लहानपणी हृदय असतं आणि ते धडधडतं हे दुर्लक्षित झालं किंवा होत असे. सगळं लक्ष खेळण्यात, धावण्यात, पळण्यात आणि अत्यानंदी राहण्यात. हो काही तरी उडायचं काही वेळ पोटाच्या वरच्या भागात पण धावणं, पळणं इतकं सततच होत कि त्यात काही विशेष वाटलंच नाही, काही वेळाने ते शांत व्हायचं, धडधडणं थांबायचं वगैरे कडे कधी लक्षच दिलं गेलं नाहीच. खेळ झाला कि यथेच्छ खायचं, तावच मारायचा आणि काहीही चालायचं, पुढ्यात मांडलेलं सगळं, घरचं, शेजारच्यांच, मैत्रीणीकडंच सगळं म्हणजे सगळं, "आने दो" हि वृत्ती होती, नकळत उभी राहिलेली. अभ्यास करणं अतिशय सोप्पं असायचं, झटकीनी व्हायचा, आणि खूप पळापळ केल्यामुळे आणि उत्कृष्ट जेवण झाल्यामुळे शांत झोप लागायची. तो काळ काही उठसुठ प्रेमात वगैरे पडण्याचा नव्हता आणि ते कश्याशी खातात, का? वगैरे कधी डोक्यात आलं देखील नाही त्यामुळे त्या वेळी धडधड वाढते म्हणतात ते देखील अनुभवलं नाहीच. समाज नियमांप्रमाणे वेळेवर लग्न, कार्य, मुलंबाळं, संसार देखील झाला पण उगाचच खालील शब्दात पेरल्याप्रमाणे नाही काही झालं.
"टिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी,
संपते अंतर झोक्यात"
किंबहुना हे सर्व अनुभवलं हि असेल पण खूपच नकळत आणि थोडक्यात, अगदी दिनचर्येचा भाग जणू.
हे असे सगळे वर्ष झर्रर्रकिनी सरले असल्यामुळे असेल कदाचित सध्या मला प्रकर्षाने जाणवायला लागलंय हृदयाचं अस्तित्व आणि वाढलेली धडधड. अगदी पुन्हा एकदा प्रचंड तरुण झाल्यासारखे मी दिवस अनुभवते आहे, कधीही ना पाहिलेले आणि जाणवलेले असे ते. प्रत्येकाला म्हणे तरुणपण एकदाच अनुभवता येतं पण माझ्या बाबतीत तसे नाहीच मुळी. अर्धशतकी वाटचाल झाल्यामुळे असं म्हणे कि आता इतकं धडधडणं चांगलं नाही, ते कमी करा. प्रकर्षाने व्यायाम करा, जिभेवर ताबा ठेवा, आणि यादी फारच मोठी आहे. आत्ता जरा ते पहिल्या प्रथम ठोके शांतपणे ऐकू यायला लागलेत आणि ते मी उपभोगणं थांबू?, छे छे मला जमणं अशक्यच. तर अश्या ह्या माझ्या नवीन अनुभवांसोबत आताशा प्रत्येक नवीन दिवस उगवतो आणि मावळतो आहे, नावीन्य पूर्वक असा, कधी नव्हे ते अनुभवायला देखील भाग्य लागतं नाही का? लहरीप्रमाणे उद्भवणारे ते तालबद्ध ठोके, ती घालमेल, त्या किंचित वेदना अगदी जणू "लव्ह अँथॅम" च हो. ह्या "लव्ह अँथॅम" मागची कारणे तर मला अजिबातच ठाऊक नाहीत, माहिती करून घ्यायची नाही, पण हा क्षणो क्षणी घडणारा बदल मात्र भरभरून उपभोगायचा आहे मला.
प्रत्येक टप्पा मी खूप भन्नाट अनुभवाला आहे माझ्या वेळी होता तसा, अगदी लहानपणापासून, आता हे टिक टिक, धड धड पण मनमुराद. इतकी वर्ष का लागली त्या हृदयाला मला त्याचे अस्तित्व जाणवून द्यायला किंवा त्याने का घेतली कोणास ठाऊक. त्या धड धड च्याच गतीने किंवा साथीने आता हे लिहिलं देखील जात आहे, प्रथमच.
"प्रथम तुुज ऐकता जीव वेडावला
उचलूनी घेतले निजरथी मी तुला
प्रथम तुुज ऐकता ..."
The paradox of living in general and of Life in particular; so beautifully portrayed. And as always, with such positivity.
उत्तर द्याहटवाEvery moment of life is an experience in itself; only the shades vary thus making it full of vibrant hue!