वंदनीय, आदरणीय श्री. रामदास स्वामीजींनी लिहिलेल्या अनेक श्लोकांपैकी महत्वाचा एक श्लोक आहे हा. माझ्या लहानपणीपासून शाळेत सुद्धा हा श्लोक शिकवला होता, आणि प्रत्येक वेळी जेवण पुढ्यात आलं कि मनात अजून देखील नकळत आणि आपोआप हात जोडले जातातच. त्या नंतर माझ्या मुलांच्या इंग्रजी शाळेत सुद्धा ह्या श्लोकाचं भाषांतर शिकवले आहे पण मतितार्थ तोच. विविध देशात देखील अन्नाचं महत्व सर्वश्रुत आहेच. किंबहुना प्रत्येक माणूस तसं बघितलं गेलं तर अन्नासाठीच वणवण, धडपड, कष्ट आणि बरेच काही करतो. दोन वेळा गरम साधं घरचं पोटभर मिळावं स्वतःला, कुटुंबाला आणि सर्व सजिवांना हेच तर त्रिवार सत्य आहे. मग इतकं सगळं असतांना देखील मी काही माणसांची सवय बघितली आहे. ती माणसं अनेकदा अन्न स्वतः वाढून घेतात पण उरलेलं अन्न झाकून ठेवत नाहीत. एखाद वेळा झालं तर ठीक आहे, विसरतो, पण नेहेमीच. हि काय सवय? उरलेलं अन्न घरचे, दारचे किंवा कोणीतरी इतर जीव खाणार ना? मग त्या अन्नाचा असा अपमान का करायचा? इतकी गर्मी कशासाठी? कोणाला काय दाखवायचं आहे? आपलं पोट भरलं त्यावेळी म्हणजे झालं? हे विचित्र पण नाही, त्या पेक्षा फार वेगळं आहे. माझ्या मैत्रिणीची सासू तर सर्वांसाठी चहा करणार निरुत्साही पद्धतीने, सर्वांच्या हातात नेऊन देणार पण सुनेच्या नाही. बरं असो, नका देऊ तिच्या हातात पण झाकून ठेवा, ते देखील नाही. ह्या अश्या असुरी वृत्तीची माणसं का असतात? कोणास ठाऊक.
अश्यांकडून काय नाही करायचं ह्याचं उत्कृष्ट शिकवण मिळते मात्र, हे हि नसे थोडके ना.
अन्नाला मान द्या, आदर करा कारण त्याशिवाय जगणं कठिण आहे. आदर करता येत नसेल तर कमीतकमी अनादर तरी टाळा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा