माझ्या वडिलांचा गुरुवारी उपवास असायचा, श्री दत्त परंपरा आहे घरी त्यामुळे. शनिवारी पण असायचा, का कुणास ठाऊक आणि मी कधीच विचारण्याच्या भानगडीत पडले नाहीच कारण यथेच्छ उपवास आणि नॉन उपवास पदार्थांवर ताव मारता यायचा त्या निमित्याने. म्हणजे माझी कोणे ऐके काळी ख्याती होती कि मध्यरात्री जर मला उठवायचे असेल तर साबुदाणा खिचडी केली आहे, खाणार का एवढं विचारायचं, बास. इतकी म्हणजे इतकी मनापासून मला ती आवडायची. पांढरी शुभ्र, मस्त तिख्खट आणि उगाच साखरेची चव असलेली, भरपूर कोथिंबीर आणि उत्कृष्ट दाण्याचे कूट, कधी कच्चा बटाटा घालून तर कधी उकडलेला, अहाहा च. क्या पदार्थ है? आई शपथ !!!
इतकी वैविध्यता होती आणि आहे उपवासाच्या पदार्थांमध्ये, कि आई खूप प्रकार करायचीच आणि त्यामुळे माझी मज्जा होती. त्यातलाच एक म्हणजे भगर आमटी. आईला मागे लागून जास्त आमटी करायला सांगायची. कारण? अहो सोप्पं आहे, उपवासाच्या दिवशी भगरी सोबत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीला म्हणून ती शिळी दाण्याची आमटी आणि गरमागरम पहिल्या वाफेचा भात, भरपूर तूप, क्या बात है? लै भारी, जगावेगळी ती चव.
मी म्हणजे पट्टीतली खाणारी, अगदी येऊ द्या पद्धतीची, त्यामुळे खूप मज्जा यायची. आज हे लिहिण्यामागचं प्रयोजन असं कि काल आठवण आली म्हणून भगर आमटी केली होती रात्री, ती जास्त केली, आज सकाळी उठल्या उठल्या सकाळची कामे उरकल्यावर आधी भात लावला आणि कधी एकदा ती कालची आमटी आणि भात फस्त करते असं झालं होतं मला. पर्वणीच हो, कुठलीही उपमा देता येणारच नाही ह्या अश्या नवख्या / अनोख्या पदार्थाला. जगातली सर्वोत्तम चव, असं वाटतं होतं कि तो कालवलेला भात संपूच नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा