प्रत्येक सजीवाला तहान लागतेच आणि पाणी हेच जीवन देखील आहे. शरीररूपी यंत्राला व्यवस्थित सुरु ठेवण्यासाठी जलसमृद्ध असणं अत्यावश्यक आहेच. प्रत्येकाची तहान वेगळी आणि ती त्या व्यक्तीला ठाऊक असते, असावी. त्याची तसदी मग त्यानेच घेणं अपेक्षित नाही का? असो.
आताच्या दिवसात गाडी आणि पिशवी ह्या दोन्हीचे आकारमान बदलले आहे. दोन्ही गोष्टी भल्या मोठ्या झाल्या आहेत. दररोज कचेरीला न्यायाची पिशवी असो, नाही तर संगणकाची बॅग, आकार भलामोठाच, अनेक कप्पे वैविध्य चेनने एकतर बंद करता येणारे नाहीतर उघडे पण. अहो बॅगचं काय पण मोबाईल, पाण्याची बाटली, पेन, पेन्सिल आणि इतर सगळ्यांचाच आकार वेगळ्यापद्धतीने मोठा झाला आहे. गरज म्हणून किंवा नावीन्य म्हणून असेल कदाचित. गाड्यांचे तर विचारूच नका. माणसं घरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन आणि गाडी ७ आसन संख्येची. गाडी मोठी म्हणजे मग खूप कप्पे, बंद, उघडे, इकडे-तिकडे, सगळीकडे. आताशा प्रत्येक बँक आणि गाडीच्या कंपन्या लोन ची सहज सुविधा देत असल्यामुळे प्रत्येकजण गाडीचा मालक झाला आहे, अभिमानाने मिरवतो आहे.
इतकं सगळं असतांना आणि तहान लागत असतांना मग स्वतःला लागणारे पाणी घरून घेऊन लोकं का येत नाहीत कुणास ठाऊक? बरं, जर घरून पाणी आणायचं विसरलात तर रस्त्यात असंख्य छोटी मोठी दुकाने आहेतचं कि, तेथून घ्यावे पाणी विकत घ्यावे, जवळ बाळगावे आणि प्यावे, कोणी अडवलंय? तुम्ही जेथे जाता तेथे किमान पाण्याची सोय तर असणारच, पण यदा कदाचित नसेल, वेळ लागणार असेल सोय करायला तर अडू देऊ नये ना आपलं?. स्वाभिमानी, स्वतंत्र का असू नये माणसाने? जागा नाही एक स्वतःपुरती पाण्याची बाटली बाळगायला? का तहान लागते ह्याची जाणीव नाही? स्वयंसिद्ध व्हा आणि स्वतःची तहान तरी स्वतः भागवा, काही अंशी तय्यारी असू द्या. इतके कप्पे असून मग काय उपयोग? इतके शिकले सवरलेले असून काही फायदा नाही. प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं माणसाने. आणि वेळेवर तहान भागली नाही कि मग त्याचे परिणाम / दुष्परिणाम होतात, स्वतःवर आणि दुसऱ्यांवर देखील, दृश्य स्वरूपाचे असे, ते घातक ठरतात मग तब्बेतीला. हे सगळं सहज टाळण्यासारखं आहे. त्यामुळे काही सेकंद स्वतःच्या तृष्णेला / तृष्णेसाठी द्याचं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा