बुधवार, ३१ जुलै, २०२४

१९६०: सेहत का राज


"आजि सोनियाचा दिनु  

वर्षे अमृताचा घनु  

 हरि पाहिला रे हरि पाहिला रे"


माझी आज एकंदरीत अशी अवस्था झाली हो, कारणे? अनेक आहेत. देते एक एक करून. 

अगदी कळत्या वयापासून फर्ग्युसन महाविद्यालयाबद्दल खूप म्हणजे खूप ऐकलं होतं. ह्या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश, उदिष्ट आणि माणसं हि जगावेगळी होती. पण त्या वेळी मी नागपूरकर होते आणि "इथे विद्यार्थी दुरुन दुरून शिकायला येतात", "आहे त्याचं सोनं करा" असा पिंड होता. वसतिगृहात जाऊन राहणे हे तितकसं मान्य नव्हतं आणि ते देखील मुलीला. त्यामुळे मी गप्प राहिले पण इच्छा मात्र खोलवर जिवंत राहिली. मग अनेक वळणं आणि, बऱ्याच टप्प्यांवर निर्णय घेतले पण FC दूरच राहिले. त्या महाविद्यालयाच्या समोरून जातांना सगळं आठवायचं. आणि आज मला पुन्हा एकदा बोलावण्यात आलं त्याच किंवा FC च्याच एका नवीन संस्थेमधे बोर्ड सदस्य म्हणून. 

"काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" अशी माझी अवस्था FC बद्दल लिहिण्यासाठी. पण राहावलंच नाही, म्हणून हे काही शब्द. तिथली वास्तू, तिथले वातावरण, ऊर्जा, माणसं, शिक्षक, विद्यार्थी हे सर्व इतके वेगळे का असतात? हे मात्र नेहेमीच जाणून घेण्याची उत्सुकता होतीच. चार दा जाणं झालं माझं त्या परीसरात, उदघाटनाला, भूमिपूजनाला, विद्यावाचस्पती (PhD) मुलाखतींसाठी वगैरे. आज मी ऑनलाईन हजर होते, आणि सगळं म्हणजे सगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न होता. सरते शेवटी मला हवे ते उत्तर मिळालेच, आणि बाकी सगळ्या मोठ्या कारणां व्यतिरिक्त एक अजून पिटुकले कारण समजले. BoS ची मीटिंग म्हणजे एक बड प्रस्थ असतं. ती उभी करणे म्हणजे बराच अभ्यास, कागदं, माणसं, आमंत्रणं आणि सल्ले असे भरपूर काही असतं. अश्या मीटिंग मधे सर्वांसाठी  पाणी हे तांब्या पेल्यात / वाडग्यात देण्यात आलं, टेबल वर ठेवण्यात आलं, अहाहा च. म्हणजे इतकी काळजी अगदी प्रत्येकाची, अप्रूप आहे. प्लास्टिक च्या छोट्या बाटल्या असणं मीटिंग मधे हे गृहीत धरलं गेलं आहे. प्लास्टिक कुठल्याही पद्धतीत घातकच. जे महाविद्यालय इतकी मस्त सर्वांची मनःपूर्वक काळजी घेते, तिथले सगळेच काय भन्नाट असेल फक्त विचार करा? "शितावरून भाताची परीक्षाच" नाही का? मी तरी हे दृश्य आज पहिल्यांदा बघितलं. मी इतक्या वैविध्य ठिकाणी जात असते पण हे अवर्णनीय असे होते माझ्या साठी. काही नक्की म्हणतील "काय त्यात?" पण नाही, "खूप काही त्यात". उगाच नाही इतकी वर्ष सर्वार्थाने एक नंबर वर आहे हे विद्यापीठ, प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडवलेत. FC मध्ये प्रवेश मिळणं हि सन्मानाची गोष्ट आहे, अजूनही, इतक्या दशकानंतर सुद्धा. क्या बात है? 

आणि अश्या FC / DES मधे माझ्या सारख्या छोट्या शहरातून आलेल्या, मराठी भाषेत शिक्षण झालेल्या मुलीला एक भाग होता आलं हि खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठं भाग्य माझं. आणि हे फक्त माझ्या चार डोळ्यांना दिसलेलं, मला भावलेलं असं हो.  

FC / DES च्या अप्रतिम "सेहत का राज" आज मला समजलं. इथे मी सर्व स्तरावरची सेहत समबोधते आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक ई. 

प्रत्येक विद्यार्थी हा समग्र, सर्वकष स्वरूपाचा घडावा म्हणून जी सर्व शिक्षकांची धडपड होती ती आज दिसून आली, वेळोवेळी दृष्टीस पडलीच. प्रत्येकापर्यंत "तो" म्हणजे "बाप्पा" किंवा "हरी" पोचू शकत नाही, त्याचे बोट धरून मार्ग दाखवू शकत नाही म्हणून शिक्षकांची "त्याने" निर्मिती केली आणि त्याच प्रत्यंतर आज आलंच. खूप विचारपूर्वक अभ्यासक्रम मांडला होता, आणि त्यात काही बदल करण्यास तय्यारी पण दिसली. सगळंच वाखाणण्यासारखं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...