शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

काळजीच्या पल्याड


सध्या मी घरची शेफ आहे. कारण माझी मदतनीस फारच मस्त आहे. अगदी वेगाने सगळं मला हवं ते, हवं तस्स मस्त चिरून देते, वाटण लागलं तर करून देते आणि इतर काही तय्यारी जशी लागेल तशी करते. त्यामुळे मग दोघींचं काम सोप्पं होतं. तिला हातभार लागतो, तिच्यावरच सगळं पडत नाही आणि मला पण मस्त मज्जा येते, एक वेगळे समाधान मिळते, दोघींच्या गप्पा पण होतात, अनेकदा हास्य विनोद पण होतात. तर अशी हि, मला सवय झालेली मदतनीस अचानक म्हणाली कि मला गावाला जायचे आहे, एक नाही दोन नाही तब्बल ११-१२ दिवस. माझ्या पायाखालची जमीन हादरलीच. मला एकटीला चार वेळेचा स्वयंपाक अशक्यच आहे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे आणि रात्रीचे जेवण पुन्हा, दोनदा चहा, उन्हाळा म्हणून शीतपेय, फळं ई. काही विचारू नका. तिची मदत मला फारच मोलाची आहे. त्यामुळे दोन्ही वेळेला मला जमतं सगळं करायला. हि सुट्टीवर जाणार म्हणजे खूप मोठा यक्ष प्रश्न होता मला. त्या मला काम त्याच दरम्यान, त्यामुळे बाहेर जाऊन काम करायचं आणि शिवाय घरचं, त्यात मुलीची परीक्षा. त्यामुळे ती एक माझी मोट्ठी सगळ्या बाबतीत धावून येणारी आहे. आता ते देखील शक्य नाही. खूप म्हणजे खूप दमले विचार करून. आणि मग सरते शेवटी एक दिवस हातात घ्यायचा ठरवला. रात्रीचे जेवण घरगुती बाहेरून आणायचे मी निश्चित केले. आणि सहज माझ्या कडे काम करणाऱ्या ताईला विचारले तू किती वाजता निघणार आहेस, कोणत्या दिवशी नक्की येणार आहेस? तर म्हणते कशी, नीट ऐका, "आम्ही फक्त दोन दिवसा करताच जाणार आहोत. आमच्या एका नातेवाईकांची सून बाळंत झाली, तिला मुलगी झाली, त्यामुळे सव्वा महिना तरी काहीच पूजा करता येणार नाही. पुढील महिन्यात बघू काय ठरतंय ते." मी नाचू, का गाऊ, का उड्या मारू, का ओरडू, का शतशः "त्याचे" धन्यवाद मानू हे समजलंच नाही मला काही क्षण. मला माझ्याच कानांवर विश्वास नाही बसला. म्हणजे माझी "त्याला" कित्ती पराकोटीची काळजी आहे बघा. त्याने मला अडचण होऊ नये म्हणून एका बाळाचा जन्म ठरवला, तो ह्याच कालावधीत झाला, आणि ह्या मंडळींनी ठरवलेला कार्यक्रम बारगळला किंवा पुढे ढकलला गेला. पुढील महिन्यात ती गेली तर मला चालणार आहे, कारण सासरे तेव्हा नसतील ज्यांना खूप साग्रसंगीत सगळं लागतं सतत आणि हे पण गावाला जाणार आहेत, त्यामुळे आम्ही दोघी मस्त मज्जा करू उलट. माझ्या सारख्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात राहणाऱ्या छोट्या व्यक्तीचे तो जाणतो, मदतीचा हात देतो न विचारात ह्याला काय म्हणावे? बरं मी ऋषी मुनींसारखी त्याची आराधना पण नाही करत हो, फक्त जमेल तशी पूजा, ध्यान आणि दररोजचे नेमलेले कार्य, एवढेच. तरी देखील त्याची मदत मिळणं हे अप्रूपच आहे माझ्या साठी. असेच आशीर्वाद, अशीच कृपा आणि असेच लक्ष सदोदित राहू दे हि विनंती. मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या कडे "त्याच्या" ह्या कृतीकरता शब्दच नाहीत. असा हा माझा पाठीराखा, दणकट सखा आणि काय म्हणू. प्रत्येक वेळी श्रद्धा अजून दृढ होते अश्या प्रसंगामुळे. कित्ती महिन्यांपासून कष्ट घेतलेत त्याने माझ्यासाठी, माझ्या सुखसोयीसाठी, माझ्यावर ताण येऊ नये ह्या साठी. म्हणजे तो देखील जाणतो माझ्या पायांची स्थिती. अजून काय हवं?  

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

गाऊन


सकाळी, संध्याकाळी, रात्री कुठल्याही प्रहरी चालत चालत, फेर फटका मारता मारता, दूध आणता आणता गाऊ कसे शकतात? आणि गाता गाता चालू कसे शकता? किंवा दूध कसे विकत घेऊ शकता? मला तर हे प्रश्न नेहेमीच पडतात आणि महाड आश्चर्य वाटतं. एकावेळी एक काम करूच नये, अनेक कामं करत राहावीत ह्या मताची मी पण आहे. तरी देखील माझी बोटं तोंडात जातात. आणि मुख्य म्हणजे काय गरज आहे? ते चांगलं नाही दिसत? सकाळी बघितलं कचेरीत, विद्यालयात, महाविद्यालयात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी कि खूप निस्तेज वाटतं आपोआप. कधीही प्रयन्त असावा कि स्वतः साधं पण व्यवथित राहावं म्हणजे स्वतःला आणि इतर बघणाऱ्यांना ऊर्जा मिळते, आनंद होतो. 


दिवसाच्या प्रत्येक वेळेनुसार वैविध्यता उपलब्ध आहे कपड्यांमध्ये. सर्वांकडे बहुतांशी इतके आहे कि ते असं सगळं घेऊच शकतात.  मग जेव्हा पाहावं तेव्हा गाऊन घालून सर्वत्र भटकत का असतात बायका, आज्ज्या, काकवा, काय हे, कित्ती भोंगाळ दिसतं ते. घरी काहीही करा हो, पण दारा बाहेर पडतांना जरा तरी विचार नको का? विचित्र आणि निरुत्साही असा कारभार. काही तरी विचारपूर्वक कार्य करावे, स्वतःला आणि बघणाऱ्यांना त्याचा फरक पडतोच. प्रत्येक वेळी मल्टि टास्किंग नकोच. दररोजचं माहिती आहे कि आपल्याला बाहेर पडावं लागतं तर मग तशी तय्यारी करावी, करावीच. आपण सोसाटीईत राहतो ह्याच भान असलंच पाहिजे. 

रविवार, २१ एप्रिल, २०२४

ती तरुण जोडी


माझ्या घरासमोर एक छोटेखानी साधं हॉटेल / खानावळ आहे. तेथे अगदी सकाळी लवकर चहा, नाश्ता मिळायला सुरवात होते ते थेट रात्री उशिरा पर्यंत घरगुती जेवण देखील मिळतं. आजूबाजूला अनेक दुकानं आहेत, एक छोटसं वसतिगृह देखील आहे, भरपूर वर्ग सुरु असतात, आणि शिवाय ऑटो थांबा आहे, त्यामुळे भरपूर वर्दळ असते त्या खानावळीत. मी स्वतः हे २००५-०६ पासून अखंड सुरु असलेलं बघितलं आहे. दोघी माय लेकी ते अत्यंत आनंदाने चालवतात. अगदी दोघी सारख्याच दिसतात जश्या कि सख्याच जणू. २००५ पासून ची जी ऊर्जा त्यांनी टिकवली आहे ती आज तागायत तसूभरही कमी झालेली नाही. आणि शिवाय कणभर देखील वजन वाढलं नाहीच. कसं काय जमवतात कोणास ठाऊक? सातत्याने तेच दुकानं, तेच बेंचेस, तीच दोन तीन झाडे, त्याच पायऱ्या, तोच स्वयंपाक आणि बहुतांशी तेच गिऱ्हाईक किंवा त्याच त्याच पदार्थांच्या मागण्या / ऑर्डर्स, सगळं तेच पण त्या दोघी उत्कृष्ट रित्या किंवा त्या पेक्षा हि सुरेख रीतीने सर्व सांभाळत आहेत, हसतमुखाने. २००५ साली माझ्या मते फक्त ह्या लेकीचं लग्न झालं होतं. मग एक छोटसं पिल्लू झालं, ती आता आजी ला गाडीवर भन्नाट घेऊन जाते. म्हणजे बघा. ती पिल्लू सुद्धा तेथेच मोठी झाली. क्या बात है? ह्या जोडी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. तेच तेच काम करून, तेच एक छोटेखानी हॉटेल बघून किंवा तेच पडद्यामागे पदार्थ तय्यार करून, देऊन, मग पुन्हा बाकी स्वयंपाकाची तय्यारी ह्याचा कंटाळा न त्यांना कधी आला ना कधी येवो, हीच प्रार्थना. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या सासू सुनांच्या जोडी कडून. दिसायला पण इतक्या सुरेख आहेत, राहतात पण मस्त आणि सतत कार्यरत. बघावे ते नवलच. जे आहे ते स्वीकारलं हसतमुखाने, अत्यानंदाने कि मग असा परिणाम साधता येतो. कधी तरी अधे मध्ये त्या काकूंना मुलगा दिसायचा पण क्वचितच. स्वछता, चव, चेहेऱ्यावर हास्य राखलेले असे ते ठिकाण. 

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

ते कारण


शारीरिक वजन आटोक्यात ठेवण्याचे सर्वच जण अथक आणि आटोकाट प्रयत्न करत असतात. काही जण मग खाण्यावर नियंत्रण ठेवून, तर काही व्यायामावर भर देऊन आणि बाकीचे दोन्ही एकत्र करून, श्रम करत असतात. काहींना फळ मिळतं काहींना नाही. वजन आटोक्यात ठेवण्या मागे अनेक करणे आहेत, एक म्हणजे तंदुरुस्ती, आजारपणांना आमंत्रण न देण्यासाठी, काळाची गरज, स्वतःची गरज, नोकरीच्या ठिकाणी आवश्यक, सुंदर दिसण्यासाठी, तरुण राहण्यासाठी आणि भासण्याची, वय लपवण्यासाठी आणि अशी इतर बरीचशी करणे आहेत. 


सध्या माझी अर्धवेळ काम पद्धतीमुळे माझ्या हाती बराच वेळ शिल्लक राहतो. तो मी करणी लावते, सदुपयोग करते. वैविध्य लोकांना भेटते ज्यांना अनेक दिवसात, महिन्यात किंवा वर्षात भेट झाली नाही, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते, लिहिते, गप्पा मारते, पिटुकल्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांच्याशी खेळते आणि असे अनेक गोष्टी करत राहते. त्यातली एक महत्वाचा बदल म्हणजे सध्या बहुतेक ठिकाणी मी साडी परिधान करून जाते. अनेक वर्ष ज्या कपाटात विराजमान आहेत, सणासुदीलाच बाहेर पडतात त्यांना प्रकर्षाने हवा दाखवण्याचे काम सध्या मी करते आहे. तीच गत अनुरूप दागिन्यांची. म्हणून मला ते जे आरामामुळे वाढलेली चरबी मूळ पदावर आणायची आहेच, ती विरघळली पाहिजेच. संपूर्ण आराम, त्यात अत्यानंद खूप म्हणजे खूप काही करायला मिळतंय म्हणून, यथेच्छ, घरचं आणि गरमागरम दोन / चार वेळचं खायला मिळतंय त्यामुळे मिळालेलं समाधान हे सगळं दृश्य आहे, सर्वत्र, सर्वांना. मला सर्व साड्या मस्त मिरवायचा आहेत. मी मिरवायला मिळणार म्हणून एक दोन नवीन साड्या अवेळी, करण्याव्यतिरिक्त विकत घेतल्या आहेत. आता त्यांची बारी. आत्ता पर्यंत त्यांनी माझी खरंच खूप वाट पहिली, फोन केले, विनवण्या देखील करून झाल्या पण छे. मला काय त्यांना तेव्हा न्याय देता आला नाहीच. म्हणून वजन कमी झाले कि त्यांचीच शोभा वाढणार आहेत. सध्या त्या मार्गावर काम सुरु आहे. मला मनापासून मदत करण्यासाठी डॉक्टर ज्ञानदा खुद्द, आणि त्यांची संपूर्ण चमू झटत आहेत, अथक मेहेनत घेत आहेत, विचारपूर्वक असे खाणे सुचवत आहेत आणि वजन पण अणुरुपात बहिर्गमन, निर्गमन करत आहे. असो, जशी मी तशीच माझी चरबी, दोघीपण गोगलगायीच्या वेगाने पुढे मार्गक्रमण करत आहोत. "हम होंगे कामयब एक दिन नक्की च". डॉक्टर ज्ञानदा म्हणत असतील काय हे कारण वजन कमी करण्याचं? पण असो, असे व्यक्ती येति आणिक स्मृती ठेवुनी जाती. 

उपवर्ग


अगदी लहापणीपासून नातेवाईकांमध्ये, शेजार पाजारी, मित्र मैत्रिणींचे मोठे भाऊ बहीण आणि बरेच जणांची लग्न जुळवतांना पत्रिका, नाडी, गण, गोत्र, गूण असे काही सूचनक शब्द सातत्याने कानी पडले. त्यामुळे ते किवर्ड्स, सूचनात्मक शब्द आपलेसे वाटू लागले, ओळखीचे झाले, त्याचा मतितार्थ समजायला लागला थोडक्यात आणि सध्या इतक्या वर्षांनी उमजायला देखील लागले त्याचे गूढ. एक उपवर्ग समोर आला आहे नव्याने, अर्थात तो होताच कधी पासून पण काहीसा दडून बसला होता, आता दृश्य झाला आहे. त्यामुळे ह्या पुढे जे सोयरीक जुळवणार त्यांनी हे नक्की ध्यानात ठेवा, कदाचित उपयोग होईल, गरज भासल्यास. 


देव, मनुष्य, राक्षस गण असे तीनच गण म्हणे शास्त्रात लिहिले आहेत, किंबहुना त्यामुळे ते पत्रिकेत पण त्याचं पद्धतीने स्थानापन्न देखील झाले आहे, प्रचलित आहेत. हा जो उपवर्ग समोर आला आहे तो, त्याच्या कृती, वैचारिक पातळी ई. देव गणाला शोभतचं नाही, माणूस करूच शकत नाही, त्याला अजून बरीच उत्कृष्ट कार्य करायची असतात आणि राक्षस बहुतांशी चावण्यावर, भुंकण्यावर, प्रहार करण्यावर, मारण्यावर आणि अश्या विकृत कार्यात मग्न ठेवतात आवर्जून स्वतःला सातत्याने, असं केलं नाही तर त्यांना झोप / निद्रा येत नाही, अन्न पचत नाही, हाताला खाज सुटते आणि संपूर्ण वाटत नाहीच. त्यामुळेच हा नवीन गण, ज्यातील माणसांना पुरणपोळी देखील तिखट वाटते आणि ते तोंडाचा सुरर सुरर असा आवाज काढतंच ती ग्रहण करतात. "ता वरून ताक" अश्या पद्धतीने तुम्हाला समजले असेलच कि मला काय म्हणायचं आहे ते. सातत्याने तक्रारीचा सूर, अगदी वरचा सा लावलेला, सुरकुत्या, सतत उणेदुणे काढतंच राहणे, कधीही म्हणजे कधीही आनंदी राहायचे नाही, दुसऱ्याला राहू द्यायचे नाही, आणि कशातच समाधान नाहीच, नेहेमीच कॉन्फयुज्ड / गोंधळलेले, निर्णय घेतला तरी तो चुकीचाच कसा हे उगाळत बसणार आणि हे घरी जास्त दारी थोड्याफार प्रमाणात. तर असे हे नवीन  "पुरणपोळी तिखट" गण.


भावी नवरा, जावई बघायला गेलात तर पूर्ण पोळी मागवून, खायला घालून बघा तर, जसे "मुन्ना भाई ..." नावाच्या सुप्रसिद्ध चित्रपटात दाखवले आहे. म्हणजे पुढचे पाऊल टाकायचे कि नाही हे ठरवता येईल आधीच. आणि हो हा गण आजून पत्रिकेत ठळक पद्धतीने दर्शविला नाही, त्यामुळे फक्त पत्रिका काहीही ह्या बद्दल सुतवाच्य करू शकत नाही. कुटुंब शास्त्रात आहे, दररोज च्या अनुभवत सिद्ध झालेला आहे अनेक वेळा त्यामुळे ताक फुंकून प्या बरं का?

रामनवमी


माझी रामनवमी आणि संपूर्ण नवरात्र सफल झाले ह्या वर्षी. ह्याचाच अर्थ पुढील वर्ष, प्रत्येक दिवस आणि क्षण नक्कीच असाच वेगळा आणि खरोखरीच उत्सव असणार. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण", आज अगदी अशी स्थिती झाली आहे माझी. मनापासून आज मला माहेर सारखे आमंत्रण होते रामजन्म उत्सवाची. शलाका ताई आणि आनंद दादांच्या मंगलमय, चैतन्यपूर्ण वात्सुत. अहाहा च. अत्यंत नाविन्यपूर्ण, परिपूर्ण आणि उत्साहाने भरपूर आखलेला असा कार्यक्रम. त्यात खूप अशी भक्तिपूर्ण विविधता. एक लग्नसोहळ्याचे स्वरूप आले होते त्या जन्म उत्सवाला. जरी करता करविता "तो" असला तरी, शलाका ताईंच्या मार्फत हे सर्व संपन्न झाले, आयोजिले गेले आणि मी त्याचं एक भाग होते, एक श्रोती होते, म्हणजे अहो भाग्य माझे.  सजावटीपासून, प्रसादापर्यंत सर्वच वाखाणण्या जोगे आणि अप्रतिमच. नियोजनाची कमाल आहे शलाका ताईंची. त्यांच्या वानरसेनेकडून सगळे करून घेणे हि फार मोठी गदा त्या पेलतात. अशीच ताकद त्या मारुती रायने त्यांना बहाल करावी हि मनःपूर्वक प्रार्थना. १०००+ रामनाम जप तो देखील आखीव रेखीव असा, सुलभ अशी असं व्यवस्था, ऋतूनुसार पेय सर्वांना गारेगार, प्रकृतिस्वाथ्यासाठी, तदनंतर डॉक्टर दातार ह्यांचे एकनाथांना समर्पित राम चरित अनुभववादन / निरूपण, ताल सूर बद्ध जन्मसोहोळा, पुनः पुन्हा रामनाम जपसाधना आणि ह्यावेळी अनोखी लेझीम वापरून आणि फेर धरून अशी. अत्यंत नावाजलेल्या आणि रामरूप झालेल्या गायकांची भजन सेवा, सर्व सदारकर्त्यांचा यथोचित आदरपूर्वक आणि शब्दसुमनांनी केलेला सन्मान. हे सर्व अद्यावत संगीत सामग्री सहित श्रोतेहो. सरते शेवटी महाप्रसाद, तो देखील सर्वोत्तम असाच, अथ: पासून इति पर्यंत अगदी बारकाईने लक्ष देऊन, खूप वेळ घेऊन, फारच उत्कृष्ट असे प्लांनिंग करून आखलेला. "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवता आला म्हणून उभयतांचे शतशः धन्यवाद. 


एका वनरसेनेच्या वानरीला मी प्रकर्षाने सांगितले कि त्या खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत आहेत, खूप भन्नाट तय्यार झाल्या आहेत. त्यावर त्यांचे उत्तर असे होते "कि मला माझ्या मुलाचा जन्म सोहोळा च आहे असे भासते आहे, त्यामुळे मी आई अशी नटले आहे. त्याशिवाय आज माझ्या वडिलांचा देखील जन्मदिन, आणि ते हि बारा वाजताच". क्या बात है. 


अजून एक त्याचं सेनेतील तूप वाढण्याचे काम देखील अत्यानंदाने आणि रामनामाची करत होत्या. त्यांना मी जेव्हा सांगितले कि "पुरणपोळीची गोडी वाढली तुम्ही तूप वाढल्यामुळे किंवा रामनामपूर्वक तुपामुळे". त्यांचे देखील उत्तर फारच अप्रतिम होते "एक तर राम च काय तो करणारा आणि शलाका ताई मार्गदर्शक आम्ही फक्त त्यांची सेने. हे कार्य हातून घडल्यामुळे संपूर्ण वर्ष ह्याची ऊर्जा टिकते". मी तर निःशब्दच झाले हे ऐकून. 


डोळे, कान, पोट, मन तृप्त झाले. 


मंडप चमूचे, गायकांचे, आयोजकांचे, प्रासादिक स्वयंपाक करणाऱ्यांचे, खाल पासून वर पर्यंत वस्तू सुशोभित करणाऱ्यांचे आणि इतर सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार. अगदी त्या शेजारच्यांचे सुद्धा आभार ज्यांनी मनापासून घर तर दिलंच उठाबसायाला, अनेकदा खाली वर करून पिण्याचे पाणी भरलं, भरपूर बर्फ आणून ते थंडगार केलं आणि सर्वांची तृष्णा भागवली ह्या अश्या ग्रीष्म ऋतूमध्ये. भले मोठे प्रसन्नतेत भर घालणारे कुलर, अमृततुल्य असे ताक आणि हि यादी न संपणारी आहे. असे  उत्सव होती आणिक स्मृती ठेवुनी जाती. 


|| जय श्रीराम ||  

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

"माहेर"ची परिभाषा


माहेर हे एक वेगळंच समीकरण आहे. हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही तितकेच प्रकर्षाने समजते ह्या विभक्त कुटुंब पद्धतीत. पण तरी देखील मला नव्याने एक आगळी वेगळी परिभाषा उमगली आहे ह्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या शब्दाची, किंबहुना ह्या संकल्पनेची. 

तर त्याचं काय झालं कि माझ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालयात एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ठराविक वेळा किंवा त्या पेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालायचे होते. शिवाय काही आसने देखील करावयाची होती. baas मग काय मी झाले सुरु. आणि माझ्या न कळत कधी ती संख्या गाठली गेली हे समजलंच नाही. मी आपली नियोजलेले करत होते, करत राहिले आणि एका ठराविक पद्धतीने कळवत राहिले. मग आला निकालाचा दिवस आणि काय म्हणताय मी अख्ख्या विश्वविद्यापीठात पहिली आले. अहाहा च. माझ्या संस्थेसाठी फार मोठी कामगिरी होती ती. संपूर्ण प्रवास झकास झाला. आणि बक्षीस समारंभात कौतुक म्हणून व्यायाम सुरुच राहावा म्हणून अप्रतिम सुंदर मऊसर टी शर्ट, ट्रॉफी, योग मॅट असे दिले गेले. त्या योग मॅट वर पाठ टेकली कि ह्या जगापल्याड गेल्यासारखे वाटते जसे कि अगदी घरी आईच्या कुशीत निजल्यासारखे. माहेरची उब आहे त्यात आणि शब्दात न पेरता येण्यासारखा अनुभव. इतके भन्नाट वाटते कि योग करतच राहावे असे. बघा म्हणजे सासरी राहून माहेरचा अनुभव तो देखील दररोज. ह्या पेक्षा अजून काय हवे. हि सगळी माहेरची शिकवणच तर आहे ज्या मुळे मला वेळेचे नियोजन करून, व्यायाम करता आला. ठरवलेले पूर्णत्वास न्यायाचे, जिद्द कायम ठेवायची, पुढे मार्गक्रमण करत राहायचे हे आणि असे अनेक धडे लहानपणापासून मिळाले, महत्व कळले. त्यामुळे स्व कमाईची ती मॅट म्हणजे माझे सर्वस्व आहे. मी खूप जीवापाड जपते तिला. आज पर्यंत खूप मॅट वर व्यायाम करण्याचा योग आला. स्वतः मॅट विकत घेऊन पण आसने केली, पण ह्या जिंकलेल्या मॅट ची सर कोणालाच नाही.

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

वस्त्र


मी अनेक प्रकारे स्वतःला भाग्यवान समजते, खूप काही लाभलाय, पदरात पडलंय आणि अनपेक्षित पणे मिळालंय देखील. त्यातलेच एक इथे आज नमूद करत आहे. माझ्या आईकडे सगळेच व्रत, वैकले, सण आणि शिस्तीत, सोळ्यात, साग्रसंगीत पूजा - अर्चा, नैवैद्याने परिपूर्ण. करायचे तर उत्तमच, हाच स्वभाव म्हणून खूप प्रमाणात धार्मिक, पौराणिक आणि अध्यात्मिक विधी होत होते घरी. अगदी मला कळायला लागले तेव्हा पासूनच मी हे सगळं अगदी जवळून बघितले, मनापासून भाग घेतला आणि तदनंतर तर संपूर्ण ताबाच घेतला, नैवेद्य करायचा, पूजेच्या तय्यारीचा अगदी रांगोळी, तोरणापासूनच सगळे. त्यामुळे सगळंच ठाऊक होत. अर्थात तेव्हा ना सर्वत्र सारखे होते, खूप तफावत नसायची. गूळ-साखर हाच काय तो तेवढा बदल आढळला मला तरी, प्रसाद करते वेळी. कोकणस्थ तेव्हा सगळेच साखरेचे पदार्थ करत असतं आणि देशस्थ गुळाचे. बास, बाकी काहीच फरक नव्हता. जाणवला नाही, चार डोळ्यांनी टिपला नाही, कारण नव्हताच. माझ्या घरी आणि इतरत्र गुढी उभारतांना एक नवीन महावस्त्र = खण, गाठी, कडुलिंबाची पानें / डहाळी, आणि त्यावर तांब्या इतकंच असायचं. आंब्यांच्या पानांचे तोरण आणि डहाळी घरच्या दाराला, देवघराला लावली असायची. मी लग्न होऊन सासरी आले, काही वर्ष देशाबाहेर राहिलो त्यामुळे त्यानंतर लक्षात आले असे कि इथे गुढी म्हणजे साडी, लिंबाची आणि आंब्याची डहाळी, तांब्या, गाठी आणि फुलांचा हार वगैरे. म्हटलं हे काय? सुरवातीला काहीच समजले नाही. मग सासूबाईंना आवडतील अश्या साड्या घेतल्या. त्यांच्याकडे नसलेला रंग किंवा प्रकार ई. आणि आता मी माझ्या लेकीला आवडेल अशी, ती नसेल अशी साडी घेते. नववर्ष म्हणून घरच्या पिल्लांना, आईला, नवीन वस्त्र, दागिना ई. घेण्याची पद्धत होती, साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे. म्हणजे वर्षभर भरभराट राहते, टिकते अशी त्यामागची सद्भावना. दिल्याने वाढते म्हणतात, आणि ते देखील घरातील व्यक्तींनाच देणं होतं होतं तेव्हा ना, मग काय हरकत आहे. 


सासरची गोष्टच वेगळी होती. आता मी दोन साड्या घेतल्या ह्या वर्षी. एक गुढीला आणि एक आम्हा दोघी माय-लेकीला. एक खण, मग एक साडी, ते आता दोन साड्या असा बदल आवडला मला, भावतोय. भरभराट च दृष्टीस पडते आहे, मग बदल स्वीकारायला काय हरकत आहे. वृद्धिंगत व्हावे, सर्वार्थाने, म्हणजे मिळवले. खूप समाधान मिळाले मला अश्या बदलातून जातांना, स्वीकारतांना, आणि माझ्या मुलीचा सहभाग बघून. 


बदल हाच स्थिर असतो ह्याची खात्री पटली. जे होते ते चांगल्यासाठीच हे देखील मान्य झाले. असे सण येति आणिक स्मृती देऊनी जाती. 

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

आंब्याची पाने आणि गर्भधारणा


प्रत्येक शुभ प्रसंगाच्या वेळी भारतात दारावर आंब्याचे तोरण लावायची पद्धत आणि रीत आहे. ह्या शिवाय आंब्याच्या डहाळ्या पण देवघरावर, दारावर, गुढीसोबत लावतात, आणि आंब्याची पाने कलशाचा महत्वाचा भाग असतो. पूजा झाली, तो दिवस सरळ कि दुसऱ्या दिवशी "पुनरा गमना यच" असं म्हणून अक्षता वाहायच्या आणि मग ती आंब्यांची पाने निर्माल्य होतात. आताशा विहिरी नाहीत घरोघरी, नदीत टाकायचे नाही, प्रत्येकाच्या घरी कचरा गिरवयाची सोय नसते त्यामुळे कित्येकदा ते पायाशी, कचऱ्यात टाकले जातात. त्या दिवशीपुरतं महत्व त्याच, बास. 


अगदी तसेच आहे माझ्या पाहण्यात, अनेक कुटुंबात, अर्थात अपवाद असतात प्रत्येक वेळी पण फारच थोडके, हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण नाही. गर्भधारणेच्या काळात जे काही ७-८ महिने असतात त्या पुरते होणाऱ्या आईचे लाड, किंवा काळजी म्हणता येईल, जसे बाळ झाले तसे बाळालाच फक्त महत्व.  

धार लावणे


माझ्या लहानपणी बैठी घरे होती सर्वत्र. फ्लॅट हि संकल्पना फार नंतर आली, माझ्या मते जेव्हा मी नोकरी करायला सुरवात केली आणि तेही फारच थोड्या प्रमाणात. आत्ता सारखे मुळीच नाही. त्यामुळे धार लावणारा अगदी घराच्या गेट पाशी येत होता तेव्हा. कुठल्याही घरी वापरात असलेल्या हत्याराला धार लावण्यासाठी तो सायकल वर मागे एक छोटेसे यंत्र घेऊन येत असे. ते पायडल मारून चालू करत असे. खूप म्हणजे खूप मज्जा यायची ते बघायला. त्या वेळी विळी च वापरली जायची भाजी, फळे चिरायला. चाकूचा वापर फारच कमी प्रमाणात होत असे. आज सारखे सर्रास चाकू वापरले जायचे नाही त्या वेळी. तेव्हा भारतीय पद्धतीने सगळे होत असे, आत्ता भारत बाहेर काय चालते त्याची नक्कल जास्त होते. चाकूची धार कमी झाली कि एक दोनदा प्रयन्त करायचा कपाच्या खालच्या भागाला घासून तात्पुरती धार लावण्याचा, नाहीतर त्याला मोडीत काढून नवीन घेऊन यायचा. बास. संपला विषय. तर अशी हि माझी धार ह्या विषयाची थोडक्यात ओळख. 


गेले काही दिवस माझ्या चार डोळ्यांनी एक अजिब पण आत्यंतिक नैसर्गिक पद्धतीने धार लावणे बघितले. अर्थात ह्या आधी पण मी ते टिपले होते पण ह्या काही दिवसांपासून ते जास्त प्रकर्षाने जाणवले आणि अजून काही आधीचे मला आठवले. आमच्या कडे दोन मिठू होते, एक करंट जातीचा आणि एक नेहेमीच. दोघेही पिल्लू होते. त्यांना उडता येत नव्हतं, आमच्या मागच्या अंगणात ते येऊन बसले होते. मांजर किंवा इतर प्राणी त्रास देतील म्हणून मग आम्ही ते सुरक्षेच्या दृष्टीने पाळले. ती दोघे काही दिवस गेले कि मान खाली घालून खूप वेळ काही करत बसलेली दिसायची. निरखून बघितले तर चोच घासत बसलेली असायची, ह्या आणि त्या बाजूनी देखील. नंतर लक्षात आले कि ते त्यांच्या चोचीला धार लावत होते. अगदी तस्सेच सध्या आमच्या घराच्या मागे भले मोठे झाड आहे, त्यावर बसलेले कावळे झाडाच्या फांदीवर / बुंध्यावर असलेल्या सुरकुत्यांचा आधार घेतात धार लावण्यासाठी. मस्त चोच घासत बसलेले असतात. काय दृश्य आहे ते? एक म्हणजे मी माझ्या बालपणात झारर्किनी जाऊन पोचले क्षणात, आणि ते विहंगन दृश्य बघून धन्य झाले. कित्ती बुद्धिवान ते पिटुकले पक्षी. कधी काय कसं करायचं हे निसर्गाचं शिकवतो त्यांना. क्या बात है. अप्रतिमच. 


चला तर मग आपण देखील आपल्या बुद्धीला अशीच धार देत राहू, वैविध्य प्रकारे, आणि सातत्याने. म्हणजे ह्या दुनियेत तक धरून राहायला मदत होईल. मग ती धार वाचनाने, मनन-चिंतन करून, ध्यान आणि योग करून, शारीरिक + मानसिक स्वास्थ्य सांभाळून लावू. 

बुधवार, १० एप्रिल, २०२४

केसा येवढी


माझी एक सख्खी मैत्रीण मला तिच्या नवीन सखी बद्दल सांगत होती. अगदी आदराने बरं का मंडळी. अगदी कोणताही किंतु परंतु न ठेवता, न बाळगता किंवा कुठलीही तुलना ना करता. 


तर तिच्या हाती लग्नाच्या जवळपास ३ दशकानंतर एक नवीन गोष्ट विराजमान झाली. अर्थात सर्वांनीच त्या बद्दल विचारले. मला सांगतांना म्हणाली कि हि एक बांगडी माझ्या आज्जे सासूबाईंची आहे. माझ्या वाट्याला आली. आदरपूर्वक ती फार साधी दिसले सर्वांना, अगदी गोल होती म्हणून बांगडी आणि तिची जाडी एक केसा एवढीच होती. फार फार कमी वजनाची, किंबहुना मोरपीस जास्त वजनाचे असेल अशी. 


ह्या माझ्या मैत्रिणीला आम्ही सर्वांनीच फार फार जवळून बघितले आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती आहे. आणि त्या काळी बहुतांशी सर्वत्रच एकसारखे वातावरण होते. स्त्री घर सांभाळायची आणि पुरुष बाहेर कामाला जायचे. स्त्रीला मान सन्मान होता. त्या पै न पै गोळा करून अंगभर सोने, दागिने ई. परिधान करत होत्या. त्या वेळी भरपूर सुरक्षा होती, स्त्रिया घरीच असायच्या आणि बरकत होती, जरी कमाई सगळ्यांचीच नगण्य होती. पण माझ्या मैत्रिणीच्या माहेरी तिच्या आजीच्या पाटल्या, बांगड्या, इतर दागिने, चांदीची ताटे, वाट्या आणि इतर खूप काही होते. सगळीकडे जर परिस्थिती सारखीच होती मग इतकी तफावत का? हा मला पडलेला प्रश्न. म्हणजे एकीकडची आजी त्याच वयाची ६-८ वजनदार बांगड्या मिरवते आणि दुसरीकडे जेमतेम सोन असलेली फक्त एक बांगडी? माझ्या मते हा फरक ताळतंत्र सांभाळण्याचा आहे, दूरदृष्टीचा आहे, भन्नाट नियोजनाचा आहे आणि अर्थातच आवड. त्या स्त्रीला ह्या सगळ्यांची पुढील पिढ्यांकरताची गरज, किंवा साठवणूक ह्याची असलेली जाण, तिच्या विचारांना मिळालेला सन्मान, आदरपूर्वक वागणूक आणि शांतता, दृश्य समृद्धी आणि असेच बरेच कंगोरे. कुटुंबातल्या स्त्रीला सन्मान दिला, मुभा आणि मोकळीक दिली कि जमीन आस्मानचा फरक पडतो. हे इथे दागिने किंवा पैसे ह्या बद्दल बोलणं नाहीच, पण एक भरभराट पण अत्यंत महत्वाची असते आणि मग ती पिढ्यानपिढ्या आशिर्वादात्मक रित्या सुरु राहते. अविचारी माणसे असली कि काहीच साध्य होत नाही हे ह्या साध्या एका उदाहरणावरून सिद्ध होते. त्यामुळे मस्त राहा, सन्मान द्या आणि घ्या, तदनंतर भरभराटीचा विजय हा नक्कीच होणार. 

वाढत्या अंगाचे


मी माझे स्नातकोत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहत होते. एका मुक्त विद्यापीठात नोकरी पण करत होते. त्या वेळी माझ्या मनगटावर एक साधे दिसणारे पण योग्य वेळ दाखवणारे घड्याळ होते. तेवढ्यातच माझे लग्न ठरले आणि माझे ते जुन्या पद्धतीचे योग्य वेळ दाखवणारे घड्याळ बदलले गेले. आम्ही दोघे नवीन घड्याळ खरेदी करण्यासाठी एका नामवंत दुकानात गेलो. बरीचशी घड्याळे बघितल्यावर एक पसंद केले. तिथल्या नेहेमीच्या पद्धती प्रमाणे मी घड्याळ घालून बघते तर काय बरेच मोठे होते ते, म्हणजे जवळपास ४ कड्या काढाव्या लागल्या व्यवस्थित मनगटावर विराजमान होण्यासाठी. तेव्हा ते दुकानातले काका म्हणतात कसे, "ह्या कड्या सांभाळून ठेवा. पुढे कामात येतील. लग्न झाल्यावर वजन वाढते.... ई. ". का कुणास ठाऊक पण घड्याळ्याचे पट्टे वाढत्या अंगाचे तय्यार करतात. अर्थात मी माझ्या वेळेचा हा किस्सा सांगते आहे जेव्हा दहावीत परीक्षेत वेळ कळवा म्हणून आधी आईचे घड्याळ मिळायचे घालायला, जुने. मग काही वर्षांनी आपले नवीन, अशी पद्धत होती, अलिखित नियम देखील होता. 


परवा मला एक साधे घड्याळ बक्षीस म्हणून मिळाले. प्रेमाने दिले आहे मला. खूप दिवस झाले म्हटलं आज घालावे, म्हणून उघडले तर काय, ते देखील ह्या जमान्यात वाढत्या अंगाचेच निघाले. आता मला त्याच्या कड्या काढून आणाव्या लागतील नाहीतर ते गळून पडेल, समजणार पण नाही. 


अजूनही मनगटाने त्याचा आकार सांभाळा आहे तब्बल २५ वर्षांनी ह्याची कमाल वाटली. मज्जा आली. काही घड्याळ्यांचे डिझाईन वेगळे केले आहे ज्यात कड्या तश्याच राहतात आणि हूकने मागे पुढे करून कोणत्याही मनगटाची शोभा वाढवता येते. प्रगती आहेच. काही सांगता येत नाही काही वर्षांनी आपोआप जुळवून घेणारे पट्टे देखील निघतील. पण माझी पहिली ह्या पट्ट्याची आठवण तरी देखील ताजी तवानी राहिलाच ह्याची खात्री आहे.  

पांगुळगाडा ते ...


हे बरेचदा ऐकलं होतं किंबहुना मराठी पुस्तकात देखील होतं कि "एक चक्र इथेच पूर्ण केलं जातं", आपोआप. अर्थात तुम्ही बघाल तसे असते सगळ्याच बाबतीत. "लहानपण देगा देवा" असं सगळेच मनातल्या मनात म्हणत असतात, इच्छित असतात. अगदी दूर कशाला जायचे, परवाच माझी लेक शाळकरी मुलांना यथेच्छ खेळतांना बघून म्हणाली कशी, "शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे बघ ना कशी मनसोक्त खेळात आहेत खाली. शाळा म्हटलं कि मोजकाच अभ्यास आणि बाकी वेळा मित्र, बास. कित्ती मस्त आयुष्य आहे नाही? मी म्हटलं अगं आपण सगळेच जगलो ना ते आधी, मग? काही का असेना पण सर्वांना ते मुक्त बागडणं फारच आवडतं. अर्थात त्या लहानपणी मोठा व्हायची प्रचंड घाई झालेली असते ती वेगळी गोष्ट. असो. 


तर लहानपणी धडपडत पाय फुटले कि पांगुळगाडा अत्यानंदाने वापरला जातो. मग तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला असो नाही तर अत्याधुनिक असा, तो त्रिकोणी सारख्या आकाराचा असो नाही तर गोल, पण तो चांगलाच वापरात येतो. एक मस्त आधार मिळतो, आकाश ठेंगणं वाटायला लागतं, अगदी जग पादाक्रांत केल्याचा आभास होतो आणि एक मोकळीक मिळाल्याची जाणीव देखील. इथून तिथे आणि तिथून इथे, सर्वत्र विहार सुरु. मोठ्यांना लहानांनी उच्छाद मांडल्या सारखं वाटतं पण वाढतं वय देखील लक्षात येतं, प्रगती दिसते आणि मज्जा येते. पांगुळ गाडा ह्या करता कि आधार असला तरी पांगल्यासारखं होऊ शकतं, म्हणजे चालता चालता तोल जाणे, मध्ये काही आलं तर सांभाळता न येणे आणि ह्या सगळ्यातुनच शिकणे, अर्थात त्या पायात बळ मिळवणे सरावाने, पुढची पायरी गाठणे ई. 


हे असं गोंडस लहानपण झर्रर्रकिनी कधी निघून जातं समजतच नाही. मग काय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नोकरी, चार हात ई. करता करता काही जणांच्या हाती अजून एक मोठ्या आकाराचा पांगुळगाडा विराजमान होतो. वॉकर असे त्याचे गोंडस नाव. प्रत्येक पाऊल टाकते वेळी त्याचा आधार वाटतो. त्याला दिवा लावण्याची सोय असते, चाके दिली असतात, आणि प्रत्येकाच्या उंचीनुसार बदल करता येतात. त्या आजी आजोबांना देखील मोकळीक, स्वातंत्र जे गेले अनेक वर्ष अनुभवलं होतं आणि जे अश्याच काहीश्या रंगीबेरंगी पिटुकल्या पांगुळगाड्यामुळे शक्य झालं होतं / सुरु झालं होतं ते. पाय मोकळे होतात ते वेगळंच. आणि काय हरकत आहे?. आयुष्यभर, जागोजागी, पदोपदी आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे कुणाचा ना कुणाचा आधार घेतला आहेच. स्वरूप वेगवेगळे असेल कदाचित पण आधाराशिवाय अश्यकच मार्गक्रमण करणं. बघा म्हणजे इथेच एक चक्र पूर्ण होतेच हे कित्ती सत्य आहे. 


सगळेच पिल्लं लहानपणी असा गाडा घेतातच असे नाही,काही चपळ असतात आणि इथे तिथे धरून पट्टदिशी चालू लागतात. अगदी तसेच प्रत्येक आजी आजोबा नाही वापरात गाडा, पण कोणी काठी, तर कोणी मित्राचा खांदा, तर कोणी काही वापरतोच, सजगता म्हणून. ते देखील उपभोगता आलं पाहिजे उंच मानेने. 


काय विचारपूर्वक "त्याने" सगळं घडवलं आहे, बऱ्याचश्या गोष्टी आपल्या सुपूर्त केल्या आहेत आणि काही ठिकाणी स्वतःच्या हाती सत्ता ठेवली आहे आपल्याला पांगळा करून. सगळंच मानवाच्या हाती देऊन टाकलं तर काय होईल ह्याची कल्पना देखील करवत नाहीच. 


कधी लागलाच तर आधार घेऊन किंवा देऊन एक एक पाऊल पुढे टाकूया. एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

तेथे कर माझे जुळती


मी अक्षरशः नतमस्तक झाले एक बातमी ऐकून. एक बातमी म्हणण्यापेक्षा एक जबरदस्त आणि विचारपूर्वक कृती ऐकून. अनेक वर्षांपासून / दशकापासून माझी एक मैत्रीण आहे. त्या काळात सोशल मीडिया फार वेगळ्या प्रकारे सुरु होते आणि प्रत्यक्ष भेटीत अनुभवता येत होते. प्रत्यक्ष घरी जाणे कधीही, यथेच्छ पोटभर जेवणे / खाणे, भरपूर गप्पा फक्त मैत्रिणीशी नाही तर अख्ख्या कुटुंबाशी आणि कुठलीही घाई नाहीच, बोलायचं पण पोटभर आणि ऐकायचं त्याहून मस्त मजेत. खूप म्हणजे खूप भटकायचं, उगाच, अभ्यासासाठी आणि कामासाठी सुद्धा. काम म्हणजे अख्ख्या कुटुंबाचे. ह्या अश्या साध्या, सरळ वातावरणात वाढलेले आम्ही सर्व. त्यात एक खास मैत्रीण, तिचे खास सदैव हसत मुखाने स्वागत करणारे कुटुंब, सर्वजण अतिशय हुषार, चार बहिणी, काका काकू आणि आमच्यासारखे सारखे पडीक व्यक्तिमत्व. त्यातील दोन नंबरची ताई प्रत्येक वेळी सुवर्णपदक विजेती, आणि गेले ३ दशकं नावाजलेली सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ म्हणून असंख्य रुग्णांना प्रचंड प्रेरणा देत आहे, बरे करत आहे, तेजोमय दृष्टी बहाल करते आहे. अशी हि आमच्या सर्वांची आदर्श ताई अगदी बारीकसारीक आणि पराकोटीचा, म्हणजे सामान्यांच्या कधी लक्षात येणार नाहीच असा, इतक्या उंचीचा विचार करून काकांना म्हणजे तिच्या वडिलांना रामल्लाचे दर्शन करण्यास घेऊन गेली. अगदी व्ही आय पी असे असाधारण दर्शन, थेट गाभाऱ्यात, म्हणजे लल्ला आणि काकांमध्ये कोणीच नाही असे अद्वितीय. संपूर्ण शिस्तीत आखलेला प्रवास, अप्रतिम सोय आणि परमानंद, संपूर्ण दोन दिवस असा आलेख. परमोच्च बिंदू ह्या सगळ्या प्रयत्नांचा किंवा विचारांचा असा कि ताई काकूंची पैठणी नेसून गेली होती दर्शनाला काकांसोबत, म्हणजे दोघांनी जोडीने दर्शन घेतल्यासारखे होते, काकू नाहीत ह्याची जाणीव होणार नाही आणि त्यांना पण दर्शनाचा लाभ. परमेश्वराचे कित्ती कोटयावधी आशीर्वाद आहेत ताईसोबत बघा, असा विचार तिला करता आला. मी तर हे सगळे वर्णन ऐकून निःशब्दच झाले. माझ्या शब्द संग्रहात ह्या सगळ्या कार्यासाठी, उत्कृष्ट कृतीसाठी, विचारपूर्वक देवदर्शन घडवून आणल्यासाठी कुठलीही उपमा नाही, कि प्रशंसा / स्तुती करण्यासाठी शब्दसुमने नाहीतच. उगाच नाही आपल्या मराठीत कर्तृत्त्वान मुलीला बाईमाणूस असे संबोधले जाते, कारण ती ह्या आणि त्या घराचे सगळेच सांभाळते. प्रत्येकीलाच असे भाग्यात नसते हो. त्यामुळे मी माझ्या ह्या आदर्श अश्या ताई समोर नतमस्तक होते. "काय वर्णू ताव गूण, अल्पमती नारायण". ती आधीच माझी आणि असंख्य लोकांची ताई आणि आदर्श तर आहेच, पण आता तिच्या बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला. तिच्या हातून असेच कार्य सातत्याने होत राहो हि सदिच्छा आणि प्रार्थना. 


असं म्हणतात ना कि प्रत्येकाकडे तो परमेश्वर स्वतः पोचू शकत नाही म्ह्णून त्याने आई घडवली. अगदी तस्सेच प्रत्येकाला परमेश्वराचे / संतांचे दर्शन "ह्याची देही ह्याची डोळा" होणे अशक्य म्हणूनच अशी ताई त्याने निर्माण केली, घडवली आणि तिला असे जगावेगळे विचार प्रदान केले. माझ्या साठी, आणि इतर अनेकांसाठी तिचे दर्शन घेतले म्हणजे पावले हो. आमची प्रत्यक्ष भेट कधी होते माहित नाही पण साध्या माझा तिला दुरूनच साष्टांग नमस्कार. अहो भाग्य त्या काका काकूंचे ज्यांनी अश्या अद्वितीय मुलीला जन्म दिला. 

सोमवार, १ एप्रिल, २०२४

आगळा वेगळा फोन

 आज मला एक आगळा वेगळा फोन आला असं म्हणायला हरकत नाही, किंवा संवाद साधला गेला, अदृश्य स्वरूपाचा. अहो काय सांगू, प्रत्यक्ष "तो" होता त्या बाजूला आणि म्हणतो कसा, अगं जसा तुम्हाला उन्हाळा, तास तुमच्याच घरात आम्हाला देखील नाही का? फोटो, मूर्ती ह्या स्वरूपात पुजता तुम्ही म्हणजे आमचं अस्तित्व आहे. म्हणजेच ती उन्हाची झळ आम्हाला देखील आहे ना. मग त्या करता तू काय करते आहेस? एखादी तरी गोष्ट सांग केलेली? "त्यानेच" मला आधी पासून एक वेगळी अनोखी सदाबहार आणि आयुष्यभर पुरून उरणारी अशी गिफ्ट दिली आहे ती म्हणजे नावीन्यतेने विचार करणे. मग त्या गिफ्ट चा ह्या देवघराची पण कधी काळीं उपयोग करावा, नाही का? चल तर मग. त्यात अजून एक म्हणजे मला माझे देव, आणि देवघर ज्या दिवशी मी नामस्मरण करत करत स्वच्छ करते, हार घालते त्या दिवशी दृष्ट लागण्यासारखे दिसतात. आज मी भरपूर ताजी ताजी, रंगबिरंगी फुले आणली होती, अर्थात हार करून वाहण्यासाठी, पण मग देवघर स्वच्छ करून, फोटोची, मूर्तींची जागा अदलाबदल करून, शेजारी वेगळे बसवून, प्रत्येकाला मोकळे पणाने ठेवत मी फक्त फुलं वाहिली. प्रत्येकाला एक नक्कीच आणि मस्त रंगसंगती साधत, काही मूर्तींना अनेक अशी फुले वाहिली. आज ते देवघर इतकं अप्रतिम दिसतंय म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. त्यांना पण फार आवडलाय हा पिटुकला बदल. फक्त फ्रेम वर मांडलेली फुले, सगळं कसं हलकं फुलकं उन्हाळी पद्धतीचं. फ्रेमभर हार म्हणजे कदाचित जास्त गरमी, म्हणून त्यानेच सुचविलेला हा बदल हो. क्या बात है? तो सगळं यथाशक्ती, यथायोग्य आणि व्यवस्थित करून घेतोच आपल्याकडून, पैसे देतो, बुद्धी बहाल करतो, शक्ती प्रदान करतो आणि कृती करवून घेतो. आधीच मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली त्यात आज हि भर पडली, एक म्हणजे फोन ची आणि दुसरी हि कृती. "चेरी ऑन केक" म्हणजे मी स्वयंपाक घरातील बाळबोध अगदी छोटेखानी पंखा देखील सुरु ठेवला आहे, तेवढाच गार वारा बरा वाटतो हो सभोवताली. "असे फोन, प्रसंग येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 


आणि फक्त मलाच नाही, घरातील सर्वांनाच एक उत्कृष्ट दृश्य दिसते असे सजलेले देवघर असले कि, त्या एकंदरीत घराला प्रफुल्लित वाटतं. 


असेच फोन करत राहा रे. आणि सेवा घडू दे नित्य. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...