मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

खाऊ

माझ्या लहानपणी एक बाबांचे स्नेही होते ते प्रत्येक वेळी आमच्या घरी येतांना मला नक्की खाऊ घेऊन येत असतं. तो खाऊ म्हणजे पर्वणीच असायची. एका छोटेखानी पुडीत कित्ती प्रकार सामावून आणायचे ते, आणि ते देखील फक्त माझ्याच साठी, कारण त्यावेळी आमच्या घरी मी एकटीच शेंडेफळ होती. त्यावेळी फक्त ती एक गम्मत होती कारण त्या पल्याड काहीही समजायचं नाही. 

इतक्या वर्षांनंतर काल पुन्हा मला खाऊ मिळाला, माझ्या माहेरहून पाठवलेला, उत्कृष्ट देखण्या पद्धतीने अगदी मनापासून घरी तय्यार करून, पॅक करून प्रेमाने पाठवलेला. कित्ती विविधता होती / आहे त्यात, गोड, किंचित आंबट, मस्त झणझणीत तिखट आणि बरेच काही. माझी सहपाठी, संशोधन करणारी, विद्यावाचस्पती च्या मार्गावर अग्रगणी अशी अप्रतिम काम करणारी श्रद्धा, तिच्या आईने माझ्यासाठी खास, आठवणीने पाठवलेला हा खाऊ. अगदी माझी पसंद लक्षात ठेऊन पाठवला. काकूंच्या मागे प्रचंड गोतावळा आहे आधीच, काकांच्या ऑफिस च्या वेळा, मुली, जावई, त्यांचा प्रचंड मोठा आणि उत्साही मैत्रिणीचा समूह, त्यांचे लाड, भरपूर येणार-जाणारा, नातेवाईक आणि बरेच असे. ह्यात माझी आवड लक्षात ठेऊन घरचा खाऊ आठवणीने पाठवणे म्हणजे एक फार फार मोठी गोष्ट आहे, शब्दांच्या पलिकडली अशी. 

सध्याच्या काळात प्रत्येकाला त्याचंच झालंय पुरे अशी परिस्थिती आहे सर्वत्र. आपलीच कामे आटपत नाहीत त्यामुळे दुसऱ्यांसाठी काहीच करणं शक्य नाही, बऱ्याचदा इच्छा असून देखील. आपलेच व्याप भरपूर पुरतात दिवसभर. त्यात काकूंसारखा मस्त उत्साहाने खळखळणारा झरा खूप काही शिकवून जातो. 

माझ्या मुलांच्या वेळी तब्बल ९ महिने + पुढचे ४ महिने मला माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी-आप्तेष्ट-शेजारी ह्यांनी अगदी पौष्टिक घराचा पोटभर आहार खाऊ घातला. खूप विविधता होती त्या संपूर्ण काळात आणि प्रचंड प्रेम झळकत होतं ते वेगळंच. त्यावेळी मी माझ्या आईला विचारलं होतं कि ह्या सर्वांची परतफेड कशी करायची? त्यात प्रत्येक जण काही बाळंतीण होणार नव्हतं, मग कधी, कसे, काय  मी त्यांच्या साठी करू? तेव्हा तिने दिलेले उत्तर आज पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवले मला. परतफेड तर व्हायलाच हवी, पण त्यासाठी बाळंतीण होणे गरजेचे नाही, किंवा त्याच व्यक्तीला काही ताबडतोब देणे शक्य नसेल तर कुठल्यातरी प्रमाणात कोणाला तरी, कुठल्यातरी स्वरूपात ते देणं अत्यावश्यक आहे. सातत्य ठेव, काही तरी नेहेमी करत रहा. आणि आता काकूंनी पण तेच प्रात्यक्षिक करून दाखवलं. आणि हे पहिल्यांदा नाही करत आहेत बरं का, हे ह्या आधी पण त्यांनी केलंय, अगदी गरमागरम पदार्थ पोटभर खाऊ घालण्यापासून. 

गिफ्ट / भेट म्हणजे काय हे माझी आई खूप सुंदर समजावून सांगायची मला. त्या व्यक्तीला काय आवडेल, काय दिल्याने आनंद मिळेल, कुठली भेट उपयोगी ठरेल ई. आणि ती व्यक्ती विचारात ठेवणे ह्या सगळ्या प्रोसेस लाच खरी भेट म्हणतात. त्या नंतर घेतलेली वस्तू म्हणजे फक्त एक जिन्नस.  

आमच्या नागपूरचं पाणी काही वेगळंच आहे ह्यात शंकाच नाही. 

काल पासून त्यांच्या हातचे खाऊन खूपच तृप्त झालंय आणि अशीच पर्वणी पुढचे अनेक दिवस मला अनुभवायला मिळणार आहे. 

लहानपणीचा खाऊ फक्त काही मिनिटे पुरायचा मला, पण हा खूप दिवस आणि आत्ता जाऊन कुठे मला खाऊचं महत्व प्रकर्षाने जाणवलं. असं कोणासाठी करण्यात काय परमानंद मिळतो ह्याची जाणीव झाली. 

काकूंच्या हातून असेच असंख्य जणांना पोटभर खाऊ घालणं घडावं, त्यांना पण त्यांच्या आवडीचं आणि चव बदल म्हणून मस्त चाखता यावं  आणि माझ्या हातून पण असं कार्य घडो हि सदीच्छा. खूप मनापासून धन्यवाद काकूंना. 

सगळेच सुगरण

(You may need to click twice for this above video to play. Tx.)

गेली काही दशके ज्या पद्धतीने मुली उच्च शिखरे गाठत आहेत त्याला मानाचा मुजरा आणि त्या सर्व कन्यकांना अत्युच्च उंची गाठण्यासाठी सातत्याने ID प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना दिसते. असं म्हणतात ना "युअर वर्क शुड स्पिक अबाउट यू, नॉट यू" / "तुमचं कामं बोललं पाहिजे तुम्ही नाही", अगदी त्या मतितार्थाने हि आणखी एक अनोखी भेट सगळ्याच सुगरण बंधू भगिनींना ID तर्फे. 

अजून एक प्रसिद्ध म्हण आहे कि मुलं आई-वडिल किंवा घरच्या थोरा-मोठ्यांकडून किंवा त्यांच्या कृतीकडे सूक्ष्म लक्ष ठेऊन असतात आणि अगदी तेच मग अंगीकारतात. अगदी तसेच, ह्या जाहिरातीतल्या घरी होतांना दिसतंय, किंबहुना हि जाहिरात बघून असंख्य घरी होईल आणि त्या सर्व मुलींना, स्त्री वर्गाला, आयांना एक सुखद विश्रांती मिळेल, ज्या योगे त्यांच्या हस्ते अजून वैविध्य स्थरावर भरपूर कार्य घडेल. 

ID एक फार उत्कृष्ट आणि विचारांती कृती करणारी फारच तरुण कंपनी आहे आणि ह्या जाहिराती जरी असल्या, ह्या जाहिरांतींमार्फत ते त्यांचा धंदा जरी वाढवत असले तरी फक्त १३ सेकंदात किती मार्मिक गोष्ट त्यांनी मांडली आहे बघा. ज्याच्या डोक्यात हि सुपीक कल्पना आली, सुचली त्याला सर्वप्रथम साष्टांग दंडवत. मला त्याला मनापासून आणि अगदी लवकर भेटायला आवडेल नक्की. ह्या मागची किंवा त्यांच्या सगळ्याच उत्पादनांच्या जाहिरातीबद्दल मला जाणून घ्यायला मनापासून आवडेल. जे इतक्या पिढ्या घरची मंडळी, मुली / सुना / आया / बहिणी ई. त्यांच्या कर्तृत्वाने जाणीव करून देऊ शकल्या नाहीत ते ह्या जाहिरातीने नक्कीच घडेल. आमेन. सर्वजण स्वावलंबी होतील, त्यांना घरच्या कामांचं आणि घरच्या जेवणाचं महत्व प्रकर्षाने कळेल हे निश्चितच.  

Tiny URL of complete post on LinkedIn:

https://lnkd.in/dFvkXNcW

Normal length URL of complete post on LinkedIn:

https://www.linkedin.com/posts/dr-preeti-mulay-536b43a9_jugaadstory13-innovation-design-activity-7026172981554950144-OC_9?utm_source=share&utm_medium=member_desktop


रविवार, २९ जानेवारी, २०२३

फोटोकॉपी

कुठलेही मुलींच्या ड्रेसेस दुकानं घ्या तेथे अक्षरशः असंख्य पद्धतीचे, रंगसंगतीचे, फॅशन चे, किंमतींचे वैविध्य प्रकार उपलब्ध असतात, किंबहुना त्यांना ते ठेवावेच लागतात धंदा सुरळीत चालविण्यासाठी, किंवा खूप गिऱ्हाईक सतत येण्यासाठी. त्यात काहीच वावगं नाही. त्या सगळ्या प्रचंड संपदेतून दोन विविध वयोगटातल्या मुलींना सारखाच ड्रेस पसंत पडावा म्हणजे दाही बोटं तोंडात घालण्यासारखं आहे, आणि किंचित अशक्यच. मी सहसा खूप कीस पाडत नाही, किमतीला पटलं, कापडाची पोत भावली, रंग आणि रूपरेषा नवीन वाटली आणि ऑफिस मधे घालण्यासारखी कि मग गरज असल्यास घेऊन मोकळं व्हायचं. माझ्या सारखी फोटोकॉपी आहे हे समजल्यावर मला प्रचंड अत्यानंद झाला. किंवा असे देखील म्हणता येईल कि आपली निवड मस्त आहे, साजेशी आहे, योग्य आणि दर्जेदार आहे. 

"#ट्विनिंग इज विंनिंग", "#कॉर्डीनेटेड ऑउटफिट्स", "#ऍन आर्ट फॉर्म", "#मिररिंग", "#सेम बट डिफरंट" ई. हे दिग्गज मानसशास्त्रज्ञ ह्यांनी विविध संशोधनातून व्यक्त केलेले वाक्यांश आहेत. आपल्या कडे बऱ्याच कुटुंबात अजून देखील जुळ्या मुलांना / ट्विन्स किंवा सख्या भाऊ बहिणींना एकसारखं घालण्याची पद्धत होती, आहे. आताशा तर विविध ट्विनिंग डे साजरे करतात मुद्दाम. पण हे जर सहज घडलं तर? दोन मुलींचे कपडे एकसारखे घेतले गेले आणि घातले गेले तर? एक तर त्याचा प्रचंड आनंद साजरा कराच, जमत असेल तर पोटभर हसा, फोटो काढा, कुठून घेतला हे विचारा सहज माहिती म्हणून आणि अशी कारणं अनेक आहेत:

१. तुम्ही दोघे एकाच ठिकाणी काम करता आणि एकसारखा विचार देखील 

२. दोघांची आवड कित्ती मिळती जुळती आहे 

३. एकच बेस / पाया / मूळ आहे ज्यावर वैचारिक इमारत उभी आहे 

४. दोघीनी विविध गुणधर्म सगळ्याच स्थरावर एकसारखं आत्मसात केलं आहे  

५. आणि असे बरेच नकळत जडण घडण झालेले मुद्दे 

६. सारखा स्वभाव 

७. एकाच परिसरात वास्तव्य 

एकच रेखांकन, सजावट, शोभिवंत नक्षिकाम असेल दोन ड्रेस वर पण रंग वेगळा असेल तरी देखील एक वेगळी मज्जा अनुभवता येतेच, यावीच, कारण हे पूर्णपणे नकळत घडलं आहे, निव्वळ योगायोग आहे, बाकी काही नाही आणि त्यामुळे दोघींच्या एकवाक्यतेचं, किंवा एकसंध पणाचे दर्शन घडले आहेत. त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही, अजिबातच. 

आताशा अजुन एक भन्नाट कल्पना राबवली आहे धंदे करणाऱ्यांनी. ती म्हणजे एकाच कुटुंबातील दोन, तीन सख्या किंवा चुलत भावांनी वेगवेगळी दुकानं चालवायची, एकाच शहरात, जवळपास च्या भागात आणि एकाच करखानदाराकडून माल विकत घ्यायचा मोठ्या प्रमाणात आणि विविध आउटलेट मधून विकायचा. गिऱ्हाईक जास्त मिळतं आणि मस्त धंदा होतो. ह्या कारणांमुळे देखील एकाच पद्धतीचे ड्रेसेस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. दोन वेगळ्या दुकानांत, दोन वेगळ्या जणी, दोन वेगळ्या वेळेला, वेगळ्या वयाच्या, वेगळ्या कुटुंबातल्या, न बोलता / ठरवता जातात काय आणि एकसारखे ड्रेस विकत घेऊन घालतात काय, अहाहा च, महद आश्चर्यच आहे हे. मस्त गोष्ट आहे आणि खूप खूप भन्नाट फोटोकॉपी देखील. 



तेव्हा आणि आता

शिकाकाई चं वास्तव्य प्रत्येक घराघरात असायचं त्या वेळी, माझ्या लहानपणीपासून. माझे, माझ्या आईचे, शेजार पाजारी राहणाऱ्या सर्व मुलींचे केस सौंदर्य अगदी मनाला भावणारे असेच असायचे. लांब सडक, दाट, काळेभोर आणि स्वास्थ्य वर्धक असे. खूपच कमी, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत जणींचे केस क्वचित कापलेले असायचे. पांढरे केस देखील फार कमी नजरेस पडायचे आणि दिसलेच तर आजींचे फक्त. किंबहुना पांढरे केस हे म्हातारपणी होत असतं तेव्हा. ह्या केशसौंदर्यामागे अनेक कारणे आहेत, त्या वेळचं वातावरण, शुद्ध पौष्टिक सकस ताजा घरचा आहार, आणि शिकाकाईचाच उपयोग. नैसर्गिक शिकेकाई म्हणजे रामबाण किंवा एकमेव जिन्नस केसांसाठी. त्या वेळी कृतीवर भर देत होते, म्हणून केसांवरचा उपाय हा वाक्प्रचार टाळला मी. कारण उपाय करण्याची गरज पडत नसे. शिकाकाई वापरात राहा, केसांचे स्वास्थ्य जपत राहा, इतकं साधं आणि सोप्प होत ते, पिढ्यांपिढ्या चालत होतं. माझ्या मते ह्या शिकाकाईत फक्त केस सांभाळण्याचे गुणधर्म नाहीत तर बाकी अजून भरपूर काही आहे. केस धुतल्यावर ते पाणी नाल्यात मिसळणार प्रत्येक घरातून आणि त्या वेळची शिस्तच और, त्यामुळे बहुतांशी रविवारी सकाळी हे घडणार आणि पुन्हा एका आठवड्याने. त्यामुळे प्रत्येक ७-८ दिवसांनी नाल्यात प्रत्येक घरातून आलेल्या नैसर्गिक औषधी युक्त पाण्यामुळे स्वच्छता आपोआप घडणारच. रविवारी प्रत्येक घरात शिकेकाई उकळली जाणार ठराविक वेळेला आणि ठराविक काळासाठी, ती वाफ हवेत पसरणार आणि शुद्ध करणार. प्रत्येकाचे इंद्रिय देखील स्वस्थ होते त्यावेळी, त्यामुळे ह्या शिकेकाई उकळण्याचा सुगंध सर्वत्र पसरल्यामुळे मग श्वास मार्ग पण उत्कृष्टच काम करणार, कारण नकळत प्रत्येक आठवड्याला मस्त सकाळच्यावेळी प्रसन्न करणारा हा ताकदवर सुगंध असायचा. कुठलेही केमिकल नाहीच कधीच त्यामुळे सर्वत्र स्वास्थ्य होतं. मोठे केस असल्यामुळे फक्त रविवारी घरी असतांना, सुट्टीच्या दिवशी उन्हात केस वाळवले जायचे, त्यामुळे सदांकदा सर्दी, त्यामुळे मग घसा, ताप, आणि हे सर्व हवेत पसरलं जायचंच नाही मुळी. त्यामुळे सगळेच स्वस्थ आणि मस्त. सर्वांना हात जोडून विनंती आहे, जमल्यास खूप प्रचंड बदल नाही, पण फक्त शिस्त बाळगा, आहे ते डोक्यावरचं सौंदर्य / जंगल सांभाळा, नैसर्गिक वापरून तर बघा, कदाचित फक्त तुम्हांलाच नाही तर खूप जणांना त्याचा फायदा होईल नकळत. कोणाकोणाला फायदा झाला हे मोजत बसू नका, वर्षभर तरी आयुर्वेद डॉक्टर च्या सल्ल्याने सुरु करा आणि केसांच्या जर असतील तर त्या समस्यांपासून संपूर्ण मुक्त व्हा, नसतील तर त्याची काळजी करणं सोडाच. ह्या सर्वांमुळे मग बाकी काही कधीच तक्रार किंवा अस्वस्थात भेडसावणार नाहीच मुळी. प्रयोग सुरु करा शिस्तीत लवकरच मंडळी.      

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

सांगीतिक पर्वणी

मी मागे एकदा लिहिल्या प्रमाणे मला लहानपणीपासून गोलगोल फिरणाऱ्या खुर्च्यांचं प्रचंड आकर्षण आहे, अजून देखील. मज्जा येते, एक वेगळं अनुभवायला मिळतं काहीतरी शब्दांच्या पल्याड असं, आनंद मिळतो ई. सध्याच्या खूप साऱ्या खुर्च्या जेव्हा मी बघते आणि वापरल्या जातात तेव्हा अनुभवते त्यावेळी अजूनच प्रचंड वेगळं वाटतं. ती माझ्या दृष्टीने एक निश्चितच "सांगीतिक पर्वणी" असते जणू. हालत्या खुर्चीचे अनेक भाग किंबहुना प्रत्येक भागच हालत असतो, चाकं, बूड, टेकण्याची कलणारी उशी किंवा मागचा टेकायचा भाग ई. सर्वच. प्रत्येकजण प्रत्येक क्षणी कुठलीतरी भलती हालचाल करतो, कोणी मागे टेकतो, कोणी फिरतो, कोणी वळतो, कोणी पुढे-मागे होतो ई. आणि ह्या सगळ्यांमुळे वैविध्य साग्र संगीत तय्यार होते. खुर्च्या नवीन असोत नाही तर जुन्या, सुरांची कमतरता नाहीच, वेगवेगळ्या धून वाजत राहतातच. मी साध्या बाकड्यांवर, मेज वर, किंवा साध्या खुर्च्यांवर बसून अभ्यास केल्यामुळे असेल कदाचित मला हे असलं संगीत जरा कमी भावतं, कधी कधी तर नकोसं वाटतं, आणि ज्वलंत प्रश्न उभा ठाकतो तो असा कि ह्या सगळ्या आवाजांचा इतरांना काहीच त्रास होत नसेल? वर्ग किंवा लॅब सुरु असतांना इतकं सातत्याने हलायची गरज असते? का पण? सातत्याने हालता येतं हा खुर्चीचा गुणधर्म आहे, त्यामुळे बसणाऱ्याची कामे सुकर होतात हा उद्देष आहे फक्त. सततचे हलणे म्हणजे अस्थिरता असा माझा समज आहे. तरी देखील का हे दाखवायला आवडतं लोकांना कि मी अस्थिर आहे, मला स्तब्ध बसणं अशक्य आहे, किंवा मी हल्ल्यामुळे कदाचित दुसऱ्यांना त्याचा त्रास किंवा अडथळा येऊ शकतो, शांतता भंग होऊ शकते ई. स्थिरता येण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा उत्साह टिकून प्रचंड काम होण्यासाठी काही तरी दणकट करायलाच हवं, अगदी थोडेसे ध्यान, श्वासाचे व्यायाम, मनन चिंतन वाचन, खेळ, आवड जोपासणं, कामाविषयी कुतूहल आणि उत्साह, काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्याची धडपड / जिद्द / आग ई. मग खुर्ची कुठलीही असो ती ना उगाचच हलणार / डोलणार / संगीत ऐकणार. चला तर मग सगळे लागू या कामाला आणि दाखवून देऊ या स्वतःला आणि जगाला.    

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एक विनंती, जमल्यास फिरत्या खुर्च्या आवाज करणार नाहीत ह्याचा तरणोपाय शोधून काढा आणि अमलात आणा पटकीनी. 


स्वभावालाच औषध असतं

मी अगदी शालेय दिवसांपासून हेच ऐकत आले आहे कि "स्वभावाला अजिबातच औषध नसतं". माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. काहीही झालं तरी इंचभर बदल घडत नाही तो म्हणजे स्वभाव. हे मी काही धड्यात वाचलं, शिक्षकांच्या तोंडून ऐकलं, वर्तमान पत्रात, गोष्टी, कथा ई. मार्फत विविध वेळा हे माझ्या कानावर पडलं. कदाचित त्यामुळे बिंबलं गेलं. मोठी होत असतांना अनेक वेळा मला वेगवेगळे अनुभव आले. त्यातलाच एक इथे कथन करत आहे. माझे एक सहपाठी होते, माझ्याच कार्यालयात काम करत होते, पण मानव संसाधन विभागात. कधीही म्हणजे कधीही सरळ उत्तर मिळालेच नाही त्यांच्याकडून किंवा नेहेमीच स्वारी नकारात्मक बोलण्यावर जास्त भर द्यायची, अगदी मनसोक्त. मी ते स्वीकारलं होतं त्यामुळे मला जास्त कठीण, अवघड किंवा अवजड नाही गेलं आणि अर्थात माझा त्यांचा तसा कधीतरी संबंध यायचा. एक जगावेगळा चमत्कार मी काही दिवसांपूर्वी अनुभवाला. मला भलामोठा धक्का बसला, झटका लागला आणि आश्चर्य देखील वाटलं. मला माझ्या कानांवर अजिबात विश्वास नाही बसला पण मग असे अजून दोन एक प्रसंग झाले रांगेत त्यामुळे मग निश्चित झालं कि "स्वभावालाच औषध असतं". अगदी सहज नाही पण स्वभाव संपूर्ण बदलू शकतो. माझ्या काही प्रश्नांना इतकी व्यवस्थित उत्तरं मिळाली, काळजी जाणवली त्यांच्या शब्दात, बोलण्यात, लिखाणात आणि वागणुकीत देखील. इतका मोठा जमीन अस्मानाचा फरक म्हणजे चमत्कारचं. खूप खूप प्रसन्न वाटलं, खात्री पटली कि त्यांना जाणीव झाली, उमगलं महत्व माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं कित्ती गरजेचं आहे ते. माणुसकीने वागण्यामुळे, स्वभावात ठरवून बदल घडवून आणण्यामुळे स्वतःला तर प्रचंड समाधान मिळतं, माणसं जोडली जातात, नाती टिकतात, खूप सुंदर संबंध दृढ होतात, समाधान मिळते आणि सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्मिती होते.  हा बदल घडला कशा मुळे हे मला माहित नाही आणि जाणून घायचे नाही. असतील काही कारणं, जाणीव झाली असेल, घटना घडली असेल, काहीही असलं तरी शेवट गोड झाला आणि नवी सुरवात गोड झाली हे अत्यंत महत्वाचं. अशीच सर्वांना सद्बुद्धी होवो हि ईशचरणी प्रार्थना म्हणजे सगळेच आनंदाने एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने काम करतील, खूप उत्कृष्ट कामे साधली जातील आणि "आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे" अशी वातावरण निर्मिती देखील होईल सातत्याने. 


मऊसर "ती"

माझ्या लहानपणी साबुदाणा खिचडी म्हणजे पर्वणीच होती माझ्यासाठी. अत्यंत आवडीचा पदार्थ, किंबहुना अत्यंत च्या पल्याड जर काही उपमा असेल तर ती देखील योग्यच राहील इतकी जास्त मनापासून मला ती आवडायची. कधी आई बाबांचा उपवास असेल त्याची आतुरतेने मी चातकासारखी वाट बघायची. अर्ध्या रात्रीतून जरी फक्त "साबुदाणा खिचडी खाणार का?" एवढं म्हटलं तरी देखील पट्टाकिनी उठून ती फस्त करणार म्हणजे करणारच. उत्कृष्ट, चविष्ट, जगावेगळी, भन्नाट, आणि देऊ तेवढ्या उपमा अपुऱ्याच आहेत ह्या पदार्थाला. त्यावेळी फक्त जाड साबुदाणाचं ठाऊक होता आणि उपलब्ध पण. त्यामुळे आधीपासून तय्यारी होत असे दुसऱ्या दिवशी खिचडी करण्याची. साबुदाणा भिजवणे, दाणे भाजून दाण्याचं कूट करून तय्यार ठेवणे, नारळ खवणून ठेवणे, कोथिंबीर शिस्तीत निवडून ठेवणे, मिरच्या, दही, बटाटे / काकडी असण्याची खात्री करणे ई. बटाटे सकाळी आई उकडून घ्यायची, म्हणजे झटकीपट खिचडी तय्यार. साबुदाण्याचा पांढरा शुभ्र रंग टिकून राहावा ह्या साठी एकतर व्यवस्थित हिरव्या मिरच्यांचे तुकडे किंवा कुटून घातली जायची, शिवाय त्यात होत आली कि चमचाभर (अगदी थोडेसे) दही फेटून लावले जायचे, शिवाय वरून आणि पोटात नारळ घातला / पेरला जायचा. ह्या सगळ्या साग्र संगीतामुळे ती खिचडी इतकी मऊ व्हायची कि ज्याचं नाव ते, उत्कृष्ट लागायची पहिल्या वाफेची आणि थंड खाल्ली तरी देखील. अहाहा च. अप्रतिम. पांढऱ्या त्या मोत्यांमध्ये हिरवी कंच मिरची, कोथिंबीर पेरलेली प्रेमाने, त्यात डोकावणारे बटाटे किंवा काकडीच्या पिटुकल्या फोडी, नारळ, दही किंवा दुधाचा मारलेला हबका (क्वचित, काही घरात) ई. मुळे पंचपक्वान्नांचा दर्जा आणि साठवण माझ्यासाठी / माझ्यासारख्या तिखट खवैईला लाभत असे. हे सगळं कदाचित त्यावेळच्या घरगुती वातावरणामुळे, आई संपूर्णवेळची गृहिणी असल्यामुळे सहज साध्य झालं असेल. आताशा इन्स्टंट चा जमाना, साबुदाणा बारीक, काही मिनिटात भिजणारा / फोडणीस तय्यार आणि लगबग कचेरी गाठण्याची. ह्या सर्वांमुळे सोप्प झालं आहे सगळं आणि चवीत विविधता देखील आली आहे त्यामुळे. दोन्ही पद्धतीने केली तरी "ती" मऊच होते, पण आईची माया थोडीशी वेगळी लागतेच जिभेला, कितीही आटापिटा केला तरी. त्यात अजून एक म्हणजे आधी एकच किराणा दुकानदार पिढ्यांपिढ्या, हात बसलेला, साबुदाण्याचा स्वभाव माहिती असलेला, त्यामुळे देखील त्या मऊपणात भर पडायची. आता म्हणजे असंख्य कंपन्या साबुदाण्याच्या, त्यामुळे ठावच लागत नाही साबुदाण्याच्या स्वभावाचा. त्यामुळे खूपदा वेगळ्या चवीची खिचडी चाखायला मिळते. जेव्हा ती थोडीशी चिकट होते, भांड्याच्या बुडाला थर निर्माण करते तो फस्त करण्याची मज्जा काही औरच. आणि जर यदाकदाचित खिचडी उरलीच तर थोडेसे जास्त दही टाकून, किंवा उपवास भाजणी कालवून, किंवा बटाटा शेंगदाणे कूट मिसळून केलेले मऊसर थालीपीठ देखील जगावेगळं लागतं, आई ला केल्याचं, आणि पोरांना खाल्याचं पोटभर समाधान.  

आत्ता प्रकाश पडला "ती" ला खिचडी का म्हणतात ते? काय काय जिन्नस मिळून हि तय्यार होते, करण्यास तय्यारी देखील लागते, असंख्य वेळा खाल्ली तरच पोटभर समाधान लाभते, प्रत्येकाला खाता येईल अशी मायाने ओतप्रोत अशी मऊसर, सौंदर्यवती . . . . . . . . .  

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

साधं आणि सोप्प

एवढ्यातच मी एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अगदी समजायला लागल्यापासून मी माझ्या घरी संक्रांतीचं, चैत्रगौरीचं, श्रावण शुक्रवारचं आणि इतर असे अनेक हळदी-कुंकू समारंभ बघितले, भाग घेतला आणि आयोजित देखील केले. आधी बहुतांशी सर्वजणी घरी असायच्या त्यामुळे संक्रांतीच्या दिवशीपासून ते रथ सप्तमीपर्यंत दररोज कोणा ना कोणाकडे असायचंच हळदी-कुंकू, शेजारी पाजारी, नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी. त्यावेळी तिळगुळ लाडू, वड्या आणि पोळ्या फक्त घरी तय्यार केल्या जायच्या आणि ते देखील वर्षातून एकदा, गल्लीबोळातल्या पिटुकल्या दुकानात वर्षभर नाही.   त्यामुळे वाट बघितली जायची त्या स्वादिष्ट आणि पौष्टिक वड्यांची. अगदी थोड्या काळ खायला मिळत असतं आणि त्यात आ'म्ही सारे खवय्ये" असल्यामुळे कुठलीही लाज लज्जा नाहीच, "आने दो" ह्या पद्धतीने भरपूर, मनसोक्त, यथेच्छ फडशा पाडला जायचा तिळगुळाचा. आई सोबत माझं पालूपद नेहेमीच असायचं त्यामुळे प्रचंड मज्जा यायची. प्रत्येक घर, पद्धती अतिशय वेगळ्या, त्यामुळे खूप रंगबिरंगी तिळगुळ चाखायला मिळायचा. मज्जा काही औरच होती ती, शब्दात कधीच बांधता येणार नाहीच. सध्याची स्थिती ३६० अंश बदलली आहे. बहुतांशी सगळ्याचजणी घराबाहेर, ३६५ दिवस दारोदारी हर तर्हेचा तिळगुळ उपलब्ध आणि उपलब्ध म्हणून सेवन त्यामुळे अप्रूप राहिलंच नाही आहे ह्या वड्या / लाडवांबद्दल सर्वसाधारणपणे. ऑफिस असल्यामुळे फक्त उपलब्ध असलेल्या दोन रविवारीच हळदीकुंकू, त्यामुळे देखील सर्वांच्या घरी दिलेला (विकतचा बहुतांशी) तिळगुळ खाता येत नाही. ह्या अश्या असंख्य कारणांमुळे असेल कदाचित एका गडगंज, अफाट श्रीमंत असलेल्या एका जणींनी मला हळदीकुंकू दिल्यावर काहीतरी हातात ठेवलं,पण गप्पांच्या नादात मी काही लक्ष दिलं नाही, कारण गप्पा जास्त महत्वाच्या वाटल्या मला, काही क्षण भरच्या. नंतर बघते तर काय माझ्या हातात फक्त तीळ होते, चार दाणे. म्हटलं काय? माझ्या चार डोळ्यांनी पुन्हा एकदा, अनेकदा बघितले आणि तिला गाठलेच मी, म्हटलं अगं हे काय दिलंस मला? "तिळगुळ, आमच्यात असंच देतात हो " इति ती. मी अवाक, कित्ती साधं आणि सोप्पं ना. आणा बाजारातून आणि वाटा, धुवा, वाळवा, भाजा, कुटा, मोजा, शिजवा आणि वळायला नक्कोच मुळी, तरी देखील "सुगरण". कित्ती सोप्पं पौष्टिक खाद्य, मधुमेह वगैरेची चिंताच नको. 

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

जिंकलं

माझ्या विश्वविद्यापीठाच्या परिसरात अनेक संस्था आहेत त्यात एक वैद्यकिय महाविद्यालय देखील आहे. वैद्यकिय महाविद्यालय म्हणजे भलं मोठं रुग्णालय देखील आलंच. रुग्णालय असल्यामुळे दरताशी महानगरपालिकेने बस सुविधा दिली आहे. ह्या बस सुविधेमुळे असंख्य रुग्णांना नाही तर, कर्मचाऱ्यांना खूप सुविधा झाली आहे. मला एक भ्रम होता कि बस सुविधा हे फक्त अगदी गरजू लोक वापरतात. पण काही दिवसांपूर्वी सलग बरेच दिवस एक डोळ्यांना अचंबित करणारा प्रसंग घडला. बरोबर ८ वाजता सकाळी एक बस पोचते रुग्णालयात. त्यातून तांत्रिकी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी उतरले. तांत्रिकी महाविद्यालय ८.३० वाजता सुरु होते आणि बऱ्याचदा विद्यार्थी हा उशिरा येणारा असतो. आणि त्यातून वातानुकूलित यंत्रणा वगैरे काहीही नसतांना, कुठलीही सोयी सुविधा नसतांना ह्या जमान्यातले विद्यार्थी अश्या साध्या बसने येतात म्हणजे महद आश्चर्यच. ८ वाजता पोचायचं म्हणजे त्याआधी अती लवकर उठावं लागतं, मस्त तय्यार होणं, डब्बा आणि ह्या सर्वांकरता लागणारी स्वयं प्रेरणा ई. म्हणजे कमाल आहे. हे विद्यार्थी जे बस ने प्रवास करतात, वेळेवर दररोज, ह्या सुरवातीच्या अभियांत्रिकी दिवसात म्हणजे आता पुढे कदाचित काहीच बघायची गरज नाहीच. हि लागलेली शिस्त, बाणलेली म्हणा खरं तर आता नोकरी व्यवसायात देखील नक्कीच कामी येणार म्हणजे येणार. वेळेआधी कामं होणार, अभ्यास होणार आणि बरेच काही. माझ्या दृष्टीने ह्या अश्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना जे वेळेचं महत्व ओळखतात, अवाच्यासव्वा खर्च टाळतात अश्यांना पुढे कधी वेळेचं व्यवस्थापन करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे ताण सुद्धा बहुतांशी जाणवणार नाही त्यामुळे सर्व सुरळीत होईल हे नक्की. अश्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज पडू नये कारण त्यांनी आधीच अश्या अनेक परीक्षा पार पाडल्या आहेत. माझ्या दृष्टीने ह्या विद्यार्थी मित्रांनी आधिच खूप जिंकलं आहे, त्यामुळे आता छोट्या मोठ्या आव्हानांना ते तय्यार आहेत हे सातत्यानं केलेल्या कृतीतून सिद्ध झालंय. बाकी विद्यार्थ्यांनी आणि उशीर करणाऱ्यांनी खूप शिकण्यासारखं आहे ह्यातून. 

अन्न हे पूर्णब्रह्म

वंदनीय, आदरणीय श्री. रामदास स्वामीजींनी लिहिलेल्या अनेक श्लोकांपैकी महत्वाचा एक श्लोक आहे हा.  माझ्या लहानपणीपासून शाळेत सुद्धा हा श्लोक शिकवला होता, आणि प्रत्येक वेळी जेवण पुढ्यात आलं कि मनात अजून देखील नकळत आणि आपोआप हात जोडले जातातच. त्या नंतर माझ्या मुलांच्या इंग्रजी शाळेत सुद्धा ह्या श्लोकाचं भाषांतर शिकवले आहे  पण मतितार्थ तोच. विविध देशात देखील अन्नाचं महत्व सर्वश्रुत आहेच. किंबहुना प्रत्येक माणूस तसं बघितलं गेलं तर अन्नासाठीच वणवण, धडपड, कष्ट आणि बरेच काही करतो. दोन वेळा गरम साधं घरचं पोटभर मिळावं स्वतःला, कुटुंबाला आणि सर्व सजिवांना हेच तर त्रिवार सत्य आहे. मग इतकं सगळं असतांना देखील मी काही माणसांची सवय बघितली आहे. ती माणसं अनेकदा अन्न स्वतः वाढून घेतात पण उरलेलं अन्न झाकून ठेवत नाहीत. एखाद वेळा झालं तर ठीक आहे, विसरतो, पण नेहेमीच. हि काय सवय? उरलेलं अन्न घरचे, दारचे किंवा कोणीतरी इतर जीव खाणार ना? मग त्या अन्नाचा असा अपमान का करायचा? इतकी गर्मी कशासाठी? कोणाला काय दाखवायचं आहे? आपलं पोट भरलं त्यावेळी म्हणजे झालं? हे विचित्र पण नाही, त्या पेक्षा फार वेगळं आहे. माझ्या मैत्रिणीची सासू तर सर्वांसाठी चहा करणार निरुत्साही पद्धतीने, सर्वांच्या हातात नेऊन देणार पण सुनेच्या नाही. बरं असो, नका देऊ तिच्या हातात पण झाकून ठेवा, ते देखील नाही. ह्या अश्या असुरी वृत्तीची माणसं का असतात? कोणास ठाऊक. 

अश्यांकडून काय नाही करायचं ह्याचं उत्कृष्ट शिकवण मिळते मात्र, हे हि नसे थोडके ना. 

अन्नाला मान द्या, आदर करा कारण त्याशिवाय जगणं कठिण आहे. आदर करता येत नसेल तर कमीतकमी अनादर तरी टाळा. 

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

सुरेल अक्का surreal

गेले काही दिवस surreal हा शब्द अनेकदा वाचनात आला माझ्या. अनेक वर्तमानपत्रातून एका बातमीने सर्व भारतीयांचं मन फक्त जिंकूनच नाही घेतलं तर उर अभिमानानं भरून आलं आहे. "नातू नातू" ह्या गाण्याला, चित्रपटाला आणि एकंदरीतच संपूर्ण चमूला जगमान्य पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांची खूप वाह वाह होत आहे. त्या संदर्भात surreal moment हा शब्द अनेक जण मांडत आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करतांना इंग्लिश वर्तमानपत्रात. अजब, अमूर्त, स्वप्नवत असे काही शब्दार्थ आहेत ह्या इंग्लिश शब्दाचे. माझ्या दृष्टीने ह्या कामगिरीला सुरेल असं संबोधलं पाहिजे मराठीत. कारणे अनेक आहेत. "नातू नातू" हे गाणं असल्यामुळे सूर, लय, ताल, बोल, स्पंदन ई. तर आलेच आणि ह्या बक्षिसामुळे आता हे सर्व जगभर पोचले आहे.  हि बक्षिसे मिळण्याआधीच असंख्य मनं जिंकण्याची कामगिरी ह्या चमूने साधली आहे सुरेल पद्धतीने / सुरेल रितीने. सुरेलपणा संपूर्ण चमूच्या साधेपणात पण झळकतो आहे, अगदी गाणं शब्दबद्ध करणाऱ्यांपासून ते चाल देणे, नृत्य, अवतीभोवती नाचणारी चमू, ठिकाणं, वैविध्य वेशभूषाकार, केशभूषाकार आणि इतर सर्वच जण. ह्या सर्वांच्या सुरेल मिलापामुळेच हे ऐतिहासिक काम साध्य झालं. 

ह्या उत्कृष्ट प्रसंगावरून बोध हाच, कि जे काम कराल ते सुरेल होऊ द्या, कामाचा प्रत्येक अंश, कृती  आनंदाने पार पाडा, आनंद आणि त्याची तरलता कधी आपोआप पसरेल तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याची फळं पुन्हा एकदा, अनेकदा सुरेलता देऊन जाईल आणि ती वृद्धिंगत देखील होईल.      


सुवर्णमध्य

माझ्यामते प्रत्येक व्यक्ती मग ती कुठल्याही वयाची असो, कुठल्याही व्यवसायात असो नाही तर कुठलीही पार्श्वभूमी असो सातत्याने सुवर्णमध्य शोधतच मार्गक्रमण करत असते. किंबहुना थोरामोठ्यांचं म्हणणं पण अगदी तेच असतं कुठल्याही परिस्थितीत सुवर्णमध्य शोधा आणि पुढे व्हा. प्रत्येकाने शोधलेला किंवा त्याला गवसलेला सुवर्णमध्य हा त्याच्या दृष्टीने त्या वेळी योग्यच असतो, त्यामुळे त्या व्यक्तीचे जोडे परिधान केल्याशिवाय इतरांना ते समजणं आणि उमगणं अवघडंच. त्यामुळे अनाहूत सल्ले देणं टाळाच मंडळी. कारण एकतर प्रत्येकाच्या डोक्यावरचं आभाळ वेगळं असतं जरी ते सर्वांना सारखंच दिसतं दुरून, विचारल्याशिवाय आणि उमगल्याशिवाय उगाच "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असं नकोच. मी हे एक साधं सोप्पं उदाहरण घेऊन समजावून सांगते. तुमची तुमच्या घराची एक खोली आहे, त्याची लांबी, रुंदी, उंची आहे, परिमाण आहे, आकार आहे. सर्वसाधारण मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गीयांकडे एका खोलीत (झोपायच्या / अभ्यासाच्या) एक पलंग, एक कपाट, एक टेबल आणि अडगळीच्या किंवा जास्तीच्या वस्तू ठेवण्यासाठी कपाटावर कप्पे केलेले आढळतात. कपाटावरचे कप्पे हे मग छतापर्यंत ओढले किंवा बांधले जातात. त्यात कधीतरी लागणाऱ्या प्रवासाच्या वस्तू, गोधडी आणि इतर सामान रचले जाते. असे हे कप्पे बांधण्याकरता बहुतांशी खोलीतल्या दोन भिंतींचाच उपयोग केला जातो. वास्तुतज्ञांना किंवा सजावट तज्ज्ञांना ह्या बद्दल जास्त माहिती असते त्यांचे ठराविक समीकरणं असतात ह्या मागे. कधी कधी असं पण आढळून आलं आहे कि आटाळा असल्यामुळे त्या कप्प्यांची लांबी रुंदी नेहेमीपेक्षा थोडीशी मोठी पण घेतली असते. पण ह्या सर्वांमुळे मूळचा खोलीचा मध्य आणि कपाटांमुळे / कप्प्यांमुळे अवतरलेला खोलीचा मध्य वेगवेगळा असतो. विद्युतशास्त्रवत्ता किंवा वीजतंत्री जेव्हा पंखे लावायला येतो तेव्हा एकतर खोलिचाच मूळ मध्य साधला जातो कारण पंखा लावण्याची सोय बांधकाम करतांना जेथे दिली असते तेथे तो लावून मोकळा होतो. शक्य असल्यास सजावट तज्ज्ञ आवश्यक बदल घडवून आणतात आणि कप्पे धरून उरलेल्या जागेत मग मध्य साधून पंखा बसवला जातो, कारण पंखा हि एक अत्यावश्यक वस्तू आहे. आपल्या घरात जास्त वेळ किंवा बहुतांशी वास्तव्य आपलं असतं, पाहुणे हे काही क्षण, मिनिटं किंवा तास येतात आणि जातात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना जे योग्य वाटतं तेच खरं. बाकीच्यांनी एक तर बोलू नये किंवा त्यांच्याकडे प्रत्येकाने दुर्लक्ष करावं कुठलेही स्पष्टिकरण न देता. 

अगदी सहज सोप्प जे असेल, जे तुम्हाला रुचेल पचेल तसा मध्य साधा. बघा पलंगावर आडवं पडल्यावर, सहज छताकडे लक्ष गेलं तरी देखील खूप भन्नाट गोष्टी शिकायला मिळतात. सतत आजूबाजूला लक्ष ठेवा, टिपा आणि छोट्या छोट्या युक्त्या आजमावत सुवर्णमध्य शोधतं मार्गक्रमण करा, प्रत्येक बाबतीत.   

रविवार, ८ जानेवारी, २०२३

धड धड वाढते ठोक्यात...

लहानपणी हृदय असतं आणि ते धडधडतं हे दुर्लक्षित झालं किंवा होत असे. सगळं लक्ष खेळण्यात, धावण्यात, पळण्यात आणि अत्यानंदी राहण्यात. हो काही तरी उडायचं काही वेळ पोटाच्या वरच्या भागात पण धावणं, पळणं इतकं सततच होत कि त्यात काही विशेष वाटलंच नाही, काही वेळाने ते शांत व्हायचं, धडधडणं थांबायचं वगैरे कडे कधी लक्षच दिलं गेलं नाहीच. खेळ झाला कि यथेच्छ खायचं, तावच मारायचा आणि काहीही चालायचं, पुढ्यात मांडलेलं सगळं, घरचं, शेजारच्यांच, मैत्रीणीकडंच सगळं म्हणजे सगळं, "आने दो" हि वृत्ती होती, नकळत उभी राहिलेली. अभ्यास करणं अतिशय सोप्पं असायचं, झटकीनी व्हायचा, आणि खूप पळापळ केल्यामुळे आणि उत्कृष्ट जेवण झाल्यामुळे शांत झोप लागायची. तो काळ काही उठसुठ प्रेमात वगैरे पडण्याचा नव्हता आणि ते कश्याशी खातात, का? वगैरे कधी डोक्यात आलं देखील नाही त्यामुळे त्या वेळी धडधड वाढते म्हणतात ते देखील अनुभवलं नाहीच. समाज नियमांप्रमाणे वेळेवर लग्न, कार्य, मुलंबाळं, संसार देखील झाला पण उगाचच खालील शब्दात पेरल्याप्रमाणे नाही काही झालं. 

"टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी,
संपते अंतर झोक्यात"

किंबहुना हे सर्व अनुभवलं हि असेल पण खूपच नकळत आणि थोडक्यात, अगदी दिनचर्येचा भाग जणू. 

हे असे सगळे वर्ष झर्रर्रकिनी सरले असल्यामुळे असेल कदाचित सध्या मला प्रकर्षाने जाणवायला लागलंय हृदयाचं अस्तित्व आणि वाढलेली धडधड. अगदी पुन्हा एकदा प्रचंड तरुण झाल्यासारखे मी दिवस अनुभवते आहे, कधीही ना पाहिलेले आणि जाणवलेले असे ते. प्रत्येकाला म्हणे तरुणपण एकदाच अनुभवता येतं पण माझ्या बाबतीत तसे नाहीच मुळी. अर्धशतकी वाटचाल झाल्यामुळे असं म्हणे कि आता इतकं धडधडणं चांगलं नाही, ते कमी करा. प्रकर्षाने व्यायाम करा, जिभेवर ताबा ठेवा, आणि यादी फारच मोठी आहे. आत्ता जरा ते पहिल्या प्रथम ठोके शांतपणे ऐकू यायला लागलेत आणि ते मी उपभोगणं थांबू?, छे छे मला जमणं अशक्यच. तर अश्या ह्या माझ्या नवीन अनुभवांसोबत आताशा प्रत्येक नवीन दिवस उगवतो आणि मावळतो आहे, नावीन्य पूर्वक असा, कधी नव्हे ते अनुभवायला देखील भाग्य लागतं नाही का? लहरीप्रमाणे उद्भवणारे ते तालबद्ध ठोके, ती घालमेल, त्या किंचित वेदना अगदी जणू  "लव्ह अँथॅम" च हो. ह्या  "लव्ह अँथॅम" मागची कारणे तर मला अजिबातच ठाऊक नाहीत, माहिती करून घ्यायची नाही, पण हा क्षणो क्षणी घडणारा बदल मात्र भरभरून उपभोगायचा आहे मला.   

प्रत्येक टप्पा मी खूप भन्नाट अनुभवाला आहे माझ्या वेळी होता तसा, अगदी लहानपणापासून, आता हे टिक टिक, धड धड पण मनमुराद. इतकी वर्ष का लागली त्या हृदयाला मला त्याचे अस्तित्व जाणवून द्यायला किंवा त्याने का घेतली कोणास ठाऊक. त्या धड धड च्याच गतीने किंवा साथीने आता हे लिहिलं देखील जात आहे, प्रथमच. 

"प्रथम तुुज ऐकता जीव वेडावला
उचलूनी घेतले निजरथी मी तुला
प्रथम तुुज ऐकता ..."

आधुनिक दडप / गमचा

खूपदा ऐकलं आहे आणि जुन्या मराठी चित्रपटात बघितलं देखील आहे कि गृहिणी त्या काळी दुपारचे जेवण घरी तय्यार करून शेतात घेऊन जात असतं. शेतात त्याचे मालक कमालीचे कष्ट, शेतीची कामे करत असतात खूप तास त्यामुळे त्यांना घराचे साधे पौष्टिक जेवण नेलं जात. अर्थात साधी भाकरी, भाजी, ठेचा  आणि कांदा ई. मेनू असायचा तेव्हा, सगळीकडे सारखा. वेताची साधी टोपली तय्यार केलेली त्यात सगळं जेवण आणि त्यावर एक स्वच्छ मऊ कापडाचा तुकडा बांधलेला असायचा. एक छोटी घागरभर पाणी आणि हे टोपलं इतकंच. त्या कापडाच्या तुकड्याला दडप किंवा गमचा म्हटले जायचे. त्या कापडाची गाठ सोडून, पसरवून मग त्याच टोपलीतले अन्न हातात घेऊन खाल्ले जायचे. सोप्पं होतं सगळंच. आणि तसे ते जेवण जेवून अगदी तृप्त व्हायला व्हायचं. ते कापड, किंबहुना पातळसा कापडाचा तुकडा, दडप दोन कामे करायचा, एक म्हणजे त्या अन्नाचे झाकण, सुरक्षा, शिवाय खेळती हवा, आणि खाली काही सांडू नये, पडू नये म्हणून पसरवलेली छोटेखानी चटई म्हणा हवं तर. अशी चटई पसरवणे म्हणजे एक शिस्त च जणू. आपण सध्या ह्या अश्या रंगबेरंगी चटईला मॅट असे म्हणतो. त्यावेळी आई, आजी, मावशी, मामी अश्या प्रेमळ घरच्या मोठ्या स्त्रियांनी मायेने प्रेमाने वापरलेल्या लुगड्या ने बहुतांशी गमाचा / दडप तय्यार करतं. अर्थात अजून काही विविध मऊसर कापड देखील वापरले जात असे. 

आताशा बऱ्याच कारणांमुळे पोळी किंवा भाकरी नोकरदार कर्मचारी डब्ब्यात आणण्याशिवाय अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळून आणतात. फक्त पोळी, भाकरी कशाला तर पराठे किंवा तत्सम पदार्थ ह्या अश्या फॉईल मधेच आणले जातात. त्यामुळे अनेक फायदे होतात आणि त्यातलाच एक म्हणजे काम करण्याच्या मेज वरच सहसा जेवलं जातं, त्यामुळे शिस्त आणि खाली काही सांडू नये म्हणून ते फॉईल नीट पसरून, मग त्यावर डब्बे उघडले जातात आणि यथोचित भोजन पार पडते. हे सगळं अनेक वर्ष अनुभवताना अचानक मला काल दडप ह्या प्रकाराचे आधुनिक स्वरूप आठवले आणि माझे आधुनिक पेन लिहायला सळसळले.  

कुठलीही तुलना नाहीच पण घरची शिदोरी नेहेमीच अत्यंत महत्वाची, प्रेमाने ओतप्रोत भरलेली आणि पौष्टिक अशी. त्यामुळे थंड झाली तरी मायेची उब जाणवणारी अशी.  मस्त खाऊन आणि स्वस्थ राहून दडप जसा स्मृतिगंध पसरवते तसा तुम्ही आनंद पसरावा.  

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

काळजीपूर्वक सावकाश

धावपळ, शर्यत आणि शीघ्रगती हा तर सर्वश्रुत जगमान्य नियम आहे आणि सर्वजण अगदी हिरीरीने ह्यात भाग घेतात. किंबहुना अनेक जण कळत, नकळत ह्यात सहभागी होतात. काही जणांना तर अश्या शर्यतीच दिसतात फक्त. किंवा इतरांना ह्या शर्यतीत सहभागी करणं, मुद्दाम टाकणं हे अनेकांचे नित्यनियमाने काम. असंख्य जण फक्त पुढे मार्गक्रमण करतं असतात कोणाचीही वाट न बघता. हे झालं एक. दुसरं म्हणजे मला शाळेच्या धावण्याच्या आणि सायकल चालवण्याच्या शर्यती आठवल्या. त्यात दोन प्रकार असायचे. एक म्हणजे जो जोरदार सायकल चालवून किंवा धावून सर्वप्रथम येतो आणि दुसरी शर्यत म्हणजे सावकाश चालणे / धावणे शर्यत. सावकाश सायकल चालवणाऱ्याला किंवा धावणाऱ्याला बक्षीस मिळते. दोन्ही शर्यती फार अवघड आहेत, जोरदार गतीने धावणं जितकं कठिण त्या पेक्षा कणभर जास्त कठिण सावकाश धावणं / चालणं. आमच्या सोसायटीत ठिकठिकाणी गतीरोधक बांधले आहेत. बरीच छोटी मुलं आणि जेष्ठ असतात सोसायटीत, त्यामुळे प्रत्येक गाडी जाता येता सावकाश कमी गतीने जा-ये करण्यासाठी म्हणून. त्या गतिरोधकावरून हळूच सावकाश गाडी काढणं म्हणजे एक खास कलाच आहे. प्रत्येकाला जमणं अशक्य. सरळ मार्गावरून गाडी चालवणं आणि अश्या उंच सखल भागावरुन गाडी काढणं तज्ज्ञांचं काम आहे. तज्ज्ञ फक्त गाडी चालवणारा नाही तर दुसऱ्याचा विचार करणारा पण हवा. दुसऱ्याचा विचार असेल तर कृती तशीच होते. गाडी भरपूर गतीने तर सगळेच चालवतात पण गाडी न बंद पडता सावकाश चालवणं म्हणजे सर्व पद्धतीचे कौशल्य पणाला लागते. आज एका रिक्षातून आम्ही बाहेर जात होतो, तो रिक्षेवाला कदाचित आमच्या सोसायटीत पहिल्यांदाच आला होता. त्यात अनुभवांवरून न शिकणारा, डोळस पणे काम न करणारा किंवा कदाचित कामावर लक्ष नसणारा किंवा घाई असणारा.  ४-५ गतीरोधक आहेत सोसायटीत. एकावरून रिक्षा उडवणे समजू शकते. पण बाकी गतिरोधकांचं काय? दिसतं नव्हते का मुद्दाम? त्याचं त्याच्यापाशी. पण हे नक्की कि आपल्या कामावर प्रेम असणे, त्या रिक्षाची किंवा कामाची काळजी असणे, दुसऱ्याची कदर करणे, आणि सावकाश गतीने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक आहे, नेहेमीच.  

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

आरोग्य उपचार

गेली अनेक वर्ष मी डॉक्टरांच्या संबंधित हे एक वाक्य नेहेमी ऐकलं आहे, किंबहुना कानावर पडलं आहे ते असं कि डॉक्टर असा असावा कि त्याला बघता क्षणीच अर्धा रोग नाहीसा व्हावा. शब्दशः नाही, पण बऱ्याच अंशी. डॉक्टर असा दिसावा, प्रसन्न व्यक्तिमत्व असावं, मधाळ बोलणं आणि शांतपणा ई. अगदी तस्सेच मग पेशंट नी देखील, अर्थात ज्यांना सहज शक्य आहे त्यांना, जे चालत स्वतः डॉक्टर कडे येऊ शकतात त्यांनी जरा प्रदर्शनीय असे गेले तर? प्रदर्शनीय म्हणजे दर्शनीय, मस्त, स्वच्छ आणि भन्नाट. असे गेले कि १. त्या पेशंटला स्वतः फार उत्साही वाटणार ह्यात शंकाच नाही. जरी काही दुखत फुकत असलं तरी असं साधंच पण छान तय्यार होऊन गेलं कि वेगळी स्फूर्ती येतेच. ते देखील मग पट्टाकिनी बरं व्हायला फार उपयोगी पडतं. गोळ्या औषधे खूप छान परिणाम दाखवतात.  २. प्रत्येक पेशंट जरा असं साधा पण छान उत्साही आला तर त्या डॉक्टर ला देखील मरगळ येणार नाही. सततचा तो औषधांचा वास, इंजेक्शन, गोळ्या औषधे ई. बद्दल चर्चा ह्यातून रंगीबेरंगी आणि हवाहवासा बदल दृष्टीस पडेल. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे डॉक्टरला किंचितही थकवा जाणवणार नाहीच, तसा पण जाणवत नाहीच, पण एक थर जास्त भर नाही का. हे एक मस्त चक्र असल्यासारखे काम करेल, पेशंट्स मस्त - डॉक्टर भन्नाट - त्यामुळे मग पुढे येणारे पेशंट्स निरोगी होणार झटकीपट. फक्त डॉक्टरनेच का उत्साही राहायचं, मस्त दिसायचं आणि काही अंशी रोग पळवायचे. जास्त प्रमाणात रोग पळवू या, दोन्ही कडून प्रयत्न होऊ देत. सर्व पेशंट्स राहतात उत्तम, पण थोडीशी मरगळ झटका, तय्यार होऊन तर बघा, जे दुखतंय त्याला स्वीकारा, तक्रार म्हणून नाही तर सल्ला म्हणून डॉक्टरशी गप्पा मारा थोडक्यात आणि मग बघा बदल. कोण म्हणत कि डॉक्टर इतके तज्ज्ञ असतात कि त्यांना कशाची गरज भासत नाही? पेशंट दिसावा असा, प्रसन्न व्यक्तिमत्व, मधाळ बोलणं आणि शांतपणा ई. कि डॉक्टर, नर्स, लिफ्ट चालक आणि इतर सर्वांनाच उत्साह फक्त वाढणार नाही तर टिकेल देखील. काही पेशंट्स चे असे सळसळते व्यक्तिमत्व बघून इतरांचे रोग छू मंतर होतील. 

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

तहान

प्रत्येक सजीवाला तहान लागतेच आणि पाणी हेच जीवन देखील आहे. शरीररूपी यंत्राला व्यवस्थित सुरु ठेवण्यासाठी जलसमृद्ध असणं अत्यावश्यक आहेच. प्रत्येकाची तहान वेगळी आणि ती त्या व्यक्तीला ठाऊक असते, असावी. त्याची तसदी मग त्यानेच घेणं अपेक्षित नाही का? असो. 

आताच्या दिवसात गाडी आणि पिशवी ह्या दोन्हीचे आकारमान बदलले आहे. दोन्ही गोष्टी भल्या मोठ्या झाल्या आहेत. दररोज कचेरीला न्यायाची पिशवी असो, नाही तर संगणकाची बॅग, आकार भलामोठाच, अनेक कप्पे वैविध्य चेनने एकतर बंद करता येणारे नाहीतर उघडे पण. अहो बॅगचं काय पण मोबाईल, पाण्याची बाटली, पेन, पेन्सिल आणि इतर सगळ्यांचाच आकार वेगळ्यापद्धतीने मोठा झाला आहे. गरज म्हणून किंवा नावीन्य म्हणून असेल कदाचित. गाड्यांचे तर विचारूच नका. माणसं घरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन आणि गाडी ७ आसन संख्येची. गाडी मोठी म्हणजे मग खूप कप्पे, बंद, उघडे, इकडे-तिकडे, सगळीकडे. आताशा प्रत्येक बँक आणि गाडीच्या कंपन्या लोन ची सहज सुविधा देत असल्यामुळे प्रत्येकजण गाडीचा मालक झाला आहे, अभिमानाने मिरवतो आहे. 

इतकं सगळं असतांना आणि तहान लागत असतांना मग स्वतःला लागणारे पाणी घरून घेऊन लोकं का येत नाहीत कुणास ठाऊक? बरं, जर घरून पाणी आणायचं विसरलात तर रस्त्यात असंख्य छोटी मोठी दुकाने आहेतचं कि, तेथून घ्यावे पाणी विकत घ्यावे, जवळ बाळगावे आणि प्यावे, कोणी अडवलंय? तुम्ही जेथे जाता तेथे किमान पाण्याची सोय तर असणारच, पण यदा कदाचित नसेल, वेळ लागणार असेल सोय करायला तर अडू देऊ नये ना आपलं?. स्वाभिमानी, स्वतंत्र का असू नये माणसाने? जागा नाही एक स्वतःपुरती पाण्याची बाटली बाळगायला? का तहान लागते ह्याची जाणीव नाही? स्वयंसिद्ध व्हा आणि स्वतःची तहान तरी स्वतः भागवा, काही अंशी तय्यारी असू द्या. इतके कप्पे असून मग काय उपयोग? इतके शिकले सवरलेले असून काही फायदा नाही. प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं माणसाने. आणि वेळेवर तहान भागली नाही कि मग त्याचे परिणाम / दुष्परिणाम होतात, स्वतःवर आणि दुसऱ्यांवर देखील, दृश्य स्वरूपाचे असे, ते घातक ठरतात मग तब्बेतीला. हे सगळं सहज टाळण्यासारखं आहे. त्यामुळे काही सेकंद स्वतःच्या तृष्णेला / तृष्णेसाठी द्याचं.   


झटकीपट ठणठणीत

माझा एक खूप गोड पण थोडा वेडा डॉक्टर आहे. वेडा अनेक कारणांसाठी. त्यातलं एक म्हणजे तो रात्री .३० नंतर उपलब्ध असतो. एकदा एवढ्यातच मी गेले त्याला भेटायला, त्याने तपासून औषध दिले, सल्ले दिले आणि मग मी रस्त्यावरच एक औषधाचे दुकान दिसले म्हणून थांबले. म्हटलं इथेच मिळाले औषध तर घेऊन टाकू. उतरले आणि डॉक्टर ने दिलेली चिठ्ठी सुपूर्त केली त्या दुकानदाराच्या हाती. माझी त्या दुकानात जायची पहिलीच वेळ होती. त्या दुकानदाराने दोनच औषधे होती त्यामुळे पट्टाकिनी काढून तर दिली पण काही प्रश्न होते ते विचारले औषधांबाबतीत. मी ती उत्तरे देता देता माझ्या लेकीला आवडणारे चॉकलेट दिसले म्हणून घेतले. पैसे द्यायला दुसऱ्या बाजूला गेले दुकानाच्या त्यावेळी दुकानदार बिल करण्यात मग्न होता. माझं माझ्या डाव्या बाजूला सहज लक्ष गेलं तर काय तेथे नेलपेंट्स होते हो, टोपलीभर, शिस्तीत मांडून ठेवलेले. अहाहा, कुठला रंग घेऊ आणि कुठला नाही अशी माझी स्थिती झाली. काय सांगू. किंमत देखील वाजवी होती. त्यामुळे देखील आणि अनपेक्षित नजरेस पडल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला हो, काय सांगू तुम्हाला. अनपेक्षित ते वैविध्य रंग माझ्या पुढ्यात आले जशी कि रंगपंचमीचं जणू, अर्थात अगदी वेगळ्या प्रकारची अशी. त्यामुळे इतकी गुंग झाले, औषधे आणि काही नेलपेन्ट्स घेऊन प्रचंड आनंदात स्वारी घरी कधी पोचली हे तर लक्षात आलं नाहीच शिवाय माझं काही दुखत-फुकत होतं ह्याची जाणीव देखील राहिली नाहीच. "काय वर्णू तव गूण...." अशी माझी अवस्था झाली. आत्ता समजलं कि औषधाच्या दुकानात नेलपेन्ट्स का विकायला ठेवतात? खरं कारण. जबरदस्तच.

 मी असं ऐकलं होतं लहानपणीपासून कि डॉक्टर असा असावा किंवा त्याचे संभाषण कौशल्य इतकं अप्रतिम असावं, त्याने नेहेमी ताज तवानं दिसावं म्हणजे येणारा रोगी अर्धा तेथेच बरा होतो. हेच सर्व आता औषधाच्या दुकानाला पण लागू पडतंय असं दिसतंय हो. मी अर्धी काय पूर्णच बरे झाले. धंदा हा एक भाग झाला पण कितीहि विजोड कॉम्बो असलं (औषधं + नेलपेन्ट्स) तरी मला फार जबरदस्त उपयोगी ठरलं ते. मनःपूर्वक धन्यवाद ज्याने हा विचार केला आणि रंगांची उधळण केली, कदाचित फक्त माझ्यासाठीच त्या दिवशी आणि येणाऱ्या प्रत्येका साठी.

 

वास्तुशांती

मला प्रचंड भावणारी संकल्पना म्हणजे वास्तू देवतेची मनःपूर्वक / मनोभावे केलेली पूजा अर्चना. माझ्या घराच्या वास्तू दरम्यान एकदा एका गुरुजींनी आम्हाला नेहेमी प्रमाणे माहिती दिली होती. तसं बघितलं गेलं तर वास्तू हि फक्त एकदा केली जाते, नवीन घरात प्रवेश करतांना. पण गुरुजींच्या मते सहज यजमानांना जमल्यास प्रत्येक वर्षी वास्तू होणं अत्यावश्यक आहे. साग्रसंगीत नाही पण त्या देवतेपुढे नतमस्तक होणं गरजेचं आहे. पटलं आम्हाला ते. अर्थात प्रत्येक वर्षी वास्तू पूजा नाही पण घर म्हटलं आणि ते देखील महाराष्ट्रात, ब्राह्मण समाजात कि वर्षभरात विविध पूजा संपन्न होतातच. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे माझ्या एका खास मैत्रिणीला तिची स्वतःची अशी मोठी केबीन मिळाली म्हणून सासरे आणि तिचे "हे" खास भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन तिला आश्चर्यचकित करायला आले होते. माझ्या मते ती पण एक खास पद्धतीची वास्तुपुजाच. आज का कुणास ठाऊक पण मला असं भासलं आणि प्रकर्षाने जाणवलं कि ज्या इमारतीत आपण राहतो, दिवसभर काम करतो, मोठे होतो, मोठ्या हुद्द्यांवर जातो आणि जी तुम्हाला छत्र देते, ऊन/वारा / पाऊस . पासून खास संरक्षण बहाल करते मागता, मग अशी वास्तू ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उभी राहिली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार दररोज मानले तरी कमीच आहे, नाही का? आणि ह्याला देखील पूजन म्हटले पाहिजे, मानसपुजा जणू. ज्या जमिनीवर आज तुमची इमारत उभी आहे तेथे आधी किडा, मुंगी, माशी, सरपटणारे प्राणी आणि इतर अनेक जिवांचं वास्तव्य होतं. त्यांचं कुटुंब गुण्यागोविंदाने तेथे नांदत होतं. ते तुमच्यासाठी दूर  झाले, दुसरीकडे गेले राहायला, शिवाय विविध प्रकारच्या कष्टकऱ्यानी मेहेनत घेतली म्हणून हि इमारत अस्तित्वात आली. त्यामुळे दररोज नचूकता काही क्षण त्या सर्वांसाठी द्या, मनापासून मनातल्यामनात हात जोडा आणि धन्यवाद माना, बास. कित्ती सोप्पं आहे ना हे? चला तर मग "दोन हस्तक एक मस्तक" वापरून दररोज वास्तुपूजन करू या. निरपेक्ष बरं का मंडळी, कारण त्या वास्तूने आधीच आपल्या सर्वांना भरभरून दिलं आहे आणि देत राहणार आहे अबोल पणे.   

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...