शनिवार, ४ एप्रिल, २०२६

2414: दोनदा वाचावंसं वाटेल असं लिहा

परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच.

गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं:
“अजूनही लेक्चररच आहेस का, की काही पुढे केलंस?”

मी थोडंसं हसून विषय बदलला.
पण तेच पुन्हा… आणि पुन्हा तोच प्रश्न.

मला उत्तर द्यायचंच नव्हतं असं नाही.
पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आवश्यक असतंच असं नाही ना.

मी मनाने शिक्षक आहे.
आणि त्याबद्दल मला कधीच कमीपणा वाटला नाही.

छोट्या गावातून, मराठी माध्यमातून शिकत इथपर्यंत येणं—
हे “फक्त” म्हणून सोडून देण्यासारखं नाही.

आजकाल एक गोष्ट मात्र जाणवते
जर खरंच कुणाबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर ते इतकं अवघड राहिलेलं नाही.

फोनवर बोलत असतानाही नाव टाईप करून सर्च करता येतं.
आणि खरंच उत्सुकता असेल, तर नंतर एक फोन करून
“तुझं काम पाहिलं, छान वाटलं” असंही सहज म्हणता येतं.

प्रश्न काय विचारला यापेक्षा, तो कसा विचारला हे जास्त लक्षात राहतं. पत्र, मेल असे लिहावे, फोन वर असं बोलावं कि ऐकतं राहावसं वाटेल, पुन्हा पुन्हा पत्र / मेल / फोन यावा असं वाटलं पाहिजे. तो लिहिणारा अगदी समोर बसून संवाद साधतो आहे असं भासलं पाहिजे, नाही का?

बाबा नेहमी एक साधी गोष्ट सांगायचे
"काही लोक फक्त वयानं मोठे होतात. आणि काही खरंच मोठे होतात."

फरक तिथेच पडतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...