मी अनेक प्रकारे स्वतःला भाग्यवान समजते, खूप काही लाभलाय, पदरात पडलंय आणि अनपेक्षित पणे मिळालंय देखील. त्यातलेच एक इथे आज नमूद करत आहे. माझ्या आईकडे सगळेच व्रत, वैकले, सण आणि शिस्तीत, सोळ्यात, साग्रसंगीत पूजा - अर्चा, नैवैद्याने परिपूर्ण. करायचे तर उत्तमच, हाच स्वभाव म्हणून खूप प्रमाणात धार्मिक, पौराणिक आणि अध्यात्मिक विधी होत होते घरी. अगदी मला कळायला लागले तेव्हा पासूनच मी हे सगळं अगदी जवळून बघितले, मनापासून भाग घेतला आणि तदनंतर तर संपूर्ण ताबाच घेतला, नैवेद्य करायचा, पूजेच्या तय्यारीचा अगदी रांगोळी, तोरणापासूनच सगळे. त्यामुळे सगळंच ठाऊक होत. अर्थात तेव्हा ना सर्वत्र सारखे होते, खूप तफावत नसायची. गूळ-साखर हाच काय तो तेवढा बदल आढळला मला तरी, प्रसाद करते वेळी. कोकणस्थ तेव्हा सगळेच साखरेचे पदार्थ करत असतं आणि देशस्थ गुळाचे. बास, बाकी काहीच फरक नव्हता. जाणवला नाही, चार डोळ्यांनी टिपला नाही, कारण नव्हताच. माझ्या घरी आणि इतरत्र गुढी उभारतांना एक नवीन महावस्त्र = खण, गाठी, कडुलिंबाची पानें / डहाळी, आणि त्यावर तांब्या इतकंच असायचं. आंब्यांच्या पानांचे तोरण आणि डहाळी घरच्या दाराला, देवघराला लावली असायची. मी लग्न होऊन सासरी आले, काही वर्ष देशाबाहेर राहिलो त्यामुळे त्यानंतर लक्षात आले असे कि इथे गुढी म्हणजे साडी, लिंबाची आणि आंब्याची डहाळी, तांब्या, गाठी आणि फुलांचा हार वगैरे. म्हटलं हे काय? सुरवातीला काहीच समजले नाही. मग सासूबाईंना आवडतील अश्या साड्या घेतल्या. त्यांच्याकडे नसलेला रंग किंवा प्रकार ई. आणि आता मी माझ्या लेकीला आवडेल अशी, ती नसेल अशी साडी घेते. नववर्ष म्हणून घरच्या पिल्लांना, आईला, नवीन वस्त्र, दागिना ई. घेण्याची पद्धत होती, साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे. म्हणजे वर्षभर भरभराट राहते, टिकते अशी त्यामागची सद्भावना. दिल्याने वाढते म्हणतात, आणि ते देखील घरातील व्यक्तींनाच देणं होतं होतं तेव्हा ना, मग काय हरकत आहे.
सासरची गोष्टच वेगळी होती. आता मी दोन साड्या घेतल्या ह्या वर्षी. एक गुढीला आणि एक आम्हा दोघी माय-लेकीला. एक खण, मग एक साडी, ते आता दोन साड्या असा बदल आवडला मला, भावतोय. भरभराट च दृष्टीस पडते आहे, मग बदल स्वीकारायला काय हरकत आहे. वृद्धिंगत व्हावे, सर्वार्थाने, म्हणजे मिळवले. खूप समाधान मिळाले मला अश्या बदलातून जातांना, स्वीकारतांना, आणि माझ्या मुलीचा सहभाग बघून.
बदल हाच स्थिर असतो ह्याची खात्री पटली. जे होते ते चांगल्यासाठीच हे देखील मान्य झाले. असे सण येति आणिक स्मृती देऊनी जाती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा