आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पूजेच्या किंवा धार्मिक कार्याच्या वेळी कलश पूजन केले जाते. म्हणजे नारळ आणि तांब्याचा तांब्या ह्या दोघांना हळद कुंकवाची बोटे काढली / उमटवली जातात, कुंकवाचे स्वस्तिक पण ह्यावर विराजमान होते आणि मगच पूजेला खरी सुरवात होते. हि खूप वर्ष चालत आलेली प्रथा आहे आणि अजून देखील ती पाळली जातेच. त्या नारळाला श्रीफळाचे महत्व दिले जाते अश्या प्रकारे पूजा सुरवात केल्यावर. शुभ मानले जाते, सुवासिनी साठी जे महत्व आहे हळदी-कुंकवाचे, देवांना पूजेला आग्रहाने विनंती करून स्थानापन्न होण्यास आळवणी केली जाते ह्या अश्या पूजेच्या तय्यारीने.
तर परवाची गोष्ट. मी आदल्या दिवशी इडली चे पीठ भिजवले कारण दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत तो बेत होता म्हणून. सध्या खूप ऊन वाढलंय त्यामुळे पट्टाकिनी पीठ फुलते आणि इडल्या खूप मऊसूत होतात. अगदी तसे सगळे विचारपूर्वक भिजवले, वाटले आणि झाकून ठेवले. सकाळी उठून दर्शन घेतले तर काय अहो आश्चर्यम, पीठ मस्त फुलले होतेच पण अगदी किंचित बाहेर पडले होते. ते ज्या भांड्यात भिजवले होते त्या भांड्याच्या काठाला एक पिठाची किनार तय्यार झाली होती आणि शिवाय अगदी जशी हळदी-कुंकवाची बोटे उमटावी जणू तशी ती फुललेल्या पिठाची रांगोळी तय्यार झाली होती. काय दृश्य होते ते? ते बघण्यातच आणि अत्यानंद मानण्यातच मी इतकी गुंग झाले कि फोटो वगैरे काढणे त्या वेळी सुचले नाहीच. इतकी सुबक सुंदर कलात्मक ती कृती घडली होती आपोआप कि ज्याचं नाव ते. मस्त. काय कमाल आहे निसर्गाची आणि विज्ञानाची? अगदी शब्दांच्या पल्याडचं. ते कसं घडलं हे मला ठाऊक नाही, जाणून घायची इच्छा नाहीच पण जे होतं ते अप्रतिमच्या पलीकडले होते. असे दृश्य जर नेहेमी निर्माण झाले तर पहिल्या वाफेच्या गरमागरम घरच्या इडल्या अधिक सांबार, चटण्या ई. सोबत जास्त फस्त होतील ह्याची खात्री आहे. मला अजून एक खात्री आहे कि त्या पीठाला पण खूप म्हणजे खूप मज्जा आली त्या भांड्या बाहेर इतक्या सुंदर रीतीने पडायला. ते ठळक दिसत होतं त्या कृतीतून. फुलून बाहेर पडावं तर असं, दिमाखात, स्वतः एन्जॉय करत आणि दुसऱ्याला आनंद देत. कित्ती शिकण्यासारखं आहे ह्यातून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा