रविवार, २९ मे, २०२२

मेथीची आमटी

श्रावण सोमवारी संध्याकाळी / तिन्ही सांजेवेळा भूक चालवणारा एकमेव जगावेगळा सुगंध अगदी अंगणापर्यंत पोचलेला असायचा तो म्हणजे मेथीच्या आमटीचा. अहाहा च. अजिबातच कधीच माझ्या विस्मृतीत जाणार नाही असा. तशी महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार दररोज घरी एक तर साधी आमटी होत असे किंवा साधं वरणचं असायचं बहुतांशी. आमटी वैविध्य प्रकारची होत असे पण त्यात चार दाणे मेथीचे किंवा मेथीची चिमूटभर पावडर घालण्यावर माझ्या आईचा जोर असायचाच. काढीत पण, कैरीच्या तक्कुत मेथी दाणे घालायचीच. पौष्टिक असतं म्हणून आणि त्या निमित्यानेच मेथी पोटात जाते सगळ्यांच्या नकळत.   पण श्रावण सोमवार जरा जास्त वेगळा भासायचा आम्हा सगळ्यांना. त्या दिवशी माझी मेजवानीच असायची कारणं भरपूर आहेत, एक म्हणजे पहाटे पहाटे च्या "बेल पुडी" ची आरोळी, मग श्री. महादेवाची पूजा, पांढरी फुलं, उपवासाचे पदार्थ आणि एकतर शाळेला सुट्टी किंवा अर्धा दिवस, अहाहा च. अजून काय हवं होतं आयुष्यात. संध्याकाळी भरपूर मेथ्या घालून केलेली आमटी आणि बाकीचा साधा स्वयंपाक असायचा, पण पोळी काय भात काय सगळ्यांसोबत खाण्याचा परमानंद देणारी असायची ती विशेष आमटी. अगदी साधी पण उत्कृष्टच. कदाचित दिवसभर माझ्यासारखीने जे यथेच्छ उपवासाचे पदार्थ रिचवलेले असायचे त्या करता किंवा जे पूर्ण उपवास करायचे त्यांच्या पोटाचा विचार करून हि केलेली असायची. ती साग्रसंगीत आमटी, भरपूर मेथ्या, घरचा गोडा मसाला, गूळ ई. युक्त आणि त्यात आईच्या हातची, तोडच नाही. जगाच्या पाठिवर कुठेही मिळणार नाहीच, अशक्यच. आईच्या नखांची सर नाही पण अत्यानंद देऊन गेली आज मी कित्येक वर्षांनी सहज रविवार म्हणून मनापासून केलेली मेथीची आमटी. माझी शाळा, ते बहरलेले दिवस, ते सगळे सोमवार, माझं घर, सगळयांची सैर घडली अचानक नकळत. कोण म्हणत मेथी कडू असते? तिच्या सारखा गोडवा कुठेच नाही मंडळी, हो पण माझ्या आईने करून दिली तशी ओळख झाली तर मगच तो गोडवा जास्त सुमधुर होणार ह्यात शंकाच नाही.

हेल्मेट वरचं प्रेम

सध्या सगळेच विद्यार्थी पुन्हा एकदा कॉलेज लाईफ अनुभवत आहेत, वर्गात मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आम्ही शिक्षकवृंद पुन्हा एकदा शिकवणे एन्जॉय करतो आहे. अमोरासमोर आलं कि फक्त अभ्यास नाही तर वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल देखील खूप काही आत्मसात करता येत, टिपता येतं आणि शिकता येतं. अगदी तस्सेच काहीसे झाले इतक्यात. एक खूप उंच एक विद्यार्थी आहे, आणि तो दररोज न चुकता एक देखणी हेल्मेट हातात शिस्तीत घेऊन प्रवेश करतो वर्गात. ती हेल्मेट इतकी वैविध्य रंगानी नटलेली आहे, आकर्षक आहे कि नकळत लक्ष वेधलं जातंच. परवा ह्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होती. हा पठ्ठा आला, हेल्मेट मिरवत, हवं ते साहित्य नेऊन ठेवलं त्याच्या डेस्क वर आणि मी त्याला न्याहाळत होते, कि बघू तो आता काय करतो ते, उगाच शिक्षक म्हणून सूचना देण्या ऐवजी. आणि अगदी तस्सच झालं. सामान ठेवल्यावर तो आला, पोडियम वर हेल्मेट अलगद ठेवली, खिशातून रुमाल काढला, तो व्यवस्थित अंथरला पोडियम वर आणि मग त्यावर त्याची राणी विराजमान झाली. पेपर झाला रे झाला कि मी त्याला विचारलं ह्या त्याच्या एकंदरीत हेल्मेट च्या निवडी बद्दल, इतकी काळजी घेतल्याबद्दल ई. मी: "माझ्यामते तुम्हाला गाडी चालवायला मनापासून आवडतं, किंबहुना वाऱ्याशी संवाद साधता कदाचित". तो: "अगदी बरोबर, खूप मनापासून प्रत्येक गाडी चालवायला, काळजी घ्यायला फार आवडतं मला, खूप जपतो मी गाडीला, आनंद मिळतो मला, खूप वर्षांपासून चालवतो मी त्यामुळे असेल कदाचित. ई.". ते दिसत होतं त्याच्या कृतीतून. दुर्मिळ आहे ह्या पिढी साठी, एकतर अनेक जण हेल्मेटचं घालतांना दिसत नाहीत, कोणीतरी घेऊन दिलेली असते गाडी आणि वय त्यामुळे आपलाच रास्ता असल्यासारखे चालवतात. पण हा आउट लायर आहे ह्यात शंकाच नाही. ह्या वरुन एक अंदाज बांधता येईल कि हा मुलगा कदाचित प्रत्येक बाबतीतच इतका काळजी पूर्वक असावा, तो त्याचा मूळ स्वभाव दिसतोय मला. नक्की आवडतं असावं हे असं त्याचं काळजीपूर्वक वागणं हेल्मेटला देखील.

टाळ्या

आज अर्धशतकी वयात नव्याने उमगला टाळ्यांचा अर्थ, टाळ्यांमागचा उद्देश्य किंवा टाळ्यांमागचा माणूस. अगदी नकळत्या वयापासून मी स्वतः असंख्य वेळा टाळ्या वाजवल्या, बघितल्या, ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या देखील. पण आज काही तरी वेगळं होतं हे नक्की. एका समारंभात माझ्या चार डोळ्यांना असं आढळलं कि काही मोबाईल वर दुसरा हात अलगद खाली वर करत आहेत, काही टेबलावर एक हात हलकासा आपटत आहेत, काहींचा एक हात स्थिर आहे आणि दुसरा त्यावर वाजवला जातोय, काहींचे दोन्ही हात कामात येत आहेत, काही एका हाताच्या तळव्यावर दुसरा हात टेकवत आहेत, काही दोन तळवेच वापरात आहेत, काही फक्त एकदाच हातावर हात आणि बास, काही दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवून तर काही दोन्ही हाताची बोटं फैलावून टाळ्या वाजवतात आहेत. माणसागणिक बदल आढळला मला आज प्रकर्षाने. हे सगळं बघून मला असं जाणवलं कि काही:


  • मोबाईल वर दुसरा हात अलगद खाली वर करत आहेत = हं, ठीक आहे, चांगलं आहे 
  • टेबलावर एक हात हलकासा आपटत आहेत = पूर्ण सहेमत आणि उस्फुर्त ताबडतोब दिलेली प्रतिक्रिया 
  • काहींचा एक हात स्थिर आहे आणि दुसरा त्यावर वाजवला जातोय = फार उत्तम नाही हो 
  • काहींचे दोन्ही हात कामात येत आहेत = उस्फुर्त, अत्यानंद झालेला 
  • एका हाताच्या तळव्यावर दुसरा हात टेकवत आहेत = असं का, बरं, ऐकलं
  • दोन तळवेच वापरात आहेत = मनापासून दाद 
  • फक्त एकदाच हातावर हात आणि बास = व्हॉट एव्हर 
  • दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवून तर काही दोन्ही हाताची बोटं फैलावून टाळ्या वाजवतात आहेत = प्रचंड उत्साही प्रतिसाद 
  • तर मोठ्याने टाळया आणि शिवाय चेहेऱ्याचे हावभाव = फारच निखळ मनाचा  

एखाद्याचं वाक्य, विनोद, शेरा, ओळ ई. काहीही तुम्हाला आवडलं तर उस्फुर्त प्रतिसाद द्या मंडळी, राखून ठेवू नका. मोकळे व्हा, मोकळे जगा स्वतःसाठी हो. तुमच्याच फायद्याचं आहे ते. बाकीचे करू देत काहीही तुम्ही बिनधास्त टाळ्या वाजवा म्हणजे तुमचेच ऍक्युप्रेशर चे पॉईंट्स मस्त ऍक्टिव्ह होतील.

Love is in the air

This term or sweet little phrase is used very commonly in Western countries and here especially after getting engaged or finding your soul mate or during valentine day’s week etc.  I mean at least I am aware of these tiny little things. There is one more term having multiple meanings called “Pillow Talks”. Very special and unique conversation between or your admirer / companion / partner etc. but a pillow is also a very unique friend who serves as best buddy to handle your loneliness if any. Exactly like few do it with their pets, themselves etc. So when everywhere / anywhere two admires or partners are conversing affectionately other than pillow air also witnesses it, feels happy / excited and hence amplifies it further to reach to many more all over the entire world. Due to which love / affection / fondness / attachment / feelings etc expands its wings and you feel the love in the air, always or suddenly from no-where, for no reason etc. This love could be between any two people, two living beings, living and non-living… the best part is it multiplies and spreads automatically, speedily, rapidly, swiftly… So next time whenever you are in an affectionate conversation with any, don’t only be excited for yourself and for your partner but also for hundreds of others who will receive that happiness from you through air, because of you. So love more, it will be spread more in multiples and this mother earth will be a happier place than ever before to live and enjoy.

साज चढला

माझी एक मैत्रीण आहे जी माझी जाऊ पण आहे आणि तिला पानात कितीही चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, कालवणं ई. असले तरी देखील काही तरी सटर-फटर तोंडी लावायला लागतचं. मग काय तिच्या मुळे आम्हाला पण ती छानशी सवय लागली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑफिस मधे थंडगार डबा खातांना प्रत्येक वेळी तिची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहतं नाहीच. माझी लेकरं तेव्हा खूपच लहान होती जेव्हा हि माझी जाऊ सटर-फटर तोंडी लावायला मागायची. त्या दिवशीपासून माझ्या मुलांनी एक त्यांचा नवीन शब्द शोधून काढला आहे कुडुम. आज तागायत तोच प्रचलित शब्द आहे आमच्या घरी, "काही तरी कुडुम दे, म्हणजे शेव, खारी बुंदी, चकली, ई.". आज देखील तेच झालं. आमच्या कचेरीत / विद्यापीठात एक कार्यक्रम होता. सर्वांना जेवण होतं, पण माझ्या पायांसाठी ती खूप दूरची पायपीट होती म्हणून मी माझी शिदोरी आधीच आणली होती सोबत माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे. आज सहज नेता यावा असाच डब्बा केला होता पण थोडीशी पौष्टिकता जपत ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बुंदी घातलेला पण आणला होता सोबत. "चेरी ऑन केक"  म्हणजे एका मैत्रिणीच्या सोबत आज डब्बा खाण्याचा दुग्ध शर्करा योग आला. माझे लोणचं लावून आणलेले पराठे, पुलाव असे आणि तिचा डब्बा. पण चिवडा बुंदी सोबत ते साधं घरगुती जेवण चाखतांना एक वेगळाच साज चढला.  तो साज, तो आनंद, ती चव, तो स्वाद शब्दात बांधण्यासारखं नाहीच, त्याचा आवाका फार मोठा आहे. "जेवण कित्ती गार झालंय, घरी असतो तर गरम खाता आलं असतं...." ई. विचार मनात देखील आले नाहीतच ह्या आमच्या इस्पेशल कुडुम मुळे. 

"डबा असावा डब्यासारखा
 नको नुसता देखावा 
त्यात असावा प्रेम जिव्हाळा 
आणि कुडुम चविष्ट निराळा"


टच स्क्रीन संगणकच का?

संगणक अनेक रंग ढंगात उपलब्ध आहेच, त्यात टच स्क्रीन आणि साधे हे देखील आहेत बाजारात आणि प्रत्येकाची आवड शिवाय परवडायला पण हवं. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आणि गरज पण. त्या नुसार लॅपटॉप किंवा डेस्कटॉप विकत घेतले जातात.

त्या व्यतिरिक्त मी जेव्हा संगणक शिकायला सुरवात झाली नेमकी तेव्हाच माणसाला बहुउपयोगी अशी मेनू ड्रिव्हन सिस्टिम नव्हती, कंमांड्स द्याव्या लागायच्या,लिहाव्या लागायच्या प्रत्येक वेळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे कीबोर्ड खूप उपयोगी येत असे. कीबोर्ड शॉर्टकट्स पण माहित असणं अत्यावश्यकच होतं किंबहुना फॅड होतं म्हणा ना. तेव्हा कधीच मी पडले नाही कि कीबोर्ड शॉर्टकट्स का शिकायचे? वगैरे. पण शिकले, आवड म्हणून. पण आज त्याचा प्रकर्षाने उपयोग होतो आहे मला. माझा उंदीर सध्या आजारी आहे, नाराज आहे, खूप उपचार करून देखील त्यात जीव परत येत नाही आहे. पण संगणक म्हणजे माझा जीव कि प्राण, श्वास, आत्मा ई. आणि सगळंच त्यात आहे, आता? हा प्रश्न पडायच्या आत मी कीबोर्ड शॉर्टकट्स वापरले, टच स्क्रीन च्या उपलब्धतेचा पुरेपूर सदुपयोग करून घेतला आणि काम अडू दिल  नाही. बघा म्हणजे संगणक, शॉर्टकट्स आणि डोंगराएवढे काम ह्या मुळे आधी शिकलेलं आणि सध्याची अद्ययावत सुविधा किती कामाला येते आहे. मला पक्की खात्री आहे कि टच स्क्रीन काढण्यामागे हा असा प्रमुख उद्देश असावा ज्याने हे संकल्पना शोधून काढली त्याचा, किंवा त्याला असं उंदीरमामाने अडवलं असेल म्हणून कदाचित. असो. मी तर हे सगळे इतकं म्हणजे इतकं एन्जॉय करते आहे कि ज्याचं नाव ते. मज्जा येते आहे. थोडीशी गती कमी झाली आहे पण ती पण एक मज्जाच नाही का?

टिकली का लावायची

माझ्या लेकीचा हा अत्यंत आवडीचा प्रश्न, अगदी नेहेमी ती तो वापरतेच, नेहेमी म्हणजे बहुतांशी दररोजच. आणि आधी आधी मला पण हा प्रश्न पडायचा आणि त्याचं फक्त मुळमुळीत उत्तर माझ्या कडे होते किंवा नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. मग मी त्या प्रश्नाकडे कानाडोळा करायला लागले आणि आज ह्या प्रश्नाचं उत्तर उभं ठाकलं अचानक माझ्या पुढ्यात. खूप हलकं, मस्त अगदी फुलपाखरू झाल्यासारखं वाटतय मला आत्ता, ह्या क्षणी.

जन्मल्यापासून जी आईने सुरवात केली तीट काजळ, गंध, अंगारा, कुंकू कधी कधी ई. तो प्रवास रंगबिरंगी गंध, त्याचे वैविध्य डिझाइन्स आणि मग टिकल्या ई. करत करत आज पर्यंत सुरु आहेच. त्या माझ्या कपाळाला, त्या ठराविक ठिकाणाला पण इतकी सवय झाली आहे कि टिकली नसेल तर अडत काहीच नाही पण सुचत देखील नाही.  दररोज टिकली लावल्याशिवाय पाय बाहेर पडत नाहीच शिवाय माझ्या बॅगेत, ऑफिस मधे, इकडे-तिकडे टिकल्यांचे पाकिटं आढळतातच, म्हणजे लावलेली टिकली पडलीचं तर हातासरशी उपलब्ध असावी सहज म्हणून.

पण आज एक समाधान मिळालं कि "माझा खारीचा वाटा" इतकंच पण त्या टिकली तय्यार करणाऱ्यांना माझ्या सवयीमुळे थोडासा हातभार लागतो, त्यांना धंदा मिळतो / त्यांचा धंदा चालतो, हे हि नसे थोडके. त्यामुळे टिकली लावणं हि एक चांगली सवय आहे, सौंदर्यात भर पडते वगैरे ह्यात मी पडणार नाही, पण एक संपूर्णत्व नक्कीच लाभतं जे मला आवडतं आणि माझं मलाच भन्नाट वाटतं, काम उत्कृष्ट होतात.  टिकली आता नव्हे पण खूप वर्षांपासूनचा माझाच एक भाग असल्यासारखा आहे, माझी ओळख आहे, कारण मी विद्यार्थी दशेत असतांना माझी त्या वैविध्य टिकल्यांमुळेच ओळख होती अख्खा कॉलेज मधे आणि ती टिकली प्रकर्षाने.

कुठल्याही फक्त रूढी, परंपरा, धर्म, जात, ई. गोष्टी मला कधीच स्पर्श देखील केल्या नाहीत टिकली वापरतांना, सुदैवाने.

टिकल्यांचा व्यवसाय फार तोकडा, छोटासा असेल असा माझा गैरसमज होता, जो आज दूर झाला जेव्हा मी गूगल बाबाला विचारलं ह्या बद्दल हि अनुकथा लिहिण्याच्या आधी. मोठा व्यवसाय आहे आणि त्या संपूर्ण "पुरवठा साखळी = सप्लाय चेन" चा इतकी वर्ष झाले मी एक हिस्सा आहे हे वाचून फार बरं वाटलं.  मी आज मनसोक्त फारच उत्कृष्ट, वेगळ्या ढंगांच्या आणि खूप मनापासून तय्यार केलेल्या टिकल्या विकत घेतल्या आणि उद्याचपासून मी त्या मिरवणार आहे, त्यामुळे त्या संपूर्ण समुदायाला मनापासून धन्यवाद, माझ्या हाती इतक्या अप्रतिम देखण्या टिकल्या दिल्या बद्दल, एक वेगळी ऊर्जा दिल्याबद्दल आणि माझा भाग झाल्याबद्दल. 

Read more about Bindi business on following URLs:

https://aatmnirbharsena.org/blog/bindi-making-business-in-india/
https://connect2india.com/Kumkum-Bindi

पेपर वेट

खूपच वर्षांनी हा शब्द मी वापरते आहे, किंबहुना बघितलंच नाही मी पेपर वेट कित्येक वर्षात. संपुष्टात आली कि काय हि संकल्पना? असं प्रश्न मनात डोकावत होता तेवढ्यात एक नवीन पद्धतीचं पेपर वेट नजरेस पडलं आणि खात्री झाली कि अजूनही हि बहुउपयोगी वस्तू लागते आहे, वापरात आहे. गोल गोल फिरवलेला, हाताला चाळे नुसते, फेकून मारायला, त्याच्या आत कलाकारी करायला, ई. त्याचा उपयोग होता, म्हणजे कागदं उडू नये हे  जरी मूळ उदिष्ट असलं तरी. सध्या काय जगी, स्थळी, पाषाणी बघावं तेथे AC असतो, तो फारच नाजूक पद्धतीने गारेगार हवा फेकण्याचं काम करतो जे त्याला नेमून दिलं आहे. त्यामुळे असेल हो कदाचित कि हे पेपर वेट दिसेनासे झालेत. किंवा सध्या बहुतांशी सगळंच ऑनलाईन होत असल्यामुळे पण कागद जर वापरलाच जात नाही तर मग त्यावर वेट ठेवण्याची गरजच नाही कारण ते उडून जाताच नाहीत, काही नसतंच उडून जायला नाही का?

आज उन्हाळ्याचा एक दिवस. वर्गात ऑफलाईन परीक्षा घेत होते. प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका होत्या खूप साऱ्या आणि पंखे संपूर्ण ५ च्या गतीने सुरु होते, सगळेच्या सगळे. त्यामुळे पेपर वेट ची प्रकर्षाने उणीव भासली असे शब्द ओठातच राहिले माझ्या कारण मी आणि माझी संशोधक विद्यार्थिनी ने आपापले मोबाईल फोन न कळत ठेवले होते कि त्या पत्रिकांवर. बिचारे मोबाईल फोन, त्याचे उत्पादक, विक्रेते आणि संशोधक कोणाला म्हणजे कोणालाच हे स्वप्नात देखील वाटलं नसेल कि मोबाईल चा एके दिवशी फक्त पेपर वेट म्हणून सदुपयोग होईल. मोबाईल बिच्चारा आधीच किती ओव्हर लोडेड आहे, सगळ्यांची संभाषणं ऐकतो, करमणूक करतो, तापमान सांगतो, बातम्या ऐकवतो, उठवतो पहाटे, आठवणी करून देतो कामाच्या, सगळे संपर्काचे नंबर, मेल ई. जपून ठेवतो, आरास म्हणून देखील काम करतो, दिशा दर्शक होतो, बाप रे, आणि आता त्यात हे एक नवीन काम / जबाबदारी अंगावर आली बिच्चाऱ्याच्या. कित्ती दमणूक होतं असेल नाही त्याची.

रुसलेला माझा प्रिंटर

सप्टेंबर २०२० ला मी कामानिमित्य काही दिवसांकरता / महिन्यांकरता नागपूरला गेले होते. त्या काळात माझा प्रिंटर माझ्या खोलीतून काढून स्टोररूम / गोदाम / कोठारात ठेवण्यात आला. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझी खोली एका नवीन आलेल्या मोठ्या प्रोफेसर ला देण्यात आली होती, वापरण्याकरता. तो प्रिंटर मला देण्यात आला होता आणि मी तो कित्येक वर्ष वापरात होते, माझ्याच खोलीत, माझा सोबती जसा. नागपूरला जातांना कदाचित त्याला नीटसं बाय केलं नाही बहुतेक, राहूनच गेलं, कसं काय घाईत कोणास ठाऊक. मी परत आल्यावर देखील खूप दिवस तो गोदामातच होता वास्तव्याला. आता जसे परीक्षेचे दिवस सुरु झाले तस्से मला त्याची प्रकर्षाने आठवण झाली, मी मेल केला आणि त्याचं माझ्याच खोलीत पुनरागमन झालं. आणि पुन्हा एकदा त्याच्याशी गप्पा न मारता मी थेट त्याला माझ्या संगणकाशी कनेक्ट केलं. आणि महद आश्चर्यम. काहीच हालचाल नाही. म्हंटल काय झालं. पुन्हा एकदा प्रयन्त करू, पण छे हो. मग त्यातले तज्ज्ञ आले, खुडूकमूडूक केलं, पण तरी हा पठ्ठा धजेनाच. तेवढ्यात काही तरी आणायला गेला आणि का कुणास ठाऊक पण मी थोड्याश्या गप्पा मारल्या माझ्या प्रिंटर शी, सॉरी म्हंटल, रागावूनकोस अशी विनवणी केली आणि काय सांगू पठ्ठा सुरु झाला कि आपोआप. प्रिंटर पण रुसतो? हि कल्पनाच नव्हती मला. आता मात्र कानाला खडा. ह्या पुढे प्रत्येकाला सांगून जाणार, आत्ता समजलं मला कि न सांगता इतक्या महिन्यांसाठी गेलं कि दुखावतो हो समोरचा मग तो दिसायला आणि म्हणायला निर्जीव असला तरी देखील.

संबंध

 "श्री गजानन विजय" ह्या पवित्र ग्रंथाची पानं किंवा काही ओळी माझ्या नित्य वाचनात असतात. त्यात एका अध्यायात एका भक्ताची कथा नमूद केली आहे. त्या भक्ताला एक दुर्धर आजराने ग्रासलं असतं, तो शेगावला वास्तव्याला येतो, महाराज जेथे स्नानाला जातात तेथील माती अंगाला लावतो. हा त्याचा दिनक्रम खूप दिवस चालू राहतो आणि तो पूर्णपणे बरा होतो / मुक्त होतो आजारातून. अर्थातच एक अतिशहाणा त्या भक्ताला अनाहूत सल्ला द्यायला हजर होतो, त्याला हटकतो, वैद्याकडे जायला सांगतो, ई. त्यावर भक्त सांगतो कि हि माती जेथे महाराज स्नान करतात नदीकाठी म्हणजेच माझ्यासाठी जगातली उत्कृष्ट औषधी आहे. त्या मातीला एक वेगळा सुगंध आहे कारण त्यात वैविध्य औषधं ओतप्रोत भरली आहेत जी माझ्या आजारावर रामबाण इलाज आहेत. तू स्वतः अनुभव घे म्हणजे समजेल. दुसऱ्या दिवशी भक्त आणि अतिशहाणा दोघे नदीकाठी पोचतात आणि अतिशहाण्याला त्याच मातीचा दुर्गंध येतो कारण ती माती त्याच्या साठी नसतेच, त्याच्या उपयोगाची नसते आणि शिवाय संपूर्ण शरण गेल्याशिवाय अनुभव येणं अशक्यच, नाही का? पण तीच माती जेव्हा भक्ताचा हातात येते तेव्हा त्याला औषधाचं स्वरूप प्राप्त होतं.

२०१८ - १९ च्या दरम्यान मी परतफेड नावाची श्रुंखला लिहिली होती त्याची सुरवात शहाळ्यांपासून झाली होती. प्रत्येक वेळी चाखलेलं शहाळं वेगळ्या चवीचं भासायचं मला. मला त्या वेळी असं सुचलं होतं कि ज्यांनी नारळाचं झाडं लावलंय ते दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, त्यांची प्रकृती लवकर ठणठणीत व्हावी ह्या उद्देशाने लावलं असेल त्याची चव सुमधुर, बाकी नाही. पण आज एक वेगळा दृष्टिकोन जाणवला. कि सगळ्याच नारळाचं पाणी हे औषधीच असतं. जे गोड लागलं नाही माझ्या जिभेला तेच कदाचित त्या वेळी माझ्या प्रकृतीला जास्त योग्य होतं, हवं होतं म्हणून त्यावेळी बरोबर माझ्या हाती तसं थोडसं तुरट पाणी पुढ्यात उभं ठाकलं. किती उत्कृष्ट, जगावेगळा आणि न कळत संबंध स्थापित झाला बघा. आणि आणखी एक शिकवणूक देऊन गेला कि निरपेक्ष राहा, शहाळं म्हणजे गोडच असं नाही. तुमच्या व्याधीला बरं करण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी कि शहाळ्याचे पाणी कधी कधी अगोड देखील असू शकतं, किंबहुना असतंच. "त्याला" कित्ती काळजी बघा माझी. इतकी जगभर त्याची लेकरं असून देखील माझ्यासाठी वैयक्तिक लक्ष ठेवून राहणं म्हणजे ........ त्यात माझी योग्यता नसतांना, मी नाही ऋषी मुनी, नाही हि देवळातली गुरुजी, ना हि गोरगरिबांची सेवा करणारी. माझ्या कडे त्याच्या साठी शब्द अपुरे आहेत. अशीच कृपा दृष्टी माझ्यावर आणि सर्वांनवर सदोदित राहो हि ईशचरणी प्रार्थना.

बुधवार, २५ मे, २०२२

तापलेला नाही, संतापलेला

परवा मी आमच्या एक्साम कक्षात गेले होते काही प्रिंट्स घेण्याकरता, परीक्षा येऊ घातली आहे त्यामुळे त्याचे पेपर्स प्रिंट करायचे होते. त्या विभाग प्रमुखांची रीतसर परवानगी घेऊन पोचले आणि दिल्या कि प्रिंट्स. २०-२२ पानं होती माझ्या मते एका गठ्यात आणि असे दोन गठ्ठे प्रिंट करायचे होते. पण म्हटलं आधी फक्त एक गठ्ठा प्रिंट कर अशी विनंती करू या, अहो हो आजकाल विनंति / हात जोडणं ई. फार म्हणजे फारच महत्वाचं आहे, तब्बेतीला चांगलं असतं. आणि प्रिंट दिल्यावर थोड्याच दूर ठेवलेल्या प्रिंटर पाशी मी पोचले तो गठ्ठा घेण्यास आणि जे आढळलं मला ते खूप वेगळं होतं. ती कागदं मला क्षणभर पण माझ्या हातात धरता आली नाहीत हो, इतकी तापली होती. तो अनुभव इतका वेगळा होता कि माझ्या मते तो प्रिंटर तापला नाही प्रचंड संतापला होता. इतकं संतापणं योग्य नाही प्रकृतीला अजिबातच. दुसरा गठ्ठा तोवर प्रिंट दिला गेला होता, त्याची पण अगदी तीच गत. छे छे. काही तरी औषोधोपचार प्राधान्य देऊन, उच्च विद्याविभूषित डॉक्टर बोलावून करून घेतले पाहिजेत त्या प्रिंटर चे. नाहीतर लवकरच.........

आणि मुख्य म्हणजे मी मागे एकदा नमूद केल्या प्रमाणे माझ्या बाबांचं वाक्य मला प्रकर्षाने आठवलं, ते माझा चेहेरा कधी मलूल झालाच तर म्हणायचे "काय होतयं"?, मी: "बाबा ताप आलाय, किंचित" किंवा "तपासारखं वाटतंय", त्यावर त्यांच चपराख उत्तर तय्यार असायचं "तापचं आला आहे ना, मग गोळी घेतला कि उतरेल, आराम कर, संताप नाही ना मग मिळवलं, त्याला कुठलंच औषध नाही ग बाजारात". बास, हे ऐकल्यावर कुठला ताप उरतोय, चट्टकिनी उतरून जायचाच.

त्यामुळे हा किंवा कुठलाही प्रिंटर / माणूस / अजून कुठले अवजार फक्त तापाने त्रस्त आहे ना ह्याची खात्री करा, संताप परवडणारा नाही आहे. आणि हो स्वतः देखील ताप  येऊ न देणे आपल्या हातात नाही, संताप येऊ न देणे तर आहे ना. मग चला तर मंडळी संतापाची देवाण घेवाण नकोच आज पासून, आत्ता पासून.

वातानुकुलीत यंत्रणा कोणासाठी?

एक भली मोठी कंपनी आहे. त्या कंपनीच्या वरिष्ठांना ने आण करण्यास कंपनीच्याच गाड्या आणि ड्राईव्हर आहेत. अनेकदा अनुभव घेतल्यावर असं ध्यानात आलं कि दिवसभर काम केल्यावर परततांना गाडी मधली वातानुकूलित यंत्रणा चालू केली कि ड्राईव्हरच्या ड्रेसचा घामाचा वास प्रकर्षाने जाणवतो. मग त्यावर ताबडतोब उपाय निघाला आणि ड्राईव्हर साठी खास AC खोलीची व्यवस्था करण्यात आली.

काही प्रजातींच्या कुत्रांसाठी देखील AC फारच महत्वाचा असतो म्हणे. कदाचित बाकी पाळिव प्राणी, पक्षी ह्यांना पण लागत असेल आणि मालक ते देत असतील.

माझा सध्याचा ड्राईव्हर जो आहे त्याला अस्वस्थ व्हायला होतं, इतक्यांदा तो सतत घाम पुसतो कि एक हात आणि रुमाल चालूच. त्यामुळे भीती वाटते. AC लावला कि मग अस्वस्थपणा ताबडतोब कमी होतो.

एका घरकाम करणाऱ्या मावशींनी सांगितलेला किस्सा. त्या म्हणाल्या कि माझे एकंदरीत कामं होती, त्यापैकी कामाचे पैसे मिळायचे. आठवं काम मी फुकट करत होते कारण मला काम करता-करता संपूर्ण वेळ टीव्ही बघायला मिळावा म्हणून.

राजेशाही संपून एक काळ झाला, पण तरी देखील जुने राजे आणि त्यांची राजेशाही पद्धत अजूनही काही राजघराण्यात दिसते. असेच एकदा एका राजाच्या घरच्या अंगणात, राजवाड्याजवळ एक देऊळ होते, त्याच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. आणि त्या देवळाशेजारी राजाचा हत्ती होता, हत्तीचं घर होत / शेड बांधली होती. त्यात उन्हाळ्यात पाण्याचे फवारे मारण्याची सोय होती आणि खास त्या हत्तीच्या मनोरंजना करता टीव्ही देखील होता. 

ह्या सगळ्यांबद्दल ऐकल्यावर मला एक यक्ष प्रश्न पडला आहे तो असा कि मग स्वतःच्या गाडीतला AC आणि घरचा टीव्ही नक्की कोणासाठी आहे, असतो, असला पाहिजे?

टीव्ही बघत जर जगावेगळा चविष्ट स्वयंपाक किंवा घरकाम होत असेल तर हरकत नाही. AC लावल्यावर व्यवस्थित, शिस्तीत गाडी चालवली तर हरकत नाही. नाहीतर अवघडच आहे.

असो, फक्त मालकच नाही तर सगळेच मिळून ह्या सोईंसुविधांचा लाभ घेऊयात. 

मंगळवार, २४ मे, २०२२

घासणीचा आकार

मला भांडी घासण्याचा प्रक्रियेची जेव्हा ओळख झाली तेव्हा लिंबू-मीठ, वीट, राख, चिंच ई. गोष्टी पण वापरात असायच्या साबणाशिवाय. कारण त्यावेळी बहुतांशी भांडी हि पितळेची, तांब्याची किंवा लोखंडाची असायची. त्यामुळे ह्या गोष्टी फार उपयोगी पडायच्या. नारळाची शेंडी पण घेतली जायची घासणी म्ह्णून. मग हळू हळू अनेक उद्योग उतरले ह्या  क्षेत्रात आणि घासणी, भांड्यांचं साबण ई. मधे विविधता दिसायला लागली. आधी स्पॉन्ज आला, मग थोडी खरखरीत प्रकारची चौकोनी / आयताकृती अशी, मग स्पॉन्ज एका बाजूला + खरखरीत दुसऱ्या अशी, मग स्टील ची गोल, फळांच्या आकाराचे, हातात सहज धरता यावेत असे बाजूने किंचित गोलाकार दिलेले, ब्रश सारखे, वैविध्य रंगांचे, जाडीचे, प्लास्टिक चे, वाकड्या मानेचे, अगदी पलंगाच्या आकाराचे सुद्धा आणि अनेक असे प्रकार झाले.

परवा मावशींनी आरोळी ठोकली, भांड्यांचं साबण संपायला आलयं अशी आणि मग मी जाऊन घेऊन आले. दुसऱ्या दिवशी मावशीच गायब, मग मी झाले तात्पुरती मावशी. म्हटलं कशाला उगाच उरलेलं तोडकं साबण वापरायचं नवीन काढूया, सरते शेवटी मी उतरले आहे मैदानात भांडी घासायला कित्येक वर्षांनंतर. शिस्तीत साबणाचं पॅकिंग उघडते तो काय अहो आश्चर्यम. घासणी कडे मी बघतच राहिले. कारण गेले काही वर्ष साबणाच्या मोठ्या पॅक सोबत घासणी पण देतात. तो आकार बघूनच मी त्याच्या प्रेमात पडले हो अक्षरश:. कोणाच्या म्हणताय? अहो त्या घासणीच्या, आकाराच्या, ज्याने हे डोकं लावलंय त्याच्या ई. अश्या घासण्या दिल्या तर मनापासून काम होणारच ह्यात शंकाच नाही हो. कसं काय सुचलं असेल कोणास ठाऊक. अगदी शुल्लक गोष्ट पण परिणामकारक अशीच. "बदल हाच स्थिर असतो" म्हणतात हे कित्ती खरं आहे ह्याच प्रत्यंतर आलं मला. साधं भांडी घासण्याचं साबण ते, पण तेथे देखील इतका वेगळा विचार. आवडलं मला.  इतक्या रंगबिरंगी, नाजूक हातांना विचारात घेऊन, लहान मुलांना देखील शिस्त लागावी म्हणून निघालेले, भारतीय आणि विदेशी बनावटीचे असंख्य घासणीचे प्रकार अनुभवले पण घरची भांडी, घरच्यांसाठी जेवण ज्यात प्रेमाची फोडणी देऊन तय्यार केलयं, मग घराचा आकार असलेली घासणी दिली गेली तर, वा म्हणजे वा च. मज्जा आली. वेगळा विचार केल्याबद्दल धन्यवाद, अगदी मनापासून आणि अजून एका प्रकारे घराला घरपण दिल्याबद्दल.

फॉर्म फिलीन्ग चॅट

खूपदा ऐकलं आहे कि माझी पिढी हि एक फारच निराळी, अनोखी आणि जगावेगळी अशी पिढी आहे कारण आम्ही सर्वांनी सगळं सुरवातीला मॅनुअली केलं आहे आणि सध्या अगदी शिताफीने तंत्रज्ञान देखील वापरतो आहोत. प्रवास फार मोठा आणि वेगळा होता ह्यात काही दुमत नाहीच. फॉर्म म्हटला कि कागदावर छापलेला हीच परिभाषा माहिती आहे. पण मग त्यानंतर ऑनलाईन फॉर्म निघाले जे कि ऑफलाईन फॉर्म ची प्रतिकृती होती जी संगणकाच्या साह्याने भरायची होती. मग गुगल फॉर्म निघाले जे एकावेळी अनेकजणांना पर्यंत पोचतात आणि एकावेळी अनेक जणांना भरता देखील येतात, काय जादू आहे नाही?. भन्नाट .

त्यानंतर आम्हाला माहित असलेला अजून एक मोठा आणि सहज भाग आयुष्याचा, दिनचर्येचा म्हणजे गप्पा, कोणाशीही, कधीही, कुठेही आणि कुठल्याही विषयावर. असे फारसे बंधन, किंवा त्यावरून नावं ठेवणं, वेठीस धरणं असं काहीही म्हणजे काहीही नव्हतंच तेव्हा. मग आले फोन आणि त्यामुळेमन उधाण वाऱ्याचे” असं काहीसं झालं आणि दूर असलेल्या सर्वांशी संवाद साधणं सहज सोप्प झालं. त्या पुढील पायरी म्हणजे लिखित संवाद अक्का चॅट. पत्राचा लहान भाऊ पण ताबडतोब उत्तरं देणारा असा, बहुतांशी ताबडतोब.

ह्या सर्वांमधे मला एक अजून प्रसंग आठवले ते जेव्हा मी बाबांसोबत बँकेत जात असे आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा दिसत नाही नीट त्यांना बोलत-बोलत, माहिती काढतं-काढतं फॉर्म भरून द्यायचा. आज अगदी तेच नेमकं मी पुन्हा एकदा अनुभवलं, ते दिवस पुन्हा एकदा जगले, बाबांची, त्या बँकेची, त्या फॉर्म ची आणि त्या तमाम लोकांची आठवण करत कारण आज मी एका कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करत होते आणि त्यांनी अगदी अस्साच फॉर्म + चॅट उपलब्ध करून दिला होता संगणकावर, छान वाटलं, नवीन काही तरी असं त्यांना वाटलं असेल पण मी ते आधीच जगले होते त्यामुळे मला फक्त ते संगणकावर करतांना खूप मज्जा आली अगदी लहान मुलाला एखादं नवीन खेळणं हातात मिळाल्यावर होतं तस्स, अगदी तस्स. असे नवीन नवीन प्रयोग करत राहिले कि माझ्या सारख्या वापरणाऱ्याला पण भन्नाट वाटतंच पण भूतकाळात फेरफटका मारता येतो ते वेगळच. "असेच नवीन प्रयोग होती आणि स्मृती देऊनी जाती". मी हे असं फॉर्म + चॅट पहिल्यांदा अनुभवलं मग माझी दौतच मला म्हणाली अगं चल, उचल मला आणि हो सुरु, अर्थात आता संगणकावरच हो. 

वेगळ्या कुळातला गुलमोहोर

बहरणं, उस्फुर्त बहार येणं, जगावेगळं फुलणं . म्हणजे गुलमोहोर, माझ्यासाठी. "भरभरून जगणे" ह्याची व्याख्या काय? असा जर कोणी प्रश्न मला विचारला तर माझ्या कडे एका शब्दात सांगण्यासारखे उत्तर आहे. गुलमोहोराची फुलं, त्याचा तो वृक्ष, रंगछटा, असंख्य भरपूर केशरी रंगात इकडे तिकडे कुठेतरी दिसणारा हिरवा रंग, उंच आणि रुंद - विस्तीर्ण अशा शाखा, अनेक दिवस टिकणारी फुलं, जमिनीवर मुळांशी पडलेला सडा जशी कि उत्कृष्ट रांगोळीच  .... काही विचारूच नका, लिहावं तेवढं, बघावं तेवढं कमीच आहे. जेथे जेथे नजर जाते तेथे तेथे गुलमोहोर दिसतोच. अश्या वर्णनाची झाडेच दृष्टिस पडतात, ऑफिस ला जाता येता किंवा कुठेही बाहेर पडलं तर सातत्याने, अर्थात खिडकीच्या बाहेर लक्ष दिलं तर, बाहेरचा नजारा उपभोगला तरच.

माझ्या चार डोळयांना काही दिवसांपासून एक वेगळं दृश्य दिसतंय आणि मला खात्री नव्हती, विश्वास बसत नव्हता माझ्याच डोळ्यांवर पण आज अगदी आवर्जून बघितलं आणि मग म्हटलं काढावी दौत आणि टिपायला करावी सुरवात. तर त्याचं असं झालं कि गेले अनेक दिवस माझ्या ऑफीसा च्या रस्त्यावर एक गुलमोहोराचंच झाड आहे, भलं मोठं बरं का, पण त्याला फुलं अगदी थोडी मात्र पानांनी बहरलेलं असं ते. अहाहा . गुलमोहोर म्हणजे बहर, हे समीकरण शाबूत ठेवून देखील आपलं वेगळेपण जपणारं असं भन्नाट उदाहरण, वेगळ्याच कुळातलं. हे असं कसं झालं असेल? हायब्रीड जात असेल का? का कुणी प्रयोग म्हणून लावलं असेल? का गुलमोहोरात वेगवेगळे प्रकार असतात? खूप खूप प्रश्न पडले होते मला पण मग ते विहंगम दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं, कुठलेही प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत आणि जमेल तेवढं डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्यातून एक लक्षात आलं कि गेले अनेक वर्ष मी माझ्या प्रत्येक विद्यार्थी आणि बॅचला सातत्याने एक गोष्ट सांगतं आले आहे ती हि कि तुमच्या कडे चॉईस आहे फक्त इंजिनिअर होऊन भल्यामोठ्या रांगेत उभं राहायचं, नोकरी मागायची का इंजिनिअर होता होता आपला एक वेगळा ठसा उमटवायचा? प्रयत्न केलं तर सहज शक्य आहे, ह्या झाडाने जसं वेगळेपण जपलयं अगदी तस्स, गुलमोहोराचं पण मस्त हटके. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने धडपड केली तर इंजिनिअर पण मस्त हटके असं होता येईल, कंपन्या तुम्हाला प्राध्यान देतील आणि जगावेगळं समाधान मिळेल ते वेगळचं, नाही का?. मग लागा कामाला झट की पट, आत्ताच. 

रविवार, २२ मे, २०२२

सिमेंटिंग

अगदी पूर्वी असं म्हणतात कि राहत्या घरांना दगडयांच्या भिंती होत्या, मग विटांच्या पण मातीने सारावलेल्या अश्या भीती बांधायला सुरवात झाली, कदाचित तेव्हा राहती घरं हि बैठी असायची गगनचुंबी नाही, त्यामुळे असेल. किंवा बाहेरील वातावरणाप्रमाणे घराचा आतील भाग मस्त राहावा म्हणून देखील असेल कदाचित.

त्यानंतर भाजलेल्या लाल विटा आणि सिमेंट ह्यांचा वापर होऊ लागला. छोट्या लाल भुसभुशीत गुळगुळीत विटा महाराष्ट्रात आणि भल्यामोठ्या सच्छिद्र लाल विटा कोकणात, तरी देखील त्यांना जोडणारा दुवा म्हणजे सिमेंट.

पण ह्या छोट्या छोट्या लाल विटा वापरून भलं मोठं बांधकाम करण्यासाठी वेळ दवडू लागला आणि अर्थातच प्रत्येक क्षेत्रात सातत्याने बदल होत असतोच त्या प्रमाणे आणि कदाचित विटांसाठी वापरलेली खास माती + सिमेंट हे समीकरण तेवढसं नीट नसेल, शिवाय विटांची भाजायची प्रक्रिया ह्यांना वेळ लागतो.   ह्या सर्व कारणांमुळे असेल सिमेंटच्या भल्यामोठ्या विटा फॅक्टरी मध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंचलित यंत्रणेने तय्यार होऊ लागल्या आणि वापरात देखील. फटाफट काम होऊ लागलं त्यामुळे, दिसायला, टिकायला, बांधायला थोडं सोप्प, पण तरी देखील विटा रचून झाल्यावर त्यावर सिमेंट चे थर देतातच, आधी जाडसर मग पातळ सिमेंटनी गुळगुळीत करून टाकतात भिंती आतून आणि बाहेरून देखील. म्हणजे त्या इमारतीला संपूर्ण संरक्षण मिळतं, आयुष्यभर आणि त्यानंतर देखील.

अगदी आपल्या जीवनातले सगळे आपले लोक तसे. जसे घरी आई वडील भाऊ बहिण आणि इतर नातेवाईक असतात, एकावर एक, एका बाजूला एक विटा रचल्यासारखे भक्कम सर्वांसाठी सदोदित उभे असतात, प्रत्येक व्यक्तीची इमारत कशी मजबूत उभी राहील ह्या साठी अथक प्रयत्न करतात, स्वतः ऊन वारा पाऊस ई. सहन करतात अगदी विटांसारखे, पण तरी देखील त्यावर मैत्रत्वाचा / मित्रपरिवाराचा सिमेंटचा थर असावा लागतो. ते थर कधी चढतात, कधी मजबूत इमारतीचे भाग होतात हे कळत देखील नाही. काही खास आणि घट्ट असतात तर काही पातळ आवरणासारखे, पण वेगळी उपमा, किंवा एक वेगळाच स्वाद, सुरक्षा ई. देऊन जातात. विटांना एकमेकांशी जोडण्यासाठी सिमेंट लागतं आणि त्यावरचा अत्यावश्यक असा थर देण्यास देखील. सर्वत्र मैत्री असू द्या, सर्व प्रकारची मैत्री करा, टिकवा, सिमेंटिंग शिवाय प्रत्येक इमारत अधुरीच हो, त्यामुळे फक्त माणसाशी माणसाप्रमाणे मैत्री करा, टिकवा, नात्यांचे नाव देण्याची किंवा त्याप्रमाणेच वागण्याची गरज नाही.

खरं - खोटं

आज आम्ही एका सुप्रसिद्ध भोजनालय, उपहारगृह, जलपानगृह अक्का रेस्टॉरंट मधे गेलो होतो, एक खास निमित्य होतं. हे रेस्टॉरंट एका जगप्रसिद्ध शेफ ने सुरु केलं आहे अनेक वर्षांपासून आणि त्याच्या खूप ठिकाणी शाखा आहेत. हि शाखा इतक्यातच सुरु झाली आहे. त्यामुळे जरा छोटी आहे, ह्या नवीन जागी प्रतिसाद नीट मिळाला कि मग मोठ्या प्रमाणात सुरु करणार असतील. असो. नेहेमी प्रमाणे पदार्थ उत्कृष्टच होते, एकंदरीत व्यवस्था चोख होती. पण शेवटी तो धंदाच, काही शाश्वती नाहीच. त्याच मुळे असेल किंवा एक संस्कार म्हणून / पद्धत म्हणून, दररोज सकाळ संध्याकाळ हात जोडायची सवय म्ह्णून असेल कदाचित त्या रेस्टॉरंट मधे छोटेखानी देवघर होतं भिंतीवर, अगदी दारातून शिरल्यावर दिसेल असं. त्या देवघराशेजारी एक नेहेमीची संस्कृती दर्शवणारी साधी पुठयावर काढलेली सरस्वती रांगोळी उभी केली होती, देवघराला प्लास्टिक च्या झेंडूच्या फुलांचा हार घातला होता, तो अगदी हुबेहूब खरा वाटत होता. म्हणजे बघा मंडळी, "त्या" देवाने आपल्याला खरं यश द्यायचं, खरे आशीर्वाद द्यायचे, खरी भरभराट द्यायची पण आपण मात्र हे असं खोटं अर्पण करायचं त्याला, रांगोळी एकदाची आणून उभी केलेली, हार एकदाच घातलेला ई. माझ्या तर आकलनाच्या बाहेरचं आहे सर्वच. "दोन हस्तक आणि एक मस्तक" बास इतकंच हवं हो त्याला, मनापासून काम करा, जमल्यास कोणालाही दुखावू नका, जमेल तेवढी गरजवंतांना मदत करा, पोचतं त्याला. आणि देवघर ठेवायचंच असेल तर त्याची निगा राखा, काही मिनिटं वेळ द्या, ताजी फुलं आणि हार घातले कि कसे देव गोजिरवाणे दिसतात आणि आपल्याला मनापासून समाधान मिळते ते वेगळच. अगदीच जर पाऊसपाण्यामुळे ताजी फुलं हार मिळाले नाही तर हा कृत्रिम फुलांचा हार घालण्यास हरकत नाही.   खरं द्या आणि खरं घ्या त्याच्याकडून, हजारो पटीत. "त्याच" देवाने / निसर्गाने ऋतू प्रमाणे वैविध्य रंगांची, सुवासाची, आकाराची, प्रकारची फुलं निर्माण केली आहेत, मग वाहा. ओरबाडू नका, पण हवी तेवढी नक्की अर्पण करा, त्याचं त्यालाच, मनोभावे. दररोज जमल्यास, नाहीतर एक दिवसाआड तरी छोटेखानी रांगोळी काढा आणि बघा तुमच्या मेंदूला अत्यावश्यक असं डोपामाइन तय्यार होतं आणि जगावेगळी ऊर्जा देऊन जातं, भरभरून अशी. चला तर मग खरं -खोटं ह्या भानगडीत न पडता लागा कामाला.

शनिवार, २१ मे, २०२२

तरुण सुपारी

कुटलेली सुपारी हि अनेक प्रकारांमधे उपलब्ध असते आणि मी ती दररोज सेवन करते, अर्थात सुपारी विरहीत जी मसाला सुपारी असते तीच. त्यात फक्त जेष्ठमध, सोपं, ओवा, धने डाळ ई. पदार्थ असतात. पचनाला मदत तर मिळतेच, पण पचन नीट होत असल्यामुळे वजन आटोक्यात राहते हा एक नवीन उपयोग मला दृष्टीस पडला ह्या सुपारीचा आणि त्यामुळे का कोणास ठाऊक अजून जोमाने आणि आनंदाने त्याचं सेवन होऊ लागलं. आज नवीन पुडा उघडला त्या सुपारीचा आणि न्याहारी तेव्हाच झाल्यामुळे थोडसं टाकलं तोंडात. आणि काय आश्चर्य, ती सुपारी इतकी ताजी आणि कुरकुरीत भासली मला, कि जी दोनेक दिवसात फूस होऊन जाते. हवेशी संपर्क आल्यामुळे असेल कदाचित, पण ती मजा येत नाही तीच सुपारी झाल्याची कारण सरदली जाते, मग कुठलाही ऋतू असो.

थोडासा विषय बदल करते आहे पण ते गरजेचंच आहे. चितळ्यांची जगप्रसिद्ध बाखरवाडी आधी अर्धा नाही तर एक किलोच्या पाकिटातच उपलब्ध होत असे. आणि आता मागे एकदा मी अनुकथेत लिहिल्याप्रमाणे ३ बाखरवाडी एका पाकिटात उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे उघडा, कुरकुरीत बाखरवाडीचा स्वाद चाखा आणि मज्जा करा. नाहीतर मोठं पाकीट म्हणजे फूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचं पॅकिंग तसं असतं त्यामुळे काही वेळा पूर्ती सुपारी किंवा वडी तरुण राहते. तेव्हा ह्या वाडी सारखी नवीन पॅक सुपारीसाठी आणा हि विनंती म्हणजे तरुण सुपारी चाखत, वजन आटोक्यात ठेवणं स्वःत तरुण राहण्याचा आनंद उपभोगता येईल.  

शुक्रवार, २० मे, २०२२

पूर्णाहुती

हा एक फारच मोठा, आदरणीय असा, उच्च विद्याविभूषित, साधू-संत, सन्माननीय आध्यात्मिक गुरुंनी च वापरावा असा आहे. मला खरं तर अजिबातच अधिकार नाही, पण का कुणास ठाऊक ह्या कलियुगात काल पासून खूप काही खुणावून गेला, प्रचंड समाधान देऊन गेला आणि त्यामुळे माझा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली ती वेगळीच. अर्थात खूपच पिटुकली गोष्ट घडली आणि कोणीतरी काय बहुतांशी सगळेच जण माझ्या ह्या सगळ्या लिखाणांना फक्त एक डायरी / रोजची डायरी इतकाच दर्जा देतात ते का? हे देखील अनुभवलं मी. कारण हे जे मी आता नमूद करणार आहे तो माझ्या डोळ्यादेखत घडलेला छोटेखानी प्रसंग आहे, माझ्या घरी, माझ्या लेकी सोबत असा. आणि केवळ हे माझ्या लेकीला नाही तर सर्व तरुण पिढीला साजेसा आहे, त्यांच्या आई वडिलांना समाधानपूर्वक आणि बिनधास्त पणे "आज" अनुभवता येण्याचे कारण देणारा असा आहे. अर्थात हि माझी पद्धत झाली ह्याच्या कडे बघायची.

तर त्याचं असं झालं सध्याच्या आंब्याच्या मोसमात, रसाची प्रचंड आवड, भरभरून वर्षातले हे काही खास दिवस अनुभवायची ओढ, ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे माझ्या लेकीने अथ पासून इती पर्यंत अत्यानंदाने, आवडीने केलेला रस. ती अगदी मनापासून पेटीतले आधी मस्त सुगंधाने ओतप्रोत असे आंबे निवडते, स्वच्छ धुवून घेऊन, चिरून, फोडी करून, कोयी धुवून, साग्रसंगीत पद्धतीने फक्त रस करत नाही तर आधी शिस्तीत जुने वर्तमान पत्र घेऊन, लागणारे भांडे तय्यार ठेवून, रस झाल्यावर सगळं पुसून धुवून जागच्या जागी ठेवणार देखील. हे सगळं करतांना एक तर माझ्याशी पोटभर गप्पा, नाहीतर गप्पा आणि गाणी ई. पण चालू बरं का मंडळी. मग येथेच्छ फस्त करायचा तो रस, बास. त्या आंब्या व्यतिरिक्त हिच्या आवडीचा स्वाद जास्त येतो आम्हाला तो रस चाखतांना मंडळी. असो.

ह्या तिच्या आवडीकडे काल सहज मला वेगळ्या पद्धतीने बघता आलं, अचानक.

ह्या तिच्या एकंदरीत लयबद्ध आणि शिस्तीमुळे मला नक्की खात्री पटली कि माझी लेक नोकरी / व्यवसाय करायला लागल्या नंतर हातात मिळालेलं काम व्यवस्थित पूर्णत्वास नेणार हे नक्की, आणि ते देखील अगदी आवडीने. पहिल्यादा करत असेल एखादं काम तरी मन लावून शिकेल आणि पूर्ण करेल, हे दिसतंय मला माझ्या चार डोळ्यांनी. आता शंकेला अजिबात स्थान नाहीच माझ्या मनात तिच्या भविष्याबद्दल. खात्री पटली मस्त अनेकदा. त्यामुळे आता मी "आज" आनंदाने जगायला मोकळी, उद्याची अनावश्यक पालक म्हणून चिंता नकोच. हे असं मला जाणवलं हि देखील एक प्रकारची फार मोठी कृपाच हो "त्याची". मला इतकी मस्त शांतता अनुभवायला दिल्याबद्दल शतशः धन्यवाद आणि संपूर्ण नतमस्तक "त्याच्या" समोर पुन्हा एकदा.

पूर्णाहुती म्हणजे तरी काय, तर एखाद्या उद्देशाने केलेला संकल्प, त्या करता केलेले होम-हवन / पूजा जी निर्विघ्नपणे पूर्णत्वास गेली. अगदी तस्सेच, न मागता पदरात पडलेलं रत्न आहे माझी लेक माझ्यासाठी. मला जशी सद्बुद्धी मिळाली तसे तिचे संगोपन घडले माझ्या मार्फत आणि त्या संपूर्ण तपश्चर्येचे प्रत्यंतर आता हळुवारपणे दृष्टीत येत आहे. अध्यात्मिक गुरूंसारखी निश्चितच हि पूर्णाहुती नाही, पण माझ्यासारख्या सामान्य आईला तेवढीच महत्वाची आहे, कारण मुलांनी आपल्या डोळ्यादेखत स्थिरस्थावर व्हावं हि इच्छा असतेच, त्या करता तर सगळी जिवाची सदोदित धडपड सुरूच राहते.

This entire process of making aamras - mango milk shake was a visible good quality, this will surely reflect in her professional career too. Amen. 

पगडी ते टोपी

पंजाबी पगडी किंवा महाराष्ट्रीयन फेटा हि एक शान आहे, त्याचा एक मान आहे आणि ते बांधणं हि एक कलाच आहे, माझ्या दृष्टीने. १६-१७ वर्षांपूर्वी पगडी बांधायचे नियम मी ऐकलेले, अनुभवलेले ते वेगळेच होते आणि आता फार शिथिल झाले आहेत असं जाणवतं. हा बदल बऱ्याच कारणांमुळे घडला असेल, एक तर ती पडगी सांभाळणं एकंदरीत वेळ खाऊ प्रकार. ते खूप शांतपणे करण्याचं काम आहे आणि त्यात रस पाहिजे. सध्या कोणालाच वेळ नाही आणि तेवढं मोठं कापड सांभाळणं, दुसऱ्याला बांधून देणं / घेणं अवघड आहे, विभक्त कुटुंब पद्धतीमधे. सध्या पगडीची जागा टोपीने घेतली आहे. इलॅस्टिक कापडापासून तय्यार केलेली टोपी. ती घालायला काढायला अगदी सोप्पी, दुसऱ्यावर विसंबून राहायला नकोच आणि सांभाळायला फार सहज. तशीच टोपी सगळे बहुतांशी तरुण, विद्यार्थी, वसतिगृहात राहणारे ई. वापरतांना दिसतात आजकाल. टोपी घातली आहे, पडगी च्या ऐवजी पण केस कापले नाहीत, हे हि नसे थोडके, असं म्हणायला हरकत नाहीच. टोपी हा सहज साध्य उपाय असला तरी ती पगडीची शान टोपीत नाहीच. तो रुबाब कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. पण "कालाय तस्मै नमः", प्रवाह पतित होणं फार आवश्यक आहे सध्याच्या काळात. इच्छा असून देखील सगळं साध्य होत नाही सर्वांना. पगडी / फेटा ह्या मुळे होणारे फायदे, केस न कापणे हि रीत, ते लहानपणीपासून झालेले संस्कार, पिटुकल्या पगडी तस्सम पासून झालेली सुरवात ई. एका बाजूला आणि आजकाल उगाचच फॅड म्हणून केस वाढवणारे तरुण किंवा कुठल्याही वयातली माणसं हे दुसऱ्या. वाढवलेले केस शोभून दिसत आहेत नाहीत, काही घेणं देणं नसतं त्यांना. एखाद्या कलाकाराने त्याच्या कलेच्या साधनेकडे संपूर्ण लक्ष दिल्यामुळे वाढलेले केस हे वेगळं, पण उगाचच नको.   

पुण्यात किंवा महाराष्ट्रात तय्यार फेटा विकत मिळतो, तशी पगडी पण उपलब्ध असेल ना बाजारात, मग शोधा. तो कदाचित जास्त चांगला पर्याय ठरेल टोपी शिवाय, असं मला वाटतं.

मी असंख्य जणांना पगडी ते टोपी असा बदल आत्मसात करतांना बघितले आहे गेले अनेक वर्ष. पण एक विनंती आहे, जेव्हा जमेल तेव्हा पगडी किंवा फेटा आपल्या आप्तस्वकियांकडून बांधून घ्याच.  मला अनुभव नाही पण पगडी बांधणं किंवा फेटा हा एक सुंदर पर्याय आहे आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्याचा.
असा उत्कृष्ट "क्वालिटी टाईम" एकमेकांच्या सानिध्यात घालवण्याची संधी कदापि दवडू नकाच. तो एकत्र उत्तम वेळ, ती स्पंदन, त्या गप्पा (कदाचित शब्देविण संवादू) अनुभवा, साठवून ठेवा आणि अश्या उत्तम आठवणीत रममाण व्हा नेहेमीच. कुठलंही नातं असो ती बांधण्याकरीता लागणार बराच वेळ हा काही महत्वाच्या संभाषणासाठी उपयोगी पडत असावा नक्की. अर्थात तेव्हा आधीच्या काळी / सोसिअल मिडिया यायच्या आधी दोघे (mom dad, husband wife etc) कामाला जात नव्हते, शांतात होती, ई.

पण आता काळ बदलला आहे त्यामुळे ह्या सगळ्या सोई : पगडी ऐवजी टोपी.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...