एखाद वर्षाचं बाळ झालं कि त्याला पाय फुटतात आणि त्या दरम्यान प्रकर्षाने पायात छुमछुम, तांब्याचे वळ घालतात आणि शिवाय वॉकर ची मदत घेतात. बारश्यातच गुंतवणूक म्हणून, दागिना म्हणून किंवा उपयोगी म्हणून पायात छुमछुम किंवा वळे घातले जातातच किंवा काही जण नंतर घालतात, त्या बाळाच्या हालचालींचा मागमूस कळावा / लागावा म्हणून. वॉकर दोन प्रकारचे मी अनुभवले आहेत, सजीव आणि निर्जीव. म्हणजे ज्यांच्या घरी आजी-आजोबा किंवा इतर मंडळी आहेत आणि ते अगदी कौतुकाने त्या बाळाला चालायला मदत करतात, प्रोत्साहन देतात. काही फक्त पांगुळ गाड्याची ओळख करून देतात त्या बाळाला आणि तो / ती फिरते घरभर, अर्थातच मोठ्यांच्या देखरेखी खाली. मला त्या बाळाला पाहून तरी असं वाटतं कि त्या बिचाऱ्याला बांधलंय त्यात, कधी कधी जबरदस्ती. आणि त्याला त्यातून स्वतः बाहेर पडता पण येत नाही सहजी. आज ह्याची का आठवण झाली म्हणताय? सध्या हायब्रीड मोड मधे शिकवणं सुरु आहे माझं, त्यामुळे काही विद्यार्थी वर्गात हजर आहेत आणि काही ऑनलाईन घरी. त्यामुळे मी वर्गात जाते, संगणक समोर ठेवते आणि वर्ग घेते / शिकवते. त्यामुळे मला संगणका समोरून हालता येतच नाही, हालले कि घरच्यांना म्हणजे विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन जॉईन झाले आहेत त्यांना ऐकू येत नाही, मी दिसत नाही, त्यामुळे मला ह्या वयात पांगुळ गाड्यात बसल्याची जाणीव होते आहे, बांधिलकी असल्यासारखी. लहानपणी त्या पांगुळगाड्यात बसून / उभं राहून काय झालं होत माझं कोणास ठाऊक पण हे हायब्रीड वर्ग सुरु झाल्यापासून मी खूप एन्जॉय करते आहे पांगुळगाड्याची / तत्सम अनुभूती ह्या वयात, अहाहा. "असे दिवस येति आणि स्मृती ठेवुनी जाती". आता मला खरंच वाटतंय कि एकतर अशी गाडी असावी ज्यात पुढे माझा संगणक, मी बसलेली आणि शिवाय सर्व वर्गात फिरता येतंय = आधुनिक पांगुळगाडा मोठ्यांचा. किंवा बाळ कडेवर घ्यायची मोडलेली सवय पुन्हा करून घ्यावी लागेल आणि चार्जे लॅपटॉप हातात घेऊन फिरून बघायला हरकत नाही वर्गात, जपून, न धडपडता. दोन्ही अशक्य पर्याय आहेत. पण असो. गोळाबेरीज म्हणजे सजीव विद्यार्थी दिसत आहेत डोळ्यासमोर, समृद्ध झालेली डोळ्यांची भाषा अनुभवता येते आहे, तो कलकलाट, तो उत्साह, ती तरुणाई ई. सगळं पुन्हा नव्याने अनुभवता येतं आहे.
गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२
बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२
माझा प्रवास फियाट - जीप ते क्रेटा
अगदी समजायला लागल्यापासून मी अनेक प्रकारच्या चारचाकीतून प्रवास केला आहे, आकाशाला गवसणी घातली आहे, पळती झाडे अनुभवली आहेत. कारण फार सोप्प, माझ्या वडिलांचा हुद्दा मोठा होता आणि त्यांना दौऱ्यावर जावं लागत असे अनेक वेळा त्यामुळे अनेक गाड्या त्यांना वापरण्या करता देण्यात आल्या होत्या. मी पांढरा छोटा हत्ती त्यावेळी, त्यामुळे सगळेच ड्राइव्हर-काका लाड करायचे, दररोज अगदी न चुकता, कित्तीही थकलेले असले तरी, कितिही प्रवास करून आले असले तरी मला चक्कर मिळायचीच, अलिखित नियम होता ना. ते मी इतकं म्हणजे इतकं पोटभर एन्जॉय करायची कि ज्याचं नाव ते. आणि सलग अनेक वर्ष हो. त्या सगळ्या विविध आकाराच्या, प्रकारच्या जीप होत्या बिना दाराच्या. मग आली फियाट, उलट्या बाजूने दार उघडतं असे, पिटुकली कार ती. त्यानंतर फारच मनापासून मी आंब्यास्याडर नावाची भली मोठी कार उपभोगली. राजेशाहीच थाट होता तिचा त्यावेळी. त्यानंतर अमेरिकेतल्या गाड्या छोट्या, मोठ्या, तिथल्या जीप, अगदी काही मिनिटांकरता बस कम बोट ई. सगळं म्हणजे सगळं चालवलं आणि फारच गट्टी जमली माझी हवेशी, रस्त्यांशी, आकाशाशी, बर्फाशी सुद्धा, काय विचारता. पुन्हा भारतात परत आल्यावर सँट्रो, पॅलिओ, जॅझ असा केला प्रवास आणि काल बसले नव्या कोऱ्या करकरीत क्रेटात. त्याचे सीट चे प्लास्टिक पण अजून तस्सेच आहेत, इतकी नवीन हो ती. तिचा नव्याचा सुगंध, अहाहा, शब्दात बांधणे म्हणजे गुन्हा च होईल हो. क्रेटात तब्बल २० मिनिटे चक्कर, ते देखील एका दिवसात दोन्ही वेळा, काय पर्वणी होती म्हणून सांगते. पोटातलं पाणी देखील हाललं नाही हो. अर्थात त्याच श्रेय माझी विद्यार्थिनी च्या ड्राइविंग कौशल्याला पण जात. अशी चिकणी गाडी असल्यावर आपोआपच भन्नाट ड्राइविंग होणार ह्यात शंकाच नाही. म्हणजे मला एक तर त्या नशेत समजलंच नाही कि आम्ही कधी पोचलो ठिकाणावर आणि शिवाय रोज येतो-जातो त्याच रस्त्यावर चालतोय हे फार अवघड होत अकॅसेप्ट करणं. जे जे माझ्या सोबत आहेत ना अगदी माझ्या वडिलांच्या वेळेपासून त्यांनी त्यांनी माझी चक्कर ची आवड हेरली आणि नेहेमी वैविध्य गाड्या चा अनुभव दिलाच. त्यानंतर मी पण मनापासून चालवणं इतकं शिकले कि मी स्वतः आणि त्यामुळे माझी गाडी दोघीही मस्ती खूप करतो. हे सगळं एका कडेला चालू असतांना दुचाकी पण पोटभर आणि भन्नाट वेगाने चालवल्या त्या देखील वैविध्य प्रकारच्या. असा हा अगदी लहानपणी सुरु झालेला रास्ता, हवा, ढग ह्यांच्याशी संवादाचा प्रवास आज तागायत अविरत सुरु आहे आणि सुरु राहील देखील. मी, माझ्या सोबतच्या प्रवाशांनी आणि अर्थात त्या सगळ्या वाहनांनी इतकं प्रचंड एन्जॉय केलं त्यामुळे इतकी वर्ष हि मैत्री कायम राहिली, टिकली. चला तर मग, आपआपले सगळे उपभोगलेले प्रवास आठवू या आणि पुन्हा त्या केलेल्या सफारी वर निघुयात.
काचेचं महत्त्व
माझ्या घरी दिवाणखान्यात एक टीव्ही युनिट होतं. टीव्ही च्या आजुबाजुला शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी कपाटं केली होती आणि त्यांना काचेची दारं होती. माझी टीव्ही बघतांना किंवा कोणी आलं तरी देखील हॉल मधे बसण्याची जागा ठरलेली, अगदी त्या काचेच्या दारासमोर. का म्हणताय? अहो सोप्प आहे, त्या काचेमुळे मला मागे / माझ्या पाठी मागे काय चाललंय ते स्पष्ट दिसत असे मान न वळवता. माझी मुलं तेव्हा खूप लहान होती, त्यांना इतकं आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीच, कि आपली आई म्हणजे लई भारी, तिला मागे पण कदाचित डोळे आहेत किंवा, काही तरी जादू आहे. मी खूप म्हणजे खूप ते दिवस एन्जॉय केले. त्यानंतर मी ऑफिस मधे शिकवायला लागले आणि जो वर्ग होता ती खरं तर एक लॅब होती, त्यातच शिकवणं आणि लॅब देखील चालायची. लॅब असल्यामुळे मागे एक भली मोठी काच होती आणि त्या मागे काही जण बसत होते. मी शिकवतांना मला त्या काचेतून सगळं स्पष्ट दिसायचं कि विद्यार्थी वर्ग सुरु असतांना काय काय मस्ती करत आहेत, काही वेगळं बघत आहेत का स्क्रीन वर ई. आणि विद्यार्थ्यांना पण फारच आश्चर्य वाटायचं कि आमच्या जवळ देखील न येता ह्यांना समजतं कसं? खूप म्हणजे खूप मज्जा यायची.
काल अजुन एक गम्मत झाली. वर्ग सुरु होता. त्यात एक पंटर जो होता त्याला हा विषय फार व्यवस्थित माहित होता, त्याने ह्या आधी काम केलंय. त्यामुळे त्याने वेळेचा सदुपयोग करावा असा विचार केला असावा आणि वर्गात बसून काही तरी भलतंच सुरु केलं ना त्याने बघायला, त्याच्या संगणकावर. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला बसलेले बाकीची चष्मीश पंटर पण मग बघू लागले / किंबहुना त्यांची नजर गेली हो सहज संगणकाच्या स्क्रीन वर. मी ते हेरलं. त्यांनाही ते समजलं पण उमगलं नाही. त्यांची धडपड सुरु होती, थोडं स्क्रीन कडे आणि थोडं माझ्या कडे लक्ष. मग मी छोटासा ब्रेक घेतला आणि त्यांना माझ्या घरचा, लॅब चा आणि काचेचा किस्सा सांगितलं. मागे बसलेले दोन विद्यार्थी चष्मा घातलेले होते त्यामुळे त्यांच्या चष्म्यात मला सगळं दिसत होत, जागेवरुन न हालता कि काय गडबड चालली आहे. इतका हशा पिकाला.
त्या छोट्याश्या काचेमुळे कित्ती वैविध्य तरुणाशी जोडले गेले मी कायमची, पारदर्शी असण्याचा कित्ती फायदा होतो बघा स्वतःला आणि दुसऱ्यांना देखील / बघणाऱ्यांना / समोर उभं असणाऱ्यांना. पारदर्शी राहा, आणि पारदर्शकता टिकवा, नेहेमी.
मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२
काम नेमणे एक कला
कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची महत्वाची जबाबदारी म्हणजे दृष्टीपथात असलेलं / नसलेलं काम अचूक व्यक्ती शोधून त्याला सुपूर्त करणे. अर्थात योग्य व्यक्ती त्या कामासाठीच आहे ह्याची खातरजमा करून त्याला / तिला नेमणे. अनेक वर्षांच्या मेहेनतीतून, अनुभवाच्या शिदोरी मुळे हे वरिष्ठांना सहज जमतं. त्यात अजून एक गोम आहे मात्र. ज्याला नेमणार आहे त्याला / तिला किती काम द्यायचं हे देखील ठरवता आलं पाहिजे. ती व्यक्ती किती जुनी कर्मचारी आहे, अनुभव किती आहे, स्वभाव कसा आहे, आधीचं काम कसं पार पाडलंय ई. अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं. आता जे नोकरी करणारा वर्ग आहे आणि तो जर माझं हे लिहिलेलं वाक्य वाचत असेल तर म्हणेल कि काम पडलं अंगावर कि निभावता आलंच पाहिजे, नाहीतर सोडा नोकरी किंवा करू नका ई. हो पण तरी देखील मला असं वाटतं कि सर्वतोपरी विचार करून काम सोपवलं जातं. अगदी जसं घरी दररोज कुकर लावणे हो. जेव्हा पासून माझ्या आयुष्यात कुकर नावाचा प्रकार आला आहे तेव्हा पासून मी हेच बघत आले आहे कि कुकरची ठराविक भांडी असतात, एक खाली स्टॅन्ड असतो, ती भांडी एकावर एक लगोरी सारखी व्यवस्थित बसतात आणि त्या प्रत्येक भांड्यात जे शिजायला लावलंय ते ते वेगळं छान शिजून निघत, शिट्या झाल्या कि. अगदीच एखाद्या दिवशी कुकरचं डोकं खराब झालाच तर एकत्र होतं पण फार क्वचित. त्यात देखील कुकर लावणाऱ्याचीच घाई किंवा चूक असू शकते बऱ्याचदा हो. असो.
पण मी ३१ एक वर्षांपूर्वी एका लग्नासाठी दिल्ली ला गेले आणि मला नव्याने समजलं कुकर कसा लावायचा ते. त्यांच्याकडे ४-५ छोटेछोटे कुकर दिसले मला, सांस्कृतिक धक्का होता तो मला. ५ कुकर एका घरी आणि चालू स्थितीत, काय हे? मग समजलं कि डब्बे न वापरता डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देऊन आमटी, उसळ ई. टाकली जायची. अहो काही वर्षांनी कळत - नकळत माझ्या घरी पण हि परंपरा कधी सुरु झाली हे समजलंच नाही, छे छे, मी ५ कुकर विकत घेतले नाहीत पण थेट फोडणी आणि शिट्या हे अमलात आलं.
पण अहो असं जर प्रत्येक वेळी झालं / केलं तर गडबड होते ना, तो कुकर विचित्र रंगाचा व्हायला लागतो हळू हळू, कारण भारतीय फोडण्या म्हणजे रंग, हळदीचा, तिखटाचा ई. तेल त्यात पुरेश्या प्रमाणात. कुकर बरबटतोच नाही म्हटलं तरी, तसं त्याला पाहायची अजिबात सवय नाही ना मला म्हणून अजून विचित्र वाटत खरं. एकावर एक भांड्यांची लगोरी सुटसुटीत, दिसायला, शिजायला, सांभाळायला उत्तम. प्रवाह पतित होणं देखील आवश्यक आहेच म्हणावं. पण इतकं पण नक्को कि तो कुकर अगदी थोड्याच दिवसांचा पाहुणा ठरेल, नाही का?
वरिष्ठांनी देखील आधी कर्मचाऱ्याला थोडं काम द्यावं, मग लागोरीसारखे एक एक मजले चढवावे, ते मजले नीट चढण्यासाठी खाली स्टॅन्ड = भक्कम आधार देखील द्यावा म्हणजे कुकर सारखेच काम स्वच्छ होते, टिकते आणि नीट होते देखील. एकदम काम टाकलं अंगावर कि पसारा वाढतो आणि ते दृश्य विलोभनीय ठरत नाही मग. काम नेमणे हि कलाच नाही का, कस लागतो अगदी.
एक कुकर आणि त्याचा बदललेला वापर ह्या वरुन मला वरिष्ठ आणि त्यांनी सुपूर्त केलेलं काम ह्या बद्दल समानता सहज दृष्टीपथात पडली.
"गोड खायला मिळणार"
मंडळी आज मी पुन्हा एकदा माझ्या शालेय दिवसांची, मित्रमैत्रिणींसोबत व्यतीत केलेल्या सोनेरी क्षणाची सफर करून आले, पुन्हा एकदा, अहाहा. तुम्ही सर्वांनी पण हे अनुभवलं असेलच, एकदम दोघे एकच शब्द बोलले कि "आज गोड नक्की खायला मिळणार" असं काहीसं म्हणत असू. एकत्र बोलण्याचा आणि गोड खायला मिळण्याचा, त्या योग-योगाचा काय संबंध हे मला नाही ठाऊक, किंबहुना कोणालाच नसेल ठाऊक, पण पिढ्यांपिढ्या हे वाक्य वापरलं जात होत हे निश्चित.
- आणि त्यात कित्येकदा खरंच खायला गोड मिळालं का?,
- काय मिळालं?
- आणि किती मिळालं?
- कोणाकडे मिळालं? कि
- स्वतः केलं? / विकत घेतलं? ई. कीस पडत आम्ही कोणीच बसलो नव्हतो आणि नाही देखील.
आज ह्या विषयाची आठवण का झाली? सांगते.
मी आणि श्रद्धाने (माझ्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीने) एकाच वेळेस एकच शब्द टाईप केला व्हाट्सऍप वर हो, तो इतका एकाच वेळी होता कि ताबडतोब एक तर आम्ही दोघी पहिल्यांदा पोटभर हसलो फोन करून कारण फोन कारण्याबद्दलच होता तो शब्द आणि मग अचानक लक्षात आलं कि आज नक्कीच तोंड गोड होणारच, आधुनिक पद्धतीने का होईना एकत्र एकच शब्द नकळत उच्चारला / वापरला गेला ना. प्रत्येक वेळी "का?" ह्याने काय होत? खरंच होत का? ह्यात काय अर्थ आहे? ई. किंवा अजून भरपूर प्रश्न विचारण्याच्या भानगडीत न पडता फक्त तो क्षण, ती परंपरा, हे अमुल्य हास्य, आणि गोड नक्की फक्त उपभोग, एन्जॉय करा पोटभर. त्यात तथ्य असो वा नसो, काय फरक पडतो. पंगतीत, पार्टीत, ठरवून आणि अपेक्षित / विकत घेऊन तर नेहेमीच गोड खातो आपण, एखाद वेळी अश्या मुळे मिळालेल्या गोडाचा आस्वाद घेऊ यात आणि स्मृती / आठवणींचा साठा वाढवू या, म्हणजे काही वर्षांनी हे वाचून किंवा मनात येऊन खुद्कन गालावर जे हसू फुटेल त्याला तोड नसेलच.
शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२
सगळ्यात ताज
एक आटपाट नगर आहे त्यात एक चौकोनी पण मोठं कुटुंब, तीन पिढ्या गुण्यागोविंदाने नांदतात एकत्र. त्यात काका काकू, त्यांची दोन मुलं, एक सुनबाई आणि आज्जेसासू देखील. त्यातल्या काकांनी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन, अगदी उच्च पदापर्यंत पोचेस्तोवर नोकरी केली, मानाने. अतिशय वेगळ्या पद्धतीचं, समाजपयोगी काम सातत्याने केलं, राबले आणि आव्हान पेलत संचालक पदावरून निवृत्ती घेतली. काल तो सेवानिवृत्ती चा कार्यक्रम होता, मोठ्या प्रमाणावर उभारला होता, कारण त्यांचं व्यक्तिमत्व, पद, प्रचंड केलेले काम आणि ओळखी ई. ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांच्या विषयी चार शब्द बोलण्याची सुवर्णसंधी फक्त एका व्यक्तीला लाभली. ती व्यक्ती कोण हा मंडळी विचार करून ठेवा हो.
काकांना सगळ्यात जास्त जर कोणी ओळखत असेल तर ती त्यांची आई, नाही का? मग क्रमाने बोलायचं झालं तर अर्धांगिनी, मुलं आणि सरते शेवटी अगदी नुकती घरात प्रवेश केलेली सून. सुनेला खरं तर काहीच काळ झालेला आहे कारण ती नवखी आहे त्या घरात, आणि शिवाय फक्त ऐकिव माहिती त्यांच्या कार्याची, किंवा संभाषणातून मिळालेली तेवढीच. आणि जरी आपण सध्या २०२२ मधे असलो तरी देखील उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात सून आणि सासऱ्यांच्या थोडा कमीच संपर्क येतो, फक्त कामापुरता. आणि बघा अश्या सुनेला मनोगत व्यक्त करायला सांगणं, देणं, आणि ते आव्हान यशश्वी रित्या पेलणं, निभावणं म्हणजे शब्दात मांडण्या पलिकडलेच आणि अप्रत्यक्ष तिच्या सर्वगुणसंपन्न होण्याची पावतीच, नाही का. अशी पावती मिळणं म्हणजे अहो भाग्यच, माझ्या दृष्टीने. ते मनोगत ऐकणाऱ्यांना पण कुतूहल नक्कीच वाटलं असेल ह्यात शंका नाहीच. आणि हो हे लिहितांना सहज ध्यानात आलं, त्या काकांच्या प्रत्यक्ष कुटुंबातील इतर सदस्य नाही तरी काकांचे भाऊ, बहिणी, आणि इतर मंडळी पण मोठ्या प्रमाणात असतीलच ना?. तरीही सुनेला हा मान मिळावा हा सर्व स्त्रीवर्गाचा सन्मान आहे आणि तो ह्या कुटुंबाने दिला. अहाहा. सोन्याहून पिवळे.
ह्या प्रसंगाबद्दल मी इतकं भरभरून लिहिते आहे कारण हि काकांची सून म्हणजे माझी एक संशोधन करणारी विद्यार्थिनी आणि सखी देखील. आमचं सहज ह्या बद्दल बोलणं झालं कारण दोन दिवस ती सुट्टी टाकणार होती. आणि हो त्या वरून मला माझा एक छोटासा प्रसंग आठवला, मला पण अचानक एक दिवस, एका क्षणी माझ्या सासऱ्यांच्या ७० / ७५ व्या वाढदिवसादिवशी बोलायला सांगितलं होतं. तय्यारी न करता बोलणं, सासऱ्यांसारख्या कुटुंब प्रमुखाबद्दल बोलणं, सुनेने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे किती कंगोरे टिपलेत ह्याची परीक्षाच जणू, अवघडच असतं, हे तेव्हा समजलं मला.
एकंदरीतच प्रत्येक मुलीला एक निरीक्षण करण्याची, चांगल्या गोष्टी व्यक्तिमत्वातल्या टिपून ठेवण्याची, न सांगता समजण्याची, गोड आणि शिस्तीत बोलण्याची, मोठ्यांशी अदबीने वागण्याची कला असतेच. त्याचमुळे ह्या सुनेची निवड झाली ह्याची खात्री आहे मला, मी ओळखते ना तिला गेली २ वर्ष.
काकांना त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल माझ्याकडून शुभेच्छा, आणि सेवा निवृत्तीपर्यंत इतकी वर्ष सातत्याने ऊर्जेच्या महत्वपूर्ण क्षेत्रात योगदान दिल्यामुळे अभिनंदन. ज्या कुटुंबात सुनेला इतका मानसन्मान मिळतो अश्या सर्वांना मला नक्कीच भेटायला आवडेल लवकरच.
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मैत्र्य
स्पर्श हा फक्त एक भल्यामोठ्या शब्दकोशाचाच भाग नाही तर वैविध्य प्रकारे तो अनुभवून वृद्धिंगत होण्यासाठी आहे. तो प्रत्यक्ष असो व अप्रत्यक्ष, सजीव का निर्जीव व्यक्ती, प्रसंग किंवा वस्तूंमुळे अनुभवता आलेला असो. एखाद्याचा फक्त आवाज मनाला भिडतो, सहज वाऱ्याची झुळूक एक वेगळाच स्पर्श देऊन जाते, अगदी कधी काटे येतात अंगावर, झाडावर आनंदाने डोलणाऱ्या आंब्याच्या मोहोराचा जगावेगळा सुगंध देखील वेगळ्या पद्धतीचा स्पर्श देऊन जातो. अकाली जन्मलेल्या बाळांना जशी कांगारू उपचार पद्धत सुचवली जाते, ते स्पर्शाची महती जाणूनच ना.
मला दोन प्रकारची माणसं असतात हे जेव्हा ज्ञात झालं तेव्हा का कुणास ठाऊक पण स्पर्शाबद्दल थोडसं जास्त उमगलं. एक प्रकार म्हणजे जो समोरच्याचा, मित्राचा, मैत्रिणीचा, घरच्यांचा, थोडक्यात म्हणजे आपल्या लोकांचा चेहेरा सहज वाचतो आणि उगाच प्रश्न विचारून भंडावून न टाकता कृती करतो आणि दुसरा कृती न करता प्रश्न विचारण्यास प्राधान्य देतो. समोरच्याकडे बघून थोडक्यात लक्षात आलं कि काही तरी गडबड आहे आणि जो हात हातात घेतो, पाठीवर एक छोटीशी थाप देतो, पाठीवरून हात फिरवतो, जादू की झप्पी देतो त्याचा प्रचंड फायदा होतो आणि परिणाम दिसतो - टिकतो देखील. अगदी तसेच आवाजाचे देखील आहे, समोर व्यक्ती नसेल तर आवाज ऐकल्यावर देखील अंदाज येतो आणि मग काही गोड बोल, प्रेमाने गुंफलेले चार शब्द, काही आठवणी, उत्साह वाढवणारं एखादं वाक्य देखील पुरेसं ठरत.
कोणी तुमच्या पुढ्यात प्रत्यक्ष असतं आधार द्यायला बऱ्याच वेळा तर कोणाचा आवाज फक्त उपलब्ध असतो (दूर देशात असलेले मित्र), काही डोळ्याने जाणीव करून देतात आणि काही एक्सप्रेस करत नाहीत पण माहित असतं कि ते आहेत, किंवा काही कधी प्रत्यक्ष / फोन वर आणि हवे तेव्हा हजर असतात. अश्या वैविध्यतेने नटलेला आपला प्रवास असतो. कायम / शाश्वत आणि टिकाऊ असं काहीच नसतं तरी देखील आपण अपेक्षेवर जगतो कि हे सगळे आपले साथी आणि आपल्यासाठी नेहेमीकरता असणारच आहेत. प्रत्येकाला मात्र फक्त माणसाचीच गरज असते, कधी शारीरिक व्याधी म्हणून कधी मानसिक आधार हवा असतो तर कधी उगाच एखाद्याचा सहवास हवा असतो. पाषाण हृदयी फारच कमी असतात, अगदी बोटावर मोजण्या इतके किंवा काही नसतात खरं पण दिखावा करतात. मोकळे व्हा, स्वछंद जगा, स्वतः हवा तेव्हा मैत्रीचा आधार घ्या आणि दुसऱ्यांना द्या / उपलब्ध व्हा, मोजमाप न करता. आणि मग बघा "गिव्ह अँड टेक" ह्या म्हणीचा अर्थ काय आहे तो / किंबहुना हि म्हण जन्मालाच का आली ते.
वय झालयं
त्या काळी आणि वेळी मी फारच तरुण होते आणि तो देखील. अर्थात त्याला आधीचा अनुभव होता, म्हणजे माझ्या पेक्षा तो मोठा होता. दोघेही अल्लड वयात असल्यामुळे म्हणा का, सळसळत रक्त म्हणा, ध्येय गाठण्याची जिद्द, कामाचा डोंगर, विसावा हा माझ्या शब्दकोशात नसलेला शब्द आणि असंख्य अशी कारणं देता येतील. त्यामुळे तो कधी अवतारायचा हे मला आणि माझ्या आजूबाजूच्यांना कधी म्हणजे कधीच समजलं नाहीच. ना हि चेहेऱ्या वर कधी काही उमटलं, नाही चाल बदलली नाही अजून काही, अगदी नेहेमीचा दिवस जसा. अहो बाहेरच्यांना कशाला घरच्यांना आणि मला स्वतःला देखील कधी म्हणजे कधीच समजलं नाही त्याच आगमन आणि गमन कधी होत असे ते. पण आता त्याचं वय झालंय, त्याच्या वाढत्या वयानुसार तो फार अजीब वागायला लागलाय आणि त्यामुळे तो मला समजावून सांगण्याचा अथक प्रयत्न करतोय कि आता विसावा घ्या, थोडी गती कमी करा, ई. त्याचं वाढलेलं वय आता झळकायला लागलंय माझ्या न कळत.
तो आला तेव्हा जो उत्साहाचा झरा घेऊन आला होता आणि तो टिकला अनेक वर्ष / शतकं, त्यामुळे शंका पण शिवली नाही मनाला, असं वाटलं कि असंच असतं, नेहेमीच, त्यात बदल होतो हे माहित नव्हतंच आणि तो देखील इतका. अजूनही स्पष्ट आठवतं मला त्याच आगमन, ते सगळे बदल, आकार उकारात, विचार आणि आचारात, स्वप्नात आणि प्रत्यक्षात, अहाहा.
तो तरुण होता तेव्हा सळसळती गती होती, त्यामुळे तो हि आणि मी हि मोकळी होत असे झटपट, आता बिच्चारा थांबत / अडखळत चालतो हो, म्हातारपण फार अवघड, त्याला आणि त्यामुळे मला पण. आता अगदी अडनेड्या तरुण वयापासून त्याला जपलं, त्याच्या म्हातारपणी सोडणं बरोबर नाही ना, आणि सोडणे हा पर्याय पण नाही हो. त्यामुळे त्या म्हाताऱ्याला ओंजारात गोंजारत पुढे चालणं आवश्यक आहे. बिच्चारा. असो, सगळेच टप्पे जगायचे, बिनधास्त, नेहेमीच, बदलेल्या चालींसगट गाडी चालवतांना जसे गियर बदलतो अगदी तस्से.
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२
अंगठ्यांचा राजा
अंगठी हा एक छोट्या आकाराचा आणि वजनाचा पण फार महत्वपूर्ण जगभर घातला जाणारा दागिना आहे. अवाक करणाऱ्या किमतीची पण अंगठी असेल अस्तित्वात पण मी त्या पासून अनभिन्न आहे, आणि ते फार बरं आहे, एका दृष्टीने. मुलींचा खास मित्र म्हणायला हरकत नाही, म्हणजे अहो फक्त अंगठीच नाही तर एकंदरीत दागिने हो. मुलं देखील घालतात, पण ठराविक प्रमाणात, आवश्यकतेनुसार, आवडीनुसार आणि थोडक्यात. असतात काही अवलिया ज्यांना प्रचंड आवड किंवा दिखावा म्हणून दागिने / अंगठ्या परिधान करायला आवडतात.
अंगठ्या दोन प्रकारच्या घातलेल्या बघितल्या आहेत मी, बहुतांशी भारतात ग्रह तारे ई. शी निगडित, विविध धातूंच्या, आणि सहज फक्त फॅशन म्हणून घातलेल्या ई. बाहेर देशात सुद्धा ग्रह तारे ह्यांच्या अंगठ्या मिळतात पण त्या फारच कमी प्रमाणात भारतासारख्या उपयोगात येतात, तेथे कदाचित खड्यांचा रंग, आकार आणि वैविध्यता म्ह्णून फक्त अश्या अंगठ्या घालत असतील. असो.
२०२२ मधे जी नवीन विद्यार्थ्यांची पिढी आहे, जी संगणक किंवा "कृत्रिम बुद्धिमत्ता" पिढी असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही अश्या पिढीतली मुलं, मुली नाही बरं का, ग्रह तारे ई. वर विश्वास ठेवत असतील? मला तरी अशक्यच वाटत, दुरून बघितल्यावर आणि एकंदरीत ऐकून / वाचून आणि काही त्यांच्या वयातल्या मुलांबरोबर राहून वाटत तर नाही कि त्यांना एकतर ह्या सगळ्यांवर विश्वास असेल आणि ते गुरुजी / पत्रिका ई. वर भरोसा ठेवतील, चर्चा करतील, छे छे. अशक्यच. पण आज माझ्या चार डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं काही तरी झालं. अनेक दिवसांपासून मी बघत होते, पण ओझरती. आज खात्री पटली. एक तरुण मुलगा आहे, असेल १९-२० वर्षाचा. हातांच्या दाही बोटांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे त्याने. दाही बोटात अंगठ्या आहेत त्याच्या. मग तुम्ही मला म्हणाल त्यात काय मोठंसं? असेल बड्या घरचा, पैसा असेल, त्याची बोटं, त्याच्या अंगठ्या, तुला काय करायचं आहे? अगदी बरोबर. त्याने जर फॅशन म्हणून वेगवेगळ्या डिझाईन च्या अंगठ्या घातल्या असत्या, बदलत राहिला असता रोज किंवा जमेल तेव्हा तर मला काही म्हणजे काही वाटलं नसतं, पण त्याच्या सगळ्या अंगठ्या ग्रह-ताऱ्यांच्या आहेत हो, भल्यामोठ्या आकाराच्या आणि साध्या. मला ३-इडियट ह्या चित्रपटाची आठवण झाली आणि थोडसं / किंचित आश्चर्य वाटलं. असो. तो ज्या कारणांसाठी त्या अंगठ्या घालतो आहे त्या सगळ्या लवकरच पूर्ण होऊ देत म्हणजे मिळवलं.
कधी नव्हे ते
सहज लक्ष गेलं माझं आणि जातंच राहील कारण फक्त एका मैत्रिणी मधे मला जाणवतील असे बदल दिसले, सतत आणि फारच वेगळे अगदी टोकाचे, अनपेक्षित असे. आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच राहिला अगदी न कळत कारण त्यानंतर अश्या अनेक जणी डोळ्यासमोर उभ्या राहत गेल्या. छोटेखानी भागातून येऊन, भरपूर शिक्षण आणि प्रचंड कामाचा अनुभव घेता घेता संसाराचं गाड पण चालू होत. सगळं म्हणजे सगळं अत्योत्तम पद्धतीने हाताळणं सुरु होतं, मुलं मोठी होत होती, अगदी साध्या नेहेमीच्या घरात असतं तस्सच. कधी म्हणजे कधी पँट घालणं, फ्रॉक घालणं आणि त्या सॊबत आपसूकच येणारी फॅशन हि खिजगणतीतच नव्हती हो त्यांच्या, विचार देखील शिवला नव्हता. आणि आता तर भुमिका पण बदलल्या होत्या, हक्काचं आई वडिलांचं घर नव्हतं प्रयोग करायला तरी देखील अचानक सुरवात झाली आधुनिक कपडे, दागिने, आणि इतर गोष्टी घालायला आणि थोडसं वागणं पण काही अंशी बदलले. अर्थात फारच वेलकमिंग बदल आहे, प्रवाह पतित होणं अत्यावश्यक आहेच, आणि एक नाही दोन नाही पण अनेक असंख्य सर्वत्र दिसू लागल्या आहेत. जेव्हा मी हे सगळं मनातलं उत्कृष्ट रित्या, पटेल, समजेल अश्या पद्धतीने माझ्या लेकी समोर मांडलं तर कन्यका म्हणते कशी, ममा, आधी पण हे सगळं होत होतं पण कदाचित फक्त मुलं ते करत होते, मुली नाही आणि ते दिसून येत नव्हतं किंवा दाखवलं जात नव्हतं, आता राजरोजशपणे होतंय, आणि त्यात काही वावगं नाही, कारण हे त्यांचं आयुष्य आहे, त्यांना त्यांच्या मर्यादा माहित आहेत आणि गेले ते दिवस संपूर्णपणे. बदल हाच तर स्थिर असतो ना, तूच सांगतेस नेहेमी. दबून न राहता, आपल्याला आवडेल ते, शोभेल ते आणि आनंद देईल ते करायला काय हरकत आहे, फक्त मुलानांच मुभा का? कुठे लिहिलं आहे? आणि आता चष्मा अगदी लहान बाळांपासून लागतो, पाळी काही वर्ष आधी सुरु होते, लवकर निवृत्ती पण घेतली जाते, कानाचं मशीन फार आधी लागतंय, घर लवकर विकत घेतलं जातंय मग फार वय झाल्यावरच जगून घ्यायचं असं नाही, त्याच पण वय थोडं आधी सरकलंय आता असं उघड दिसतंय. सोईनुसार, गरजेनुसार आणि मनःस्वास्थ्या करता आवश्यक ते करत राहा आनंदाने. "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे"....
कवाडं
माझ्या स्वतःच्या पहिल्या वहिल्या घरी सुरवातीला वॉशिंग मशीन आणि मिक्रोवेव्ह बसवण्यासाठी जो व्यक्ती आला होता त्याने अगदी ओझरतं सांगितलेलं मला आठवतंय. दोन्ही मशीन्स म्हणे वापरून झाली कि दार उघडच ठेवावं किलकिलं, घट्ट बंद करू नये. का कुणास ठाऊक पण पटलं होत मला ते तेव्हा आणि मी "पडत्या फळाची आज्ञा" जशी तस्सेच करायला सुरवात केली / किंबहुना घडलं ते माझ्या हातून अगदी सहज नियम असल्यासारखं. त्यानंतर पुन्हा एकदा काही कारणासाठी नवीन एक तांत्रिक माणूस आला आणि मशीन बघून म्हणतो कसा, छान सांभाळलं हो, वास नाही, ओलावा/ आर्द्रता / दमटपणा ई. काहीच साठलेलं दिसत नाहीच, अगदी कोर करकरीत आणि ठणठणीत. कमाल आहे. कसं साध्य केलंत? मला फारच आश्चर्य वाटलं कि एवढ्या छोट्याश्या कृतीचा परिणाम असा दृश्य असतो? क्या बात है. शाब्बास.
त्यांनतर आजकालच्या फ्लॅट मधल्या छोट्या इकडे तिकडे दिलेल्या बाथरूम ची पण थोड्याफार प्रमाणात तीच कथा. आंघोळ पांघोळ आटपली कि जर अगदी घट्ट दरवाजे दडपून घेतले तर काही महिन्यात त्याचा परिणाम छतावर / दारांवर / भिंतीवर आणि एकंदरीत बाथरूम मध्ये दिसायला लागतोच. त्यामुळे थोडावेळ दार उघडं ठेवा, खिडकी उघडी असू द्या, तो छोटेखानी पंखा असतो तो चालू करा, पुसून घ्या ई. मशीन काय, किंवा बाथरूम काय सांभाळावं लागतच, कारण सतत आपल्याच संपर्कात येतात ह्या वस्तू, नाही का? मग आपल्या रोजनिशीतच असू द्या ह्या गोष्टी आणि हाताला वळण.
नातेवाईकांचे तानेवाईक होऊ द्यायचे नसतील तर मनाच्या, आचार-विचारांच्या खिडक्या दरवाजे देखील मोकळी / उघडी असू द्या. सातत्याने बंद ठेवली तर दुर्गंध येऊ शकतो, नको ती आर्द्रता पण नुकसानदाई ठरू शकते. त्यामुळे कवाडं प्रयत्नपूर्वक मोकळीच ठेवा, स्वछंद जगा आणि जगू द्या.
आगगाडी ची गती
मंडळी आगगाडी, स्टेशन आणि बाकी सगळी गडबड जरा डोळ्यासमोर आणा बरं, का? अहो खूप दिवसात / महिन्यात हे केलं नाही ना म्हणून हो, बाकी काही नाही. नाही अगदीच तस्स नाही, त्याला एक काल कारण पण झालं हो, म्हटलं चला उतरवावं कागदावर ताबडतोब. गाडी जेव्हा स्टेशन जवळ येते तेव्हा तिची गती कशी असते? फारच संथ, बरोबर? अगदी त्या गाडीला जाऊन धक्का द्यावा कि काय असं पण वाटतं कधी कधी, आणि जे दररोज वायू वेगाने पळत असतात त्यांना तर तर नक्कीच असं वाटणार, साहजिक आहेच. नाही का? पण कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने, किंवा थांबायचंच आहे म्हणून किंवा शिस्त म्हणून, किंवा नियम म्हणून किंवा आताशा कृत्रिम बुद्धिमत्ता स्टेशन आलं कि आपोआप गती कमी करतंच असणार, स्टेशन वरचे रूळ काही वेगळे असतील, म्हणजे काहीही झालं तरी गती कमी होईलच, असंख्य कारणं देता येतील.
काल हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे ऑफिस मधे बरेच पाठोपाठ लेक्चरर्स झाले होते, मिटींग्स होत्या, रास्ता भयानक आणि ऑटो वाल्याचे ड्राइविंग विचारूच नका, आणि त्यात प्रचंड भूक लागली होती, का कुणास ठाऊक?. ह्या सगळ्यांचा परिणाम किंवा गोळाबेरीज म्हणजे मी अगदी मुंगीच्या पावलाने घरात शिरले. त्या क्षणी अगदी असं वाटलं ना कोणीतरी माझे पाय उचलून ठेवावे पुढे पुढे, तो चालता / सरकता जिना असतो तसं काहीस. हे माझ्या "ह्यांनी" टिपलं आणि म्हणतात कसे माझ्या कन्येला, "हे बघ स्टेशन वर पोचताना गाडीची गती कशी असते तशी दिसते आहे हि", आई शपथ, जे हसू फुटलं उस्फुर्त, मज्जा आली आणि थकवा छू. खूप खूप वर्ष सातत्याने गती अनुभवता आली, कामात आली आणि त्याचमुळे आता संथगतीचा उपभोग आनंदाने घ्यायला हवा, नाही का? मुंगी, गोगल गाय, हत्ती, जे म्हणायचं ते म्हणा, पण आता करू ते शांत पणे आणि आनंदानेच.
भाषेवर प्रभुत्व कसे मिळवाल?
मी साध्या मराठमोळ्या शाळेत शिकलेली. पण जेव्हा अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचं ठरलं आणि किंचित डोळे उघडले तेव्हा असं जाणवलं कि बाहेरच्या अभियांत्रिकी जगात वावरण्यासाठी आणि तरून जाण्यासाठी इंग्लिश भाषा आत्मसात केलीच पाहिजे. इंग्लिश भाषेशी सख्य कसं साधता येईल हा माझा सोज्वळ प्रश्न होता माझ्या बाबांना. त्यांनी साधा सोप्पा तरणोपाय सांगितला. संपादकीय सदर इंग्लिश वर्तमान पत्रातलं दररोज वाचायचं आणि ते घड्याळ लावून आपल्या शब्दात पुन्हा लिहून काढायचं. दोन्ही लिखित मग तपासून बघायचे. संपादकीय भाषा, शब्द, वाक्यरचना ई. कसे अचूक, थोडक्यात पाल्हाळ न लावता लिहिले आहेत हे लक्षात ठेवायचं, नवीन शब्द एखाद्या वहीत लिहून ठेवायचे, लक्षात ठेवून ते पुढे वापरायचे प्रकर्षाने. संपादकीय सदरच का? तर त्यात चालू घडामोडी वर भाष्य केलेलं असतं चपराख पणे. विद्यार्थी दशेत हे फार कामाला येत कारण इंग्लिश तर नक्कीच उत्तम होण्यास मदत होते आणि जगभर सद्य स्थितीत काय चालू आहे हे समजल्यामुळे मुलाखतीच्या वेळेला, किंवा सामान्य ज्ञानात वाढ होते.
मला ह्याच नाही तर बाबांच्या प्रत्येक गोष्टी सततच आठवत राहतातच, पण आज गोष्ट हि प्रकर्षाने आठवली कारण मी विद्यार्थ्यांना संगणकाचा प्रोग्रॅम कसा लिहायचा, लॉजिक कसं तय्यार करायचं ई. शिकवत होते. तेव्हा मी त्यांना हे सुचवलं कि मी दिलेले किंवा गुगल वर उपलब्ध असलेले कोड फक्त वाचा, त्यानंतर घड्याळ लावून तेच कोड आपल्या पद्धतीने लिहून काढा कुठेही न बघता आणि लिहून झालं / रन झाला प्रोग्रॅम कि मग तुम्ही लिहिलेला आणि गुगल वर उपलब्ध असलेला कोड तुलना करून बघा, काही बदल हवा असेल तर अवश्य करा आणि तो लक्षात ठेवा, यदाकदाचित चुका झाल्याचं तर त्या टिपून ठेवा, ई. अगदी माझ्या बाबानी दिलेल्या उदाहरणा सारखाच जाणवलं मला, पण आधुनिक आणि संगणकाच्या भाषेशी संबंधित.
"प्रयत्नांती परमेश्वर". गुगल वर असंख्य पद्धतीने लिहिलेले कोड उपलब्ध आहेत, ते सहज कॉपी-पेस्ट करून शिक्षकाला देता येतील पण मग शिकणं होणार नाही. उद्या आव्हानात्मक कोड लिहावा लागला तर सुकर व्हावं ह्यासाठीच हे दिवस आहेत, भरपूर मेहेनत करा आणि शिकून घ्या, नक्की जमेलच ह्यात शंकाच नाही. माणसाची काय किंवा संगणकाशी संवाद साधण्यासाठी लागणारी भाषा, शिकावी लागणार, पारंगत व्हाव लागणार, हि काळाची गरजच आहे. प्रेमाने, झोकून देऊन, रस घेऊन, आनंदाने करा आणि सातत्याने करत राहाच.
परिपक्वता / प्रगल्भता
माझ्या समवयस्क तरुण मैत्रिणीसोबत गप्पांचा फड रंगला होता आणि अर्थातच अनेक विषयातला एक विषय जास्त चर्चिला गेला. बहुतांशी सगळ्याच जणी स्थिरस्थावर झाल्या आहेत. मुलं लहान राहिली नाहीत, त्यांची मार्गक्रमणा सुरु झाली आहे,छोटेखानी घर, गाडी, (कदाचित) पुरेशी साठवलेली गंगाजळी आहे, अर्थातच थोड्याफार प्रमाणात आवश्यकतेनुसार दागदागिने, कपडा लत्ता आहे. ह्या पुढे आनंदी राहणं, ठणठणीत तब्येत सांभाळणं, पोटभर हसणं आणि रोजचे घरचे व्यवहार तेवढे सुरळीत सुरु ठेवण्याचा प्रयन्त इतकंच आहे. वयासोबत येणारी प्रगल्भता पण आली आहे. मोठं होणं म्हणजे कदाचित हळू हळू निरपेक्ष होणंच नाही का? आणि हि निरपेक्षता स्वतःला च कामी येते, आजूबाजूला आणि सर्वत्रच जग फार अप्रतिम, सुंदर आणि सुखावह भासायला लागतंच. मग अश्या वेळी, किंबहुना अश्या योग्य वेळी जर निवृत्तीचा मार्ग अवलंबला तर? हो दर महिन्याला येणारा पगार नक्की थांबेल, पण आवडीचं काही तरी करण्याची संधी मिळेल, नवनवीन मार्ग दृष्टीपथात येतील आणि नव्या दिशेने मार्गक्रमणा करता येईल. नवरा, घरचे किंवा अजून कोणीही ह्यांच्या समोर हात पसरवायची वेळ येणार नाहीच, कारणं अनेक आहेत
१. स्वतः पुरतं लागेल एवढं निश्चित जमा असेल किंवा गुंतवणुकीतून उभं करता येईल कदाचित
२. घरखर्च घरच्या कुटुंबप्रमुखाने उचलावा हि माफक अपेक्षा
३. मुलांच्या शिक्षणाची सोय उच्च मध्यमवर्गीय करून ठेवतात बहुतांशी
४. दागदागिने, कपडे ई. चा वर्षानुवर्षांचा साठा च पुरेसा ठरू शकतो, त्यामुळे नवीन घेण्यासाठी पदर / हात पसरावा लागणार नाहीच, आणि वाटलंच तर योग्यच आहे ना, चुकीचं काहीच नाही
५. हळू हळू खाण्यापिण्याची पण इतकी वैविध्यता अनुभवली असते कि एक तृप्तता निश्चितच येते किंबहुना यायला हवी
आज पर्यंत असंख्य टप्पे गाठले, अशक्य अवघड होते बहुतांशी सगळेच, पण जमलं / जमवलं. मग हा नवीन टप्पा पण पार करू हि अपेक्षा आहे. थोडासा फरक नक्कीच आहे
१. हा टप्पा स्वतःसाठी गाठायचा आहे, किंबहुना घाई नाही
२. वयानुसार आलेली शांतता येईल कामात
३. अनेक वर्षांच्या अनुभवांची शिदोरी आहेच ना पाठीशी
४. आकर्षक डौलदार पद्धतीने स्विकारणं जमेल हार मानवी लागली तरी
चला तर पन्नाशीतल्या सगळ्या कळ्यांनो, "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे". शांतपणे सारासार विचार करून निर्णय घ्या आणि तो जगा, सहज. थोडीशी अध्यात्मिक / वैचारिक बैठक असली कि पुरे, छान जोड मिळते. अर्थात काहीच अगदी सहज सोप्प नसतंच आयुष्यात, नाही का? त्यामुळे ह्या निर्णयाची नाव देखील पार होईल ह्यात शंकाच नाही.
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
अंगवळणी पडलेलं भाष्य
तर त्याचं असं झालं कि पुण्याहून नागपूरला जायच्या आधीच तिथलं माझं वास्तव्य अगदी थोड्या काळाचं असणार आहे हे ठरलं होत. त्यामुळे मी आणि माझ्या आजूबाजूच्या त्या सर्वांनी न ठरवता पण जगून घेतलं, मस्त मज्जा केली, प्रत्येक वेळी जमेल तस्स अत्यानंदात घालवले दिवस. त्यामुळे माझी आठवण म्हणून प्रत्येक मैत्रिणीला एक छोटी भेटवस्तू द्यायचं ठरवलं आणि घ्यायला गेले सुद्धा. ऑनलाईन शोधाशोध केली आणि आवडीचं दुकान गाठलंच. मुलींना द्यायचं आणि ते देखील संक्रांतीच्या वेळेला म्हणून खोटा पण एक दागिना घ्यायचा ठरवला. मला त्या क्षणी फक्त सोनेरी आणि चांदीचा रंग फक्त लक्षात राहिला. पण दुकानात गेल्यावर हर तऱ्हेचे ब्लॅक मेटल चे सेट जास्त भावले आणि तेच घ्यायचं ठरवलं. तो दुकानदार सुद्धा मोठं गिऱ्हाईक पाहून इतका खुश होता, आणि त्या आनंदाच्या भरात म्हणतो कसा, फार छान चॉईस आहे मॅडम तुमची, आवडेल सर्वांना आणि संक्रांतीच्या निमित्याने काळं शोभून दिसेल. मी ब्लॅक मेटल चा मंगळसूत्र आणि कानातल्याच सेट पसंद केले होते प्रत्येकीला विविध्य डिझाईनचे. पण उत्साहाच्या आणि आनंदाच्या उकळ्या फुटत असल्यामुळे तो दुकानदार म्हणतो कसा, फक्त पाणी लागू देऊ नका हो ह्या गळ्यातल्या आणि कानातल्यांना नाहीतर काळे पडतील. बाप रे, मी फक्त जमिनीवर पडले नाही, हसून हसून पुरेवाट अक्षरशः. त्या बिचाऱ्याला चांदी आणि सोन्याच्या रंगांचे दागिने विकायची नेहेमीची सवय हे जरा नवीन प्रकार, पण अंगवळणी पडलेले भाष्य पडले बाहेर सहज हो तोंडातून. पण फारच अप्रतिम अनुभव होता तो. नेहेमी साठी लक्षात राहणारा. आधीच काळे ते काळे कसे पडणार? त्याचा अर्थ असा नाही कि वाट्टेल तसं वापरायचं, कदाचित हे पांढरे पडतील. असो, खोटे खरे सगळेच दागिने महत्वाचे, सगळ्यांचीच सारखीच काळजी घेऊ या म्हणजे खूप दिवस ते टिकतील आणि सर्वांना वैविध्य प्रकार मिरवता येतील.
पिशवी / झोळी / बॅग
माझ्या लहानपणी नागपुरातल्या माझ्या वास्तव्यात मला इतकं आठवतं कि एक तर फार दूर कुठेतरी मी गेली आहे खेळायला, शिकायला असं झालेच नाही कधी. सगळं कसं हाकेच्या अंतरावर होतं, स्वतः जाता - येता येत असे सहज, अगदी तहान लागली तरी पट्टाकिनी घरी येऊन पाणी पिऊन पुन्हा निघता येत असे. आणि दुसरं सगळेच अगत्याने वागणारे, सहज कोणाहीकडे अर्थातच ओळखीच्यांकडे हो मस्त खाऊन पिऊन येता येत होत, नेहेमीच.
पण आता म्हणजे मोबाईल फोन चा जमाना, सर्वांचा विचार करून, शक्य होईल तेव्हाच एकमेकांकडे जायचं. असो. स्विगी सारखे प्रकार पण भयंकर प्रमाणात फोफावतात आहे. जरी सोय होत असली तरी देखील घरचं ते घरचंच, स्वच्छता, चव, आरोग्यदायी आणि पोटाला साजेस.
माझ्या गोगलगाईच्या चाली मुळे आणि चार डोळे देखील असल्यामुळे मला सावट चट्टाकिनी दिसतं आणि बराच वेळ देखील. त्याच असं झालं कि अनेक वर्ष ऑफिस मधे बहुतांशी सर्वांनाच दररोज घराचा डब्बा आणतांना बघितलं आहे. ऑफिस मधे नॉर्मल दिवस होते तेव्हा सगळे जण एकत्र जेवत असल्यामुळे सर्वांना पुरेसं आणलं जायचं डब्यात, दररोज. शिवाय आम्हा आयांचा एक अलिखित नियम होता कि संध्याकाळच्या ऑफिस मधल्या चहा सोबत काही तरी कोरडा नाश्ता खाऊनच ऑफिस मधून निघायचं, म्हणजे पोटाला थोडा आधार. सगळ्याच आया, त्यात उत्साही, मुलं शाळकरी, त्यामुळे वैविध्य गोष्टी आवर्जुन त्यांच्या शाळेच्या डब्यासाठी होत असतं आणि अर्थातच ऑफिस मधे पण मैत्रिणींना चव म्हणून एखाद डब्बा येत असे. तर अशी हि लगोरी खेळता येईल इतक्या डब्यांची कथा. तर माझं निरीक्षण असं आहे कि अनेक जणी फक्त हात हालवत ऑफिस ला येतात, कसं काय? प्रत्येक मॅडम कडे दोन नाही तर तीन बॅग्स नक्कीच असतात, एक लॅपटॉपची, दुसरी डब्याची आणि तिसरी पर्स. ह्या पुढे हात हलवत येणं बघून मला धक्का च बसला. असेल दिक्षित आहार वगैरे कदाचित, घरीच मस्त पोटभर खाऊन येत असतील, आणि घरी पोचल्यावर संध्याकाळी डायरेक्ट जेवणच. किंवा सगळेच सामान ऑफिस मधे ठेवत असतील. जे काही आहे ते वेगळं आहे हे निश्चित. भलतंच वाटलं मला पण त्यांच्यासाठी सोयीचं असावं. एक नवीन दृष्टिकोन समजला, असं पण करता येत हे कळलं, अहाहा. ओझं नकोच काही. आजकाल तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय कि कुठुनही कुठलेही मशीन / संगणक ई. जोडता येतो आवश्यकता असली तर, नाही तर मोबाईल आहेच कि. शांतता.
चला मंडळी, सर्वार्थाने हलकं जगू यात, दररोज चा प्रवास पण सुखकर होईल त्यामुळे.
सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२
वास / सुगंध / सुवास ई.
आपल्या दिवसाची सुरवात, मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या सुगंधाने होते. असंख्य सुवास दरवळतात आजुबाजुला, काही नैसर्गिक काही प्राकृतिक, आणि बरेच असे. हे बहुतांशी सगळेच सुगंध प्रचंड प्रेरणा देऊन जातात खूप जणांना. हे सगळं इतकं सहज आणि नैसर्गिक रित्या होतं कि त्या सुगंधाला आणि आत्मसात करणाऱ्याला देखील लक्षात येत नाही, अगदी नकळत होते देवाण घेवाण. आणि हो सुगंध म्हणजे फक्त अत्तर, सेंट, पर्फुम, साबण, उदबत्ती, फुलं इत्यादीचं नाही तर पहिल्या पावसानंतरचा मातीचा दरवळणारा सुगंध, समुद्राच्या पाण्याचा, धबधब्याच्या पाण्याचा, आंब्याच्या मोहोराचा, नवीन कोऱ्या कपड्यांचा, आईच्या साडीचा, दाढीच्या साबणाचा, फोडणीचा, धुपाचा, होम-हवनाचा, कढवलेल्या तुपाचा, रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाचा आणि बरेच इतर असे असंख्य आहेत. प्रत्येकाची आवड आणि दृष्टिकोन वेगळाच. सध्या आमच्या जुन्या घराला नवीन साज चढवला आहे आणि सगळ्या भिंती फार आनंदात आहेत, नृत्यचं चाललंय जणू त्यांचं, असं जाणवतंय. का? सांगते. अहो त्यांना नवीन रंग, त्यांची झालेली साफसफाई, त्यांचं मोहक रूप फार भावलंय म्हणे. आधी ह्या अत्यानंदाच्या भरात सगळ्या भिंतींनी आणि रंगाने त्यांच्या सुगंधाची उधळण आजूबाजूच्या कपाटाला, दरवाज्यांना, छताला, आरशाला, खिडकिनांचं दिली हो. कारण त्यावेळी फक्त तेवढेच उपस्थित होते आजूबाजूला. त्या सर्वांनी पण मनापासून अनोखा नवीन सुगंध अनुभवाला पोटभर. मग दोन पायांची मित्रमंडळी प्रगटली आणि त्या ताज्या सुगंधाने त्यांना पण आपलंस केलं, उस्फुर्त स्वागत केलं आणि सामावून घेतलं. पहिल्या दिवशी जितका नवखा आणि उग्र वाटला तो सुवास दुसऱ्या दिवशीपासून आपलासा का वाटायला लागला ह्याच गुपित आत्ता मला उमगलं. त्या सुगंधाने आपलसं केलं तर तो माणसाला हवा हवासा वाटतो किंबहुना माणूस म्हणतो कि ह्याची मला सवय झाली. नाण्याला नेहेमीच दोन बाजू असतात आणि ह्या बाबतीत सुगंधाची बाजू जास्त खणखणीत आणि बलाढ्य आहे मंडळी. माझ्या घराच्या भिंतींवरचा रंग माझी इतकी आवभगत करेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. आज पर्यंत इतक्या वेळी अनेक ठिकाणी बरेचदा नवीन रंगांचा खरं त्रास होतो, कारण त्या रंगाला प्रत्येकाला सामावून घेण्याची कला कदाचित अवगत नसेल हो. आमच्या घराचा नवीन पिढीच्या रंगाची मात्र कमाल आहे आणि खूप शिकण्यासारखंच आहे, असेच आपण देखील आजूबाजूच्यांना सुगंध पसरूयात, सामावून घेऊयात, नेहेमीच, कुठलेही किंतुपरंतु न बाळगता. कोण म्हणतं कि फक्त माणसांकडूनच किंवा सजीव प्राण्यांकडूनच शिकता येत ते?
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२
साम्य
७ फेब्रुवारी ला दरवर्षी जगभरात एक अत्याधुनिक सण साजरा करण्यास सुरवात होते, तो एक आठवडा चालतो आणि सर्वच वर्गात त्याचा आनंद उपभोगला जातोच. अगदी आपल्या नेहेमीच्या सणांप्रमाणे जसे कि दिवाळी, संक्रांत ई. हे सण पण बरेच आठवडे साजरे केले जातात सर्वत्र, भारतात. दिवाळी ते देव दिवाळी ह्या कालावधीत कारण माहेरवाशिणींना त्यांच्या सासरचं सगळं सांभाळून भाऊबिजेच्याच दिवशी येता येईलच असे नाही, म्हणून हि वाखाणण्यासारखी विचारपूर्वक केलेली सोय. तेच संक्रांतीच देखील. रथसप्तमीपर्यंत आपल्या सोईनुसार हळदीकुंकू करता येत.
अगदी त्याच धर्तीवर मला हा अत्याधुनिक सण आखलेला दिसतो, ७ ला सुरु होतो, वैविध्य प्रकारचे प्रत्येक दिवस घेऊन, आपापल्या सवडीनुसार, सोईनुसार मस्त झकास एन्जॉय करण्या करता आणि संपूर्ण एक आठवडा चालतो तो, १४ तारखेपर्यंत.
ह्या दोन सणांमधे मला फारच साम्य आढळलं म्हणून मला सांगड घालता आली अनुकथेच्या स्वरूपात.
त्यामुळे लोक हो जमल्यास आठवडाभर आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत वेळ व्यतीत करा, नाहीतरी काही दिवस आठवड्यातले त्या खास ठरलेल्या दिवस प्रमाणे आणि अगदीच जर जमलं नाही तर एखाद दिवस नक्की, कारण ह्याची तय्यारी आणि माहिती / पूर्वसूचना जगभरातील लोकांना असतेच आणि ती देखील वर्षभरापूर्वी मिळालेली, त्यामुळे हे सहज साध्य होण्यासारखं आहेच. आणि हो सगळ्याच प्रकारच्या जाहिराती सतत वाचायला, ऐकायला, बघायला मिळतातच ह्या सणाविषयी, थोडक्यात काय कोणीच तुम्हाला हे विसरू देत नाही, येऊ घातलेल्या सणाविषयी. मस्त एन्जॉय करा, एक्सप्रेस कराच, नवीन पदार्थ चाखा / खिलवा, असंख्य प्रकारच्या भेट वस्तू उपलब्ध आहेत त्या घ्या दोघांसाठी, कारण नेहेमीच "कृतीने शब्दांपेक्षा जास्त व्यक्त करता / होता येत".
शूर आम्ही सरदार आम्हाला....
काही महिन्यांपुर्वी मी माझं एक निरीक्षण लिहिलं होतं ज्यात प्रकर्षाने मी मांडल होत कि एक / दोन मोठ्या बॅग्स खांद्यावर असतांना, खिशे असतांना बहुतांशी लोक मोबाईल मात्र हातातच धरणार. कदाचित त्या छोट्या मोबाईल साठी जागा नसेल त्या बॅगेत किंवा खिशात. असो. एक हात पूर्णपणे मोबाईल सांभाळायला देऊन धडपडत बस मधे चढायचं, रस्त्यावर चालायचं आणि बरेच काही. परवाच एक जख्ख आजी बघितल्या. त्यांना वयोमानाप्रमाणे चालणं थोडसं अवघड होतं, पण त्या सकाळच्या उद्यानात चालायला आल्या होत्या वाटतं. आजोबांच्या मागे स्कूटर वर चढून बसणं अवघड होत होतं, तरी देखील एका हातात ते खेळणं होतंच. ते काही त्यांनी पर्स मध्ये, काकांच्या खिशात किंवा स्कूटर च्या डिकीत ठेवलं नाहीच. असो, अशी अनेक दरडोई उदाहरण देता येतील, पदोपदी दिसतातच.
हे तरी थोडं बरं होत असं म्हणायला हरकत नाही तर गेल्या काही दिवसांपासून मी अजून एक निरीक्षण केलं आहे, किंबहुना झालं आहे/ दृष्टीपथात पडलं आहे. माझी दाही बोटं तोंडात गेलीच. कारण आज काल फॅशन का अजून काही पण अहो खेळणं / घुंगुरड असं भासवून चक्क उघडा लॅपटॉप एका हातात, दुसऱ्या हातात मोबाईल, आणि खांद्याला बॅग, असे शूरवीर दिसू लागले आहेत. काय हे? रस्त्यावर असली सर्कस का? काय मिळतं हो हे करून? काय दर्शवायचं असतं? खूप च वेगळ्या धाटणीतले शाश्त्रज्ञ वगैरे असतील का? कीज = keys दबल्या जात नसतील विनाकारण? इतका हलका असतो का लॅपटॉप? बॅगेत मावत नाही? उघडा का धरायचं? पडला तर चुकून? बाप रे मलाच असंख्य प्रश्न पडलेत. देवा. हेच दिगज्ज चार घरच्या भाजीच्या पिशव्या आणतील का गपगुमान उचलून? विश्वविक्रम वगैरे करतील का? शेजारच्या आजी आजोबांची कामं ?
बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२
शेवटचा घास
जेवण आणि त्याच्या पौष्टिकते बद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे आणि अर्थातच ऐकलं / आमलात पण आणलं आहे. त्यातली एक आख्यायिका अशी कि म्हणे फक्त एक घास जेवणाच्या शेवटी दररोज न चुकता गोड खावंच, पण फक्त एक घास, उदाहरणार्थ एक गुलाब जाम, एक चमचा हे किंवा ते गोड बास इतकंच, जास्त नाही, हा नियम. असो.
नाण्याची दुसरी बाजू, माझी आई नेहेमी सांगायची कि जर एखाद दिवशी पानात गोड असेल तर जेवणाची सुरवात ते गोड खाऊन करावी.
मग सुरवात करावी का शेवट? एक घास, का जरा जास्त का मनसोक्त? असे अनेक प्रश्न आहेतच.
अजून एक पैलू असा आहे कि भारतात काय जगभरात साधारणतः दोन गटाची माणसं असतात, एक गोड खाणारी + आवडणारी आणि दुसरी तिखट भक्त. माझी गिनती मी दुसऱ्या गटात करते अर्थातच.
तर मी ह्या सगळ्यातून एक सुवर्णमध्य माझा मी शोधून काढला असं म्हणणार नाही, पण मी तो आत्मसात केला आणि तो मला फारच भावाला देखील. आई म्हणजे माझे दैवत सगळ्याच बाबतीत. आणि त्यामुळे मी पानात गोड असलं तर त्यांनी सुरवात पण करते आणि ते संपवते पण ताबडतोब म्हणजे मला तिखट, आंबट, तुरट आणि बाकी चवी चाखता येतील पानात असलेल्या. पण हे करता करता मी अजून एक गोष्ट प्रकर्षाने करतेच. ती काय ते सांगते थांबा, आत्ताच अनुभवली, म्हटलं लिहावं.
आज मी डब्यात दोन भाज्या आणल्या होत्या, शिवाय रोज मला आमटी नुसती प्यायला आवडते त्यामुळे ती पण होतीच. माझ्या कडे दररोज / नेहेमीच बॅग मधे काही तरी कुडुम अक्का सटरफटर / शेव बिव असतेच. हे कुडुम अनेक कारणांसाठी ठेवते मी, एक म्हणजे सवय, दुसरं म्हणजे अत्यावश्यक म्हणून, एखादवेळा भूक लागू शकते, तिसरी म्हणजे थंड असतं डब्यातलं त्यामुळे अधे मधे खायला मज्जा येते, चौथं चव कमी जास्त झाली असेल तर भरून निघायला ई. आणि अशी अनेक कारणे आहेतच. त्यामुळे आज माझ्या कडे लगोरी खेळता येईल सहज एवढे डब्बे होते, दोन भाज्या, आमटी, पोळी, कुडुम. नेहेमीच होतात हो पण आज भाज्या काही जगावेगळ्याच झाल्या होत्या, अप्रतिम चव. त्यामुळे कुडुम विशेष उपयोगात आलं नाहीच. त्या दोन भाज्यातली पण एक भाजी म्हणजे माझा जीव कि प्राण, पोपटाची. अहाहा, मग काय विचारात, जेवण झाल्या झाल्या थोडीशी बडीशेप / सुपारी तोंडात टाकणारी मी आज आमटी आणि दुसरी भाजी आधी संपवली आणि शेवटचे दोन घास पोपटाच्या भाजीचे. जेवणा नंतर देखील कित्ती तरी वेळ ती उत्कृष्ट चव रेंगाळत होती जिभेवर. त्या अनुभवाचं वर्णन शब्दात मांडता येत नाहीच, अशक्यच. तिखटानेच माझ्या प्रत्येक जेवणाचा शेवट ठरलेला आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेषच जणू.
नाल्याचे महत्व
अगदी लहानपणी पासून शाळेत म्हणावं किंवा इतर शिक्षक / शिक्षकेतर तज्ज्ञांकडून वैविध्य पाण्याचे स्रोत, किंवा वाहत्या पाण्याच्या जागा / सांडपाणी ई. आणि अनेक संलग्न विषयावर शिकलो / ऐकलं / बघितलं आणि वाचलं देखील. थोडक्यात काय तर नाले हे बहुतांशी उघडेच असायला हवेत किंबहुना असतातच, पण काही वेळा काही कारणास्तव ते शिस्तीत झाकले देखील जातात. म्हणजे आधी उघडा असलेला नाला गरजेनुसार पाईप वगैरे व्यवस्थित मांडून बुजवला जातो. आता हे करण्यामागची कारणं अनेक आहेत, त्यातलं एक रस्ता रुंदीकरण. आता रस्ता मोठा का करावा लागतो कारण रहदारी वाढलेली दिसते म्हणून. रहदारी म्हणजे जास्त गाड्या, विविध कचेरीत / ठिकाणी जाणाऱ्या, कधी कधी ठरलेल्या वेळी नाही तर एका वेळी खूप जास्त, ई. असे अनेक प्रकार आढळून येतील. बरोबर?
माझ्या दृष्टीने नाला हा नैसर्गिक तय्यार झालेला असतो, जेव्हा तो दूर खेडोपाडी, शहराबाहेर च्या ठिकाणी असतो. प्रत्येक वेळी ठरवून बांधालाच जाईल नाला हे निश्चित नसतं, किंवा हे नाल्याचे दोन प्रकार म्हणता येतील.
आकाशाखाली उघडा नाल्याच्या पाण्यावर सूर्यकिरण पडत असल्यामुळे त्रासदायक जीवाणू / किटाणू / दुर्गंध काही अंशी नैसर्गिक रित्याच नाहीशे होत असतील. मी ह्या विषयातली तज्ञ् तर अजिबातच नाही, आणि मला ह्या विषयाची ऐकिव माहिती आहे वरवरची. पण सामान्य ज्ञानावर आधारित हे विचार आहेत. मला असं वाटतं जर नैसर्गिक रित्या नाला तय्यार झाला असेल तर तो तसाच टिकवून ठेवावा. कशाला महत्व द्यायचं हे ठरवायला पाहिजे, वाढलेल्या गाडयांना का सांडपाणी इतकी वर्ष वाहून नेलेल्या नाल्याला. माझ्या मते तर जर पावसाळ्यात जास्त पाऊस पडला तरी हे उघडे नाले फार फार कामाला येतात, जास्तीचा प्रवाह सामावून घेतात, वाहत्या पाण्याला जास्त जोर असेल किंवा बरेच वर्षाचा तो नाला असेल तर त्याची खोली पण आपोआप वाढते, ज्याने अजून जास्त पाणी सामावून घेतले जाते. माझ्या सारखीला जर हे कळत तर आधुनिकीकरण करणाऱ्यांना नाही. पाईप हे पर्याय नाहीतच. आणि मग दुर्घटना झाल्याच्या बातम्या वाचनात येतात. टाळा हे लोक हो, खरंच टाळा.
त्या ऐवजी म्हणजे नाला बुजवण्याच्या ऐवजी ज्या संस्था त्या मार्गावर स्थापन झाल्या आहेत आणि ज्यामुळे गाड्या वाढल्या आहेत त्यांना जमल्यास त्यांच्या कचेरीच्या वेळा मागे-पुढे करायला सांगा, लोकांना एकमेकांसोबत यायला सांगा, बस वापरायला सांगा, गाड्यांचा सुळसुळाट होणार नाही ह्याची काळजी आधी घ्या, नाला बुजवण्यापेक्षा. माझ्या डोळ्यादेखत बदल होत आहेत पण मी एक सामान्य नागरिक असल्यामुळे काहीही करू शकत नाहीच. एका ठिकाणी फक्त नाला नाही बुजवला तर त्याची दिशा / वळण पण थोड्याफार प्रमाणात हलवलंय, देवा, सद्बुद्धी दे बावा.
कॉपी थाळी
मी आजपर्यंत असंख्य प्रकारच्या थाळ्या चाखल्या आहेत / फस्त केल्या आहेत. थाळी म्हणजे पर्वणीच जणू, कारणं? बरीच, खूप मस्त सजवलेली, वैविध्य पदार्थांची रेलचेल, चव बदल, साग्रसंगीत केलेलं आणि वाढलेलं, वाढण्याची पद्धत, विविध चवीची अप्रतिम सांगड आणि बरीच अशी. अजून एक महत्वाचं म्हणजे थाळी खायला जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब किंवा मित्र मंडळींसोबतच, त्यामुळे आणखीनच मज्जा वाढते / द्विगुणित होते. त्यात जर वेगळ्या ढंगाची / राज्याची असेल तर सोन्याहून पिवळे. आणि तसे पण मोठी मंडळी, खाण्याचे दिग्गज नेहेमीच म्हणतात ना कि सगळे रस पोटात जाणं अत्यावश्यकच, सगळ्याच चवी महत्वाच्या ई. त्यामुळे देखील मला थाळी प्रकार खायला जायला फार फार आवडतं. थाळी खाऊन आलं कि संध्याकाळी पण बहुतांशी सुट्टीच असते जेवणाला, ते पण मोठं कारण आहे बरं का मंडळी.
आज एक बोर्ड पहिला अचानक, ऐकलं होत ह्या बद्दल पण प्रत्यक्ष वाचलं / पाहिलं आजच, काय तर म्हणे प्रसिद्ध आईस्क्रीम थाळी. घ्या, काय काय नवीन येईल माहित नाही. अर्थात वैविध्य आईसक्रीम एकत्र वाढलेले असणार आणि ते कदाचित तुम्ही हवं तेवढं खाऊ पण शकणार. मज्जा येईल का हि थाळी फस्त करतांना? एखाद वेळा चाखायला हरकत नाही, जातेच आता सर्वांना घेऊन लवकरच.
आम्ही एकदा मधे नवीन आलेली पिझ्झा थाळी फारच एन्जॉय केली होती हो, अहाहा, एका थाळीत असन्ख प्रकारचे पिझ्झे, छोटे छोटे आणि हवे तेवढे खा, अजून मागवा जे आवडले तेच. क्या बात है. अर्थात संपूर्ण जेवणाची थाळी आणि ह्या आधुनिक कॉपी थाळी ला सर नाहीच, पण असो नेहेमी काही तरी नवीन प्रयोग करत राहावे हे नक्की.
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२
आशिरमय गट
माझी दहावी आटोपली आणि मी तुकड्या तुकड्यात घरीच लहान शाळकरी मुलांना शिकवायला सुरवात केली. इंजिनियर ची परीक्षा झाली आणि पुर्णवेळ नोकरी स्विकारली आणि ती घौडदौड सुरु राहिली त्यानंतर, अर्थातच विविध ठिकाणी, विविध हुद्द्यावर आणि मुलांना सांभाळत. ह्या माझ्या छोटेखानी प्रवासात मी अनेक प्रकारच्या मुली पारखल्या, किंबहुना अभ्यासल्या गेल्या सहज जे कानावर पडलं त्यानुसारच फक्त, कधीही म्हणजे कधीही फार खोदायला गेले नाही. अनेकविध कारणं आहेतच कि मुली का नोकरी करतात, कधी सोडतात ई. एक गट असा आढळला कि
काहीही झालं तरी शेवटपर्यंत काम करणारच, दुसरा ज्यात काम करणं / कमावणं अतिशय महत्वाचं आहे गरजेचंच आहे, तिसरा कधीच नोकरी ना केलेला असा, ज्या घरीच फार आनंदी आहेत, चौथा ज्यात मुलं छान मोठ्ठी झाल्यावर सुरवात केलेल्या, पाचवा फक्त ऐकिव गट आहे ज्यांना मी कधीच बघितलं नाही ज्यात करोडोंची नोकरी सोडून काही वेगळंच सुरु केलं आहे, सहावा पण नाही कधी संपर्कात आला ज्यात अचानक झाल्यासारखं वाटतं एका क्षेत्रातून दुसरी कडे कूच केली आहे, सातवा ज्यात उत्तम सुरु असलेली नोकरी सोडून समाज कार्य आरंभलं आहे ई. अजूनही बरेच गट असतील देखील पण मला एवढे आढळले सध्या. हो, ह्या सगळ्यांची आपआपली भरपूर कारणं असतील देखील कि त्या सगळ्या त्याच गटात का आहेत, जे मला जाणून घ्यायला नकोत, किंवा गरज नाहीच. एक अजून गट म्हणता येईल कि नाही हे माहित नाही पण त्यात फार कमी जणी आहेत ज्यांना समाजाच्या दृष्टीने फार लवकर निवृत्ती घ्यायची आहे / घेतली आहे, अगदी कदाचित बोटावर मोजता येतील एवढ्याच, अर्थात माझ्या संपर्कात आलेल्या / आढळलेल्या / ऐकलेल्या / वाचलेल्या. त्यांच्या घरी कदाचित समाधान असेल, पाठबळ असेल, पुरेसा संच असेल किंवा असं भासत असेल, कुठलेही कारण नसेल, तब्बेतीच्या कुरबुरी असतील छोट्याश्या, बदल हवा असेल, थांबायची इच्छा झाली असेल किंवा अजून काही. मग अश्या मुलींना / स्त्रियांना काय म्हणाल? त्यांना खूप मोठा आशिर्वाद लाभला आहे?, का त्यांना सद्बुद्धी मिळाली आहे, का थांबल्याशिवाय त्यांना कळणार नाहीच पुढे काय करायचं ते, का त्यांना उमगलं आहे कि सरते शेवटी किती पैसा पुरेसा असतो? पैशासाठीच का काम करायचं? किती वर्ष? आता सगळ्याच गोष्टी / वयोमानच काही वर्ष आधीच होऊ घातलंय, उदाहरणार्थ: चष्मा म्हणजे चाळीशी असा समज होता आधी आणि आता?, निवृत्ती म्हणजे ६५, घर निवृत्ती नंतर येणाऱ्या पैशानी आणि आता नोकरी लागल्या लागल्या ताबडतोब, पैसे आणि किमती वस्तू हाताळणं बहुतांशी स्वतः कमवायला लागल्यावरच, आणि आत्ता अगदी शाळकरी वयातच. मग निवृत्ती का नाही आधी घेता येत जर सहज शक्य असेल तर? घेतलीच समजा मग त्यानंतर काय? ह्या गटात कोणी आहेत का? त्यांनी काय काय केलयं? काय काय करावं? सोप्प असतं का? पैसे मिळणार नाहीत दर महिन्याला, धावपळ थांबेल, रोजनिशी पूर्णपणे बदलेल आणि बरेच काही, चालेल का? ह्या सगळ्यांची उत्तर त्यातनं गेल्यावरच समजतील का?
आऊट लायर म्हणजे बाह्यस्थ किंवा पठडी बाहेरचा, अश्यांचा टिकाव लागतो का? हा छोटासा गट ह्या आऊट लायर संद्येचा भाग समजावा का? उत्तरं मिळतील का? शोधावी का? कुठून सुरवात करावी, स्वतः पासून का दुसऱ्या पासून? दुसरा समाधानी का असमाधानी, हे कसं मांडायचं? जशी जशी उत्तर मिळत जातील तशी तशी मी तुमच्या समोर मांडत जाईनच, पण त्या आधी कोणाला काही कल्पना असेल तर निश्चित कळवणे हि विनंती. इतका हा गट दुर्मिळ असेल, इतके प्रचंड आशीर्वाद मिळाले असतील, विचारांची दिशा स्फटिका सारखी स्वच्छ असेल असं वाटलं नव्हतं हो.
बदल
ऑफिसला जायच्या तय्यारीचा रोजचा एक महत्वाचा भाग म्हणजे पिण्याच्या पाण्याची बाटली आणि डब्बा भरणं. अगदी लहानपणीपासून ते माझं चक्क लग्न होईस्तोपर्यंत हे काम माझ्या वाट्याला कधी म्हणजे कधीच आलं नाही. माझे बाबा आणि आई अतिशय उत्साहाने हे माझ्या साठी करत होते, हातात कधी देत होते हे अजिबात जाणवलं नाही. मग आज मी का बोलते आहे ह्या बद्दल हा सहज प्रश्न आला असेलच ना तुमच्या मनात? तर त्याचं असं झालं, आज मी ऑफिस ला जातांना माझी पाण्याची बाटली भरत असतांना हे सगळं आठवलं, मी पट्टाकिनी जुन्या घरात फेरफटका मारून पण आले आणि पोटात गोळा, डबडबलेले डोळे घेऊन वावरू लागले.
सध्या माझ्याच राहत्या घरातून माझ्याच जुन्या घरात राहायला निघालो आहोत आम्ही. हे सगळं अचानक ठरलं जेव्हा मी नागपूरला माझ्या नवीन ऑफिसच्या कामासाठी गेले होते. असो. पण आज प्रकर्षाने जाणवतं आहे कि मला आताच, ह्याच काळात हि नागपूरची सुवर्णसंधी का मिळाली ते, आणि मला परत येऊन देखील आज एक महिना झाला तरी देखील मी परत का आले नाही? मला क्षणो क्षणी का सतत नागपूरची आठवण येते आहे, का तिथलीच माणसं डोळ्यासमोर उभी ठाकत आहेत, काय चाललंय नक्की? दुसऱ्या घरात गेल्यावर जरी ते माझंच जुनं घर असलं, तरी शुन्यापासूनच सुरवात आहे, तेथे सहज पुन्हा स्थिरस्थावर होण्याकरता आणि हे राहतं घर सोडून जातांना होणार त्रास पट्टाकिनी शमून जाण्याकरीता "त्याची" हि नागपूरची मांडणी होती तर? असं आहे तर, आत्ता समजलं / उमगलं थोडं फार. कित्ती विचार करावा "त्याने" माझा आणि का? मी कोण हो त्याची, एक साधी मुलगी? बास, नाही का? महत्वाचं व्यक्तिमत्व वगैरे नाहीच. आणि राहतं घर जरी अगदी थोडे वर्ष आमचं होत तरी देखील इथले पक्षी, हवा, झाड झुडपं, माणसं, इथले रुटीन / रोजनिशी आता अंगवळणी पडली होती. ह्याच घरात मला माझे पाय परत मिळाले, जेथे एक पाऊल टाकता येत नव्हतं तेथे चक्क एक जिना सहज चढता येतोय, ह्याच घराने मुलांची १० वी - १२ वी साजरी केली ई. अर्थात दुसऱ्या घरात एकदा राहायला गेल्यावर होईल तिथली सवय पण लवकरच. पण हे सगळे बदल सहज सोप्पे नाहीतच पचवायला, आत्मसात करायला, अगदी त्याच्यामुळेच तर नागपूर पेरलं मध्ये. किती आणि कशी उतराई होऊ "त्याची" मला खरंच समजत नाही आहे.
म्हणून ध्यानी - मनी -स्वप्नी नसतांना मला माहेरी पाठवलं, अनपेक्षित लाड झाले, सगळं म्हणजे सगळं आयतं दिलं गेलं, पुन्हा एकदा दररोज पाण्याची बाटली भरून मिळाली न सांगता, गरमा गरम सरप्राईझ आवडते पदार्थ चारीठाव आणि मग नवीन मार्गक्रमणा करायला पाठवलं भरपूर नवीन नाती आणि आठवणींचा साठा घेऊनच.
मला आठवतंय ह्या क्षणी मी असंख्य वेळा माझ्या विविध विद्यार्थ्यांना, मुलांना आणि बरेच जणांना हे समजावून सांगितलं आहे कि जर तुम्हाला थोडसं जरी वाईट / उदास वाटलं तर प्रयत्न पूर्वक आधी उपभोगलेले अप्रतिम क्षण / सहली / पदार्थ आणि इतर जे परमानंद / ओठांवर हसू देऊन जातं ते आठवा म्हणजे उत्साहाने पुढची कामं सुरु करता येतील. आज मला हे सगळं करायचं आहे सहज / नकळत.
प्रत्येक क्षण, दिवस, महिने आणि वर्ष मला फुलासारखं जपलं "त्याने", त्याबद्दल मनापासून शतश: धन्यवाद.
रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२
पंगतीच महत्व
जगी-स्थळी-पाषाणी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अश्या होत्या जेवणाच्या पंगती माझ्या लहानपणी. सतत पंगती, म्हणजे लग्न, मुंजी सारखे समारंभ असो, नाहीतर सण-वार-पुजा, बसायच्या आणि उठायच्या पंगतीच. पंगती शिवाय घराबाहेर / विविध प्रसंगी जेवतात हे माझ्या वयाच्या लहान पण समजुतदार मुलांना ठाऊकच नव्हतं. पंगती म्हणजे पर्वणीच जणू, शिस्त, वेळ पाळणे, सगळेच एकदम बसणार आणि उठणार, वाढपी, वाढण्याची पद्धत आणि बरेच काही. अर्थात शेवटची पंगत थोडी हटके असायची, गंमत जम्मत व्हायची, उरलं सुरलं संपवायचं हे एक टोक नाही तर खास पदार्थांची रेलचेल हे दुसरं. पण काही का असेना, आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंगत एकत्र सुरु होत असल्यामुळे सगळ्यांची जेवणाची गती बहुतांशी सारखीच असायची, असावी लागायची, उगाच नखरे चालत नसत, किंवा नसतंच कोणाचे. माझ्या दृष्टीने आज मला खात्रीशीर सांगता येईल एखाद्याला जेवतांना बघून, ऐकून कि हा व्यक्ती पंगतीत कधी जेवला आहे का नाही?, पंगतीचा लाभ त्याला मिळाला आहे का नाही? ते, १००%. तोंड उघडं, जेवतांना आवाज, तक्रारी, हाताला चाळे, लक्ष नाही, आनंद नाही, दुसरे आपल्यासोबत बसले आहेत / नाहीत ह्याची गिनती नाहीच, चमच्याने खाणं, उरवणे पानांत, कसंही बसणं, वेळेचं भान नाही ई. आणि असे अनेक लक्षण आहेत माझ्या दुर्ष्टीने. अर्थात ह्या सगळ्याला काही अंशी जडण-घडण, स्वभाव, बेशिस्त ई. पण जबाबदार आहे, पण तरी पंगती चा अभाव हे कारण सगळ्यात अग्रगणी आहे माझ्या दृष्टीने. पंगती त यथेच्छ जेवणाचा असंख्य वेळा उपभोग घेतलेल्यांना हे नक्की ठाऊक असणार कि पंगतीत वाढावं पण लागतं, बहुतांशी मंडळी वया प्रमाणे, जमेल तसं वाढतातच, न सांगता. म्हणूनही हे सगळे चांगले गुण आपोआप रुजले जातातच.
फेस रिडींग वगैरे नाही पण त्या पल्याड व्यक्तिमत्व चा जाता जाता सहज अभ्यास आणि त्याची पंगती शी सांगड घालता येणं शक्य आहे. नोकरीशिवाय व्यक्ती जाणून घ्यायचा असेल तर हा एक पर्याय माझ्या आज डोक्यात आला म्हटलं लिहावं.
एखाद्याला नकळत पारखायचं असेल तर त्या व्यक्ती सोबत भोजनाचा आनंद घ्या आणि नीट निरीक्षण करा. पट्टकिनी लक्षात येईलच कि काय दडलंय ते, पुढे जायचं कि नाही, आपल्यात काय बदल करावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी स्फटिकासारख्या स्पष्ट होतील लगेच. बघा मंडळी पंगतीच महत्व. मानलं बुवा ज्यांनी पंगत हि संकल्पना मांडली.
पायी - सायकल - बस - दुचाकी - ते चारचाकी - ओला ई., पत्रावळीची पंगत - ताटातली पंगत - जमिनीवर बसून पंगत - टेबलावरची पंगत - बुफे ते स्विग्गी ई., ट्रंक कॉल - साधा लँडलाईन - पेजर - मोबाइल - स्मार्टफोन ते स्मार्ट घड्याळ ई. सगळं आनंदाने हाताळलेल्या पिढीचा विजय असो.
शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२
गैरसमज / फालतूचे निष्कर्ष
आपल्याला अनेकदा असं वाटत कि माझ्या हातून चूक, अशक्यच, ह्या जन्मात नाहीच. आणि मी अनेक मोठ्या माणसांना बघितलं आहे स्वतःची चूक अमान्य करतांना. असो, नाण्याची दुसरी बाजू आणि एक दुसरा वर्ग देखील आहे ज्यात माणसं जशी जशी मोठी होतं जातात तशी तशी फार वेलकमिंग, समजूतदार आणि सर्वांना सामावून घेणारी अशी.
एक दिवस एकाच कचेरीत काम करणारी नवरा बायको विविध मार्गाने / गाड्यानें जातांना बघितलं आणि मला वेगळं वाटलं थोडसं विचित्र देखील. आणि मी घरी येऊन त्याबद्दल उहापोह पण केला. मग दुसऱ्या दिवशी कानावर आलं कि त्या सरांचे आई का वडिल म्हणे शेजारच्या इस्पितळात दाखल आहेत. त्यामुळे कदाचित सर गाडीने आधी इस्पितळ मग घर असं करणार असतील आणि मॅडम थेट घरी. मला हि पार्श्वभूमी अजिबातच ठाऊक नव्हती, तरी पण मला काहीही अधिकार नाही त्यांच्या बद्दल उगाच काही विचार करण्याचा. मला फार म्हणजे फार वाईट वाटलं. मी फार कमी वेळा दुसऱ्यांच्या फंदात पडते, नाहीच बहुतांशी, पण ह्यांच्या बद्दल का झालं हे समजलं नाही. असो. मी मनापासून त्यांची क्षमा मागितली आणि पुढे असं होऊ द्यायचं नाही असं स्वतःला सांगितलं आणि विषय संपवला.
फालतूचे निष्कर्ष कधीही काढू नयेत, ज्या मुळे आपल्या ज्ञानात भर पडत नाही त्या कडे फिरकू नयेच. उगाच ढवळा ढवळ, दुसऱ्यांबद्दल बोलणं टाळावेच, किंबहुना मनात विचारच येऊ देऊ नये म्हणजे पुढचं सगळं थांबेल आपोआप.
आवडती / नावडती
प्रत्येकाचीच एक आपली अशी आवड निवड असते, मुख्यत्वे काम करण्याच्या क्षेत्राची आणि त्यामुळेच कदाचित शिक्षण क्षेत्राची सुद्धा. प्रत्येकालाच त्याला आवडेल त्या क्षेत्रात शिकायला आणि काम करायला मिळतंच असं नाही. किंबहुना बहुतांशी मिळत नाहीच, आपण नावडत्या किंवा अनोळखी क्षेत्रात सुरवात करतो आणि हळू हळू न कळत कधी ते क्षेत्र आवडायला लागत ते समजत देखील नाही, बरेचदा, किंबहुना खूप जणांना ते आवडून घ्यावं लागतं कारण कदाचित त्या वेळी दुसरा पर्यायच नसतो. किंवा ज्या पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात, काही वाचण्यात येत, ऐकण्यात येत, त्यामुळे त्या क्षेत्रात काम सुरु होत आणि अनेक वर्ष केलं जातं सातत्याने.
आता माझंच बघा नं, का कुणास ठाऊक अगदी लहानपणी पासून मैत्रिणी, आजूबाजूचं वातावरण, ते दिवस ई. मुळे असेल कदाचित पण स्वयंपाकाची फार आवड निर्माण झाली. खूप आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात वैविध्य पदार्थ मी कधी करायला सुरवात केली माझं मलाच समजलं नाही. मी नेहेमी आईला म्हणायचे कि मला फक्त दहावी करायचं आहे, पुढे काही नक्को. मला खूप आवडेल रोज घरी सर्वांसाठी स्वयंपाक / पदार्थ करायला. पण कुठे काय, मी फार थोडा वेळ घालवते स्वयंपाक घरात आणि विद्यावाचस्पती पर्यंत मजल-दरमजल करत गेले, कुठे दहावीला थांबण्याची इच्छा आणि कुठे पीचडी. माझं मलाच कधी कधी फार आश्चर्य वाटत ह्याच कि मला अजिबातच लिहायला आवडत नव्हतं, म्हणजे मी खूप रागवून घेतलं आहे ह्या करता. हां, शाळेत / परीक्षेत निबंध, किंवा अगदी अत्यावश्यक एवढंच मी लिहीत असे, कामापुरता मामा. आणि आता बघा, क्षणभर विश्रांती घ्यायची इच्छा होत नाही, कसं का असेना पण टिपावंसं वाटतंच.
दुसरं पण उदाहरण माझ्याच घरातलं, माझी सावली, माझी लेक, साधारणतः दहावी / अकरावीत कोणी विचारलंच कि पुढे काय करणार आहे, तर म्हणायची कशी "काय करणार नाही हे मला पक्के माहित आहे, मला काहीही झालं तरी इंजिनीरिंग आणि त्यातनं संगणक च इंजिनिअर नाही व्हायचं". आणि आता? मॅडम तेच करत आहेत. काय म्हणायचं ह्याला कोणास ठाऊक. असो.
सांगण्याचं तात्पर्य असं कि मला मनापासून गृहिणी व्हायचं होत, फक्त घर उत्साहाने सांभाळायचं होतं आणि मी तितकीच सतत घराबाहेर राहिले कित्येक वर्ष. आवडीचंच क्षेत्र / माणसं / नोकरी / मित्रपरिवार / घर / शेजारी ई. मिळालं तर सोन्याहून पिवळं, पण काही कारणास्तव नाही मिळालं तर काही हरकत नाहीच. माझ्या अनुभवा वरून सांगते थोडे दिवस त्या क्षेत्रात सरले कि आपोआप मनापासून आवडायला लागतं, आपलंस होतंच. मिळालंय ते तुमच्याच साठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या योग्यतेच आहे ह्यावर विश्वास ठेवाच. "श्रद्धा आणि सबुरी" ठेवा म्हणजे मार्गक्रमणा चालू राहिल च.
शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२
विश्वास / एकाच्या विचाराचं
अनेकदा माझ्या लिखाणात आलं आहे आज पर्यंत असंख्य वेळा कि "माझे बाबा म्हणजे एक अक्षरश: विद्यापीठ होते". ते फारच सोप्पे आणि साधे वाक्य / शब्द / क्लुप्त्या ई. सहज सांगून जायचे. त्यातलच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा नेहेमी सांगायचे कि "घरात शांतता हवी असल्यास एकाच्या विचारानं चालावं, आणि नेहेमीच. विचारलं तरच सल्ला द्यावा". हे वाक्य माझ्यात इतकं भिनलं आहे ना, आधी मला नव्हतं प्रॅक्टिकली नव्हतं जमत पण आता अगदी मनापासून आणि न-कळत जमतंय, शिस्तीत आणि त्याची फळं मला चाखायला मिळताहेत. का आणि कसं झालं हे मला माहित नाही, मला त्यात पडायचं पण नाही, पण जे झालं ते खूप च शांतपणे झालं, आनंदात आणि समाधानाने झालं ह्यात वादच नाही. विश्वास होताच, पण तो प्रत्यक्षात उतरला आणि काम अगदी एकाच्या डोक्याने पट्टाकिनी झालं. ते म्हणतात ना "मोर कूक स्पॉईल द फूड", तस्स काहीस.
माझी बदली झाली होती ५ महिन्यांकरिता. त्याच वेळी राहत्या घराचा विक्रीचा व्यवहार झाला आणि तो होणं अत्यावश्यकच होत मुलाच्या फीची सोय झाली. त्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या घरात राहायला जाणं आलं. ते अनेक वर्ष भाड्याने देण्यात आलं होत, जुनं झालं होत, त्यामुळे डागडुजी करणं फारच महत्वाचं होत. माझ्या ह्यांनी उचलला विडा आणि लागले कामाला. मी एक गड आणि ते दुसरा सांभाळत सुरु झाली कामं दोन्ही एकदम. संपूर्ण घराचं काम त्यांच्या इच्छे प्रमाणे, त्यांना हवं तस्स, अगदी त्यांच्या आवडीचं सुरु झालं. आणि हो त्यांची आवड सर्वांना माहित आहेच, नाही का?. हो बरोबर ओळखतलं. तर आज आता जवळपास काम संपत आलं आहे. सकाळी हे म्हणतात कसे कि ज्याने आमच्या घरचं काम केलं तो म्हणतो कसा "मॅडम अधेमधे आल्याचं नाहीत, हे जगावेगळं आहे हो, खरं तर हे उलट असतं. मी इतकी वर्ष ह्या व्यवसायात आहे, असं मी कधीच नाही बघितले". अहाहा मला इतका आनंद झाला म्हणून सांगते, मी कधी नव्हे ते पोटभर अगदी आनंदात रमत हासले. अहो आयतं घर मिळतं आहे ह्या पेक्षा अजून काय हवंय मला, जबरदस्तच. माझ्या डोक्याने केलं असतं तरी देखील ते मलाच सांभाळायचं असतं, आता देखील मीच राणी, नाही का? मग... घराला घरपण देण्याचा प्रयन्त अजून मनापासून होणार आता ह्यात काहीच दुमत नाही. पण माझी ढवळाढवळ नसल्यामुळे आणि कटकट कदाचित म्हणता येईल त्यामुळे कामाला वेग आला, कुठलाही गोंधळ न होता. आमच्यातला हा बदल वाखाणण्यासारखा आहे, आमच्यासाठी. अलिप्त राहता आलं, भन्नाट. आवडलं फार मला, त्या डिझाईनर ला देखील.
"कभी कुछ ना कर के भी देखो..." हि अशी कॅडबरी ५-स्टार ची जाहिरात आहे, अगदी त्याचं काटेकोर पालन मी केलं घराच्या पुनः निर्माणाच्या वेळी आणि बहुतांशी त्या नंतर नेहेमीच. गरज असेल तेव्हाच माझी बहुमूल्य ऊर्जा मी खर्चते. कारण माझं असं ठाम मत आहे कि "काहीही न करणं / शांत राहणं / अधेमधे न करणं" देखील खूप महत्वाचं आणि उपयोगी आहे, ती एक फार मोठी मदत आहे. त्यामुळे मंडळी "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" अस्स अजिबातच करू नका कधीच. आपल्यापुरतं बघा, जेथे आवश्यक आहे तेथे मदतीचा हात द्या, अत्यानंदाने जगा आणि परमानंदाची अनुभूती घ्या, सदोदित.
गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२
खळबळाट
एक आटपाट नगर होतं / आहे हो, अर्थात २०२२ मधे. त्या नगरात एक सुंदर चौकोनी कुटुंब राहतं, त्यात आई बाबा आणि दोन मुलं. एक महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात आणि हो नोकरी खिशात असलेला आणि दुसरा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी. दोघेही मोठे, समजूतदार, आई बाबा अर्थातच ऑफिस ला जाणारे आणि प्रचंड व्यग्र कामात. अगदी सुरवातीपासूनच आई नोकरी करणारी आणि मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर त्यामुळे दोन्ही मुलांना घर कामाची, वाण सामान आणण्याची, निर्णय घ्यायची, आवाक्यात पण पैसे खर्च करण्याची सवय, थोडक्यात म्हणजे घराला /आईला मदत सतत मिळाली आहे मुलांकडून. आता ते कुटुंब एका भल्यामोठ्या घरात जाणार आहेत राहायला, नवीन घेतलंय सर्वानुमते. सध्या सर्व सामान / घर सगळं इतस्त्तः पडलंय आणि ते अर्थात होणारच. कारण चौघांपैकी कोणालाच खूप वेळ नाही पण जेवढा केवढा वेळ आहे त्यातून ते आवरासावर करत आहेत. ह्या सगळ्या घोळत घरी काम करणाऱ्या मावशी जर समजलं नाही कि काय / कुठलं सामान टाकून द्यायचं, कुठलं घेऊन जायचं, कुठलं ठेवायचं ई. म्हणून सध्या राहू देत आहेत जैसे थे, आणि आई कुठे कुठे बघणार म्हणून पसारा चालतोय सध्या सर्वत्र. त्यात काही दिवसांपूर्वी हे सगळं कमी होत म्हणून काय पण आईला नवीन किटाणू ने त्रास दिला आणि ८-१० दिवस घरी दार दडपून जबरदस्ती कोंडून घ्यावं लागलंच. त्या तुरुंगातून बाहेर आल्यावर तिला मुलांच्या चेहेऱ्यावर जरा गंभीरता दिसली आणि ती जवळपास ३-४ दिवस टिकली. ती हैराण पण कामाचा डोंगर इतका होता कि त्याकडे तिचं सहज न-कळत दुर्लक्ष झालं. पण सरते शेवटी दोन टप्प्यात उलगडा झाला, एक म्हणजे घरी म्हणे प्रेग्नन्सी किट सापडली. तिला वाटलं घरी सतत लोकांचं येणं-जाणं-राहणं सुरूच असतं, त्यामुळे असेल कोणाची तरी, राहून गेली असेल, त्यात काय, आजकाल कॉमन आहे फार. आता सगळं सामान बाहेर येतं आहे त्यामुळे असेल. तिच्या साठी तो विषय संपला होता. पण मग धाकट्याने का कुणास ठाऊक नंतर सांगितलं कि "आई अगं काय बघतोय आम्ही सगळे, वापरलेली किट बघून आमच्या पायाखालची जमीन सरकली, आता काय हे नवीन, कसं होणार, का? आणि असे असंख्य प्रश्न आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर आले. ३-४ दिवस इतके भयानक गेले. आणि अशी वापरलेली का टाकलीस उघड्यावर?" आणि नंतर तोच सांगतो कसा "अगं ती तुझ्या करोना ची टेस्ट केली ना, त्याची किट होती, नीट बघितलं तेव्हा उलगडा झाला".
बाप रे. काय हे? अगदी "बधाई हो" सिनेमाची आठवण झालीच हा किस्सा ऐकून.
किट तय्यार करणाऱ्यांनी पण कॉपी करावी पण इतकी हुबेहूब कि काहींच्या घरात त्यामुळे खळबळ माजते / भूकंप येतो आणि बरेच काही. काय हे, काही तरी वेगळं आता तरी करा मंडळी,
दोन्ही किट वेगळ्याच दिसायलाच हव्या, रंग रूप आकार सगळं म्हणजे सगळं संपूर्णच वेगळं हवं, प्लिज, अहो वेळ गेली नाही, अजून काही घरात स्फोट व्हायच्या आत.
पेड - अनपेड
अगदी सुरवाती पासून जेव्हा मी पैसे हाताळणं सुरु केलं तेव्हा पासून कधीच म्हणजे कधीच कोणाचे पैसे द्यायचे राहिले नाहीत, अगदी वेळेवर दिले / दिले गेलेत. उदाहरण सांगायचं झालं तर आताशा तर टॅक्सी वापरली कि ताबडतोब पैसे द्यावेच लागतात, बहुतांशी जर सेटिंग केलं असेल तर तुमच्या खात्यातून परस्पर दिले जातात किंवा कंपनीला. ह्या संदर्भात मला सध्या सारखे फोन / मेल यायला लागले कि तुमचं बिल due = देय आहे ते लवकरात लवकर चुकतं करा. मी अवाक, म्हटलं हे कसं शक्य आहे. आणि जी किंमत त्या बिलाची होती त्या किमतीची टॅक्सी मी कधी वापरलीच नाही. म्हटलं हे काय अनपेड प्रकरण नवं.
अनपेड ह्या साध्या संज्ञा वरुन आठवलं कि आपण कोणाकोणाचं आणि काय काय देऊ करतो, फक्त पैश्या बद्दलचीच देवाण घेवाण असते का? उदाहरणार्थ वैविध्य प्रकारच्या झाडाझुडपांकडून आपण काय काय घेत असतो ते रिपे = Repay करतो का? मग फक्त घ्यायचं का? द्यायचं केव्हा? कधी? कसं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? ह्याचा अर्थ असा नाही कि उद्याच हातात कुदळ घ्या आणि लागा कामाला, अजिबातच नाही, पण
- शेतकरी आणि त्याचं कुटुंब जे कष्ट करतात त्याची जाणीव असू द्या
- अन्न वाया जाऊ देऊ नका
- झाडं जगवा / वाढवा / लावा
- आपल्या एका मुळे पर्यावरण / निसर्ग ह्यांना हानी पोचणार नाही हे बघा
एकंदरीत काय तर हिशोब नेहमी क्लिअर ठेवा, मग तो फक्त खाण्यापिण्याशीच संबंधित नाही किंवा फक्त वातावरणाशी नाही, सख्य असो, नाते, मित्र मैत्रिणी, शेजारी-पाजारी आणि बाकी सर्वच पशु, पक्षी, झाडं, फुल, पानं, निर्जीव वस्तू देखील मंडळी. आपण सर्वांचंच देणं लागतो, हे नेहेमी लक्षात ठेवा. आधुनिकीकरण हवं म्हणजे वातावरणाचा समतोल राखूनच, उध्वस्त करून नाही. जरी पेड-अनपेड हे इंग्लिश भाषेतले शब्द असतील तरी देखील पेड हा मी हिंदीतला एक शब्द धरून जे सुचलं ते मांडलं.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...