शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

सुवर्णमध्य

माझ्यामते प्रत्येक व्यक्ती मग ती कुठल्याही वयाची असो, कुठल्याही व्यवसायात असो नाही तर कुठलीही पार्श्वभूमी असो सातत्याने सुवर्णमध्य शोधतच मार्गक्रमण करत असते. किंबहुना थोरामोठ्यांचं म्हणणं पण अगदी तेच असतं कुठल्याही परिस्थितीत सुवर्णमध्य शोधा आणि पुढे व्हा. प्रत्येकाने शोधलेला किंवा त्याला गवसलेला सुवर्णमध्य हा त्याच्या दृष्टीने त्या वेळी योग्यच असतो, त्यामुळे त्या व्यक्तीचे जोडे परिधान केल्याशिवाय इतरांना ते समजणं आणि उमगणं अवघडंच. त्यामुळे अनाहूत सल्ले देणं टाळाच मंडळी. कारण एकतर प्रत्येकाच्या डोक्यावरचं आभाळ वेगळं असतं जरी ते सर्वांना सारखंच दिसतं दुरून, विचारल्याशिवाय आणि उमगल्याशिवाय उगाच "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असं नकोच. मी हे एक साधं सोप्पं उदाहरण घेऊन समजावून सांगते. तुमची तुमच्या घराची एक खोली आहे, त्याची लांबी, रुंदी, उंची आहे, परिमाण आहे, आकार आहे. सर्वसाधारण मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गीयांकडे एका खोलीत (झोपायच्या / अभ्यासाच्या) एक पलंग, एक कपाट, एक टेबल आणि अडगळीच्या किंवा जास्तीच्या वस्तू ठेवण्यासाठी कपाटावर कप्पे केलेले आढळतात. कपाटावरचे कप्पे हे मग छतापर्यंत ओढले किंवा बांधले जातात. त्यात कधीतरी लागणाऱ्या प्रवासाच्या वस्तू, गोधडी आणि इतर सामान रचले जाते. असे हे कप्पे बांधण्याकरता बहुतांशी खोलीतल्या दोन भिंतींचाच उपयोग केला जातो. वास्तुतज्ञांना किंवा सजावट तज्ज्ञांना ह्या बद्दल जास्त माहिती असते त्यांचे ठराविक समीकरणं असतात ह्या मागे. कधी कधी असं पण आढळून आलं आहे कि आटाळा असल्यामुळे त्या कप्प्यांची लांबी रुंदी नेहेमीपेक्षा थोडीशी मोठी पण घेतली असते. पण ह्या सर्वांमुळे मूळचा खोलीचा मध्य आणि कपाटांमुळे / कप्प्यांमुळे अवतरलेला खोलीचा मध्य वेगवेगळा असतो. विद्युतशास्त्रवत्ता किंवा वीजतंत्री जेव्हा पंखे लावायला येतो तेव्हा एकतर खोलिचाच मूळ मध्य साधला जातो कारण पंखा लावण्याची सोय बांधकाम करतांना जेथे दिली असते तेथे तो लावून मोकळा होतो. शक्य असल्यास सजावट तज्ज्ञ आवश्यक बदल घडवून आणतात आणि कप्पे धरून उरलेल्या जागेत मग मध्य साधून पंखा बसवला जातो, कारण पंखा हि एक अत्यावश्यक वस्तू आहे. आपल्या घरात जास्त वेळ किंवा बहुतांशी वास्तव्य आपलं असतं, पाहुणे हे काही क्षण, मिनिटं किंवा तास येतात आणि जातात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना जे योग्य वाटतं तेच खरं. बाकीच्यांनी एक तर बोलू नये किंवा त्यांच्याकडे प्रत्येकाने दुर्लक्ष करावं कुठलेही स्पष्टिकरण न देता. 

अगदी सहज सोप्प जे असेल, जे तुम्हाला रुचेल पचेल तसा मध्य साधा. बघा पलंगावर आडवं पडल्यावर, सहज छताकडे लक्ष गेलं तरी देखील खूप भन्नाट गोष्टी शिकायला मिळतात. सतत आजूबाजूला लक्ष ठेवा, टिपा आणि छोट्या छोट्या युक्त्या आजमावत सुवर्णमध्य शोधतं मार्गक्रमण करा, प्रत्येक बाबतीत.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...