“बारश्याच्या दिवशी आत्याला का मारतात?”
एवढासा, अगदी निरागस प्रश्न. पण थेट मनात घर करून बसणारा.
एवढ्यातच मी एक नामकरण सोहळा "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवला. त्यात एका पिटुकलीने हा प्रश्न विचारला आणि मग मात्र विचारचक्र सुरू झालं. त्याचं उत्तर शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.
अर्थात तिला म्हणायचं होतं की आत्या जेव्हा बाळाचं नाव ठेवते तेव्हा तिच्या पाठीवर गुद्दे मारण्याची एक पद्धत आहे, ते तसं का करतात?
मला फक्त हे माहिती आहे की असं करतात, त्यामागचं कारण ठाऊक नाही. मी कधीच विचारलं नाही कुणाला आणि कुणी कधी सांगितलं पण नाही. किंबहुना हा प्रश्नच मला कधी पडला नाही. पण आज पडला…
तर माझ्या मते सर्वप्रथम जर महाराष्ट्रीयन परंपरा, रूढी, सण साजरे करण्याची पद्धत बघितली तर असं लक्षात येईल की जुन्या काळी मुलगी माहेरी येण्याची ठराविक कारणे होती, दिवस होते. भाऊबीज हा ठरलेला दिवस किंवा दिवाळीच्या दिवसात कधीतरी जमेल तसं. लग्नानंतर पहिल्या वर्षी मंगळागौरीला, मांडव परतणीला, आणि इतर काही सणांना जमल्यास.
तेव्हा दळणवळणाची खूप साधने उपलब्ध नव्हती, टेलिफोन नव्हते त्यामुळे संपर्क हवा तेवढा होत नसे. त्या निमित्ताने मुलीची पुन्हा एकदा भेट होईल म्हणून ही प्रथा सुरू झाली असेल. आत्याला आदराने बोलवायचे एक कारण.
ज्या मूळ घराची आत्या / मुलगी, तिला दिलेले, तिने आत्मसात केलेले संस्कार, हुशारी, चपळाई आणि स्वास्थ्य हे सगळं त्या मूळ घरात टिकून राहो म्हणून कदाचित नवीन बाळाची ओळख अशी तिच्या हस्ते होत असावी. आपण म्हणतो बघा की लग्नगाठ पवित्र ठिकाणी बांधावी, कुठलेही उद्घाटन प्रसिद्ध, नाव कमावलेल्या व्यक्तीच्या हस्ते व्हावं म्हणजे नवीन सुरुवात त्यांच्या सारखी नावाला येईल, प्रसिद्धी पावेल. त्या नावाजलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात काही काळ सर्वांना घालवता येईल, त्यांच्या त्या वेगळ्या ऑराचा भन्नाट परिणाम होईल इ. अगदी तसेच काहीसे त्या घरच्या मुलीचे सर्व चांगले गुण नवीन बाळाला बळ देणारे, त्याची सुरुवातच अशा व्यक्तीच्या हस्ते असं काहीसं.
शिवाय मान दिलेला कोणाला आवडत नाही? हा एक खूप वेगळ्या स्तरावरचा मान त्या मुलीला दिला गेलाय. ती बाळाच्या कानात नाव सांगून, काही ठिकाणी तीच ठरवते नाव देखील, तिला दिलेल्या मनाचा मान राखते आणि सोहळ्यात सामील होते.
तेव्हा ऑनलाईन खरेदी, उठसुठ खरेदी असं काहीच नव्हतं. ह्या आमंत्रणामुळे आत्याला लग्न झाले असेल तर साडी आणि इतर भेटवस्तू दिल्या जायच्या, आणि लग्न झाले नसेल तर तशा पद्धतीने. वर्षातून मोजून कपडे घेतले जायचे. त्यात जर अशी साडी मिळाली माहेरची तर तिचे अनेक दिवस, महिने, वर्ष त्या आठवणीत मस्त जायचे सासरी एकटीने राहताना. एकटीने ह्या संदर्भात की माहेरची माणसे आजूबाजूला नसतात म्हणून एकटी, बाकी काही नाही.
शिवाय गुरुजी, पूजा, संस्कार सगळं विधिवत आटोपलं बारश्याचं की मग छोटासा खेळ म्हणून पण असेल हे असं पाठीवर गुद्दे मारणं.
किंवा ती त्या बाळाच्या कानात नाव सांगितल्यावर आत्याचं सर्वांना एकत्र किंवा प्रत्येकाकडे जात “आमच्या बाळाचं नाव अमुक तमुक हो...” अशी पण प्रथा आहे. पेढे किंवा बर्फी वाटत, हळदीकुंकू देत, घुगऱ्या वाटताना इ. तर नाव ठेवणे, आत्याने बाळाला सांगणे हे त्या दोघांपुरतं मर्यादित राहावं, नंतर आत्याने प्रत्येकाला सांगण्यात येणारी वेगळी मजा घ्यावी, ह्या करता हसत-खेळत जवळचे अनेक जण थाप देतात किंवा गुद्दे मारतात.
बाकी इतर वेळी सुद्धा पट्टाकिनी कुठे पोचू द्यायचं नसेल तेव्हा गम्मत म्हणून अडवा-अडवी करतात तसं असेल काही. आत्याला सरळ सरळ नाव ठेवू द्यायचे नाही, थोडीशी मजा आधी करायची असं.
ते गुद्दे मारणं इतकं मजेशीर असतं, म्हणजे दुरून बघायला पण आणि तिथे पाळण्याजवळ जाऊन त्या आत्याला प्रत्यक्ष गुद्दे देणं पण. त्यात प्रेम आहे, आपुलकी आणि माया आहे, एक वेगळा आपलेपणा आहे. त्यावेळी ऐकायला आलेले वेगवेगळे आवाज आहेत, हास्याचे, बांगड्यांचे, हळुवार दिलेल्या गुद्द्यांचे इ. त्यामुळे मग कदाचित अनेक मुलींना वाटत असेल की मला पण हे सगळं अनुभवायचं आहे, मला पण असंच मानाने माहेरी यायचं आहे. काही इतर जणींना आई होण्यास प्रवृत्त करत असतील हे खेळ आणि मग कुटुंबातील सदस्य वाढत असतील आणि समाज मोठा होण्यास मदत देखील होत असेल नकळत किंवा अप्रत्यक्षपणे.
आता तर आई बाबा, AI आणि सुरू असलेले नवीन नावाचे ट्रेंड्स इ. अनेक जण नाव ठरवतात. पण आधीच्या काळी तर गुरुजी त्या पूजेच्या वेळी अक्षर काढून द्यायचे आणि मग आत्याबाई ऐनवेळी नाव आठवून, जुळवाजुळव करून, अर्थ समजून, काय योग्य ठरेल हा विचार करून पट्टाकिनी नाव कुजबुजायच्या बाळाच्या कानात. तिला दिलेल्या मानाचा संपूर्ण आदर ठेवला जायचा कारण आज असतात तशी अनेक नावे तेव्हा ठेवण्याची, वापरायची पद्धत अस्तित्वात नव्हती हो. त्यामुळे आत्याबाईंवर भिस्त असायची सगळी, कारण ते मूल, त्याचं कुटुंब, मित्र, समाज सगळेच शेवटपर्यंत ते नाव उच्चारणार ना? ह्या सगळ्या प्रक्रिया, टप्पे, निर्णय इ. ची कौतुकाची थाप म्हणजे गुद्दे असावेत कदाचित.
जर आत्या लग्न झालेली असेल तर बारश्याचं आमंत्रण यायच्या आधीच, बाळ झाल्यापासून तिला माहेरी जाण्याचे, समारंभात सामील होण्याचे, बाळाशी खेळण्याचे वेध लागत असणारच. तेव्हापासून मग तिची लगबग, धडपड सुरू होत असणार. सासरी पटवणे, कामे इतरांना वाटून निघणे, कधी नाराजी देखील पत्करून जाणे, परवानगी मिळाली तरी अर्धा जीव सासरी आणि अर्धा माहेरी अशी तारेवरची कसरत करत समारंभाचा आनंद उपभोगणे इ. सगळंच आलं त्या कौतुकाने आपल्या माणसांनी दिलेल्या गुद्द्यात हो. आलीस?, तुझी उपस्थिती लाभली त्याबद्दल शाब्बास, म्हणून थाप किंवा गुद्दा.
गुद्दा प्रेमाने दिला ना पाठीवर की लागत नाही कारण मूठ असते ती, मऊ भाग ताठ पाठीवर पडतो तेव्हा लागत नाहीच. आणि किती जणांनी गुद्दे दिले हे किती दिवस लक्षात राहत असेल नाही?
पिटुकला व्यायाम पण होत असणार सर्वांचाच ह्या निमित्ताने. बाळ पाळण्यात निजलेले किंवा पहुडलेले, पाळणा जमिनीवर विराजमान, त्यामुळे आत्याला वाकून त्या बाळाच्या कानापर्यंत सावकाश, सांभाळून पोचायचं म्हणजे वाकावं लागणार, खाली बसावं लागणार आणि त्या स्थितीत इतरांना तिच्या पाठीवर त्या काही क्षणात गुद्दे मारायचे म्हणजे वाकावंच लागणार. आणि असे अनेक बारसे कुटुंबात, शेजारपाजारी, समाजात, नातेवाईकांत येत असणारच तेव्हा. शिवाय शारीरिक मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मंगळागौरीचे खेळ आणि इतर वेळी खेळलेले खेळ, घरची कामे इ. असायचीच भरीला.
सोप्पा साधा खेळ, आनंद, आठवणी, मजा, प्रथा, पिटुकला व्यायाम, मान, सन्मान, ऑरा, भेट, सामाजिक वृद्धी आणि इतर असे अनेक कारणं ह्या एकाच प्रसंगी साधता येतात.
ज्यांनी कोणी ही प्रथा सुरू केली त्यांच्या सर्वव्यापी विचारांना नमन. कमाल आहे त्यांची, कसा काय इतका मोठा दूरदर्शी विचार करून प्रथा सुरू केली कोणास ठाऊक. आणि ती इतकी वर्ष सातत्याने सुरू आहेच.
अजून काही कारणे माहिती आहेत का कोणाला, असल्यास कृपया सांगा, म्हणजे मला देखील ह्या पुढील सगळे बारसे कार्यक्रम अजून उत्कृष्टपणे उपभोगता येतील.