गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

वॉकर एक बांधिलकी

एखाद वर्षाचं बाळ झालं कि त्याला पाय फुटतात आणि त्या दरम्यान प्रकर्षाने पायात छुमछुम, तांब्याचे वळ घालतात आणि शिवाय वॉकर ची मदत घेतात. बारश्यातच गुंतवणूक म्हणून, दागिना म्हणून किंवा उपयोगी म्हणून पायात छुमछुम किंवा वळे घातले जातातच किंवा काही जण नंतर घालतात, त्या बाळाच्या हालचालींचा मागमूस कळावा / लागावा म्हणून. वॉकर दोन प्रकारचे मी अनुभवले आहेत, सजीव आणि निर्जीव. म्हणजे ज्यांच्या घरी आजी-आजोबा किंवा इतर मंडळी आहेत आणि ते अगदी कौतुकाने त्या बाळाला चालायला मदत करतात, प्रोत्साहन देतात. काही फक्त पांगुळ गाड्याची ओळख करून देतात त्या बाळाला आणि तो / ती फिरते घरभर, अर्थातच मोठ्यांच्या देखरेखी खाली. मला त्या बाळाला पाहून तरी असं वाटतं कि त्या बिचाऱ्याला बांधलंय त्यात, कधी कधी जबरदस्ती. आणि त्याला त्यातून स्वतः बाहेर पडता पण येत नाही सहजी. आज ह्याची का आठवण झाली म्हणताय? सध्या हायब्रीड मोड मधे शिकवणं सुरु आहे माझं, त्यामुळे काही विद्यार्थी वर्गात हजर आहेत आणि काही ऑनलाईन घरी. त्यामुळे मी वर्गात जाते, संगणक समोर ठेवते आणि वर्ग घेते / शिकवते. त्यामुळे मला संगणका समोरून हालता येतच नाही, हालले कि घरच्यांना म्हणजे विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन जॉईन झाले आहेत त्यांना ऐकू येत नाही, मी दिसत नाही, त्यामुळे मला ह्या वयात पांगुळ गाड्यात बसल्याची जाणीव होते आहे, बांधिलकी असल्यासारखी.  लहानपणी त्या पांगुळगाड्यात बसून / उभं राहून काय झालं होत माझं कोणास ठाऊक पण हे हायब्रीड वर्ग सुरु झाल्यापासून मी खूप एन्जॉय करते आहे पांगुळगाड्याची / तत्सम अनुभूती ह्या वयात, अहाहा. "असे दिवस येति आणि स्मृती ठेवुनी जाती". आता मला खरंच वाटतंय कि एकतर अशी गाडी असावी ज्यात पुढे माझा संगणक, मी बसलेली आणि शिवाय सर्व वर्गात फिरता येतंय = आधुनिक पांगुळगाडा मोठ्यांचा. किंवा बाळ कडेवर घ्यायची मोडलेली सवय पुन्हा करून घ्यावी लागेल आणि चार्जे लॅपटॉप हातात घेऊन फिरून बघायला हरकत नाही वर्गात, जपून, न धडपडता. दोन्ही अशक्य पर्याय आहेत. पण असो. गोळाबेरीज म्हणजे सजीव विद्यार्थी दिसत आहेत डोळ्यासमोर, समृद्ध झालेली डोळ्यांची भाषा अनुभवता येते आहे, तो कलकलाट, तो उत्साह, ती तरुणाई ई. सगळं पुन्हा नव्याने अनुभवता येतं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...