मला अजूनही आठवतं मी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची, मी लहान असतांना, माझी दहावी झाल्या झाल्या. तेव्हा मला खोटं वाटेल पण फक्त पन्नास रुपये मिळायचे एका मुलाचे एका महिन्याचे. पण ते देखील स्वकमाईचे म्हणजे अप्रूपच होतं मला. त्या नंतर किंचित उडी मारली मी, डिग्री हातात यायचीच होती आणि पिटुकली नोकरी मिळाली काहीसे पंधराशे असे मिळायचे महिन्याला. मग ते व्यवस्थित महाविद्यालयात शिकवायला लागल्यावर दुप्पट झाले महिन्याला, पण अकराचं महिने मिळायचे. असं करता करता गाडी सुरु झाली. हळू हळू पगारवाढ झाली, कदाचित अनुभव आणि पुढील शिक्षण होतं गेलं, कुठेतरी वरिष्ठांना समजलं कि हे शिक्षकी रसायन आहे, त्यामुळे द्या थोडं नियमात बसेल तसं. सरकारने पण मग मनावर घेतलं कदाचित त्यांना उमगलं असेल कि महागाई शिक्षकाला पण सुटली नाही त्यामुळे स्थिती सुधारली. त्यावेळी खूप उड्या मारणं माहित नव्हतं शिक्षकी पेशात. बे-एके-बे, मस्त मज्जेत चालू असायची गाडी, अर्थात हे मला माहित असलेल्याचं फक्त सांगते आहे हो. आता लाखात कमाई आहे, असावीच लागते ह्या वाढत्या आणि वेगळ्या जगात तक धरून राहायला. हे सगळं होतं असतांनाच मला माझ्या पायांनी खुणा केल्या बऱ्याच, पण मी ढकला - ढकली करत राहिले, जवळपास तब्बल पाच वर्ष. आणि मग निर्णयाची वेळ आली, घेतला बाप्पाचे नाव घेऊन. त्या नंतर मग मुक्त विहार सुरु झाला. असंख्य महाविद्यालयं आहेत पुण्यात, बरेच खाजगी विद्यालयं पण आहेत, त्यामुळे मी इथून तिथे, जसे पाय साथ देतील तसे सुरु आहे मार्गक्रमण. आणि "बालपण देगा देवा" किंवा "एक चक्र पूर्ण होतं", ती सायकल पूर्ण होते इथेच असं म्हणतात ना अगदी माझे तसेच झाले आहे. त्या संस्थेला जमेल तेवढे देतात मानधन, काही जण येण्या-जाण्याचे देतात, त्यामुळे जेथून सुरवात झाली होती त्या मूळ पदावर मी येऊन पोचले पैशाच्या दृष्टीने. अर्थात तेव्हाचे पन्नास म्हणजे आज हजारोत आहेत पण तरी "फुलाची पाकळीच" ती. त्या मुक्त संहाराने मला खूप काही दिले, देत आहे, देत राहतील. खूप वेगवेगळी ठिकाणे, रस्ते, जागा, इमारती बघायला मिळतात. असे देखील विद्यार्थी असतात हे समजतं. नवीन, तरुण, उत्साहाने सळसळते शिक्षक बघायला मिळतात. नवनवीन सिल्याबस पण आहेत हे समजतं. वर्गांचे प्रकार, बाक, फळे, गणवेष, आणि असे इतर अनेक बाबी. क्या बात है!!! मस्तच. माझ्यासारखी भाग्यवान मी च. शिकवायचं जाऊन फक्त, बाकी काही नाही, जे मला मुळात माहिती होतं ह्या पेशा बद्दल. त्या नंतर कालानुरूप खूप म्हणजे खूपच बदल झाले, व्हायलाच हवेत, किंबहुना शर्यतीत टिकायचं म्हणजे जगापुढे राहायलाच हवे ना? मला ते भावलं नाही म्हणून मी काढता पाय घेतला, अक्षरशः. ते वर्तुळ पूर्ण झालं ह्याचा आनंद आहे, खूप नवीन चेहेरे पाहायला मिळतात, नवीन साड्या, नव्या जागा आणि संपूर्ण स्वातंत्र्य, हवे तेव्हाच काम करायचे. सुरवात केली तेव्हा देखील बाप्पाचं होता सद्बुद्धी द्यायला आणि आता देखील बाप्पाचं घडवून आणतोय सगळं, मी फक्त दिसते, असतो तोच शिकवायला. अजून काय हवंय. पावलं सगळं.
मंगळवार, २३ जुलै, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा