लागा कामाला पट्टकिनी. आणि जसे सर्वगुणसंपन्न असे सॉफ्टवेअर सिस्टिम्स तय्यार आहेत, नवीन तय्यार होण्याच्या मार्गावर आहेत, आहेत त्या अजून सुंदर आणि बहुउपयोगी अश्या स्वरुपात नटत आहेत, मग तसेच ह्या दिवसाला बघा. वाईट वाटणे स्वाभाविकच आहे पण त्यावर मात करता यावी ह्यासाठी नतमस्तक व्हा, हात जोडा आणि बघा कसे ह्या पुढील मातृदिन साजरे होतील ते.  

रविवार, १२ मे, २०२४

"मी ... झालो तर"


मी पंतप्रधान झालो तर, मी कार झालो तर असे हे निबंधाचे विषय असायचे माझ्या लहानपणी, शाळेत. आज उमगलं ते तसे विषय का होते ते. 


आज न्याहारीला चविष्ट पालक+मुळा पराठा सेवन करते वेळी नेहेमी प्रमाणे माझ्या ताटलीत शेजारी छोट्या प्रमाणात लोणचे होते आणि त्याला खेटून चटणी विराजमान झाली होती. पराठेच मुळी इतके पौष्टिक होते कारण त्यात ज्वारीचे पीठ, तिखट मीठ, धने पूड, ओवा आणि कोथिंबीर यथोचित प्रमाणात घातली होती. आणि हो अर्थातच प्रेमाचा भरपूर मसाला देखील होताच जोडीला. तसे बघायला गेले तर केचअप, चटणी, लोणचे काहीही लागत नाहीच तव्यावरच्या गरमागरम पराठ्या सोबत, पण असो, एक पद्धत, सवय किंवा आवड म्हणून ते वाढलं जातंच पानात.  गेली अनेक वर्षे मी पराठे करते आहे आणि सेवन पण करते आहे, आज पर्यंत जे घडले नाही ते आज झाले, पराठा चक्क नाराज झाला माझ्यावर. म्हणतो कसा, कि मी काय चविष्ट नाही म्हणून माझा अपमान केलास? ह्या सगळ्यांना माझ्या शेजारची जागा देऊन? तुझ्या लाटन्याखाली आलो, शेकलो गेलो, भिजलो, भाजलो आणि अत्यानंदाने तुझ्या समोर उभा ठाकलो तर जोडीला आहेतच हि मंडळी. का? माझी चव जास्त वृद्धिंगत होते का ह्या सर्वांसोबत? मी मग उत्तर दिले, कि चव तर वाढतेच, प्रथा पण आहेच, जोडी पण हवी ना? आणि शिवाय ह्या चटणीत सगळ्या डाळी आहेत, मेथी आहे, टमाटर आहे, कढीपत्ता ई. आहे त्यामुळे सकाळच्या न्याहारीची पौष्टिकता वाढते आहे, नाही का? आणि नुसती चटणी कधी कोणी खाऊ शकतं का? नाही ना, पराठे शिवाय मज्जा नाही, परिपूर्णता किंवा महत्व नाही असं म्हणा हवं तर. चटणी केवढी, तू केवढा? कशाला बघतोस इकडे तिकडे, ज्यांना जसं आवडतं तसं खाऊ दे ना. हो कि नाही? तेव्हा कुठे महाराज थोडे नरमले, हाश...  


असे काहीसे माझ्या हातून आज लिहिले जायचे होते, असा मला विचार करता यावा म्हणून अनेक दशकां आधी निबंध लिहून घेतले गुरुजनांनी एक शिक्षणाचा, भाषेचा भाग म्हणून. वा क्या बात है? मज्जा आवि गयो. 

गणाची सुरवात


पत्रिकेत एक प्रमुख बाब नमूद केलेली असते ती म्हणजे गण. गण कोणी, कधी आणि कसा शोधून काढला माहित नाही, पण त्याला एक अध्यात्मिक, सामाजिक आणि अभ्यासपूर्वक पाय असणार हे निश्चितच. खूप आधी गुरुजनांनी हे तीन गण निश्चित केले असणार. 


मी मागे एका अनुदिनीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या दृष्टीने चौथा गण पण अस्तित्वात आहे. त्यात अशी मंडळी येतात ज्यांना "पुरणपोळी देखील तिखट लागते". असो.


मला आज एक उमगलं आहे कि हे गण कसे निर्माण झाले असतील. आताशा आभासी जगात आपण अनेक संघ तय्यार करतो. अगदी शालेय जीवनापासूनच खास मित्र, वर्ग मित्र, शेजारचे मित्र, खेळायचा ग्रुप असे अनेक गट तय्यार होत जातात. अगदी सहज घडतं म्हणा किंवा विचारपूर्वक देखील. निरखून आणि पारखून मग एखाद्याला आपल्या गटात सामील केले जाते. निरखणे आणि पारखणे म्हणजे थोडक्यात त्यांच्या कृतींकडे लक्ष देणे, ते विविध प्रसंगाच्या वेळी कसे वागतात ते टिपणे, त्यांची प्रतिक्रिया काय असते हे बघणे ई. आणि बरेच काही. गहन आहे हा विषय खरं. प्रत्येकवेळी सोज्वळ अशी भूमिका जर घेतली, वयोमान, लहान थोर ह्याचा विचार न करता, न असून राहता जर कार्य करत राहिला, सतत कार्यमग्न राहिला, सगळेच गोड मानून घेतले बहुतेक प्रत्येक वेळी, राग लोभ ह्या पल्याड असा व्यक्ती म्हणजे देव गण. माणसासारखा वागणारा माणूस. आणि ज्याचा कधीच थांग पत्ता लागताच नाही, कुठलीही शाश्वती नाहीच, कधी कुठे कोणाशी काय होईल हे सांगता येत नाही, बिना वातीचा फटाका, गुरगुरण्याचा सातत्य टिकवून ठेवणारा, नको त्यात नाक खुपसणारा, नको तेवढे सल्ले देणारा, नकोसा असा म्हणजे बोलायलाच नको, पत्रिका देखील पाहायला नको. कधीच कुठलेच ग्रह तारे स्थिर दिसणार नाहीतच. अश्यांपासून लांब राहणे अत्त्योत्तमच, ते अशक्य असले तरी. कधीच त्यांच्या कुठल्याच टोकाच्या वागण्यावर जाणे नकोच, चांगले वागले तर वाहून जायला नको आणि वाईट वागले तर दुःख होऊ देऊ नये. त्यांचं यांनाच ठाऊक नसतं ते काय करत आहेत ते, कधीच. सारखे भरकटलेले, गोंधळलेले आणि अक्षम. कधीं आहे फरक लक्षात घेणं "अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" आणि ह्यांच्यात पण ते माणूस आणि देवांच्या स्वहिताचे आहे. त्यामुळे पत्रिका बघणाऱ्यांना आणि संगणकाच्या साहाय्याने पत्रिका तय्यार करणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कि जरा आपला दृष्टिकोन बदल. तीन गण फक्त नावाला नाहीत, तिसरा भलताच आहे, तिसरा डोळा पापणी रहीत असलेला असा. त्यामुळे तुमच्या हातून कोणाचे ह्या पुढे नुकसान होऊ नये ह्याची खबरदारी घ्या आणि चौथ्या गणाबद्दल समोरच्याला सावध कराच.  

शनिवार, ११ मे, २०२४

देऊळ


प्रत्येक देवस्थानचा एक महिमा असतो, एक माहात्म्य असते आणि महत्व पण. बहुतांशी ठिकाणी त्यांच्या स्वरूपाचे तेथे वास्तव्य झाले असते अनेक वर्षांआधी म्हणून त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. त्यांचा वास तेथे असतो, त्यांचा आशीर्वाद भक्तांना मिळत राहतो आणि तेथील भक्तिमय वातावरण फारच प्रासादिक असते त्यामुळे ते स्थान तीर्थरूप होते. प्रत्येक देवळाला एक नाव दिलेले असते ते तेथील प्रमुख देवावरून. तरीदेखील प्रत्येक ठिकाणी बाप्पा स्थानापन्न असतोच. मारुतीराया, शनिदेव आणि इतर मूर्ती देखील स्थापलेल्या आढळतात. सर्व देवांना नतमस्तक झाल्याचं पुण्य लाभते एका प्रदक्षिणेच्या म्हणून असेल कदाचित. प्रत्येकाचे श्रद्धा स्थान देखील वेगळे असतेच. त्यामुळे देऊळ हे अनेक मूर्तींनी, अनेक देवांच्या वास्तव्याने भरपूर असे स्थान. तेथील कपूर, उदबत्ती, होम हवं, हार फुले आणि इतर असे प्रासादिक सुगंध एकत्र चाखायला मिळतात. आज एक ह्या जगावेगळा अनुभव मला आला पहाटे / सकाळी. अवघे देऊळ आज माझ्या द्वारी आल्याचा भास झाला मला, किंबहुना अगदी जसे कि मी देवळात नमन करते आहे असा सुगंध अनुभवता आला. प्रत्यक्ष अख्खे देऊळ आले हो मला भेटायला माझ्या साठी प्रासादिक सुगंध घेऊन, एक अनोखी भेट ह्या खास दिवशी. अजून काय हवयं? इतक्या सकाळी फ्लॅट्स मध्ये आजू बाजूला, वर खाली कोणीही देवळात होते तशी पूजा करणे अशक्यच. मग हे काय होते? अद्भुत असे काहीतरी हे निश्चितच. त्याचा मोठे पण तर बघा, मी त्याची भक्त, तर मी त्याच्या दर्शनाला जायचे कि त्याने माझ्या कडे यायचे दर्शन द्यायला? तो कित्ती म्हणजे कित्ती मोठा आहे, तरी देखील माझ्या सारख्या नगण्य, सूक्ष्म अश्या मनुष्याच्या द्वारी पातला प्रत्यक्ष त्याच्या अनोख्या रूपात, कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखे आहे ह्या कृतीतून. भेट महत्वाची, मग कोणी कोणाकडे जातंय हे महत्वाचे नाहीच. हो ना? अख्खे देऊळ मी आज अनुभवले ह्याची देही ह्याची डोळा. तंत्रज्ञाच्या युगात सिम्युलेशन म्हणतात अगदी तस्से.

गुरुवार, ९ मे, २०२४

अक्षय


आज अक्षयतृतीया, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस, अत्यंत शुभ दिवस. ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त बघावा लागत नाही कार्य करण्यासाठी. आजचा दिवस जो वर्षातून एकदा येतो तो इतका खास आहे कि ह्या दिवशी प्रत्येक जण काही ना काही नवीन सुरवात करतोच, कोणी नवीन घर घेतो, कोणी गाडी, दागदागिने ई. हे सर्व सुमुहूर्तावर खरेदी करण्या मागचे कारण हे कि हि नवीन केलेली सुरवात अशीच अक्षय राहो, आशिर्वादात्मक झालेली सुरवात अशीच भरभराटीला येऊन टिकून राहो, सदोदित, पिढ्यानपिढ्या. संपन्न अशी सुरवात जी प्रत्येक प्रकारच्या संपत्तीत भर घालताच राहते. घर, गाडी, दागिने ह्याचे मोजमाप आहे, गणना आहे पण जर अगणित असे, सातत्याने जे भरभराटीस येणार आहे, समाजाच्या कामाला येणार आहे असे आज च्या दिवशी घडले तर? ज्यांना स्पर्श करता येतो त्यांना इंग्लिश भाषेत टँजिबल हा शब्द आहे, पण आज च्या दिवशी मला इन टँजिबल अश्या संपत्तीचा अनुभव आला दोन प्रकारे. 


आजच्या सुमुहूर्तावर डेक्कन एडुकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहोळा होता. मी त्या संस्थेची एक कार्यकारी समिती सदस्य (बोर्ड मेंबर) आहे. त्या मुळे मला आमंत्रण होते आणि मी तो सोहोळा ह्याची देही ह्याची डोळा अनुभवण्या करता उपस्थित होते. आवर्जून गेले होते. जाते वेळी मी कॅब केली होती. त्यात रेडिओ जॉकी ने ह्या दिवसाचे अनन्य साधारण महत्व काय हे नमूद केले. त्या नुसार माझ्या बाबतीत मला असे सुचले कि मी माझ्या वयाच्या १५ व्या वर्षांपासून शैक्षणिक / अध्यापनशास्त्रीय क्षेत्रात कार्यरत आहे. आज च्या दिवशी त्या संदर्भात मला इतक्या अप्रतिम पूजेला हजार राहायला मिळालं आहे हे अहो भाग्यच. मला आज खात्री पटली आणि स्पष्ट झाले कि माझ्या हातून छोटेखानी कार्य सातत्याने सुरु राहणार आहे इन टँजिबल अश्या प्रकारचं, ज्याचे काही मोज माप नाही. खूप भावपूर्ण, अध्यात्मिक, परिपूर्ण आणि सकारात्मकता वृद्धिंगत करणारं असं एकंदरीत वातावरण होतं. ते गुरुजींचे मंत्र, शोडोपचारें झालेली पूजा, उपस्थित असलेले सर्व दिग्गज व्यक्ती, मंडप, सजावट, अथपासून इतिपर्यंत केलेली चोख व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगमान्य, आदरणीय लोकमान्य टिळकांच्या हस्ते सुरु झालेल्या वास्तूत आधुनिकतेचा चढवलेला साज म्हणजे सोन्याहून पिवळे असा अनुभव होता. आत्ता दुकानातून फक्त माझ्याचसाठी आणली आहे इतकी नवीन कोरी कॅब, पोटातील पाणी हलणार नाही असे त्या वाहनचालकांचे सफाईदार गाडी चालवणे, सकाळचे प्रफुल्लित वातावरण अशी झालेली सुरवात, मग अजून काय हवयं? मोठ्या जोमाने, अधिक मेहेनतीने ह्या पुढील वर्षात मी संशोधनाचे काम करणार हे निश्चित, किंबहुना तो ते करून घेणार हे नक्की. क्या बात है!!! 

Last but not the least: पुण्यात बसून नागपूरची म्हणजे माझ्या माहेरची चव आज चाखायला मिळाली मला. आज सरतेशेवटी, पूजन झाल्यावर न्याहारीची व्यवस्था केली होती आणि अपेक्षेपेक्षा काही वेगळंच वाढलं गेलं / पुढ्यात आलं. पुण्यात इतके मस्त चविष्ट आणि ठसकेबाज पदार्थ चाखणे हि पर्वणीच होती मला. "अन्नदाता सुखी भव", ते स्वयंपाकी निश्चित मुलाचे नागपूरचे होते ह्यात काहीही दुमत नाहीच. खूप चविष्ट चवदार अशी सुरवात करून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.  

अथक मेहेनत


आमच्या सोसायटीत एक नवीन पाहून येणार आहे, लवकरच. त्यासाठी इतकी म्हणजे इतकी लगबग सुरु आहे कि ज्याचं नाव ते. म्हणजे माझी दाही बोटे तोंडात अशी परिस्थिती झाली आहे. काय करू काय नाही अशी होणाऱ्या आई वडिलांची स्थिती आहे. इतका उत्साह मी आज तागायत ह्याची देही ह्याची डोळा अनुभवाला नाहीच. मी त्यात इतकी गढून गेले आहे कि माझ्या हातात एक अवयव आहे, खेळणे आहे त्याने मी सगळं रेकॉर्ड करून ठेऊ शकते, लोकांसोबत शेयर करू शकते ह्या कडे माझं पूर्णपणे दुर्लक्षच झालं. वर खाली, इकडून तिकडे, डावीकडून उजवीकडे सारखं भ्रमण सुरु आहे, श्वासही नं घेता, नं खाता पिता, कुठलीही विश्रांती नं घेता, क्या बात है. धडपड सुरु आहे सातत्याने. इतकी सुबक हालचाल, कष्ट आणि ते देखील बाळ येणार आहे हे समजल्यावर? चार पायांच्या पशूंना हे खूप अवघड आहे. इतकी मेहेनत पण ठाऊक नाही घेतील कि नाही, म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके घेतात. ते म्हणतात कि सगळंच पैशानी विकत घेता येतं तर काडी काडी जमवून, कौशल्य वापरून का बांधायचं पहिल्यापासून? अगदी नाविन्यपूर्ण असं? 


एक कावळा आणि एक त्याची कावळी ज्या पद्धतीने मेहेनत पल्याड गेले आहेत आज पहाटे पासून ते बघून डोंळ्याचे पारणे फिटले माझ्या. आधी भल्यामोठ्या वृक्षांच्या सुरकुतलेल्या फांद्यांवर चोच घासून सुरवात झाली. मग एक एक काडी, वाळकी बरं का, मग कुठूनतरी मस्त पांढरी शुभ्र दोरी मिळाली त्यांना, मग काय विचारात अहाहा च, अक्षरशः नाचले दोघे ती पायात आणि हातात / चोचीत धरून, फेर धरला चक्क त्यांनी. माझ्या मते होणाऱ्या आईला एक अभूतपूर्व वाळकी भली मोठी फांदी गवसली, ती तिला काही केल्या चोचीत धरून उडून बांधत असलेल्या घरट्यापर्यंत नेता आली नाही, पहिल्या काही प्रयत्नात. ती खाली जमिनीवर पडली. हि खाली आली उडत, ती पुन्हा घेऊन गेली, पण एक भाग राहून गेला. ती जशी ती फांदी घेऊन घरट्यापाशी पोचली ज्याचा मेस्त्री, मेसन ती चा तो होता, त्याने पहिल्यांदा शाबासकी दिली पंखांनी, मग ती काडी नीट ठेवली. ती ने कसं काय त्याच्याशी हितगुज केली कोणास ठाऊक, पण तो खाली आला, आणि उरलेला भाग घेऊन उडाला. सकाळी सहा-सव्वा सहा पासून सुरु केलेली मेहेनत फळाला आली आणि आत्ता अडीच वाजता ते सर्वोत्तम कलेचा नमुना असलेले घरटे तय्यार झाले आहे त्या भल्या मोठ्या वृक्षाच्या एका फांदीवर. लवकरच बाळबोध कावकाव ऐकायला मिळेल असे वाटते आहे. मी ह्या खिडकीतून त्या खिडकीत, अगदी न्याहारी पासून ते जेवण पर्यंत सगळं आज खिडकीत बसून त्यांना बघता बघता झालं. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे ह्या जोडी कडून? आत्ता दोघे बसून त्यांच्या स्वनिर्मित घरात बहुतांशी गादी तय्यार करत आहेत, किंवा एक मस्त पैकी शेवटचा हात फिरवत आहेत. 

सोमवार, ६ मे, २०२४

कृतज्ञता


आदरणीय आणि सर्वश्रेष्ठ श्री रामाचे मंदिर स्थापनेच्या वेळी "नादातूनी ह्या नाद निर्मीतो..." हि आरती सर्वश्रुत झाली. अजून देखील अगदी नित्य नेमाने हि आरती ऐकणारे खूप जण आहेत, त्यातली मी एक. त्या वर माझ्या हातून काही ओली लिहिल्या गेल्या होत्या आणि मला एक जप माळ पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले ती आरती / भजन ऐकून. त्याच कारण म्हणजे फक्त किती वेळा राम नाम माणसाने / गायकांनी उच्चारले आहे हे नाही तर जितकी वाद्य वाजली ह्या संपूर्ण आरतीत, जितक्या ताल आणि सूर वाद्यांनी, समूह गायकांनी साथ दिली ह्या सगळ्यांची बेरीज १०८ होते असा माझा अंदाज आहे, किंबहुना खात्रीच. 


प्रत्येक व्यक्तीला त्याचे कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते ती सूर्य बाप्पाकडूनच. प्रत्येक व्यक्तीलाच कशाला? अगदी संपूर्ण सजीव समूहाला तोच तर ऊर्जा पुरवतो, किंवा तोच ऊर्जेचे स्तोत आहे. ह्या उपर मी तर म्हणेन कि प्रत्येक निर्जीवातल्या सजीवाला देखील तोच कार्य करण्यास मोलाची मदत करतो. आता ह्या श्री रामाच्या आरती विषयीच बघा ना, काही दिवस जर तबला तस्साच पडून राहिला तर तो हवा तास वाजत नाही, किंवा तसे गोड बोल कानी पडत नाही. त्याला देखील हवा लागली पाहिजे, ऊन / ऊर्जा हवीच, वादका सोबत. सूर्य बाप्पा जरा विश्रांती घ्यायला ढगा आड लपला कि म्हणे तबला सर्रदतो, मग खूप वेळ घेऊन लावावा लागतो. 


तबलाच कशाला ढग आले कि सर्वांनाच थोडसं निरुत्साही वाटतंच. पाऊस पडतो तेव्हा, त्या मोसमात बरीचशी लाकडी दारे सुद्धा फुगून बसतात, कपड्यांना वास येतो. 


अगदी समुद्र, नद्या, फुलं, पानं, पक्षी, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचाच उत्साह टिकवून ठेवणारा आपला सूर्य बाप्पा. 


मला हे सुचवायचं आहे कि फक्त भजन ऐकून, कानावर पडून, किंवा शब्दांमुळे, गायकाच्या शैली मुळेच प्रसन्न आणि अध्यात्मिक बाहेर येत नाही तर वातावरण निर्मिती व्हायला आणि टिकायला सगळेच कारणीभूत ठरतात, सूर्य ऊर्जेने युक्त वाद्य, वाद्यवृंद, कोरस गाणारे, दाद देणारे श्रोते, आणि इतर अनेक घटक.    


अश्या ह्या सूर्य बाप्पाला नमन, दंडवत, जो प्रत्येकाचा सखा आहे, सोबती आहे आणि पिढ्यानपिढ्या, अनेक वर्ष पासून अथक, निरपेक्ष कार्य करतोय दिवस रात्र संपूर्ण जगभर. हि जरी सुष्टीची किमया असली तरी ती कमाल आहे. 

शनिवार, ४ मे, २०२४

निमंत्रण

 काही दिवसांपूर्वी मला माझ्या एक खास मैत्रिणीचा फोन आला. तिचा आवाज ऐकून इतकं अफाट वाटलं म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. तश्या आम्ही आपआपल्या विश्वात, रोजनिशी सांभाळता सांभाळता हवं तेव्हा भेट होतं नाही पण हो, वर्षातून एकदा भेण्याची धडपड करतोच आणि होतेच भेट. पण ती सर्व संशोधक आणि शिक्षक कुटुंबासमवेत आणि थोडक्यात. त्या नंतर कधीतरी नमस्कार चमत्कार चे मेसेज काय ते. त्यामुळे तिचा आपणहून आलेला फोन म्हणजे पर्वणीच होती. दुधात साखर किंवा चेरी ऑन केक असं झालं जेव्हा आम्ही दोघी काही वेळा का होईना एक मेकींसमोर आलो, बोललो, गप्पा झाल्या, सेल्फी ने मस्त आठवण जपली आणि मज्जा आली. "थोडक्यात गोडी" म्हणतात ना अगदी तस्से. निमित्य होते तिने मला आमंत्रण द्यायचे ते एका परीक्षेचे. मी काय एका पायावर तय्यार. गेले कि लागलीच. काय काय गम्मत केली म्हणून सांगते. एक तर मी "गाडीतून-चक्कर" वेडी मुलगी, अगदी म्हणजे अगदी कळायला लागल्या पासूनच. त्यामुळे तिच्या महाविद्यालयांत जायचे म्हणजे फारच मोठी चक्कर मला, ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. त्यात गाडीवान सोबत, मग काय विचारात. इकडे बघू का तिकडे, ह्या पाट्या वाचू का त्या, भिंतीवर रेघाटलेली चित्रे टिपू का नवीन झालेल्या / सजलेल्या इमारती बघू असं झालं माझं, आणि हे सलग दोन दिवस. माझ्या सारखी भाग्यवान मीच. अजून काय हवंय? त्यात वेळेच्या आधी निघायची अनेक वर्षाची सवय, सध्याचे रिकामपण त्यामुळे कुठलीही घाई नाहीच, यथेच्छ अनुभवाला मी तो प्रवास. हे काय कमी होते, म्हणून एकत्र घरचे डब्बे खाल्ले, विद्यार्थिनींना परीक्षक म्हणून वैविध्य प्रश्न विचारणे किंवा उत्तरे काढून घेणे हे तर इतके म्हणजे इतके एन्जॉय केले कि विचारूच नका. धमाल आली.  मग भेट झाली ती त्या संस्थेच्या संशोधनाच्या उच्च पदाधिकारी, अधिष्ठाता ह्यांच्याशी. विद्यार्थिनी फारच हुशार आणि अप्रतिम रित्या घडलेल्या अश्या दृष्टीस पडल्या. अशी संधी मिळाली होती ना कि जी प्लॅटिनम च्या पल्याड होती. तिचा मस्त उपभोग घेतला मी. फार म्हणजे फारच भन्नाट अनुभव होता तो, आणि अगदी बहरलेले असे गेले ते दिवस.  "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 

आदरणीय महर्षी कर्वे, त्यांच्या सहचारिणीला आणि वास्तू देवतेला नतमस्तक होऊन माझे दोन्ही दिवस सुरु झाले. कारण ते नसते तर हि संस्था उदयास आली नसती आणि मला तेथे यायची संधी मिळालीच नसती. त्यांच्या अफाट आणि अगाध कार्याला नमन अगदी मनःपूर्वक. 

शतशः धन्यवाद ह्या निमंत्रणाबद्दल सुनीता. 

और

 औरत ह्या शब्दातच और आहे. अजून काय हवंय? ज्यांनी कोणी हि हिंदी भाषा तय्यार केली, किंवा शब्द घडवले त्याला सलाम. मिशन मंगल नावाच्या चित्रपट देखील एक वाक्य आहे, कि बरं झालं ह्या मिशन चे नाव मम्मी होतं नाहीतर .... पुढे बोलण्यात अर्थच नाही. सर्व जणी त्यांच्या ऑरा मुळे (औरत्वामुळे) सगळं यथोचित सांभाळतात, ह्या साठी प्रत्येकीच्या पाठीवर थाप. 

शुक्रवार, ३ मे, २०२४

उरलेले चिवडे


विकत आणलेल्या वैविध्य प्रकारच्या चिवड्याची म्हणे एक निश्चित तारीख असते खाण्याची. त्या नंतर ते चविष्ट लागत नाहीत किंवा खाऊ नयेत. आणि काय होतं कि उपवासाचा साधा, उपवासाचाच पण तिखट, ह्या आणि त्या कंपनीचा, मक्याचा, फरसाण एक दोन प्रकारचे असे अनेक प्रकार घर म्हटले, शाळा कॉलेज ला जाणारी चार मंडळी घरी असली कि असतातच, ठेवले जातात. कारण प्रत्येकाला आता बदल हवा असतो, एकाच एक घरी केलेला चिवडा खायला आवडत नाही. त्यामुळे काय होतं कि डब्ब्यात बरेच पुढे आढळतात. नवीन आणला चिवडा कि मजेत आणि आवडीने फस्त करायला सुरवात होते. पण जसे दिवस सरतात तसे नवीन पुढे उघडले जातात आणि जुने तसेच पडीक राहतात डब्यात किंवा त्याला डब्याचे धन म्हटले तरी हरकत नाही. त्या सगळ्या पुड्यांची वेळ संपली कि मग फेकून देणे हा एकच पर्याय उरतो. पण माझ्या सारखी डोकं चालवणारी मुलगी तसं होऊ देत नाहीच. भेळ कर, तर कधी ह्यात घाल तर त्यात घाल असं करून संपवतेच, नाहीतर वेळ व्हायच्या अशीच घरी काम करणाऱ्या मुलीच्या घरी रवाना करते. 


आज काय मज्जा आली म्हणून सांगते. एक अनोखा उपयोग नजरेस पडला मला आज त्या उरलेल्या चिवड्यांचा. तर त्याचं काय झालं कि मी पोहे करायला घेतले नाश्त्यासाठी म्हणून, साग्रसंगीत. आमच्या कडे शेंगदाणे हा प्रकार घातलेला आवडतो पोह्यात. मग ते कांदे पोहे असोत, नाही तर बटाटा किंवा गाजर वगैरे घालून केलेले. आणि माझ्या कडे मला मदत करणाऱ्या ताईने काल उत्साहात सगळ्याच भाजलेल्या दाण्यांचे कूट करून टाकले. आता आली का पंचाईत? सकाळी काय करावे, फोडणी झालेली. अश्या वेळी पट्टाकिनी सोसायटीतल्या दुकानात जायचे पट्टाकिनी हा पर्याय होता, मसाला शेंगदाणे होते ते सोलून घालायचे हे जवळपास निश्चित केले, आणि मग ट्युब लाईट पेटली कि माझी. बास मग काय, मज्जा आली, असे पोहे मी आयुष्यात पहिल्यांदा करत होते हो. दोन चिवड्यांची पाकिटे होती हे आठवले. त्यांच्या तारखा चार डोळ्यांनी बघितल्या. तारीख आहे म्हटल्यावर मग त्यातले शेंगदाणे निवडून घेऊन वेळ साजरी केली. दडपण आले होतेच मला पण निभावले थोडक्यात. सरते शेवटी मस्त काजूमय पोहे डिश मध्ये सजले असते अगदीच जय काही तरणोपाय सुचला नसता तर. पण जमलं बावा सगळं. अश्या प्रकारे तीन मधला हा एक नाश्त्याचा प्रकार व्यवस्थित पोटात स्थानापन्न झाला. आज शनिवार, जरा शांतता त्यामुळे मग एक का न्याहारी करायची हा माझा मला विचारलेला मीच प्रश्न हो.  

गुरुवार, २ मे, २०२४

कढी पिठलं


हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. दोन्ही वैविध्य पद्धतीने तय्यार केले जातात, किंवा चाखले जातात. जसे कि पातळ पिठले (वरून पीठ लावून केलेले किंवा कालवून), घट्ट पिठले, पातीचे पिठले, आणि बरेच असे. गोड कढी, पांढरी कढी, भाज्या घालून केलेली कढी, किंवा कढी गोळे, ह्या काही कढी करण्याच्या पद्धती किंवा रचना. "नागपूर तेथे सगळंच भरपूर" ह्या पद्धतीने तिथला एक खास पदार्थ आहे तो म्हणजे "भातावरचं पिठलं". जसा गोळा भात करते वेळी भात शिजत आला कि गोळे पेरतात आणि वाफवतात, अगदी तसेच, भात शिजत आला कि पिठल्याचं कालवलेलं पीठ वर पेरायचा आणि झाकून ठेवायचं, वरून फोडणी देऊन यथेच्छ ताव मारायचा. 


ताकातलं पिठलं हा पण एक फार आवडीचा पदार्थ आहे. अगदी म्हणजे अगदी झट कि पट होणारा.  ते पिठलं पण घट्ट / पातळ ह्या दोन्ही प्रकारे करता येतं. पातळ ताकातलं पिठलं हे बऱ्याच अंशी कढी तत्समच लागतं मला. खूप अंतर वाटत नाही. कारण ताकातलं पिठलं हे अगदी साध्या पद्धतीने केलं असतं, फक्त फोडणी देऊन, बाकी कांदा, लसूण, टोमॅटो ई. घटक न घालता केलेलं. "ते" पिठलं आणि "ती" कढी हा फरक आहेच जो मान्य करावा लागेलच. आणि त्यामुळे "त्याला" जरा जास्त पीठ लागतं घट्टपणा यायला आणि "हि" थोडक्यात खुश असते नेहेमीप्रमाणे. 


बुधवार, १ मे, २०२४

तो अप्रतिम नजराणा


आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पूजेच्या किंवा धार्मिक कार्याच्या वेळी कलश पूजन केले जाते. म्हणजे नारळ आणि तांब्याचा तांब्या ह्या दोघांना हळद कुंकवाची बोटे काढली / उमटवली जातात, कुंकवाचे स्वस्तिक पण ह्यावर विराजमान होते आणि मगच पूजेला खरी सुरवात होते. हि खूप वर्ष चालत आलेली प्रथा आहे आणि अजून देखील ती पाळली जातेच. त्या नारळाला श्रीफळाचे महत्व दिले जाते अश्या प्रकारे पूजा सुरवात केल्यावर. शुभ मानले जाते, सुवासिनी साठी जे महत्व आहे हळदी-कुंकवाचे, देवांना पूजेला आग्रहाने विनंती करून स्थानापन्न होण्यास आळवणी केली जाते ह्या अश्या पूजेच्या तय्यारीने. 


तर परवाची गोष्ट. मी आदल्या दिवशी इडली चे पीठ भिजवले कारण दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत तो बेत होता म्हणून. सध्या खूप ऊन वाढलंय त्यामुळे पट्टाकिनी पीठ फुलते आणि इडल्या खूप मऊसूत होतात. अगदी तसे सगळे विचारपूर्वक भिजवले, वाटले आणि झाकून ठेवले. सकाळी उठून दर्शन घेतले तर काय अहो आश्चर्यम, पीठ मस्त फुलले होतेच  पण अगदी किंचित बाहेर पडले होते. ते ज्या भांड्यात भिजवले होते त्या भांड्याच्या काठाला एक पिठाची किनार तय्यार झाली होती आणि शिवाय अगदी जशी हळदी-कुंकवाची बोटे उमटावी जणू तशी ती फुललेल्या पिठाची रांगोळी तय्यार झाली होती. काय दृश्य होते ते? ते बघण्यातच आणि अत्यानंद मानण्यातच मी इतकी गुंग झाले कि फोटो वगैरे काढणे त्या वेळी सुचले नाहीच. इतकी सुबक सुंदर कलात्मक ती कृती घडली होती आपोआप कि ज्याचं नाव ते. मस्त. काय कमाल आहे निसर्गाची आणि विज्ञानाची? अगदी शब्दांच्या पल्याडचं.  ते कसं घडलं हे मला ठाऊक नाही, जाणून घायची इच्छा नाहीच पण जे होतं ते अप्रतिमच्या पलीकडले होते. असे दृश्य जर नेहेमी निर्माण झाले तर पहिल्या वाफेच्या गरमागरम घरच्या इडल्या  अधिक सांबार, चटण्या ई. सोबत जास्त फस्त होतील ह्याची खात्री आहे. मला अजून एक खात्री आहे कि त्या पीठाला पण खूप म्हणजे खूप मज्जा आली त्या भांड्या बाहेर इतक्या सुंदर रीतीने पडायला. ते ठळक दिसत होतं त्या कृतीतून. फुलून बाहेर पडावं तर असं, दिमाखात, स्वतः एन्जॉय करत आणि दुसऱ्याला आनंद देत. कित्ती शिकण्यासारखं आहे ह्यातून.   

गोंधळलेले व्यक्तिमत्व


एक फारच भन्नाट हिंदी चित्रपट तय्यार केला आहे आणि तो मस्त चालला, त्याच शीर्षक आहे "अतिथी तुम कब जाओगे". मस्त हलकाफुलका मजेदार चित्रपट आहे तो. "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". हि एक फारच प्रसिद्ध म्हण आहे. प्रसिद्ध ह्या करता कि ह्या शब्दातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाहुणा कसा हवा हे चपराक पद्धतीने मांडलाय येथे. ज्याने कोणी हि म्हण लिहिली त्यांना साष्टांग नमन. आपल्या घरी पाहुणे आले तर, किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर कसे वागावे हे नमूद केले आहे. कोणच्या घरीच कशाला घरी, दारी कुठेही गेलात तरी आदर्श वागच. त्या व्यक्तीने पुन्हा पुन्हा यावे असे वाटले पाहिजे, सर्व कृती अश्या च असायला हव्यात. सामाजिक, आर्थिक, पारमार्थिक, वैयक्तिक भान ठेवायलाच पाहिजे. हाः, जर एखादा केमिकल लोचा झाला आहे, विस्मृतीच्या त्रास आहे, रुग्ण आहे तर वेगळी गोष्ट. पण जर सगळे आलबेल आहे तर मात्र माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे अत्यावश्यकच. आदर कमवावा लागतो, आणि तो टिकवण्यासाठी पण अथक मेहेनत आणि प्रयन्त करावेच लागतात. फक्त वय वाढलं म्हणजे सगळ्यांनी जबरदस्ती आदर द्यायचाच हे कुठे लिहिले आहे?


"अतिथी देवो भव" अगदी देवासारखे वागणे अपेक्षित आहे. अतिथीच्या वागण्यातून बोध घेता आला पाहिजे सर्वांनाच. एक उदाहरण म्हणून राहिले पाहिजे आणि ते देखील अगदी थोडे दिवस. कंटाळा येईल इतके दिवस किंवा महिनोन महिने नाहीच. 


प्रत्येक अतिथी देव असतो का? तर मुळीच नाही. एखादा लाखातून देवासारखा असतो. इंजिनीरिंग भाषेत एक बेल कर्व असतो. घंटेच्या आकाराचा ग्राफ, त्यात दोन टोक असतात, त्यात अत्यंत कमी जनता असते. इथे पण अगदी तसेच आहे. देवत्व येण्याकरता तपश्चर्या लागते हो, आणि ती अत्याधुनिक, अध्यात्मिक आणि धार्मिक पद्धतीची हवी. नाते संबंध टिकवावे लागतात देवाला सुद्धा. त्यामुळे माणसात राहून देवत्व हे फार दुर्गम आहे. आणि येणाऱ्याने एक काही तरी निश्चित करावे, ते पाहुणे म्हणून आलेत का घरचे म्हणून? आणि तसे वागणे, बोलणे, चालणे ठेवावे. 


दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।

गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...