शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

२०१७: कशात काय?


माझ्यासाठी काही तरी खास आणले गेले. ते हातात आल्या आल्या एक वेगळाच सुगंध दरवळला. तो एक छोटासा बॉक्स होता. जेव्हा तो उघडला त्यात एक अलुमिनियम ची थैली आढळली. बॉक्स उघडला कि सुगंध जसा कि द्विगुणित झाला, अजून प्रकर्षाने जाणवला. आणि जेव्हा ती अलुमिनियम थैली उघडली तेव्हा तर भलताच अनुभव आला.  जेव्हा तो पदार्थ चाखला  तेव्हा अन्तर्बाह्य सुगंधांनी संपूर्ण पणे माझी सृष्टी भारावून गेली. अहाहा च. वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला. अतिशय उत्कृष्ट, उत्तम, चविष्ट आणि पारंपरिक असा तो पदार्थ आहे. कर्नाटकात प्रसिद्ध आहे म्हणूनच माझ्या साठी आणला होता खास. त्यात डिंक, सुकामेवा, खोबरं, तूप, गूळ+साखर समप्रमाणात बहुतांशी, आणि अर्थात वेलदोडा घातलेला आहे. किंबहुना हे सगळे जिन्नस वेलदोड्यात घातले आहेत, मिसळले आहेत कि काय असे वाटले. अक्षरशः मी नाहून निघाले वेलदोड्याच्या स्वादात, आणि सुगंधात. मस्त प्रतीचा, ताजे तवाने वेलदोडे वापरले आहेत. अहो पण किती ते प्रमाण? म्हणजे नक्की महत्वाचा घटक काय आहे, वेलदोड्याची वडी सुकामेव्यासह, हे आहे कि सुकामेव्याची खास मिठाई (अर्थात वेलदोडा घालणारच पण अगदी चिमूटभर). अर्थात अश्या नव्या ढंगाची ती वडी चाखून माझा आनंद गगनात मावेना. आधीच मी श्री. बालाजी च्या प्रसादाच्या लाडवांची भली मोठी चाहती आणि हि मिठाई म्हणजे माझ्या नजरेत त्या लाडवांची प्रतिकृती. त्यामुळे खूप भन्नाट मज्जा आली. अशी मिठाई देखील तय्यार होते हे माहित नव्हतं. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणात महागाची विलायची वापरली जाते हे अर्धशतकी प्रवासात पहिल्यांदा समजलं. आणि त्यात पक्की नागपूरकर, खवैयि व्यक्तिमत्व, त्यामुळे "आन दो" अश्या पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त फस्त झालं पण. अहाहा. 


जिच्या मुळे मला हा असला असली खास पदार्थ चाखता आला तिला सर्वप्रथम धन्यवाद. मज्जा आवि गयो. 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

२०१६: शब्दांच्या अलिकडले


आताशा का कुणास ठाऊक पण एक नवीन सवय माझ्यात रुजू पावते आहे. नित्यनियमाने, अगदी दररोज, सकाळी चहा चा कप हातात आला कि नतमस्तक व्हायला होतं. कोणासमोर म्हणाल तर त्या गाई, म्हशींसमोर ज्यांनी हे दूध दिलं. शेतकरी ज्यांनी आलं तय्यार केलं आणि माझ्या पर्यंत पोचवलं, तसेच गवतीचहा सुद्धा. ऊस शेती अतिशय आव्हानात्मक. हे आव्हान ज्यांनी पेललं, सगळे कष्ट उपसून, साखर कारखान्याला पुरवले आणि जे जे हात साखर तय्यार करून माझ्या पर्यंत पोचवण्यासाठी राबले त्या सर्वांसमोर.  मी तब्बल एक आठवडा चहाच्या बागानात वास्तव्याला होते. तेथे लागणारे कष्ट ह्याची देही ह्याची डोळा बघून आले. कित्ती त्या मुली अनेक तास उभे राहून ती पाने खुडतात, टोपलीत टाकतात आणि मग त्याचे फॅक्टरीत प्रोसेसिंग होते. सर्वांची आठवण झाल्याशिवाय राहात नाहीच.  पाणी ज्यांनी अगदी दाराशी आणून सोय केली त्या सर्व कष्टकऱ्यांचे धन्यवाद, अगदी जशी "गंगा आली रे अंगणी". गॅस, सिलेंडर, स्टोव्ह, लायटर किंवा काडेपेटी ह्या कारखान्यात काम करणारे सर्व कामगार, असे सगळे म्हणजे सगळे प्रेमाने आळवले / आठवले जातातच आपोआप न कळत, आणि चहा फस्त होतो.  अर्थात चहाचे सोबती बिस्किटे अर्थातच त्यांना घडवणारे हात, मशिन्स, आणि पुन्हा एकदा शेतकरी हे देखील आहेतच ना. न विसरता, आमचे हे देखील, कारण त्यांच्याच कष्टाचे फळ म्हणजे हे घर आणि सर्व सोयी सुविधा. त्यांना विसरून कसे चालणार बरे. त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद दिले जातातच, कोणीच सुटायला नको. 


हि झाली नाण्याची एक बाजू. 


दुसरी म्हणजे समाधान. एकतर सर्व इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत, किती कप चहाला किती काय काय घालायचे हे लक्षात आहे. दुसरे म्हणजे इतक्या सर्वांना त्यांच्या मेहेनतीचा मोबदला मिळण्यासाठी आपण भागीदार आहोत, न कळत. 


असा विचार केल्यावर मला जरा हायसं वाटलं नाहीतर "कशी होऊ उतराई" असा विचार सतत येत राहिला. कारण मला एक कप मस्त, चविष्ट, तजेलदार चहा मिळावा हातात म्हणून एका रांगेत बघा ना कित्ती जणांनी कामं केली आहेत, कष्ट केले आहेत. क्या बात है? ह्यालाच म्हणतात नशीब आणि "सुख म्हणजे नक्की काय असतं" ह्या परे? काहीच नाही. आणि फक्त सकाळीच नाही बरं का "त्याने" इतक्या योग्य स्थतीत ठेवलं आहे कि मनात येईल तेव्हा चहा करणे सहज शक्य आहे. आपण तो दोनदा पितो तेवढंच. 


हे सगळं शब्दांच्या अलिकडले असे आहे माझ्यासाठी कारण "दोन हस्तक आणि एक मस्तक" किंवा फक्त मनःपूर्वक दररोज चे धन्यवाद पुरेसे आहेत, शब्दात प्रेरणे अवघडच आणि शब्दापर्यंत पोचण्याआधीच प्रकर्षाने धन्यवाद दिले जातातच. 


अगदी तसेच, मोठ्या प्रमाणावर जेवणाचे ताट समोर वाढल्यावर देखील होते.  


सर्वांचे उतराई व्हा, नतमस्तक व्हा, सर्वांच्या कष्टाची जाणीव असू द्या, कारण कुठलेही काम सोप्पे नाही, आणि सर्वांच्या मदतीशिवाय काहीच चालणार नाही. त्यामुळे हे असचं पुढे चालत राहावं असे वाटत असेल तर त्या सर्व कष्टकऱ्यांना बळ द्या. 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

२०१५: माहेरची साडी


हा एक सुप्रसिद्ध चित्रपट होता, आहे, अनेक दशकांपूर्वी आला होता आणि धमाल चालला होता. शेवटी ज्यात माहेर खुद्द आहे असं चित्रपट चालणार नाही असे होऊच शकत नाही. अर्थात माहेर म्हटलं कि आपल्याला एक तरुण नवविवाहित तरुणी डोळ्यासमोर येते किंवा बाकी सगळ्या वयोगटातल्या मुली ज्यांना हा शब्द उच्चारला कि क्षणभर डोळ्यासमोरचं काहीच नजरेस पडत नाहीच. 


पण आताशा ना तसे दूर माहेर राहिले आहे, ना हि तशी साडी. आताशा तर तंत्रज्ञानामुळे हवे तेव्हा आई वडील, भाऊ बहिणींना बघता, बोलता आणि भेटता येतं आभासी पद्धतीने / व्हरचुअल पद्धतीने हो. अगदी तसेच, त्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने आता हवे ते हवे तेव्हा ऑनलाईन मागवता येतं आणि ते घरपोच पण मिळतं. इतकं सोप्प झालंय सगळं. तरी पण माझ्यासारखीला अजूनही आहेच ती माहेरची ओढ, ती कायम राहणार कारण मी ह्या असल्या तांत्रिक युगात जन्मले नाही. आणि माहेरचं असं नाही पण कोणीही काहीही माझ्यासाठी आणलं त्याच अप्रूप निराळंच असतं, मग ती साडी असो, नाहीतर काही आणि. मी मागे एकदा नमूद केल्या प्रमाणे माझी आई म्हणते कि काय वस्तू आणली आहे ते महत्वाचं नाही तर त्या मागची क्रिया, कृती, पायऱ्या महत्वाच्या. ती व्यक्ती तुमच्या बद्दल विचार करते, तुम्हाला काय आवडेल हे ध्यानात आणते, त्या करता ते लक्षात ठेवते, मग दुकानात जाऊन विकत घेऊन पाठवते म्हणजे गिफ्ट. वस्तू नाहीच. 


तर माझी इतक्यातच एका पवित्र (निर्मळ) जसे पाणी, प्रामाणिक, प्रांजल, प्रांजळ अश्या प्रांजलीची ओळख झाली. फक्त आमचं दोन तीनदा बोलणं झालं फोन वर तेवढंच. आणि  एवढ्या च ओळखीवर तिने स्वतःहून माझ्या मुलासाठी, जो वसतिगृहात राहतो त्याच्यासाठी गम्मत घेऊन जाण्याची तय्यारी दाखवली. क्या बात है नाही. मुलाच्या इच्छेनुसार, त्याला जे आवडेल ते पण प्रांजलीला जड होणार नाही असं थोडंस पाठवलं, माहेरचं, खाऊ हो. आता तो घरापासून दूर म्हणजे एका अर्थानी सासरीच गेलेला कि नाही, माहेरी नाही म्हणजे सासरी आणि वसतिगृह म्हणजे एक प्रकारचे वेगळे पण असलेले सासरचं, माझ्या दृष्टीने हो. आणि आता ह्या पिढीच्या मुलांना कुठलं आलंय माहेर सासर. त्याला आवडलं सगळं, प्रांजलीने नेलेले आणि मला मनापासून समाधान मिळाले अगदी जशी कि माहेरच्या साडीची उब.  जितके द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत प्रांजलीला आणि अर्थात तिच्या कुटुंबियाला. 

आधीच्या माहेरच्या परिभाषेप्रमाणे नाही तरी मुलांना कुठे असतं माहेर आणि वेगळं सासर, त्या वरून माहेरची साडी वगैरे, म्हणून हा प्रांजळ उहापोह. 


रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

२०१४: दारिद्र्य


दरिद्री हा शब्द उपहासाने किंवा मित्रमंडळींमधे गमतीने पण वापरला जातो. जे प्रार्थनेवर विश्वास ठेवतात ते कोणाच्याही पदरी हे दारिद्य येऊ नये ह्या बद्दल त्या भगवंताला / दिव्य शक्तीला मनोभावे साद घालतात. पैशाशी निगडीत असलेले असे दारिद्य हा एकच प्रकार नाही तर वैचारीक, सामाजिक, बौद्धिक असे अनेक कंगोरे आहेत त्याला. पैशाने थोडेसे कमी असलेला मेहेनतीने खूप पुढे जाऊ शकतो आणि त्याची खूप उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो आणि बघतो देखील. पण जो विचारांनी दरिद्री असतो तो कधीच पुढे येऊच शकत नाही, अगदी नगण्य अशी संख्या असेल जेथे हा चमत्कार घडला. 


विचारांनी श्रीमंत व्यक्ती हि समाजात, घरात, कामावर आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडतेच. पण जे विचार स्तरावर दरिद्री, कमी नाही हो, पूर्णतः दरिद्री असे त्यांच्या सोबतच्या मंडळींना पण त्या दारिद्र्यात / दलदलती जोपासतात. मग एखादा व्यक्ती अगदी लहानपणापासून वैचारीक दरिद्री आहे हे जर माहिती आहे तर मग एक तर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला साथ देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर त्याच्या पासून कोसो दूर राहिले पाहिजे. 


दोन खास मित्रांची कहाणी माझ्या पुढ्यात मांडली गेली अचानक इतक्यात. अगदी पहिल्या वर्गापासून ते संपूर्ण शिक्षण होई पर्यंत म्हणे दोन मित्र एका वर्गात होते. एक घरचा व्यवस्थित, आर्थिक परिस्थिती सुंदर, वडील चांगल्या हुद्यावर वगैरे. आणि दुसरा म्हणजे अत्यंत गरीब, पैशाची वानवा, तरी देखील भले मोठे कुटुंब आणि बहुतांशी सर्वांचेच विचार अगदी निकृष्ट, घाणेरडे म्हटलं तर त्या शब्दाचा अपमान होईल असे. जवळपास राहात असल्यामुळे, एकाच वर्गात असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांची ओळख टिकून राहिली. जो व्यवस्थित कुटुंब संस्थेतून आला होता त्याने टिकवून ठेवली. मग ह्या दोघांची कालांतराने लग्न झाली, मुले बाळे झाली आणि त्या नंतर मुलांची लग्न जुळवायची वेळ आली. तेव्हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले आणि सधन व्यक्तीच्या मुलीचा विवाह वैचारीक पातळीवर मूलतः दरिद्री असलेल्या व्यक्तीच्या मुलाशी झाला देखील. हे का? माहिती असतांना दरीत ढकललं त्या मुलीला वडिलांनी. असे का केले असेल? मला असंख्य प्रश्न पडले आहेत. ज्याची उत्तरे नाहीतच. नशीब म्हणून किंवा "विनाश काले विपरीत बुद्धी" असे काहीसे म्हणावे लागेल ह्या प्रकरणात.  त्या मुलीची कुचंबणा झाली ते वेगळंच पण दरिद्री माणसाने प्रचंड त्रास दिला, त्याचं सातत्य इतकं होतं कि दाही बोटं तोंडात जावी इतपत. बघा म्हणजे दरिद्री लोकं कुठल्या स्तरावर जाऊ शकतात, त्यांची शक्ती आणि नसलेली बुद्धी कशी त्यांना साथ देते. दरिद्री माणसाला यत्किंचित वाटलं नसेल कि आपण एका हाडा माणसाच्या मनाला छळतोय जी आपली सून आहे, सक्ख्या मुलाची बायको? हि सोयरीक जमली तेव्हा सर्वतोपरी श्रीमंत असलेल्या माणसाची आई हयात होती. मग तिने तर जास्त पावसाळे बघितले होते ना, सगळं ठाऊक असतांना असं घडलं कसं आणि का? त्या मुलाचं नशीब घडवण्यासाठी, का हे दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी? पुढिल पिढी जास्त योग्य उभी करण्यासाठी का पुन्हा एकदा प्रारब्ध म्हणून? 


"त्याचा" निर्णय अंतिम आणि योग्य ह्या वर माझा दृढ विश्वास आहे. आपण फक्त खेळाचा एक भाग आहोत हे देखील मान्य आहेच. पण सगळं बघितलं कि आश्चर्य वाटायला लागतं. अनेक आधुनिक संत देखील म्हणतात ना "जे घडून गेलंय ते उत्तम होतं, काही शिकवण देऊन गेलं सर्वांना आणि जे घडणार आहे ते सर्वोत्तम आहे". भूतकाळात झालेले सगळे विसरून जा, सोप्प नाही ते, पण पर्याय नाही, प्रयत्न केलेच पाहिजेत, तो कार्मिक अकाउंट बंद करा कायमचा आणि  ह्या पुढे सर्वांसाठी फक्त प्रार्थना करत पुढे व्हा. "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान". 

2013: Working professional


I recently came to know the definition of a working professional lady, and it came to me as a sweet shock. Let me narrate the details briefly here.

 

So, this is the tail of one girl who got married really early. She was married in the joint family then, many years ago. And fortunately or unfortunately, her mother-in-law lived a long life till the young girl became mother-in-law herself. Being married so young, she used to be given a tiny work load to carry out, rarely. The entire house was run by her mother-in-law, sister-in-law, and elders in the family. So much so that when she delivered her kids, they were also taken care of by family members only, including their food, stories, health, and what not. The girl who turned into a mother-in-law definitely took care of home, but after many years, and that too with the help from her grown up kids, sons and daughters, and retired husband too. She was a homemaker for her entire life, and her only work was to cook for all. Outside chores were managed by others in the house. Her day used to start at around 7am, cooking and somethings here and there till noon, then TV, lunch, and nap time from 2-5pm daily, without fail. Again, a few visits to the kitchen, followed by consistent TV, dinner, and again, good night's sleep.

 

I am sure all are aware of the daily routine of this generation's moms with multitasking, very demanding work front, equally challenging home front, driving, and working at keeping fit, being presentable, huge screen time, tight timelines, and the list is really endless.

 

Now when we heard that the girl mentioned in the first paragraph was called working professional, great personality, etc., to name a few, by her husband, sons, and daughters, then what will they call the tiny description of today’s moms narrated in the second paragraph? What is the exact definition of a working professional? According to my tiny vocabulary, master, mastero, expert, pro, specialist, virtuoso, etc. are far less. Yeah, she was good at cooking and showing constantly how much she worked, but that is not it, right? The new generation has the designation, needs to prove consistently, lives in a competitive world, may handle politics too on a small scale, takes good care of wealth earned (hard earned), proper management of her time in hand, drive / commute in this crezy traffic, interactions with many so-called men-led cultures, upgrades, updates herself, her health, and always smile on face, involvement in kid activities, and what not.

 

I was again super surprised to hear the definition multiple times.

२०१२: जय्यत तय्यारी


माझ्या लहानपणी पासून जे काही कानावर पडलं ते मी आणि माझ्या सारख्या तमाम मध्यम वर्गीय मुलींनी ग्राह्य धरलं. अगदी कळत्या वयापासून मी आधी लिहिल्याप्रमाणे अगदी जो दिसेल तो, घरी, दारी, प्रत्येक ठिकाणी एकच री ओढली जायची, ती म्हणजे लग्नाची. सगळ्यांनी अगदी विडाच उचलला होता कि लग्न होऊन जाणारी मुलगी हि सर्व गुण संपन्न पाहिजे. स्वयंपाकात / पाककलेत, घर सांभाळण्यात, कलेत निपुण, आवराआवरी, आदर सत्कार, व्रत वैकले, सगळ्या चाली रीती, आणि शिवाय शिक्षणात सर्वोत्तम, म्हणजेच पुढे नोकरी साठी सजग आणि तय्यार. अगदी न कळत्या वयापासून जी टेप सुरु व्हायची ती अक्षता पडे पर्यंत. सगळीकडे एक वाक्यात आहे हे बघून ती त्यावरच विश्वास ठेवायची आणि मनापासून सगळ्या फ्रंट वर निपुण होण्याचा प्रयन्त करायची, आणि त्या वेळच्या सगळ्याच मुली त्यात यशस्वी झाल्या पण. 


दोन गोष्टी शिकवायच्या राहिल्या पण त्या वेळच्या समाजाकडून ह्या मुलींना. त्या राहिलेल्या गोष्टी जर शिकवून टाकल्या असत्या तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, सर्वत्र जास्त आनंद दिसला असता, पण काश ते राहून गेलं. 


१. त्या वेळचा समाज, घरी दारी, सर्वत्र सगळे जण मुलींच्याच इतके मागे लागले, त्यांची सगळी शक्ती आणि वेळ त्यातच खल्लास झाला कि ते हे सपशेल विसरले कि मुलांना देखील शिकवावं लागतं. किंवा त्यांनी हे गृहीत धरलं कि मुलांना सगळं येतं, त्यांचा शिकवण्याची गरज नाही. ते घरचे मुख्य आहेत किंवा होणारे मुख्य आहेत त्यामुळे ते सगळं किंवा सगळ्यांना सामावूनच घेतील सर्वार्थाने आणि जिंकतील. कारण ती मुलं आहेत, जिंकलेली जन्मापासून, वंशाचा दिवा, कुलभूषण ई. 


२. मुलींना एक गोष्ट ठासून सांगायची राहिली कि "तू सून म्हणून त्या घरी जाणार आहेस, मुलगी म्हणून नाही. ते तुझं घर नसणार आहे, हक्काचं नाही. तेथे कदाचित फक्त तुझ्या चुका दाखवल्या जातील, उणे दूणेच काढले जातील, ते फक्त सहन करणे ह्या शिवाय पर्याय नाही. सगळेच तुझ्याकडून खूप अपेक्षा करणार, सर्वांनाच खुश ठेवावे लागणार सतत" ई. ह्या पिढीच्या आधी हे सगळं कदाचित मुलींना अनुभवावं लागलं नाही, त्या जेव्हा सून म्हुणू आल्या तेव्हा, आई झाल्यावर त्यांना चांगलीच किंवा कुठलीही वेगळी वागणूक नाही मिळाली, घरच्या सारखे महत्व मिळाले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींना हे सगळं शिकवले नाहीच. कारण नव्हतेच शिकवण्याचे.  पण आता तसे नाही, कात्रीत सापडलेली सँडविच पिढी हि, घरात दारात दोन्ही कडे कर्तृत्व सिद्ध कारायचे होते तिला. पण अर्थात कामाच्या जागी चुका शांतपणे समजावून घेऊन पुढ्यात मांडल्या, प्रोफेशनली, शिवाय पगार मिळाला, बढती मिळाली ई. 


अजून एक म्हणजे आधीच्या पिढीने इतके मस्त उदाहरणं समोर मांडले आणि तेव्हाच्या काळानुरूप लग्नाला पर्याय नव्हताच, ठेवलाच नाही मोठ्यांनी. पण सॅन्डविच पिढीतल्या आईची स्थिती बघून माझ्या संपर्कातल्या कित्येक मुलांनी, मुलींनी लग्न करायचेच नाही हा ठाम निर्णय घेतला आहे. आणि चुकून केलेच तर पुढची पिढी जन्माला येणार नाही हे निश्चित कारण त्यांना असं भलतं जग दाखवायचं नाही म्हणे त्यांना. 


म्हणजे बघा एका घरच्या सुनेला, आईला, बायकोला जसं वागवतांना बघितलं ते वेगळं होतं. काही सुंदर उदाहरणं आहेत, असतातच नेहेमी, चांगले उत्तम लोकं आणि कुटुंबीय असतात पण फार म्हणजे फारच दुर्मिळ, भिंग घेऊन शोधावे लागतील असे. 


।। "कालाय तस्मै नमः" ।। 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

२०११: बैठक


तुम्ही समुपदेशक म्हणून अनेकजणांसोबत काम करत असाल, सल्लागार असाल, वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असाल किंवा शिक्षक असाल, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी इच्छा, सदीच्छा, आशीर्वाद, गुरु, साधना आणि बैठक असणे महद अत्यावश्य्क आहे. त्या करता सातत्याने मेहेनत घ्यावी लागेल प्रत्येकाला. मग तुम्ही नवशिखे असाल, प्राविण्य प्राप्त केलेले असेल, खूप अनुभुवी असाल, कुठल्याही भूमिकेत किंवा स्थितीत असाल तरी देखील बैठकीला पर्याय नाही. मग बैठक म्हणजे नक्की काय? असंख्य लोकांनी, वरिष्ठ व्यक्तींनी, अनुभवी महानुभावांनी अनेकविध अश्या व्याख्या दिल्या आहेत, नमूद करून ठेवल्या आहेत, खूप ठिकाणी.  पण माझ्या दृष्टीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थरावर स्थिर असणे म्हणजे बैठक. त्यासाठी एखादी गोष्ट आचरणात आणून चालणार नाही तर सांख्यिक रित्या, एकत्रित पणे त्यावर हळूहळू काम व्हायला हवे. मग त्यात नतमस्तक होणे आले, योग आणि प्राणायाम करणे, छंद जोपासणे, नियमित व्यायाम, बुद्धीला चालना, वाचन, मनन चिंतन, सात्विक भोजन, गुरूंचे आणि थोरामोठ्यांचे स्मरण, कर्तव्य दक्ष रहाणीमान असं सगळंच आलं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हळूहळू सुरवात केली कि सगळं साध्य होतंच, तिळमात्र शंका नाही. त्यामुळे जरी तुम्ही वाहनचालक असाल, खूप वर्षांचा अनुभव पाठिशी असला तरी दरवेळी कृतज्ञापूर्वक, मनातल्या मनात त्या वाहनाला, मशीनला नमन करून कामाला सुरवात करून बघा बदल कसा अनुभवता येतो ते.  तुम्ही दुसऱ्याचं समुपदेशन करण्या आधी सर्व स्तरावर तय्यारी करा, तरच ऐकून घेणे, समजणे, उमजणे आणि यथोचित उपाय सांगणे तुमच्या मार्फत साध्य होऊ शकेल.  


मी ह्या छोटेखानी लेखाची सुरवात केली त्याप्रमाणे जरी तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातली सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट पदवी असली तरी आशिर्वादाशिवाय पान हलणार नाहीच.  त्या सुप्रीम पॉवरच्या  समोर शरणागती पत्करणे अत्यावश्यक, जे घडून गेलंय ते उत्तम होतं आणि जे पुढे घडणार आहे ते देखील उत्तमच असणार आहे हा भरवसा अत्यंत प्रेरणादायक ठरतो. शिक्षण + आलेले अनुभव (स्वानुभव) + केलेले वाचन + निरीक्षण + गुरूंचे आशीर्वाद + स्वास्थ्य = तुमच्या हातून घडणारे काम.  तुम्हीच जर अस्वस्थ असाल तर थोडीशी गडबड होऊ शकते. माणूसच आहे, शरीर आहे आणि भरकटणारे मन म्हटल्यावर थोडेसे इकडे तिकडे होणे साहजिक आहे, पण बैठक असली तर मात्र पुन्हा सन्मार्गावर येणे सहज शक्य आहे. करून बघा आणि जरी आपल्याला वाटत असले कि आपण दुसऱ्यांचे काम करतो आहोत, पण स्वतः किती वृद्धिगत होतो आहोत ह्या कडे प्रकर्षांने लक्ष असू द्या. बैठक आणखीन स्थिर, मजबूत होईल नक्कीच. 

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

२०१०: चलता-है अटीट्युड


माझ्या बघण्यात ह्या अर्धशतकी वाटचालीत अनेक पद्धतीचे लोक आले, व्यक्तिमत्व दिसले, अनुभवता आले. काही अत्यंत शिस्तप्रिय, बाकी फारच कडक, आणि बाकी उरलेले सगळंच "चलता-है" असा दृष्टिकोन ठेवणारे. काही थोडक्यात उदाहरण द्यायची झाली तर, उशिरा पोचणे कामावर, रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाडी चालवणे दिवे लावून, दिलेली कामे अर्धवट करणे किंवा ढकला-ढकली करत करणे, थोडक्यात काय सगळंच "चालतं-हो" असं म्हणणारे. "सगळेच करतात आणि करायला पण हवं नाहीतर आपली किंमत राहात नाहीच" असे काहीसे बोलणारे, वागणारे आणि विचार असलेले. हे मी गेले अनेक वर्ष माझ्या चार डोळ्यांनी बघत आले आहे आणि ह्या सर्वांना ते कसं काय जमतं ह्याचा विचार करून डोक्याचा भुगा करून घेत आहे. असो. 


आज सकाळी ह्याच धर्तीवर मला एक विचार सुचला तो येथे मांडते आहे. 


काही अहोरात्र चालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया बघुयात, जसे कि पचन संस्था, किडनीचे कार्य, हृदयाची धड धड आणि रक्ताभिसरण, पोटऱ्यांचे कार्य, मेंदूची कामे आणि असे सगळे जे आपल्या शरीराशी निगडित आहेत. आता बाकीचे बघुयात, पृथ्वीचे भ्रमण, सूर्याची किरणे, हवा, गुरुत्वाकर्षण आणि इतर. हि यादी भली मोठी आहे. जर ह्या सातत्याने चाललेल्या कर्मांनी एकदा ठरवलं कि आपण देखील "चालतंय-हो" असं म्हणून बघावं, तर काय होईल?


"कृत्रिम बुद्धिमत्तेवर" अनेक गाड्या, खूप यंत्रणा कार्य करत आहेत, आपण म्हणजे मानवानेच त्यांना शिकवले आहे कि कशी कामे करायची वायूच्या गतीने. त्यांना एक कृतिमरितीने विचार करायला पण शिकवले आहे. त्यांनी पण असेच ठरवले कि एकदा "चालतंय सगळं" असं वागून बघूया तर? 


फक्त विचार करा काय होईल? माझ्या मते फक्त अनर्थ, अजून काही नाही, प्रचंड नुकसान. आणि मग दोश द्यायला आहेतच अनेक जण. 


हे सगळं टाळता येणं अगदीच शक्य आहे सर्वांना, सहज सोप्प आहे, "पेराल ते उगवेल", हे लक्षात ठेवा. काहीही होणार नाही जर तुम्ही खऱ्या कारणांसाठी कधीतरी उशिरा पोचलात तर, पण चुकीचा मार्ग नको. आधीच थोडे लवकर निघण्याची सवय लावून घ्या. शांत व्हा. आणि आनंदी मस्त मौला प्रत्येक दिवस अनुभवा. "चलता-है" हा शब्द, वाक्यांश आपल्या शब्दकोशातून काढूनच टाका. जमल्यास दुसऱ्यालाही असे करण्यापासून सहज जमल्यास थांबवा. आशा करते कि हे माझे विचार खूप जणांपर्यंत पोचतील. "उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे" / "प्रिव्हेन्शन इज बेटर दयान क्युअर". 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

2009: Prescription


Prior to welcoming my twins to this world, obviously, there were many rounds of doctor visits involved. Thereafter, during my legs episode too, many doctor visits showcased the use of properly printed prescription letters or pages. Some of the doctors have their assistance who will fill up the previous visit’s details, then kick starts the current discussion.

 

Similarly, when the PhD guide meets his / her scholars, why not create and maintain the file of prescriptions? Guide should not wait, but print one such letterhead by making it in Canva and xeroxing it; keep it ready. The scholar may keep them so that before the next visit or meeting, the scholar will fill up publication status details, conference, grant, patent, data, collaboration details, etc. so that further directions can be given. Instead of writing in a register, in an online mode, or on plain paper, a professional approach will prove more useful. Scholars need to maintain this file and bring it during discussion every time. Guide needs to make sure to prescribe less or moderate medicines; no overdose, please.

 

If required, now a days in the market, carbon copy papers are also available, so guide-scholar duo may opt to use such paper so as to have two copies of the same prescription.

 

In this multitasking world, making use of such printed prescriptions, writing on a piece of paper will help guide and the scholar, with reduced screen time and no need to recollect or remember anything about every individual research. Generally all the PhD guides are teachers, hence there will be no issue with the handwriting as with doctors, the medical professionals.

 

I sincerely believe properly written prescriptions for scholars will prove a great initiative.


If PhD guides will start using prescriptions which  will generally have the next date of meeting or any objectives to fulfil with a specific date, etc., so everything will be transparently documented. I am aware of a few handful guides jot down the minutes of meeting or points etc. for their scholars, but if every guide will do it then the productivity will increase for sure.

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

२००८: क्षणभंगुर / तात्पुरते / क्षणिक

 

१५ ऑगस्ट च्या दिवशी मी प्रवासात होते. घरून विमानतळापर्यंत जातांना सगळे मस्त पांढऱ्या शुभ्र पोशाखात दिसले. हातात विविध्य आकारांचे तिरंगे बघून भूतकाळात रमता आलं.  त्यात काही शाळा पण होत्या रस्त्यात. बरीच मुली समूह गीत, देशभक्तीपर नाच ई. भाग घेतलेल्या नजरेस पडल्या. सहज ध्यानात आले त्या सगळ्या मुलींनी कित्ती दिवस आधी ह्या नाचाची तय्यारी सुरु केली असणार, त्यांच्या शिक्षकांनी देखील, अगदी गाणे निवडण्यापासून ते पोशाख, सगळ्यांचे ताल सूर बसवणे, जुळणे ई. तालमी, रंगीतालीम आणि असे बरेच. आणि त्या काही मिनिटात तो प्रेक्षकांसमोर सादर केला कि संपला. त्या वेळेपुरते सादरीकरण, क्षणिक, बास. 


कोणाची ओळख होणे, भेटी गाठी, आणि मग विसर, कामामुळे, इतर अनेक कारणांमुळे, क्षणिक, अगदी काही वेळेपुरते. 


कचेरीत जाणे, दररोजची कामाची यादी केलेली असतेच, मीटिंग ठरलेल्या असतात, काही अचानक अनपेक्षित येणार ह्याची तय्यारी असते आणि त्या प्रमाणे त्या दिवसाचे काम आटोपले कि एक कार्यभाग संपुष्टात येतो तात्पुरता. पुढल्या दिवशी नवा दिवस नवी सुरवात कदाचित नव्या जोमाने आणि तय्यारीने. दिवस संपतोच, कोणीच त्याला थांबवू शकत नाही. काहीच थांबवता येत नाही, सगळेच तात्पुरते, टेम्पररी अश्या स्वरूपाचे. 


औषधें त्या वेळापुरती काम करतात, वेळ संपली कि पुन्हा काही प्रमाणात दुखणे डोके वर काढू शकतेच. त्या काही तासापुरते मर्यादित. 


कुठलीही दिवसभरातील गोष्ट घ्या, प्रसंग पहा तो फक्त तात्पुरता होत असतो. एकाच मीटिंग मध्ये महिनोंमहिने बसलोय हे शक्य नाही. किंवा सतत तरुण राहिलो आहे हे अशक्यच. भाजीचा ताजेपणा हा फक्त १-२ दिवस, बास. नंतर त्याला शिळी भाजी अशी उपमा दिली जातेच. 


हास्य काय, अश्रू काय, घोर लागणे काय सगळंच क्षणभंगुर, किंवा क्षणिक असे देखील म्हणता येईल. 


पैसा अडका, संपत्ती, ताकद, घर दार, नाते संबंध, सगळंच तेवढ्यापुरते. अर्थात सर्वत्र आउट्लायर्स असतातच. काहींच्या बाबतीत वेगळं घडणं सहज शक्य आहे. पण सगळंच जर पासिंग कलाऊड सारखे आहे, येत-जात राहणार आहे तर अडकून काय फायदा. नका त्या फंदात पडू. आला दिवस गेला दिवस नाही परतला कधी. नक्की, खात्रीशीर, नेहेमीकरता असेलच असे काहीच नाही, माझ्या दृष्टीने. त्यामुळे अगदी तस्सेच वागण्याचा प्रयत्न करा. स्वावलंबी पद्धतीने. गुंतू नका अनावश्यक रित्या त्यात.  

२००७: स्क्रॅम्बल्ड रवा


मला डाएटिशियन ने दिलेला किंवा सुचवलेले खाणे आवडते, ते मी अगदी मनापासून पाळण्याचा प्रयत्न करते. फक्त वजन कमी करणे किंवा बाह्यरूपाला महत्व देणे नाही तर तंदुरुस्त राहणे जास्त आवश्यक म्हणून. तर आजचा नाश्ता होता रवा डोसा, खूप मस्त भाज्या घालून केलेला असा. त्या सोबत मग साधी हिरवी चटणी, सॉस असं काही. त्याप्रमाणे मी सकाळी मस्त किंचितसा रवा भाजला, थंड झाल्यावर त्यात पाणी घातले म्हणजे तो फुगेल शिस्तीत म्हणून आणि मग सगळ्या भाज्या चिरून, किसून त्यात घातल्या, मीठ, तिखट, कोथिंबीर घातली आणि तवा तापायला ठेवला. पहिला डोसा घातला तर तो विचित्र झाला, काही तरी वेगळा.  मला काही उमजेना काय झालं असेल नक्की. असा कधीच होत नाही रवा डोसा. किंबहुना ह्या आधी मी लिहिले आहे कि रवा डोसा हा कधीच बिघडत नाही कारण त्यात बिघडण्यासारखं काहीच नसतं. तो खूप गोल वगैरे पसरवावा लागत नाहीच. थोडेसे डोके चालवले आधी तो डोसा मग 

स्क्रॅम्बल्ड रवा किंवा एक वेगळ्या धाटणीतला उपमा तय्यार झाला. मी तो मग चमच्याने फस्त केला. त्यानंतरचे सगळेच मग स्क्रॅम्बल्ड रवा अवतार झाले. तेव्हा लक्षात आलं कि रवा डोश्यात अगदी महत्वाचा घटक म्हणजे दही. कारण तो एक बाइंडिंग चे काम करतो, सर्व पदार्थांना / घटकांना / जिन्नसांना एकत्र बांधून ठेवतो आणि त्यामुळे डोसा झक्कास होतो. आज तो घरी नव्हता. आणि मी दुसरे कुठले बाइंडिंग दिले नव्हते. त्यामुळे हा घोळ झाला, नवीन पदार्थ तय्यार झाला.    मज्जा तर आलीच खायला, सगळं संपलं देखील आणि मला माझ्या एका ताईची खूप मनापासून आठवण झाली. मी त्या वेळी ६-७ व्या वर्गात असेल बहुतेक जेव्हा तिचे लग्न झाले आणि त्यानंतर माझा तिचा काही संपर्क राहिला नाही. ती फार प्रसिद्ध होती कोरडा उपमा करण्यात. भगरा उपमा म्हणायचे त्याला. मस्त सगळ्या भाज्या, उडदाची डाळ, दाणे, मिरच्या, भाजलेला रवा आणि अगदी किंचित पाणी, भरपूर कोथिंबीर आणि नारळ. अहाहा च. तिच्या सारखा तो उपमा मी अजून तरी कोठेही खाल्ला नव्हता जो आज माझ्या पुढ्यात वाढला गेला आपोआप. क्या बात है? इतकी मज्जा आली म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते.  


ह्या शिवाय बाइंडिंग चं महत्व प्रकर्षाने जाणवलं पुन्हा एकदा, अगदी जसे कि ते विस्मृतीत गेले होते. सर्वांनाच एक तो बाइंडिंग एजन्ट लागतोच नाही. कधीही आणि सातत्याने उपयोगी येणारा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा असा. मग ते घरची लहान मुले असो, किंवा एखादी भन्नाट आजी, एखाद्या डिपार्टमेंटची हेड / मुख्य नाहीतर मित्रांच्या संघाची प्रेरणा. असा बाइंडिंग एजन्ट असेल तर मग सगळं सैरभैर होतं, नको तेवढं पसरतं उगाचच, इतकं कि मग आवरणं अशक्य आणि अवघड होऊन जातं. एकाच एजन्ट / व्यक्ती  असावा जो सर्व स्तरावर ठामपणे उभा राहील किंवा प्रत्येक क्षेत्रातील सल्लागार पण उपयुक्त ठरेल, पण त्याच्याशिवाय पान हलणे नाहीच, अशक्यच. त्यामुळे अश्या बहुमूल्य व्यक्तीला गृहीत धरू नका. त्याचे महत्व त्यांना सांगा, वेळ घालवा शक्य असेल तेव्हा आणि तुम्ही पण कोणाचे तर असेच एजन्ट व्हा, राहा आणि वृद्धिंगत व्हा स्वतः. 


२००५: ओढाताण


इतक्यात मी प्रवासाला निघाले होते माझ्या बेस्टी सोबत. तिच्या शिवाय माझं पान देखील हालत नाही, कधीच.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती असली कि मला कधीच काहीच बघावे लागत नाही. त्यामुळे मी व्हील चेअर वर बसल्या बसल्या मस्त विश्व दर्शन करत असते. भिरभिर सर्वत्र बघतं, टिपतं आणि  अत्यानंद घेत असते. इतकी मज्जा येते म्हणून सांगू? आणि काय काय मस्त मस्त, मनमोहक आणि भन्नाट बघायला मिळते. हा प्रवास जरा जास्त आश्चर्य कारक ठरला आमच्यासाठी कारण जेथे जेथे नजर जात होती तेथे तेथे जुळी मुलं नजरेस पडत होती. हे कसं काय होत होतं हे ठाऊक नाही मला. पण खूप जोड्या दिसल्या.  अर्थात आमच्या सोबत सहप्रवासी म्हणून ह्या वेळी खूपच जास्त मुले होती, अगदी नुकतीच चालायला, जग फिरायला शिकलेली अशी. त्यामुळे इतकी मज्जा आली. सगळ्या नवशिख्या आया, अत्याधुनीक अश्या, त्याच पद्धतीची केश आणि वेशभूषा देखील. आई झाली म्हणून काय झालं ती तिला हवे तसेच सगळे परीधान  करणार, असा काहीसा पवित्रा होता. 


सध्या म्हणजे गेले १५ वर्ष असेल, किंवा काही त्या आधी पण, हो, अगदी आपल्या भारतात, मध्यम वर्गीय लोकांमधे सुद्धा एक ट्रेंड सुरु झाला तो म्हणजे केस मोकळे सोडण्याचा, मग ते कुठल्याही पद्धतीचे असो, कितीही लांब असोत नसोत, ई. पण ते मोकळेच. हा ट्रेंड फक्त मग तरुण मुलींपुरता मर्यादित न राहता  सर्वदूर पसरला, ना वयाची अट, ना वजनाची, नाही दिसण्याची किंवा कशाचीही. काय धन्य वाटतं केस मोकळे ठेवण्यात कोणास ठाऊक? फॅशन आहे हे मान्य आहे, पण तरी? असो. 


तर ह्या सगळ्या अत्याधुनीक आया बहुतांशी उंच टाचेच्या चपला / सॅंडल / तत्सम घातलेल्या, जीन्स, टी शर्ट, हातात मोबाईल (तो तर हवाच ना, त्या शिवाय कसं चालणार, जग थबकून जाईल ना), आणि सामान. त्यात पिल्लू, त्याची गाडी, आणि इतर वस्तू. कडेवर घ्यावं लागलं कि पिल्लू हमखास जबरदस्त पकड ने केस धरणारच, एका बाजूचे सोडवले कसे तरी त्या आधीच दुसऱ्या बाजूला धरलेच आणि ओढलेच म्हणून समजा. आणि त्याची मूठ इतकी घट्ट असते, आणि ओढ इतकी जास्त बसते  कि ज्याचे नाव ते. कधी कधी तर जीव कासावीस होतो, मानेला पण झटका बसू शकतो. पण पिल्लूला कदाचित मजा येत असेल, कारण त्याला समजलं कि मला धरता येतंय, अहाहा च. जोवर ते पिल्लू कडेवर तो वर बहुतांशी हे असंच चालू, झोपल्यावर किंवा त्याच्या गाडीत ठेवल्यावर नाही अर्थात, पण बाकी वेळी आहेच. शिवाय त्याला कितीवेळ गाडीत किंवा कडेवर घेणार म्हणून जर फरशीवर सोडलं तर संपलं, सर्वत्र फिरायला मोकळे आणि ते मोकळे गळ्यात येणारे, मधे मधे येणारे केस? तोबा तोबा, काय काय सांभाळू अशी गत, त्रेधा तिरपीट नुसती. ह्या सगळ्या ओढाताणीत तो मोबाईल मात्र सतत हातात. बापरे, हसू का रडू, व्हीलचेअर वरच बसून राहू का त्या पिल्लूला थोडावेळ सांभाळू, म्हणजे आईचा हात मोकळा, श्वास घेता येईल माउलीला, केस आवरता येतील थोडेसे, मोबाईल वर काही बघता येईल असा गोंधळ माझ्या मनात सुरु होता. 


कुठलीही तुलना नाहीच, पण सहज भूतकाळात चक्कर मारून आले. मी विद्यार्थिनी असतांना किंवा शिक्षिका झाल्यावर प्रकर्षाने दररोज वेगळा साधा ड्रेस, साजेशी पण भली मोठी टिकली आणि परफेक्ट नेलपेन्ट असायचं म्हणजे असायचाच. न चुकता, दररोज. आईच्या घरी होते त्यामुळे जमायचं कदाचित कारण माझ्यावर कुठलीच जबाबदारी नव्हती आणि वेळच वेळ होता हातात. पण जेव्हा माझी पिल्लं आली तेव्हा पासून ना टिकली, ना बांगडी, त्यांना टोचेल असे काहीच नाही, घड्याळ पण नाहीच. नाईलपेन्ट तर मी जवळपास १९ वर्षांनी पुन्हा लावायला सुरवात केली.  पिल्लंमय आणि नोकरीमय झालेली आई होते मी सलग अनेक वर्ष.  फॅशन आपल्या गतीने सुरु होती आणि मी माझ्या. केस आणि मोकळे? हे समीकरण मलाच नाही तर माझ्या आजूबाजूला, घरी दारी, परसात, कुठेच म्हणजे त्यावेळी कुठेही बघण्यात नाहीच. म्हणजे असं काही असतं हे देखील माहिती नव्हतं, त्यामुळे करणं खूप दूरची गोष्ट. आणि आता सवय राहिली नाही  त्यामुळे शक्य नाही. ह्याचा अर्थ मी किंवा माझ्यासारख्या फॅशनेबल नाहीत असा होत नाही. बरोबर ना?


असो, नवीन आई, नवीन पिल्लू आणि त्यांची नवीनकोरी ओढाताण सुरु राहू दे किंवा राहील अशीच. मोकळे केस ठेऊन झाशीच्या राण्या काम करतात, गाड्या चालवतात, आणि सगळं शिताफीने निभावतात हे म्हणजे अप्रतिमच.  

२००४: कर्तव्य, काम, नोकरी


महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार बहुतांशी ठिकाणी मुली स्वयंपाक घर म्हटले, वाढणे आले कि अग्रगणी असतात, ठेवल्या जातात. हो २०२४ मधे  सुद्धा. मुलं अजूनही मागच्या खुर्चीवर स्थानापन्न आहेत. असो, मुली अगदी सर्व कामे, कर्तव्य  हिरीरीने करतातच. पहिली पंगत सणावारी, किंवा काही दिवस मास असल्यास थोरा मोठ्यांची बसते, म्हणजे  पुरुष मंडळींची. त्या नंतर मग मुलांची पाळी येते. किंवा मागे पुढे, वयोमानानुसार. ते सगळं आटोपलं कि मग घरच्या मुली, स्त्रिया, आया ई. त्यांची बारी येते तोवर ह्या पहिल्या आणि दुसऱ्या पंगतीची वामकुक्षी होत आली असते. म्हणजे पहिल्या दोन पंगतींना वाढा, सकाळपासून कामे, आणि शिवाय स्वतःच स्वःत घेऊन पोटभर जेवा. ते झालं कि पुढची आवराआवरी आलीच अनुशंघाने. आवराआवरी होत नाही तोवर संध्याकाळच्या चहाची वेळ येतेच.

साधा प्रश्न आहे माझ्या पुढ्यात उभा. कि ह्या मुलींना, आयांना कोणी का वाढत नाही? मुलींनी सर्वांना वाढणं जर अपेक्षित आहे, अलिखित नियम आहे तर मग हा असा नियम का नाही, लिखित स्वरूपात यायला हवा. जरं भजे तळून का वाढले जात नाही? पुन्हा एकदा सगळे पदार्थ मस्त गरम करून, विचारून, आग्रह करून का ताटात वाढले जात नाही? शेजारी बसून खाऊ घातले तरी हरकत नाही ना? थोडासा वेळ त्यांना पण द्यावा अधे मधे. काय हरकत आहे गरमागरम पोळ्या करून वाढल्या आणि त्याच वेळा थोडासा  भात लावला आणि पहिल्या वाफेचा पानात वाढला तुपाच्या धारेसहित? दहा हत्तींचे बळ येईल तुमच्याच घरच्या स्त्रियांना, मुलींना, आयांना. तुम्हाला त्यांनी ठणठणीत राहणं नको आहे का? त्यांच्या औषध पाण्यावर तुम्हाला उगाचच खर्च करायला आवडेल का अश्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहायला नेहेमीकरता? ठरवा पट्टाकिनी तुमचे तुम्हीच. आणि सगळं जग बदलत आहे, प्रत्येक पद्धतीने, कंगोऱ्याने, मग ह्या बाबतीत बदल का घडू नयेत? करून बघा आणि फळं चाखा. मज्जा येईल सर्वांनाच ह्याची खात्री आहे १०० टक्क्यांपेक्षा जास्तच.  

२००३: खिरीची खरी चव


मी एका खास भ्रमात वावरत होते कि खिरीची चव हि (समजा तांदुळाची खीर) तांदुळाच्या गुणवत्तेवरून, दर्जावरून ठरवता येते. त्यानंतर यौग्य प्रमाणात तांदळाला भिजवले कि पण  चव वृद्धिगत होते. सुकामेवा, विलायची, केशर, दुधाचा दर्जा, दाट होईस्तोवर मस्त आलेली उकळी ह्या सगळ्यांमुळे चार चांद लावते. पण छे हो, आज माझे डोळे उघडले. चार डोळे आहेत, ते देखील बरं का मंडळी.

तर त्याचे असे झाले कि आज मोठ्या प्रमाणावर घरी स्वयंपाक होत होता. चार बर्नरचा गॅस तर सर्वांकडेच असतो आजकाल. तर बाकी तीन बर्नर वर विविध फोडण्या सुरु होत्या आणि चवथ्या बर्नर वर सातत्याने खीर उकळत होती. त्या तीन बर्नरवर भाजीची फोडणी झाली, विविध मसाले फटाफट घातले गेले, मीठ, तिखट, जीरा धने पावडर ई. देखील. कधी खूप वेळ उकळत होती शिवाय. हे सगळं चाललं असतांना कोशिंबीर झाली, कुकर झाला, दोन भाज्या, पंचामृत केले गेले. बहुतांशी सगळ्याच पदार्थात हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त पैकी टाकण्यात आला फोडणी सुरु असतांना, खूप प्रमाणात कढीपत्ता पण होता घातलेला, आणि पुन्हा एकदा नमूद करते कि चवथ्या गॅस वर खीर सुरूच होती उकळत. मग मला लक्षात आलं कि खरी चव खिरीला कशी येते नेहेमी. काय काय नेमकं त्यात घातलं जातं तेव्हा इतकी व्यवस्थित ती होते. अर्थात करणाऱ्याच्या हातची चव पण आहेच, अनुभव देखील, पण नकळत पडलेले मसाले आणि त्याचं एकंदरीत समीकरण ह्याने ती सरते शेवटी चव येते.

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

२००१: उत्तर


श्राद्धाचे जेवण श्रद्धेने, त्या कष्टकऱ्यांसाठी, शेतकरी, स्वयंपाकी, मदतनीस, शेतमाल साफ करणारे, वाहून आणणारे, सांभाळून ठेवणारे, निवडणारे, सूर्य देवासाठी, जमिनीसाठी, वरुण देवासाठी, संपूर्ण आभाळासाठी, पावसाच्या संपूर्ण चक्रासाठी, भूमिगत शेतीमित्रांसाठी, खतासाठी, शेतीत राबणाऱ्यांसाठी, गॅस च्या प्लांट वर काम करणाऱ्यांसाठी, मीठ, तिखट, मसाले ह्यांच्या फॅक्ट्रीत अहोरात्र काम करणाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, जलशुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्यांसाठी, गाई म्हशी ज्यांच्यामुळे तूप लाभलं आहे, आणि ते अनेक पदार्थांमध्ये वापरलं गेलंय, अश्या सर्वांसाठी फक्त ते अन्न सेवन करावे माझ्या दृष्टीने. 


नैवेद्याच्या पानात काही ठिकाणी मीठ वाढत नाहीत, का हे मला ठाऊक नाही. पण ऐकिवात आहे. तर माझ्या ऐकीव माहितीनुसार मिठागरात काम करणे अवघड आहे, अर्थात आता खूप नावीन्याने भरपूर मशिन्स आली आहेत. त्या नंतर डावी बाजू जर नेहेमीच्या पद्धतीने पण वाढलं तर. चटण्या: आपल्या दारात वीज आणण्यासाठी ज्याने कष्ट घेतले, मिक्सर तय्यार केला, आपल्याला म्हणजे स्वयंपाक्याला सद्बुद्धी दिली किती वाटायचे, कायकाय घालायचे, त्यांच्यासाठी, कोशिंबिरीच्या सगळ्या जिन्नसांसाठी केलेल्या कष्ट कार्यांसाठी, भात शेती हि खूप कष्टाची, मेहेनतीची, दूध लोणी ताक तूप काढणाऱ्या हातांसाठी, पापडाचे पीठ योग्य प्रमाणात तय्यार करून, ते व्यवस्थित भिजवून, लाटून, सुर्यबाप्पाच्या किंवा मशीनच्या मदतीने सुकवून, तळून चव वृद्धिंगत करणाऱ्यांसाठी. रोजच्या भाज्यांची शेती करणे म्हणजे जिकरीचे काम, त्यात पावसावर भर, अपार कष्ट, कमी मानधन तरी जिकरीचे आपल्या समोर ताट वाढलं जातंय त्या संपूर्ण शेतकरी कुटुंबासाठी, कांडप आणि मसाले फॅक्टरीत काम करणे म्हणजे जबाबदारी आणि चिकित्सक नजर. त्या संपूर्ण चमूसाठी. 


हे सगळं डोक्यात येण्याचे कारण म्हणजे माहिती असतांना, "त्याच्यावर" संपूर्ण श्रद्धा असतांना, असे जेवण सेवन करायचे का? असा प्रश्न अनेकांना पडत असणार, पण कुठलाही पर्याय नाही म्हणून निमूटपणे जेवणे एवढंच ठाऊक आहे. किंवा कोणाला विचारायचे? गुगल बाबा प्रत्येक प्रश्नाचे हवे तेव्हा पट्टाकिनी आणि योग्य उत्तर देईलच असे नाही. त्यांच्यासाठी हा एक साधा, सोप्पा, सरळ, डोक्यात आलेला दृष्टिकोन मांडला एवढंच. 


आणि ह्या वर नमूद केलेले सर्व फक्त ह्या अश्याच खास जेवणाच्या वेळी आठवायचे नाहीत, तर दर वेळी, प्रत्येक पान हातात वाढून आले कि नतमस्तक व्हायचेच, दिवसातून दोन ते तीन वेळा, न चुकता. श्रद्धेने धन्यवाद देऊनच मग संपूर्ण भोजन गोड मानून घ्यायचेच. माझ्या मते असे केल्याने स्वतःला आत्मिक समाधान तर लाभतेच, पण शिवाय तो केलेला नमस्कार पोचतो त्या कष्टकऱ्यांपर्यंत, त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते पुढे मार्गक्रमण करायची आणि हि एक छोटीशी शाबासकी असते त्यांना दिलेली. काही देशात प्रथाच आहे कि कमीतकमी २ वर्ष शेती करायचीच लहान वयात, आणि लढाईला जायचे किंवा लष्करात रुजू व्हायचे. हे २ वर्ष केल्यावर तो माणूस घडतो आणि लक्ष केंद्रित करून कामे करतो. 


अगदी मूठभर ठिकाणी तंत्रज्ञान पोचले आहे, बाकी कडे चिखल, माती, ऊन, वारा, पाऊस, मेहेनत, अपार कष्ट आणि कमी मोबदला हेच आहे. म्हणून नम्र विनंती आहे कि त्या सर्व कष्टांना सलाम कराच. 

२००२: लाळेरं


घरी, देवघरात आणि खास करून स्वयंपाकघरात तेलाचं बुदलं वापरतो आपण सर्रास. स्वयंपाकासाठी आधी स्टील ची बरणी वापरली जायची. त्यात एक पिटुकला डाव पण असायचा जो एक योग्य माप द्यायचा तेलाचे. पण त्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीने त्याची जागा घेतली. किंवा छोटेखानी विविध आकाराचे तेलाचे भांडे स्वयंपाक घरात फिरू लागले. त्या सोबत तुपाचे चांदीचे नाहीतर स्टील चे छोटे बुदले पण असायचे. प्लास्टिक ने ह्या साठी जागा घेतली कि थोड्या प्रमाणात तेल ओतलं गेलं पाहिजे म्हणून. त्यामुळे त्या बरणीचे डोके अगदी निमुळते आहे. 


हे झालं खाद्य तेलाचं. आधी खाद्य तेल किंवा तूप च वापरले जायचे देवासमोर दिवा लावतांना. पण नंतर देवाचे वेगळे तेल पण मार्केट मधे दृष्टीस पडले. ती पण एक निमुळती प्लास्टिक बाटली. आणि त्याला अगदी व्यवस्थित सील केलेलं. ते सील काढून मग समईत किंवा दिव्यात तेल वात घालून दिवा लावायचा. 


मी अनेक प्रकारच्या तेलाच्या बाटल्या आत्तापर्यंत वापरून बघितल्या, अगदी स्वस्त ते महाग, देशी विदेशी, छोट्या मोठ्या, अगदी विविध प्रकार पण कितीही काळजी घेतली तरी प्रत्येक बाटलीतून तेल ओतल्यावर, त्याचे तोंड पुसले ताबडतोब तरी किंचित ओघळ येतातच. मग बाटली ठेवतांना खाली कागद ठेवला, त्या बाटलीला कागद गुंडाळला पण तरी त्याचा हवा तसा उपयोग झाला नाही. एक तर त्या स्टील किटली आणि छोटासा डाव ह्या कडे परत जायचं, किंवा ह्या अश्या बाटल्यांना लाळेरं बांधायचं त्यांच्या पिटुकल्या मानेला. म्हणजे कदाचित फायदा होईल, संपूर्ण बाटली तेलकट होणार नाही. इतके तंत्रज्ञान पुढे गेले पण ह्या साठी एक साधा उपाय शोधला नाही कोणी अजून. 


असो. ह्या निमित्याने मला माझ्या मुलांच्या बीब ची आठवण झाली. हे कित्ती गोड आहे. मला भूतकाळात रमता आलं काही वेळा करता. आहे कि नाही मज्जा. 

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

२०००: चमत्कार

मी एक संगणक तंत्रज्ञ असल्यामुळे २००० ह्या वर्षाचे महत्व मला माहिती आहे आणि त्या वेळी डिसेंबर महिन्यात जे काही घडलं होतं ते मी ह्याची देही ह्याची डोळा बघितले पण होते अनुभवले होते. 


हे वर्ष माझ्या साठी अजून एका दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण माझे दोनाचे चार ह्याच वर्षी झाले होते, एक वेगळी कलाटणी मिळाली आणि खूप वेगळं विश्व  उभं ठाकलं माझ्यासमोर. 


हा आकडा मग मी पुन्हा एकदा प्रचंड महत्वाच्या दुर्ष्टीने बघितला, किंवा माझ्या समोर तो उभा ठाकला. मी एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षिका म्हणून नोकरी करत होते. त्या नोकरीचा भाग म्हणून आम्हाला संशोधन पण करायचे होते. संशोधन करणे म्हणजे जमल्यास मोठ्या प्रमाणात समाजाला मदत करणे, त्यांच्या अडचणींना जर काही तांत्रिक उपाय असेल तो सुचवणे, अनेक प्रयोग करून बघणे, त्याची नोंद ठेवणे, त्याबद्दल लिहिणे, प्रयोग सुरूच ठेवणे, त्यांच्यात तुलना करणे आणि ते पुन्हा समाजासमोर मांडणे, किंवा जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या समोर, संक्षिप्त स्वरूपात तुमचे काम, बाकिच्यांनी ह्याच विषयात केलेलं काम असे सगळे पेपर च्या स्वरूपात मांडणे आणि असे बरेच काही. जेव्हा तुम्ही पेपर लिहिता, तो तज्ज्ञांकडे पाठवता, जर्नल मध्ये तो प्रसिद्ध होतो तेव्हा बाकीचे लोक तो वाचायला, रेफर करायला सुरवात करतात. रेफर करणे म्हणजे वाचून सोडून देणे नव्हे तर त्याबद्दल तुमच्या पेपर मध्ये लिहिणे. त्याला सायटेशन असे संबोधले जाते. तर २००० सायटेशन मिळणे एका पेपर ला हि खूप मोठी उडी आहे, शाबासकी आहे, प्राप्ती आहे आणि सगळे बोलणे थांबतेच इतके मोठे सायटेशन मिळाले हे बघितले कि. अर्थात २००० हि फक्त सुरवात असते, पण माझी २००० ह्या आकड्याची पुनः ओळख अशी झाली होती. 


अर्थात ह्या जगात इतके दिग्गज लोकं आहेत ज्यांचे सायटेशन कदाचित आकाशाला भिडले असतील, पण २००० हा देखील खूप मोठा आकडा आहे.


माझा मुलगा लहान होता. शाळेत जात होता. त्याच्या वार्षिक स्नेह संमेलनात एकदा म्हणतो कसा "मम्मा मला स्टेज वर जाऊन सर्टिफिकेट मिळवायचं आहे पण ते अभ्यासात काही मिळणार नाही हे मला माहिती आहे, कारण मी इतका हुशार नाही. पण मला तरी देखील १००% अट्टेण्डन्स / वर्षभर उपस्थिती ह्याचं सर्टिफिकेट हवंच आहे पुढल्या वर्षी". म्हणजे बघा तो फक्त वयाने लहान होता, दिसायला लहान होता, पण डोक्याने? मला तर खूप भरून आलं त्या वेळी. मी त्याला समजावलं आणि असं म्हणायचं नाही असं सांगितलं. मिळेल तुला पण एखाद्या विषयात प्राविण्य. नाराज व्हायचं नाही, तुलना करायची नाही, जोमाने अभ्यास करायचा  असं काहीस मी त्याला समजावलं आणि प्रॉमिस केलं कि त्याला मी पुढल्या वर्षी १००% उपस्थितीचं सर्टिफिकेट नक्की मिळवून देणार, प्रयत्न करू आपण दोघे.  असा आमच्यातला संवाद इतक्या वर्षांनी आठवायचं कारण म्हणजे माझ्या एका पेपर ला २००० सायटेशन मिळणे हे फक्त स्वप्नवत होत, आहे आणि राहील माझ्या साठी. किंबहुना आता स्वेच्छा निवृत्तीनंतर तर ते अशक्य आहे, किंवा गरजेचे नाही आहे. पण तेथे नाही तर दुसरीकडे २००० टप्पा माझ्या हातून गाठला गेला हे महत्वाचे.  आणि ह्याचं श्रेय पूर्णपणे ज्याची लेखणी आणि ज्याचे शब्द त्याला सर्वप्रथम जातें, तदनंतर आमच्या ह्यांना ज्यांनी मला खूप मोकळीक दिली काय हवं ते करण्याची, कुठल्याही प्रकारची अडवणूक केली नाहीच कधीच. मी कधीच काहीच खूप सर्वांनी वाचावं ह्या उद्देशाने लिहीत नव्हतेच, कारण लिखाण आत्यंतिक महत्वाचे होते माझ्यासाठी, लाईक्स किंवा फॉरवर्ड नाही. त्यामुळे त्याने सांगितले, माझे हात चालले आणि आज २००० वर पोचले.  वाचकांना धन्यवाद, संगणकाला तर कोटी प्रणाम, त्याची साथ नसती तर कसे सगळे झाले असते हो. आणि सगळ्या विषयांना मनःपूर्वक आभार माझ्या समोर फक्त उभे ठाकले नाहीत तर जो वर मी लिहीत नाही तो वर डोळ्यासमोरून सरले नाहीत. अहाहा च.   

२००० आकडा गाठणे माझ्या साठी चमत्काराशिवाय कमी नाहीच. कारण माझी ख्याती होती, मी खूप बोलणे ऐकून घेतले आहेत माझ्या लिखाणाबद्दल खूप आधी कि हिचं काही खरं नाही, हिला साधं लिहिता येत नाही, काय होणार? ई. आणि ते सगळं ऐकून मी त्यांच्या वर भरोसा ठेवला, माझ्यावर नाही आणि लिहिणं पूर्णपणे सोडलं. पण फेसबुक आलं, ते मला भावलं, माझ्या समोर असं काही उभं रहातं गेलं कि मी लिहिते झाले हळू हळू. आधी काही ओळी, मग पेपर्स कारण  त्याला पर्यायच नव्हता, मग थेसिस, खूप सारे ग्रांट अप्लिकेशन्स, रिपोर्ट्स आणि अनेक पद्धतीचे लेखन होत गेले. एकीकडे तांत्रिक लिखाण तर दुसरीकडे प्रकर्षाने मराठी ब्लॉग सुरवात झाली. एका मुळे दुसऱ्याचा फायदा झाला आणि मज्जा येत गेली, गती आली, सुचतं गेलं, शब्द पेरले गेले आणि त्याची गोष्ट झाली.  कधी कशी केव्हा कोणी केली काहीही ठाऊक नाही. कधीही कशाच्याही मागे लागले नाही कारण तशी सद्बुद्धीच झाली नाही, तेवढा वेळ दिला गेला नाही.  


ह्या मागे "त्याचा" काय उद्देष आणि उदिष्ट आहे हे ठाऊक नाही, जोवर आज्ञा मिळते आहे तो वर लिहीत राहणार. ह्या सगळ्या प्रवासासाठी शतशः धन्यवाद. 


१९९९: भावना


मी ह्या आधी एका ब्लॉग मधे लिहिल्याप्रमाणे ज्या पद्धतीने होणारी नवरी पांढरा गाऊन घालून बोलावलेल्या मंडळींना दाखवते, ते महत्वाचे ठरते. ती जर स्वतःच जर गोंधळलेली असेल तर बघणारे तिला अजून गोंधळून टाकतात. जर ती स्वतः आत्मविश्वासाने बाहेर आली तर तिला तसे उत्तर मिळते बघणाऱ्यांकडून. कदाचित विद्यार्थ्यांना शिकवतांना सुद्धा हे लागू पडते. किंवा रस्त्यावर गाडी चालवतांना देखील. 


आज मला अजून एक असा अनुभव आला कि तेथे सुद्धा हे लागू पडते.  


आताशा फॅकल्टी विद्यार्थ्यांशी सोशल मीडिया द्वारे संवाद साधतात. काही प्रश्न असतील, किंवा शंका ते सोशल मीडिया वर विचारणे सोयीचे समजतात. असो. तर विद्यार्थी जेव्हा उगाच काही विचारत असेल, त्या प्रश्ना मधे दम नसेल किंवा फॅकल्टी उत्तर देते वेळी साशंक असेल किंवा तत्सम, तर ते पोचतं. म्हणजे सोशल मीडिया वर काय काय पोचतं तर तुमचा मेसेज नक्कीच पण त्यासोबत तुमचा कॉन्फिडन्स देखील. काय मनात होतं तुमच्या जेव्हा तुम्ही हे उत्तर लिहिलंत? हे देखील पोचतं. 


त्यामुळे असं म्हणतात ना, कि जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा प्रत्युत्तर देऊ नये, भांडण वाढतात, अगदी तसेच सगळ्या गोष्टी, मग ते भांडण असो, आपला मुद्दा मांडणे असो, एखाद्या प्रश्नाला उत्तर देणे असो हे शांत डोक्याने करा, आनंदाने करा, घाईत नाही, म्हणजे समोरच्याला उत्तरसोबत समाधान देखील प्राप्त होतं, न कळत.  


काय भन्नाट टेकनॉलॉजि आहे ना? छुपी रुस्तम अगदी. अजून काय काय पाठवते आपल्या मेसेज सोबत कोणास ठाऊक? चला तर मग शोधून काढू या. 

१९९८: नावडती


मी एकदा एक गोष्ट ऐकली होती आणि हे देखील समजलं कि ती म्हणे सत्यकथा होती.  ती कथा येथे मी थोडक्यात देते आहे. एक ठिकाण होतं, तेथे एक जंगल होतं. तिथल्या लोकांना ते जंगल नको होते, कारण त्या ऐवजी त्या मोठ्या जागी त्यांना काही तरी दुसरं उभं करायचं होतं. सर्वानुमते मग काही तरी करायचं ठरलं. मी गोष्ट छोटी करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तिथल्या रहिवाश्यांनी जाऊन झाडाखाली उभे राहून त्याला शिव्या द्यायला सुरवात केली. आणि काही दिवसात हळू हळू सगळी झाडे मरून गेली. जागा साफ झाली. सरकारी स्तरावर पण कुठलीही अडचण आली नाही. 


अगदी तसेच कुटुंब प्रमुखाचे पण आहे. तो जर सगळ्या कुटुंबीयांना सातत्याने शिव्या देत असेल, घालून पाडून बोलत असेल, सारख्या चुकाच दाखवत असेल तर त्याचा अर्थ साफ आहे. त्याला ते कोणीच नको आहेत. मग काय हवे आहे? हा अगदी वेगळाच मुद्दा झाला. कदाचित संपूर्ण चैन, मोकळीक आणि बाकी इतर.  त्यामुळे हे असे इशारे आहेत, लक्ष ठेवा नाहीतर सगळं साफ व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःची अशी लेव्हल नसलेल्या माणसाकडून नामुष्की करायची कि नाही हे तुम्ही ठरवा आणि पाऊले उचला आत्ताच. 

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

१९९७: घरचे कपडे


सुती कपडेच जास्त प्रमाणात आधी विकत घेतले जायचे आणि तेव्हा खूप जास्त प्रमाणात फॅशन च्या नावाखाली काही बाही उपलब्ध नव्हतेच. सगळ्याच ऋतूत अत्योत्तम म्हणून देखील सुती कपडे घेण्याकडे ओढ असायची. अजून एक कारण म्हणजे सुती कपडे जसे वापरू तसे लवकर जुने दिसतात पण तितकेच मऊ होतात, त्यांना तुमची, तुम्हाला त्यांची सवय होते आणि मग घरी वापरायला सुद्धा काढतात. 


सुती किंवा सूत मिश्रित ज्याच्यात त्याचे प्रमाणात जास्त आहे असे कपडे रात्री झोपायच्या वेळी घालणे सगळेच पसंद करतात. आता घरचे आणि बाहेरचे वेगळे कपडे आलेत, खूप प्रमाणात, वेगळ्या ढंगात त्यामुळे मज्जा आहे सर्वांची. घराचे कपडे घरातच राहतात. कमी वेळासाठी घातले जातात, धुवून, वाळवून, पुन्हा घातले जातात. बाहेर जातांनाचे अगदीच वेगळे असल्यामुळे मग हे रात्रीचे कपडे घरीच राहतात, बाहेरची हवा, धूळ, प्रदूषण ई. पासून लांब, दूर. बाहेरच्यांची त्यावर नजर पण पडत नाही. त्यामुळे कधीही बघा, घरातल्या कपड्यात परिधान केल्या केल्या कित्ती वेगळे समाधान वाटते, कारण ते पूर्णतः तुमचेच असतात. बाहेर घालून गेले कि तुमच्या शिवाय ते धुळेंचे घर, प्रदूषणाची वस्ती, काही वेगळ्या नजरा, माती आणि इतर अश्या अनेक गोष्टी सामावलेली होऊन जाते. म्हणून ह्या घरच्या सुती कपड्यांचे महत्व अनन्य साधारण असेच आहे. 


आधीच्या काळी बहुतांशी आजी, पणजी, अश्या सगळ्या घरीच असायच्या. त्या फक्त सुती साड्या नेसायच्या. त्यामुळे लहान मुलांना घालायला, अंथरयाला, पांघरायला जुन्या साड्यांचे विविध प्रकार शिवले जायचे. त्यामुळे आज्यांना मस्त वाटायचे आणि नवीन पिढीला आशीर्वाद तर मिळायचाच पण शिवाय मऊपणा, शांतपणा, मस्त, स्वस्थ वाटायचे. लहान कशाला आईच्या साड्यांची गोधडीत जी काही झोप लागते म्हणून सांगू, कशाला सांगतेय मी, सर्वांनीच हा अनुभव / स्वानुभव घेतला असेलच.  


अगदी बोटावर मोजता येतील अशा काहींना मात्र घरातले कपडे घालून भाजी आणायला, किंवा अजून काही छोट्या कामांसाठी जायची सवय आहे. ती मोडा आणि फरक अनुभवा. 


बाहेरचे कपडे बाहेरच्यांच्या गरजे प्रमाणे घातले जातात, म्हणजे तुमच्या व्यवसायाला शोभेल असे, लागतील असे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या छत्रछायेखाली असता तेव्हा तुम्ही फक्त तुम्हीच असता. त्यामुळे थोडेसे ढगळे, सैलसर, मस्त, स्वस्त, हलकेफुलके, उत्साही, ताजेतवाने घाला, मिरवा आणि राहा. 

कळस म्हणजे, वेळ असेल तर, कधी तरी, किंवा वेळ काढून घरचे कपडे स्वतः कामात बदल म्हणून, व्यायाम म्हणून फक्त एक जोडी, जास्त नाही, हाताने धुवून वाळत घाला आणि वाळल्यावर ते परिधान करा. जास्त मज्जा येईल. काय वेगळा स्पर्श असतो, काय ती वेगळी स्वच्छता अनुभवता येते, सगळी अत्याधुनिक मशिन्स झक मारतील तुमच्या हातापुढे. 


१९९६: योग्य वेळ


मी पुण्याला आल्यापासूनच म्हणजे गेले २० एक वर्ष जेष्ठ नागरीक संस्थेंशी संलग्न आहे, बरेचदा जात-येत असते तेथे. पुण्यात फार प्रचलित आहे आणि तिथे अनेक सुविधा दिल्या जातात, समवयस्क लोक राहतात, घर पण वाढत्या व्हायला साजेसं बांधलं असतं आधी पासूनच. तेथे गुंतवणूक करणारे स्वतः करतात, ते त्यांच्या मर्जीने तिथले वास्तव्य स्वीकार करतात उतार वयात. काही जणं काही कारणांमुळे जेष्ठांना तेथे ठेवतात, काही तरुण वयातच पुढची सोय करतात अश्या ठिकाणी घर घेऊन.  अनेक प्रकारची मंडळी तेथे राहतात. काही मालक म्हणून तर इतर भाडे तत्वावर. 


हे सगळं बघून मग दोन प्रश्न मनात येतात, कुठल्या वयात अश्या ठिकाणी गुंतवणूक करावी? फार आधी, मधल्या वयात किंवा म्हातारपणी? आज एका आजोबांची माझी भेट झाली, एका अशाच प्रकल्पाला भेट द्यायला आम्ही गेलो होतो. ते तिथे आले होते स्वतःसाठी घर विकत घ्यायला. ते दिसण्यावरून तरी ७५ चे तरुण वाटत होते. आणि तो प्रकल्प पूर्ण व्हायला जवळपास ३ वर्ष लागणार आहेत. त्यांच्याशी पण बोलून पुन्हा एकदा हा प्रश्न उभा ठाकला कारण तेच म्हणाले कि कोणास ठाऊक मला येथे राहायला मिळेल कि नाही? ३ वर्ष हा मोठा काळ आहे माझ्यासाठी. ई. 


खूप तरुण मंडळी पण आली होती, त्यांचा मानस मला माहित नाही त्या ठिकाणी यायचा. 


हि अशी ठिकाणं बहुतांशी शहराच्या बाहेरचं सुरु होतात. अर्थात पुण्यासारखे शहर लवकर पसरतं आहे, पण सद्यस्थिती बघून निर्णय घेणं अवघड वाटतं कारण खूप मोठी गुंतवणूक आहे. बाहेर, खूप दूर असल्यामुळे सध्या शहराच्या मानाने कमी किंमत दिसते आहे. 


अजून एक त्यातला भाग म्हणजे कुठल्याही वयात नॉर्मल वातावरणात राहणं योग्य, म्हणजे सगळ्या वयाची माणसे हवीत आजूबाजूला. फक्त एकाच वयोगटातील नको. वसतिगृहात राहतांना कसे आपल्याला ठाऊक असते कि येथे फक्त ४ वर्ष काढायचे आहेत त्यामुळे ते ठीक आहे. पण इथे तसे नाही. त्याचा एक चांगला तरणोपाय सापडला आज मला. आज जो प्रकल्प बघायला आम्ही गेलो होतो तेथे सर्वप्रथम नेहेमीसारखी वसाहत आहे, जेथे तरुण, म्हातारे, कुटुंबीय सगळेच राहतात.  दुसऱ्या टोकाला भल्यामोठ्या प्लॉट्स आणि बंगल्यांची स्कीम येते आहे, म्हणजे तेथे पण सगळ्या वयाची माणसे राहणार आणि मधे आहे जेष्ठ नागरीकांसाठीची सोय, १३ मजली ३ इमारती. त्यामुळे खाली उतरले कि मिळवले, सगळेच आवाज येणार, खूप वर्दळ राहणार नेहेमीसारखी, दुकाने असणार आहेत भविष्यात ई. अपेक्षा खूप आहेत, अंतर सोडलं तर बाकी ठीक आहे, बघू काय होतं पुढे. एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झाली आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे असे सगळे प्रश्न उभे ठाकले सर्वांसमोरच. बाप्पा मार्ग काढून देईल नक्की ह्यातून देखील, ह्याची खात्री आहेच. 


योग्य वय काय, जेष्ठ होण्याची वाट बघायची म्हणजे उशीर का तरुण असतांना घेऊन टाकून घाई करायची लवकर केले म्हणून, का सर्वात उत्तम म्हणजे मनाने नेहेमी तरुण राहून एक दिवस हातात घेऊन पुढील वाटचाल करायची, येईल तो दिवस बेस्ट समजायचा.  

१९९५: उपस्थित आणि अनुपस्थित


कोण जास्त महत्वाचे आहे? जे तुमच्या समोर उभे आहेत, बोलतं आहेत का जे ह्या वेळी अनुपस्थित आहेत? कुठल्याही समारंभाला किंवा कार्यक्रमाला, मग तो घरगुती असो नाहीतर सोसायटीतील असो किंवा नातेवाईकांकडचा असो, सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असते. बहुतांशी सगळेच येतात. पण काहींना इच्छा असून देखील येता येत नाही, अनेक कारणे असू शकतात. समजा एका चौकोनी कुटुंबाला आमंत्रण दिले आहे, त्या पैकी फक्त एकाने हजारी लावली आहे, प्रतिनिधी म्हणून, तर असं आढळतं कि जो येतो तो फक्त तेथे त्यावेळी हजर नसलेल्यांबद्दलच चौकशी करतो, का नाही आले? हे अगदी सगळे म्हणजे सगळेच विचारतात आणि काळजी पोटी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी प्रत्येक वेळी. ते मला अगदी पटते, मान्य पण आहे. जो उपस्थित असतो तो सर्वांना सांगतो देखील बाकीच्यां बद्दल पोटतिडकीने. पण जो उपस्थित आहे त्याचं काय? त्याच्या बद्दल आधी विचारायला हवे असे वाटत नाही का? मला तरी वाटतं किंबहुना मी ते इतकी वर्षे पाळले आहे प्रकर्षाने. 


मी कचेरीत असतांना बऱ्याचदा काही मीटिंग बोलवायचे. अर्थात मी मीटिंग बोलावली आहे म्हणजे मी आधी तेथे हजर पाहिजे आणि माझ्या सवयीनुसार सर्वांच्या आधी मी जाऊन सगळी व्यवस्था चोख आहे कि नाही हे बघत असे. माझ्या नंतर येणार पहिला व्यक्ती हमखास हा प्रश्न विचारणारंच, कोणीच नाही आलं अजून? का? अरे पण मी आले आहे ना, त्याचं काय? ते महत्वाचं नाही का? हा नेहेमीचा प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी विचारण्या ऐवजी जर असं म्हटलं तर: अरे वा, चला कोणी येण्या आधी शांतपणे बसू या, दोघी गप्पा मारू या, काय म्हणताय, कश्या आहात, सध्या काय नवीन ताजा? असं मोघम काही. 


हे असं कचेरीत पण होत असे तेव्हा पासून कदाचित मला सवय लागली कि उपस्थित माणूस महत्वाचा. त्याच्याशी पण बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, तिथपासून सुरवात करू या, मग जे नाहीत त्यांच्या बद्दल मोघम विचारपूस, जास्त बरं होईल नाही का? जो उपस्थित आहे त्याने पण काही कामे बाजूला सारली असतील ह्या कार्यक्रमाची वेळ पाळण्याकरता, किंवा आधीच कामे आटोपली असतील, म्हणजे त्याने जमावलंय /योजलंय येथे यायला. ते जास्त महत्वाचं. 


आईला बघितलं कि आधी मुलांबद्दल विचारपूस, मस्त आहे हो, पण तिला पण विचारा, तिच्या साडी बद्दल, दिसण्या संबंधी, किंवा फक्त हवापाणी बास. मज्जा येईल करून तर बघा. 


किंवा "तू आलीस, कित्ती मस्त वाटतंय तुला बघून, एकदम झकास दिसते आहेस. आज ना हा कार्यक्रम असा असा मांडला आहे, नियोजित आहे." असं काहीसं. नवीन आलेल्या दुकानांबद्दल, चित्रपट संबंधी, OTT च्या कार्यक्रमाबद्दल, ई. दोन माणसं समोरासमोर आली कि संभाषण सुरु होणे आवश्यक आहे ज्याने दोघांना आनंद मिळेल. ती भेट लक्षात राहील. दोन व्यक्ती एकमेकांना भेटले म्हणजे ते ओळखतात, बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे त्यांना ठाऊक आहे स्वभाव, आवडी निवडी, ठिकाणं, विषय, मग तेच छेडा, इतर नको, किंवा सरते शेवटी, जास्त भर नकोच त्यावर. तुमचं मत काय आहे? जे डोळ्याला दिसतंय ते, स्पर्श करता येतंय ते, जाणवतंय ते, स्पंदन ऐकू येतात ते मोलाचे. इतर पण आहेत पण त्या वेळा करता फक्त दुय्यम स्थानावर. 


दुसरे जेव्हा तुमच्याशी अनुपस्थितांबद्दलच बोलतात तेव्हा त्यांना ते जाणवत नाही, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या संबंधी न बोलता जे आले नाहीत त्यांच्या संदर्भात गोष्टी छेडल्या तर त्याचे हावभाव बघा, तुम्हाला लगेच जाणवेल फरक, प्रकर्षाने. 


चला तर मग, जे हाजीर तो वजीर, हे आत्मसात करू या.  

१९९४: व्यावसायिक नाम


गेल्या १५-२० वर्षाच्या कालावधीत मला एक आढळलेली एक गोष्ट मी येथे नमूद करते आहे. भारतात जर आपण एखाद्या सरकारी कचेरीत गेलो किंवा कचेरीतच कशाला जायला हवे, रस्त्यावर सुद्धा नजरेस पडते कि त्यांच्या अनेक चारचाकी गाड्या ह्या भारतीय ब्रँड च्या नसतातच. त्या बहुतांशी बाहेर देशात तय्यार झालेल्या असतात. सरकारी मोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारीच जर स्वदेशी वापरात नसतील तर कसे होणार? आणि त्यांना अश्या विदेशी महागड्या गाड्या घेण्यासाठी परवानगी कशी मिळते? का असं काहीही नसतं? मला सरकारी कामकाजाचं काहीही माहिती नाही, पण वाटलं, निदर्शनांस आलं म्हणून येथे मांडलं एवढंच. 


आणि गेल्या काही वर्षात तर स्वदेशी कंपन्यांच्या गाड्या इतक्या अप्रतिम आहेत, सर्व सुविधांनी युक्त अश्या कि ज्याचं नाव ते. मग इतकी प्रगती केलेली असतांना त्यांना प्रोत्साहन देण्याशिवाय सर्रास बाहेरच्या मेक ची गाडी विकत घेतली जाते हे काही समजलं नाही मला. शिवाय आपण "मेक इन इंडिया" असा प्रचार प्रसार करतो आहोत, अनेक नव तरुण ह्यात हिरीरीने सहभागी होत आहेत. कित्तीतरी मोठाले व्यावसायिक त्यांना मदतीचा हात हेत आहेत. मग हे असं असतांना देशात तय्यार झालेल्या वस्तूंना जास्त पुढे न्यायाचे का बाहेरच्या? आणि ते देखील सरकारी कचेऱ्यांनी? 


एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या चार डोळ्यांना आढळलेलं, दिसलेलं, जाणवलेलं असं मांडते आहे, एवढंच. तफावत आहे ना, बोलण्यात आणि वागण्यात एक वाक्यात हवी. आणि बरं एखादी चुकून माकून गाडी नजरेस पडली असती तर वेगळी गोष्ट होती, पण खूप प्रमाणात दिसल्या तेव्हा विचारात पडले कारण नसतांना. असो. 

१९९३: सोशल मीडियाचा उगम

 २५-३०-४० वर्षांपूर्वी सोशल मीडिया नावाचा प्राणी का नव्हता? का उदयाला आला नव्हता? ह्याचं खरं कारण मला आज समजलं. त्या वेळी सीमारेषा स्पष्ट पणे आखल्या होत्या. घर आईची जबाबदारी, वडिल सगळं बाहेरच बघणार. तेव्हा स्वतःचा बँड वाजवायची, मी कित्ती आणि काय काय करते हे सांगत फिरण्याची गरज नव्हती मुलीला, तिचं महत्व तिला ठाऊक होतं आणि घरच्या दारच्यांना सुद्धा. इथवर सगळं ठीक होतं. 


मागील एका लेखात मी "धन-अन्न-मन-तन" ह्या मॅपिंग बद्दल लिहिले होते. त्या प्रमाणे मग मुली शिकायला लागल्या, नोकरी करू लागल्या, आर्थिक स्वतंत्र मिळवले, उच्च शिक्षित झाल्या, उच्च पदांवर कामं करू लागल्या आणि आपला ठसा उमटवू लागल्या. हे सगळं त्या पादाक्रांत करत होत्याच, उंच शिखरे गाठत होत्या आणि आहेत, पण हे सगळं घराबाहेर. घरी आलं कि घरची जबाबदारी आहेच. ती देखील त्या उत्तम पद्धतीने, जसे जमेल तसे करत राहिल्या पण घरच्या मंडळींना, जेष्ठांना, श्रेष्ठांना कधीच त्याचे अप्रूप वाटले नाही, कौतुक वाटले नाही, किंवा तोंडावर कौतुक केले नाही, कृतीत दिसले नाही. मी सर्वसाधारण लोकांबद्दल बोलते आहे,  काही अंशी सगळ्याच स्तरावर वेगळे लोक असतातच, जे सर्वांपेक्षा खूप छान वागतातच. असो. 


तर जेव्हा "त्याला" हे जाणवलं कि मी आधी त्या मुलींना घर सांभाळण्याची सद्बुद्धी दिली होती, मग ती बदलून अभ्यासावर जुंपले, आणि नोकरीसाठी प्रोत्साहित केले, तेथे त्यांचा चांगलाच जम बसला अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, त्यांनी माझी मान खाली जाऊ दिली नाहीच. पण तरी जर त्यांना खूप ऐकून घ्यावं लागत असेल किंवा त्यांना सतत घालून पडून बोलले जात असेल तर मग अजून वेगळा बदल अत्यावश्यक होता, हे जेव्हा जाणवले तेव्हा मग मी वैविध्य सोशल मीडिया नावाच्या टीम ला आमंत्रित केले, त्यांना सशक्त केले म्हणजे मग माझ्या सर्व मुलींना त्यांनी कमावलेल्या नावाबद्दल, कार्याबद्दल आणि इतर कामांबद्दल मस्त सगळं मांडता येईल आणि तिला खूप शाबासक्या मिळतील. हे खरं कारण आहे सोशल मीडिया सुरु करण्यामागचं. स्वतःचा बँड वाजवायचा असतो हे तो वर माहित नव्हतं किंवा त्याची निकड भासली नव्हती. पण आता अत्यावश्यक आहे असं "त्याला" वाटलं. आणि "त्याला" असं देखील वाटलं कि हे केल्यामुळे मुलींबद्दलचा सन्मान वाढेल. अर्थात ह्या सर्वांमुळे पुढील पिढी मस्त तय्यार झाली, त्यांनी आईची धावपळ बघितली, त्यामुळे त्यांच्या समोर आई बद्दलचा आदर खूप प्रमाणात वाढला, आणि सर्वांनी ठरवलं कि असं आपण होऊ द्यायचे नाही. हे खूप मोठं अचिव्हमेंट होतं खरं. ज्यांनी बदलावं म्हणून हा सर्व सोशल मीडिया नावाचा सोहोळा  आयोजित केला होता मूलतः त्यांच्यात मात्र तसूभरही फरक पडला नाही, पडणार नाही, त्यांना समजतंय सगळं पण दंभ आडवा येतोय. अहंकार, कुठला आणि का? हे मात्र ठाऊक नाही. 


तर मुलींनो, तुम्ही खूप मस्त सगळं काम करत आहात. काही वर्षांनी वळून बघितलं तर सगळं आठवायला पाहिजे, एक यादी तय्यार व्हावी म्हणून नमूद करून ठेवा, इथे तिथे सर्वत्र पोस्ट कराच. आणि संतो राखा हे सांगण्याची गरज पडत नाहीच बहुतांशी. त्यामुळे चला तर मग "झेंडा उंचा रहे हमारा" असं म्हणत, स्वःताची पाठ थोपटत पुढील मार्गक्रमण करू या. उगाच कशाला हवी आहे कोणाकडून शाबासकी? अजिबात नकोच. वाईट बोलून, शिव्या देऊन, घालून पाडून बोलून आज पर्यंत एक काही तरी करून दाखवायची ऊर्जा मिळाली, पण आता काहीही नको, ऊर्जा नको, शाबासकी तर अजिबात नको आणि गोड चांगले शब्द तर नकोतच, ठेवा तुमच्याकडे. 


बघा म्हणजे सोशल मीडिया येण्याकरता "त्याला" पण काय काय करावं लागलं आपल्या मुलींसाठी. धन्य आहे "तो" नक्कीच.  

१९९२: प्रश्न


माझ्या पिढीपासून सगळ्याच मुली नोकरी साठी बाहेर पडल्या, माहेरी असतांनाच आणि सासरी गेल्यावर सुद्धा अर्थार्जन सुरु राहिलंच. त्यामुळे मी जसे अनेक वेळा मुलाखती दिल्या तश्या माझ्या बरोबरीच्या सर्वांनाच मुलाखती द्याव्या लागल्या. त्या शिवाय काही नोकरी मिळणे नाही. सहज ह्या बाबतीत एवढ्यात आमची चर्चा झाली, अनेक वेळा वाचले होते लेख ह्या वर पण तेव्हा त्या कडे इतके लक्ष गेले नाही किंवा त्या वेळी ते इतके महत्वाचे वाटले नाही. आता मात्र जरा वेगळेपण जाणवायला लागलंय. 


थोडीशी तफावत जाणवली मुलाखत घेतांना विचारलेल्या प्रश्नांची. मुली गेल्या कि आधी नवरा काय करतो? मुलं किती हे का जास्त महत्वाचे प्रश्न आहेत कोणास ठाऊक? पण आधी तेच विचारले जाते. पण हे मुलांच्या बाबतीत एक तर होत नाही किंवा मग सरते शेवटी सूतवाच्य करायचे म्हणून सहज कुटुंब कुठे आहे, कोण कोण आहे असा प्रश्न फक्त समोर टाकला जातो, विचारला जातो.  आणि त्याचे उत्तर पण माझ्या मते मोघमचं दिले जाते. "शितावरून भाताची परीक्षा" होते कि काय हे कळत नाही. आणि तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा पण हा प्रश्न काही सुटत नाही. 


फारच वेगळे वाटते हे सगळं ऐकलं आणि पाहिलं कि? आता तरी जेव्हा २०२४ संपत आलं आहे, आणि तरी देखील? कमाल वाटली, म्हणून माझे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला. 

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1991: Love, affection, utmost care

I feel privileged today as I was a part of uniquely different vibrations getting spread by Dr. Gokhale in NIRPO's founder's day event. He, along with his wife, son, and daughter-in-law started the Mayacare Services, which is now a foundation. They provide free services to senior citizens in various forms. Many volunteers work for this foundation as external and internal members. Most of their tranied people who are now placed with their foundation are specially abled, but still they run the show with great motivation, consistency, and utmost energy levels. I think he narrated that around 20 special youngsters are working as external members and 40+ as internal members. In addition to that, there are many senior citizens who work for this foundation. Dr. Gokhale is primarily a sports enthusiast (a cricket expert who still plays tennis every day and one more sport), child specialist, linguist, writer, and he wears many more hats. At 86, he still works more than full time for his foundation, which is running 74 different centres all over India, one outside India, which was recently started, and many services are provided at the comfort of a senior citizen’s home itself.

 

In his autobiography he said “वेद नाही वाचला तरी चालेल पण वेदना निश्चित वाचा”.

 

It's impossible for me to jot down one blog on Dr. Gokhale, his dedicated work, his hobbies, his expertise in mental health work, etc. I am truly running out of apt words. Hence, we are kindly requesting you to visit this foundation’s very informative website and see if you can be a part of it by volunteering your valuable time, energy, skills, or in any other form. During his speech today, he said if you have a leakage problem in, say, a bathroom, you immediately call a plumber. For any other household repairs too, there are plenty of on-call services available, but if you are in need of love, affectionate care, passionate affection, call mayacare foundation at www.mayacare.org

१९९०: हेल्मेट


आज आठवड्याच्या सुट्टीचा दिवस, बहुतांशी सर्वांनाच सुट्टी, अर्थात व्हाईट कॉलर जॉब वाल्यांना तर निश्चित. आज मी देखील थोडीशी सकाळी लवकर बाहेर पडले कारण मला एका कार्यक्रमाचे निमंत्रण होते. सकाळी बाहेर पडल्यामुळे खूप सुंदर नजारे बघायला मिळाले कारण आज वरू देवतेने पण साथ दिली, सूर्य बाप्पाचे दर्शन घडले, त्यामुळे माझ्याचसारखे अनेक जण बाहेर पडले होते. त्यात होते एक कुटुंब. रस्ता छोटा होता, रस्त्यावर पाणी साठले होते, खड्डे होते, त्यामुळे मला त्या कुटुंबीयांना व्यवस्थित बघता आले. आई-बाबा आणि एक सहा एक वर्षांचे पिल्लू होते बरोबर. तिघेही मस्त मौला हिंडायला निघाले होते आपापल्या दुचाकीवर, सायकल वर. आई लिडर होती, पुढे होती, कारण रस्ता लहान होता, एकामागे एक असेच जावे लागत होते. आईच्या मागे पिल्लू, आणि तदनंतर बाबा. आई आणि बाबा दोघेही आळीपाळीने, कधी एकत्र, पिल्लूला सूचना देत होते. मस्त वाटले ते बघून कि इतक्या लहानपणापासून व्यायामाची सवय लावत आहे त्याला.  पण महद आश्चर्य देखील वाटले कि तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातली नव्हती. कुठलीही दुचाकी असो डोक्याचे संरक्षण फारच गरजेचे आहे. इतर देशात तर किंवा इथे पण काही जणं गुढघ्याभोवती देखील काही तरी लावतात. असो. इतका छोटासा रस्ता, गर्दी, सर्वांनाच घाई, पाऊस पाणी आणि त्यात हेल्मेट न घालता चालवणे मला काही योग्य वाटले नाहीच, काहीही म्हणा. मग हिच सवय मोटर सायकल चालवतांना देखील वापरली जाते. 


हे दृश्य बघून मला एक वेगळे स्पेलिंग सुचले किंवा शब्द फोड उमगली, ती अशी. Helmet हा मूळ इंग्लिश शब्द आहे, स्पेलिंग आहे. पण माझ्या मते जर लोकांना अजून प्रकर्षाने डोक्याच्या टोपीचे महत्व पटवून सांगायचे असेल तर Hell - mate असे करावे. का ते सांगते? तुमच्या चुकीमुळे, आळशीपणामुळे तुम्ही हेल्मेट परिधान करत नाही, चांगल्या सवयी अंगीकारत नाही आणि त्यामुळे पुढील पिढी पण तेच गृहीत धरते, चलता है अटीट्युड. त्यांना सांगा हेल मधे इतक्या लवकर जायचे नसेल तर हा मेट / सखा / मित्र अंगिकारा ताबडतोब. घराबाहेर, दाराबाहेर पडायचंच नाही जोवर डोक्यावर टोपी नाही तोवर, ती देखील चांगल्या कंपनीची, मजबूत, टिकावू अशी.  आत्ता समजलं मला कि ह्या शब्दाचं मूळ काय आहे ते किंवा काय असायला हवं ते. 


तुम्ही एकवेळ दुचाकी चालवाल हो व्यवस्थित,पण बाकीच्यांचं काय जे वेडे वाकडे किंवा काही अंदाधूंद चालवतात रस्त्यावर. त्यामुळे स्वतःची सुरक्षा स्वतःच करायची हे काय शिक्षित लोकांना सांगावं लागतं? 


असो, त्यांच्या ह्या कृतीमुळे मला हा एक ब्लॉग लिहिता आला. हा जास्तीत जास्त लोकांनी वाचावा हि मनापासून इच्छा म्हणजे सर्वांना नवीन शब्दफोड, किंवा स्पेलिंग समजेल आणि ते काळजी घेतील. 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

१९८९: SIP अक्का सिप


घोट घोट, थोडे थोडे म्हणजे एका अर्थी सिप. आणि गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला थोडीशी पिटुकली रक्कम गुंतवायची, सातत्य टिकवून ठेवायचं, शांततेने त्या कडे बघायचं आणि काही वर्षात मस्त मोठी रक्कम नक्की जमा होते. माझा एक शाळेचा मित्र आहे आणि त्याच्या कडे धनाढ्य संपदा आहे गुंतवणुकीच्या ज्ञानाची, विविध प्रकारांची, देश आणि विदेशी स्तरावर उत्कृष्ट गुंतवणूक करण्याची, खुप सुंदर सतत माहिती देत असतो तो आणि परवाच त्याने सांगितले ह्या SIP चे महत्व अजून एकदा, अगदी शास्त्रोक्त. 


माझ्या मते हि SIP म्हणजे भिशी, महिन्याला जमवणे काय तर ठरलेली रक्कम. अर्थात भिशी त्या रकमेवर इंटरेस्ट देत नाही. पण वेगळी गम्मत आणते, सगळे जमतात, एक थिम ठरवतात, मस्त झक्कास डिश करतात, गप्पा मारतात, आताशा अनेक फोटो काढतात आणि पांगतात पुढील महिन्यात कोणाकडे जमायचे हे ठरवून.  भिशी अनेक प्रकारची असते, फक्त पैशांची नाही. झाडं लावण्याची, पत्ते खेळण्याची, घरचा बगीचा सजवायची ई. असे ऐकले आहे.  


भिशीचा ढोबळ मानाने अर्थ हा कि सुसंगत, एक सारखे विचार करणारे एकत्र येणार प्रत्येक महिन्यात ठरलेल्या दिवशी आणि आवडती गोष्ट करणार ज्यामुळे त्याचा फायदा होणार, अनेक पद्धतीने. 


आमची पण एक भिशी आहे. दर महिन्याला जमतो एकत्र. माझ्या मते २०१९ च्या दरम्यान ती सुरु झाली आहे. न्यू नॉर्मल डेज होते तेव्हा देखील सुरु राहिली हे भिशी अगदी हिरीरीने ऑनलाईन पद्धतीने. आणि खूप मस्त प्रतिसाद आहे ह्या उपक्रमाला. आधी सुरवातीला अनेक जण आले, काही मधे आले-गेले आणि आता एक शिस्तबद्ध पद्धतीने सोशल मीडियाचा वापर होतो, एक संघ तय्यार झाला आहे आणि सर्वांना त्यावर माहिती पोचवली जाते प्रत्येक कार्यक्रमाची.   आमच्या ह्या उपक्रमाचा लाभ म्हणणाऱ्यांना, यजमानांना आणि इतर आजूबाजूच्या खूप जणांना होतो, तो जाणवतो आणि कासवाच्या गतीने का होईना फरक जाणवू लागतोच, माना अथवा न माना. ह्या उपक्रमाला भिशी असे नाव देणे खरं तर योग्य नाही, कारण हि फक्त भिशी नाहीच. हा एक धार्मिक उपक्रम आहे जो प्रत्येक महिन्याला होतोच होतो, "तो" घडवून आणतोच. आमच्या ह्या उपक्रमाचे अगदी SIP अक्का सिप सारखे आहे, हळूहळू सुरवात होते, दर महिन्याला कंपाऊंडिंग होते, चक्रवाढ व्याजाप्रमाणे आणि ती गुंतवणूक वाढतच जाते एक्सपोनेन्शिअल (exponential) पद्धतीने, कोणीही त्याला अडवूच शकत नाही. ह्या वाढीत आहे सुधारलेले उच्चार, पाठ झालेल्या ओव्या / काही स्तोत्र किंवा संपूर्ण स्तोत्र, मंत्रउच्चाराची गोडी / आवड,  नकळत मिळणारी आणि टिकणारी ऊर्जा, मानसिक स्वास्थ्य आणि स्थैर्य, बदलेला चांगला दृष्टिकोन, वृद्धिंगत झालेली एकाग्रता, समाधान आणि सत्संग. हि यादी खरं खूप मोठी आहे आणि वाढतच राहणार आहे. 


आमच्या ह्या उपक्रमाचा दिवस देखील "त्यानेच" सुचविलेला आहे, जो कि महिन्यातली शुद्ध एकादशी. ह्या उपक्रमात सर्वप्रथम प्रत्येक महिनातल्या 

एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे, कथा आहे आणि त्याचे कथन केले जाते, समजावून सांगितले जाते, त्यानंतर रामनामाचा एक माळ जप, श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, श्री. गीतेचा बारावा अध्याय पठण आणि मग त्याचे गीताई मार्फत केलेले निरूपण, काही उत्कृष्ट गायकांची भजने, प्रसाद, गप्पा आणि पुढील महिन्यातील पठाणाची रूपरेषा ई. तर असा हा आमचा श्री. विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा उपक्रम. 


काही संशोधकांनी नमूद करून ठेवलंय कि एक व्यक्ती जर ठराविक दिवस नामस्मरण करेल, पठण करेल, ध्यान करेल तर त्याचा लाभ कमीत कमी बत्तीसहजार लोकांना होतो. डायरेक्टली किंवा अवचित, पण होतोच, ती कंपने (vibrations) पोचतातच निश्चितपणे सर्वांपर्यंत, सर्व सजीव आणि निर्जीवांपर्यंत. काय ताकद आहे बघा पठणात? नामात? त्यामुळे ह्या पुढे एक शिस्तबद्ध पद्धतीने, किंवा जसे जमेल तसे, जमेल तेवढे नामस्मरण कराच. ।। जय श्रीराम ।।  


१९८८: अल्ट मेट्रिक्स


माझ्या संशोधनाबद्दल लिहिण्याच्या कार्यशाळेमधे मी सायटेशन्स बद्दल सांगतेच कारण ते खूप महत्वाची उपलब्धी आहे संशोधका करता. सायटेशन्स म्हणजे अजून किती जगातील लोकांनी तुमचे कार्य वाचले आणि त्यावर काम केले, त्याबद्दल त्यांच्या शोधनिबंधात लिहिले, नमूद केले ई. सायटेशन्स हा फक्त एक आकडा नाही तर खूप काही सांगून जातो त्या व्यक्ती बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल. 


आधी संशोधन करून पेपर्स च्या स्वरूपात सगळी निदर्शने मांडली जायची. आणि फक्त पुढे येऊ घातलेले, त्या विषयात आवड असलेले विद्यार्थीच ते वाचतं असतं, बाकी कोणी नाही. पण आताशा तसे नाही. एकदा का पेपर लिहिला आणि तो प्रसिद्ध झाला कि सगळ्या स्तरावरचे लोक तो पेपर वाचतात आणि त्या बद्दल सोशल मीडिया वर चर्चा देखील करतात. मग असे किती जण त्या पेपर बद्दल बोलत आहेत ह्याला म्हणतात अल्ट मेट्रिक्स स्कोर. म्हणजे आता सायटेशन्स बरोबरीने हा स्कोर पण गृहीत धरला जातो, बघितला जातो. 


तसेच काही आज माझ्या डोक्यात आले, कुठनं माहित नाही अजिबात, आणि मी देखील जास्त विचार करत बसले नाही थेट लिहायलाच घेतलं. तर एखादा व्यक्ती जर संशोधक आहे, पेपर्स लिहितो आहे, ग्रँट्स मिळवत आहे, शिक्षक पण आहे, त्याच्या सोबत अनेक अजून स्कॉलर्स काम करत आहेत ई. मग तो व्यक्ती फक्तच टेक्निकल लिहितो का अजून काही विविध प्रकार हे पण बघायला काय हरकत आहे? एक वेगळी अल्ट मेट्रिक्स मिळेल त्यामुळे. म्हणजे ज्यांना सायंटॉमेट्रिक प्रकारचे पेपर लिहायचे आहेत ते त्या संशोधकाचा पूर्ण प्रवास वर्णन करतात, सुरवात कुठून झाली, कोणत्या विविध लोकांसोबत, डेटा बरोबर कामे केली, कुठल्या लोकांनी फंडस् दिले त्याच्या कार्यकरता ई. आणि बरेच असे. मग तो एक इतका उत्कृष्ट पेपर्स लिहिणारा आहे कारण तो गोष्ट सांगतो खूप ठिकाणी जाऊन, लहानग्या मुलांसोबत रमतो, आजी आजोबांना खेळतं, बोलतं करतो ई. किंवा अजून काही पद्धतीचे लिखाण करतो, कविता, गोष्टी, गाणी, कहाणी, वर्तमानपत्राचे लिखाण, भाषांतर, संक्षिप्त लेखन आणि इतर ई. बाबी नमूद करू शकतो. कारण माझ्या मते हे सगळं करतो म्हणून पेपर्स उत्तम उतरवतो. मग काय हरकत आहे असं पण बघण्याची त्या अल्ट मेट्रिक स्कोर कडे? चला तर मग उचला पेन आणि लिहा बरं, पाठवा जर्नल ना, बघू ते काय म्हणताहेत ते? माझ्या मते अशी मॅपिंग आवडेल त्यांना, भावेल देखील आणि कदाचित तुम्ही पहिलेच असाल असं काही लिहिणारे.  

१९८७: कुकरची आवड


आधी आम्ही ब्राह्मणी स्वयंपाक करत होतो घरी, पूर्ण थाळी, डावी उजवी बाजू, मधली जागा आणि सगळेच साग्रसंगीत. त्या नंतर चौघांच्या आवडी निवडी वेगळ्या, बदलल्या, डाएट डोकवायला लागलं मधेच, काहीच कारण नसतांना. गूगल बाबानी डोकं काढलं, लेख लिहिले गेले, व्हिडिओ तय्यार झाले, ज्यांना जे अनुभव आले ते त्यांनी सांगितलं. पण तो जगाचा शेवट नाही ना, फक्त सुरवात आहे किंवा एक भाग आहे किंवा फक्त एक छोटासा अनुभव आहे. तो व्यक्ती जो हे लिहितो आहे किंवा रेकॉर्ड करतो आहे त्याची पार्श्वभूमी पण ठाऊक नाही तरी आपण सगळं म्हणजे अगदीच सगळं नाही पण कधी हे तर कधी ते करण्याचा प्रयन्त करतो, अथक असा. आता ह्या बदलांमधे आधी भात पानातून नाहीसा होतो, मग तेलाची बारी येते, कोशिंबिरींच्या ऐवजी साधी काकडी पानात लवंडते, दाट लस्सीची जागा पातळ ताक घेते, फोडण्या, शेंगदाणे, गोड, पोळी ह्यावर गदा येते. आमटी आवडली तर अर्ध्या - एक वाटीवर पिण्यास बंधने घातली जातात आणि असे इतर अनेक. अर्थात पोळीच्या ऐवजी भाकरी, जी कि फारच पौष्टिक आहे, शारीरिक स्वास्थ्याला उपयोगी आहे, पण तरी देखील होत आहेत हे बदल.  


तर आताशा माझ्या घरच्या कुकरमधे फक्त डाळ शिजवली जाते. आलू पराठा पण बॅक सीट वर गेला ना, त्यामुळे वरण एके वरण, बदल म्हणजे ह्या च्या ऐवजी ती डाळ, इतकाच. आणि हो भातच नाही त्यामुळे खिचडी पण नाहीच कि. पण आज आम्ही ठरवलंच आणि बेत किंचित बदलला. आज खिचडी रस्सम असे करायचे ठरवले. दोघींना कामं होतं त्यामुळे खिचडी डायरेक्ट शिजवत बसणं शक्य नव्हतं. म्हणून मग कुकर जिंदाबाद. त्याला काय आनंद झाला म्हणून सांगते, अत्यानंदाने अगदी पटापटा शिट्ट्या मारल्या अगदी वेगळ्या ढंगातल्या होत्या त्या. आणि खरंच आज जरा शॉर्टकटच मारला होता मी. नाहीतर साग्रसंगीत खिचडी करते ना, वेळ असला कि तेव्हा मस्त पैकी डाळ तांदूळ धुवून तुपावर भाजून घेते. पण आज म्हटलं छे. झट कि पट वाली खिचडी करूया.  आणि केवळ कुकर साहेब सामग्री बदलल्यामुळे खुश होते त्यामुळे त्या खिचडीची रंगत फारच वाढली कि. तो पण बिचारा कंटाळा फक्त दाली शिजवून हो इतके दिवस. पण काय बोलणार ना? त्यामुळे गप्प गुमान कधी व्यवस्थित शिजव तर कधी अर्धवट असं काहीस चालू होते त्याचे चाळे. डाळ आणि खिचडी दोघी स्त्रीलिंगी, खिचडीत पण डाळच पण दोघींमधला फरक जाणवला पठ्याला, हुशार आहे. दिसत नाही अजिबात पण छुपा रुस्तम निघाला. 


त्यामुळे आज मला समजलं आहे कि आपल्या पोटाला, प्रकृतीला आणि कुकरला खुश ठेवणे अत्यंत महत्वाचे आणि त्या करता अधेमधे विविध जिन्नस ठेवायचे कुकरमधे, म्हणजे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.  

1986: The voice


I am narrating a lot about a show on TLC named “Say yes to the dress" these days, in many of my blogs. Today, while enjoying the yet another versions of this show, I suddenly felt the difference. I mean, I was aware of it, i knew it, but today I realised it truly. This show is alive in many countries where brides wear the white dress for the wedding and we watch almost all the versions just for fun. Of course the team is different in every country's show which includes: the owners of the shops, designers, consultants, and many others, including the alteration department and admin staff too. The designs are also truly different definitely per country. The dialect is different too. The only thing that is common is consultants ask first the bride what she is looking for, in which kind of dress, which type of material, and based on their chosen destination, how the dress should be. Of course, entourage plays an important role too, but the importance is definitely given to bride; it's her voice. When the manager observes that she needs help while selecting the dress, they pitch-in perfectly, awesomely, to come to a beautiful conclusion. That’s the way.

 

Absolutely no comparison, and also now the things are changing for the better in our country too. But for many generations together, I guess the bride here in India was asked about her choice while the entire family, extended family members, are on a shopping spree for her wedding, but with very little freedom. There are outliers, but very few.


The one who is paying for the dress or outfit should be given the required importance. But at the same time, all should remember that it's her day, the bride's day for sure; her choices matter; she needs to carry that outfit on that day with confidence.

१९८५: नाराजी


माझी राणी, माझी प्रिय गाडी इतकी म्हणजे इतकी नाराज होती माझ्या वर कि ज्याचं नाव ते.  आज मी तिला जवळपास १० एक दिवसांनी बाहेर काढली चक्कर मारायला. चूक माझीच आहे कारण मीच तिला मधल्या काळात दररोज माझ्या सोबत कचेरीत जाण्याची-येण्याची, वेळेची, चकाचक राहण्याची, माझी वाट बघण्याची, रविवारच्या सुट्टीची, भुट्ट्याच्या गाडी जवळ थांबून थोडासा शेक आणि भन्नाट सुगंध अनुभवण्याची सवय लावली होती. ती अचानक मागल्या वर्षी बंद झाली कारण मी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे. आताशा मी अगदीच गरज असेल तर बाहेर पडते कारण अनेक वर्ष मी सातत्याने बाहेरच राहिली आहे. आणि अर्थात तंत्रज्ञानाने बहाल केलेले ऑनलाईन चे ऑप्शन इतके म्हणजे इतके माझ्या उपयोगी पडते कि मी माझ्या घरी सुखाने बसून मग कामे करते. 


शिवाय सध्या पाऊस फार आहे. खड्डे, खाचखळगे, पाणी साठलेले रस्ते, गर्दी, घाई, ह्या सगळ्यात माझ्या सारखीने का बाहेर पडायचे? अजिबात गरज नाही. त्यामुळे मग माझी राणी बिच्चारी एकटी रुसून फुगून बसली होती. तिला आता मानवायलाच पाहिजे. दररोज नाही तरी एक दिवसाआड चक्कर मारून, छोटीशी का होईना. तिच्याशी गप्पा मारून, तिला माझ्याच सारखी सवय आहे, विविध रस्त्यांवरून जायची. आता अगदी नक्की प्रॉमिस मी तिला नेत जाईन सारखं सारखं. चुकलंच माझं. मला खरंच लक्षातच नाही आलं हिच्या बद्दल. काय हे? सगळीकडे सरदलेले वातावरण, काचा बंद, वरून पाऊस सतत मग त्याचा परिणाम होणारच ना? प्रत्येकावर होतोय, तसाच तिच्या वर पण झाला. माझी सक्खी राणी असल्यामुळे मला खरंच वाईट वाटलं. ह्या नंतर असे होणे नाही. 


तिला माझ्याच सारखे मोठ्याने गाणे ऐकणे आवडते, पण आज काही केल्या आवाज मोठा करतच नव्हती. काचा खाली कर गं? असं म्हटलं तर सुरवातीला ऐकलंच नाही पठ्ठीने, सलग कित्ती तरी दिवस सूर्य बाप्पाचे दर्शन नसल्यामुळे मलूल झाली होती. अशी इतकी थंडगार, निरुत्साही मी तिला कधीच बघितले नाही. उलट तय्यारच असायची सतत कुठेही, कधीही जायला. १५ वर्षांचा आमचा सहवास आहे हो, एक नाही दोन नाही. त्यामुळे आम्ही ओळखतो ना एकमेकिंना. आणि ती माझ्याच सोबत जास्त राहिली आहे ना, त्यामुळे अधिक हक्काने नाराजी व्यक्त होत होती तिची. असे ह्या नंतर होऊ नये ह्या साठी आता मला सतर्क राहावे लागणार. अनपेक्षित घडले त्यामुळे जास्तच मनाला लागले आहे माझ्या आज.    

१९८४: बघण्याचा दृष्टिकोन


काल अचानक एक चित्रपट माझ्या समोर उभा ठाकला. तो अक्षरशः मला बघ असा काहीसा म्हणाला. मी पण मग तय्यार झाले कारण त्या चित्रपटाबद्दल फक्त तीन ओळी लिहिल्या होत्या. आणि त्या वाचून इतकंच समजलं कि हा चित्रपट गोष्टींबद्दल आहे. त्यातले कलाकार मंडळी खूप म्हणजे खूप मोठी आणि नावाजलेली नावं होती, त्या मुळे पण मग तो बघावासा वाटला आणि अर्थातच तो नवीन चित्रपट होता. मला का कुणास ठाऊक पण शहरातले, नावीन्यपण दाखवणारे किंवा आंतरराष्ट्रीय धर्तीवर आधारलेले असे काहीसे चित्रपट बघायला आवडतात. उगाचच गरीबी, दारिद्र्य, गल्ल्या, बोळ, आणि इतर गोष्टी ज्या आपण नेहेमीच ऐकतो, बघतो किंवा आपल्याला त्या बद्दल नक्कीच करुणा येते, हात जोडले जातात, प्रार्थना केली जाते तेच पुन्हा करमणूक म्हणून किंवा ज्ञानात भर अश्या आशयाने बघायचे नसते. मी आहे अशी आहे. तर तो कालच चित्रपट बघून झाला आणि वाटलं कि हा असा देखील तय्यार करता येऊ शकला असता. त्या चित्रपटाचा शेवट गोड दाखवू शकले असते, अजून काही वेगळ्या पद्धतीने देखील संपूर्ण कथानक मांडता आले असते ई. 


मग मलाच पुन्हा लक्षात आले कि त्या वेळी जेव्हा चित्रपटाची कथा त्या चमू समोर आली, किंवा दिग्दर्शकाने रूपरेषा ठरवली, त्याला अनेकांनी आर्थिक पाठिंबा देऊ केला, सगळे लागलेले नियम मान्य झाले आणि शूटिंग देखील झालं, तेव्हा त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी दाखवलं. कदाचित हा चित्रपट सत्यकथेवर पण आधारित असेल. मग त्यामधे जास्त बदल करण्याची मुभा नसेल. किंवा ३ वर्षाआधी काढलेला हा चित्रपट त्या परिस्थिती चपलाख बसला असेल. आणि असे जर प्रत्येकाचे मत लक्षात घेत गेले तर कधीच कुठलेच कार्य साध्य होणार नाहीच. कुठेतरी थांबणे आलेच, स्वीकारणे आलेच. नाही का? आणि चित्रपटच कशाला प्रत्येक क्षेत्रात हे असेच आहे.  


"से येस टू द ड्रेस" ह्या कार्यक्रमात एक होणारी नवरी आली, खूप म्हणजे खूप वैविध्य ड्रेस परिधान केले तिच्या आवाक्यातले, पण कुठलाही आवडला नाही, विकत घेतला नाही. मग पुन्हा काही दिवसांनी परत आली. त्यावेळी त्या दुकानाच्या मुख्य व्यक्तीने म्हटलेले वाक्य असे कि "ह्या दुकानात हजारो ड्रेस आहेत. जेवढे जास्त बघत जाशील तेवढे जास्त गोंधळशील. त्या पेक्षा काही बघ, त्यातल्या त्यात आज ह्या क्षणी सर्वार्थाने जो आवडेल, भावेल, त्यात मस्त वाटेल तो निवड आणि थांब. आपल्या अवतीभोवती असंख्य माणसे आहे, खूप संपर्कात येतात, पण आपण एखाद्याला होणारा नवरा म्हटले कि मग बाकीच्यांकडे बघून आपण शोध थांबवतो. खूप त्या पेक्षा चांगले आढळतील देखील पण आपण ते स्वीकारतो". 


अगदी तस्से आहे. हा चित्रपट काय, माझ्या सारख्या आईला पण वाटते तेव्हा मी असं करायला हवं होतं, हे का नाही सुचलं? पण ठीक आहे, रात गई बात गई. त्या वेळी जे सुचलं, जे रुचलं, जे योग्य वाटलं ते केलं गेलं आपोआप. बास. आपल्याला मागे नाही पुढे जायचं आहे. आणि मग माझ्यातली संशोधक अचानक जागी झाली आणि म्हणाली कि ह्यालाच तर संशोधन म्हणतात किंवा प्रगल्भ, मोठं होणं म्हणतात. ह्या पुढे जर कोणी तुम्हाला पालकत्वाबद्दल विचारलं तर तुम्ही नावीन्याने भरपूर उत्तर द्या. किंवा हा चित्रपट अजून किती वेगळ्या पद्धतीने उभा करता आला असता? असा जर जनतेला प्रश्न विचारला पुढील भाग काढावा म्हणून किंवा चित्रपट जडण-घडण शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यास म्हणून तर सांगा, किंवा आपले मत त्यांना सहज मेल करून, पत्र लिहून कळवा, त्यावर लेख लिहा नावासहीत किंवा निनावी, कित्ती तरी वैविध्य उपाय आहेत. त्यामुळे गाडी पुढे जाणं अत्यावश्यक आहे, मागे नाहीच, आणि स्थिर पण नाही. कारण थांबला तो संपला. 

१९८३: उडून गेलेले औषध


२००४ साला पासून माझ्याकडे एक रामबाण इलाज आहे, जेव्हा हवा तेव्हा वापरायचा, काहीही साईड इफेक्ट नाहीच, शिवाय उपयोग फार म्हणजे फार आणि सगळ्या वयोगटाला उपयोग बरं का मंडळी.  


असं कुठे लिहिलं आहे कि सर्दी, पडसं झालं कि फक्त व्हिक्स नावाचे व्हेपोरब वापरायचं? बाम हो आपला, साधा. अर्थात सर्दी झाली कि सायनस चे पॉईंट्स मोकळे होण्याकरता किंवा तो निलगिरी, कापूर आणि इतर औषधीचा सुगंध उपयोगी पडतो. पण इतर वेळा पण त्याचा मस्त उपयोग होतोच.  


डोकं आहे हि जाणीव झाली कि, म्हणजे थोडसं डोकं दुखल्यासारखं वाटलं कि डोळे मिटायचे आणि अगदी किंचित हे व्हेपोरब लावायचं कपाळाला म्हणजे जरा पट्टाकिनी बरं वाटतं. अमृतांजन रोल ऑन असेल तर ते देखील अशाच पद्धतीने काम करतं. 


मी माझ्या लहान मुलांना मस्त गुंगी यावी, ते पट्टाकिनी झोपावेत म्हणून बहुतांशी दररोज त्याचे पाय चेपून देत असे, आणि कपड्यांना किंवा उशीच्या अभ्रयाला थोडेसे व्हिक्स लावत असे, वातावरण निर्मिती म्हणा हवं तर. त्याचा उपयोग झाला, मला आणि त्यांना पण. दोघे मस्त गाढ झोपायचे. 


काल मला ह्या व्हेपोरब ची आठवण झाली, दिवसभर जरा दगदग झाली होती, म्हटलं आता पूर्ण आणि शांत झोप हवी आहे आणि त्या करता काही तरी करावं खास, छोटेसे. नवीन कोरी बाटली होती घरी. त्याचे उद्घाटन केले, पहिल्यांदाच उघडले, इतक्यातच तय्यार केले होते ते, तारीख बघून मगच कपाळावर लावले. आणि महद आश्चर्यम, एका अंशाचा सुद्धा फरक पडला नाही, काही माझ्या कपाळावर लावलंय हे देखील समजले नाही, त्याचे अस्तित्व पण नव्हते आणि असर पण शुन्याहून कमी. क्या बात है? एक तर असं असू शकतं कि मी उगाचच जास्त अपेक्षा करत होते, कि ह्या मुळे मला मस्त सुगंध मिळेल, औषधी असा आणि असरदार पणामुळे छान झोप लागेल. शिवाय ज्या हातांनी ते चोळले तो नाकापाशी धरला कि पण फारच सुंदर वाटायचं, पण काल म्हणजे अगदीच काहीच नाही झालं. दुसरं म्हणजे व्हिक्स ने त्याचा फॉर्मुला बदलला असेल कदाचित, जास्त हलका फुलका केलेला दिसतोय म्हणजे चिपचिप वाटणार नाही. काहीही असो, इतके महागडे ते व्हेपोरब संपूर्ण पणे उडून गेलेले होते असा भास झाला. पैसे वाया गेले, झोप लागली नाही आणि निकृष्ट किंवा ढासळलेल्या दर्जाची कीव आली.  हि डब्बी कधी संपतेय असं झालंय किंवा आमच्या मावशींना देऊन टाकते आणि ह्या नंतर कधीच हे विकत घेणार नाही असा प्रण करते. नवीन रब शोधण्याची वेळ आली आहे. चला उठा शोधायला मदत करा मला. 

१९८२: आप्पेटी


आज श्रावणातला पहिला शुक्रवार, जिवतीची पुजा, पुरणाचे दिवे करून, घरच्या लहानग्यांना ओवाळून / औक्षवण करून साजरा करण्याचा दिवस, नतमस्तक होण्याचा दिवस.  त्या नुसार मी पण पुरण केले, पुजा केली, आणि आधीपासून तय्यारी केली होती एक दाक्षिणात्य पदार्थ करण्याची. मला भारी तो आवडतो त्यामुळे मग करायचाच अशी गाठ बांधली, केला देखील. तो पदार्थ म्हणजे अनोखा आणि साधा आहे. आत पुरण आणि बाहेरून आवरण मेदूवड्यांचं किंवा इडलीच्या पिठाचं, दोन्ही पद्धतीने करतात असं ऐकलं आहे मी. हा एक साधा पारंपरिक पदार्थ आहे, टिकतो म्हणे बरेच दिवस आणि लागतो मस्त. थोडासा तेलकट होतो, पण एखाद दिवशी चालतं. 


पुरण अगदी मोजून मापून केलं होतं. सगळे वडे केले, माझ्या पिल्लू साठी पुरणाच्या पोळ्या केल्या, कटाची आमटी केली आणि मग त्या उरलेल्या इडलीच्या पिठाचे आप्पे केले. काही तरी वेगळं म्हणून. आणि ठरवलं कि आप्पे झाले कि ते मस्त त्या कटाच्या चविष्ट आमटी सोबत फस्त करायचे. आणि अहो काय उत्तम म्हणजे सर्वोत्तम लागला तो पदार्थ म्हणून सांगते. मला तर उडीद रस्सम वडा ह्या पदार्थाची आठवण आली, पण हा त्यापेक्षा भन्नाट लागला हो. क्या बात है? गरमा गरम आप्पे आणि चविष्ट कटाची आमटी, दोन्ही पौष्टिक त्यामुळे बिनधास्त आणि जरा जास्तच खाल्ले गेले. म्हणजे आज मी एका नवीन पदार्थाची सुरवात केली. तुम्ही पण करून आणि खाऊन बघाच, अर्थात मला सोबतीला बोलवायचं विसरू नका हो. 

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

१९८१: खरे कारण


माझ्या पिढीला सर्वत्र "सँडविच पिढी" असे संबोधले जाते, कारण आम्ही ना धड तिकडचे ना इकडचे, म्हणजे नाही जुन्या ना नव्या जमान्याचे पूर्णपणे. माझ्या आजी आणि आईच्या वेळी व्यवस्थित सीमा आखली होती, आई घर सांभाळणार पूर्णपणे आणि बाबा बाहेरचे सर्व. कोणीही कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. अर्थात प्रत्येक वेळी, सर्वत्र आऊट लायर्स आढळतातच, अपवाद हो. त्यामुळे एक्का दुक्का लोक सारखे नाक खुपसणारे आढळतात पण बहुतांशी लोक सरळमार्गी, आपलं भलं आणि दुसऱ्याचही. 


पण मग त्या सुप्रीम पॉवर ने ह्याच सगळ्या आजी आणि आई मंडळींना उपदेश दिला, प्रेरित केलं, प्रेरणा दिली आणि सांगितलं ठणकावून कि नवीन पिढीच्या मुलींना शिकू दे, जग बघू दे, स्वतंत्र होऊ दे, आर्थिक सुबत्ता महत्वाची आहे आणि असे अनेक पैलू उभे केले त्यांच्या समोर. हे करतांना "तो" सगळं काळजी पूर्वकच करत होता.  "तो" आदर्श आणि जेष्ठ मुलींना दुखावत नव्हता, कुठलीही तुलना करत नव्हता, तुम्हाला काय मिळालं नाही असं काहीही सांगत नव्हता पण पुढील पिढीने काय करावं हे नाजूक पद्धतीने त्यांच्या देखत उभं करत होता, सातत्याने सर्वांना प्रेरित करत होता, एकाच वेळी. त्यामुळेच कदाचित ती क्रांती सर्वत्र घडली, दिसून आली, उदयास आली. 


वैविध्य संत, महात्मे, ग्रंथ, आधुनिक संत ह्यांच्या सांगण्यानुसार "धन-अन्न-मन-तन" हा असा मार्ग आहे म्हणे, किंवा जोडला गेला आहे ह्या पद्धतीने. तंत्रज्ञानाच्या किंवा गणिताच्या भाषेत बोलायचं झालं, संदर्भ द्यायचे झाले तर "बेल-कर्व्ह" असतो, घंटीच्या आकाराचा असतो. मधला भाग मोठा आणि दोन्ही काढील बाजू / शेपूट लहान. मधला भाग मोठा असतो कारण त्यात बहुतांशी जनता सामावली असते, सगळे सर्व सामान्य लोक असतात जे सरळमार्गी चालत असतात. पण काही बोटांवर मोजण्या इतकी वेगळी पण असतात, आढळतात आजूबाजूला. इथे आपण सर्व सामान्यांबद्दल सुतवाच्य करणार आहोत. 


तर "त्याने" अशी सदबुद्धी का दिली? 


तर बहुतांशी पुरुष मंडळी सरळ मार्गाने पैसे कमावतात, जे त्यांच्या कुटुंबीयाला गरजेचे असतात, उपयोगी असतात. पण काही आहेत जे वाममार्ग अवलंबतात.  किंवा ह्या कलियुगात म्हणे सरळमार्गी कमी होत चालले आहेत झपाट्याने. "धन-अन्न-मन-तन" हा क्रम जर आपण महत्वाचा मानला आणि महत्वाचा आहेच तर मग घरी येणार पैसा कसा येतोय हेच जास्त महत्वाचे ठरते, कारण जसा पैसा येणार त्यानेच अन्न विकत घेतले जाणार, सेवन केले जाणार संपूर्ण कुटुंबाकडून, तसेच मग विचार सुचणार आणि तशीच तब्बेत उभी राहणार किंवा टिकणार. जर घरची मुलगी, आई, आजी, काकू, मामी ई. शिकले, नोकरी करू लागले, पैसे  कमावू लागले आपल्या कुटुंबासाठी तर त्यात आईची माया असणार. त्या माऊलीच्या डोक्यात सातत्याने तिचे घर, तिची लेकरे, स्वयंपाक आणि इतर महत्वाची कामे असणार त्यामुळे ती जाऊन पट्टाकिनी काम आटोपून परत येणार, बास. चोख काम करणे, ते देखील वायूच्या गतीने हे जास्त महत्वाचे तिच्या साठी. त्यामुळे अगदी कमी प्रमाण सोडले तर सगळ्या अश्याच असतात. संपूर्ण घराचे स्वास्थ्य, त्यामुळे गावाचे, शहराचे, देशाचे, आणि उत्कृष्ट पिढी घडवायची असल्यामुळे हे सगळं मांडव लागलं त्याला. महागाई, वाढत्या अपेक्षा, अंधानुकरण, आंतरराष्ट्रीय स्थर, तुलना, सारखी अवहेलना / अपमान ई. गोष्टींव्यतिरिक्त आज माझ्या मनात आलेला विचार देखील "त्याच्या" दृष्टीने अत्यंत महत्वाचा असेल, म्हणून हे सगळं घडलं, घडतंय. फक्त पुरुषांच्या हातून, किंवा त्यांच्या कष्टाने येणाऱ्या पैशात दंभ जास्त भरत चालला होता कदाचित, वरचढपणा  पण मग आलाच सोबत. ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी सर्व मुलींना दिलेली सद्बुद्धी, वरदान आणि शक्ती होती आणि आहे हि, असं मला वाटतंय मनापासून. 

एकंदरीत स्त्री वर्ग बाहेर पाडण्याचे महत्वाचे कारण आज ठळकपणे माझ्या समोर उभे ठाकले. ह्याचा अर्थ असा नाही कि हे संपूर्ण पुरुषवर्गाला लागू आहे, अजिबातच नाही.  सर्वांचा सन्मान करतं, राखत हे फक्त माझे विचार येथे मांडले आहेत, कोणा बद्दल देखील माझ्या मनात किंतुपरंतु नाही बरं का मंडळी. 

आज मी सिस्टर शिवानी ह्याचा एक कार्यक्रम बघत होते, ज्यात "धन-अन्न-मन-तन"  हा क्रम सांगितला गेला त्याच वेळी हे विचार माझ्या मनात आले. तुम्हाला काय वाटतं ह्या संदर्भात हे मला ऐकायला निश्चित आवडेल.     

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...