बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

तो पदस्पर्श

तर हि २४ वर्षांपूर्वीची हि कथा आहे. कथा नाही स्वानुभवच तो. तर १९९८ साली माझं वास्तव्य हैदराबादेत होतं. मी त्यावेळी पदव्युत्तर अभ्यासक्रम करत होते आणि शिवाय अर्धवेळ नोकरी देखील. पण हैद्राबाद हे माझं गाव नसल्यामुळे मला वसतीगृहात राहावं लागलं. उत्कृष्ट दुचाकी चालवायला येत होती, पण त्या वेळी मात्र मी ६-८ चाकी भली मोठी बस पसंद केली. दररोज माझी पदयात्रा जवळपास ८-१० किमी होत असे, जास्त पण कमी नाही. फक्त स्वयंपाक करावा लागत नव्हता पण बाकी कामांची यादी भली मोठी होती. कामं+अभ्यास+नोकरी करून सावकाश चालत बसथांबा गाठणं परवडत नसे. त्यामुळे वायुवेगाने जायचं-यायचं. असा हा दिनक्रम १८ महिने सलग सुरु होता. वजन आटोक्यात राहण्याशिवाय रस्त्याशी गप्पा, पायांचे आभार आणि "गुड-डे" बिस्किटांची न्याहारी मानत दिवस सरत राहिले. त्या माझ्या संपूर्ण वास्तव्यात भरभक्कम साथ मिळाली ती माझ्या एका शिक्षकाची आणि त्यांच्या मॅडमची. त्यांना काही कामानिमित्य भेटायला म्हणून माझे आई-वडिल देखील आले होते एकदा. तर ह्या अश्या माझ्या दररोजच्या दोस्ताला आज पुन्हा एकदा २२ एक वर्षांनी पुन्हा भेटण्याचा योग आला मला आज. अर्थात ह्या आधी धावती भेट झाली होती पण आज भावनांसोबत, जाणिवांसोबत आणि आठवणींसोबत आगळी-वेगळी अशी होती ती भेट. अक्षरशः त्याच्या समोर नातमस्तक व्हावं अशी ती. २२ वर्ष हा काही कमी कालावधी नाहीच. त्यात माझे पाय पुरते गेले पण प्रचंड मोठी आठवण, स्मृती आणि स्फूर्ती, समाधान देऊन गेले. स्वप्नवत वाटतंय सर्व, माझे पाय ज्या रस्त्यावरुन चालत होते, ज्याने १८ महिने सलग माझ्या पायांना वाट दाखवली त्यांना शतशः धन्यवाद. आणि आज त्याच रस्त्यावरून मी माझ्या चारचाकीतून जातांना डोळे भरून आले, कधीही म्हणजे कधीही यत्किंचित शिवलं देखील नव्हतं तेव्हा कि मी अशी १० पावलांवर स्थलांतरित होईन आणि चारचाकी घेऊन मिरवीन  टोकं आहेत दोन्ही पण माझीच नाही का? "अशी पावले येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". त्यावेळी करून घेतलं, पायांनां प्रचंड बळ / ताकद दिली, तेव्हा जास्त गरजेची होती त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आज पासून पुढे तुझ्या हिशोबानुसार ताकद कायम टिकून ठेव, नवनवीन दोस्ती / आठवणी घडवून आण एवढी प्रार्थना.   

तेव्हा आणि आता


चिवडा, माझ्या लहानपणी असायचा तो एकतर मुरमुऱ्याचा, पोह्याचा, कणसाच्या पोह्यांचा किंवा एकत्र. दिवाळी फराळात चकली, शेव, शंकरपाळे (खारे / गोडे / तिखट) अश्या पदार्थांची रेलचेल असायची. हे सगळे पदार्थ वेगवेगळे द्यायची, वाढायची पद्धत असायची. चिवड्यात शेवेचे तुकडे, किंवा शंकरपाळे + कणसाच्या पोह्याचे तुकडे ई. बघायला मिळायचे नाहीत. असं दिसलं आणि दिलं गेलं म्हणजे लोकांना देऊन उरलेलं हा समज / गैरसमज होता. कधीच कोणालाच आवडायचे नाही. पण आताशा कलियुगात चिवडा ने कात टाकली आहे. सध्या चिवडा म्हणजे एकंदरीत गोळाबेरीज त्यात थोडेशे शेवेचे तुकडे, इकडे तिकडे शंकरपाळे, आणि बरेच काही. माझ्या कडे असा चिवडा आला कि मला लहानपण, मूळ पाककृती, तेव्हाची विचारसरणी, वाढण्याची पद्धत ई. सगळं म्हणजे सगळं डोळ्यासमोर उभं ठाकतं, म्हणून हा थोडक्यात पंक्तिप्रपंच. दोन्ही चिवडेच, पण "(तेव्हा)काय होतास तू काय झालास तू" असं म्हणावसं वाटतं. अर्थात तेव्हा पण अत्यानंदाने फस्त केला तो आणि आज देखील करते आहेच.

ओळखीची काळजी

बऱ्याच ठिकाणी सांबार ह्या सुप्रसिद्ध पदार्थाचे नाव असे का पडले ह्यामागची कारणे वाचनात आली आहेत आणि ती खूप आवडली देखील मला. माझ्या दृष्टीने आणि काही ओळखीच्या लोकांच्या सवयीकडे बघून मला सांबार म्हणजे एक संपूर्ण पाककृती / अन्नपदार्थच वाटतो कारण त्यात भरपूर प्रमाणात भाज्या घातल्या जातात, प्रथिने असतात आणि एकंदरीत भरमसाठ गुणधर्म असलेला चविष्ट पदार्थ आहे.  सांबाराची कहाणी वाचायची असल्यास ह्या खाली दिलेल्या लिंक वर जा आणि तृप्त व्हा. दाक्षिणात्य पद्धतीने केलेल्या गरमागरम सांबाराबद्दल लिहिण्याची, वाखाणण्याची ताकद माझ्या लेखणीत नाही आणि  करायला मी धजावणार पण नाही. मी फक्त ते नेहेमीच मंत्रमुग्ध होऊन ओरपते, बास. 

https://www.slurrp.com/article/tried-this-maharashtrian-dal-that-may-have-inspired-sambar-1659258324220

एका प्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकाराने चढवलेला साज म्हणतो "नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगामेरी आवाज़ ही, पहचान है....". ह्या गाण्यामुळे नाही तर नवजात शिशुला, बाळाला, लहान मुलाला, घरच्या मोठ्यांना, विद्यार्थ्यांना किंवा कधीही कुठेही कोणालाही सरप्राईझ देतांना आपण डोळे झाकले तरी फक्त आवाजाकडे लक्ष देतो आणि ओळखतो. आवाज हि फार मोठी ओळख आहे माझ्या दृष्टीने, अगदी प्रत्येक क्षणी, क्षणोक्षणी. तो आवाज आपल्या कंठातून येतो आणि त्या घशाची काळजी घेणं अत्यावश्यक असतं सगळ्या अवयवांची घेतो तशी. भारतीय स्वयंपाकात तेल, तूप असे जिन्नस वापरून तय्यार केलेल्या स्निग्ध पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे दाक्षिणात्य मेदुवडा किंवा पंजाबी पराठा फस्त केल्यावर कडक मसालेदार चहा प्यावा, किंवा गरम पाणी अशी प्रथा आहे किंवा सांगितलं आणि आचरणात आणलं जातं सहसा. घरची मोठी मंडळी पण आवर्जून सांगतात.

अर्धशतकी टप्प्यावर मला अनेक गोष्टींची जाणीव नव्याने होते आहे आणि आज मला उमगलं कि मेदुवड्या सोबत सांबर का वाढला जातो, किंवा सांबार का आहे ह्या पाककृतीचा विशेष भाग? फक्त चटणी / चटण्या पुरेश्या होत्या ना? मग सांबरच का? वर नमूद केल्याप्रमाणे मेदुवडा कुरकुरीत, खुसखुशीत व्हावा म्हणून त्यात काही जण सोडा घालतात, तर काही अजून काही पद्धतीने ते वड्याचे पीठ भिजवतात. सरतेशेवटी तो तेलात तळलेला पदार्थ मग तो आवडीने खाल्यावर घश्यावर परिणाम होऊ नये म्हणून हि क्लुप्ती खरंतर शोधून काढण्यात आली होती, आहे. त्यामुळे ह्यापुढे मनसोक्त आनंद घ्या, हवे तेवढे प्रमाणात वडे खा, पण मग सर्वगुणसंपन्न सांबार त्यावर प्यायला विसरू नका. तुमची ओळख = घसा, आवाज ई. शाबूत राहिल खात्रीपूर्वक हो. सो "मस्त खा आणि स्वस्थ राहा" असे "आम्ही सारे खवैये" मधे आवर्जून सांगतात प्रत्येक एपिसोड च्या समारोपाला.

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

अनुभवावे ते नवलच

कलियुग नक्की कधी सुरु झालं आणि कधी पर्यंत आहे हे मला ठाऊक नाही कारण अगदी मला कळायला लागल्यापासून हा शब्द माझ्या कानावर पडतो आहे. एक साधारण उदाहरण देते. मी असेल ७-८ वी मधे, तेव्हा आमच्या घरी काही तरी बांधकाम काढलं होतं माझ्या वडिलांनी. तेव्हा ते जे कामगार / मजूर यायचे कामाला ते अगदी आरामात ९-१० च्या दरम्यान. मग गप्पा, तंबाखू ई. झाल्यावर मग अगदी संथ गतीने सुरु कसे तरी काम. आणि थोडासा वेग घेत नाही तर चहा, मग किंचित काम कि जेवणाची सुट्टी जवळपास १ तास, लोळणं ई. आणि साधारण ५ च्या वेळी रामराम. त्या वेळी तो मुजोरी पणा बघून म्हटलं जायचं "कलियुग आहे, काय करणार?". आता आमच्या मागच्या बाजूला नवीन बांधकाम सुरु झालं आहे काहीच दिवस झाले मुहूर्त होऊन. पहाटे ७ च्या आधी काम सुरु होतं अगदी जोरशोरसे आणि हि अनुकथा मी लिहिते आहे तेव्हा रात्रीचे ११ वाजले आहेत अजूनही त्याच जोमाने काम सुरु आहे. माणसं आहेत कि मशीन? आणि आश्चर्य म्हणजे सध्या हे भयानक गतीने चाललेलं काम बघून लोकं म्हणताहेत "कलियुग आहे, काय करणार?". अगदी बोटावर मोजावे इतक्या कमी दिवसात माझ्या कचेरीच्या रस्त्यावर १५-१८ माजली भली मोठी एकच पण इमारत तय्यार झाली आहे. कसं कायं? म्हणजे नक्की काय बदल झाला आहे, तंत्रज्ञानात कि चढाओढीत कि मजुरांच्या स्वभावात कि अजून काही? एकाच पाळीच्या मजुरांना तर इतकी तास सलग काम अश्यक्यच आहे, मग दोन का तीन पाळीत करतात वेगवेगळी लोकं कामं कुणास ठाऊक? इतका मोठा आवाज करत कामं सुरु आहेत, आजूबाजूला माणसं राहतात, आजारी असू शकतात, लहान बाळं असू शकतील, जनावरं आहेत, पक्षी आहेत, सर्वांनाच विश्रांती हवी आहे, काही म्हणजे काही विचार नाहीच कसा? नियम, कायदा वगैरे काही आहे का नाही? बघावं, ऐकावं, आणि अनुभवावं तेवढं वेगळं आणि विचित्रच आहे हे सगळं.

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

परिवर्तन (ट्रान्झिशन)

माझ्या एक नेहेमी बघण्यातली सुंदर कन्यका. आधी मी थोडीसी तिच्यापासून अंतर राखून राहायचे कारण तिचे वडिल उच्चपदस्थ होते. त्यांची ख्याती होती / आहे आणि त्यात हि मितभाषी, मग मला समजलं नाही, त्यामुळे मी फक्त नमस्कार चमत्कार इतक्या पुरतंच ठेवलं होतं. नाही म्हटलं तरी तिचा एक मस्त रुबाब होता, ठसन होती, वय उंची गोरा रंग झक्कास, अगदी साधी पण ठसक्यात राहणारी अशी मुलगी.  मग जेव्हा तिच्यासोबत काम केलं तेव्हा तिचे सगळे गूण समजले. अतिशय उत्कृष्ट, परिपूर्ण अगदी तज्ञांसारखे प्रचंड गतीने तिने काम केले. स्वतः लागेल तसे पिटुकले निर्णय घेऊन अगदी लगबगीने भेटून, बोलून, समजावून घेऊन वेळेआधी सगळं आटोपलं पण. मग मात्र आम्ही दोघी मस्त मैत्रिणी झालो. अधे मधे गप्पा व्हायच्या. अचानक काही दिवस ती दिसली नाही. म्हटलं असेल इकडे तिकडे. मग कानावर आलं कि तिचे "दोनचे चार" झाले आहेत. मग काही दिवसांनी मी लग्नाचे फोटो बघितले आणि सहज नवीन घराबद्दल चौकशी केली. एवढ्यात पुन्हा एकदा ती सहज माझ्या समोर उभी ठाकली, एकदा, दोनदा, अनेकदा आणि तेव्हा नकळत माझ्या चार डोंळ्यानी टिपलं ते म्हणजे बोलू नये पण अवकळा आल्यासारखी हो, अगदी निस्तेज. बहुतांशी म्हणजे ९९% एक मस्त वेगळाच साज चढतो लग्नानंतर, कारणं असंख्य आहेत. एक तर सगळं फारच नवीन, कौतुक, भरपूर कपडे, दागिने ... त्यामुळे निर्माण झालेली आणि झळकत असलेली  ऊर्जा, असे बरेच काही. शिवाय मुलाकडच्यांना देखील एक अप्रूप असतं कि त्यांच्या घराण्याची सून आहे, त्यामुळे तिची पत जपली जाते. कारण सासरचेच नाही तर समाज देखील लक्ष ठेवून असतो. आई-बाबांच्या घरापेक्षा नेहेमीच कणभर जास्त आणि ते देखील सुरवातीच्या काळात असतंच. पण इथे सगळंच प्रचंड प्रमाणात उलटं दिसतंय. मला क्षणभर तिचा अवतार बघून नक्कीच वाईट वाटलं, यातना झाल्या. मी मनापासून नक्की प्रार्थना करणार कि सगळं उत्तम असू दे, ती आधी सारखी खळखणारा झरा जशी तशी पुन्हा होऊ दे. तिच्या सासरच्यांना सद्बुद्धी मिळू दे.  प्रार्थना फक्त हिच्यासाठी नाही तर सगळ्याच मुलींसाठी, मुलांसाठी आणि प्रत्येकासाठी पण.

सहसा घरचे खूप उत्साही असतात, माहेरी आई-बाबा, भाऊ, बहिण, सासरी तिकडचे, बाहेर पडतांना प्रामुख्याने आणि त्यात मुलगी कारण ती एक प्रतिबिंब असते, घराचं प्रतिनिधित्व करत असते, नकळत ठसा उमटवते, कारण घरचं - दारचं, शिक्षण आणि बाकी इतर असंख्य कामं ती शिताफीने करत असते. मग हिच्या कडे नसेल का कुणाचं लक्ष ती दररोज घराबाहेर पडतांना? कोणी काही सुचवत नसेल? गिफ्ट्स आणून देत नसेल सहज म्हणून,काहीही प्रसंग नसतांना, ती केवळ मस्त दिसावी म्हणून, टवटवीत फुलासारखी....  

हे असं ट्रान्झिशन होणं, किंचित अधोगती म्हणा, हे बरोबर नाही. अर्थात काही काळ लोटल्यावर होईल देखील सर्व पूर्ववत किंवा त्याहून कणभर उत्तम, हिच आशा.


रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

काकड आरती

पहाटे, माध्यान्याला आणि संध्याकाळी किंवा तिन्हीसांजेला अश्या ३-४ वेळी नियमाप्रमाणे विविध देवस्थानांमधे / घरी आरत्या होतात दररोज, न चुकता. गुरुजी पूजा अर्चा झाली कि शेवट आरतीने करतात. काकड आरती हि खास सहसा कार्तिक महिन्यात केली जाते. मी अगदी कळायला लागल्या पासून काकड आरती बद्दल ऐकलं आहे, कारण आमच्या ओळखीच्या लोकांकडे किंवा देवळात ती होतं असे. त्यावेळी जे मी ऐकलं काकड आरती बद्दल ते असं होतं कि :

१. भल्या पहाटे म्हणजे साधारण चारच्या आधी हि आरती करतात.
२. देवांना आळवून उठवलं जातं.
३. माझ्या लहानपणी कार्तिक महिना म्हणजे मस्त थंडी, मग सर्वांनाच पहाटे उठणं प्रचंड अवघड, त्या दृष्टीने माणसाचा आळस निघून जावा, त्याने आंघोळ करून देवाची आरती करावी आणि पट्टाकिनी कामाला लागावे हा उद्देश असावा.
४. एक सुरेख आणि अनोख्या पद्धतीचा दिवा लावला जातो ह्या आरती करता. मोठ्या आकाराचा आणि कपड्यासारखं काही तरी वापरलं जातं ती ज्योत तय्यार होण्यासाठी, जसे मावळे वापरायचे जेव्हा वीज नव्हती तेव्हा. अशी प्रत्येक मंदिरात जर थंडीच्या वेळी काकडा वापरून आरती केली, संध्याकाळी सर्वत्र जरा जास्त प्रमाणात पणत्या तेवत ठेवल्या तर एक प्रकारची उत्कृष्ट नैसर्गिक उष्णता / ऊर्जा निर्माण होते आणि थंडीत बहुउपयोगी ठरते. "थेंबे थेंबे तळे साचे" म्हणतात ना अगदी तस्से. शिवाय काकड आरती दरम्यानचा आवाज, भाव, आर्तता, भक्ती ई. ची पण मोठ्या प्रमाणात भर पडत असावी. आणि गोळाबेरीज म्हणजे थंडीत देखील अत्यानंद. सहज सुलभ थंडी सहन करण्याची ताकद, उत्साह, मस्त लागणारी भूक, प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेला मुबलक भाजी-पाला, फळं आणि वैविध्य पदार्थांची रेलचेल, हे सर्व आणि बरेच काही प्रत्येक सजीवाला लाभत असे, त्या वेळी.


तर असा हा काकड आरतीचा थोडक्यात महिमा. आता थोडेसे दृश्य बदलले आढळते आहे, गगनचुंबी इमारती, विविध प्रांतातून आलेले आणि स्थायिक झालेले लोकं, प्रदूषण आणि इतर घडामोडी त्यामुळे एकसूत्रीपणा हरवला आहे, थंडी नाहीशी झाली आहे, ऋतू त्यांचं स्वरूप संपूर्ण बदलले आहे आणि त्याचा (दुष्)परिणाम सर्वच अनुभवात आहोत.  आपण सर्वचजण गेली काही वर्ष व्हायब्रेशन्स म्हणजे लहरी वर जगतो आहे, मोबाईल किंवा संगणक ह्यावर चालतात आणि सगळे व्यवहार देखील. त्यामुळे आपला संपूर्ण विश्वास आहे ह्या अश्या अदृश्य सिग्नल्स च्या अस्तित्वावर. तर मग जे थोडेसे उशिरा उठणारे आहेत, किंचित आळशी, पांघरूण मनापासून प्रिय असलेले असे, त्यांनी प्रयोग म्हणून, देव-धर्म-भक्ती ई. मधे न अडकता काकड आरती हे एक विज्ञान म्हणून वापरून बघायला हरकत काय. किंवा जे पहाटे उठणारे आहेत त्यांनी आवर्जून काही मिनिटे कार्तिक महिन्यात आरती म्हणून बघितली तर कदाचित त्यांना त्याचे उत्कृष्ट परिणाम नक्की अनुभवता येतील. चला तर मग उठा, आणि सुरु व्हा उद्याच पहाटे. आणि हो मला कळवायला विसरू नका तुमचे अनुभव. 

https://mr.wikipedia.org/wiki/काकड_आरती

पेचप्रसंग

मला सहसा का कुणास ठाऊक पण प्रश्न पडत नाहीत, किंवा पेचात अडकत नाही पण आज तसं झालयं खरं. आज माझा वाहन चालक सकाळी सकाळी मला कळवतो कि तो आजारी आहे. पर्याय हाच होता कि भाड्याची मोटारगाडी शोधायची. आज माझं अहो भाग्य कि मला ती ताबडतोब मिळाली देखील. आणि मी व्यवस्थित कचेरीत पोचले देखील. आता वेळ आहे ती त्या अभिरुची मापन अक्का गूण द्यायची. रेटिंग काय द्यावं हा भलामोठ्ठा प्रश्न उभा ठाकला आहे माझ्या पुढ्यात. वेळेवर गाडी मिळाली, त्याने शांतपणे कचेरीला सोडलं हे महत्वाचं कारण माझं ऑफीसा शहराबाहेर असल्यामुळे बरेचसे ड्राईव्हर्स राईड कॅन्सल करतात, यायला बघत नाहीत काही कारणास्तव. पण हा आला गपगुमान. पण गाडी इतक्या भयानक परिस्थतीत होती, अस्वच्छ आणि डबडाच जणू. कधीही म्हणजे कधीही त्याला फडकं दाखवलं नव्हतचं जणू. बरं झालं आज ढगात अतिशय अप्रतिम रंगरंगोटी करणं सुरु होतं, उंचचउंच झाडं आमच्या गाडी सोबत अक्षरशः पळत होती. उंच झाडांवर आणि डोंगरांवर धुकं होतं, विलोभनीय असं दृश्य होतं. प्रत्येक डोंगर सुरेख हिरव्या रंगांच्या छटांनी नटले होते. गगनचुंबी इमारती जास्त सुरेख दिसत होत्या, बऱ्याच नवीन इमारती आकार घेत आहेत ते दृश्य देखील बघण्यालायक होतं आणि त्यात भरीसभर म्हणजे आपल्या भारताची पुढली पिढी पण संपूर्ण रस्त्यात आणि सौंदर्यात भर घालत होती, त्यांच्या पोशाखांनी, वैविध्य दप्तरानी आणि इतर बऱ्याच पद्धतीने. प्रवास झाला, वेळ निघून गेली पण मग गूण देणं राहिलं आहे. द्यावे का ना द्यावे? दिले तर किती? लिहावं का अस्वच्छते बद्दल, समजेल का त्या माणसाला का त्याची परिस्थिती अशी काही आहे कि त्याला सातत्याने गाडी चालवावी लागते आहे म्हणून तो साफसफाई करू शकत नाही? आणि मी कमी गूण दिले तर त्याच्या धंद्यावर परिणाम होईल? प्रश्नाचं भज झालयं नुसतं डोक्यात. असो. हि अनुकथा लिहून झाल्यावर उमगेल तर ठिक नाहीतर सोडून देणं जास्त योग्य. तो आणि त्याची गाडी, बघून घेतील. मी वेळेत / वेळेआधी पोचले हे महत्वाचं. किती जणांना आणि काय काय शिकवायचं नाही का?  

आणि हो एक महत्वाचं लिहायचं राहूनचं गेलं कि, असं ऐकिवात आहे कि जर मी त्या गाडी ला, एकंदरीत प्रवास किंवा राईड ला कमी गूण दिले तर म्हणे ह्या पुढे मला हवी तेव्हा भाड्याची गाडी मिळणार नाही / मिळण्यास अडचण होईल. आता हे काय नवीन? म्हणजे मग करायचं तरी काय? मौनं सर्वार्थसाधनम्॥


गुणधर्म व वैशिष्ट्य

कालची संध्याकाळ एक पिटुकला बदल देऊन गेली. माझी लेक अगदी तय्यार बसली होती. मी घरात शिरता क्षणी हातात वाफाळता गवती चहा युक्त कप मिळाला आणि मोबाईल देखील. काही कळायच्या आत फर्मान सोडलं गेलं  तुला काय मागवायचे आहे ते पट्टाकिनी सांग कारण आज मी फक्त जिलबी + फाफडा फस्त करणार आहे, मला अजिबात जेवण नक्को, रात्री. आणि तिने मागवलं पण तिच्या आवडीचे जिन्नस. बास. विषय संपला. काही मिनिटात हवं ते दारात उभं ठाकलं आणि ते तिने अत्यानंदाने मावशींना आणि मला देत आडवा हात मारलाच. उरलेली जिलबी मग शीतकपाटात स्थानापन्न झाली. सकाळी मी बाहेर काढली कारण मला संपूर्ण कल्पना होती कि न्याहारी दरम्यान पण खाणार आणि थंडगार चविष्ट लागणार नाही. आम्ही दोघी ब्रेकफास्ट करते वेळी मी पण एक तुकडा तोंडात टाकला आणि अहो आश्चर्यम् ती जिलबी टस-कि-मस झाली नव्हती, जैसे-थे होती, कडक आणि त्याच स्थितीत जशी काल संध्याकाळी ताजी असतांना होती. इतक्या भल्यामोठ्या वातानुकूलित यंत्रणेत राहून देखील रात्रभर तसूभर देखील फरक नाही, चवीत, खुसखुशीतपणा, कडकपणा, स्पर्श, ई. सगळं तस्संच, अहाहा च. ते बघून मग सहज मनात आलं कि सर्वत्र आपण माणसं अशी का टिकून राहू शकत नाही, म्हणजे आपल्या दररोजच्या कामात, व्यवहारात, नात्यात, संबंधात वगैरे. म्हणजे कितीही गोठलेल्या परिस्थितीतून जावं लागलं तरी बाहेर पडल्यावर पुन्हा संबंध जैसे थे. उदाहरणार्थ कामावर, नात्यात किंवा इतर वेळी बऱ्याचदा असं होतं कि कोणी तरी ओरडतं, रागावतं, अपमान देखील होतो, ताशेरे ओढले जातात, कधी जाणून बुजून तर कधी अनवधानाने, पण ती वेळ निघून गेल्यावर जिलबी सारखं आपल्या मुळ रूपात त्याच कडक पूर्वस्थितीत का परत यायचं नाही? ते काय म्हणतात ना "झालं गेलं गंगेला मिळालं", "रात गई बात गई" वगैरे.  थोडीशी मेहेनत करावी लागेल कारण आपण सरतेशेवटी माणसं आहोत, पण जमेल असं वाटतंय. बघावं करवून, हळू हळू. जमल्यास जिलेबी सारखी गोड मधुर चव निर्माण होईल आपल्यात आणि नात्यात देखील. चला तर मग असा हा गोड सुमधुर स्वानुभव घेऊन बघुयात. 

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

उत्साहवर्धक

असं असंख्य वेळा माझ्या कानावर पडलं आहे, वाचनात आलं आहे, स्वानुभव तर आहेच आहे आणि अर्थात तथ्य आहे असं वाटतं देखील. प्रत्येक लेखात बहुतांशी हेच नमूद केलं आहे कि दिवसातून दोनदा केस विंसरले पाहिजेत, अर्थात भारतीय प्रथे प्रमाणे. केस विंसरण्याचे प्रचंड, आभाळाएवढे किंबहुना अगणित फायदे आहेतच. उत्साहवर्धक वाटतं, चैतन्यशील, ताजेतवाने, अगदी फुलपाखरू झाल्यासारखे ई. वाटते. अजूनही असंख्य प्रकार असतील जाणिवांचे पण वेगळाची भावना प्रगट होते, प्रत्येक वेळी, वेळोवेळी, अर्थात प्रेमाने, वेळ देऊन कृती केली तर, संवाद साधला तर, कृतज्ञ होऊन कंगवा केला तर, देखरेख केली तर, नेहेमीच, मग त्या केसांची उंची, लांबी, खोली, दाटपणा कसा हि असो. प्रत्येकाला जमेल, रुचेल, पचेल आणि भावेल तसे, पण काळजी घेणं, सांभाळणं अत्यावश्यक आहेच. असं काहीसं ऐकतच मी लहानाची मोठी झाले. सातत्याने सर्वत्र हेच दृश्य होतं आणि गरीब / श्रीमंत, लहान / थोर सगळेच ह्यात सहभागी होते, किंबहुना हा एक दररोजच्या रोजनिशीचा अविभाज्य घटक आहे, जो वगळू शकत नाहीच.

अर्धशतकी वाटचाल करतांना अचानक माझ्या समोर खूप सुंदर नावीन्याने नटलेले दृश्य उभे ठाकले, एक नाही, दोन नाही पण चार जणांच्या स्वरूपात. मी अवाकच झाले, नि:शब्द जशी. मी आधी एक जण बघितला ज्याचे केस उत्कृष्ट, अद्वितीय, लई भारी आणि जगावेगळे असे आहेत. मी खूपदा फक्त बघितले पण एक दिवस न राहवून विचारणा केलीच. माहिती अशी मिळाली कि अगदी जन्मापासून मिळालेली हि भेट आहे, प्रचंड कुरळे, म्हणजे हाईट आहे, कुठल्याही मशीनने होऊच शकत नाहीत इतके. त्याच्या वडिलांचे देखील होते म्हणे असे. मग साहजिकच माझा पुढील प्रश्न: मग ह्या सर्वोत्कृष्ट भेटीची देखभाल? काही शब्द माझ्या ओठांवरच विरले, कारण त्याने उत्साहाने मला उत्तर द्यायला सुरवात केली कि मी काहीच करत नाही, कंगवा पण नाहीच, कधीच, लावतच नाही, हा, अगदीच वाटलं तर कधीतरी कापतो, क्वचितच. ह्या नंतर अजून एक, दोन, तीन जणांनी तेच / तशीच उत्तरे दिली. अर्थात फक्त एकालाच ते शोभत होतं, बाकींनी काही तरी खास करणं आवश्यक होतं माझ्यामते. असो. मला हे कदापि म्हणायचं नाही कि पचपच तेल लावा, घट्ट बांधा, अगदी बारीक कापा ई. मुळीच नाही पण अहो कंगवा करणं हे गरजेचं आहेच. फक्त केसांकरता नाही तर त्या खालच्या कातडीकरता, रक्ताभिसरणाकरता, आणि बाकी वैज्ञानिक कारणांकरता, रोजनिशीतला भाग म्हणून तरी. मला फार म्हणजे फारच मोठ्ठा धक्का बसला. कंगवा केला नाही तर कितपत आयुष्य राहील त्या डोक्यावरच्या टोपलीचं? मला काहीही घेणं देणं नाही, केस त्याचे, निर्णय पण त्याचे, तरी का कुणास ठाऊक मला जरासं अस्वस्थ व्हायला झालं आणि हे लिहिलं गेलं. त्या केसांचं सौंदर्य टिकण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्याला सजीव ठेवण्यासाठी कदाचित असंख्य, वैविध्य उपयुक्त अवजारं उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून बघावा, सल्ला घ्यावा, काळजीपूर्वक कंगवा करावा, नाही का? अर्थात फक्त कंगवाच करण्याने उत्साहवर्धक वाटतं असं नाही, अजून बरेच तरणोपाय आहेत, पण डोकं चालणं जास्त उपयुक्त नाही का? बघा, डोक्याला सुद्धा चालण्याची उपाधी दिली गेली आहे. अर्थात ज्याची त्याची मालमत्ता ज्याने त्याने हवी तशी सांभाळावी. त्या डोक्यावरच्या अनोख्या सुरेख घरट्याने मला चार शब्द मांडण्याची संधी दिली आणि मला उत्साहवर्धक झाल्याची जाणीव झाली. धन्यवाद.    

छानदार

प्रत्येक नोकरदार व्यक्ती त्याच्या त्याच्या व्यवसायाच्या गरजेनुसार वेष आणि केशभूषा करतो दररोज कामावर जातांना. त्या ठिकाणाला, कामाला शिवाय व्यक्तीला, वयाला, व्यक्तिमत्वाला, आणि बऱ्याच अश्या पिटुकल्या साजेशी असावी वेष आणि केशभूषा. अनुरूप तय्यार होण्यामुळे स्वतःला, बघणाऱ्याला आणि आजुबाजुच्या बऱ्याच जणांना त्याचा फायदाच होतो, कळत - नकळत. हा फायदा आकड्यात मोजण्यासारखा नसेल कदाचित आणि अदृश्य देखील पण होतो हे नक्की. अर्थात चांगला आणि वाईट देखील बरं का मंडळी. त्या व्यक्तीबद्दल सर्व नाही पण खूप काही समजतं बघितल्यावर, संपर्कात आल्यावर, संवाद साधल्यावर आणि सहवास लाभला तर देखील. फक्त तुमच्या पेक्षा लहानच नाही तर सर्व वयोगटातल्या व्यक्ती सातत्याने शिकत असतात, बोध घेतात, आत्मसात करतात, मार्गावर चालतात आणि बरेच काही. स्वतः साठी आणि बऱ्याच इतर जणांसाठी / जनांसाठी छानदार राहा, आकर्षक नाही, दिखावा नाही पण साजेसे, साधे, स्वच्छ आणि सध्याच्या प्रचलित प्रथेला धरून. "गो विथ द फ्लो" / "प्रवाह पतित व्हा" असं काहीसं. फॅशन नेहेमीच बदलत असते, आपण, आपले विचार कधीच स्थिर नसतातच मग त्या नुसार जमेल तेवढा जमेल तस्सा बदल आपल्या दिसण्यात का नसावा?

एवढ्यातच एक व्यक्ती अचानक समोर उभी ठाकली. मी खूप नाही पण बऱ्यापैकी ओळखते त्यांना, ऐकीव माहिती आहे, उच्च विद्याविभूषित, मोठ्या पदावर स्थानापन्न, कुटुंब सुस्थितीत आणि धनसंपन्न अशी पार्श्वभूमी. त्यांना प्रमुख पाहुणे / परीक्षक म्हणून खास आमंत्रित करण्यात आले होते, हे मला त्यांची अचानक भेट झाल्यावर समजलं. पण त्यांना बघून यत्किंचित देखील वाटलं / भासलं / जाणवलं / भावलं नाही कि त्या इतक्या मोठ्या आहेत आणि आमंत्रिक आहेत त्यांच्या एकंदरीत अवतारावरून. मी मनापासून त्यांची माफी मागून हे लिहिते आहे. अगदी घरी असल्यासारखं, लंकेची पार्वती जणू असं का यायचं? ते देखील खास पाहुणे म्हणून. थोडसं तरी प्रदर्शनीय राहावं ना माणसाने. मला तर पोटात गलबलचं. घरून निघतांना कोणीच त्यांना काहीच म्हटलं नसेल? आरश्यात बघतांना त्यांना स्वतःला काहीच जाणवलं नसेल? असे पाहुणे येति आणि स्मुर्ती ठेवुनी जाती, हे बरोबर का चूक? का?

मितभाषी

माझं थोडक्यात केलेलं स्वनिरीक्षण असं म्हणतं आहे कि सध्याच्या नवीन पिढीतली मंडळी / मुलं-मुली ह्या प्रचंड बडबड करतात आणि शिवाय मितभाषी आहेत. अर्थात, तुम्ही पण नीट बघितलं तर तुमच्या देखील हे लक्षात येईल. त्यांचे हाताचे अंगठे सातत्याने न थबकता पळत असतात वायूवेगानं, प्रचंड शब्द पेरले जातात, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात समोरच्याला ताबडतोब पण तो अप्रत्यक्ष संवाद ह्या परिघातला. भेट, गप्पा, हशा, मारामारी (प्रेमळ हो), शब्दांची देवाणघेवाण, स्पर्श ई. चं नवं रुपडंच जणू. आज मला प्रकर्षाने जाणवलं कि हे पण एका दृष्टीने फार महत्वाचं आहे. कसं ते फक्त एक उदाहरण देऊन सांगते. माझं क्षेत्र, माझी आवड आणि माझा स्वभाव ह्यामुळे मी प्रचंड बडबड करते. आणि हो त्यात एका घरगुती स्वयंपाकाच्या पदार्थ मिळतात त्या ठिकाणी थांबवली गाडी कि माझ्या गाडीवानाला समजतं कि आज स्वयंपाक करणाऱ्या मावशींची दांडी आहे ते. माझा गाडीवान कधीच सुट्टी घेत नसे, अगदी क्वचित पण आताशा त्याच्या सुट्ट्या भरमसाठ वाढल्या आहेत. का माहिती आहे? एक कारण म्हणजे मी. मावशी आल्या नाहीत कि मला काही मिनिट नेहेमी पेक्षा उशीर होतो आणि बडबड. ह्यावर गाडीवान मला विचारतो कसा "तुम्ही मावशीचे पैसे कापता का? ओरडत नाही तुम्ही? चालतं तुम्हाला त्या नाही आल्या तर?" ई. ह्या सर्वांची उत्तर ऐकली पठ्याने आणि सुट्ट्यांची सरबत्ती सुरु झाली. त्यापेक्षा हि सध्याची मितभाषी पिढी खूप परवडली.

१. ते ड्राईव्हर वगैरेंशी बोलायला जात नाहीत
२. घरचं तर नाहीच नाही
३. त्यामुळे ह्याचं त्याला समजत नाही आणि त्यामुळे ह्याचा त्याच्यावर परिणाम होत नाहीच (कॅसकेडिंग इफेक्ट)
४. मावशी आल्या काय गेल्या काय काही फरक पडत नाही कारण स्विगी आणि बरीच मनभावक मंडळी उपलब्ध आहेत, घरचंच पाहिजे हे खिजगणतीत नाहीच

असो, आता मलाच नव्याने सगळं शिकावं लागणार, सांभाळावं लागणार हेच खरं. केली खूप वर्ष बडबड आता जरा स्वरतंतू, व्होकल कॉर्ड्स ना विश्रांती देणं गरजेचं आणि माझ्या फायद्याचं आहे.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...