मंगळवार, ३० जुलै, २०२४

1958: माझे नितांत प्रेम


खरं बोलू का? माझे नितांत प्रेम आहे रवा दोस्यावर, साधा करा आणि भाजी, सांबर, चटण्यांसोबत मिटक्या मारत फस्त करा, किंवा भरपूर भाज्या घालून करा आणि नुसता गरम गरम आनंदाने खा. त्याच्या सोबत काहीही नसलं तरी निभावतं, एखादी पुडी चटणी, ताबडतोब होणारी देखील पुरते, किंवा कोरडी चटनी पण चालते. मी तर आळशी, डोसा झाला कि त्यावरच भुरभुरते कोरडी चटणी किंवा सांबार मसाला, माझ्या आईची पद्धत.  सोप्पा आहे करायला, बास तो रवा भिजवा कि लगेच फुलतो, फुगतो नाही हा मंडळी. सगळं सामावून घेतो, भिजवणे नाही, मिक्सर नाही, फुगणे नाही, रात्रभर लवाजमा नाही आणि पौष्टिक भरपूरच. त्यामुळे मज्जा येते. अजून एक खासियत म्हणजे तव्यावर टाकला रे टाकला कि मस्त स्वतःच पसरतो, फिरवत बसायला नकोच, कुठलेही कौशल्य वगैरे दाखवायला नको आणि उगाच ऐकून घ्यायला नकोच, कि गोलच डोसा झाला नाही, नीट पसरला नाही, जाडच झाला ई. अजून यादी भली मोठी आहे. 

अगदी तसेच भगरीच्या दोस्याचे देखील आहे, झट कि पट भिजणार, मस्त भरपूर काकड्या, हवा असेल तर बटाटा, बारीक चिरलेल्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर असं सगळं साग्र संगीत घालून तो इतका चविष्ट होतो कि ज्याचं नाव ते. आणि अगदी रव्या सारखा स्वतः मस्त फैलणारा, कौशल्य दाखवायची गरज नाहीच. आणि पौष्टिकता तर शिगेला पोचलेली. शिवाय काहीही आंबवायला नकोच, आधीच आदल्या दिवशीपासून धडपड नाहीच, त्यामुळे माझं नितांत प्रेम आहे ह्या दोघांवर आणि सारखा ताव मारत राहते मी त्या वर. 

अगदीच खूप उत्साह असेल तर महिन्याचा किराणा आला कि रवा आणि भगर थोडीशी भाजून, पीठ करून ठेवायची. मग काय ताबडतोब डोसे तय्यार. साधी दाण्याची चटणी पण पुरेशी आहे, काहीही नसलं तरी आताच इतका माल घातला आहे कि तो पुरेसा आहे. किंवा जास्तीत जास्त लोणचं चवीला. अहाहा च. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...