माझ्या लहानपणी समजायला लागल्यापासून मला, माझ्या मैत्रिणींना, शेजारी पाजारी, नातेवाइकांच्यात आणि सर्वत्र मुलीला दररोज कित्येकदा एक वाक्य / सौंज्ञा ऐकावी लागायची, किंबहुना ऐकवली जायची. अगदी सगळेच मुक्तहस्ताने ती ऐकवायचेच. प्रत्येक कृतीला त्या सौंज्ञे शी जोडले जायचेच. "अगं तुला सासरी जायचंय...". त्यामुळे न कळत्या वयापासून त्या अस्तित्वात नसलेल्या सासरची जीवतोडून मेहेनत घेतली जायची. त्या मेहेनतीच्या कक्षा फार फार मोठ्या होत्या. त्यातला एक टप्पा म्हणजे दारातली सुबक सुंदर रांगोळी. आधी ठिपक्यांची मी रांगोळी काढायला लागले आणि त्यात प्रचंड प्रमाणात नैपुण्य प्राप्त झाले, अत्यानंदाने भल्यामोठ्या प्रमाणात त्या काढल्या जायच्या, पुढच्या मागच्या अंगणात, शेजारच्यांच्या आणि मैत्रिणींच्या दारी देखील. एकदम उत्कृष्ट असे ठिपके मांडले जायचे माझ्या हातून, कसे कुणास ठाऊक, कदाचित ती माझ्या इंजिनिअर क्षेत्राची सुरवात असेल. मग अगदी म्हणजे अगदी परिपूर्ण, निखालस, आदर्श, योग्य अश्या बारीक, एकसारख्या रेषा ओढल्या जायच्या, आणि मग ती वाखाणण्यासारखी रंगसंगती. अहाहा च.
त्यानंतरचे टप्पे म्हणजे संस्कारभारतीची आणि मग दाक्षिणात्य प्रकारची ठिपके विरहित रांगोळी. त्यात पण नैपुण्य प्राप्त झाले नकळत.
आज तशीच एक अप्रतिम रांगोळी साकारली गेली अचानक, ती कशी आणि कधी अवतरली हे कळले देखील नाही. त्यामुळे अगदी मनापासून आनंदाने कृती झाली. एक वेगळं रसायन अनुभले आज. आज माझ्या लेकीचा महाविद्यालयाच्या नवीन सत्राचा पहिला दिवस. म्हटलं काही तरी गोड आणि तिखटातले चमचमीत पोटभरीचे वेगळे देऊयात. सँडविच करायचा बेत आखला काल. आज ब्रेडची मांडणी केली, त्यावर मग चटणी ने सुरवात होऊन एक एक भाज्या पहुडल्या निवांत. त्यावर मग मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चीझ एकावर एक सुबकतेने मांडले गेले आणि महद आश्चर्य, जगावेगळी रांगोळी तय्यार. मग काय प्रत्येक सँडविच साकारते वेळी मांडणी आपोआप बदलली गेली, रंगसंगती वेगळी साधली गेली त्या उपलब्ध जागेत आणि जी काही मज्जा आली म्हणून सांगते, अत्यानंदाच्या पल्याड अशीच. लेकीची रवानगी केल्यावर मी जेव्हा त्या रंगसंगतीचा मनःपूर्वक आस्वाद घेतला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं कि एक अनोखा मसाला नक्की घातला गेला आहे आज आपसूक. क्या बात है.
छान. Sandwich इतकंच उत्स्फूर्त.अनुभवा च्या रंगातून रंगलेलं सृजन.
उत्तर द्याहटवाthank you
हटवा