रविवार, ३१ मार्च, २०२४

"ते" गाण्याचे सार्थ बोल


"सासुरलं गेंदा फुलं ", "तेरे साथ गंदी गंदी गंदी बात..." असे बोल असलेले हिंदी चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं होतं साधारण दहा वर्षे आधी. सर्वानुमते हे गाणं म्हणजे रोमांचित संभाषण असे आहे किंवा होते. पण एवढ्यातच कसे कुणास ठाऊक पण अनेक किस्से ऐकून, वाचून, बघून नाण्याची दुसरी बाजू समजली. परवाच टीव्ही वर "कौन बनेगा करोडपती" ह्या भल्या मोठ्या नावाजलेल्या कार्यक्रमात खुले आम एक बायको नवऱ्याचे खडे बोल सुनावत होती. त्यातला नवरा म्हणतो कसा "तू कमावत नाहीस तर तुझा उपयोग काय ह्या घराला", किंवा "आई कुठे काय करते" हे पण सर्वश्रुत आहेच कि. सगळ्या स्तरात भारतात बायकोला बोलणे आहेच, अर्थात आऊट लायर्स  किंवा चांगले अपवाद असतात. कोणी कबूल करतात कोणी नाही, कोणाच्या घरी असे तर कोणाच्या तसे. कोणाकडे स्पष्ट तोंडावर ऐकवतात तर कोणाकडे काही वेगळी पद्धत असेल. पण "बायको कायच काम करते" हे खूप ठिकाणी बघायला मिळते. उगाचच नाहीत बायका नोकरी करायला बाहेर पडल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात. छे छे, फक्त शिक्षण घेतले म्हणून नाहीच, मुळात शिकल्याच त्या कारण अर्थकारण जास्त महत्वाचं बायको, आई आणि इतर नात्यांपेक्षा. अर्थात पुन्हा सांगते "आमच्या कडे असे का$$$$$ही नाही" अश्या म्हणाऱ्या सापडतील, पण ते कितपत खरं खोटं हा एकतर विषयच नाही, आणि ते त्यांचं ते बघू देतं.

सारखं बोलून छान तय्यार करतात ते मुलींना समाजात वावरण्यासाठी आणि खूप मस्त उंची गाठण्यासाठी. कित्ती विचारपूर्वक कृती आहे नाही. सगळे श्रेय अश्या दृष्टीने त्या बोलक्या बाहुल्यांनाच जाते. 

"गंदी बात..." ह्या मागे काय दडलंय: तर मी नवरा. नवरा म्हणजे सातत्याने बोलणारच. अर्थात पुढील पिढी मध्ये हे नाही, नसावं, पण आधी होतं. सासू सासरे कित्येकदा काडी लावायचे, आणि हे पोपट बोलायचे. ह्याला गंदी बात म्हणतात. म्हणजे लग्न झालं, आता तू कधीही कानावर न पडलेले, अनपेक्षित असे ताशेरे ऐकायला तय्यार राहा असे आहे, असे दृश्य आहे अनेक कुटुंबात, मग ते शिकलेले असो, अतिउच्च विद्याविभूषित असो नाही तर अनपढ.  "शुभ मंगल सावधान" असा मतितार्थ आहे ह्या गाण्याचा एका दृष्टीने. प्रत्येक लग्नात करतात सावधान पण त्याचा असा देखील अर्थ असू शकतो, काही मुलींना तर आयुष्यभर हे ऐकावं लागतं, कुठलेही स्वतंत्र दिले जात नाही किंवा त्यावर देखील एक वाचक असतो, खुप उदाहरणं आहेत आणि खूप भोगले आहे माउलींनी. असो. म्हणूनच अजून मुलींपर्यंत हे पोचावं, अजूनही वेळ गेलेली नाही असं सांगण्याकरता हे गाणं लिहिलेलं असावं आणि अश्या प्लॅटफॉर्म वर सादर केलं असावं. बोल, चाल आणि चित्रीकरण लक्षात राहण्यासारखं आहेच. तेव्हा जुन्या पिढीतल्या मुलींनो सजग व्हा. ज्यांचं सासर ह्याला अपवाद आहे त्या सुना फार भाग्यवान आहेत. आणि अशी मस्त माणसे आहेत ह्या जगात अजून.

सोमवार, २५ मार्च, २०२४

वेगळाच बदल


मी होमिओपॅथी औषधांवर विश्वास ठेवणारी आहे. मला ती औषधे आवडतात, परिणामकारक वाटतात आणि हि औषधे ज्या पद्धतीने तय्यार केली जातात, ज्या रीतीने उपचार केले जातात ते मला भावतं. अंतर्बाह्य असा परिणाम साधला जातो, स्वभाव लक्षात घेऊन. आणि असे नेहेमीच म्हटले जाते कि "स्वभावाला औषध नाही". म्हणजे माणसाचा स्वभाव हा कधीच बदलत नाही. पहिल्यांदा जर रुग्ण होमिओपॅथी डॉक्टर कडे गेला तर खूप वेळ त्याची चौकशी होते. त्यात अगदी गरम खायला आवडते का थंड? काही दुखत असल्यास गरम पाण्याची पिशवी घेतली तर बरं वाटतं का? असे असंख्य प्रश्न विचारले जातात, किंवा एक भला मोठा फॉर्म भरून घेतला जातो. 


एकाद्या शारीरिक दुखण्याला गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फ हे दोन उपाय आहेत. म्हणजे पोटात औषध, थोडा आराम आणि शिवाय शेक हे सगळे मिळून पट्टाकिनी बरे व्हायला होते. आधी माझा एक भला मोठा गैरसमज होता कि सूज आली तरच बर्फ वापरतात, बर्फ किंवा तत्सम जेल असेल, फ्रिज मध्ये ठेवून गार केलेली पिशवी = आईस पॅक. काही वेगळ्या स्वभावाच्या माणसांना ह्या पद्धतीने दुखण्यात बरे वाटेल असं ठाऊक नव्हतं किंवा मला पटत नव्हतं, का कुणास ठाऊक. मला सुरवातीला प्रचंड राग यायचा जर मी कोणाला असं थंड पिशवी घेऊन शेकतांना पाहिलं तर, कारण सरळ आणि स्वच्छ होतं. शेकणे आणि थंड पिशवीने? ह्या, काही काय? असं कधीतरी होऊ शकतं का? मला शाब्दिक समीकरणापासूनच झेपलं नव्हतं हे सगळं. पण वारंवार माझ्या पायांच्या दुखण्याकरता डॉक्टर मला थंड शेक चा सल्ला देत राहिले. काही दिवसांपूर्वी, ह्या भल्या गर्मीच्या मोसमात मग मी हा प्रयोग करून बघण्याचे ठरवले. आणि सांगते काय? मी माझीच ना राहिले. माझ्या पायांना तो शेक इतका म्हणजे इतका भावाला कि ज्याचं नाव ते. माझ्या पायांना बोलता आलं असतं तर त्यांनी नक्कीच धन्यवाद दिले असते आणि शिव्या पण. इतके दिवस हे अमृत का नाही चाखवलंस आम्हाला असं नक्कीच विचारलं असतं त्यांनी. अर्थात माझ्या पायांची अजून एक सवय आहे कि गरम असो वा थंड त्यांना मी साधारण एक तासभर तरी  शेकत बसणं भावतं. शेकत असतांना गप्पा पण हव्यात हो. भलतेच आगाऊ आहेत पठ्ठे. तर आताशा जेव्हा जेव्हा पाय त्यांचं डोकं वर काढतात, तेव्हा तेव्हा गारेगार अनुभव अनुभवतो आम्ही. 


आता मला सांगा ह्याला काय म्हणायचं? स्वभावात बदल? का आणखीन काही? का उन्हाळा म्हणून शरीराला आणि त्या दुखण्याला सुद्धा गारेगार जास्त भावतंय? मग आता जर मी पोटात औषध घ्यायला होमिओपॅथी डॉक्टर कडे गेले तर ते कशी औषधे देणार मला, गरम आवडते म्हणून का थंड? 


डॉक्टर ठरवू दे ते, मी तर सध्या अजून मोठ्या आकाराचे जेल पॅड मागवण्याचा मार्गावर आहे. सध्या मी गारेगार चा पुरेपूर अत्यानंद उपभोगतो आहे. पुढचं पुढे बघू. आज माझे पाय ठणठणीत आहेत हे जास्त महत्वाचे. आणि स्वभावालाच औषध असते, स्वभावच बदलतो आणि हे शक्य आहे. बदल हाच तर स्थिर असतो ना सरते शेवटी. आधी कदाचित पहिली म्हण योग्य असेल हि पण आताशा नाही. आता बदल करत राहणे हे जास्त योग्य. म्हणजे सर्वांमध्ये सामावून घेता येत सहजी. सतत हटवादी किंवा ठाम बनून न राहता हवे तेव्हा स्वभाव विरुद्ध बदल स्विकारुन बघा तर?, कदाचित आवडेल, हे मी आधी का नाही अनुभवलं? असं देखील वाटेल तुम्हाला कदाचित. 

शनिवार, २३ मार्च, २०२४

सांगीतिक मेजवानी


मी एवढ्यातच एका सुंदर, विचारपूर्वक आखलेल्या कार्यक्रमाला गेले होते, उपस्थित राहिले होते. दिग्गज, नावाजलेली माणसे व्यासपीठावर स्थानापन्न झाली होती. पेटपूजा आधीच करवली होती आयोजकांनी. थंडगार वातानुकूलित जागेत, शिस्तीत आणि भरपूर आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी, सगळ्या उच्च विद्याविभूषित, भल्या मोठ्या हुद्द्यांवर काम करणारी, किंवा काम करून झालेली उच्चभ्रू मंडळी होती श्रोते म्हणून. अगदी सगळ्यांकडे किमान एक किंवा जास्त अती महागडे मोबाईल होते. भन्नाट वेष आणि केशभुषा करून सगळे उपस्थित होते. आटोपशीर साधारण दीड तासाचा कार्यक्रम होता. दोन लहान मुले होती बाकी सगळी मोठी मंडळी. जसा कार्यक्रम सुरु झाला प्रत्येक मिनिटाला एकाच फोन वाजला. माझ्या मते एखादाच व्यक्ती सोडला तर प्रत्येक जणांनी तो फोन घेतला आणि हळू आवाजात (असं त्यांना वाटलं) बोललेच. एक डॉक्टर मॅडम तर सतत दीड तास फोन वरच होत्या. एकाच फोन वाजल्या नंतर तरी आपला फोन बंद करावा किंवा आवाज बंद करावा कि नाही? पण चे हो. हे काय कमी होतं माझ्या अगदी समोर बसलेल्या मॅडम संपूर्ण वेळ त्यांची साडी सारखी करत होत्या, ते झालं कि डोळ्यात औषध टाकत होत्या मग पर्स ची एक, दोन, मग तिसरी चेन उगढझाप करत होत्या, डोळे पुसत होत्या, पुन्हा साडी... मी डॉक्टर नाही, पण डोळ्यात औषध फक्त दिवसातून दोन किंवा तीनदा च घालतात, प्रत्येक मिनिटाला नाहीच. 


कित्ती जण ह्या खुर्ची वरून त्या वर, इथून फोटो कधी, तिथून फोटो कधी, ह्याला धक्का मार, इतके फिरत होते सतत कि अरे तुम्ही कशासाठी आलात कार्यक्रमाला. 


कित्ती फोन वर मोबाईल डेटा चालू होता, त्यामुळे सोशल मीडिया चे नोटिफिकेशन्स सारखे दर मिनिटाला / क्षणाला हजर. काय हे आणि कशासाठी. कित्ती म्हणजे कित्ती ती अस्वस्थता आणि ती दर्शवायची कशाला कि मी अस्वस्थ आहे. स्थिर व्हा ना आता तरी, ह्या टप्प्यावर तरी. तो जर मोबाईल काही वेळ बंद ठेवला, नाही फोन उचलला तर काय होणार आहे? सांगीतिक मैफिल होती अगदी, आठही बाजूंनी सतत आवाज, नोटिफिकेशन्स, फोन ची रिंग, फोन वर बोलणे, आवाज करत फिरणे ई. इतकी सुंदर भाषणे होती, त्या वक्त्यांनी तय्यारी केली होती, मग त्यांना मान द्या लोकहो. ज्यांना ऐकायचे आहे त्यांना तरी ऐकू द्या. 


सरते शेवटी मी डोळे बंद केले, चष्मा काढून हातात ठेवला आणि शब्दमोती कानात साठवून घेण्याचा प्रयत्न केला, कारण कुठलेही सादरीकरण नव्हते व्यासपीठावर, फक्त ऐकायचे होते. कमाल वाटली पण ह्या उच्च विद्या विभूषित माणसांची. विचित्र वागणं, अनपेक्षित होतं मला कारण तेथे सगळे बहुतांशी साधक म्हणणारे च होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्याच काहीच वाटतं नव्हतं कि आपण काही तरी चुकीचं करतो आहोत. छे छे. काहीही घेणं देणं नाहीच. त्या वक्त्यांची कमाल आहे, मानायला हवं त्यांना, एक ब्र शब्द न बोलता, कुठलीही तक्रार न करता त्यांनी त्यांचे भाषण सुरु ठेवले होते. मला खूप शिकण्यासारखे आहे ह्या तुन. मला नाही आवडत असं वागणं. असो. अनेकदा / आजकाल बरेचदा काय नाही करायचं हेच शिकवणारे जास्त होतं चाललेत. मोबाईल बाबाच्या इतक्या आहारी जाऊ नका, जपा स्वतःला मंडळी, खूप उशीर व्हायच्या आधी. मूलभूत, साधी, अपेक्षित, प्राथमिक अशी हि नैतिक कर्त्तव्य आहे कि जबाबदारीने वागावे, मोबाईल बाळगावा, सोशल मीडिया वापरावा. म्यूट, सायलेंट, आणि बंद कारणे शक्य आहे जेव्हा आपण अश्या एखाद्या सभेत जातो, ऐकायला जातो, किंवा दुसऱ्यांशी संवाद साधत असतो. इतके तर अत्यावश्यक आहे. सन्मान द्या आणि घ्या.  

चाळीशी


माझ्या लहानपणी पासून मी एक निरीक्षण केले होते आणि तेव्हा असे बोलले जायचे, किंबहुना हि वस्तू स्थिती होती कि चष्मा म्हणजे चाळीशी. एखाद्याला चष्मा आहे म्हणजे तो किंवा ती चाळीशीच्या आसपास आहे. "अलीबाबा आणि चाळिशीतले चोर" नावाचा नवा चित्रपट येऊ घातला आहे. त्या निमित्याने सर्व कलाकारांशी चर्चा झाली. मी ती बघितली, ऐकली, एक प्रश्न त्या कलाकारांना विचारण्यात आला, कि "चाळीशी म्हणजे काय?". तर उत्तर असे होते कि "कोणाही बद्दलचे गैर समज दूर झाले", "हा माझ्याशी असंच का वागला असेल, मग मी पण त्याचाशी तसेच वागणार ई." निघून गेले. असेल काही समस्या म्हणून असे बोलला किंवा वागला असेल अशी समजूत आपोआप निर्माण झाली = चाळीशी. हे प्रत्येकाने काबुल केले. कोणाच्या अध्यात मध्यात न पडणे, किंवा पडण्याचा मोह न होणे = चाळीशी. असे अनेक किस्से, अनुभव आणि घटना सांगितल्या गेल्या. 


आत्ता किंबहुना गेले काही वर्षे मात्र हि परिभाषा बदलली आहे. चष्मा म्हणजे चाळीशी असं समीकरण राहिलेले नाही. आताशा अगदी लहान वयात चार डोळे होतात, दोनाचे. ह्या मागची कारणे अनेक आहेत, वाढलेला  स्क्रीन टाइम, जीवनसत्त्वांची कमतरता, प्रदूषण आणि बरीच इतर. मला आज नवीन एक कारण सापडले आहे. ते असे. प्रत्येक वयात, ठिकठिकाणी इतकी चढाओढ निर्माण झाली आहे, बऱ्याच जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, खूप स्थरावर कामे करायची आहेत, बाहेर देशात नोकरी / शिक्षण किंवा फिरायला जायचे आहे, पैसे ढिगाने मिळवायचे आहेत ई. मुळे मग जीवाचे रान करावे लागत आहे. अशात कशाला कोणाच्या अध्यात मध्यात पडायचे, आपले काम बरे आणि आपण बरे, नाही का? काल आपण कसे होतो आणि आज त्यात प्रगती आहे का हे बघितले तरी बास. म्हणजे पैशांची प्रगती नाही तर तब्बेतीची, स्वास्थ्याची, शिकण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची. प्रगती पथावर गाडी असायलाच हवी ते दर्शवण्यासाठी हा चष्मा स्थानापन्न झाला आहे आपल्याकडे जरा लवकर मंडळी. त्या दोन जास्तीच्या डोळ्यांनी आधी स्व मग बाकीचे, खार तर नकोच बाकीचे, असं पवित्रा घ्या आणि बदल अनुभवा. त्याचा अर्थ बाकीच्यांची काळजी घ्यायची नाही असे नाही. तर समतोल साधायचा, अती नको. तुलना नकोच, दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा नको, अती नको ते विचार नकोत, आणि अर्थात स्व कडे लक्ष केंद्रित हवे. 

प्रत्येकाला आताशा गेली १५ एक वर्षे मोठे व्हायची फार घाई झाली आहे. लवकर मोठं व्हायचं, सगळं अनुभवायचं असं झालायं. घ्या मग आता? ४०शी पण जवळ लवकर पुढ्यात उभी ठाकली आहे, चष्म्याच्या रूपात. आणि जर इतक्या लवकर चार डोळे लाभलेच आहेत तर मग तसेच वागा देखील ना, नेहेमीच.  वागायचं  नाही, तर ऐकायचं, बोलायचं, अनुभवायचं, मिरवायचं, ई. सगळ्याच कृती हो.  कधी असे आणि कधी तसे हे कसे चालणार? एक ठरवा आणि पुढे मार्गस्थ व्हा. 

४० म्हणजे नवीन ६० अशी मी एक जाहिरात बघितली इतक्यात. खूप तथ्य वाटले मला त्यात. 

चला तर मग, आजपासून प्रत्येक दिवस चार डोळ्यांसोबत अत्यानंदाने साजरा करू यात जसा कि एक सण. 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

अनन्य साधारण


काल सहज यू ट्यूब वर फेरफटका मारतांना एक विडिओ नजरेस पडला आणि त्याने खिळवून ठेवले मला अक्षरशः. इतके कि त्यानंतर मी त्या व्यक्तींचे अजून दोन विडिओ बघून काढले. समोरचे दिसत नव्हते डोळ्याला मी इतकी भारावून गेले होते. "डाउन सिन्ड्रोम" असलेल्या एका मुलीची  (अनन्या) आई तिची कहाणी कथन करत होती. दिवसभर कशी अनन्या ची आई कणखर, खंबीर आणि अविचल आहे हे जरी दर्शवत असली तरी ती कोलमडायची अनन्या झोपी गेल्यावर. अनन्या खूप लघवी असली तरी तिची शारीरिक, मानसिक आणि वैचारिक क्षमता नव्हती सामान्य मुलांसारखी झेप घ्यायची. अगदी तसेच आईला पण सगळे आधी करून दाखवावे लागत होते अनन्याला सातत्याने प्रेरित करण्यासाठी, जे फार अवघड होते. पण सगळी दिव्य पार पाडत शिवाय घरी आणण्याची सख्खी जुळी बहीण, आई डॉक्टर, सगळीच तारेवरची कसरत सांभाळत त्याच अनन्या चा शाशत्रोक्त पद्धतीने शुभविवाह पार पडला. अनन्या आता दुबई ला स्थायिक झाली आहे, तिथली सून झाली आहे. हे सगळं मी पहिल्या व्हिडिओत बघितलं 


पण त्यानंतरचे दोन डोळ्यातले पाणी थांबवतंच नव्हते. जितके अनन्या च्या आई ने पराकाष्ठेची तिला एक माणूस म्हणून घडवले, अर्थात सख्या लोकांची, डॉक्टरांची आणि इतर जणांची मोलाची मदत घेत अगदी तसेच विघ्नेश च्या आईने देखील शिवधनुष्य पेलले दुबईत गेली कित्येक वर्ष. तिच्या कडे देखील विघ्नेशची छोटी बहीण होती, त्याची शाळा, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि अर्थात माणूस म्हणून जडण - घडण, हे सगळं होतंच. आणि असं सगळं अनेक वर्ष सरल्यावर विघ्नेशची आई अजून एका तश्याच पिल्लाला सांभाळायला तय्यार झाली म्हणजे ती कित्ती वेगळ्या कोटीची व्यक्ती असेल हे मला शब्दात मांडता येत नाहीच, कारण माझ्या शब्द कोशात तिच्या साठी योग्य अक्षरसमूह नाहीतच. 


मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात खूप शिकलेली, नोकरी करणारी, पैसे कमवत राहणारी, घर सांभाळणारी, स्वयंपाक येत असलेली, घरचे दारचे कामे करता येत असलेली, गाडी चालवायला येत असलेली, हुशार, नाती जपणारी, आणि अशी १००-२०० पाने भरतील अशी सून हवी असते. त्यात चुकीचे काहीच नाही. अशी सून मिळाली तरी उणे दुणे काढणे अगदी पहिल्या घटकेपासून सुरु. अश्या समाजात विघ्नेशच्या आई सारखी माउली पण असते हे नव्याने समजलं. हे नवीन जोडपं कितीही निर्मल, स्वच्छ, सरळ आणि प्रेमळ असलं तरी त्यांना सांभाळण्याची पण गरज आहेच. कमालीच्या पल्याड, असामान्य व्यक्तिमत्व असतात ह्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. विघ्नेश च्या आई वडिलांचं एक वाक्य मला जास्त भावलं. ते दुबईला च वास्तव करण्या मागचं कारण म्हणजे त्या देशात अश्या मुलांना खूप जपतात, मानाने सन्मानाने, अगदी सगळेच. कोणीही कुणालाही हिणवत नाहीच. अनन्या च्या आईला तर माझा साष्टांग नमस्कार पण विघ्नेश च्या आईला कोटी कोटी प्रणाम आणि दररोज तिच्या साठी खास प्रार्थना आणि मागणे कि तिला शक्ती दे. 


आणण्याच्या जुळ्या बहिणीला तिच्या आईने सहज म्हणून एक प्रश्न विचारला, कि तुझ्या साठी विघ्नेश सारखा जोडीदार बघितला तर? ती म्हणते कशी, तो दररोज कुठलीही अढी मनात न ठेवता मला अनेकदा "आय लव्ह यू" म्हणेल. रागावणार नाही, उगाचच चिडणार नाही, उणे दुणे काढणार नाही, फक्त म्हणजे फक्त माझ्याच साठी माझाच होऊन राहील आणि हि तिची यादी फार लांब लचक आहे. माणुसकीचा एक स्वच्छ सुंदर आणि कल्पक नजराणा असतात हि माणसं. दिलेले काम मनापासून, कलात्मक रीतीने, वेळेआधी करतात, कोणाच्या अध्यात मध्यात नाहीच, डावपेच नाही, राजकारण नाही अगदी सरळ मार्गी आयुष्य जगणारे. प्रत्येकावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारे असे. 


मला कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालायं. मला हे असे विश्व संपूर्ण पणे अनभीन्य आहे पण तरी देखील संपूर्ण बुडायला झालायं त्यात मला आता. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण". 

https://www.youtube.com/watch?v=7FM3egDfidM

सोमवार, १८ मार्च, २०२४

स्थिर सायकल


मला गेली अनेक वर्षे विविध सायकलींबद्दल ठाऊक आहे. अर्थात साध्या, गिअर नसलेल्या अश्या. सायकल अगदी माझ्या वडिलांची भली मोठी, काळी, मग माझी आली छोटी तीनचाकी, मग दुचाकी, त्या नंतर अनेक. रस्त्यावर वाऱ्याशी गप्पा मारत फेरफटका मारणे म्हणजे मोठ्ठी गम्मत. त्या सोबत आईची, माझी कामे होत असतं. अमेरिकेला गेल्यावर अजून एका प्रकारच्या सायकलीशी माझी गट्टी झाली, ती चारभिंतींच्या आत चालवायची म्हणजे चाकांचा एवढा संबंध नसतोच, माझ्या दृष्टीने. मग त्यात असंख्य प्रकार, आकार आणि उंचीच्या सायकली बघितल्या, वापरल्या देखील. कधीही व्यायामात खंड नको पडायला म्हणून ह्या अश्या सायकली. उत्साह टिकून राहावा, बहाणे न करता कुठल्याही ऋतूत मस्त पद्धतशीर शारीरिक हालचाली व्हाव्या म्हणून वापरायच्या. आज मला अचानक अजून काही कारणे सुचली. सायकल म्हणजे पडणे आलेच. किंबहुना पडले नाही तर सायकल काय शिकणार? रस्त्याचा अंदाज कसा बांधता येणार? रहदारीत न घाबरता, आत्मविश्वासाने सायकल मिरवण्याचा, ठिकठिकाणी पोचण्याचा अत्यानंद कधी घेणार? असे सगळे वाक्प्रचार माझ्या लहानपणी प्रचलित होते. तर आत्ताच्या बेशिस्त रहदारीत, खड्यांच्या रस्त्यात आणि वाहनांनी चोवीसतास दुथडी भरून वाहत्या रस्त्यात सायकल काढण्यापेक्षा, प्रदूषण (हवेचे, धुळीचे, वासाचे, आवाजाचे) अनुभवण्यापेक्षा हि स्थिर सायकल बरीच बरी. बाल्कनीत किंवा एखाद्या बागेत असलेली व्यायामासाठी योग्य. उगाच धडपड नको, लागणं नको कि डॉक्टरच्या फेऱ्या आणि दुखणे. त्या पेक्षा स्थिरता महत्वाची, जी योग आणि अश्या सायकली किंवा तत्सम व्यायाम करून साधता येईल. चला तर मग मंडळी अश्या सायकल वर स्वर होऊ यात आणि स्वस्थ राहू यात. 

रविवार, १७ मार्च, २०२४

सारी कायनात...


हि एक हिंदी भाषेतली म्हण आहे कि सगळे विश्व तुम्हाला मदत करायला हजर होते अनेकदा, जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा किंवा अगदी सहज पणे जेणेकरून कोणाचीच गरज पडणार नाहीच. वातावरण निर्मिती इतकी जगावेगळी असेल, अनपेक्षित असेल कि कदापि कोणावर अवलंबून राहावे लागणार नाहीच. स्वयंसिद्ध होण्याचा अप्रतिम उपाय जो खूप काळ टिकतो, तुमच्या स्मृतीत राहतो, अगदी ताजा तवाना असा.


काही दिवसांपासून मोगरा आल्यासारखा बहराला आहे, जेथे तिथे, सर्वत्र. माझ्या बाल्कनीत आहे, माझ्या वर, खाली, आजू आणि बाजूला देखील. जगावेगळा सुगंध घेऊन तो नटाला आहे. कुठलेही कुंजूशी न करता तो तो सुगंध वाटतोय सर्वांना आणि सर्वदूर. सर्वदूर नेण्यास मंद वारा त्याला साथ देतोय. हवा / वारा ज्याच्या अदृश्य भव्य दिव्य शक्ती पुढे मी निःशब्द होते, नतमस्तक होते तो ह्या सुगंधाला सातत्याने माझ्या पर्यंत पोचवतो आहे, आपणहून, न सांगता. आमच्या घराला भल्यामोठ्या खिडक्या आहेत, प्रत्येक खोलीत, सर्वत्र, भरपूर अश्या. त्यामुळे मी कुठेही गेली तरी सुगंध हजर. वर्षातून एकदा तो अनुभवायला मिळतो आणि काही दिवस फक्त. त्यामुळे मी तो मनाच्या गाभाऱ्यात सांभाळून ठेवण्याचा प्रयन्त करते आहे. माझा सकाळचा अबोल गजर आहे तो. चौफेर नृत्य करतोय जसा, असा तो सुगंध माझ्या आधी पोचतो त्या ठिकाणी आणि रोमांचित करून सोडतो. कुठलाही भलता, वेगळा, निरूपयोगी, त्रासदायक ई. विचार मला स्पर्श करण्याआधी. कित्ती करावं कोणी माझ्या साठी आणि का? कित्ती म्हणजे कित्ती शिकण्या सारखं आहे ह्या जोडगोळी (हवेच्या स्पर्शामुळे किंवा स्पर्शाने मोहून वाहिलेली हवेमुळे) कडून, देवा. ह्याची परतफेड होणार का माझ्या हातून? इवलेसे रोप लवियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलाला...

मोगऱ्याला तोड नाहीच. त्या नंतर "तो" माझ्या साठी मुक्तहस्ताने मातीचा सुगंध पसरवतो, मग येतो जाईचा आणि इतर मनमोहक दरवळ, मृदगंध, आमोद, परिमल... ह्यांची श्रुंखला सातत्याने मला "पुढचे पाऊल" टाकायला लावतेच.  

शनिवार, १६ मार्च, २०२४

पहा - वाचा - ऐका


मी अगदी शाळेत असतांना पासून अनेक जणांकडून ऐकलं होतं हि घरी महाभारत सारखा ग्रंथ ठेवायचा नाही. किंवा सारथी+मागे कुणी बसलेला / उभा असलेला असा रथ पण वाळू वापरून केलेली कलाकृती असे देखील घरी करून ठेवायचे नाही. त्या वेळी का कुणास ठाऊक पण "असे का?"हा प्रश्न कधीच मी विचारला नाहीच. मोठे म्हणताहेत ना मग नाही करायचं, एवढं ठाऊक होतं. 


एवढ्यातच मला हे असं का नाही करायचं ह्याचं गमक समजलं. अर्थात हे फक्त एक कारण असेल पण ते फार महत्वाचे असे कारण आहे. माझ्या लहानपणी वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, वाचनालय, मैदानी खेळ, नाटकं, विविध संगीताचे कार्यक्रम ई. अशीच करमणुकीची साधने होती. त्या काळी काहीही म्हणावं पण सर्वत्र स्वथता होती. नकारात्मक असे काही वाचले जायचे नाही, कानावर पडायचे नाही आणि अनुभले जायचे नाही. 


पण जेव्हा पासून टीव्ही चे आगमन झाले तेव्हा पासून सगळं गडगडलं. अर्थात प्रत्येकाने काय बघावं आणि काय नाही ह्यावर नियंत्रण असले पाहिजे, पण तसे होतांना दिसत नाही. इतक्या वाहिन्या, इतकी चढाओढ आणि बहुतांशी प्रत्येक ठिकाणी रडणं, गळा काढणं, वचपा काढणं, ह्या मार त्याला झोड, ह्याची जिरवणे, खून, आणि ते रंजकतेचा अतिरेक करून वाढवून दाखवणे. भीतीदायक प्रकार फार प्रचलित आहे सगळ्या वाहिनीवर. "लव्ह इज इन एअर" असे जर सगळे सर्वांशी प्रेमाने वागले, बोलले, चर्चा केले, कृती केले तर सर्वत्र आनंद पसरेल. अगदी तसेच सध्या सर्वत्र तिरस्काराची भावना फारच फोफावते आहे. ती कोणी प्रत्यक्ष दर्शवतो नाही तर बरेच जण मनात ठेवून जमेल तेव्हा शाब्दिक तलवारी बाहेर काढतात, किंबहुना त्या तय्यारच असतात, गरज असो किंवा नसो. अनेक जणांचा हा जन्म सिद्ध अधिकार आहे कि फक्त दुसऱ्याचं उणंदुणं काढणं, बास. एक राक्षस गण असतो ना, त्या व्यक्तीची अशी कृती दिसते नेहेमी. 


टीव्ही नव्हता, वाहिन्यांचा सुकाळ नव्हता, सातत्याने दुःख घराघरात पोचलं नव्हतं तो वर सुदृढता होती सर्वत्र. आणि आता हे सगळे हुशार मंडळी उत्कृष्ट उपलब्ध, जगभरातील माहिती देणारे मनोरंजन करणारे कार्यक्रम का बघत नाहीत, ज्यामुळे ज्ञान वाढतं, मनोरंजन होतं शांत पणे. अगदी दुर्मिळ चित्रपट, गाणी, गाण्याचे कार्यक्रम, प्राण्यांवर केलेले चित्रपट, आणि असे बरेच प्रकार पहिले पाहिजेत, फक्त आणि फक्त आपल्या घरात, त्यामुळे समाजात सौख्य टिकून राहावं म्हणून. टीव्ही हे एकाच माध्यम नाही आजकाल, इतरत्र सर्वत्र तेच, मग ते मोबाईल चे माध्यम असो नाही तर संगणक. हे ह्या क्षणी थांबणं अत्यावश्यक आहे पुढचा ह्रास थांबण्यासाठी, सगळ्याच पातळीवरचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक ई. पाऊले उचला आणि जमल्यास बाकीच्यांना प्रबोधन करा. 

गुरुवार, १४ मार्च, २०२४

मूळ


काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो, तेथे टिपलेला हा छोटेखानी प्रसंग. एक चौकोनी कुटुंब आले होते, २ एक वर्षांचा मुलगा, आई बाबा आणि अगदीच साधारणतः एक-दीड महिन्याचे पिल्लू, प्रचंड गार वातावरणात दोन तास, कोरी कोवळी बाळंतीण, अगदी शांत पणे यथेच्छ दोघांचं जेवण सुरु होतं. एका मागोमाग एक असे अनेक पदार्थांची रेलचेल. मोठ्या मुलाला स्टॅण्डवर मोबाईल लावून दिला होता, तो त्याला जमेल तसे अर्धे पोटात आणि बाकी जमिनीला भरवत वेळ घालवत होता. माझ्या चार डोळ्यांनी दिसले सहज म्हणून आश्चर्य वाटले. काय हे? आणि कशासाठी? गरज आहे का? बरं ते तिथलं खाणं हे मंगोलियन / चायनीज अश्या पद्धतीचं होतं जे सुधृढ माणसाला जरासं वेगळंच पचायला. जड म्हणायला हरकत नाही, वेगळ्या धाटणीतले मसाले, उग्र आणि आपल्या सारख्या भारतीयांना गरज नसलेले असे. मी फक्त सर्वांसोबत हजेरी लावली होती, घरी पोटभर व्यवस्थित जेवून गेले होते, त्या हि मुळे असेल कदाचित जास्त वेळ होता आजूबाजूला काय घडामोडी होतं आहेत हे टिपायला. मान पण धरली नव्हती त्या कोवळ्या पिल्लाची आणि ते अश्या ठिकाणी आले होते. चव बदल म्हणून आले असते तर एखाद वेळा अगदी ०.०००००००१ टक्के मी समजले असते जर ते काही तरी तोंडात टाकून झटदिशी निघून गेले असते. पण नाही हो. आणि असं कधीही घडायला नको पण जर समस्या उद्भवल्या दोघांना (बाळंतीण आणि बाळाला) तर डॉक्टर दोषी. मुळात काय काय चुकलं किंवा काय टाळणं आवश्यक होतं हे लक्षात येणं अतिशय अवघड. एकदा झालेला बिघाड मग ठीक करायचं का टाळायचं हे सांगणे नको. कशाला पैसे देऊन बाहेरचं खाऊन व्याधींना आमंत्रण द्यायचं? माझ्या समजण्याच्या पल्याड आहे हे सगळं. नवीन बाळ म्हणजे फार मोठी जबाबदारी. आईच्या शरीरात प्रचंड झालेले बदल. ह्यात स्थिरता यायला वेळ द्या. घरचं साजूक, ताज सेवन करा, काही महिने जबाबदारीने नियम पाळणे अत्यावश्यक आहे, सर्वांच्या स्वास्थ्यासाठी. मग ते पिल्लू कधीही जन्माला येऊ, आमच्या किंवा आताच्या जमान्यात. "प्रिव्हेन्शन इज बेटर द्यान क्युअर" हे ध्यानात असू द्या. आपल्या भारतीय संस्कृतीत तर गरम शेक दोनदा / एकदा तरी दिवसातून बाळ बाळंतिणीला ह्याला महत्व आहे. शिवाय व्यवस्थित कान, मान झाकून ठेवणं, कमीतकमी ३ महिने घरच्या वातावरणात राहून दोघांना जंतू संसर्गापासून काळजी पूर्वक वाचवणं, बाहेरच्या वातावरण आणि इतरांच्या संपर्कात न येऊ देणं ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ह्या सर्वांना एक वैज्ञानिंक पाया देखील आहेच. मग हि शिकलेली हुशार माणसे असं का वागतात आणि खेळतात तब्बेतीशी? आम्ही त्या ठिकाणी जायच्या आधी ते वैविध्य पदार्थांचा आस्वाद घेत होते. आम्ही बाहेर पडलो तरी ते तेथेच होते. माझ्यामते ठराविक आहार, मोजक्या प्रमाणात खाणे योग्य अश्या वेळी. सर्व दृष्टीनेच "अति तेथे माती". टाळा हो. ते पिल्लू तर काहीच बोलू शकत नाही, थंडी वाजली तरी काहीच सांगू शकत नाही. इतक्या लहान वयापासून त्याला मजबूत घडवण्याची काहीही गरज नाही आणि ते साधणार पण नाहीच. खूप वाईट वाटलं मला, काहीच करता आलं नाही, हा फक्त पंक्ती प्रपंच काय तो. हे वाचून काही जण ह्या पुढे जागे झाले तरी पावलं. "अश्या घटना घडती आणि स्मृती देऊनी जाती". 

खाल मुंडी पातळ धुंडी


वर बघून चला किंवा जास्तीत जास्त सरळ बघा. गाडीवर किंवा गाडीत बसला असाल तर देखील वर बघणे सहज शक्य आहे जर चालवत नसाल तर. वैविध्य मंदिरांचे कळस, गगनचुंबी इमारती, आकाशातील नयनरम्य रांगोळी, झाडं, पानांचे रंग, फुले आणि असे बरेच काही. रांगोळ्या, झाडं, फुलं असे नैसर्गिक सौंदर्य तर सातत्याने बदलतं राहतं आणि डोळ्यांचे पारणे फेडते. कित्ती करावं त्या निसर्गाने आपल्यासाठी हो. बघा तर, त्या मोबाईल नामक अवयवात सतत डोळे घालून बसण्यापेक्षा. एकदा चाखून तर बघा म्हणजे रस निर्माण होईल आपोआप. आणखीन एक महत्वाचे कारण आहे. २०२४ ह्या वर्षी सुद्धा ते लागू आहे हे बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि ते देखील पुण्यासारख्या शहरात. खाली मान घालून गेले कि नको ते दृष्टीस पडतं. त्यामुळे समतोल साधा. मी आधी म्हटल्या प्रमाणे गाडीवर किंवा गाडीत असाल तर वर बघणे जास्त योग्य. कारण रस्त्यावर टाकलेली घाण, कचरा आणि उतारे दृष्टीस पडतं नाहीत आणि त्यामुळे मानसिक त्रास होत नाही. हे सगळे रस्त्यावर अतिउच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित आणि भल्यामोठ्या हुद्द्यावर कामं करणाऱ्यांनीच टाकले असणार. क्या बात है? सलाम त्या मंडळींना आणि त्यांच्या विचारांना. बघा वर बघणं जमलं तर, पाळा.


पायी व्यायाम म्हणून फिरायचे असल्यास जवळपासच्या मैदानात जा, बागेत जा, सोसायटीत चकरा मारा पण हि असली नको ती दृश्य बघत वाहतुकीच्या रस्त्यावर नकोच. टाळा ते. 


आता ह्या उपर कुठलाच उतारा ह्या समस्येचा मला तरी आढळला नाहीच. 

कळस


परवाच एका मंदिर समोरून जातांना माझा लेक कसा म्हणतो "हे मंदिर असं डब्यासारखं का आहे?" तो पर्यंत इतक्यांदा बघून मला हे कधीच लक्षात आलं नव्हतं. डब्यासारखं म्हणजे? इति मी. "ते फक्त चौकोनी / आयताकृती आहे, त्या वर त्रिकोणासारखं काही तरी असतं ते कुठे आहे? इति माझा लेक. "कळस?". त्यावर माझी लेक काय पट्टाकिनी म्हणाली असेल, "कळस? हा कसला शब्द ममा, कळस तर टोकाचे वागणे, बोलणे किंवा तश्या अर्थी वापरतात ना?" फार म्हणजे फार कृतकृत झाल्यासारखे वाटले मला. मराठी शाळेत न शिकता शब्द चपराख पणे लक्षात ठेवले आणि वापरले ह्यात मला प्रचंड समाधान लाभले आणि हा पंक्ती प्रपंच साधता आला. 


मराठी भाषेचं हे वैशिष्टय आहेच कि बहुतांशी प्रत्येक शब्दांचे अनेक अर्थ निघतात, जसे वापराल तसे. 


दुरून रस्त्यावरून जातांना दर्शन व्हावे म्हणून उंच कळस बांधला जातो. कळस म्हणजे वर एक टोक आणि खाली भला मोठा पाया. ह्या पायाचा आधार म्हणजे मंदिराचा गाभा. संपूर्ण मंदिराची उभारणी म्हणजे वास्तुकलेचा एक आविष्कारच, "त्याच्या" मनाप्रमाणे बांधून पूर्ण झालेला. माझ्या मते कळस किती उंच असावा, किती मोठा असावा, आतून आणि बाहेरून तो कसा सजवावा हे सगळे खूप सखल असे विषय आहेत. सिद्ध मूर्ती असलेले मंदिर, प्रत्यक्ष भगवंताचे कधी काळी वास्तव्य असेलेले ठिकाण, आणि माहात्म्य ह्या वर पण खूप काही अवलंबून असते. प्रासादिक कंपने एका उंचीवर पोचून पुन्हा आशीर्वादाच्या स्वरूपात भक्तांवर  वर्षाव होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अर्थात ती कंपने आजूबाजूच्या परिसरात पसरून प्रत्येकाला पोचत असणारच. 


कळसाचा महिमा अगाध, म्हणूनच त्याचे मनःपूर्वक पूजन देखील केले जाते. प्रत्येक धार्मिक ग्रंथ किंवा पोथी मध्ये सरते शेवटी एक कळसाध्याय असतो. संपूर्ण पोथीचे ते सार अतिशय वेगळ्या धाटणीच्या गुंफले असते. 


राजे राजवाडे ह्यांचा काळ जेव्हा होता तेव्हा काही मुकुट असे टोकदार पद्धतीचे तय्यार होत, कळसाच्या अकरा समान. माझ्या मते बंगाली लग्नांमध्ये नवऱ्याला पण खास पद्धतीचा टोक असलेला मुकुट घातला जातो. आणि असे टोकदार मुकुट प्रत्येक व्यक्ती घालण्याच्या लायक नसतो. राजा हा एकाच असतो, आणि बाकी सगळी प्रजा. तसेच लग्नात नवऱ्या मुलाला काही काळ तो सन्मान असतो. ह्या वरून जर म्हटले कि कळस म्हणजे टोक, तर वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात, रहस्य जपण्यात, चाणाक्ष पणा दाखवण्यात, आणि इतर वेळी माणूस ते गाठतो, अर्थात चांगल्या किंवा वाईट पद्धतीने. माणसाची ख्याती सर्वदूर पसरतेच, संगणक आणि तंत्रज्ञान आता आहे म्हणून नाही, तर नव्हता त्या वेळी सुद्धा. मग ती ख्याती त्याच्या उत्कृष्ट कामाची पावती असो नाहीतर वाईट. आपल्या कार्याने कीर्तिमान झालेले व्यक्ती जसे सहज सामान्यांना भेटत नाहीत, दूर राहणे पसंद करतात किंवा सोप्पं नसतं ते त्यांच्या सामर्थ्यामुळे. तसेच वाईट गोष्टीचा कळस गाठलेले आणि माहिती असलेले व्यक्ती चार हात दूर ठेवणेच उचित, नाही का? 


तात्पर्य हे कि अध्यात्मिक, भक्कम, न ढळणार, साजेसा असा पाया रचा, देवळासारखी कळसाची उंची गाथा, त्याच्या सारखे कार्य करण्याचा प्रयत्न करा, आतून बाहेरून सुबक सुंदर रुपडं निर्माण करा, सर्वांना बघावंसं वाटेल असं, त्या कडे बघून शिकावंसं वाटेल असं. वैचारिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक सत्संगत कशी वृद्धिंगत होईल ह्या कडे प्रकर्षाने लक्ष द्याच. 

बुधवार, १३ मार्च, २०२४

हे आणि ते टाळा


मी काही आधुनिक संत आणि त्याच्या संस्था असं सांगतांना ऐकले आहे कि बाहेरचे खाणे संपूर्णपणे टाळावे. अर्थात त्यांचे अनेक नियम आहेत, हा त्या पैकी एक. मी अगदी मनःपूर्वक हे मान्य करते कारण कोणी सांगण्याची वाट न बघता मी हे बहुतांशी पाळतेच माझ्या पुरते, बाकीच्यांना वेठीस न धरता. पण माझा आग्रह नसतो. गरज पडल्यास, प्रवासात किंवा बाहेर गेल्यावर मग थोडेसे आपले नियम बाजूला ठेवावेच लागतात. भूक लागली आणि मी जर घराबाहेर असेल, बरोबर असलेले खाद्य पदार्थ संपले तर मग बाहेरचे घेऊन भूक शमवावीच लागते. त्या वेळी अजून काही गडबड होण्यापेक्षा काही तरी हलके फुलके खाऊन घेतलेले बरे. अर्थात ह्या आधुनिक संतांचे असे म्हणणे आहे ह्या नियमामागे कि तो स्वयंपाकी, किंवा वाढपी आजारी असेल, त्याला भूक लागली असेल तर तो इच्छेचा मसाला पदार्थात डोळ्यांमार्फत सामील होतो आणि त्याचा सेवन करणाऱ्याला त्रास होतोच. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात पण मग हे लागू आहेच. आज मला अजून एक बाजू लक्षात आली. नवीन आणि आकर्षित रचलेली कोरी चारचाकी, दुचाकी, एखाद्याचे सुबक सुंदर बैठे घर, साडी, दागिने, एखाद्याची शरीरयष्टी, केशरचना, अंगकाठी, व्यापार, दुकान, भरभराट, लाभ, आणि असे अनेक पैलू आहेत ज्याला पण दृष्ट लागू शकतेच. शेवटी नजरेचा खेळ आहे तो. कोणाला कधी काय सुंदर दिसेल किंवा खुपेल हे सांगता येत नाहीच. एवढाच कशाला शेतीतले पीक, फळांनी लगडलेली बाग, मोहोरांनी भाहरलेली आमराई, फुलांची रंगरंगोटी, एखाद्याच्या हातातील कला, काहीही म्हणजे काहीही ना दृष्ट लागू शकतेच. मला हे असं का मिळाले नाही हा सहज मनात उद्भवणारा प्रश्न आहेच. खूप मोठ्या पातळीवर असलेला साधक (एखादाच) असं काही मनात आणणार नाही, किंवा त्यांच्या मनात असं येणार पण नाही, कौतुकाने डोळे भरून येतील. पण अशी पातळी गाठणे प्रत्येकाला अशक्यच. जसं बाहेर खाणे आपण सहज टाळू शकतो पण बाकी नाहीच. त्यामुळे "एक मस्तक आणि दोन हस्तक" अगदी सातत्याने जोडा, नतमस्तक व्हा, लाभलेल्या प्रत्येक क्षणासाठी, वस्तू साठी आणि बाकी सर्वांसाठी आणि जास्त विचार न करता, दुसऱ्याला न दुखावता, कोणाचे नुकसान न करता मार्गक्रमण करत राहा. बिनधास्त जागा आणि जगू द्या. 

आव्हानात्मक


चित्रपटात किंवा कुठलाही अभिनय करणं आजकाल फार आव्हानात्मक झाले आहे कारण त्या भूमिके व्यतिरिक्त नाच, गाणे, मारामारी, विविध गाड्या चालवणे, एकदमच सुधृढ दिसणे आणि असे बरेच पेहेलूवर कामं करावे लागते आणि त्यात निपुण असावे लागते, तरच त्या व्यक्तीची चलती राहते, किंबहुना राहण्याची संभावना असते. 


अगदी तसेच व्यापार करणे ह्या जमान्यात म्हणजे अतिशय जोखमीचे कामं आहे. पैसे, गुंतवणूक, ग्राहक, नाविन्यता, उपयुक्तता, गुणवत्ता, किंमत आणि बाजारात टिकून राहण्याची खुबी अत्यावश्यक आहे. हे सगळं तर ज्यांच्या रक्तात व्यापार आहे ते करतातच. पण आताशा "शार्क टॅंक" नावाचा एक खेळ किंवा कार्यक्रम दाखवला जातो टीव्ही वर ज्यात वैविध्य अतिरथी महारथी विराजमान असतात. त्यांना काही मिनिटात व्यापार समजावून सांगायचं असतो. त्यांना पटेल / रुचेल आणि ते गुंतवणूक करायला तय्यार होतील अश्या पद्धतीने. पीच म्हणजे  नाटुकली करून दाखवायची असते साभिनय. चापरख शब्द, काही म्हणी, शब्द फेक, सुरवात मध्य आणि शेवट अशी पकड, भाषेवर प्रभुत्व, दिसण्याकडे लक्ष, आणि हे सगळं व्यापार संबंधी फक्त, चटदिशी गळी उतरवायचं. हे करते वेळी किंवा आधी जे पुढे बसलेले असतात त्याचा अभ्यास करून यायचा म्हणजे कोणाला काय आवडेल, किंवा आवडतं हे आधीच ठाऊक असेल तर त्या पद्धतीने चौकार / षटकार आयोजता येतात. बाप रे. फक्त व्यवहार माहित असून फायदा नाही तर खूप काही जाणून घेऊन मग खेळ मांडावा लागतो. सतर्क, जागृत, दक्ष राहून प्रत्येक निष्णाताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागतात. हे सगळं करून जर पदरात काही पडलं तर तेथून मग खरा मोठा खेळ सुरु होतो. त्यात मग एवढे मोठे व्यक्तिमत्व सामील झाल्यामुळे मग त्यांच्या पैश्यांचा हिशोब ठेवणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाऊले उचलणे, वेगळ्या पद्धतीने आपल्याच उभारलेल्या व्यापाराला दिशा देणे आणि बरेच काही. हे लिहितांना पण मी दमले. कृती करते वेळी काय होत असेल. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुरून डोंगर साजरे. प्रत्येक जणांचे कष्ट महत्वाचे, छोटेखानी असोत नाहीतर मोठ्या प्रमाणावर. प्रत्येकाला आदर दिलाच पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यावरचे आभाळ अगदी वेगळेच आहे, असते. 

मंगळवार, १२ मार्च, २०२४

तो रवाना झाला


सरते शेवटी तो निघाला, नेहेमीकरता आणि मागे वळून वळून बघत, आणि त्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. इतक्या वर्षाची साथ, जीवस्य कंठश्च मैत्री, एकमेकांची झालेली सवय आणि अर्थात त्याने खूप दिले मला, त्याला देखील उत्तरात समाधान मिळाले असेल ते देखील भरपूर, न मोजता येणारे असे. प्रत्येक वेळी प्रटेक्सोबत त्याला परिणाम, फळ मिळेलच असे नाही. कधी कधी तो निरुत्तर देखील होतो कोणा कोणाच्या बाबतीत. पण माझ्या सोबत मात्र त्याला उत्कृष्ट इष्टफल साधले. "आनंदी आनंद गाडे जिकडे तिकडे चोहीकडे" असे सगळे आलबेल सुरु होते, तब्बेत सांभाळी जात होती त्याच्या मुळे माझी. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे त्याला मला सोडून जातांना झालेले दुःख. ते इतके सहज कळत होते. त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले, कधी रागावून बसला, कधी रुसला, कधी जास्त त्रास देऊन बघितला, आणि कधी दूर जाऊन बघितलं देखील तात्पुरतं, पण लागलीच पुन्हा परत फिरला देखील. कधी फारच लवकर लवकर भेटीस आला, कधी म्हणजे कधी उशीर केला नाही, अधीर असल्यासारखा. कित्ती म्हणजे कित्ती मिस करावं मला, काय हे?. शोभतं का? आधी मी पण प्रत्युत्तर म्हणून मी पण रागावले, चिडले, बडबड केली, शिव्या दिल्या, सातत्याने त्याची तक्रार केली सर्वांकडे, औषधे घेऊन त्याला हुसकावून लावण्याचा अथक प्रयत्न केला, त्याला झालेले दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला हे माहित असून देखील कि तो जायचा तेव्हा जाणारच, ते कोणालाही चुकले नाहीच. हे त्याला, मला, औषध देणाऱ्यांना, गाऱ्हाणे ऐकणाऱ्यांना सर्वांना ठाऊक होते, पण तरी सर्वार्थाने हे माझे आणि त्याचे विचलित अवस्थेत काही बाही सुरूच राहिले. आम्ही दोघे इतके एकमेकांच्या प्रेमात होतो, आंधळे झाले होतो कि आम्ही हे देखील विसरलो कि आमच्या वर पण कोणी तरी आहे, जे हे सरते शेवटी निर्णय घेणार आहेत. आणि तस्सेच झाले. त्याची रवानगी झाली. खूप हलकं फुलकं मला झाल्यासारखं वाटतंय आणि शिवाय त्याला मिस पण करणार ह्याची खात्री आहे. तो होता तेव्हा तब्बेतीची अजिबात फिकर नव्हती आता वेगळी काळजी सुरु झाली आहे. पण असे होणारच होते. आता तो कोणाच्या दुसरीच्या प्रेमात पडणार ह्याच अपार दुःख आहेच मला. काहीच मार्ग नाही. हि पण स्थिती मी अत्यानंदाने आणि परमानंदाने मी क्षणोक्षणी राहायचं ठरवलं आहे, त्याच्या सुखद आठवणीत. माझे पाय बंद पडले असतांना ६ महिने वाट बघत राहिला बिच्चारा आणि मग पुन्हा जोमाने परत आला आणि त्याच्या सगळ्या कृतीतून दाखवून देत होता कि त्याने मला कित्ती मिस केलं ते. असा हा माझा परम प्रिय सखा, सातवीपासून माझ्या सोबत होता.   

सोमवार, ११ मार्च, २०२४

तो मंत्रमुग्ध करणारा कालावधी


माझ्या मोठ्या जावेची एक गोष्ट कथन करते. प्रत्येक मुलीचे असते तसे हिचे देखील मी सहज मनात मोजले कि किती घरात वावर झाला आणि मस्त वाटलं. बहुतांशी सगळ्याच आपण ह्या ना त्या कारणांनी बऱ्याच घरात राहतो लहानपणी पासून. आधी तर वडिलांची बदलीची नोकरी असायची त्यामुळे ठराविक वेळेनंतर वेगळ्या ठिकाणी राहणे अत्यावश्यक असायचेच. कोणालाच चुकले नाही ते. जेव्हा कोणीही नवीन जागी वास्तव्याला जातात तेव्हा कोणाला चुकल्या सारखे वाटते, कोणाला किंचीत कंटाळा पण येतो, का येथे आलो? हा विचार क्षणभरापेक्षा कमी कालावधीसाठी मनाला शिवून जातो, शेजार कसा मिळेल, बाई कधी रुळेल, नवीन ठिकाणी बस्तान बसेल ना, असे एक ना अनेक प्रश्नचिन्ह सतावतात. अहो माती, वर, पाणी बदल झाला कि पशु पाखी, झाडं वेळी, फुलं, प्राणी सगळेच किंचित सामावून घ्यायला वेळ घेतातच. 


माझ्या मते, हा कालावधी फार अप्रतिम असतो, किंवा तसा घ्यावा सर्वांनी. कारण ह्या वेळी नवीन घर लावणे हे जास्त महत्वाचे असते. त्यात मग फक्त घरच्या खोल्या नाही तर जवळपासचे भाजी मंडई, किराणा वाले, छोटी मोठी दुकाने, वैद्य / आरोग्य विशेषज्ञ, बाकी कमी येणारी मंडळी कुठे स्थित आहेत, त्यांचे भाव, स्वभाव कसे आहेत, घरी कामं करणाऱ्या नवीन बायका ई. सगळेच आले. स्वतःचे घर घेतले असेल तर वस्तू पूजा यथासांग मनोभावे केली असते, भाड्याचे असेल तर छोटेखानी सत्यनारायण किंवा अशीच कलश पूजा करून प्रवेश केला असतो. त्यामुळे तो वास्तुपुरुष, किंवा ती वास्तुदेवता सुद्धा तुम्हाला सर्वांची / योग्य व्यक्तींची भेट घडवून आण्यात मोठे योगदान करत असते अदृश्य स्वरूपात. ती बस्तान बसण्याचा अवधीत मनःशांती आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी पण वातावरण निर्मिती करत असते, खुणावत असते, विविध्य स्वरूपात. ते फक्त ध्यान देऊन टीप आणि तसे वागा. नक्कीच सफलता सहज आणि पट्टाकिनी तुमच्या पदरात पडेल ह्यात काही शंकाच नाही. 


आणि हेच नवीन गाडी, साडी, कचेरी, प्रत्येक ठिकाणी आपसूक होईल. भरभरून आशीर्वाद सदोदित आपल्या पाठीशी असतातच. त्यामुळे निसंकोच आनंद घ्या.   

सुंदरता


मी काही वर्षांपूर्वी एक बोधकथा ऐकली / वाचली होती, सुंदर हातांबद्दल. किंबहुना सुंदर हातांची स्पर्धा ह्या बद्दल. एका शाळेत शिक्षिका सर्व विद्यार्थिनींना ह्या अनोख्या स्पर्धे बद्दल सांगतात आणि मला असं वाटतं कि काही दिवसांनी, दोन आठवड्यांनी ती स्पर्धा असते. "सर्वात सुंदर हात" हा खिताब देण्यात येणार असतो स्पर्धेच्या अंती. सगळ्या मुली लागतात मग लगबगीने कामाला. प्रत्येकाची इच्छा असते तो खिताब जिंकण्याची. त्यामुळे ते दोन आठवडे किंवा स्पर्धे पर्यंत चा कालावधी त्यांना हात सांभाळून वापरण्यात किंवा न वापरण्यात जातो. काही जणी खास मालिश करवतात दररोज. काही जणी दूध आणि केशर ह्या मिश्रणात हात बुडवून ठेवतात. काही जणींकडे घरचे देखील खूप प्रयान्तपूर्वक त्यांचे हात सांभाळतात सुंदरता टिकवून ठेवावी म्हणून. पण सरते शेवटी जी हि स्पर्धा जिंकते तिचे हात फारच खडबडीत असतात, त्या हातांना कधीही महागड्या क्रीम आणि केशर मिश्रित दुधाचा स्पर्श झाला नसतो. कारण त्या मुलीच्या घरची परिस्थिती फारशी धनसंपन्न अशी नसते. तिची आई चार घरची कामं करत असते पण त्या वेळी ती आजारी असल्यामुळे ह्या मुलीला घरचं, बाहेरचं आणि अभ्यास करावं लागतं / सांभाळावं लागतं. ती ते लीलया सांभाळते म्हणून तिला तो खिताब बहाल होतो. 


हि गोष्ट आज आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात दागिन्यांचा सोस आहे, किंबहुना तो कपाटात किंवा बँकेत ठेवण्याचा जास्त. सगळ्यांचा कल त्या कडेच जास्त असतो. कारण आपण त्याला एक ठेव / गुंतवणूक म्हणून जास्त भाव देतो किंवा बघतो. ते अंगावर घालण्यावर किंवा सोन्याचे पाणी जावं म्हणतात नेहेमी अंगावरून ह्या कडे थोडसं कमी लक्ष असतं. सुरक्षेततेच्या दृष्टीने योग्य आहे ते. पण मग काही तरी छोटेसे तरी अलंकार घालावे ना शक्य असल्यास. घरची कामे तर कोणालाच सुटली नाहीत. मग काहींचं म्हणणं असं असतं कि दागिने मग खराब होतील वापरल्याने. होऊदेत ना, काय हरकत आहे, पोलिश करून चकवून आणता येतात कि लगेच. किंवा घट न होता बदलून पण मिळतात. दररोज घालण्या सारखे कमी वजनाचे, कमी किमतीचे असे नाजूक दागिने घालण्याचे समाधान पण मिळते. माझ्या मते थोडेसे जुने किंवा झिजलेले दिसले म्हणजे मग त्या साठी खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर उपयोग, सदुपयोग झाला असं म्हणता येईल. त्यामुळे समतोल साधत कधी खरे, कधी एक ग्राम चे, कधी चांदीचे तर कधी खोटे घालून मिरवावे घरातल्या घरात, काहीही हरकत नाही. दिवसा ढवळ्या जवळपास गर्दीच्या ठिकाणी जात नसल्यास थोडेफार परिधान करायला काहीही हरकत नाहीच. कोणालाही न सांगता घालून तर बघा. विचारलंच तर सांगा एक ग्रामचे आहेत म्हणून. कोण चाललंय ते सिद्ध करायला. "सगळं घाला आणि मस्त राहा". जिंका. तुम्हाला आवडेल, पटेल ते करा मंडळी.  

त्या वापरलेल्या दागिन्यांना मग तो एक दुर्मिळ सुगंध लाभतो. गळ्यातलं असेल तर आईच्या / आजीच्या पावडरीचा, अंगठ्या असतील तर कणिक किंवा भाज्यांच्या पिठाचा, ह्या सर्वांशिवाय एक प्रेमाचा आणि आशीर्वादाचा. जो कुठेच कधीच लाभणार नाही. त्यामुळे वापर, सांभाळा आणि पुढील पिढीला सुपूर्त करा. 

शनिवार, ९ मार्च, २०२४

बाळ


हा शब्द मनात आला किंवा उच्चारला कि आपल्या डोळ्यासमोर एक पिटुकलं, गोंडस, सर्वांशी सामावून घेणारं, धडपडणारं, नवनवीन शिकणारं आणि त्याच्या बाल लीलांनी मोहवून टाकणारं असं पिल्लू उभं ठाकतं. पण आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीत अनेक प्रकारे मुलांना संबोधण्याची सवय आहे. मग त्यात अनेक टोपण नवे ठेवण्यात येतात किंवा सहज ठेवली जातात. आई (माझ्या सारखी) माझ्या मुल्लांची इतकी सुंदर आणि छोटीशी नावे असतांना त्यांना जे मनात येईल ते, न ठरवता हाक मारते. कधी कधी तर मुलगा आणि मुलगी ह्यांना एकाच नावाने आवाज देते, लिंग वगैरे न बघता. तर अनेक पिढयांपासून एक प्रथा चालत आली आहे ती म्हणजे बाळ ह्या नावाने मुलाला हाक मारायची. मग तो बाळ कितीही मोठा झाला तरी. आणि हो फक्त घरचे ह्या अश्या खास बाळाला एकेरीने हाक मारू शकतात, बाकी मग त्याचेच अजून एक प्रतिरूप बाळासाहेब असे संबोधतात, अगदी मानाने, अत्यंत आदराने. आज मला अचानक ह्या मागचा उल्लेख समजला. म्हणजे बाळ हे टोपण नाव ठेवावे हे ज्यांच्या मनात आले ते का? हे उमगले मला. माझ्या दृष्टीने आणि अनेक असे मुलं (मुली नाही बरं का मंडळी) बघितले, पहिले, अनुभवले आणि अचंबित झाले म्हणून हा पंक्ती प्रपंच. अर्थात अपवाद सर्वत्र असतातच. त्यामुळे क्षमस्व. कोणालाही दुखावण्याचा इथे इरादा नाही माझा. 


असं म्हणतात ना कि "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" आणि अर्थात घरचे थोर मंडळीच नामकरण करतात, लहान सहन नाही. ज्यांनी जग बघितले आहे, ज्यांना समाजाची व्यवस्थित माहिती आहे, स्वभाव बघितले कि लक्षात येण्याची लकब आहे असेच नाव ठेवतात मुलाचा जन्म झाला कि. तर ह्या अश्या थोर अधिकारी मंडळी

जेव्हा एखाद्या मुलाला बाळ असेच म्हणतात तेव्हा लक्षात घ्यावे कि हे काय प्रकरण आहे ते आणि चार - आठ - सोळा हात दूरच राहावे. हे जन्मलेलं व्यक्तिमत्व कधीच मोठं होणार नाही, सातत्याने कुरबुरी करत राहणारच, सगळ्या सोयी सुविधा "त्याने" सहजी प्रदान केल्या तरी देखील हे साहेब असमाधानी आणि कुरकुरच करत राहणार हि "काळ्या दगडावरची पांढरी रेष". त्यांच्या सोबतच्या कोणालाही म्हणजे कोणालाच कधीच कुठलेही समाधान, शांतता, आनंद मिळवू देणार नाहीच अशीच प्रतिज्ञा घेऊन भलं मोठं आयुष्य जाणारे असे महानुभाव. बरं झालं नवीन पिढीत हे असले टोपण नाव ठेवण्याची प्रथा बंद पडली कारण मुळात हि पिढी ह्या बाबतीत फारच सुधारलेली आहे. आपलं बघणारी आणि कुणाच्या अध्यात मध्यात न करणारी अशी सोर्टेड. पुन्हा एकदा सांगते काही अंशी आऊट लायर्स असणारच पण ते नगण्य आहेत.  

ये कहा आ गये हम


श्रावणी सोमवार, महाशिवरात्र ह्या दिवशी हमखास "बेल फुल वाले" अशी आरोळी ठोकत सायकल वर भल्या पहाटे तरुण मुलं येत असतं. त्या वेळी आमच्या नागपुरात आणि गल्लीत फक्त बैठे बंगले होते. फ्लॅट ह्या धारणेची सुरवात झाली नव्हती. त्यामुळे अगदी दारात १०८+ बरीच बेलाची पाने, पांढरी फुले आणि दुर्वा असे सगळे साग्रसंगीत पुड्यात मिळत होते. श्रावणी सोमवारी तर बहुतांशी पाऊस असायचा त्यात हि मुलं भिजत यायची आणि खणखणी आवाजात सर्वांना उठवायची. बहुतांशी माझ्या शिस्तीनुसार आदल्या दिवशीच मी हार वाल्याकडून सगळं आईला आणून दिले असल्याचे पण ह्या मुलांच्या कष्टाला मी मनःपूर्वक अजूनही सलाम करते. स्वच्छ वाळू आणून मी आईला देत असे. त्या वाळूचा महादेव अर्थात पिंड ती करायची आणि भक्ती भावे जप आणि पूजा. त्यात माझा खारीचा वाटा, मीपण तिच्या सॊबत बेल वाहणे, सर्व तिला आवडेल अशी तय्यारी करून ठेवणे, दारात साफ करून रांगोळी काढणे सणाला साजेशी, तोरण आवश्यक असेल तर ई. ती सातत्याने करत असल्यामुळे आणि त्यावेळी सर्वत्र मराठमोळं वातावरण असल्यामुळे हे मला करता आलं. अर्थात सहज ते संस्कार झाले आणि मला आवड निर्माण झाली. शाळा, महाविद्यालय आणि त्या नंतर नोकरी सांभाळून माझ्या हातून हे सगळं घडलं. संपूर्ण वर्षभर भरभरून पूजा, सण, व्रत वैकले असायचीच. त्या शिवाय शेजारच्यांकडे, मैत्रिणींच्याकडे आणि इतर ठिकाणी काही असले तर मी प्रकर्षाने हजार, सर्वात प्रथम आणि शेवट पर्यंत. सर्व कामांना अग्रगणी. कधीच नाही म्हंटले नाही कधीच कमी पडले नाही. सर्व आवडीने करायला जमलं मला. कसे ते ठाऊक नाही. अगदी समजायला लागल्यापासून ते स्नातकोत्तर शिक्षणासाठी जाईस्तोवर सगळं म्हणजे सगळं अथ: पासून इति पर्यंत घडलं. आत्ता समजतंय पंचपक्वान्नांचा नैवेद्यापासून ते मंगळागौरीच्या आवाक करून देणाऱ्या सुशोभी करण्यापर्यंत सगळं हिरीरीने का झालं ते. "त्याला" ठाऊक होतं कि लग्नानंतर फार काही घडणार नाही आहे हिच्या हातून. फ्लॅट संस्कृती येणार, जबाबदाऱ्या वाढणार, संपूर्ण वेळेची नोकरी असणार त्यामुळे त्या उत्कृष्ट पहिल्या फेज / पडावात सगळं झालं. मनःपूर्वक समाधानाने आणि कौतुक करत. त्याच्या प्लांनिंग ला सलाम. त्यामुळे आता जास्त काही घडत नाही ह्याच फार मनाला वाईट वाटत नाही. भरभरून सगळे अनेक वर्ष उपक्रम, कार्यक्रम उपभोगले, आठवणी ताज्या राहतील इतके. त्यावेळी तर क्षणोक्षणी फोटो काढणे नव्हते त्यामुळे सशक्त मेंदूत जसेच्या तस्से ते उभे आहेत आज देखील. अर्थात मी माझ्या आई सारखं सगळं केलं असतं तर माझ्या मुलांना ते आपसूक आलं असतं पण असो. सगळंच साध्य करता येत नाही, मला तर जमले नाही. 


बहुतेक सगळं सोडून दिल्यामुळे, तब्बेतीची कारणे म्हणा किंवा बाकी गोष्टींना जास्त महत्व दिल्या गेल्यामुळे मला "ये कहा आ गये हम..." असं वाटतं बरेचदा. "बदल हाच नेहेमी स्थिर असतो म्हणतात (चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट", असं मी स्वतःला समजावते, दोन हस्तक एक मस्तक वापरून नतमस्तक होते. 

उपवास


उपवास करावा तर माझ्या आईनेच. दोन प्रकार मी तिचे बघितले आहेत. एक म्हणजे त्या वेळी सर्व प्रवास बहुतांशी रेल्वे नी होत असे. तेव्हा ती आदल्या दिवशीपासून काहीही खात पीत नसे. आणि संपूर्ण प्रवासात पण नाहीच. इतके नियंत्रण स्वतःवर म्हणजे मला त्यावेळी खरंच कमाल वाटायची. 


सणवार असले, मोठी एकादशी, महाशिवरात्री, वटसावित्री ई. दिवशी ती सर्वांसाठी उपवासाचे पदार्थ तर करत होतीच, शिवाय जर गरज पडली तर साधा स्वयंपाक पण होत असे. एवढं करून देखील ती अगदी शास्त्र म्हणून फळ, ताक, लिंबू सरबत, भाजलेले रताळे किंवा खजूर-तूप असे काही तरी सेवन करत होती. "एकादशी दुप्पट खाशी" असं तिने कधीच म्हणजे कधीच केले नाहीच. काय करण होते माहित नाही, पण ती उपवासाच्या दिवशी औषध पण घेत नसे. तिची काय श्रद्धा होती, किंवा काय विश्वास होता ते तिचं तिलाच ठाऊक.  


तेव्हा पासून नकळत म्हणायला हरकत नाही पण ती दीक्षित पळत होती, किंवा पाळलं जायचं तिच्या कडून. तिची साग्रसंगीत पूजा झाल्याशिवाय ती काहीही खात नसे दररोज. दोन वेळा चहा, सुकामेवा, फळं आणि दोन वेळा साधं घरचं ठराविक प्रमाणातच, अधाश्यासारखं कधीच नाही. लग्न समारंभात देखील लग्न लागल्यावर दिलेला पेढा. बास. तिचे असे अनेक उपवास प्रकार होते. डायट म्हणून नाहीच पण तिची एक शिस्त होती. तशीच आपण देखील पाळूयात. घरचे ते सेवन करू या, आपल्या शरीराचे ऐकुया आणि स्वस्थ राहू यात. चला तर मग. 

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

उभे राहा


काल मी "कौन बनेगा करोडपती" चा एक भाग बघण्यात मग्न होते, त्याचा पुरेपूर आनंद उपभोगत होते. ती खेळाडू हिमाचल प्रदेशातून आली होती. तिच्या AV मध्ये म्हणते कशी कि पहाड / डोंगर तिच्या हिमाचल प्रदेशातले बर्फ असो नाहीतर भरपूर पाऊस किंवा कुठलेही वातावरण नेहेमीच ताड माड उभे राहतात नेहेमीच, कधीच तक्रार नाहीच. 


इतक्यात आमच्या पुण्यात सगळीकडे रस्त्यांचे सुशोभी करण सुरु आहे. त्यात भर वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अप्रतिम रंग संगतीचे फुलांची झाडे लावली आहे. आणि ती ज्या दिमाखात बहरलेली आहेत, ज्याचं नाव ते, भन्नाट अशी. इतकी धूळ, प्रचंड ऊन, सततची रहदारी, वाहने, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण पण ते त्यांचा स्थायी भाव काही सोडत नाहीत, खूप म्हणजे खूप फुले फुलवून येणा जाणाऱ्यांना आनंद मुक्तहस्ते वाटतात. अहाहा च. "काय वर्णू तव गूण....". नाहीतर अतिहुशार माणसे, अगदी छोट्या छोट्या कारणाने रुसून फुगून बसतात, उणेदुणे काढतात, तक्रारी तर विचारू नकाच. माणसांनी ह्या डोंगरा एवढं मोठ्ठं व्हावं आणि फुलांसारखे रंग उधळावे, म्हणजे दुसऱ्यांसाठी नेहेमी उदाहरण म्हणून कार्यरत राहिल्यामुळे मग तक्रारींना वाव मिळत नाही, वेळ नसतो काही निरूपयोगी करण्यासाठी. चला तर मग झाडांचे / वृक्षांचे, फळ आणि फुल झाडांचे (रस्त्यावर भरलेले खास करून), डोंगर दर्यांचे आणि इतर सगळ्यांचे काही गूण अंगिकारुयात हळूहळू आणि आपले एक मस्त व्यक्तिमत्व घडवू यात, उभे करू या. म्हणजे मग तुमच्याकडून इतरांना प्रेरणा मिळेल भरभरून अशी.  

गुरुवार, ७ मार्च, २०२४

(ना -> आ) वडती


साडी नेसणे म्हणजे फार प्रताप वाटायचं मला. जरा जास्त होतं असे मला. ड्रेस कसा चढवला कि झालं असं साडीच नाही त्यामुळे असेल कदाचित आणि त्याची उठाठेव फार, हे आणि ते देखील पाहिजेच. पण आता नाही. हा बदल का आणि कधी झाला हे मला माहित नाहीच मुळी. पण अर्थात हलकी फुलकी साडी हवी सहज नेसता येण्यासारखी आणि सांभाळता येणारी. कारण मला ती नेसून शिकवायचं पण असतं. इथून तिथे जायचं असतं, वर्गात फिरायचं असतं आणि बरेच काही. पण आताशा एकदमच भावली मला ती. हे कित्येक वर्षांपासून म्हणत होते कि एक शिक्षिका म्हणजे साडी आलीच. पण तेव्हा ती आणि एकंदरीत सगळी प्रोसेस नावडती होती जी आवडती कधी झाली हे समजलं नाहीच. आता अजून एक प्रयोग करून बघावा म्हणते. जेव्हा जेव्हा क्लास घ्यायचा असेल तेव्हा तेव्हा पहिल्यापासून (अतः पासून इति: पर्यंत) नेसत बसण्यापेक्षा रेडिमेड आणून बघते. आवडेल ती पण कदाचित, अशक्य काहीच नाही. प्रयोग करून बघू तर. 


बाकीच्या देशातल्या मुली सहजी सातत्याने कधीच साडी किंवा सलवार कमीज त्यांच्या देशात घालून फिरतांना किंवा कामाला जातांना कधीच दिसत नाहीत. कधीतरी भारतात आल्या तर कौतुक म्हणून काही मिनिटे परिधान करतात किंवा ध्यान धारणा करण्यासाठी आल्या तर त्या दिवसांपुरत्या दिसतात भारतीय वेशात. मग आपलं सोडून भलत्याच्या पाठी का लागायचं. इतक्या वैविध्यतेने नटलेल्या साड्या आहेत, भारतीय पोशाख आहेत, मग पॅन्ट शर्ट च्या मागे च का धावायचे? मला तरी हे पटत नाही. ज्यांना पटत त्यांनी हवं तसं वागावं पण कदाचित ह्या मुळे पण माझं साड्यांवरच प्रेम जास्त प्रमाणात दृष्टीस पडतंय सध्या. इतक्या ढीगभर साड्या आहेत त्यांचा उपभोग घेते, जितके दिवस हे नवीन प्रेम उफाळून आलेलं सुरु राहतंय तेवढे दिवस राहू दे. कदाचित हेच टिकेल. काही सांगता येत नाही आणि सरते शेवटी त्यातून काही तरी मस्त निष्पन्न व्हायला हवं, आरामशीर, आरामदायक, सुखावह वाटलं कि मग मी काम करायला मोकळी. 


तुम्हाला जर असे काही डोहाळे लागले असतील, बदल नजरेस पडत असतील तर त्यांचं स्वागत करा आणि भन्नाट आनंद उपभोगा.   

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण...


अनेक जाहीरांतींमध्ये एक पेव फुटलेले दिसतंय आज काल. आणि ते म्हणजे "हिरवा चहा प्या आणि तो पोटाचा घेर कमी करा हमखास". कुठल्याही रंगांचे पेय प्या पण घेर कमी होईलच असे नाही. असा चहा प्यायला कि घेर कमी झाला असता तर मग काय हवं होतं. बाकी अजून दिग्गज मंडळी जे व्यायाम, जिम वगैरे करतात ते मग अजून काही सुचवतात. माझ्या मते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर, व्यायाम, आहार, असले रंगीबेरंगी चहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिडचिड ला हद्दपार केले तरच फक्त पोटाचा घेर नाही तर अजून बरेच काही निश्चित सध्या होईल. ज्या आपल्या माणसांबद्दल चिडणे होते, किंवा ज्या वेळी चिडायला होते ते हळूहळू बंद करा. प्रत्येक जण आपले मार्ग वापरू शकतो शांत होण्याचे. एक ठोकताळा इलाज नाही त्यावर. पण ह्याचा परिणाम नक्की, एकदा करून बघायला काय हरकत आहे. कदाचित ह्याच करता आपल्या सर्वांना शाळेत असतांना Active and Passive Voice - कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शिकवले होते. ते विस्मरणात गेले आहेत ते वापरायला लागा आणि बघा मग कसे भन्नाट बदल अनुभवता येतील ते. कुठलीही सिद्धी प्राप्त होण्यासाठी मन प्रसन्न हवेच. आणि प्रसन्न मन हे शांत डोक्यामुळे सध्या होणार. त्यामुळे आत्तापासूनच स्वतःच्या स्वास्थ्यासाठी (शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक, आणि इतर) राग शब्दकोशातून समूळ नष्ट कराच पट्टाकिनी. स्वतःचे लक्ष इतरत्र वेधून बघा, खूप कामात गुंतवा, काम आनंदाने पार पद, थोडासा उशीर झाला काम संपवायला तरी हरकत नाही, आप्स्वकिय म्हणजे पंचिंग बॅग नाही हे विसरू नका, राग आला तर त्या व्यक्ती ची चांगली बाजू आठवा किंवा अजून काही करा पण बाहेर पद. एकदा सवय कराच, न रागावता पण जगात येत सहज हे लक्षात येईल.

मंगळवार, ५ मार्च, २०२४

'उपसर्ग'


आता हि प्रथा नाही पण आधी होती. कुमार आणि कुमारिका असे मुलांच्या नावाआधी वापरले जायचे. पण कुमारिका हे जास्त प्रकर्षाने उपयोगात येणारे असे होते, मग ते लिहितांना असो किंवा वापरात. किंबहुना मुलींना त्या काळी कु. अमुकतमुक असे लिहावे लागायचे. पण कुमार अमुकतमुक हे मी कधीच पहिले नाही, पाहण्यात आले नाहीच. अनेक वर्ष कुमारिका म्हणून मिरवायचं आणि मग एक दिवशी अचानक हे हक्काचे शीर्षक तिच्या कडून काढून घेतले जेते, तिला काहीही समजायच्या आधीच कारण नवीन वाढलेले त्या पेक्षा अनपेक्षित आणि वेगळ्या स्वरूपाचे असते. ह्या बदलाशी सामावून घेत नाही तर अजून एक आव्हान समोर उभे टाकायचे आणि मग भलं मोठं शीर्षक मिळायचं अगदी मोजक्या दिवसांसाठी "चि. सौ. का.". एक घटिका आणि ह्याचे फक्त "सौ." त रूपांतर व्हायचे. ते शेवटपर्यंत टिकायचे नाही तर मग श्रीमती. बाप रे. काय हे. 


हे तेव्हा काय कमी होतं तर आधी कु. मुलीचे वडिलांचे नाव आणि आडनाव. मग ज्या मुळे संपूर्ण जगाला तुमची ओळख असते तेच समूळ बदलले जायचे, सौ. नवीन नामकरण नवरायचे नाव आणि सासरचे आडनाव. एकदा नव्हे तर दोनदा बारसे होत असे मुलींचे. अगदी समजायला लागल्या पासून तो अभिमान म्हणजे नाव, किंवा ते नाव म्हणजेच मी हे सोडून नवीन नावाशी जुळवून घ्यायचे. संपूर्ण शिक्षण आणि प्रमाणपत्रे मिळवलेली जुन्या नावावर सोडून द्यायची किंवा फक्त स्मुर्तीत जपून ठेवायची. सातत्याने एका प्रश्नाचे उत्तर द्यायचेच "तू आधीची कोण? माहेरचं नाव काय? आई वडिल कुठले? ई." अर्थात घरच्यांनी, दारच्यानी, शेजारच्यांनी, समाजाने ते खूपच सोप्पं आणि सुकर करून टाकलं होतं सातत्य राखून, उठ सुठ तेच ते बिंबवून. आणि अर्थात मुलींची ध्येये पण वेगळ्या स्तरावरची असल्यामुळे हे नगण्य ठरवून त्या देखील सातत्याने "पुढचे पाऊल" टाकत आणि गाठत गेल्या नेहेमीच. माझे शाळेतले शिक्षक आम्हा सर्वांना "अडथळ्याची शर्यत" ह्यात भाग घ्यायला का लावायचे हे समजलं मला आत्ता. हे दृश्य फक्त महाराष्ट्रातलेच आहे बाकी इतर राज्यात कमी अधिक प्रमाणात हेच असणार पण मला ठाऊक नाही. शारीरिक,मानसिक, सामाजिक, नैतिक, वैचारिक आणि नैमिक पातळीवर भरपूर, अविरत, अथक आणि निरपेक्ष काम करावे लागत होते. आता सगळेच बदलते आहे, त्या करता सर्व स्तरावर मुलींनी विडा उचलला आहे. 

कित्ती आणि काय काय समजावत पुढे जायचं ना त्या मनाला. पण माझ्या आणि त्या आधीच्या पिढीतल्या मुलींना जमलं ते. हे सगळं करता करता बरेच काही केले त्यांनी, अगदी डोंगर एवढे, नोकरी च्या ठिकाणी, समाजासाठी, कुटुंबासाठी, आणि इतरांसाठी देखील, कळत न कळत, दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे असे. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने सुचलं ते उतरवलं. बघा म्हणजे स्त्रीच्या हक्कांसाठी असा दिवस उभा राहिला, त्या मागे सुद्धा कित्ती लढाया होत्या त्या काळी. 

चला तर मग प्रत्येक दिवस आप आपल्या परीने भन्नाट रीतीने साजरा करू यात. "मस्त खा आणि स्वस्थ राहा" मैत्रिणींनो. 

शुक्रवार, १ मार्च, २०२४

उब


मला अगदी स्पष्ट आठवतंय अजूनही, जसे कि मी आत्ता सगळं अनुभवते आहे. आमच्या नागपूरच्या उन्हाळ्याविषयी लिहावं तेवढं कमीच आहे. सतत भले मोठे डेसर्ट कूलर्स सुरूच असायचे आणि दुपारी वामकुक्षी घेते वेळी सुरवातीला तो गार वारा खूप भावून जायचा पण काही वेळानंतर, झोप लागल्यावर तोच थंडगार वारा बोचायचा किंचितसा. त्या करता आम्ही आधीच सोया करून ठेवायचो आणि ती म्हणजे आईची मऊ साडी अंगावर पांघरायाची. ती माउली कधीच त्याला नाही म्हणत नसे. 


सकाळी शाळा, महाविद्यालय किंवा त्या नंतर नोकरी ह्या सगळ्या काळात सकाळी उठायचं नसायचंच मुळी मला, कारण झोप म्हणजे महा प्रिय. मग जबरदस्ती स्वतःच्या अंथरुणातून / खोलीतून उठायचं आणि थेट आईची गादी, उशी, आणि तो प्रेमळ स्पर्श गाठायचा, अनुभवायचा. ते लोळणं म्हणजे काय हे शब्दात पेरणे अशक्यच. ती उब जागावेगळीच होती. आणि प्रत्येकवेळा अनुभवता यायचीच, अनुभवायला मिळायची. 


आमच्या विश्वविद्यालयाने एक खास स्पर्धा आयोजित केली होती, अमुक दिवस अमुक योगासने करायची, त्याची माहिती त्यांना कळवायची पुराव्यासहित. मी ते सातत्याने केलं आणि जिंकले. बक्षीस म्हणून मला खप काही मिळालं आणि त्यात एक योग मॅट पण सामील होती. माझ्यामते हे २०१७ ला झाले होते. तेव्हापासून दररोज मी योग करतेवेळी त्यावर, त्या मॅटवर पाठ टेकली कि मला त्याच उबेची पुन्हा अनुभूती मिळते. जशी कि मी अजूनही खूप लहान आहे, लाडोबा आहे आणि आईच्या त्या वस्तू वापरते आहे. ह्याही मुळे मला एक प्रचंड स्फूर्ती मिळते आसने करण्याची, सातत्य टिकवून ठेवायची आणि अर्थात हे सगळं करतांना मी वेगळ्या विश्वात पोचत असल्यामुळे मला जरा जास्त वेळ लागतो आसने संपवायला. का माहित नाही पण बक्षीस मिळाली मॅट स्व कष्टाने मिळवली होती, जिंकली होती म्हणून एक वेगळा लगाव असेल कदाचित. काहीही असो, तो स्वानुभव फारच उबदार आहे. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...