१५ ऑगस्ट च्या दिवशी मी प्रवासात होते. घरून विमानतळापर्यंत जातांना सगळे मस्त पांढऱ्या शुभ्र पोशाखात दिसले. हातात विविध्य आकारांचे तिरंगे बघून भूतकाळात रमता आलं. त्यात काही शाळा पण होत्या रस्त्यात. बरीच मुली समूह गीत, देशभक्तीपर नाच ई. भाग घेतलेल्या नजरेस पडल्या. सहज ध्यानात आले त्या सगळ्या मुलींनी कित्ती दिवस आधी ह्या नाचाची तय्यारी सुरु केली असणार, त्यांच्या शिक्षकांनी देखील, अगदी गाणे निवडण्यापासून ते पोशाख, सगळ्यांचे ताल सूर बसवणे, जुळणे ई. तालमी, रंगीतालीम आणि असे बरेच. आणि त्या काही मिनिटात तो प्रेक्षकांसमोर सादर केला कि संपला. त्या वेळेपुरते सादरीकरण, क्षणिक, बास.
कोणाची ओळख होणे, भेटी गाठी, आणि मग विसर, कामामुळे, इतर अनेक कारणांमुळे, क्षणिक, अगदी काही वेळेपुरते.
कचेरीत जाणे, दररोजची कामाची यादी केलेली असतेच, मीटिंग ठरलेल्या असतात, काही अचानक अनपेक्षित येणार ह्याची तय्यारी असते आणि त्या प्रमाणे त्या दिवसाचे काम आटोपले कि एक कार्यभाग संपुष्टात येतो तात्पुरता. पुढल्या दिवशी नवा दिवस नवी सुरवात कदाचित नव्या जोमाने आणि तय्यारीने. दिवस संपतोच, कोणीच त्याला थांबवू शकत नाही. काहीच थांबवता येत नाही, सगळेच तात्पुरते, टेम्पररी अश्या स्वरूपाचे.
औषधें त्या वेळापुरती काम करतात, वेळ संपली कि पुन्हा काही प्रमाणात दुखणे डोके वर काढू शकतेच. त्या काही तासापुरते मर्यादित.
कुठलीही दिवसभरातील गोष्ट घ्या, प्रसंग पहा तो फक्त तात्पुरता होत असतो. एकाच मीटिंग मध्ये महिनोंमहिने बसलोय हे शक्य नाही. किंवा सतत तरुण राहिलो आहे हे अशक्यच. भाजीचा ताजेपणा हा फक्त १-२ दिवस, बास. नंतर त्याला शिळी भाजी अशी उपमा दिली जातेच.
हास्य काय, अश्रू काय, घोर लागणे काय सगळंच क्षणभंगुर, किंवा क्षणिक असे देखील म्हणता येईल.
पैसा अडका, संपत्ती, ताकद, घर दार, नाते संबंध, सगळंच तेवढ्यापुरते. अर्थात सर्वत्र आउट्लायर्स असतातच. काहींच्या बाबतीत वेगळं घडणं सहज शक्य आहे. पण सगळंच जर पासिंग कलाऊड सारखे आहे, येत-जात राहणार आहे तर अडकून काय फायदा. नका त्या फंदात पडू. आला दिवस गेला दिवस नाही परतला कधी. नक्की, खात्रीशीर, नेहेमीकरता असेलच असे काहीच नाही, माझ्या दृष्टीने. त्यामुळे अगदी तस्सेच वागण्याचा प्रयत्न करा. स्वावलंबी पद्धतीने. गुंतू नका अनावश्यक रित्या त्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा