बहरणं, उस्फुर्त बहार येणं, जगावेगळं फुलणं ई. म्हणजे गुलमोहोर, माझ्यासाठी. "भरभरून जगणे" ह्याची व्याख्या काय? असा जर कोणी प्रश्न मला विचारला तर माझ्या कडे एका शब्दात सांगण्यासारखे उत्तर आहे. गुलमोहोराची फुलं, त्याचा तो वृक्ष, रंगछटा, असंख्य भरपूर केशरी रंगात इकडे तिकडे कुठेतरी दिसणारा हिरवा रंग, उंच आणि रुंद - विस्तीर्ण अशा शाखा, अनेक दिवस टिकणारी फुलं, जमिनीवर मुळांशी पडलेला सडा जशी कि उत्कृष्ट रांगोळीच .... काही विचारूच नका, लिहावं तेवढं, बघावं तेवढं कमीच आहे. जेथे जेथे नजर जाते तेथे तेथे गुलमोहोर दिसतोच. अश्या वर्णनाची झाडेच दृष्टिस पडतात, ऑफिस ला जाता येता किंवा कुठेही बाहेर पडलं तर सातत्याने, अर्थात खिडकीच्या बाहेर लक्ष दिलं तर, बाहेरचा नजारा उपभोगला तरच.
माझ्या चार डोळयांना काही दिवसांपासून एक वेगळं दृश्य दिसतंय आणि मला खात्री नव्हती, विश्वास बसत नव्हता माझ्याच डोळ्यांवर पण आज अगदी आवर्जून बघितलं आणि मग म्हटलं काढावी दौत आणि टिपायला करावी सुरवात. तर त्याचं असं झालं कि गेले अनेक दिवस माझ्या ऑफीसा च्या रस्त्यावर एक गुलमोहोराचंच झाड आहे, भलं मोठं बरं का, पण त्याला फुलं अगदी थोडी मात्र पानांनी बहरलेलं असं ते. अहाहा च. गुलमोहोर म्हणजे बहर, हे समीकरण शाबूत ठेवून देखील आपलं वेगळेपण जपणारं असं भन्नाट उदाहरण, वेगळ्याच कुळातलं. हे असं कसं झालं असेल? हायब्रीड जात असेल का? का कुणी प्रयोग म्हणून लावलं असेल? का गुलमोहोरात वेगवेगळे प्रकार असतात? खूप खूप प्रश्न पडले होते मला पण मग ते विहंगम दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं, कुठलेही प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत आणि जमेल तेवढं डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्यातून एक लक्षात आलं कि गेले अनेक वर्ष मी माझ्या प्रत्येक विद्यार्थी आणि बॅचला सातत्याने एक गोष्ट सांगतं आले आहे ती हि कि तुमच्या कडे चॉईस आहे फक्त इंजिनिअर होऊन भल्यामोठ्या रांगेत उभं राहायचं, नोकरी मागायची का इंजिनिअर होता होता आपला एक वेगळा ठसा उमटवायचा? प्रयत्न केलं तर सहज शक्य आहे, ह्या झाडाने जसं वेगळेपण जपलयं अगदी तस्स, गुलमोहोराचं पण मस्त हटके. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने धडपड केली तर इंजिनिअर पण मस्त हटके असं होता येईल, कंपन्या तुम्हाला प्राध्यान देतील आणि जगावेगळं समाधान मिळेल ते वेगळचं, नाही का?. मग लागा कामाला झट की पट, आत्ताच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा