मला डाएटिशियन ने दिलेला किंवा सुचवलेले खाणे आवडते, ते मी अगदी मनापासून पाळण्याचा प्रयत्न करते. फक्त वजन कमी करणे किंवा बाह्यरूपाला महत्व देणे नाही तर तंदुरुस्त राहणे जास्त आवश्यक म्हणून. तर आजचा नाश्ता होता रवा डोसा, खूप मस्त भाज्या घालून केलेला असा. त्या सोबत मग साधी हिरवी चटणी, सॉस असं काही. त्याप्रमाणे मी सकाळी मस्त किंचितसा रवा भाजला, थंड झाल्यावर त्यात पाणी घातले म्हणजे तो फुगेल शिस्तीत म्हणून आणि मग सगळ्या भाज्या चिरून, किसून त्यात घातल्या, मीठ, तिखट, कोथिंबीर घातली आणि तवा तापायला ठेवला. पहिला डोसा घातला तर तो विचित्र झाला, काही तरी वेगळा. मला काही उमजेना काय झालं असेल नक्की. असा कधीच होत नाही रवा डोसा. किंबहुना ह्या आधी मी लिहिले आहे कि रवा डोसा हा कधीच बिघडत नाही कारण त्यात बिघडण्यासारखं काहीच नसतं. तो खूप गोल वगैरे पसरवावा लागत नाहीच. थोडेसे डोके चालवले आधी तो डोसा मग
स्क्रॅम्बल्ड रवा किंवा एक वेगळ्या धाटणीतला उपमा तय्यार झाला. मी तो मग चमच्याने फस्त केला. त्यानंतरचे सगळेच मग स्क्रॅम्बल्ड रवा अवतार झाले. तेव्हा लक्षात आलं कि रवा डोश्यात अगदी महत्वाचा घटक म्हणजे दही. कारण तो एक बाइंडिंग चे काम करतो, सर्व पदार्थांना / घटकांना / जिन्नसांना एकत्र बांधून ठेवतो आणि त्यामुळे डोसा झक्कास होतो. आज तो घरी नव्हता. आणि मी दुसरे कुठले बाइंडिंग दिले नव्हते. त्यामुळे हा घोळ झाला, नवीन पदार्थ तय्यार झाला. मज्जा तर आलीच खायला, सगळं संपलं देखील आणि मला माझ्या एका ताईची खूप मनापासून आठवण झाली. मी त्या वेळी ६-७ व्या वर्गात असेल बहुतेक जेव्हा तिचे लग्न झाले आणि त्यानंतर माझा तिचा काही संपर्क राहिला नाही. ती फार प्रसिद्ध होती कोरडा उपमा करण्यात. भगरा उपमा म्हणायचे त्याला. मस्त सगळ्या भाज्या, उडदाची डाळ, दाणे, मिरच्या, भाजलेला रवा आणि अगदी किंचित पाणी, भरपूर कोथिंबीर आणि नारळ. अहाहा च. तिच्या सारखा तो उपमा मी अजून तरी कोठेही खाल्ला नव्हता जो आज माझ्या पुढ्यात वाढला गेला आपोआप. क्या बात है? इतकी मज्जा आली म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते.
ह्या शिवाय बाइंडिंग चं महत्व प्रकर्षाने जाणवलं पुन्हा एकदा, अगदी जसे कि ते विस्मृतीत गेले होते. सर्वांनाच एक तो बाइंडिंग एजन्ट लागतोच नाही. कधीही आणि सातत्याने उपयोगी येणारा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा असा. मग ते घरची लहान मुले असो, किंवा एखादी भन्नाट आजी, एखाद्या डिपार्टमेंटची हेड / मुख्य नाहीतर मित्रांच्या संघाची प्रेरणा. असा बाइंडिंग एजन्ट असेल तर मग सगळं सैरभैर होतं, नको तेवढं पसरतं उगाचच, इतकं कि मग आवरणं अशक्य आणि अवघड होऊन जातं. एकाच एजन्ट / व्यक्ती असावा जो सर्व स्तरावर ठामपणे उभा राहील किंवा प्रत्येक क्षेत्रातील सल्लागार पण उपयुक्त ठरेल, पण त्याच्याशिवाय पान हलणे नाहीच, अशक्यच. त्यामुळे अश्या बहुमूल्य व्यक्तीला गृहीत धरू नका. त्याचे महत्व त्यांना सांगा, वेळ घालवा शक्य असेल तेव्हा आणि तुम्ही पण कोणाचे तर असेच एजन्ट व्हा, राहा आणि वृद्धिंगत व्हा स्वतः.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा