मी पक्की नागपूरकर. मला जो अंधुकसा तिथला खूपच गोड असा पाऊस आठवतो तो म्हणजे बहुतांशी कोणालाच त्रास न देणारा. अर्थात रात्री पडून जाणारा, रस्ते आणि मॅनहोल्स इतके अप्रतिम बांधलेले कि सकाळी सगळं व्यवस्थित, पाणी निसरून गेलेलं असं. मग माझी रवानगी ह्या माझ्या पुण्यात झाली. जशी जशी माणसं बदलली, माणुसकी पूर्णपणे रसातळाला गेली, नाहीशी झाली, तसेच वातावरणात, पर्यावरणात देखील निश्चित बदल घडले. किंबहुना ह्या आपल्या माणसांनीच घडवून आणले. अर्थातच त्याचा परिणाम पावसावर पण झाला, कधी अगदीच नाही तर कधी ढगफुटी, अशी टोके गाठली त्याने. पावसाळा जो आधी मस्त वाटायचा, कारण तो त्रासदायक नव्हताच मुळी शिवाय दारावर भुट्टे झणझणीत हिरवी चटणी लिंबू लावलेले यथेच्छ हादडता यायचे. हे काय कमी होतं म्हणून मग उकडून भाजलेल्या शेंगांवर ताव मारता यायचा. आई गृहलक्ष्मी असल्यामुळे तिला कधीही म्हणजे कधीही सांगावे लागलेच नाही कि मस्त वैविध्य भजी कर ती उत्कृष्ट चटण्या सोबत पुढ्यात असायचेच. क्या बात है?
पण जशी मी आई झाले, लहान मुले अश्या ह्या आगंतुक पाऊसात गरज नसतांना शाळेत जाऊ लागली, मला गुढग्या भर पावसात बाहेर पडावं लागायचं, गाडी चालवावी लागायची तेव्हा मात्र मी अथक संवाद सुरु केला, आणि तो सुरु ठेवला. मग मला कोणी स्वार्थी म्हटले तरी चालेल. आणि त्या गोष्टींचे सार म्हणता येईल, कि माझी मुलं तर मोठी झालीच, ती काळजीपूर्वक स्वतः जा-ये करू लागली, माझे बाहेर पडणे थांबले, तसा आमचा संवाद कमी झाला, मी त्याला त्रास देणं कमी केलं जे आधी अविरत सुरूच असायचं. पण त्याने ऐकलं माझं. माझी नाहीत पण बाकी लेकरं तर जातात ना शाळेला? आया बाहेर पडताचच ना चाकरमाने असल्यामुळे, मग? त्यांची काळजी कोण घेणार. आणि ह्या आपल्या पुण्य नगरीच्या पावसाचा स्वभाव खरा असा नाहीच. तो म्हणजे अगदी पिरपिर, थोडासा, अगदी कोणाला म्हणजे कोणाला मार पडू न देता संथतेने पडत असतो. आणि गेले दोन दिवस असाच शांत पणे तो त्याचे कार्य करतो आहे, माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या सारख्या असंख्य माउलींच्या हाकेला ओ देऊन आणि त्याचा मूळ पदावर येऊन, इतकं सुखावह वाटतंय म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. मस्तच. खूप धन्यवाद माझ्या ह्या अश्या पावसाला, ढगांना आणि संपूर्ण पाण्याच्या चक्राला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा