माझ्या लहानपणी शाळेत अडथळे असतांना, मांडले असतांना शर्यत कशी जिंकायची, त्यातून मार्ग कसा काढायचा सहज रीत्या हे शिकवले जायचे. कदाचित तो फक्त एक व्यायामाचा भाग होता, किंवा चुस्ती, स्फूर्ती, तंदुरुस्ती साठी असावा. पण सर्वांनाच त्यात भाग घ्यावा लागायचाच. तेव्हा प्रत्येकाचं खूप कौतुक किंवा अंजारणे - गोंजारणे होत नसे. NCC ची तुकडी होती आमच्या शाळेची, त्यामुळे देखील असेल कदाचित. किंवा त्या पल्याड काही वेगळं. शारीरिक, मानसिक अशी संपूर्ण प्रगती व्हावी म्हणून पण असेल कदाचित. तेव्हा गुरुजनांनी, PT च्या सरांनी सांगितले आणि आम्ही केले, बास. कुठलाही प्रश्न नाही, आडकाठी तर नाहीच नाही, शिवाय मस्त भन्नाट मस्ती करत करत शिकलो सगळं. खूप म्हणजे खूपच मज्जा यायची. ते अडथळे पडू न देता, कधी सरळ, तर कधी वाकडी करून, अर्थात बाकी सोबत धावणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन, कधी थोडीशी उडी मारून तर अनेक अश्या क्लुप्त्या वापरून ती शर्यत पूर्ण करायचा मानस असायचा. जिंकायचंच असं नाही, पण त्या अडथळ्यांना पार नक्की करायचं हे ठरलेले असायचे. आज इतक्या वर्षांनी, अर्धशतकी वाटचाल झाल्यावर अचूक अर्थ समजला मला, कि हे असे अडथळे पार करणे आमच्या शिक्षणाचा महत्वपूर्ण भाग का होता ते?
आज मस्त पाऊस पडत होता, साधारण साडेसात वाजले होते संध्याकाळचे आणि मी आषाढी एकादशीचा कार्यक्रम आटोपून घरी येत होते. माझ्या आजूबाजूला बहुतांशी चाकरमाने होते. प्रत्येकाला प्रचंड घाई होती घरी पोचायची, ते देखील वेळेत, वेळेच्या आत. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, भल्यामोठ्या आकाराच्या गाड्या, त्यात समोर उत्कृष्ट पद्धतीची नावीन्याने भरपूर अशी स्क्रीन, मोबाईल तर आहेतच, हे सगळं सांभाळत वाट काढायची. बरे हे काय कमी होतं तर त्यात भर ध्वनी प्रदूषणाची, प्रत्येकजण फेविकॉल ने हात चिकटल्यासारखे हॉर्न वाजवत गाडी चालवत आहेत. कारण नसतांना हॉर्न का? आणि तो देखील इतका सातत्याने, गरज नाहीच पण असो. म्हणजे बघा हं, पाऊस, खड्डे, भरपूर गाड्या, रस्त्यावर चाललेले बांधकाम, दिवसभराचा थकवा, भूक, हॉर्न, आणि असे इतर अनेक उभे केलेले नाही तर खरोखरचे अडथळे.
मस्त पाऊस पडत असल्यामुळे असेल कदाचित, किंवा भुकेची वेळ झाली होती म्हणून, थकवा दिवसभराचा घालवण्यासाठी किंवा अजून काही कारणांनी बहुतांशी सगळी खाऊ ची दुकानी दुथडी भरून वाहत होती. कोणतेही दुकान रिकामे नव्हतेच. मस्त भिजत लोक खाण्याचा, पिण्याचा यथेच्छ आस्वाद घेत होते. थंडी जाणवत असेल, किंवा सवय म्ह्णून सिगरेट पण पिणे सुरु होते ठिकठिकाणी. आता बघा ना, ती न पिणाऱ्यांसाठी, अश्यांच्या श्वासाला, किंवा श्वास घेण्याच्या एकंदरीत संस्थेला किती पळवाट काढावीच लागत असेल, सदोदित. म्हणजे जमल्यास शुद्धच हवा वापरायची, अशुद्ध च्या वाटेल फिरकायचे पण नाही, इकडून तिकडून, वाकडी वाट करून पण जमल्यास मस्त हवा श्वास म्हणून उपलब्ध करून द्यायची. कित्ती ती कसरत, मेहेनत ना? त्याचमुळे बहुतांशी म्हणतात वाटतं कि पॅसिव्ह स्मोक हा जास्त घातक आहे.
तेव्हा सुपीक डोक्यात प्रकाश पडला कि शाळेत इतक्या वर्षांआधी का ती शर्यत शिकवली, करवून घेतली आणि उभी केली ते? क्या बात है!!! इतक्या वर्षांनी ते शिकवलेले उपयोगात येईल हे ठाऊक नव्हतं. आणि हे सगळं करायचं ते शांत डोक्याने.
आज तर मी रिक्षात बसले होते, पण मी जेव्हा गाडीचे स्टिअरिंग व्हील हातात घेते तेव्हा मात्र निघायच्या आधी पेटपूजा करून घेते, फोन ला विश्रांती देते, अजिबात घेत नाही कोणाचा आलंच तर, घरच्यांना सांगून निघते, त्यामुळे ते फोन करत नाहीत, मोबाईल डेटा बंद करते, म्हणजे अडथळ्यांची शर्यत हि आनंदाची होऊन जाते, अडथळे होते का? असा प्रश्न पडतो मला. बघा म्हणजे काय ताकतीने शिकवलं आहे मला / आम्हाला शिक्षकांनी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा