माझे एक शेजारी आहेत. ते काका अगदी दररोज न चुकता, घडाळ्याच्या काट्यावर खाली येतात. थोड्या चकरा मारतात, चालतात हो आणि त्यानंतर ते त्यांची कार उघडतात, फडकं काढून संपूर्ण कार साफ करायला सुरवात करतात, आतून बाहेरून, इकडून तिकडून. खूप वेळ घालवतात दररोज कार सोबत. हे दार उघडणार ते दार उघडणार, झटणार कारण पालापाचोळा पडला असतो. आणि हो हे सगळं व्यवस्थित तय्यार होऊन उत्साहाने. कित्ती छान पूर्ण अगदी जसे कि बाहेर जायचं आहे अश्या तऱ्हेने आटपून सकाळी सकाळी येऊन प्रदक्षिणा सुरु असतात. त्यांच्या सातत्याला सलाम. त्यांना प्रचंड प्रेम आहे त्यांच्या त्या कार वर. त्या प्रदक्षिणा म्हणजे पण एक प्रकारचं चालणंच नाही का, आणि ते देखील प्रसन्न वातावरणात, भरपूर पोपट बडबड करत असतात, वारा असतो, कार ला स्वच्छ बघून आनंद मिळतो हे वेगळंच. दररोज सकाळची त्यांची आणि माझी सुरवात फार छान केल्याबद्दल शतशः धन्यवाद.
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
झाडू बॅट
आई शपथ, किती महिन्यांनी मला आज एक संधी / मौका मिळाला घर झाडायचा हो, अगदी बरोबर ओळखलंत, आमच्या मावशी त्यांच्या कोणाच्या तरी समारंभाला गेल्या आहेत, सुट्टीवर आहेत. म्हटलं चला माझंच घर आहे आणि कधी तरी झाडू मारणं बनता है ना. पण अहो इतक्या वर्षांनी नसलेली सवय, कोणाला? दोघांना हो, मला पण झाडू पकडण्याची सवय नाही आणि झाडूला माझ्या हाताची. मग काय धमाल झाली. सध्या क्रिकेटचं वारं आहे सगळीकडे, मुलांच्या आणि मुलींच्या म्याचेस सुरु आहेत, ते लक्षात घेऊन मग मी दोन्ही हाताने विविध प्रयोग करत सरते शेवटी आनंदाने सगळं घर चकचकीत केलं. तो झाडू जेव्हा जागेवर स्थानापन्न झाला तेव्हा मला ऐकू आलं "सुटलो एकदाचा बावा, कधी येणार माझ्या प्रिय मावशी" असं काहीतरी. पण अहो असा संवाद साधता साधता, बॅट म्हणून प्रयोग करता करता कधी ते घर कचरा मुक्त झालं हे मला कळलं देखील नाही. आणि थकवा वगैरे पण जाणवला नाही. खूप मज्जा आली. नाही तर आधी माझी फारच चिडचिड होत होती, काय हे मी का घर झाडायचं ई. पण आज नाही हो. आणि मला खात्री आहे हे किंवा असे प्रयोग करत करत काम केलं कि सगळंच साधलं जाईल, मावशींची सुट्टी, काम, स्वच्छता आणि हे सगळे आनंदाने आणि न-थकता. गाणी लावली, दोन हात वापरून, धूळ झटकून काय काय केलं. माझं घर हे मैदान झालं होत थोड्या वेळा करता माझ्या साठी. अहाहा च.
सपाता बऱ्या हो देवा
गवताच्या किंवा गवतासारख्या दिसणाऱ्या काड्या जोडून / बांधून चपला तय्यार केल्या जातात. माझ्या मते त्या नाजूक असाव्यात, किंवा घरी वापरण्यासाठी, किंवा शौक म्हणून विकत घेतल्या जात असतील. मजबूत दिसत नाहीत आणि नसतील पण. त्याचा आकार पण थोडासा मोठा / अती मोठा असतो, पायाच्या आकाराहून भला मोठा. त्यामुळेच सहज व्यक्ती जेव्हा आरामात घरी आहे, त्यावेळी चालणं, गती, कुठेतरी वेळेवर पोचण्याची घाई ई. नसते त्यामुळे ह्या अश्या चपला वापरल्या तर हरकत नाही. माझ्या दृष्टीने खात्री नाही ह्या चपलांची कि त्या किती दिवस टिकतील, किंवा त्यांचं आयुष्य किती असेल. असो. आज हा विषय का?
अहो काय सांगू, कोणाही बद्दल कधीही काहीही बोलायला किंवा उणंदुणं काढायला मला अजिबात आवडत नाही कारण प्रत्येकजण त्यांच्या दृष्टीने विचार करून कृती करतात आणि मी कोण हो त्यांना Judge करणारी. पण काही दिवसांपासून मी एक व्यक्ती अशी चप्पल भल्या मोठ्या ऑफिस मधे घालून जातांना बघते आहे. धनाढ्य व्यक्ती, पैसा अडका इतका कि कुठे ठेऊ आणि कुठे नाही हि स्थिती, घरच्या अंगणात चकचकीत गाड्यांचा ताफा आणि बरेच काही. अशी पार्शवभूमी असतांना देखील त्यांना अगदी साधं राहणीमान आवडतं हे खूपच चांगलं आहे, अहो पण ऑफिस मधे कित्ती चालावं लागत, वेळेचं बंधन असतं, त्यामुळे गती पण जास्त असू शकते. आणि अश्या वेळी जर ह्या चपलेने धोका दिला तर? आजकाल तर चांभार पण जागोजागी दिसत नाहीत बसलेले. आणि शिवाय रंगसंगती पण महत्वाची, फक्त तुम्हालाच / घालणाऱ्यालाच नाही तर समोरच्याला पण, तुमच्याकडे बघणाऱ्याला देखील. नाही का? आपण बाहेर पडलो कि फक्त आपले नसतोच. एक नाही दोन नाही अनेक दिवस सलग हे दृश्य बघून मला जरा पोटात गोळा आला आणि त्यामुळे लिहायचं ठरवलं. साधं पण प्रदर्शनीय असावं माणसाने नेहेमीच, ह्याचा अर्थ महागड्याच वस्तू वापरायच्या असे नाही पण इतक्या टोकाचं तरी वागणं नको. काही आपल्या धुंदीत अनेकदा घरच्या पण व्यवस्थित सपाता घालून इकडे तिकडे दिसतात, ते पण योग्य नाहीच, पण हे तर त्यापल्याड गेलं हो. असो. ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, काय करू नये हे समजलं, मला आणि वाचकांना, हे हि नसे थोडके.
बुधवार, ३० मार्च, २०२२
पेशल मसाला चाई
आज मला सकाळी आयता चहाचा कप हातात मिळाला. तो फारच पेशल चहा होता, मसालेदार अगदी. भरपूर मसाला, वेगळा अनोखा स्वाद, मज्जा आली. एक एक घोट, अजून एक घोट पिउन बघता बघता चहा कधी संपला ते समजलं देखील नाही हो, कारण प्रत्येक घोट मसाल्याची लज्जत आणखी वृद्धिंगत करत होता. अहाहा च. पहिल्या घोटात समजलं कि आलं मस्त टाकलंय भरपूर आणि ते देखील किसून हो. किसलेलं आलं, ठेचून घातलेलं आलं, वाळलेलं आलं, तुकडा आल्याचा असं अनेकविध प्रकारे चहा तय्यार केला जातो, जशी दिवसाची सुरवात होईल तशी, वेळ असेल तसा, घाई कितपत आहे, आलं कश्या स्थितीत आहे, आणि बरेच काही. काही घोट घेतल्यावर अजुन एक नवीन स्वाद किंवा काहीतरी वेगळं घातलंय हे लक्षात आलं माझ्या जिभेला. खात्री करण्यासाठी पुन्हा एक-दोन घोट घेतले आणि निश्चित उमगलं त्या मागचं रहस्य / गुपित. मग पुन्हा हा रहस्यमय घटक आला कोठून हे विचार करता करता आणखीन दोन घोट उतरले घशा खालून. पण काही उमगेना. मग मी काल काय काय पदार्थ केले गेले होते ते आठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं कि काल कढी करण्यासाठी आलं आणि लसूण किसून ठेवलं होतं मावशींनी. मग मी अगदी जेवायला बसायच्या वेळी कढी फोडणीला टाकली. काल यथेच्छ जेवण झालं आणि आज चहा हातात मिळाला कारण मी थोडीशी आवरासावर करत होते. मावशींची सदाची घाई, पळापळ त्यामुळे त्या किसणीला फक्त पाणी दाखवलं होतं मावशींनी हे स्पष्ट झालं. पण त्यामुळे अस्सल मसालेदार, "ना भूतो ना भविष्यती" असा चाखायला मिळाला ना मला. मस्तच. मज्जा आली, खूप वेगळ्या नोट वर / कौर्ड वर दिवसाची सुरवात झाली आणि ह्या अनुकथेचा जन्म देखील मसालेदार. वा. मावशीचे आभार. "ताक हि फुंकून प्यावे" अगदी तसे आता किसणी पण धुवून घ्यावी लागणार वापरायच्या आधी किंवा वास तरी घ्यावा लागणार अंदाज येण्यासाठी.
दमछाक
माझी एक तरुण सहपाठी आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो एकाच विभागात. नॉर्मल दिवस होते तेव्हा दररोज न चुकता डब्बा एकत्र खात होतो, अधेमधे कॅन्टीन ला जायचो फडशा पडायला, कधी कधी कोणी काही खास करून आणायचो, गप्पा आणि हशा पिकायचा तो थेट आसमंतालाच भिडायचा. ह्या माझ्या तरुण मैत्रिणीच्या अनेक अद्वितीय आणि असाधारण अश्या खास गोष्टी होत्या. आता होत्याच म्हणायला हव्यात कारण इतक्यात त्या कुठे लोप पावल्यात कोणास ठाऊक, किंबहुना माहिती आहे मला आणि हाच ह्या अनुकथेचा विषय आहे. त्याच्या खास गोष्टींपैकी काही म्हणजे चविष्ट पास्ता आणि केळाच्या पुऱ्या, एकसारखी बडबड आणि असंख्य प्रश्न, इतके कि मला गप्प करायच्या. बघा मंडळी, मला, आणि गप्प म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच कि किती प्रश्नांची सरबत्ती असेल. वैविध्य विषयांवर गप्पा मारून आणि हसून पुरेवाट होत असे. हरवले ते दिवस, पण असो कोणीही कधीही असं कचेरीत उत्साहाने एन्जॉय केलं नसेलच. आम्ही भन्नाटच होतो आणि आहोत. चार पाच वर्ष मिळाली आम्हाला सलग एन्जॉय करायला माझ्या मते १३-१७. मी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देते, कारणं अनेक आहेत. माझी PhD आजच्या मानाने सोप्पी झाली असं आता म्हणता येईल. आता हि माझी तरुण सखी PhD + पूर्ण वेळ झोकून देऊन ऑफिस च काम + घर + पिल्लू + ऍडमिशन च काम + प्रमोशन च्या विविध गोष्टी + पेपर्स लिहिणं + आई-बाबा + सासरचे ई. आणि बरेच काही उत्साहात करतात ना कि दही बोटं तोंडात. ह्याचंच पिल्लू घरी असतं, फक्त इमॅजिन करा तो कित्ती प्रश्न विचारात असेल, शेवटी उतरलं असेलच ना त्यात देखील. म्हणजे मज्जाच मज्जा आणि एक अजून काम. देवा. दमछाक होत असेल पण कधी म्हणजे कधीच त्या दाखवत नाहीत, चेहेऱ्यावर कधीच ते उमटत नाही, पण हो जराशी चाल बदलली आहे सध्या, सतत संशोधनाचाच / कामाचा विचार करत असतात हे दिसतं चालतांना पण, तेवढा देखील वेळ वाया जाऊ देत नाही, किंबहुना सदुपयोगाचं करतात त्या वेळेचा. अहाहा च.
सद्य स्थितीत अवघड झालयं पेपर्स लिहिणं, ते पट्टाकिनी अकॅसेप्ट होणं, त्यात गाईड एका टोकाला, ह्या दुसऱ्या, खरोखर कष्ट आहेत, सचोटी आहे, आणि कमाल आहे खरंच. कसं सगळं करतात कोणास ठाऊक. अगदी मनापासून सलाम, अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, त्यांना १० हत्तीचं बळं मिळो हि ईशचरणी प्रार्थना. मी ह्या माझ्या चिरतरुण मैत्रिणीला इतक्या वर्षांपासून अगदी जवळून बघितलं आहे, ओळखते त्यामुळे फार प्रकर्षाने जाणवतं. बाकी समस्त तरुण मैत्रिणी ज्या ह्या काळात PhD करत आहेत आणि बाकी डोलारा सांभाळत आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. धन्य धन्य आहेत सगळ्याच. "अश्या मैत्रिणी सभोवती असती आणिक स्फूर्ती देऊनी जाती".
थांब ना रे तू
आज पुन्हा एकदा हे बोल, आर्त स्वर कानावर पडले आणि माहित नाही काय झालं. असं का होतं? प्रत्येक दिवशी का? एखाद वेळी आठवण येणं साहजिक आहे, पण मला अजूनही सावरता का येत नाही आहे. त्या घटनेला देखील आज १३ वर्ष झाली, मी स्वतः अर्ध शतक गाठलं, आणि मला हे जगजाहीर सत्य माहित आहे कि आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस दूर जाणार, मग का. हि अपराधी भावना आहे फक्त? का अजून काही? मला उत्तर नाही सापडत आहे. मला हे देखील माहित आहे कि आता वाईट वाटून, डोळ्यात पाणी आणून काय फायदा, जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही काही सुचलं, का मी स्वतःला घर-ऑफिस ह्या मधेच गुरफटून घेतलं आणि बाकी दुर्लक्षिलं गेलं. माझ्या कडून काहीही न करून घेता का गेलात इतक्या दूर कि त्या ठिकाणाचा न थांग पत्ता ना तुमचा ठावठिकाणा. अपार कष्ट घेतले माझ्या साठी, अगदी लहानपणी पासून, दररोज, न चुकता सातत्याने मोटिव्हेट केलं, पाठीवर थाप आणि तुमची सदोदित साथ दिलीत, सल्ले दिले, मी काहीतरी वाकडं-हेकडं बिनाचविच केलेलं सगळं कौतुकाने खाल्लं विना तक्रार, सहनशक्तीची तर कमालच होती तुमच्या, अपेक्षाविरहित राहणं शिकवलंत पण मी नाही शिकले, दुर्दैव माझं. माझ्या मनाची सल माझ्या सोबतच संपणार बहुतेक. का का गेलात इतक्या लवकर आणि अश्या ठिकाणी जेथून परतावा नाहीच. या ना एकदा, काही दिवसांसाठी, माझ्या साठी प्लीज, पट्टाकिनी, ह्या क्षणी, आत्ता. लहानपणी माझे सगळे "आत्ताच्या आत्ता पाहिजे ..." हट्ट पुरवले, मग हा पण पुरवा बाबा. चातकासारखी वाट बघते आहे.
प्रियांका चोप्रा ह्यांच्या सुमधुर आवाजातलं, थेट हृदयाला भिडणार असं गीत व्हेंटिलेटर ह्या चित्रपटातलं, ऐका आवर्जून.
https://www.youtube.com/watch?v=KIKWHobV3ZE
नातं
१) सिरीयल मी का बघते टीव्ही वर? हा मला विचारला गेलेला प्रश्न अनेक वेळा अनेक लोकांनी. ह्या न्यू नॉर्मल दिवसात तर स्क्रीन टाइम इतका वाढला आहे कि पुन्हा अजुन एक स्क्रीन नको वाटते. पण आताशा मी फक्त एक सिरीयल आवर्जून बघते / ऐकते १५-२० मिनिट, तेवढंच मला नवीन दागिने दिसतात, नवीन फॅशन समजते, भिंतीवरचे रंग / सजावट बघायला मिळते, काही वेगळे चांगले शब्द / वाक्प्रचार ई. ऐकायला मिळतात ई. अनेक कारणं आहेत.
२) बाबांचे बूट मुलाला यायला लागले कि वडिलांनी मुलाला दोस्त समजावं म्हणे? समजावं? आणि हे फक्त मुलगा आणि वडील ह्यांनाच का लागू हो? आई मुलीला का नाही?
तर त्याचं असं झालं कि परवा मी एक सिरीयल बघत होते त्यात आई आणि मुलीचा संवाद सुरु होता.
मुलगी: "आई मला खूप आवडलं तू माझ्या घरी राहायला आलीस, तू खूप कामं करतेस आणि उगाच म्हणायचं म्हणून नाही बरं का, मला खरंच बरं वाटतंय"
आई : "अगं एकदा का मुलगी मोठी झाली, शाळा कॉलेज ऑफिस ला जायला लागली, बाहेरच्या जगात वावरायला लागली, कि मग सगळे नात्यांचे बंध गळून पडतात आणि मग संवाद सुरु होतो तो फक्त दोन मुलींमधला".
अहाहा च, कित्ती गोड आणि सुंदर मला तर ते वाक्य इतकं म्हणजे इतकं आवडलं कि ज्याचं नाव ते. मित्र समजा / मैत्रिणी समजा कशाला, जरा त्या पुढे जाऊया कि.
मागल्या वर्षी माझी एक विद्यार्थिनी विद्यावाचस्पती झाली. आम्ही सोबत तब्बल ४+ वर्ष घालवली, सूर जुळले, ह्या प्रवासात संशोधन पेपर्स झाले, पेटंट्स झाले, ग्रँट्स मिळाल्या ई. काल आमच्या कामाला अजुन एक अवॉर्ड मिळालं KPIT कडून, त्या साठी अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला होता तेव्हा मी म्हटलं, आता फक्त दोन मुलींमधला संवाद होणार ह्या पुढे, कुठलेही नात्याचे बंधन नकोच, कुठलेही नाव नको, एकत्र सफर करू या, बास. अगदी तसेच माझ्या लेकी सोबत पण मी प्रकर्षाने सांभाळणार आहे ह्या पुढे, आत्ता पर्यंत मी तिला मैत्रीण ह्या पठडीत बसवत होते पण ह्या नंतर एक पाऊल पुढे जाणार. अर्थात ती माझ्या पेक्षा १०० पाऊलं पुढे आहेच आधीच, पण ही नवी दिशा / नवा दुर्ष्टीकोन प्रचंड आवडला आहे मला. मस्तच फायदा झाला मला ते सिरीयल बघितल्याचा. अहाहा च.
H ते H
माझी एक सख्खी मैत्रीण आहे. तिच्या मुलीने १२ वी नंतर हॉटेल मॅनेजमेन्ट चा कोर्से केला. त्या दरम्यान ३ / ५ आणि ७ तारांकित हॉटेल मध्ये तिला काम करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. ती सुवर्ण अनेक कारणांसाठी होती. एक म्हणजे विद्यार्थ्यांना अश्या भव्य दिव्य हॉटेल मधे राहायची संधी मिळाली. आता राहायलाच गेलेत म्हटल्यावर भोजन पण तारांकित पद्धतीचं. त्यानंतर "चेरी ऑन केक" म्हणजे घरच्या मंडळींना पण हॉटेल मधे येण्याची मुभा होती, किंबहुना त्यांना आवर्जून बोलावलंच होत. त्या नंतर तिने ह्या अश्या भन्नाट तारांकित हॉटेल मधे नोकरी पण पत्करली. मज्जाच मज्जा आणि भरपूर कष्ट, समाधान, पैसा, अनुभव प्राप्त होत होता. माझ्या मते ५ वर्ष काम केलं तिने ह्या पद्धतीने. आज खूप दिवसांनी तिची भेट झाली आणि H ते H झालेला फरक समजला, हॉटेल ते हॉटेल चे HR. जीवघेणी शर्यत, उगाचच विचित्र वातावरण, कामाचे तास, टांगती तलवार आणि बरेच काही होत ह्या पाठिमागे. पण आता तिचा स्वयंपाक घर, पाहुणे हाताळणे, आणि बाकी इतर गोष्टींचा अनुभव उपयोगी पडतोय नवीन लोक वेचायला, निवडायला ई. अहाहा. मस्त स्थानांतर / रूपांतर आणि बरेच काही, पटलं मला, योग्य निर्णय. तिच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
थेंबे थेंबे तळे साचे
७० एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल कदाचित, माझ्या आईने अक्षरशः किराणा दुकानातून पुड्या आलेल्या तश्याच ठेवून संसाराची भातुकली सुरु केली होती. मग एक एक छोटा डब्बा करत करत घर आकाराला आलं. सगळ्या भावांनी दिलेल्या पैशातून सोफा घेतला गेला. त्यानंतर स्टूल, एक कपाट ई. प्रत्येक वस्तू ची एक कथा असते. आज बघितलं तर विजोड घर भासेल, कारण कुठलीही थीम नाही, रंगसंगती नाही, ठरवून एकावेळी केलेलं फर्निचर नाही ई. कारण त्या काळी हि आधुनिक पद्धतच नव्हती. त्या काळी टप्प्याटप्प्यातच घर उभारलं जायी, थेंबे थेंबे तळे साचे अश्या पद्धतीने. किंबहुना त्या वेळची शैली, पगार, वातावरण ई. तसंच होतं. आणि हो घरच काय शाळा, कॉलेज, ऑफिस देखील थोड्याफार प्रमाणात तेच दृश्य दिसे. एका तपाचं अंतर दोन मजल्यांमधे, खालचा मजला १२ वर्षांपूर्वी बांधला आणि वरचा आता. जमीन आस्मानाचा पण फरक नाही आहे दोघांमधे, काही म्हणजे काही तुलना नाहीच. वरचा मजला सजला आहे जसा, प्रत्येक गोष्ट उद्याची आहे / भविष्यातली आहे त्यात, आजची नाहीच. इंग्लिश रंग, अचंबित करेल अशी रंगसंगती, गुळगुळीत आणि आरामदायी असे फर्निचर, भव्य-दिव्य वाटाव्या, प्रसन्न करून टाकणाऱ्या सगळ्या वस्तू. असे रंग डेस्क वर बघून कुठल्या विद्यार्थ्याला उत्साह नाही येणार हो, पटापट लॉजिक तय्यार होणार, भन्नाट कल्पना सुचणार आणि मोठमोठाले समाज उपयोगी प्रोजेक्ट्स तय्यार होणारच ह्यात काही शंकाच नाही. ज्या ज्या कष्टकऱ्यांमुळे आम्ही ह्या नवीन वास्तूत कल्पनांचे, प्रोजेक्ट्स आणि कामाचे मनोरे उभारतो आहे त्यांना सलाम, मनापासून धन्यवाद, मग त्यात गवंडी, मेसन, सुतार, लोहार आणि इतर सगळे आलेच.
मंगळवार, २९ मार्च, २०२२
खरं कारण
मी कुठे तरी ऐकलं आहे कि ज्यांचे केस कुरळे असतात त्यांचं आयुष्य पण म्हणे गुंतागुंतीचं असतं, त्यांच्या केसाप्रमाणे. कुरळ्या केसांना सांभाळावं तर लागतंच, पण कंगवा करायला फार वेळ लागतो, गुंता पण खूप होतो. असो. अर्थातच ज्यांचे केस मुळात सरळ आहेत त्यांचं आयुष्य सरळच असणार नाही का. कित्ती भाग्यवान, गुंतागुंत नाही, म्हणजे ते सोडवणं नाही, आणि हि सततची / दररोज ची च गोष्ट हो, वारंवार गुंता होणारच आणि तो सोडवावा लागणारच. कुरळ्या केसांच्या लोकांना खरं पहिला गेलं तर अनेक वरदान असतात, एक म्हणजे ते जसे केस असतात ते त्यांना फार छान दिसतात, अगदी कंगवा केला नाही तरी. कसे पण बांधा, सोडा, वेणी घाला, मस्त दिसतात, घनदाट दिसतात. रोजचा गुंता सोडवल्यामुळे मस्त झालेला असतो त्यांचा स्वभाव, शांत, समजूतदार ई. असा माझा अंदाज आहे आणि हे मी कित्येकदा अनुभवलं देखील आहे. म्हणून येथे मांडते आहे, अपवाद असतील आणि ते असावे पण.
हे सगळं ऐकून मग मला लक्षात आलं कि आजकाल नैसर्गिक असलेले कुरळे केस सरळ का करून घेतले जातात, पैसे देऊन. आत्ता उलगडा झाला, म्हणजे ह्या पुढचं आयुष्य सरळ असणार, कुठल्याही गुंत्याशिवाय. आमेन, अगदी तसेच होवो.
चटके
अनेक वर्ष मी नागपूरकर होते, तेथे उन्हाळा म्हणतो मी. त्या उन्हाळ्यात देखील गरज असल्यामुळे गाडी चालवली, बस ने, इतरांसोबत प्रवास केला. त्यांनतर पुणेकर झाले, अतिशय वेगळ्या गार वातावरणापासून ते प्रचंड तळपता सूर्य हे बदल गेल्या अनेक वर्षात अनुभवले. इथे पण भर उन्हात गाडी चालवली. पण कधीच माझ्या हे का नाही लक्षात आलं कुणास ठाऊक. आज मात्र प्रकर्षाने जाणवलं. गाडी जेव्हा संध्याकाळी ५ वाजता पार्किंग मधून काढली तेव्हा ती फारच तापली होती, प्रचंड ऊन होत आज. त्या तश्या तापलेल्या गाडीत बसल्यावर माझ्या मनात आलेले विचार इथे थोडक्यात मांडते आहे. पांढरी गाडी, झाडाखाली लावलेली जर इतकी तापत असेल ज्यात कापडी सीट कव्हर्स आहेत, तर तो डांबरी रस्ता कित्ती तापत असेल सांगा? फक्त विचार करा. आणि अश्या अनेक तास तापलेल्या रस्त्यावरून जेव्हा सगळ्या गाड्या जातात तेव्हा त्यांच्या टायर्स ना किती चटके लागत असतील. त्यात रस्त्यावर दगड, ठिकठिकाणी खोदलेले, त्याच्या जखमा वेगळ्याच. तरी देखील आपण ज्या गतीने गाडी चालवतो त्या गतीने टायर्स धावत राहतात आपल्यासाठी, आपल्याला / गाडीत बसणाऱ्याला त्याच्या जागी सुरक्षित पोचविण्यासाठी. कमाल कमाल आहे माझ्या दृष्टीने हि. ह्यातून बोध मी तरी असा घेईन कि आई-वडिल देखील असंख्य चटके सोसत मुलांना मोठे करत असतील, सगळेच नाही पण बरेचसे. अगदी तस्सेच ऑफिस मधे वरिष्ठ, जमेल तस्स बहुतांशी प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांभाळून घेतात, त्यांना त्यांच्या परीने चटके खावे लागत असतील संस्था चालवायची म्हणजे. पंतप्रधान देश चालवायचा म्हणजे कमी चटके असतील का? त्यामुळे सजीव किंवा निर्जीव कोणी असो, जे आपल्यासाठी कष्ट करतात, धावपळ करतात, मदत करतात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या त्या सर्वांना मनापासून दंडवत घातलं राहा, नतमस्तक व्हा आणि असेच जमेल तसे, जमेल तेवढे, जमेल तेव्हा दुसऱ्या साठी काही तरी छोटसं करून बघा, किती समाधान मिळतं ते. माझ्या गाडीच्या आणि समस्त टायर परिवाराची माफी मागते मी मनापासून, पण त्यांनी जे मला सुचवलं, दाखवलं, ते अनोखं आहे. टायर काय, आई-बाबा काय कुठलीही, कधीही तक्रार नसतेच, पण तरीही तुम्हाला पुढे घेऊन जातातच, न कंटाळता. मी तर निःशब्द झाले पुरती. धन्य ते टायर धन्य त्यांचे कार्य, परिश्रम, सातत्य.
मी माझ्यातचं गुरफटले
२३ वर्षांपूर्वी व्हाट्सअँप, इन्स्टा, फेसबुक ई. काय साधं मोबाईल नावाचं खेळणं हातात नव्हतं त्यामुळे पत्र लिहिणं किंवा STD फोन ते देखील बूथ वर जाऊन हेच काय ते साधन संवाद साधण्याचं. बास. लग्न झालं, दुसरं शहर, दुसरे राज्य, सगळंच नवीन / नवख आणि त्यानंतर तर नवीन देशचं, मग लेकरं, PhD, पूर्णवेळची नोकरी, घर ई. मधे जे मी गुरफटले कि हवा तेवढा वेळ माझ्या जन्मदात्यानां अजिबातच देता आला नाही. तेव्हा हि उणीव भासत होती, पण आज ते टोचतंय, फार भयानक पद्धतीने जाणवतंय. अर्थात मुद्दाम केलं अशातला भाग मुळीच नाही, पण एखाद्याची, फोन ची, त्याचा आवाज ऐकण्याची वाट बघणं म्हणजे काय हे आता समजतंय. जेव्हा मी ह्या वाट पाहण्याच्या फेज मधून जाते आहे तेव्हा, फार वाईट अनुभव आहे हे नक्की. मी सध्या माझ्या दादाच्या खुशालीची वाट बघते आहे कारण तो श्री. नर्मदा परिक्रमेला गेला आहे, माझ्या भाऊरायाची / त्यांचा आवाज फक्त ऐकण्यासाठी वाट बघते आहे कारण ते मागील दोन आठवड्यापासून प्रचंड कामात आहे, दिवस रात्र एक करून काम चाललंय, खाण्या पिण्याकडे नक्कीच दुर्लक्ष झालं असणार, त्यांचा आवाज ऐकायचा आहे. अशीच माझी आई माझी वाट बघत असणार आणि आता फक्त फोटोत उरली आहे, माझ्या डोळ्यात पाणी, असंख्य आठवणी ई. देऊन फार दूर निघून गेली, कायमची. माझी सर्व जणांना हि कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा कि थोडासा तो फोन बाजूला ठेवा, ऑफिस च्या कामातून अगदी ५ मिनिटं वेळ काढा आणि आपल्या लोकांशी संवाद साधा, बोला, भेटा नुसतं टेक्स्ट नको. माझ्या सारखं फक्त ऑफिस आणि घर करू नका, स्वतःला अनुभव येईल तेव्हाच माझ्या सारखे जागे होऊ नका. कोणासाठी दुःखाचं तुम्ही कारण होऊ नका, कोणालाही (आई वडिल, भावंडं, आई-वडिलांसारखे, तुमच्यावर प्रेम करणारे ई. ) वाट बघायला लावू नका.
सोमवार, २८ मार्च, २०२२
मी आणि लिखाण
माझ्या शाळेतल्या दिवसांमधे मी हवं तेवढं म्हणजे भन्नाट मार्क्स मिळतील इतपत अगदी अलंकारिक भाषा वापरून निबंध, पत्र आणि बाकी लिहीत असे. पण त्यापुढे काही नाहीच. मला माझा मोठा भाऊ नेहेमी फार रागवायचा सतत. म्हणायचा कसा जसं हवं तसं, गरजे नुसार, रागरंग बघून लिहिता आलं पाहिजे, स्वतःहून, कोणाची मदत न घेता. आणि त्याच्या सततच्या ह्या टोकण्यामुळे, वय पण अडनिडं, त्यामुळे अजूनच घट्ट झाला राग लिखाणावरचा आणि ठरवलं देखील, झालं पण लिखाण वगैरे मला करायचं नाहीच, मला लिहिता येत नाही, मी लिहिणार नाही, बाकी सगळं करणार पण लिहिणार नाही. असं काहीस. असो. आणि हो, त्यावेळी शिक्षकाला शिकवता येणं, समजावून सांगता येणं, प्रश्न पत्रिका तय्यार करणं, तपासणं ई. आलं कि पुरेसं होत. आणि आता. संशोधन हा अविभाज्य घटक झाला आहे साधारणतः २०१३ पासून, ९-१० वर्ष झाले. संशोधन करून फक्त चालत नाही ना, काय शोधलं हे जगाला सांगावं लागतं लिखित स्वरूपात. बरं संशोधन मांडण्याचे असंख्य प्रकार, पेपर्स, पेटंट्स, प्रोपोझल्स, ग्रँट्स आणि बरेच काही. प्रत्येक वेळी अश्या पद्धतीचं लिखाण म्हणजे तांत्रिक नावीन्य पूर्ण काम केल्याची गोष्ट रंगवून सांगणे. बास. इतकं ते अविभाज्य घटक असल्यासारखं झालाय, अंगवळणी पडलंय कि सर्वत्र सदानकदा आता फक्त गोष्टीच दिसतात आणि मांडता येतात. आताशा तर दररोज भरभरून लिहिल्याशिवाय चैन पडत नाही, सुचत नाही, अगदी लेखिका वगैरे नाही, पण मनात आलं ते उतरवायचं हे घडतंय. त्यामुळे मलाच माझ्यातला बदल / प्रचंड बदल, कधीही स्वप्नात देखील न पाहिलेला बदल अनुभवतांना समाधान वाटतंय हे नक्की. अशीच अविरत सेवा घडो माझ्या हातून सरस्वती देवीची हि तिच्याकडे प्रार्थना. त्यामुळे मला हि / अमुकतमुक गोष्ट आवडत नाही, ती मी करणार नाही ई. वाक्य उच्चारू नका कधीही, नाहीतर माझ्या सारखे सतत तेच कराल हि शक्यता नाकारता येत नाही.
ग्रास ऑन दी अदर साईड
अगदी आज झालेली छोटीशी घटना आणि खरंच माझे डोळे उघडले. मी हे अनेकदा माझ्या चार डोळ्यांनी बघितले आहे, पण भिडलं आजच, डायरेक्ट थेटच. तर त्याचं असं झालं, एकापाठोपाठ बरं का मंडळी, जसं कि त्या छोटेखानी घटना मला काही तरी खुणावत होत्या. मी ज्या रस्त्यावरून येणं - जाणं करते ती एक बारीक बोळ आहे. त्या रस्त्यावर अगदी त्यांच्याच फक्त मालकीचा आहे असं समजून माझे चार पायांचे दोस्त मस्त पहुडले होते आरामात. आणि हे दोस्त पण ह्याच कलियुगातले ना, मग काय, गाडी आली काय गेली काय ते ढिम्म हालत नाहीत. त्या गाडीवानाने न्ह्यावी गाडी जमेल तशी. देवा. असो. तर माझ्या समोर एका डॉगी ला त्याचा मालक दुचाकी वरून घेऊन चालला होता आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा मालक भल्या मोठ्या चारचाकीतून डॉगी ला नेत होता. सगळ्यांची नजरानजर झाली आणि त्याचं सर्वांनाच मनोगत मला समजलं असं झालं अचानक, काही सेकंदात. रस्त्यावर च्या ना वाटलं कि कित्ती सुखी आहेत, गाडीवर फिरत आहेत, मालक आहे, खाऊ-पिऊ घालतो, गादी झोपायला, गारवा, डोक्यावर छत, स्पेशल खेळणे, कौतुक आणि काय काय. त्याच वेळी गाडीतून प्रवास करणाऱ्यांना जाणवलं असेल कि हे सगळे कित्ती मोकळे आहेत, मित्र-मैत्रिणी आहेत, कुठलीही बांधिलकी नाही, पिंजरा नाही, हवं तस्स वागा, हवं तिथे लोळा, काय मज्जा आहे नाही, गळ्यात पट्टा नाही, कि गुळगुळीत फरशी नाही, मस्त रेती-माती-चिखल अहाहा च. म्हणजे बघा आता "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे". "कोणाचं काय तर कोणाचं काय". मंडळी हि त्या संपूर्ण चार पायांच्या मित्रांची नजरानजर खूप काही सांगून / शिकवून गेली मला आणि समस्त मानवजातीला. आहे त्यात नक्की खुश राहा, तुलना फक्त स्वतःशी करा कि काल मी काय होतो आणि आज बोध घेऊन काय प्रगती केली ते बास, आपल्याला लाभलं आहे ते मोजा नाही ते सोडून द्या, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाग्या प्रमाणे, कृती प्रमाणे, विधिलिखिताप्रमाणेच स्वास्थ्य, संपत्ती, प्रकृती, आणि इतर गोष्टी मिळतात / दिल्या जातात. आहे ते मनापासून आनंदाने सांभाळा आणि पुढे व्हा.
अत्याधुनिक रुमाल
हुषार गुगल बाबा
आई शपथ, तशी पण मी गुगल ची फारच मोठी फॅन आहेच, सगळेच आहेत, पण मी जरा जास्त मोठी पंखा हो. एवढ्यात मला एक मेल आला. त्यात एक गुगल फॉर्म ची लिंक दिली होती. वरिष्ठांचा मेल असल्यामुळे युद्ध पातळीवर हवी ती माहिती ताबडतोब भरून दिली, मेल पाठवला आणि मला ताबडतोब गुगल बाबांनी म्हटलं पण कि तुमची माहिती मिळाली ते. पण त्यानंतर अनेक / असंख्य लोकांचे त्या वरिष्ठांच्या मेल ला भरभरून उत्तरं येत होती. म्हटलं काय करावं, मी पण करू का मेल? आधी माझ्या काही तरुण मैत्रिणींना विचारलं कि काय केलंय त्यांनी, त्या म्हटल्या कि फक्त गुगल फॉर्म भरला तरी पुरेसा आहे, पुन्हा मेल ची जरुरत नाही. मग डोक्यात किडा वळवळला कि मी फॉर्म नक्की भरला ना? काय करावं? म्हटलं एकदा का मी फॉर्म उघडून बघितला कि मला खात्री होईल. म्हणून पुन्हा एकदा त्या दिलेल्या लिंक वर क्लीक केलं तर गुगल बाबा म्हणतो कसा, तू आधीच हा फॉर्म भरला आहेस. हायस वाटलं आणि कमाल वाटली त्या बाबाची, माझ्यासारखीला आवश्यक अशी सुविधा दिल्या बद्दल. आजकाल विसरायला फार होतं, कामात काम, काय केलंय काय राहिलंय हे आठवे पर्यंत ........ जाऊ दे. असो. त्यामुळेच तर मी ह्या गुगल बाबाला स्मार्ट आणि हुशार म्हणते ना.
धन्यवाद खरोखर, माझ्या सारखीची गरज ओळखून सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...