बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

परिवर्तन (ट्रान्झिशन)

माझ्या एक नेहेमी बघण्यातली सुंदर कन्यका. आधी मी थोडीसी तिच्यापासून अंतर राखून राहायचे कारण तिचे वडिल उच्चपदस्थ होते. त्यांची ख्याती होती / आहे आणि त्यात हि मितभाषी, मग मला समजलं नाही, त्यामुळे मी फक्त नमस्कार चमत्कार इतक्या पुरतंच ठेवलं होतं. नाही म्हटलं तरी तिचा एक मस्त रुबाब होता, ठसन होती, वय उंची गोरा रंग झक्कास, अगदी साधी पण ठसक्यात राहणारी अशी मुलगी.  मग जेव्हा तिच्यासोबत काम केलं तेव्हा तिचे सगळे गूण समजले. अतिशय उत्कृष्ट, परिपूर्ण अगदी तज्ञांसारखे प्रचंड गतीने तिने काम केले. स्वतः लागेल तसे पिटुकले निर्णय घेऊन अगदी लगबगीने भेटून, बोलून, समजावून घेऊन वेळेआधी सगळं आटोपलं पण. मग मात्र आम्ही दोघी मस्त मैत्रिणी झालो. अधे मधे गप्पा व्हायच्या. अचानक काही दिवस ती दिसली नाही. म्हटलं असेल इकडे तिकडे. मग कानावर आलं कि तिचे "दोनचे चार" झाले आहेत. मग काही दिवसांनी मी लग्नाचे फोटो बघितले आणि सहज नवीन घराबद्दल चौकशी केली. एवढ्यात पुन्हा एकदा ती सहज माझ्या समोर उभी ठाकली, एकदा, दोनदा, अनेकदा आणि तेव्हा नकळत माझ्या चार डोंळ्यानी टिपलं ते म्हणजे बोलू नये पण अवकळा आल्यासारखी हो, अगदी निस्तेज. बहुतांशी म्हणजे ९९% एक मस्त वेगळाच साज चढतो लग्नानंतर, कारणं असंख्य आहेत. एक तर सगळं फारच नवीन, कौतुक, भरपूर कपडे, दागिने ... त्यामुळे निर्माण झालेली आणि झळकत असलेली  ऊर्जा, असे बरेच काही. शिवाय मुलाकडच्यांना देखील एक अप्रूप असतं कि त्यांच्या घराण्याची सून आहे, त्यामुळे तिची पत जपली जाते. कारण सासरचेच नाही तर समाज देखील लक्ष ठेवून असतो. आई-बाबांच्या घरापेक्षा नेहेमीच कणभर जास्त आणि ते देखील सुरवातीच्या काळात असतंच. पण इथे सगळंच प्रचंड प्रमाणात उलटं दिसतंय. मला क्षणभर तिचा अवतार बघून नक्कीच वाईट वाटलं, यातना झाल्या. मी मनापासून नक्की प्रार्थना करणार कि सगळं उत्तम असू दे, ती आधी सारखी खळखणारा झरा जशी तशी पुन्हा होऊ दे. तिच्या सासरच्यांना सद्बुद्धी मिळू दे.  प्रार्थना फक्त हिच्यासाठी नाही तर सगळ्याच मुलींसाठी, मुलांसाठी आणि प्रत्येकासाठी पण.

सहसा घरचे खूप उत्साही असतात, माहेरी आई-बाबा, भाऊ, बहिण, सासरी तिकडचे, बाहेर पडतांना प्रामुख्याने आणि त्यात मुलगी कारण ती एक प्रतिबिंब असते, घराचं प्रतिनिधित्व करत असते, नकळत ठसा उमटवते, कारण घरचं - दारचं, शिक्षण आणि बाकी इतर असंख्य कामं ती शिताफीने करत असते. मग हिच्या कडे नसेल का कुणाचं लक्ष ती दररोज घराबाहेर पडतांना? कोणी काही सुचवत नसेल? गिफ्ट्स आणून देत नसेल सहज म्हणून,काहीही प्रसंग नसतांना, ती केवळ मस्त दिसावी म्हणून, टवटवीत फुलासारखी....  

हे असं ट्रान्झिशन होणं, किंचित अधोगती म्हणा, हे बरोबर नाही. अर्थात काही काळ लोटल्यावर होईल देखील सर्व पूर्ववत किंवा त्याहून कणभर उत्तम, हिच आशा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...