गुरुवार, २५ जुलै, २०२४

१९५३: भोक


माझे एक पहारेकरी काका आहेत, जे सातत्याने आमच्या संपूर्ण वसाहतीची काळजी घेतात, अहोरात्र अशी. प्रत्येक इमारतीला तरी दिवस आणि रात्रपाळीचे पहारेकरी बदलतात पण हे मुखिया असल्यामुळे सातत्याने हजर असतातच. काही वेळेपुरते ते त्यांच्या खोलीवर जाऊन येतात, पण बऱ्यापैकी आमच्याच सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे त्यांनी. एकदा मला म्हणतात कसे कि मॅडम मला पाय मोजे ऑनलाईन मागवून द्या, माझ्या नावावर म्हणजे मी इथे आल्यावर त्यांना पैसे देईन. सध्या पावसामुळे कपडे वाळत नाहीत आणि मोजे लागतात. मला बूट मोज्यांशिवाय घालायला नको वाटतात. त्यांच्यासाठी मग त्यांनी सांगितलेल्या किमतीत मोजे मी शोधायला सुरवात केली ऑनलाईन. शोधता शोधता मला अनेक प्रकार आढळले. आजकाल तर वैविध्यतेने नटलेत दुकानं, बाजार. मोज्यात इतके प्रकार मी कधीही बघितले तर नव्हतेच पण विचार देखील केला नव्हता. मला एक प्रकार दिसला तो म्हणजे फक्त टाचेपासून ते पायांच्या बोटांच्या सुरवाती पर्यंतच असलेले मोजे. म्हणजे पायाची बोटे मोकळी, मोज्यात बंदिस्त नाहीत. वा, क्या बात है? कोण वापरत असेल हा प्रकार? असा मला प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाहीच. सर्वप्रथम म्हणजे का, किंवा कसला विचार करून हे असे मोजे बाजारात आणले असतील? कशासाठी? माझ्या छोट्याश्या मेंदूला बराच त्रास दिला पण अनुत्तरीतच राहिले सरतेशेवटी.  


त्या वरून मला एक दोन किस्से आठवले. एक म्हणजे मोज्यांचे भोक आणि दुसरं म्हणजे व्यक्तिमत्व. कदाचित पायांच्या बोटांची नखं वाढली कि, किंवा मोजे व्यवस्थित सांभाळले नाही कि, किंवा जुने झाले असले फारच, जर्जर म्हणायचं आहे मला, कि हमखास मोज्याला भोक पडतच. असे भोक खरं तर कोणाला दुसऱ्याला दाखवू नयेच आणि दिसण्याच्या आत मोजे नवे घ्यावेत हा एक अलिखित नियम आहे. उच्च विद्याविभूषित, मोठ्या पदावर काम करणारा, मोठ्या अंतर्देशीय कंपनीत आणि होणारा नवरा जर असे भोक असलेले मोजे घालत असेल तर त्या मुलीने तेथेच नकार द्यायला हवा होता, कारण ते भोक फार म्हणजे फारच सांगून जाते त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल. इशारा असतो तो, सावधानतेचा. पुढे काय होऊ शकतं हे दर्शवतो तो भोक पडलेला मोजा. जर तेव्हा निर्णय घेतला नाही तर मग पस्तावा निश्चित आहेच पुढे. असो. 


तर हे असे नवीन पद्धतीचे मोजे काढण्यामागचं कारण प्रकर्षाने समजलं मला. भोक पडणारच नाही, म्हणजे मग सगळे पुढचे प्रश्न बाद. अहाहा च. क्या बात है?  कित्ती हुशारीने समस्या हरण केलं ज्याने हे असं विचारपूर्वक डिझाईन निर्माण केलं. मला खूप म्हणजे खूप मज्जा तर आलीच पण आता व्यक्तिमत्व ओळखण्याची नवीन क्लुप्ती शोधून काढावी लागेल हे देखील समजलं.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...