मला परवा एक निरोप आला आपल्या व्हाट्सअप वर. त्यात माझी मी अमुक अमुक दिवशी तमुक वेळेला उपलब्ध आहे का हे विचारलं होतं आणि त्याला मी अंगठा दाखवला. म्हणजे आजकाल व्हाट्सअप वर आलेल्या निरोपाला काही क्षण धरून ठेवलं कि तो ईमोजी च्या स्वरूपात थोडक्यात आणि पट्टदिशी उत्तरे देऊ देतो. गेली ५-६ महिने झाले हि सुविधा उपलब्ध आहे, आणि मोठ्या आनंदाने मी ती वापरत आहे. नवीन गोष्ट वापरण्यासाठीच दिलेली असते, ती सोयीची असते म्हणून उपलब्ध केलेली असते जन सामान्यांसाठी ना? मी उत्तर देऊन मोकळी झाले आणि ते माझ्या पट्टाकिनी विस्मृतीत पण गेलं, कारण ते काम मी केलं होतं. हे सगळं सकाळी घडलं आणि संध्याकाळी आला कि बांबू, ओरडा पडला मला, व्यवस्थित उत्तर द्यायला का जमत नाही तुम्हाला? जरा हो नाही म्हणायचं असेल तर शब्द वापरा, लिहा, असे अंगठे फक्त दाखवू नका, दिसत नाही ते पट्टाकिनी किंवा तुम्ही उत्तर दिलं आहे, अंगठा उंच केला आहे हे उमटत नाही उत्तरासारखं प्रकर्षाने. त्यामुळे घोळ होतो, ते टाळा. मी हो म्हणून गप्प झाले आणि मला तिचा तो बाण रुतला, काही आठवलं.
माझे कंपनीतले दिवस, अमेरिकेतला उत्कृष्ट काळ आणि मी हे सगळं वेळोवेळी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेले वर्ग, सगळं आठवलं. आपण भारतीय, बहुतांशी प्रत्येक वेळी, नेहेमीच मान डोलावतों, हालवतो, हो ला पण तशीच आणि नाही ला पण तशीच दिसते ती अनेकांना आणि मग घोळ होतो. असा हा घोळ टाळता येऊ शकतो. बाहेर देशातल्या संस्कृती मध्ये हे असं माना डोलवणे ठाऊक नसल्यामुळे पंचाईत होते, समजत नाही समोरच्याला तुमची काय प्रतिक्रिया आहे ते. त्यामुळे स्पष्ट हो किंवा नाही म्हणा, मान न हलवता ते होऊ शकतं. स्वाभाविक आहे, अनेक वर्षांची सवय आहे, नकळत होतं पण ते झालं तरी बोला, हे जास्त महत्वाचे आहे.
आपण परदेशी पणा अनेक पद्धतीने आनंदाने आणि अभिमानाने स्वीकारला आहे, मग ते खाण्याच्या बाबतीत असो, वेष आणि केश भूशा असो, बोलणं असो, वागणं असो, मैत्री च्या नावाखाली असो, छंद असो, सिनेमे असो, अगदी म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला बाहेरच्या गोष्टी अंगिकारल्या आहेत हे लक्षात येतंच. किंबहुना ते अभिमानाने दर्शवलं जातं, मग हि छोटीशी सवय अंगिकारायला असा कितीसा वेळ लागेल? खूप थोडा. सवयीने होईल, प्रयत्न करून बघाच. आपल्याला त्यांच्या सोबत काम करायचं म्हणजे हे करणं आलंच, सुखकर होईल.
हि एक माझी फक्त विनंती माझ्या नजरेस पडलं, मी अनेकदा अनेकांना ते सांगितलं आणि लिहावसं वाटलं म्हणून हा पंक्ती प्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा