शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

अनुभवावे ते नवलच

कलियुग नक्की कधी सुरु झालं आणि कधी पर्यंत आहे हे मला ठाऊक नाही कारण अगदी मला कळायला लागल्यापासून हा शब्द माझ्या कानावर पडतो आहे. एक साधारण उदाहरण देते. मी असेल ७-८ वी मधे, तेव्हा आमच्या घरी काही तरी बांधकाम काढलं होतं माझ्या वडिलांनी. तेव्हा ते जे कामगार / मजूर यायचे कामाला ते अगदी आरामात ९-१० च्या दरम्यान. मग गप्पा, तंबाखू ई. झाल्यावर मग अगदी संथ गतीने सुरु कसे तरी काम. आणि थोडासा वेग घेत नाही तर चहा, मग किंचित काम कि जेवणाची सुट्टी जवळपास १ तास, लोळणं ई. आणि साधारण ५ च्या वेळी रामराम. त्या वेळी तो मुजोरी पणा बघून म्हटलं जायचं "कलियुग आहे, काय करणार?". आता आमच्या मागच्या बाजूला नवीन बांधकाम सुरु झालं आहे काहीच दिवस झाले मुहूर्त होऊन. पहाटे ७ च्या आधी काम सुरु होतं अगदी जोरशोरसे आणि हि अनुकथा मी लिहिते आहे तेव्हा रात्रीचे ११ वाजले आहेत अजूनही त्याच जोमाने काम सुरु आहे. माणसं आहेत कि मशीन? आणि आश्चर्य म्हणजे सध्या हे भयानक गतीने चाललेलं काम बघून लोकं म्हणताहेत "कलियुग आहे, काय करणार?". अगदी बोटावर मोजावे इतक्या कमी दिवसात माझ्या कचेरीच्या रस्त्यावर १५-१८ माजली भली मोठी एकच पण इमारत तय्यार झाली आहे. कसं कायं? म्हणजे नक्की काय बदल झाला आहे, तंत्रज्ञानात कि चढाओढीत कि मजुरांच्या स्वभावात कि अजून काही? एकाच पाळीच्या मजुरांना तर इतकी तास सलग काम अश्यक्यच आहे, मग दोन का तीन पाळीत करतात वेगवेगळी लोकं कामं कुणास ठाऊक? इतका मोठा आवाज करत कामं सुरु आहेत, आजूबाजूला माणसं राहतात, आजारी असू शकतात, लहान बाळं असू शकतील, जनावरं आहेत, पक्षी आहेत, सर्वांनाच विश्रांती हवी आहे, काही म्हणजे काही विचार नाहीच कसा? नियम, कायदा वगैरे काही आहे का नाही? बघावं, ऐकावं, आणि अनुभवावं तेवढं वेगळं आणि विचित्रच आहे हे सगळं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...