मला एका संस्थेने त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता बोलावले होते. खूप दूरचे ठिकाण होते. माझ्या स्वभावानुसार १) मी बहुतांशी विचारत नाही कि किती पैसे देणार वगैरे २) मला नक्की खात्री असते कि ते योग्यच देतील म्हणूनही असेल कदाचित, आणि देतात देखील. काही संस्था जाण्या-येण्याचे पण पैसे देतात आणि काही नाही. ठीक आहे, काहीच फरक पडत नाही. ह्या संवादासाठी मी टॅक्सी ने जाण्याचे ठरवले कारण इतक्या दूर मी गाडी चालवत नाही, आणि तो कार्यक्रम दुपारी होता त्यामुळे परत येतांना मी एकांना विनंती केली होती कि मी त्यांच्या सोबत अर्ध्या रस्त्यापर्यंत येईल आणि ते हो पण म्हणाले होते. हे मला आधीच ठाऊक असल्यामुळे, ३-४ तासांचे बोलणे होणार असल्यामुळे आणि उभे पण राहावे लागणार, अंतर फार, त्यामुळे मग मी हिशोब मांडला मनातल्या मनात. एकंदरीत जाण्या-येण्याचे कित्ती होतात पैसे? आणि मला एक अंदाज आला. येतांना अर्धेच खर्च होणार होते, त्यामुळे मी त्या बेरजेनुसार, बेरजेच्या कक्षेत राहून जातांना जरा आलिशान गाडी निवडली, अर्थात ती महागडी होती. नेहेमी पेक्षा जास्त पैसे मोजावे लागले पण समाधान म्हणजे काय हे खरंच क्षणो क्षणी अनुभवता आले, गाडीची उत्तोमोत्तम स्थिती, चालक, पोटातले पाणी न हालू देता केलेला प्रवास, कुठंही घाई न करता वेळेआधी पोचलेले मी, हे सगळं समिकरण इतकं समाधान देऊन गेलं कि ज्याचं नाव ते. खूप म्हणजे खूप वेगळं वाटलं मला. हा माझा वाढदिवसाचा महिना, त्यामुळे जसे कि मीच मला बक्षीस दिले असे काहीसे झाले.
एक नवीन टॅक्सी चे अँप आहे, ज्यावर किंमत कमी करता येते, १० किंवा २० रुपयांनी. आणि मी ती सुविधा वापरते, कधी उपयोग होतो कधी नाही. पण सुविधा आहे, मला साधारण अंदाज आहे किती पैसे होतील मग का नाही वापरायची ना? माझ्या फोन वर दोन अँप आहेत आणि मी त्या दोन्ही वर आधी किंमत बघते आणि मगच टॅक्सी किंवा ऑटो बोलावते. अशी मी थोडक्यात, आणि आज चक्क महागडी गाडी घेतली, आणि ते देखील मस्त ठरवून, बाप रे, काय म्हणायचं ह्याला. मी जवळपास दोन्ही वेळचे पैसे एकाला दिले. पण मज्जा आली. माझ्यातला हा बदल नावीन्याने नटलेला आहे ह्यात शंकाच नाही. मला खरंच साध्या गाड्यांचा मनापासून कंटाळा आला होता. पावसाळ्यात खरंच नको वाटतं होतं त्यात बसायला, म्हणून पण असेल कदाचित. पण काहीही असो मला एका महाराणी सारखं वाटलं मला, मोठ्या गाडीत बसून जातांना, जसे कि ह्या राज्यातली जनता माझ्या अंगावर फुले उधळत आहेत, माझ्यासाठी वाट मोकळी करून देत आहेत, उगाचच, काहीही कारण नसतांना. कोण म्हणतं फुलायचे, झुलायचे दिवस फक्त एकदा येतात? छे छे, आज माझा झोपाळ्यावाचून झुलायचा दिवस निश्चित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा