आज मी एक व्हिडिओ बघितला युट्युब वर. फोटो, मथळा / शीर्षक आणि अवधी मस्त होता, म्हटलं बघावं. त्यात एक लग्न सोहोळा चित्रित करून दाखवला आहे. लग्नाचे सारे विधी भारतीय पद्धतीने विधियुक्त केलेले दिसतं आहेत. लग्न लागल्यावर, वर माला झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेतांना देखील दिसले रिवाजाप्रमाणे. ज्या आजी आशीर्वाद देत होत्या त्या नव्वदीच्या पुढच्या वाटल्या. आणि सगळेच फार म्हणजे फार खुश दिसत आहेत. गुरुजी पण मनःपूर्वक शास्त्रोक्त पूजा सांगतांना ऐकू आले, बघितले देखील. मंडप, सजावट, साड्या, दागिने, हार, हळद समारंभ, मेहेंदी ई. सगळंच साग्रसंगीत झालेलं आढळलं. हे सगळं बघते वेळी खूप खास वाटतं होतं आणि अनेक मस्त प्रश्न मनात आलेच. माझ्या मते श्रुती आणि नीती ह्यांचे ते लग्न होते, म्हणून त्यांना श्रीती असं प्रेमाने बोलवत होते. दोघीही खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होत्या. त्या व्हिडीओ तरी सगळ्यांनाच हे मान्य होते हे देखील आढळले.
ह्या बाबतीत सासर कुठलं? कोण सासू म्हणून हुकूम चालवणार? कोणी मंगळसूत्र घालायचं? दोन माहेर आहेत, लाभलेत त्यांना, पण सासरचं काय? कोण कोणाच्या घरी राहायला जाणार आपलं घर सोडून? का त्या तिसऱ्याच घरी स्थायिक होणार? जे विधी करून घेतले गुरुजींनी त्यात काही फरक होता का? कारण वचनं फेऱ्याप्रमाणे असतात, मग येथे काय होतं? घर सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? कोण नमतं घेणार? सर्वसाधारण पणे आधी असं गृहीत धरलं जायचं आणि तसंच वागलं जायचं कि मुलगा बाहेर जाऊन कमवणार आणि मुलीने घराकडे जास्त लक्ष द्यायचं, नोकरी करणारी असली तरी देखील. येथे सुनेकडून अपेक्षांचं काय? जावयाचा मान कोणाला? लग्नाची बोलणी झाली तेव्हा इतकी चांदी, सोने द्या ई. कोण म्हटलं असणार? आणि असे ढीगभर प्रश्न उभे ठाकलेत माझ्या पुढ्यात.
तुम्ही नक्की मनात म्हणत असाल कि काय झालंय हिला? हे काय प्रश्न आहेत? अगं हा एक खास लग्न सोहोळा आहे, त्याला का ठराविक मोजमाप लावतेस? आणि कुठल्या जमान्यात वावरते आहेस. ह्या २०२४ मधे असं काहीही नसतं.
अगदी बरोबर. २०२४ काय, लग्न म्हणजे खरं तर असं काहीच नको. एकमेकांना लागणारी, हवी असलेली साथ देणे हे होय, ज्याला बॉटम लाईन असे संबोधतात. एकमेकांना सांभाळून पुढे जायचे. प्रत्येकवेळी खंबीर पणे उभे ठाकायचे. दोघेही अगदी प्रत्येक ठिकाणी एक आहेत, कोणीही वरचढ नाहीच हे दर्शवायचे. दोघांनी मिळून घर चालवायचे, फुलवायचे, आदर्श ठेवायचा, जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या, उणेदुणे ला थाराच न ठेवता, सासुरवास न घडवता, सततच्या अपेक्षा न बाळगता, घालून पाडून न वागता ई. हक्काचा साथीदार जो कधीच गैरसमज करणार नाही, झालाच तर दूर करेल आणि सर्वतोपरी साथ देईल, हे म्हणजे लग्न संस्था. आधीच्या कुटुंबीयांनी मुलांना आणि मुलींना भेदभाव करून लहानाचे मोठे केले. समाजाने देखील फक्त मुलांना जास्त महत्व दिले, एक दंभ तय्यार केला, टिकवला, आणि सगळंच रसातळाला गेलं. अपवाद आहेत, पण फारच कमी. मुलींना सामान हक्काने, प्रेमाने वागवलं असतं, लग्नाच्या मूळ संकल्पनेला जीवापाड जपलं असतं तर? तेच आता नावं ठेवायला मागे पुढे बघत नाहीत. मुलींना किती दिवस "तो" खालच्या थराला बघू शकणार. म्हणून मग आता त्याने त्याची शस्त्रे काढली आहेत असं दिसतंय आणि मूळ पदावर आणून ठेवलंय सर्वांना. घ्या म्हणावं आता. उत्कृष्ट सगळं सुरळीत सुरु होतं, स्वहस्ते घालवलं उगाचच, आणि अनेक इतर कारणांसोबत हे कारण घेऊन वाटचाल सुरु आहे, कायदा आला आहे आणि अश्या दृष्टीने, मूळपदावर येऊन सगळे कुटुंबव्यवस्था सुरु ठेवत आहेत. मुख्यत्वे भारतीय समाजाने, मुलांनी जागे होण्याची वेळ निघून गेली आहे, आता तरी डोळे उघडा, मुलींना मान द्या, कामं करा, शांतात नांदू दे घरात. पुन्हा एकदा सांगते उपवाद आहेत, बदल घडत आहेत, पण अगदी हळुवार.
खूप छान रित्या विषय मांडला आहेस...त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे
उत्तर द्याहटवाI agree. The change is happening with a slow pace.
उत्तर द्याहटवा