मला अगदी स्पष्ट पणे आठवतंय अगदी शाळेपासून दररोज संध्याकाळी घरी दिवेलागणीच्या वेळी आई देवापाशी दिवा, उदबत्ती लावत असे आणि त्यानंतर संपूर्ण घरात, अंगणात उदबत्ती फिरवली जायी मग तुळशीपाशी ती लावत असे. अगदी तसेच अधेमधे कोळसा तापवून त्यावर धूप घालून तो सर्वत्र फिरवला जात असे. कित्येक वर्ष हा उपक्रम न चुकता चालला होता. तेव्हा माझ्या आजूबाजूला सर्वत्र सारखं वातावरण होतं त्यामुळे सर्वांच्या घरी असेच होत असे, ठराविक वेळी, दिवशी, अगदी जसे कि ठरलेलेच आहे.
त्या नंतरची आठवण म्हणजे नवरात्रीचे दिवस, नऊ दिवस, नऊ संध्याकाळी भरपूर प्रमाणात धूप दाखवला जायचा. बहुतांशी प्रत्येक घरात नाही पण खूप ठिकाणी देवीची स्थापना होत असे आणि त्यामुळे तिचा जागर आणि आरती म्हणजे धूप, दीप, कापूर खूप प्रमाणात. फक्त नवरात्रच नाही तर प्रत्येक सणाला अशीच पूजा अर्चा, होम हवन, होत असे. छोट्या मोठ्या देवळात देखील अश्याच पूजा व्हायच्या, तेथे देखील मोठ्या प्रमाणात धूप दीप कापूर लावला जायचा. शिवाय काही ठिकाणी खायचा कापूर प्रसादातून सेवन होत असे. सर्रास पूजा होत असल्यामुळे ठराविक प्रसाद दिला आणि सेवन केला जायचा त्यात खडीसाखर, सुंठ, केळ असे खास पदार्थ असायचे.
पूजा आणि आरती म्हणजे टाळ्या आल्याचं, संपूर्ण लक्ष देऊन अगदी दररोज किंवा ठराविक दिवशी देवाचे तालबद्ध पद्धतीने नामस्मरण केले जायचे. पाठ असेल तर स्वतः म्हणून किंवा सगळे कानावर पडायचे. तो महाप्रसाद पण सातत्याने सेवन केला जायचा जो त्या मंत्रोचारांमध्ये तय्यार होत असे.
ह्या सगळ्या धार्मिक आणि आनंदी वातावरणामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकून राहायचं. डासांची पण निर्मिती कमी प्रमाणात होत असे किंवा ह्या संपूर्ण धूप दीप कापूर ह्या मुळे ते जवळपास फिरकत नव्हते. आरतीमध्ये सामील झाल्यामुळे असेल कदाचीत कपड्यांना पण तो सुगंध टिकून राहत असे, त्यामुळे आरती नंतर सुद्धा डासांचा एवढा धोका होता हे कानावर पडले नाही तेव्हा, कित्येक वर्षे. आता सगळंच लोप पावलंय, त्यामुळे डासांना आयतं खाद्य मिळालं आणि संपूर्ण स्वास्थ्य कोलमडलं बरेच जणांचं.
प्रत्येक सणवार मोठ्या प्रमाणात होणे नाही आता, किंवा नेहेमी देवळात जाणे पण कदाचित सहज शक्य होणार नाही बऱ्याच जणांना, कृत्रिम सुगंध / सुवास जास्त प्रभावित करतात कि काय ह्या डासांना, त्यामुळे ते आपला आस्वाद घ्यायला येतात. असो. जमेल तेवढी काळजी घ्या, घरी दररोज एखादी आरती म्हणा, तीर्थ प्रसाद सेवन करा, टाळ्या वाजवा, नतमस्तक व्हा, आनंदी राहा, आनंद वाटा / द्विगुणित करा, कदाचित फरक पडेल, जाणवेल आणि दिसेल देखील.