मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

अनोखी प्रसूती


मराठी भाषातज्ज्ञाने काय सुंदर पद्धतीने ह्या भाषेला अलंकार चढवले आहेत, वा. ह्या आधी अनेक वेळा ह्याच प्रत्यंतर आलं मला पण आज चा अनोखाचं आहे अनुभव. तो, ती आणि ते हे अगदी लहानपणी शाळेत शिकवले गेले. अर्थात आईची घरची शाळा आणि मग नेमकी शाळा शाळा. शिकवले गेले ते दोन स्वरूपात, एक प्रत्यक्ष, जाणीवपूर्वक, वर्गात, धडे आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून. दुसरे स्वरूप म्हणजे निरीक्षणातून. एक ठाम मत किंवा शास्त्रीय समीकरण आहे, प्रसूती म्हणजे महिला, मुलगी ह्यांचीच. आताशा सर्वत्रच "आम्ही प्रेग्नेंट आहोत" ह्याचा नारा आहे. आधी तो फक्त होणाऱ्या आई वडिलांपर्यंत मर्यादित होता आता तो आजी आजोबांना पण सामील करू पाहतो आहे. वैचारिक पातळी बदलते आहे. 


आज मी पुन्हा एकदा अनोख्या माहेरी आले आहे. गेल्यानंतर देखील इच्छा पूर्ण होतात ह्या वर माझा आज विश्वास बसला आहे. किंबहुना आई नेहेमीच माझ्या सोबत आहे ह्याची खात्री पटली आज प्रकर्षाने, वेगळ्या स्वरूपात. 


एका काम निमित्य आज मी एका विश्वविद्यालयात आले आहे. तेथे अतिथीगृहात राहते आहे. बैठा मस्त आलिशान बंगला आहे हा. अतिशय मस्त आणि शांत परिसरात वसलेला, पहुडलेला. खूप हिरवळ, झाडी, डोंगर पाठीमागे, मोरांचे आवाज आणि प्रदूषण विरहित जागा. अनेक फळ आणि फुल झाडे आहेत. त्यात एकाच वेळी विराजमान झालेली आंब्याची झाडे आहेत. अचानक मला जगावेगळा, अद्वैत अद्भुत अश्या सुगंधाने मोहित केलं. बघते तर काय एका आंब्याचे झाड मोहराने बहरले मोहरले होते. आणि तेच मला खुणावत होते. अहाहा च. प्रसन्न, प्रफुल्लित व्हायला झाले मला. आयुष्यभराचा सुगंध मी साठवून घेतला माझ्यात आज. ते झाड एक तर लहान, असेल ४ वर्षाचं आणि त्याला जानेवारीत मोहरलेला बहर म्हणजे ते झाड जणू प्रसूत आहे अशी अनुभूती आली मला. लवकरच त्याला फळं धरतील, पहिलटकरीण जशी. ते म्हणजे तो आणि ती चा अनोखा मिलाप माझ्या दृष्टीने. त्या सारखे कणखर उभे ठाकणे आणि ती सारखी मधुर फळे आणि सावली देणे. अशी अनोखी प्रसूती असू शकते ह्याची कमाल वाटली आणि जाणवली मला. ते झाड नेहेमीच प्रत्येक कृतूत बहरू दे अनेक वर्ष हि मनापासून इच्छा आणि प्रार्थना. प्रत्येक प्रसूती जरी अगदी नैसर्गिक, अत्यंत कठीण आणि वेदनादायक असली तरी सुखद असते, शब्दांच्या पल्याड. 


शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निर्माल्य


आपल्या भारतात आणि मी जगले त्या महाराष्ट्र राज्यात संपूर्ण वर्षभर वैविध्य सण साजरे होतात, घर घरात पूजा केल्या जायच्या आणि एक धार्मिक वातावरण सर्वत्र सारखं असायचं. त्या वेळी ते सहज शक्य होतं कारण बंगले होते, दारात पूजेला लागणारी फुलं-पानं होती, आई हे सर्व करण्याकरता घरी असायची बहुतांशी, ई. पूजेनंतर निर्माण होणारं निर्माल्य घरीच, अंगणात, झाडांना वगैरे घालून जिरवलं जायचं. आणि अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळी देवाला वाहण्याच्या फुलांना सुगंध होता, ते नैसर्गिक स्वरूपात वावरत होते. आताचे संपूर्ण दृश्य अगदीच वेगळे आहे. माझ्या पिढी पासूनच सगळ्याच घराबाहेर पडल्या. प्रत्येक सणाला सुट्टी अशक्य. त्यामुळे एकतर थोडक्यात पूजा किंवा नो पूजा अशी परिस्थिती. पुढील पिढीला काही दर्शवू शकलो नाही. इच्छा नव्हती अशातला भाग नाही पण घडू शकले नाहीच. शिवाय सर्वत्र एकसारखे वातावरण. प्रत्येक घरची मुलगी घराबाहेर कामाला. नवऱ्याला, सासरकडच्यांना, मुलांना एक खास विषय "आई काय करते, कुठल्या हुद्द्यावर काम करते". सँडविच पिढी असल्यामुळे कामाला वाघ, ती ओढ पराकोटीची. त्यामुळे पूजा ह्या गुरुजींनी करायच्या, आई कमावतीच हवी आणि पाश्चात्य माहितीची भरमाड ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सध्याच्या पिढीला मानसपूजेला, ऍक्टिव्ह मेडिटेशन ला जास्त प्राधान्य, फारच प्रॅक्टिकल अप्रोच. आणि मी तो मानते, त्यांच्या विचारांचा सन्मान करते. 


अशी मी, किंवा माझ्या पिढीतल्या मुली आणि आपण सर्वांनी एक फारच महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवली पाहिजे आणि करायचं तर संपूर्ण व्यवस्थित, अर्धवट नाही. सध्याच्या घाई गडबडीचा काळात पूजा तर करायच्या आणि निर्माल्य रस्त्यावर, कचऱ्यात किंवा नदीत / कुठल्यातरी पाण्यात फेकायचं, हे मूलतः चुकीचे आहे, अपमानास्पद आहे माझ्या दृष्टीने. एक तर पूजा करा आणि व्यवस्थित निर्माल्य जिरवा, वेळ काढून त्याचा सदुपयोग करा, नाहीतर पुजेचा घोळ नकोच. प्रदूषण, अपघात आणि अपमान टाळा. घरच्या सर्वांनी एक सुसंस्कृत नागरिक म्हणून पर्यावरणाची जबाबदारी घ्या. घरी पूजा व्हावी असं वाटत असेल तर त्याला पूर्णत्व द्या.  

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

मातीशी नाळ


प्रत्येक जीव नाळेशी जोडला असतोच. किंबहुना प्रत्येकाला जीव देणारी ती नाळ. अश्या ह्या अनन्यसाधारण महत्व असेलेल्या ह्या घटकावरूनच हि मराठीतली म्हण जन्मली असावी; "नाळ जोडणे". अनेक ठिकाणी सर्वश्रुत असलेली म्हणजे "मातीशी नाळ जोडणे". प्रत्येकाला बाह्य स्वरूपात हे जोडणे शक्य होतेच असे नाही, कारण ते आव्हानात्मक आहे. पण असे आव्हान पेलणारे नक्कीच वेगळ्या धाटणीतले आणि खास व्यक्तिमत्व. अशीच एक चमू आहे, जे सातत्याने संशोधन कार्य अविरत सुरु ठेवतात, लोकार्पण किंवा लोकसेवा, सुदृढता ह्या शुद्ध, सात्विक आणि निर्मळ दृष्टिकोनातून. त्या चमूचे एका नावीन्याने ओसंडणाऱ्या उच्च पदस्थ पण मुळचे शेतीची आवड असणारे, अगाध ज्ञान असलेल्या एका व्यक्तीशी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे सुपीक माती, सुधृढ गाई / जनावरे, बायोगॅस प्लांट, मुबलक पाणी आणि सर्वार्थाने आत्मनिर्भर अश्या जमेची बाजू असलेले कामाचे ठिकाण. मग काय अमर्यादित क्षमता. त्याचा सदुपयोग करून, प्रयोगाअंती दही आणि लोणी ची कार्यक्षमता वाढवायला सफल झाले. ग्राहक खुश कारण सर्वांना त्याचा परिणाम अनुभवता आला. दही आणि लोणी मातीच्या कुल्लड मध्ये वितरित करायचा प्रयोग यशश्वी झाला, भावाला आणि आवडला. हे सोप्पं नव्हतंच. पण एक अतोनात जिद्द कमी आली. ते कुल्लड तय्यार करणे, विविध्य प्रयोग, मग त्याचे झाकण, मग घरपोच पोचवणे ई. शिवधनुष्य पेलत ते आज यशशिखरावर पोचलेत. मातीशी नाळ जोडणे आपण पुरते विसरलो होतो, जे "ट्रूली देसी" च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून सामर्थ्याने सिद्ध केलं. "केल्याने होतं आहे रे..." हे खरं करून दाखवलं. कुल्लड दही हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. नक्की अजमावून बघाच, आज. 

प्रवेश द्वार


ठिकठिकाणी आपल्या नजरेस पडणारे, अगदी घरी, कचेरीत, देवळात, दुकानात, अगदी कुठेही, आणि त्यात वैविध्य रंगांचे, आकाराचे, प्रकारचे म्हणजे दार, दरवाजे. हे दारं दृश्य आणि अदृश्य स्वरूपाची असतात बरं का. माझ्या पिटुकल्या अनुभवांवरून बोलते आहे मी हे. खैर अदृश्यांबद्दल थोड्या वेळाने बोलू. आधी दृश्य बघुयात. हे खरं तर मी माझ्या एका भूतकाळातल्या विद्यार्थिनी कडून शिकले, किंबहुना तिने मला तिच्या कृतीतून शिकवले. कृतीतून म्हणण्यापेक्षा आचरणातून. हि २०१७ ची गोष्ट आहे, आमची भेट झाली दोघींची आणि त्यानंतर २०२० पर्यंत आम्ही एकत्र होतो. ह्या ३ वर्षांच्या काळात फक्त एकदा तिने मला भिजलेल्या शब्दात थोडक्यात काही सांगितले पण त्यानंतर नाही. तिचा एक मंत्र होता कि कचेरीच्या दारात आलं कि घरं संपूर्णपणे जाणीवपूर्वक विसरायचं, तरच उत्कृष्ट कामे होतील आणि आखून दिलेल्या वेळेत. असं केलं नाही तर मग भज होतं, सगळी गडबड होते आणि काहीच साध्य होतं नाहीच. अर्थात हे घरच्या दारात उभं ठाकल्यावर पण अंगिकाराव, किंबहुना कुठल्याही ठिकाणी हेच सत्य आहे. करमणुकीला गेला असाल आणि जाणीवपूर्वक उत्साहाने जर आनंद उपभोगला नाही तर सगळं व्यर्थ / केरात, नाही का? आणि हो, हे असं करण्यामागे अजून एक भक्कम कारण आहे. आधुनिक संतांकडून ऐकलं आहे कि दारात सातत्याने आनंद+सुख दोन्ही हात पसरवून उभे असतात, आत येण्याकरता. आणि शिकलेली माणसं कुठल्यातरी अगदी नगण्य गोष्टीला कवटाळून दुःख करत बसलेले दिसतात त्यांना. मग कंटाळून ते निघून जातात. त्यांचं घरात नेहेमी स्वागत करा मंडळी, आपल्या मनाची, हृदयाची कवाडं मोकळी करून, उघडी ठेवून. कवाडं बंद झाली कि मग काय डोळ्यावर पण झापड येते. 

माझं अहो भाग्य कि मला त्या वेळी अशी अनमोल संशोधक लाभली. तिच्या ह्या शिकवणी मुळे आज मला सहज सोप्पं जातंय आत - बाहेर करतांना. ती आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे, विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे तिची. संपूर्ण डिपार्टमेंट ला शिताफीने पुढे नेण्याचं कार्य ती करते आहे, तिच्या हातून घडतंय. "असे संशोधक येति आणि स्मृती ठेवुनी जाती".

उंबरा असतो प्रत्येक दाराला, भारतात बहुतांशी बाप्पा असतो विराजमान दारावर प्रतीकात्मक असा, देवळात कासव जसा, मग हे सगळं का? सोप्पं आहे, तेथेच सगळं प्रयत्नपूर्वक सोडून आत येण्यासाठी. बास. 

अगदी प्रत्येक जण कळत-न कळत आई, बहीण, बायको, मैत्रीण, शेजारीण, सखी, ई. भूमिका निभावतो ना. मग अगदी तसेच हे पण आहे. एका पात्रातून दुसऱ्या, इतकं सोप्पं आहे. "केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे". ओझं बाळगून आज पर्यंत कोणालाच काहीच मिळालेलं नाहीच मुळी. चला तर मग प्रवेशद्वाराचे महत्व नव्याने समजावून घेऊ या. जेथे प्रवेश कराल तेथले व्हा. 

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

बीज अंकुरे अंकुरे

 || बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत

कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ||


८० च्या दशकात गोट्या नावाची एक मालिका दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. त्या मालिकेचे हे शीर्षक गीत जे आदरणीय अशोक पत्की सरांनी आकाराला आहे, चाल दिली आहे. आज हे बहुमूल्य असे गीत आठवण्याचे कारण खास आहे. असेच एक आशिर्वादात्मक अंकुर रुपाली आणि अविनाश ह्यांच्या कुशीत बहरू लागले. जगावेगळा आनंद देत होते, ते दिवस काही वेगळेच, शब्दांच्या पल्याड असे. 


|| बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर

लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर

हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ ||


सानिकाची दोन्ही घरचे फार प्रेमाने काळजी घेत होते. आणि काही दिवसात / महिन्यात त्यांच्या एक खास बात लक्षात आली ती अशी कि पिल्लुच्या दुधाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एक वेगळ्या दिशेने विचार करणे आवश्यकच आहे. आणि खास निगराणी ला सुरवात झाली, अभ्यास सुरु झाला, संशोधन प्रारंभ केले गेले आणि अनेक विध बाबी समोर आल्या लख्ख निर्मळ प्रकाश जणू. तिथून मग एक भन्नाट वाटचाल आरंभ झाली. 


|| अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड

मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड

निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात ||


एका नवीन अर्भकाचा जन्म झाला ज्याचे नामकरण केले गेले "ट्रूली देसी". मग एक मोहीमच हाती घेतली गेली ज्यात होती काळी-आई आपली माती, अनेक उत्कृष्ट दर्जाच्या अस्सल देसी गाई आणि त्यांची वासरे, कणखर बैल आणि भली मोठी नावाजलेली फौज, जाणकार मंडळी, निष्णात अनुभवी जेष्ठ. हि मोहीम फक्त सानिका पूर्ती मर्यादित न राहता ती महाराष्ट्रातल्या सर्वांसाठीच उभी ठाकली, मोठी होतं गेली आणि ५ वर्ष सातत्याने नानाविध प्रयोग करत बहुमूल्य झाली आहे, वाखणाणली जाते आहे. 


|| नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु

फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु

क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत ||


महावृक्ष आणि कल्पतरू होण्याकडे वाटचाल आहे "ट्रूली देसी" ची. आता त्यांचा आवाका वाढला आहे. नवनवीन प्रयोग सुरूच आहेत आणि यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे, अथक मेहेनत घेत आहेत सगळेच. पण जे ग्राहक "ट्रूली देसी" चे दूध, आणि दुधजन्य इतर पदार्थ घेत आहे, चाखत आहे, अनेक दिवस वापरात आहेत त्यांना मायेने कोणीतरी अशी उत्पन्ने फक्त त्यांच्या साठी खास तय्यार केली आहेत ह्याची जणीव प्रकर्षाने होतं आहे. त्यांच्या आणि कुटुंबाच्या सर्वंकष वाढीसाठी, आरोग्यासाठी हे आत्यंतिक महत्वाचे आहे हे ठामपणे उमगले आहे. 

प्रत्येक सूर, ताल, शब्द, गंध, वाद्य अशी जगावेगळी जुळवाजुळव होऊन जशी गान निर्मिती होते अगदी तसेच काहीसे "ट्रूली देसी" चे नियोजन जुळले आहेत. भक्कम पायावर इमारत उभी आहे ज्यात प्रत्येक बाबींचा प्रकर्षाने, अनुभवणे आणि संशोधक पूर्व असा अभ्यास नजरेस पडतो आहे. प्रत्येक गाईंची काळजी, त्यांचा आहार, विहार, दुधाची गुणवत्ता, वैविध्य अत्यावश्यक चाचण्या, शुद्धता, सात्विकता, प्रवाहनत प्रत्येक वेळी घेतलेली काळजी आणि घरपोच वितरण, शिवाय हवे तेव्हा प्रत्यक्ष शेतात जाऊन अनुभव घेण्याची सोय. ऑर्केस्ट्रेशन अगदी वाखाणण्याजोगं. 

अशीच "ट्रूली देसी" ची उत्तरोत्तर प्रगती होवो हि मनःपूर्वक प्रार्थना आणि सदिच्छा. 

ती


अगदी काही दिवसांची होती ती, दुपट्यात गुंडाळलेली, भन्नाट गोरी पिल्लू. तेव्हा जर कधी गरज पडली तर मी असायचे, कधी खेळवायला, कधी खाऊ घालायला, कधी आईचं / घरचं साफ सफाईचं काम होईस्तोपर्यंत वगैरे. नंतर मग हा क्लास कुठे लावायचा, हे कुठे मस्त मिळतं अशी छोटीमोठी बातचीत होतं असे तिच्या सोबत किंवा बहुतांशी तिच्या आई बरोबर. 

आज तब्बल १६ वर्षांनी तिलाच मी साडी नेसवली कारण आज तिचा दहावीचा निरोप समारंभ आहे शाळेत. गेले कित्येक दिवस तिच्या आईची लगबग सुरु होती, आमच्या गप्पा देखील होतं होत्या. साडी कुठून घ्यायची, मेकअप - केस कुठून कसे कधी करायचे ई. मग एकदाची साडी तय्यार झाली, आणि नेसली पण गेली. क्या बात है? इतकी गोंडस दिसत होती म्हणून सांगते ती, अनेकदा दृष्ट काढली तरी कमीच आहे. तीच जी माझ्या हातात मावत होती, कडेवर बसत होती, मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत होती,मी  दाखवलेले पक्षी आनंदाने बघत होती, ती आज साडीत, ह्याची देही ह्याची डोळा, खूप भाग्यवान समजते मी स्वतःला. शेजारी इतके मनापासून जवळ असतील हे जाणवलं. मी मोठी झाले आहे हे जाणवलं नाही, असं वाटलं ती तर काल पिल्लू होती, आणि आज बघा एक व्यक्तिमत्व घडतंय तिच्या रूपात. एक नावीन्याने-भरपूर पुण्याची राणी, झाशीची नाही हो. काय काय बोलू आणि काय नाही असं झालयं मला आज. अगदीच आमने सामने घरं, त्यात दोन्ही घरात जुळी त्यामुळे एक वेगळंच नातं, ते स्नेहबंध जुळले गेलेत. खूपच पिटुकली बाब आहे पण मला भावली खूप मनापासून. म्हणून हा पंक्ती प्रपंच. 

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

माझ्या चष्म्यातून


अगदी न कळत्या वयापासून मी माझ्या आईला प्रत्येकाला पोटभर खाऊ घालतांना बघितलं आहे, मग ते घरी येणारे पाहुणे असो, मित्र मॆत्रिणी, नाहीतर रोजच्या मावशी. मला देखील मग तशीच सवय लागली. जमेल तेव्हा जमेल तसं मी पण फुल-ना-फुलाची पाकळी खिलवू लागले. "वर्क इज वर्शीप" / "काम हीच पूजा" ह्या प्रमाणे चाकरमाने ८-१० तास दररोज घराबाहेर असतात. त्यात माझी कचेरी हि गावाबाहेर. त्यामुळे आणि ह्या म्हणीच्या संदर्भातून मी कचेरीत बोलावलेले पाहुणे देखील कधी विन्मुख गेले नाही, काही तरी खाऊनच गेले नेहेमी. शिवाय मला माझ्या PhD च्या गुरूंनी नेहेमी खाऊ-पियू घालून खूप काळजी घेतली मग मी पण मागे राहते काय. माझ्या फड च्या तरुण विद्यार्थ्यांसोबत मी मस्त मेस मध्ये जाऊन भरपेट / यथेच्छ खाऊन येत असे, अनेक वेळा. आमच्या मीटिंग तेथेच होतं बऱ्याचदा. 


मग माझे पाय सूचित करते झाले कि आता जरा हळु मार्गक्रमणा करावी. पण त्यावेळी देखील पाहुणे येणं, PhD मीटिंग ई. सुरु होतंच. मी त्यातून सुवर्णमध्य काढले. एक म्हणजे मी कोणाला दुसऱ्याला पाहुण्यांसोबत जेवण करायला विनंती करत असे. नाहीतर दुसरं म्हणजे जर पाहुणे मस्त ओळखीचे असतील, काही मानणारे नसतील तर उत्तम बेत आधीच आखून घरून अप्रतिम चविष्ट असे त्यांच्यासाठी पण डब्ब्यात घेऊन जात असे. ताटल्या, वाट्या, चमचे ई. सगळे साग्रसंगीत. कधीतरी आणि आधी माहित असल्यावर सहज शक्य होतं ते मला. माझ्या पायाने जाऊन मेस मध्ये खाण्यापेक्षा खूपच चांगला पर्याय. 


मी आताशा अनेक संस्थांमध्ये विविध विषयांवर बोलायला जाते आहे. काही ठिकाणी माझ्या PhD च्या विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांना ठाऊक आहे माझी सवय. त्या मस्त डब्बा घरून घेऊन येतात माझ्या करता. पण इतर ठिकाणी माहिती असून आणत नाहीत, जेवायची वेळ असतांना सुद्धा, हक्काने खाऊ घालणं ते देखील ओळखीच्या मैत्रिणीला हि साधी माणुसकी झाली, नाही का? असो. मी नेहेमीच माझी सोय करून जाते म्हणून वाईट वाटत नाहीच. हसू येतं. माझा दृष्टिकोन असा झाला आहे हे कदाचित मला बदलावं लागेल.

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

ध्वनी आणि वायू प्रदूषण


माझी दाही बोटे तोंडात गेली न कळत जेव्हा मी हे बघितलं कि अगदी उजाडलं कि नाही कि गॅस ची गाडी आलीच म्हणून समजा, मग तो रविवार का असेना. हे चित्र कदापि नव्हतं माझ्या लहानपणी. खूप दिवस आधी गॅस च बुकिंग करावं लागायचं, सिलिंडर घरी आणून देणाऱ्या लोकांची मनमानी / मुजोरी असायची, आणि रविवार काय ते फार प्रकर्षाने कचेरीच्या वेळा पाळायचे. वेळ संपायच्या आत ते गायब. आता हा बदल का झाला अचानक, ते देखील ३६० अंश? खूप सोसायट्या वाढल्या मोठ्या प्रमाणात म्हणून? सोसायट्या वाढल्या कारण लोकं नोकरी धंद्याच्या निमित्याने शहराकडे वळले, विभक्त कुटुंब निर्माण झाले, घरच्या स्त्रीच्या ऐवजी मोलकरणीच्या हाती गेला तो गॅस ई. पण नाही हो, आज मला एक अजून नवीन कारण प्रकर्षाने जाणवले, उमगले. त्याच माझ्या लहानपणी गॅस पेटवण्याकरता काड्याची पेटी वापरली जायची. बहुतांशी एक वेळच्या संपूर्ण स्वयंपाकासाठी आई एकाच काडी वापरलेली मला आठवते कारण तसं नियोजन असायचं आणि गरज भासल्यास कागद देखील वापरला जायचा. त्यानंतर आगमन झाले लायटर महाराजांचे. सगळेच लायटर खूप छान काम करतात आणि बरेच दिवस टिकतात देखील. पण त्यात देखील काही निवडक आहेत जे लावीनपणा त्यांचा संपला कि एका झटक्यात गॅस बर्नर पेटवत नाहीत. बरीच खटाटोप कारवी लागते, गॅस फुल वर ठेऊन खटखट केल्यावर मग काही वेळाने गॅस पेटतो. त्यामुळे गॅस वायू वाया जातो आणि हवेला एक नवीन काम लागतं ते वेगळंच, त्या वाया गेलेय गॅसला सामावून घ्यायचं. सहज अंदाज घ्या असे लायटर जर अनेक घरांमध्ये असतील तर? कित्ती प्रमाणात अपव्यय होतोय. नो वंडर रविवारी देखील आणि क्षणात सिलिंडर आताशा घरपोच पोचता केला जातो, इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर ची गरज भासते आहे. मंडळी, असा जर लायटर तुमच्या घरी असेल तर एक तर नवीन आणा नाहीतर काडेपेटी वापरा. ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा. ध्वनी ह्या करता कारण एक तर खटखट आणि दुसरं म्हणजे त्या सिलिंडर च्या गाडीचा सातत्याने येणार प्रचंड भयानक आवाज.

अंतर्बाह्य


माझ्या महाविद्यालयाच्या दिवसांमध्ये बहुतांशी फक्त सलवार कमीज हा पोशाख घातला जायचा. पँट शर्ट जीन्स ह्याची फॅशन नव्हती म्हणण्यापेक्षा त्या बद्दल ठाऊक देखील नव्हते आमच्या सारख्या त्यावेळच्या मुलींना. सणावारी आईची साडी बास इतकाच काय तो आवाका आमचा. त्या वेळी धोबी चे पण एवढे फॅड नव्हते, घरीच इस्त्री केली जायची आणि ते देखील मुख्यत्वे बाबांच्या कपड्यांना कारण ते कचेरीत जायचे. मग मी पण शिकले इस्त्री करायला माझ्या आणि इतरांच्या कपड्यांना, घरीच. तो एक मस्त कार्यक्रम असायचा. त्यात मग मी कंची मारायला शिकले अर्थात बाकी मैत्रिणींकडून आणि ते आवडले पण मला, किंबहुना भावले. दिसणाऱ्या भागाला फक्त इस्त्री करायची, म्हणजे कुर्ता आणि गुढघ्यापासून खाली पाय, तेवढेच. बाकी जे दिसत नाही त्याला काय गरज इस्त्रीचे अशी माझी भावना त्यावेळी. मग मी काही वर्षांनी एका लग्नाला गेले गावाला आणि तेथे बघते तर काय ५ वारी साडी ज्यावर विराजमान होते त्या परकराला पण तेथे बहुमान मिळत होता. अहो रात्री झोपतांना  घरी घालायचे ड्रेस सुद्धा इस्त्री केलेले. अबब च झालं मला. काही उमगेना असं का ते. आज कित्येक वर्षांनी माझ्या लेकीला साडी नेसायची आहे तेव्हा मी माझ्या साडी ला आणि इतर लागणाऱ्या गोष्टींना इस्त्री करतांना झपकीनी जादू झाल्यासारखं अचानक लक्षात आलं कि परकर चापचूप असेल, चोळगोळा नसेल तर त्यावर नेसलेली साडी आणि मुलगी पण झकास दिसतात. तो एक वेगळाच आत्मविश्वास येतोच आणि झळकतो ती साडी मिरवताना, जे अत्यंत गरजेचे आहे. अंतर्बाह्य सुरकुत्यारहीत, कुठलाही किंतु-परंतु न बाळगणं ह्या सारखं दुसरं जिंकणं नाहीच. आतला परकर इस्त्री केला आहे कि नाही हे कोण बघतंय हि त्यावेळची माझी निरागस भावना होती. पण नसणारा बघतोय ना? त्याला ठाऊक आहेच ना आत काय आहे ते. प्रत्येक पाऊल आत्मविश्वास पूर्व आणि दृढ विश्वासाने टाकणं मह्त्वाचंच आहे. आताशा बहुतांशी सगळेच जणं हे पाळतातच प्रकर्षाने पण नसाल तर करून बघा. फक्त इस्त्री पुरतं मर्यादित न ठेवता मनापासून बदल घडावा. फक्त चेहेरा दिसतो म्हणून सजवणे टाळा. फक्त शारीरिक स्वाथ्य नाही तर मानसिक, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक असे पण स्वस्थ राहा आणि फरक अनुभव. जिम बरोबरीने योग आणि प्राणायाम करा. मस्त खा, आणि अंतरबाह्य स्वस्थ राहा नेहेमी करता, स्वतः करता फक्त दाखवण्या पुरते नाही. 

रविवार, २१ जानेवारी, २०२४

पुरवून पुरवून


सुरभी नावाचा एक नावाजलेला कार्यक्रम होता दूरदर्शन वर, माझ्या लहानपणी किंवा महाविद्यालयात असतांना. त्यात एक प्रश्न विचारला होता कि चॉकलेट चे जे बार असतात त्यात एकसारखे आकाराचे तुकडे आखले का असतात? आणि त्याच उत्तर म्हणजे इतरांना वाटण्यासाठी, एकसारखे आणि सहज तुकडे व्हावे म्हणून ई. माझ्या दृष्टीने एक अजून कारण आहे आणि जे आम्ही जगलो त्या वेळी, पुरवून पुरवून खाण्यासाठी, खूप दिवस मज्जा चाखण्यासाठी. 


त्या वेळी वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणे म्हणजे एक पर्वणी होती, सगळ्या कुटुंबालाच. प्रत्येक वर्तमानपत्राची एक खासियत असायची. त्यामुळे बहुतांशी रविवारी प्रत्येक घरी अनेकविध वर्तमानपत्र यायचे. नाहीतर शेजार कधी कामाला येणार मग? अशी मज्जा होती म्हणून सांगते. वा वा वा च. त्यावेळी आणि आज देखील रविवारी वर्तमानपत्राची पाने जास्त असायची, पुरवण्या असायच्याच, कारण अर्थात रविवार म्हणजे सुट्टीचा आणि हक्काच्या आरामाचा दिवस. त्यामुळे वेळ सत्कर्मी लावण्यासाठी असेल. पण आज मला त्याचे खरे कारण समजले, उमगले अचानक. तसं पाहिलं गेलं तर प्रेस जेथे पेपर तय्यार होतो त्याला कधीच सुट्टी मिळत नाही, सदोदित आपले काम काम आणि काम. पण ज्या दिवशी सुट्टी येते अचानक, आठवड्यात अधे मध्ये त्या दिवशीचा पेपर छापला जात नाही. हे सर्वांना आधीच ठाऊक असते. त्यामुळे मग त्या आठवड्यातला रविवारचा पेपर किंवा पुरवण्या हमखास बाजूला ठेवायच्या म्हणजे पुरवून पुरवून वाचता येईल आणि पेपर आला नाही ह्याची खंत वाटणार नाही. "दुधाची तहान ताकावर" असे काहीसे. मी तरी असे अनेक दा करते. पुरवण्या बाजूला सारून ठेवते आणि मग कधी तरी बदल म्हणून वाचण्याचा परमानंद घेते. बघा अजमावून मंडळी. पुरवून पुरवून खाणे, वाचणे, ऐकणे, ई. मज्जा काही औरच. 

शनिवार, २० जानेवारी, २०२४

व्हाया मीडिया


माझ्या लहानपणी "जागतिक मातृ दिन" नव्हता असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे तो आज सारखा फार च मोठ्या प्रमाणात जगभर खास साजरा केला जायचा नाही. असा काही दिवस असतो हे खिजगणतीत नव्हतं. आता सर्वोश्रुत झालाय कारण कदाचित जाहिराती. प्रत्येक जण ह्या दिवसाची महती सांगतो, मानतो आणि साजरा करतो. त्या वेळी सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर गुरुजनांनी एका वाक्य सांगितलेलं मला आठवतं कि प्रत्येक वेळी परमेश्वर सगळ्या भक्तांकडे एकावेळी पोचू शकत नाही त्यामुळे त्याने आई ची निर्मिती केली. आईच्या स्वरूपात जणू काही "तो" मार्गदर्शन करतो, नेहेमीच. 


अगदी तसेच, घराबाहेर माझ्या मते शिक्षक किंवा गुरुजन असतात, जे मार्ग दाखवतात, पदोपदी, सातत्याने. गुरु कुठल्याही स्वरूपात पुढे येतात, आपल्या सोबती सतत असतातच, फक्त लक्ष देऊन बघायला हवं, ते मदतीसाठी च असतात. आदरणीय श्री दत्तात्रय ह्यांनी अगदी मुंगीला सुद्धा गुरु केलं होतं त्यांचं, कारण तिच्या कडून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहेच. आजूबाजूला असलेले प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटक आपल्याल्याला सातत्याने खूप काही देऊन जातात, शिकवून जातात, ते आत्मसात करा, करत जा, जेवढं हवं तेवढं, आणि मार्गस्थ व्हा. माझ्या साठी तर लिंक्ड-इन हा प्लॅटफॉर्म पण फार मोठ्या गुरूसारखा आहे. त्याला कसं समजतं कोणास ठाऊक, पण माझ्या वेळेनुसार तो मला मार्गदर्शक ठरतोय. 


माझ्या हातून जे पेरलं जातंय ते देखील काही कारणास्तव असणार नक्कीच. त्यात मी न पडलेलं बरं. मला मिळालेल्या भूमिका म्हणजे एका शिक्षक, लेखणीकार, सूक्ष्म स्तरावरची संशोधक, वाहनचालक ई. फक्त एक व्हाया मीडिया. मी कोण होते हो लिहिणारी? शब्द सुचवणारा तो, हाताची बोटे चालवणारा तो, संगणक कसे वापरायचे हे वेळोवेळी लक्षात आणून देणारा तो, संपूर्ण वायरिंग घडवणारा आणि उपयोगात आणणारा तोच. माझ्या मार्फत काही गोष्टी घडताहेत एवढंच. सध्या एक नवीन भूमिका साकारते आहे ती म्हणजे संशोधन पत्र किंवा गोष्ट कशी उभी करायची ह्याच्या क्लुप्त्या सांगण्याचं. हे कार्य व्यवस्थित पार पडो, ताकद मिळो हि प्रार्थना. 

सर्वांगासन


सर्वश्रुत असलेलं आणि फारच आवडीचं असं योगासन म्हणजे सर्वांगासन. उगाच नाही त्याला सर्वांगासन म्हणत. कुठल्या तरी ऋषी मुनींनी, योग्याने ते विचारपूर्वक नाव ठेवलं असणार. त्या आसनाने सर्वांगाला संपूर्ण व्यायाम होत असणार, लाभदायी ठरत असणार म्हणूनच. हि झाली जमेची एक बाजू. माझ्या मते योग मध्ये व्यायाम करणाऱ्याला देखील ते सर्वांगासन होतंय हे जाणवलं पाहिजे सहज आणि नेहेमीच. हा प्रत्यय जो देतो ते खरं सर्वांगासन, अर्थात फक्त माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे मी जो काही छोटा सा योग करण्याचा दररोज प्रयत्न करते त्यातून अनुभवलेलं.


मी नागपूरला असतांना माझ्या एका काकूंचे योगाचे घरासमोर वर्ग होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी योगशी तेथे ओळख झाली. मग अजून तीन जणींनी मला योगा शिकवला. आमच्या कचेरीत मी योग चॅम्पियन झाले एक वर्षी. मग ऑनलाईन पण काही वर्ग अटेंड केले, प्रत्येक वेळी काही ना काही नव्याने शिकता आले, अनुभवता आले, आत्मसात करता आले.  त्यात एका कुठल्यातरी वेळी एका आसनाची गाठ भेट झाली. त्यावेळी फक्त शारीरिक पद्धतीने ते केले. त्या नंतर अनेक वेळा, अनेक वर्ष त्याचा अनुभव घेतला. पण इतक्यातच ते आसन करते वेळी आणि झाल्यावर प्रत्येक खेपेला परमानंद अनुभवालाच. तो इतक्या उच्च कोटींचा होता कि शब्दात मांडणे अतिशय अवघड. प्रत्येक आसनाचा अर्थ, ते केल्याने मिळणारे फायदे, त्याची करण्याची पद्धत इतकं सगळं बऱ्याच वर्षांपासून अभ्यासात आहे माझ्या. आणि आताशा मी न चुकता हे आसन सरते शेवटी करते, त्यानंतर कित्ती तरी वेळ मी त्या वेगळ्याच विश्वात मी रमते. अत्यंत सोप्पं पण रामबाण इलाज जसे माझ्यासाठी. सुखासनात बसायचं, दोन्ही हात श्वास घेऊन वर न्यायचे, उश्वास सोडत मग हात पुढे आणि जमिनीवर डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा पृष्ठभाग वर न करता / हालू न देता. त्यानंतर त्या हातांना चालवत डावी आणि उजवी कडे न्यायचे आणि पुन्हा डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. काही वेळा सर्व केला कि सहज जमतं. हे सगळं करतांना नेहेमीसारखा संथ गतीने श्वास सुरु ठेवायचा. मधे, उजवी आणि डावी बाजू असे चार - सहा फेरे मात्र आवश्यक आहेत. ह्या आसनात असतांना पोटाकडे, मांड्यांकडे आणि पाठीला बसणार ताण अनुभवायचा. जेव्हा आपण वर येतो आसनाचे फेरे संपल्यावर, हात खाली घेतो तेव्हा डोळे उघडताच नाहीत. संपूर्ण शरीराला सुख लाभले आहे, सुंदर पद्धतीने ताण अनुभवता आला आहे आणि जणू सर्वांगासन झाले आहे ह्याची प्रचिती येतेच. करो तो जानो.

हे आसन मूळच्या सर्वांग आसनासारखे अत्यंत कठीण नाही. अगदी योगाची सुरवात असेल तरी देखील करता येण्यासारखे. ह्या शिवाय चयापचय क्रिया सांभाळण्यास मदत करणारे, लवचिकता सांभाळणारे आणि वृधींगत करणारे असे. मला पहिल्यांदाच हे आसन आवडण्याचे एका महत्वाचे कारण म्हणजे योगा शिक्षकाने शिकवतांना आम्हाला सांगितले होते कि श्वासोश्वास सुरु ठेवून, वाक कायम ठेऊन हाताने उजव्या आणि डाव्या बाजूला चालावे. अहाहा च. हाताने चालावे, क्या बात है. मज्जा आली ऐकूनच आणि मग करून. माझ्या साठी तर हे आसन म्हणजे सर्वांगासनाच्या पुढले असे आहे. 

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

नशा

 अनेकदा एक सवय आणि त्याबद्दलचे रसायन काय आहे हे कानावर पडले. ते किती खरे खोटे हे मी कधीच करत बसले नाहीच. ती सवय म्हणजे सुपारी किंवा तत्सम पदार्थ सेवन करणे. मजूर लोक म्हणजे शारीरिक कष्ट करणारे स्त्री आणि पुरुष दोघे काही तरी तोंडात ठेवून काम करतांना आढळतात. तसेच साधू जे विविध प्रार्थना  स्थळी कडासने घालून पूजा पाठ करतात ते धुनी चा वापर करतात. मला खास काही त्या बद्दल ठाऊक नाही पण बहुतांशी पदार्थ तोच पण सेवनाची पद्धत बहुतेक वेगळी आहे. ह्या बद्दल कानावर असे पडले कि भूक लागू नये, किंवा भुकेची जाणीव होऊ नये किंवा बराच काळ घशात तो सुवास, स्वाद, सुगंध आणि समाधान टिकून राहावे, त्या सोबात तो व्यक्ती राहावा म्हणून ते सेवन असेल.


अगदी असाच स्वानुभव मी येथे देते आहे. मला आताशा जेव्हा अर्ध्या दिवसाचे सेशन घायचे असेल तेव्हा दररोज ची दुपारच्या जेवणाची वेळ निघून जाते. भूक लागून गडबड होऊ नये म्हणून मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एक म्हणजे छोटसं तोंडात टाकण्यासारखं काही तरी जवळ ठेवतेच. आणि सकाळी सेशन ला निघण्याच्या आधी आवर्जून दोन गरमागरम भाकऱ्या, भाजी आणि ठेचा यथेच्छ फस्त करतेच. न चुकता. अगदी प्रत्येक वेळी. म्हणजे एक प्रचंड समाधान तर लाभतच पण तो सर्वोत्कृष्ट चविष्ट स्वाद ठेच्याचा घश्यात टिकतो, दरवळतो आणि मला एक अद्भुत ऊर्जा देऊन जातो ज्यामुळे आणि अर्थात सेशनला उपस्थित सर्व श्रोत्यांमुळे मग मजेत वेळ जातो, खूप मस्त शिकवता येते. अहाहा. ठेचा हि माझ्यासाठी नशा आहे. हिरव्या मिरचीचा असो किंवा लाल, कधीही चालतो, किंबहुना नागपुरी भाषेत पळतो. 

शारदीय परिसस्पर्श



शरद म्हणजे एक कृतूचे नाव आणि मराठीतले सर्वांच्या आवडीचे असे नाव. आभाळ मोकळे होऊन एक वेगळ्याच धाटणीतला ऋतू सुरु होतो तो म्हणजे शरद. असंख्य कारणांमुळे जगभरात प्रत्येक ऋतू प्रत्येक वर्षी  त्याचे आपले वेगळे असे काही तरी घेऊन येतोच, मुळचे राखून. मग शरद नावाच्या भव्य अश्या व्यक्तिमत्वाचे पण नकळत अगदी सहज असेच होत असणार, त्यांच्या संपर्कात येणारे, संवाद साधणारे, घडणारे, शिकणारे आणि वैविध्य असे प्रत्येक सजीव. शब्द कोशात ह्या नावाचा अर्थ, अनेक लेखकांनी, विद्वानांनी आणि संख्याशास्त्रकारांनी नमूद केलेले अर्थ खूप काही महती सांगून जातात ह्या नावाची. अद्भुत च आहे सगळं शरदाचे विश्व. 


अश्या नावाच्या एका सुविख्यात, सुप्रसिद्ध, कीर्तिवंत, कीर्तिमंत व्यक्ती बद्दल चार शब्द माझ्या हातून नोंदवले गेले हि एक अप्रतिम सुरवात आहे माझ्या दृष्टीने. सर्वप्रथम एकदा नाही तर दोनदा साहेबांबद्दल अविस्मरणीय असे अनुभव ऐकायला मिळाले, अंगावर काटे आणणारे आणि ते इतके हुबेहूब मांडले माझ्या पुढ्यात कि मला साहेबांना आभासी भेट घडवून आणली. ट्रूली-देसी शी कृणानुबंध आहेत आणि राहणार पण आहेत, अशी लिखाणाची सुरवात वाखाणण्यासारखी आहे, शारदीय परिसस्पर्श लाभलेली. ट्रूली-देसी च्या संपूर्ण चमूला शतशः धन्यवाद. 

रविवार, १४ जानेवारी, २०२४

पळेल / धावेल


माझ्या नागपुरात कोणी जर विचारलं कि "चालेल का?" कुठल्याही बाबतीत तर नेहेमी / बहुतांशी उत्तर येते कि "धावेल हो". इतक्या वर्षांनी देखील मी तीच सौंज्ञा सातत्याने वापरते आणि ज्यांना ठाऊक नाही त्यांना ह्याचा प्रचार प्रसार पण करते. माझ्या नागपूरचे नाव उंच ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ना, म्हणून. 


आज सीझन १६ आणि एपिसोड १५ मध्ये श्री श्री अमिताभ बच्चनजींनी पण ह्याच संदर्भात सुतवाच्या केलं. आयुष्यात देखील आपण चालत नाही पळतो, सातत्याने. तेव्हा मला माझ्या नागपूरच्या सवयीची आठवण झाली आणि ते कित्ती अत्यावश्यक होतं आणि आहे हे समजलं / उमगलं. धन्यवाद KBC च्या लेखकांना. मी नकळत पळत होते, पळेल / धावेल हे सहजी वापरत होते पण आज त्याचं फक्त महत्व नाही पटलं तर कित्ती पळू शकले हे आठवलं. त्याची माझ्या वर कित्ती पराकोटीची कृपा आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने. ह्या पुढे पण मला खात्री आहे कि तो मला धावण्याला मदत करणारच. प्रत्येक जण आपआपल्या चालीने / सवयीप्रमाणे / क्षमते नुसार च धावतो / धावू शकतो. किंबहुना धावायला पाहिजे. कोणाशी कोणाची कधीही यत्किंचितही तुलना होऊच शकत नाही धावतांना. किती धावायचं हे सुद्धा प्रत्येक डोई बदलतं. 


पुन्हा एकदा मी माझ्या नागपूरच्या, त्याच्या पद्धतीच्या आणि मी जे त्याच्याकडून शिकले त्याच्या प्रेमात पडले. अहाहा च. 

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

"तो" उद्योग


कशी कुणास ठाऊक पण अनेक वर्षांपासून मला एक नकळत शिस्त लागली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवशी घरच्या देवांसाठी सुबक सुंदर हार आणायचेच. काही कारणांनी हार नाही मिळाले तर फुलं आणून हार करायचे. इतके गोंडस दिसतात देव, देवघर आणि एक सुगंधित वातावरण निर्मिती होते. त्यांना काही गरज नसते ह्या सगळ्या हार फुलांची आणि सजावटीची पण आपल्याला नक्कीच आहे, घराला एक घरपण मिळत, माझ्या दृष्टीने. सातत्याने हारवाल्यांकडे जाऊन सुद्धा इतक्या वर्षांनी काल एक वेगळा अनुभव आला, मिळाला. हार वाल्याकडे फक्त दोन हार तय्यार होते. मला जास्त हवे होते त्यामुळे ते तय्यार होईस्तोवर मी दुकानात उभी होते आणि पूर्णवेळ त्या उद्योगाचा वेगळाच आस्वाद घेत होते. संपूर्ण सुगंधित असे ते वातावरण होते. देवाला वाहायची फुले वेगळ्या पठडीतले असल्यामुळे अप्रतिम सुगंध दरवळत होता. मी फारच वेगळ्या विश्वात पोचले जणू. मी काही मिनिटात जर इतकी छान अनुभूती घेऊ शकते तर तो उद्योजक तर दररोज हा अनुभव घेत वृद्धिंगत होणारच. अश्या सुगंधी वातावरणात निर्मिती झालेले ते हार मग आपल्या देवघरात "चार चांद" लावणारच. कधीही कंटाळवाणं होऊ देत नसेल तो मंद सुगंध ह्या व्यावसायिकांना. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फुले, त्यामुळे हार, गजरे, वेण्या, माळा, तोरणं आणि बाकी सजावट लागेल तशी करतांना अत्यानंद मिळत असेल ह्यात शंकांचं नाही. 


मी आचारी ह्या व्यावसायिकांचे पण जवळून अनेक वर्ष निरीक्षण केले आहे. ते देखील एका वेगळ्या सुवासिक घमघमाटात / सुगंधी वातावरणात काम करतात सतत. अनेकांच्या मते त्या सततच्या अरोमा मुळे भूक मरते, काही खावंसं वाटत नाहीच. जबरदस्ती शरीर नावाचं मशीन चालवण्याकरता तोंडात टाकावं लागतं. आणि सर्वांच्या चवीचं झालं कि नाही हि एक काळजी असते सारखी. 


आमराईत काम करणारे पण फक्त त्या ऋतूत तो एक अनोखा सुगंध अनुभवत जोमाने काम करत असतील. ऋतू संपला तरी देखील त्या अनोख्या सुगंधाच्या आठवणीत आणि वाट बघण्यात, त्या आंब्यांच्या झाडांचे संगोपन करण्यात सहज दिवस सरत असतील. 


अत्तर, उदबत्त्या आणि इतर तत्सम वस्तू तय्यार करणारे पण सतत दरवळत असतील त्यांच्या वागण्या, बोलण्यात, उठण्यात आणि बसण्यात देखील. 


मातीचा एक न्यारा सुगंध. बागकाम करणारे, झाडांची निगा राखणारे तो नेहेमीच मनात आणि आठवणीत साठवून ठेवत असतील, नक्कीच. 


सौंदर्य प्रसाधनगृहात काम करणारे पण वैविध्य क्रीम्स, लेप, फवारे, सुगंधी द्रव्ये, नेलपेंट्स आणि बरेच काही वापर करतांना प्रसन्न प्रचिती येत असणारच. 


बिस्किटे आणि इतर पदार्थ तय्यार करतांना येणार सुवास असे अनेक व्यवसाय मला जाणवले आणि आठवले आज त्या हारवाल्याकडे जाऊन आल्यावर. 

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

कालाय तस्मिन नमः

 माझी आई खूपच तत्वाने जगली. माझ्यासाठीचं तिचं एक खास तत्व म्हणजे तिने कधीही मला स्वयंपाक शिकवला नाही. ती म्हणायची बघ, चव घे आणि कर. बास. निरीक्षण क्षमता त्यामुळे माझी खूप वाढली. काही महत्वाच्या बाबी अश्या होत्या कि तिचा स्वयंपाक फार साधा असायचा, आणि भाजी शिजण्याकरता किंवा रस्सा करण्याकरता ती भाजीच्या कढईवर एक भांड ठेवायची आणि त्यात पाणी ठेवायची. काही वेळात ते पाणी गरम व्हायचं आपोआप आणि मग तेच पाणी रस्सा होण्यासाठी उपयोगी व्हायचं. पाणी उरलं तर आमटीत घातलं जायचं. कित्ती मस्त सदुपयोग होता तो गॅस / ऊर्जा वाचवण्याचा. अश्या तिच्या सवयीं मुळे वेगळं पाणी तापवण्यासाठी गॅस, भांड लागायचं नाही. किंबहुना माझ्या बघण्यातल्या काही अजून मावशी, काकू, मामी पण त्या काळी अश्याच होत्या. सगळं साधं सोप्पं शिजवलं जायचं, जाणीव होती, छोटी छोटी घरं होती, बहुतांशी एकत्र सगळ्यांचा स्वयंपाक होत असे एकाचवेळी. फ्लॅट्स किंवा विभक्त कुटुंब नव्हती. बहुतांशी सगळ्या घरी आई स्वयंपाक करायची, मावशी / बाई नाही. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे उपलब्ध असलेल्या गॅस सिलेंडर मध्ये भागायचं, जास्त ताण यायचा नाही व्यवस्थापकांवर, सरकारवर आणि बाकी यंत्रणेवर. आता तसं नाही. कालमानाप्रमाणे सगळंच फारच बदललं. सर्वत्र फ्लॅट्स, खूप कुटुंब, भाडेकरू, नोकरदार वर्ग शहरात आलेला, आणि फ्रिज चा अतोनात उपयोग. गारेगार सगळं शिवायचं म्हणजे जास्त गॅस लागणारच. पाणी गरम हवे असल्यास आणि वेळेअभावी मिक्रोवेव्ह किंवा अजून उपकरणांचा उपयोग. त्यामुळे सगळंच मोठ्या प्रमाणात वापरात आलं, मागणी वाढली, आई सारखं स्वयंपाकातील लक्ष नाही राहिलं. असो. कालाय तस्मिन नमः. आज खूप वर्षांनी मी आईच्या पद्धतीने साधी उसळ केली आणि सगळं चित्रफितीसारखं डोळ्यासमोर उभं ठाकलं.  

रविवार, ७ जानेवारी, २०२४

मुक्तहस्ताकृति


माझ्या लहानपणी समजायला लागल्यापासून मला, माझ्या मैत्रिणींना, शेजारी पाजारी, नातेवाइकांच्यात आणि सर्वत्र मुलीला दररोज कित्येकदा एक वाक्य / सौंज्ञा ऐकावी लागायची, किंबहुना ऐकवली जायची. अगदी सगळेच मुक्तहस्ताने ती ऐकवायचेच. प्रत्येक कृतीला त्या सौंज्ञे शी जोडले जायचेच. "अगं तुला सासरी जायचंय...". त्यामुळे न कळत्या वयापासून त्या अस्तित्वात नसलेल्या सासरची जीवतोडून मेहेनत घेतली जायची. त्या मेहेनतीच्या कक्षा फार फार मोठ्या होत्या. त्यातला एक टप्पा म्हणजे दारातली सुबक सुंदर रांगोळी. आधी ठिपक्यांची मी रांगोळी काढायला लागले आणि त्यात प्रचंड प्रमाणात नैपुण्य प्राप्त झाले, अत्यानंदाने भल्यामोठ्या प्रमाणात त्या काढल्या जायच्या, पुढच्या मागच्या अंगणात, शेजारच्यांच्या आणि मैत्रिणींच्या दारी देखील. एकदम उत्कृष्ट असे ठिपके मांडले जायचे माझ्या हातून, कसे कुणास ठाऊक, कदाचित ती माझ्या इंजिनिअर क्षेत्राची सुरवात असेल. मग अगदी म्हणजे अगदी परिपूर्ण, निखालस, आदर्श, योग्य अश्या बारीक, एकसारख्या रेषा ओढल्या जायच्या, आणि मग ती वाखाणण्यासारखी रंगसंगती. अहाहा च. 


त्यानंतरचे टप्पे म्हणजे संस्कारभारतीची आणि मग दाक्षिणात्य प्रकारची ठिपके विरहित रांगोळी. त्यात पण नैपुण्य प्राप्त झाले नकळत.


आज तशीच एक अप्रतिम रांगोळी साकारली गेली अचानक, ती कशी आणि कधी अवतरली हे कळले देखील नाही. त्यामुळे अगदी मनापासून आनंदाने कृती झाली. एक वेगळं रसायन अनुभले आज. आज माझ्या लेकीचा महाविद्यालयाच्या नवीन सत्राचा पहिला दिवस. म्हटलं काही तरी गोड आणि तिखटातले चमचमीत पोटभरीचे  वेगळे देऊयात. सँडविच करायचा बेत आखला काल. आज ब्रेडची मांडणी केली, त्यावर मग चटणी ने सुरवात होऊन एक एक भाज्या पहुडल्या निवांत. त्यावर मग मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चीझ एकावर एक सुबकतेने मांडले गेले आणि महद आश्चर्य, जगावेगळी रांगोळी तय्यार. मग काय प्रत्येक सँडविच साकारते वेळी मांडणी आपोआप बदलली गेली, रंगसंगती वेगळी साधली गेली त्या उपलब्ध जागेत आणि जी काही मज्जा आली म्हणून सांगते, अत्यानंदाच्या पल्याड अशीच. लेकीची रवानगी केल्यावर मी जेव्हा त्या रंगसंगतीचा मनःपूर्वक आस्वाद घेतला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं कि एक अनोखा मसाला नक्की घातला गेला आहे आज आपसूक. क्या बात है. 

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

"अवघा रंग एक झाला..."


अगदी असं काहीस झालं मला आज, अचानक आणि स्वर्ग फक्त चार बोटे दूर आहे असं जाणवून गेलं. माझ्या सारख्या अनुकथा मांडणारीला एक भला मोठा पुष्पगुच्छ देण्यात आला. खूप सुखद अनुभव होता, आश्चर्य आणि सरप्राईझ देऊन गेला. इतक्या पट्टाकिनी एकटा अनोखा सुगंध देणारा तो पुष्प गुच्छ अप्रतिम आहे. वैविध्य टपोरे देशी गुलाब आहेत, किंबहुना त्या भल्यामोठ्या आकाराच्या गुलाब फुलांच्या कळ्या आहेत, शिवाय पांढरी निळी फुले आहेत, हिरवीगार पाने आणि मस्त विणलेली बास्केट ज्यात हे सगळं सुबकतेने मांडले आहे. "चेरी ऑन केक" म्हणजे ह्या पुष्प गुच्छात अनेकविध छटांनी बहरलेली आकाशी निळसर फुले आहेत, जिच्या तळातल्या मोठ्या पाकळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत. पाहताक्षणी मोहून टाकेल असा तो. नीट निरीक्षण केलं माझ्या चार डोळ्यांनी तेव्हा उमगलं कि तो पुष्पगुच्छ तय्यार करणारा नक्की एक अवलिया आहे कारण त्याने अधले-मधले काही फुलं मूळची पांढरी राखून बाकीच्यांवर निळ्या रंगाची बौछार केली आहे. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" अशी माझी अवस्था झाली ती एकंदरीत मांडणी बघून. अहाहा च. इतके माझ्या साठी,वा च. जणू काही त्याला समजले कि मी येणार, माझे स्वागत वरिष्ठांच्या हातून होणार आणि माझ्या हाती रंगांची + अनुभवनाची बरसात होणार. क्या बात है. 


सगळ्या जेष्ठ शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी, विभाग प्रमुखांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल शतशः धन्यवाद सर्वांना. सगळ्यांच्या उपस्थितीमुळे, आणि थोडक्यात केलेल्या चर्चेमुळे मला जणूकाही गोष्टीरूप गुच्छ अनुभवायला मिळाला, "अवघा रंग एक झाला..." असे झाले. 


मंगळवार, २ जानेवारी, २०२४

"वादनिकवळ घेता..."

 महाराष्ट्राची एक परंपरा आहे कि नकळत जेवणाचे ताट समोर आले कि "वादनिकावळ घेता..." म्हटलं जाताच. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेला / विणलेला एक श्लोक आहे हा, महत्व पूर्ण असा. 


माझ्या मुलांना त्यांच्या शाळेत ह्याच मतितार्थाचा इंग्लिश मध्ये आधुनिक श्लोक शिकवला होता.


आमच्या कचेरीचा एक नवीन भाग म्हणून एक संस्था स्थापन झाली होती तेव्हा एक जगविख्यात खानसामा / शेफ आले होते आणि त्यांनी खूप सुंदर समजावून सांगितले. पहिल्यांदा पानाकडे / अन्नाकडे बघून लोक जेवतात, मग त्या पदार्थांचा सुंगधामुळे, मग खाऊन आणि तृप्त होऊन. 


माझे बाबा नेहेमी मला सांगायचे जेव्हा माझी स्वयंपाक घरात सुरवात होती कि माझ्या पदार्थांमध्ये एक मसाला नाही आहे. आणि तो फारच महत्वाचा घटक आहे. आईच्या हातची चव माझ्या पदार्थांना का येत नाही तेच जिन्नस वापरून असं विचारलं तेव्हा ते म्हणाले आईची माया, तो पदार्थ ग्रहण करून माझ्या कुटुंबाला स्वास्थ्य लाभावे हे जेव्हा सामवेल पदार्थ मध्ये तेव्हा खरी चव येईल.


अनेक आधुनिक गुरु सातत्याने सांगतात कि बाहेरच अन्न  सेवन करणं टाळा शक्यतो, कारण त्यात काय काय मसाले मिसळले आहेत कोणास ठाऊक आणि ते त्रास दायक ठरू शकतात. जो ते ऑर्डर केलेले पदार्थ करत असतो, वाढप्याला बरं नसेल, भूक लागली असेल, त्रागा होत असेल तर ते सगळं आपण पैसे देऊन विकत घेतो. कशासाठी? 


हे सगळे जण जे पोटतिडकीने सांगत आहेत ते कित्ती महत्वाचे आहे हे बघा. जेव्हा आपण जे काही सेवन करतो ते फक्त अन्न नसतं तर त्या सोबत अनेक मसाले पण पोटात जातात, ते भावनिक स्वरूपाचे पण असू शकतात किंबहुना असतातच. तेव्हा कुठलाही अनावश्यक विचार मनात आला कि "नाम घ्या श्री हरीचे". म्हणजे ते सेवन करू नका. त्याचा परिणाम नको. उगाच तसलं इनपुट नकोच. टाळा. श्री हरी आवडत, पटत नसेल तर घडलेले चांगले प्रसंग आठवा, उत्कृष्ट प्रसंग, आठवणी, ई. म्हणजे पण मस्त आणि चांगला परिणाम होईल. बघा एकदा आजमावून. कित्ती पिढ्यांआधी श्री समर्थांना ह्याची जाणीव झाली होती म्हणून त्यांनी हा पंक्ती प्रपंच केला, शाळेने, पालकांनी तेव्हा तो श्लोक म्हणायची चांगली सवय लावली त्याची महती पटवून सांगितली आणि त्याचा फायदा सदृश्य आहे अनेक स्वरूपात.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...