सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

तो एक दिवस

मागे बघितलं तर गेलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी उत्तमच नाही तर सर्वोत्तमच होता ह्यात शंकाच नाही आणि भरपूर काही शिकवून गेला. आजचा दिवस पण त्यातलाच एक आहे, खूपच म्हणजे खूप खास आहे माझ्या साठी. त्याची कारणे अनेक आहेत, एक तर आज मला एक सर्वोत्तम सुवर्ण संधी मिळाली आणि त्याला मी पार उतरू शकले ह्याच मला जास्त अप्रूप वाटत आहे. आज मी "कृत्रिम बुद्धिमत्ता / AI" ह्या विषयावर एक छोटेखानी सेशन घेतलं जे "वेस्टर्न कोल फिल्ड्स" च्या तंत्रद्यांसाठी खास आयोजित केलं होतं. हे सेशन जरी नागपूरच्या कार्यालयात आयोजित केलं होत तरी देखील भाग घेणारे वैविध्य भागातून व्यस्त कामातून वेळात वेळ काढून आले होते. इतके वयानी, मानानी, अनुभवांनी मोठे होते पण अगदी उत्साहाने भाग घेतला, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि मला मुख्य म्हणजे आनंद दिला. ह्या सेशन ची तय्यारी मागल्या आठवड्यापासून सुरु झाली, किंबहुना त्या हुन आधी. आमच्या बिझनेस म्यानेजमेंट च्या मुख्यांपासून ते संपूर्ण टीम ने शांतपणे सगळं समजावून सांगितलं, पाठबळ दिलं आणि माझ्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनी उत्साहाने मला माहिती संकलनात, मांडण्यात आणि रंगीत तालीम ह्यात वेळ काढून मोलाची मदत केली. माझ्या संस्थेच्या अध्यक्ष्यानी परवानगी दिली.  माझ्या मोठ्या भावाला माझ्या पेक्षा जास्त उत्सुकता आणि उत्साह होता मला मिळालेल्या ह्या छोट्या अनोख्या संधी बद्दल.
 

सर्वात मोलाची मूक साथ मला अजून एक माझ्या अगदी खास  दोस्तांनी दिली, मला दोन तास उभं राहायला आणि सातत्याने संपूर्ण वर्गात फिरून सर्वांशी संवाद साधायला सहज अगदी सहज मदत केली. न कुरबुर करता साह्य केल्याबद्दल माझ्या पायांचे मनापासून आभार.

आमच्या ह्यांचे पण आभार कारण त्यांनी देखील काही फार महत्वाचे मुद्दे माझ्या लक्षात आणून दिले आणि एकंदरीत माहितीची खाण उघडी झालीच. आणि मग काय विचारात सेशन माहितीपूर्वक आणि आकर्षक रितीने मांडण्यात मी यशश्वी झाले. छोटसं आणि एकच, तंत्रज्ञानावर आधारित सेशन होत, पण माझ्या साठी फार आवडीचं ठरलं. नवीन ऐकणारे, संपूर्ण निराळा विषय पण त्याबद्दल वाचून मनन चिंतन करून थोडक्यात मांडण्याचा अनुभव आज मिळाला सर्वांमुळे. सगळ्या उत्साही उपस्थितांना त्यामुळे आमच्या नवीन कॉलेज बद्दल देखील माहिती मिळाली, आम्ही कुठल्या प्रकारचे संशोधन करतो ते समजलं आणि बरेच काही. "एका दगडात अनेक पक्षी" साधता आले, आणि एक छोटेखानी पण खास अनुभव मिळाला. हा असा अनोखा दिवस लाभल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. "गणपती बाप्पा मोरया".

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मनगटी घड्याळ

अनेक प्रकारची मनगटी घड्याळं मी अनुभवली, बघितली आणि वापरली आहेत आता पर्यंत. आधी प्रत्येक दिवशी त्या घड्याळाला चावी द्यावी लागायची, ती काही तास चालायची आणि त्यामुळे ते घड्याळ देखील बरोबर वेळ दाखवत असे. त्या नंतर आला वेगळा जमाना आणि त्या घड्याळांमध्ये सेल असल्यामुळे चावी देण्याचं रोजनिशीतलं काम कमी झालं लोकांचं. त्यानंतर माणसाच्या ठोक्यांवर चालणार घड्याळ आलं, म्हणजे हातावर घातलं कि सुरु व्हायचं. त्या नंतर काट्यांशिवाय आकडे दर्शवणारं घड्याळ आलं. लहान मोठ्या आकारात, प्रकारात, किमतीत हि सगळी घड्याळं उपलब्ध होती लोकांसाठी. 


मला तरी त्याकाळी घड्याळ  मनगटावर खूप उशिरा घालायला मिळालं कारण त्यावेळी मला तरी ते कमवाव लागलं, सहज उपलब्ध नव्हतं. ते देखील आईच जुनं मिळालं आधी. पण ते देखील किती अप्रूप वाटायचं मिरवायला. 


आज सहज मनात प्रश्न उद्भवला, कि घड्याळ कशासाठी आणि कोणासाठी घालतात? स्वतःसाठी, वेळ बघण्यासाठी, वेळ दाखवण्यासाठी, उगाचच फॅशन म्हणून, दिखावा म्हणून का अजून काही? 


मला विचाराल तर ह्या सगळ्याच कारणांसाठी घड्याळ वापरतात. मी जेव्हा घड्याळ वापरात नव्हते तेव्हा मोबाईल देखील नव्हते, लॅपटॉप नव्हते, संगणक नव्हते ज्यात सहज वेळ दिसेल. त्यामुळे माझ्या चार डोळ्यांनी निरीक्षण चालायचं दुसऱ्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळ बघण्यात, किती वाजलेत ते विचारायचं म्हणजे किंचित अपमान, त्यामुळॆ मग बघायचं. अर्थात त्या वेळची जरी ती पद्धत असली तरी अजुनही माझ्या लक्षात आहे आणि सहज लक्ष जाताच दुसऱ्याच्या मनगटा कडे, आज पण गेलं आणि काय आश्चर्य, त्या मुलाचं घड्याळ मोठं, स्मार्ट पण संपूर्ण काळोख. काहीच दिसत नव्हतं, पट्टाकिनी मनात आलं मग काय फायदा त्या घड्याळाचा? बेकार. जरी मी विचारलं असतं किती वाजले? तरी त्याला आटापिटा करावा लागला असता, काहीतरी बटण दाबावं लागलं असत, मग आधी त्याच्या कॅलरीज किती बर्न झाल्या ह्या कडे त्याचं लक्ष आधी गेलं असतं आणि मग त्याने मला किती वाजले हे सांगितलं असतं. देवा, काय हे. स्मार्ट घड्याळाचे असंख्य फायदे जरी मला ठाऊक असले तरी घड्याळाचं मूळ उद्देश हरवल्यासारखा वाटला. असो. ह्या स्मार्ट जमान्यात सगळीच खिचडी झाली आहेच (अनेक गोष्टी / फिचर्स एका घड्याळात / वस्तू मध्ये).  त्यामुळे घड्याळ कसं उपवाद राहणार? नाही का. थोडेसे एकटे पडू लागलेत सगळेच जण  ह्या असल्या स्मार्ट पणामुळे. घड्याळात जर दुसऱ्याला वेळ सहज दिसली तर कदाचित बाकी अनेक जणांचं त्या कडे लक्ष जाईल आणि ते घड्याळ आवडेल देखील. आणि आवडलं तर ताबडतोब विकत घेतलं जाईल, म्हणजे त्या कंपनीचा तर फायदाच पण बाकी अनेक लोकांना वेळ दिसेल हा पण वाढीव नफा. 


प्रत्येकाला अश्या खिचडीची अक्का स्मार्ट घड्याळाची गरज नसते हे लक्षात ठेवा आणि साधं वेळेवर वेळ दाखवणारं घड्याळ कमवा / परिधान करा. 

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

अजून एक अवलिया

आज पर्यंत मी अनेकविध लोकांच्या संपर्कात आले आहे, नोकरी निमित्य, शेजारी पाजारी राहून, प्रवासात, मुलांमुळे, परदेशी वास्तव्यामुळे देखील. अनेक वेळा मला असं आढळलं आहे कि माझ्या संपर्कात असलेल्यांपैकी काही पुरुष मंडळी त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा अजून काही कारणास्तव एकटे राहिले आहेत आणि हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. ह्या समाजात आणि अख्ख उभं आयुष्य एकटं राहणं म्हणजे फारच मोठं आव्हान आहे आणि मी ते फार जवळून अनुभवलं आहे. पण अर्थात किंचित प्रमाणात पुरुषांना / मुलांना अगदी थोडसं सोप्प आहे त्या मानाने एकटं राहणं. मी अगदी फारच कमी प्रमाणात मुली एकट्या राहिलेल्या बघितल्या आहेत. मला एवढ्यातच अजून एका अवलियाला भेटण्याचा योग आला. तिच्या लहान भावाचं लग्न झालं, मुलगी झाली आणि ती अवघी ४ महिन्यांची असतांना त्या लहान भावाचा अपघात झाला आणि लेक पोरकी झाली. मग आत्यानेच एकटी राहून त्या ४ महिन्याच्या मुलीचे संगोपन केले, तिला मोठी / जबाबदार आणि उत्कृष्ट नागरिक घडवले आणि शिवाय तिच्या स्वतःच्या आईची काळजी पण घेतली. म्हणजे एका वेळी तीन पिढ्या सांभाळल्या, आई, स्वतः आणि भाची. हे काय कमी होत तर एका भल्या मोठ्या कंपनीत अतिशय मोठ्या हुद्द्यावर आत्या काम करते आहे. म्हणजे भावाचं लहान बाळ सांभाळत, नोकरीत सुद्धा वाहून देऊन, आईची काळजी करत, स्वतःचे सुख / आयुष्य बाजूला सारून ध्येय गाठणं म्हणजे अतिशय आव्हानात्मकच, नाही का?

धडधाकट माणसांना, सर्व सुखसोयींनी समृद्ध अश्या ना देखील असं वागणं जमत नाहीच. सतत तक्रारी, कुरबुरी, काय नाही ह्याची यादी, उणे दुणे काढत दिवसांमागून दिवस जात असतात नेहेमी. आणि ह्या बघा. त्यांना अगदी सहज शक्य होत जबाबदारी झटकणं. पण नाही तसं त्यांनी अजिबात केलं नाही. शिवाय इतक्या साध्या  तितक्याच करारी, उत्कृष्ट राहणीमान, जबाबदार, बहारदार व्यक्तिमत्व आणि बोलायला पद्धतशीर, शिस्तीत.... मी तर त्यांना बघून, ऐकून, निरखून प्रेमातच पडले. स्वतःच्या मुलांसाठी अनेक पालक मागे पुढे बघतात, बोलतात, आरडाओरडा करतात. पण दुसऱ्याचं मुलं सांभाळणं ते देखील आयुष्यभर आणि घडवायचं शिवाय ते देखील मुलीला, मला त्या आत्या भाचीला बघून प्रेमात पडावं का त्यांची स्तुती करावी का सांत्वन का धीर द्यावा का शाबासकी हे समजलंच नाही, अर्थात त्या पलीकडे गेल्या आहेत त्या. धन्य धन्य झाले ह्या समाजात इतक्या खंबीर पणे स्वतःला उभं ठेवून, भाचीला उभं करणाऱ्या "झाशीच्या राणीला" भेटून. माझा साष्टांग दंडवत त्या आत्याला. त्या दोघींना सतत उदंड, सुदृढ, आनंदी, आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईशचरणी मनापासून प्रार्थना.

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

अनन्यसाधारण महत्व

गेली अनेक वर्षांची माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे माझ्या वरच्या मजल्यावर राहते आणि तिचं एक खास वैशिष्ट्य आहे. शाळकरी मुलं मुली ते आजी आजोबांपर्यंत सगळेच जण अंगठी / अंगठ्या परिधान करतात हे आपल्याला माहित आहेच, पण दाही बोटात मिळून एखादी किंवा जास्तीत जास्त दोन, बरोबर. पण ह्या माझ्या मैत्रिणीची खासियत होती कारण ती दाही बोटात अंगठ्या घालायची. अर्थात दुरून बघितलं तर तसंच दिसायचं. पण जेव्हा आमची चांगली ओळख झाली आणि मी निरखून बघितलं तेव्हा समजलं कि दही बोटात दहा पेक्षा जास्त अंगठ्या घालते ती, म्हणजे एका बोटात एका पेक्षा जास्त. माझी दाही बोट तोंडात गेली ते बघून, असो.

मी खरं तर लग्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने अंगठी घालायला सुरवात केली होती, पण मग माझी दोन्ही बाळं लहान असतांना पुन्हा त्याला स्वल्प विराम लागला, मग नोकरीत फटाफट टाईप करता यावं म्हणून अजून एक थांबा, असं करता करता खूप काळ गेला मधे पण मग मी सुरवात केली विविध अंगठ्या काढून घालायला आणि हे लिहायला सुचलं जेव्हा माझाच हात मी बघितला सहज, अर्थात बघितला गेला सहज. करंगळीतली अंगठी माझ्या बालपणीची आजीच्या  प्रेमाने आणि आशिर्वदाने परिपूर्ण अशी. त्यानंतर साक्षगंध दिवशी परिधान केलेली दुसऱ्या बोटात. माझी बाळं झाली तेव्हा आईने दिलेली मधल्या बोटात मावली. लग्नांच्या दहाव्या वाढदिवसादिवशी दिलेली त्या पुढच्या बोटात आणि मग मधेच अंगठ्यात घालायची हवा आली होती त्यामुळे मी घेतलेली अशी अंगठी. माझ्याच पाच बोटातल्या पण पाच जणांनी, पाच विविध वेळेला, अनोख्या प्रसंगी दिलेल्या अश्या आठवणी आहेत त्या. पूर्णपणे विजोड, एकाची सर दुसऱ्याला नाहीच आणि असू पण शकत नाही, पण टप्प्या टप्प्याने मिळवलेल्या / दिलेल्या पण माझ्या साठी मनापासून गुंफलेल्या त्या अंनन्यसाधारण महत्वाच्या अश्या आहेत. महत्वाच्या ह्याच्यासाठी देखील कारण त्या फक्त मलाच नाही तर बघणाऱ्यांना पण खूप सुंदर दृश्य दाखवतात, अनुभव देतात आणि मला प्रचंड आठवणी सहित आशीर्वाद आणि सहवास देशील. अहाहा.

औषध आणि जादू

मला समजायला लागल्या पासून अनेक प्रकारची औषधे घेतली आहेत मी, सगळ्या प्याथ्या झाल्या. अनेक बरे वाईट अनुभव आले, काही औषधे आणि डॉक्टर लागू पडले काही नाही. अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत थोड्या फार प्रमाणात होतंच, जेव्हा पासून "फॅमिली डॉक्टर" हे संकल्पना संपुष्टात आली आहे. "फॅमिली डॉक्टर" ना पिढ्यांपिढ्या शरीररचना ठाऊक असायची, स्वभाव माहित असायचे, शारीरिक मानसिक + आतून बाहेरून सगळं ठाऊक असायचं आणि त्यामुळे औषधं पट्टाकिनी लागू पडायचं. एकाच गावात / शहरात वास्तव्य असल्यामुळे, हवा पाणी ई. मुळे होणारे आजार एकतर नसायचेच किंवा होत नसत. असो.

इतक्यातच मला माझ्या जावेच्या वडिलांनी औषध लिहून दिलं, शिष्तीत / व्यव्यस्थित ऐकून / समजावून घेऊन, त्या नंतर ह्यांनी आणि माझ्या दिरांनी धावत पळत जाऊन सगळीच्या सगळी औषधे आणली. ती मी ताबडतोब सुरु देखील केली. अनेक महिन्यांपासून गुढगा सतत दुखत होता तो न कळत अचानक दुखायचा थांबला. मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला, म्हटलं काय होतंय हे? मग शांत मनाने विचार केल्यावर असं आढळलं कि माझी बरं होण्याची धडपड, काकांनी सुचवलेले चपराख औषध (रामबाण इलाज), बरं होण्याची आलेली वेळ, काकांचा आशीर्वाद, खूप दूर जाऊन आणलेलं औषध, ह्यांची आणि दिरांची पण मनापासून इच्छा मी बरी होण्याची. हे सगळं अनोखं रसायन जादू सारखंच काम करतंय तर एकत्र, औषधा पलिकडे जाऊन. एका व्यक्तीच्या आरोग्यासाठी / माझ्या पायांनी ठणठणीत व्हावं म्हणून कित्ती स्रोत, दिशेने आणि बाजूने कळत / न कळत प्रयन्त होत आहेत आणि ते उपयोगी पडतांना दिसत आहेत बघा. माझ्यासाठी तर हि जादूच आहे आणि अनेक जादूगार ह्यात सामील आहेत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या.

अनेक हिंदी चित्रपटातला सुप्रसिद्ध संवाद आठवला मला "दुवा और दवा" आणि त्याची अनुभूती पण आली, ह्या आधी पण अनेकदा अनुभवलं होत मी पण आज खास प्रकर्षाने मांडावसं वाटलं ह्या अदृश्य जादूभऱ्या औषधाबद्दल.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...