सोमवार, १३ एप्रिल, २०२६

२४२४: मुलाचे पाय पाळण्यात दिसतं नाहीत


मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हि एक प्रसिद्ध म्हण आहे ती अनेक बाळांना लागू होते देखील, झाली आहे आणि आपल्याला अशी अनेक उदाहरणं ठाऊक आहेत. 

माझ्या शेजारी अनेक वर्षांपूर्वी, कदाचित २२ एक वर्षांपूर्वी एक शेजारी होते आणि त्यांची एक कन्यका होती, दिसेल तिसरीत तेव्हा. धनाढ्य असे ते सुखवस्तू कुटुंब, वडिल आंतरदेशीय कामात आणि मोठा मुलगा त्याच्या अभ्यासात व्यग्र आणि अत्यंत साधा. ह्या मॅडम प्रचंड लाडात वाढलेल्या, सर्वांना तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालेलं, अभ्यासाची फारशी गोडी नव्हती आणि गरज पण नव्हती. त्यामुळे फक्त लाडोबा, खेळ नाही, मित्र मैत्रिणी नाही, नुसता आराम असं ते वजनदार व्यक्तिमत्व. 

हळू हळू कॉलेज मधे प्रवेश घेण्याची वेळ आली, घेतला पण अनेक प्रसंग असे आले कि ते शिक्षण पुढे नेणं अवघड झालं आणि ते सोडलं. त्यामुळे अर्थात वडील नाराज झाले. मग काही औषध उपचारांची पण वेळ आली आणि मधला काळ जरासा वेगळाच गेला. 

ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यास तिच्या आईची तिला प्रचंड मदत झाली. तिने खेळात भाग घेतला, आता निर्णय घेण्यात वेळ नाही घालवला एकदम उडीच मारली.  थेट वेट लिफ्टिंग, फिटनेस, प्रचंड व्यायाम, खाण्यापिण्याची शिस्त, असंख्य शर्यती, भयानक प्रवास, खूपच मेहेनत दोघींची. जेथे जेथे ती तेथे तेथे काकू हे समीकरण झाले. आणि मग काय घरात जागा नाही ठेवायला इतके पुरस्कार प्राप्त झाले अगदी त्या खेळातले सर्वोत्तम असे, भारतीय आणि बाहेरचे सुद्धा. आणि आता तिला बघाल तर ती तीच हे कोणीच मान्य करणार नाहीच. आता तिच्या आवाजाला जी धार आहे, स्थैर आहे, जबरदस्त असे वजन आहे, भारदस्त व्यक्तिमत्व उभं झालंय. माझी दाही बोटं तोंडात. काय दिसते आता, वेगळीच, शार्प आणि भन्नाट. "ती हि नव्हेच". कुठे गेला तो सगळा लाडोबा कुणास ठाऊक पण जगावेगळा बदल आहे. 

आज शासकीय सेवेत रुजू झाली आहे अतिशय उत्तम पदावर. हि संधी तिला तिच्या प्रचंड मोठ्या कारकिर्दीमुळे बहाल करण्यात आली आहे कारण फारच कमी वेळात सर्वोत्तम कामगिरी, खूप कौतुक आहे. ती एका बाजूला पदकं मिळवत होती, वर्तमानपत्रात रकाने भरून कौतुक होत होतं आणि दुसऱ्या बाजूला अनेक तरुण तरुणींना प्रोत्साहित करत होती. तिने आधी एक तिचे स्वतःचे जिम सुरु केले, त्याला जो भरभरून प्रतिसाद मिळाला कि मग दुसरे, तिसरे अशी शृंखला वाढतच गेली. 

नुकतीच तिने अजून एक मेडल पटकावलं आहे आणि एका प्रचंड गोंडस पिल्लुची आई झाली आहे. यत्किंचित तिच्या कडे बघितल्यावर कोणीच म्हणणार नाही कि हि नुकतीच आई झाली आहे. ती पण कूल आहे, दिसणं, वागणं, बोलणं, बसणं, आवभगत करणं, आणि तिची पिल्लू तर तिच्यापेक्षा सुपरकूल आहे. इतक्या विविध स्तरावर पाय रोवल्यावर सुद्धा तिचे पण घट्ट जमिनीवर रोवले आहेत, हे बघून खूप कौतुक वाटलं, कारण मी बारशाला हजर होते. मला शब्द अपुरे पडत आहेत तिचे कौतुक करण्यास. काय काय सांगू, काय काय बोलू असं झालयं मला. पिल्लू इतकी लहान आहे पण तिचे सगळे लक्ष कॅमेरात, काय समजतं तिला इतक्या लहान वयात बापरे. जेव्हा कॅमेरा नव्हता तेव्हा मग सजावट व्यवस्थित झाली आहे कि नाही, काय काय आणि कसं सजवलं आहे ह्या कडे प्रकर्षाने तिचं लक्ष, कोण कोण आलं आहे त्या कडे पण. सगळी कडे नजर, आणि फार गोड जडण घडण. क्या बात है. 

कुटुंबातले सगळेच वेगळ्या स्तरावर, साधे, मनापासून सगळं साजरं करणारे असे. 

ह्या नवीन पिल्लुची आई जेव्हा लाडोबा होती तेव्हा ती आंतर्देशीय स्तरावर काही झेंडे गाडेल, मोठ्या हुद्यावर नोकरी करेल असे तिचे पाळण्यात पाय कधीच दिसले नाहीत, पण घडलं वेगळंच. मी आता तिच्या सोबत आणि पिल्लू सोबत, आजी सोबत वेळ काढून जाऊन नक्की भेटणार, ऐकणार सगळं, आणि हा आमूलाग्र बदलाची गाथा नक्कीच ऐकणार. 

ज्या आई वडिलांना वाटतं कि आपला मुलगा मुलगी काहीच करू शकणार नाहीत आणि तसं ते बोलून दाखवतात, मनात ठेवतात त्यांच्या साठी हे खूप सुंदर उदाहरण आहे.  खूप शिकण्यासारखं आहे.  

नक्कीच एक आत्मकथा / पुस्तक लिहावं तिने अशी माझी मनःपूर्वक इच्छा आहे, तसं मी तिला विनंती करणार आहे. कारण ते खूप प्रेरणा देणारं ठरेल अनेकांना. मी सगळं घडतांना बघितलं आहे अगदी जवळून, इतकं सोप्प नव्हतं ते, कोणालाच. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...